11/13/2011

लिमिटेड माणुसकी

आमच्या ऑफिसमध्ये इतर ऑफिसेसमध्ये असतात तसाच एक पोस्ट विभाग आहे. आलेली पत्रं आणि जाणारी पत्रं ह्यांचं काम बघणारा विभाग. त्यामध्ये कुणाकुणाची आलेली पत्र ऑफिसभर फिरून पोचवण्याचं काम करणारा एक मनुष्य आहे. रोज सकाळी मी ऑफिसात पोचल्यानंतर २०-२५ मिनिटांनंतर तो मी बसतो त्या मजल्यावर कुणाकुणाची पत्र, लिफाफे पोचवायला येतो. मी माझ्या मजल्याच्या अगदी दरवाजातच दरवाजाकडे तोंड करून बसतो आणि त्यात मला अटेन्शन डेफिसिट डिसॉर्डर असण्याचा संभव असल्यामुळे हलकीशीही हालचाल झाली की माझं लक्ष विचलित होतं, त्यामुळे येणार्‍या जाणार्‍या प्रत्येक व्यक्तिकडे माझं लक्ष जातंच. आणि सहसा इथली सगळीच लोक सकाळी दिसणार्‍या अगदी अनोळखी माणसालाही ग्रीट करतात, तद्वतच गेली तीन वर्षं तो मला रोज सकाळी ग्रीट करतो आणि मी त्याला. गेल्या तीन वर्षांच्या ओळखीनंतर फायनली दोनेक महिन्यांपूर्वी तो माझ्याशी बोलायला थांबला. पण त्याला येतं फक्त इटालियन. अगदी गेल्या वर्षीपर्यंत मला तोडकंमोडकंही इटालियन बोलता येत नसे, पण आता थोडंफार बोलू शकतो त्यामुळे आमचा थोडाफार अर्थपूर्ण संवाद झाला. त्यावरून मला एक आश्चर्यकारक गोष्ट कळली, की इतर काहीकाही अगदी शिकल्या-सवरलेल्या इटालियन माणसांनाही भारतीय माणसांच्या इथे असण्याचा जो एक सल आहे, तो ह्या अल्पशिक्षित आणि ऑफिसातील खालच्या स्तरावर काम करणार्‍या माणसाला मात्र अजिबात नाही.
मी इथे केवळ अजून सहा महिनेच असेन, हे ऐकल्यावर त्याला जेन्युईनली वाईट वाटल्याचं मला जाणवलं. आधी त्याला वाटलेलं की मी इथेच नोकरी करतो. आणि अशी चुकीची समजूत असूनही त्याला भारतीय लोक इथे असण्याचं वाईट न वाटणं मला स्पर्शून गेलं.
त्यानंतर इथे एक विचित्र घटना घडली. लिबियन युद्धामुळे बरेच निर्वासित समुद्र पार करून इटलीत शिरले. ते मुख्यत्वे लिबियात काम करणारे परदेशी कामगार. म्हणजे एकतर आफ्रिकन्स किंवा पाकिस्तानी/बांग्लादेशी (ज्यांच्या देशांनी त्यांना परत नेण्याची कुठलीही सोय केली नाही). तर रेडक्रॉसनं त्या सगळ्यांना मिलानमध्ये आणलं आणि चक्क आम्ही ज्या फोर-स्टार रेसिडन्समध्ये राहतो, तिथेच त्यांची राहण्याची सोय केली. आमचा रेसिडन्स लॉसमध्ये चालला होता आणि रेडक्रॉसकडून मिळाणारा भरघोस पैसा हा हमखास कमाईचा मार्ग, हे इंगित आम्हाला नंतर कळलं. पण संपूर्ण गोर्‍या माणसांच्या लोकॅलिटीमध्ये आफ्रिकन आणि बांग्लादेशी/पाकिस्तानी मजूरांना आणून टाकल्यानं थोडंसं विचित्र वातावरण निर्माण झालं. त्यात भर म्हणजे रेडक्रॉस त्यांना देत असलेल्या सोयी - फुकट जेवण, कपडे, सायकली, मोबाईल फोन्स, इंटरनेट. सामान्य टॅक्सपेयिंग इटालियन माणसास राग न येता तरच नवल. आम्हाला भेटणारा प्रत्येक इटालियन ह्या गोष्टीबद्दल प्रचंड राग व्यक्त करतो. आणि गंमत म्हणजे आम्हालाही त्या निर्वासितांचा हेवा वाटतो. कदाचित मत्सर हा शब्द योग्य असेल. तद्दन मूर्खपणा आहे तसं वाटणं म्हणजे, मनाविरूद्ध देशाबाहेर, घराबाहेर राहणं ह्याबद्दल कुणाचा हेवा वाटण्यात काही अर्थ आहे का? पण वाटतो. त्याची कारणं अनेक आहेत.
