5/28/2020

दधिची

दरवर्षीप्रमाणे २८ मे येतो. सावरकरांच्या शौर्याच्या गाथांचे फॉरवर्ड पाठवतं, कुणीतरी त्यांच्या गीतांच्या रेकॉर्डिंग पाठवतं, कुणी त्यांना अभिवादन करतं, कुणी त्यांचे फोटो डीपी म्हणून, स्टेटस म्हणून लावतं, तर कुणी त्यांच्या लेखांचे संक्षेप किंवा त्यांच्याबद्दल त्याकाळात लिहून आलेल्या, बोलल्या गेलेल्या गोष्टींबद्दल माहिती पाठवतं.
तर कुणी मुद्दामहून माफीवीर टाईप पोस्ट टाकतं, कुणी ५ मिनिटांच्या टीआरपीसाठी लक्षवेधक शीर्षकं देऊन विशेष कार्यक्रम करतं (आणि मग लोकांनी तोंडी शेण घातलं की माफी मागतं), कुणाला त्यांनी बीफ खाणं योग्य होतं म्हणून सांगितल्याचं आठवतं, कुणाला ते कट्टर असल्याचा साक्षात्कार (सालाबादप्रमाणे) होतो.
दिवस संपतो.

इंग्रजीमध्ये एक सुंदर शब्द आहे - 'एनिग्मा'.
Enigma a person or thing that is mysterious or difficult to understand

ह्या पुस्तकी व्याख्येतही त्या शब्दाचा खरा मतितार्थ बसत नाही, पण तरी अंदाज येण्यासाठी एव्हढा अर्थ पुरे, की ज्याचा थांग लागत नाही असा - अथांग. तरी अथांग हे त्याचं शब्दशः भाषांतर झालं अर्थशः नाही. थोडक्यात एनिग्मा हा शब्दसुद्धा मला एनिग्मा च वाटतो. पण ते असो.

सावरकरांचं वर्णन करायचं झालं, तर ह्याहून योग्य शब्द नाही. आजच्या विकाऊ लोकसंपर्काच्या काळात काय, जन्महक्काने पदावर बसलेले आणि आजन्म 'राजकीय खेळ्या' खेळलेले सुद्धा स्वतःबद्दल 'समजायला शंभर जन्म लागतील' वगैरे बिरूदावल्या आपल्या चेल्यांकडून लावून घेतात. पण खऱ्या अर्थाने जो लोकांना तेव्हाही कळला नाही आणि दुर्दैवाने (त्यांच्या नव्हे, आपल्या) आजही कळला नाही, तो सावरकर आणि त्यांचा विचार हा एक एनिग्मा आहे.

फार पूर्वीदेखील मी त्यांच्याबद्दल लिहिलं आहे, असंच तारखांचे मुहूर्त धरून. त्यादिवशी मनातली एखादी दुखरी रग ठणकायला लागते. चीड येते उलटसुलट वाद ऐकून, विषाद वाटतो की नेहरू-गांधींच्या मार्केटिंग लाटेत अनेक अस्सल देशभक्त योद्ध्यांसारखी ह्यांचीही आठवण अज्ञातात विरून चालली आहे  , लाजही वाटते की आपण कितीही प्रयत्न केला तरी एक सहस्रांशदेखील ते धैर्य, ती चिकाटी, ते साहस, ती जिद्द, ती सहनशक्ती आणि पराकोटीची आत्मिक शक्ती स्वतःच्या अंगी बाणवू शकत नाही. पण आनंदही वाटतो की त्या त्या तारखांना पडणारे डीपी, स्टेटस वाढताहेत, देशाचे पंतप्रधान अभिमानानं आणि नम्रतेनं प्रत्येक तिथी तारखेला औपचारिकता म्हणून नाही तर मनापासून अभिवादन करत आहेत. पण हे सगळं स्वतःबद्दल आहे. ह्या माझ्या भावना, माझ्या अपेक्षा, माझा इगो.
त्यांनी कार्य केलं, देह ठेवला. कसली अपेक्षा होती म्हणून त्यातलं काहीच नाही, हे कसलं पाणी. इथे आपण साधी देणगी दिली तर दहा जणांना कळेल असा प्रयत्न करतो. विनामोबदला काहीच नाही. आणि तिथे अख्खं आयुष्यच ओवाळून टाकलं गेलं. ते कशावर? कशासाठी? आणि कुणासाठी?

मागे त्यांच्याबद्दल लिहिलं होतं तेव्हा मी अंदमानला गेलो नव्हतो. त्यानंतर जाणं झालं. आणि त्या भेटीनंतर सगळ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असं वाटलं. पुलं हरितात्यामध्ये म्हणतात तसं, की कधी वेळ आली तेव्हा तसं वागलो असं नाही, पण जेव्हा वेळ येईल तेव्हा तसाच धैर्याने, चिकाटीने वागेन अशी जी एक भावना मनात निर्माण झाली ती महत्वाची होती. 
माणसाचं खरं चारित्र्य तेव्हा कळतं जेव्हा त्याच्याकडे काही नसतं, मग अंदमान ही माणसाकडून त्याचं उभं माणूसपणच हिरावून घेण्याची जागा. उरतं काय माणसाकडे त्या क्षणाला? अंदमानचं सेल्युलर जेल हे एक तीर्थक्षेत्र व्हायला हवं. देशाचे अनेक सुपुत्र तिथे होते आणि त्यांनी ह्याच देशासाठी तिथे अनंत हालअपेष्टा भोगल्या. त्यांच्या त्या हालअपेष्टा त्यांनीच मिळवून दिलेल्या स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेनं स्वतःच्या कोषात गेलेल्या त्यांच्या देशबांधवांच्या विस्मरणात गेल्या आहेत. तिथे जाऊन त्यांना उजाळा मिळू शकतो. आज लॉकडाऊनमध्ये बसून आपण मजेत आहोत आणि फिरायला मिळत नाही म्हणून दुःखी आहोत, पण दिवस दिवस दुसऱ्या माणसाचं अस्तित्वही न जाणवता फक्त कोठडीच्या दाराखाली असलेल्या वधस्तंभाचे आक्रोश ऐकत राहणं म्हणजे काय ह्याची तिथे प्रत्यक्ष उभं राहूनही कल्पना करवत नाही. कमतरता झाली तर कोलू आणि चाबकाचे फटके होतेच. हे सगळं होऊनही ज्याची जीवनासक्ती गेली नाही, ज्याची इच्छाशक्ती मेली नाही, ज्याची आत्मिक शक्ती क्षीण झाली नाही आणि ज्याची प्रतिभा कोमेजली नाही, त्याच्या चारित्र्याबद्दल काय वेगळं लिहायचं.

जसा दिवस जातो, तसं तसं पुन्हा मनावर पापुद्रे चढायला लागतात. रोजची धावपळ, कोशातली धडपड, कुटुंब-मित्रमैत्रिणी-सहकारी, थट्टा-विनोद, आशा-निराशा, यश-अपयश ह्या गृहित धरलेल्या सगळ्या गोष्टींचे एक एक थर चढत जातात. ती वेदना बोथट होते. फक्त एका गोष्टीची शाश्वती असते, की मनात ह्या सगळ्यामागे एक स्फुल्लिंग धगधगतंय. आपल्या परीनं ते तसंच सांभाळायचंय, इतरांपर्यंत पोचवायचंय.

ते अथांग आहेत, एनिग्मा आहेत. ज्याने त्याने आपला अर्थ लावायचाय. 

ह्या दधिचीनं आपला देह केव्हाच ठेवलाय. जेव्हा संकट येईल, तेव्हा लढायला लागेल ते त्यांच्या विचारांचं, त्यांच्या गुणांचं, त्यांच्या दूरदृष्टीचं वज्र आपण पेलू शकतो का हाच खरा प्रश्न आहे?

3 comments:

  1. सावरकरांवर लिहिलेल्या जाणाऱ्या नेहमीच्या लाखांपेक्षा वेगळा विचार मांडलास खूप उत्तम।
    खूप छान मांडणी केली आहेस।

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद परिक्षित, चांगलं वाटलं प्रतिक्रिया वाचून!

      Delete
  2. मस्तच. आवडलं.

    ReplyDelete