पहिलं म्हणजे बालिश कारण, त्यातले पाकिस्तानी/बांग्लादेशी कुठल्याही ऍन्गलनी घरापासून दूर आहेत म्हणून दुःखी असल्यासारखं वाटत नाही. आमच्यातल्या अनेकांचा (इन्क्ल्युडिंग मी) असा कयास आहे की ते खरे लिबियन वॉर रेफ्युजीज नाहीच आहेत, ते असेच कुठल्यातरी बोटीत बसून (जसे नॉर्मली युरोपात घुसतात) तसे आलेत आणि लिबियन वॉरच्या नावाखाली मजा मारताहेत आणि इथेच सेटल होतील.
दुसरं  म्हणजे अजून बालिश, त्यांना फुकटात इटालियनही शिकवतात आणि कदाचित इथे सेटल व्हायला मदतही करतील, आणि आम्हाला साधं वर्किंग व्हिजा एक्स्टेन्शन मिळवायचं म्हणजे मारामारी. हे म्हणजे अधिकृतरित्या प्रयत्न केले तर त्रास आणि असं बोटीत बसून आलं की मजा. (बोटीत बसून येणं ही मजा नाही हे अर्थातच अधिक विचार केल्यावर आणि त्यामागची केविलवाणी अपरिहार्यता जाणवल्यावर कळतं).
तिसरं म्हणजे बालिशाहूनही बालिश, ह्या लोकांमुळे आजूबाजूचे गोरे कधीकधी आम्हालाही निर्वासित समजतात. आता कुणी म्हणेल त्यात काय? पण इट हर्ट्स. वंशवादाचं आणि वर्गवादाचं माईल्ड स्वरूप आहे हे. आम्ही इंजिनियर आहोत, नोकरी करतो बाकायदा आणि यू इक्वेट अस विथ दीज पीपल? गोर्‍या वंशवादाच्या दाट सावलीखाली चाललेली भुर्‍या वंशवादाची आणि वर्गवादाची घुसमट. ऑसम.
चौथं आणि थोडंफार प्रॅक्टिकल कारण म्हणजे, ह्या लोकांपैकी बर्‍याच लोकांना इंग्लिशची मारामारी आणि एव्हढ्या मोठ्या हजार खोल्यांच्या हॉटेलात ते सुरूवातीला बावरून गेले होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या खोल्याही लक्षात राहत नसत. मग रात्री अपरात्री फिरून आल्यानंतर ते चुकीच्या खोल्यांच्या बेल्स दाबत. बरं इथे पीप-होल्स नसल्यामुळे कळत नाही कोण ते. मग गोंधळ, गैरसमज. त्यात काळ्या लोकांबद्दल आपल्या मनात असलेली अनामिक भीती, जणू ती जनावरंच आहेत. अर्थात, त्यांनी काही कमी उपद्रव केले असं नाही. उगाच लोकांच्या घरांच्या बेल्स मारून नेलकटर आहे का? चाकू आहे का? असले धंदे करणेही चालू होते (अर्थात ह्यामध्ये पाक/बांगला आघाडीवर होते कारण त्यांना आपली भाषा येते). दिवसरात्र कॉरिडॉर्समध्ये फेर्‍या मार, मोठमोठ्याने गप्पा आणि हास्यविनोद. पण अर्थातच ते अशिक्षित कामगार लोक, त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता? ते काय बॉरबॉन किंवा स्कॉच पीत ब्रिज खेळत बसणारेत? असो. पण ज्यांच्या बायका आणि पोरं दिवसभर घरी एकटी असायची त्यांना ह्या लोकांचा प्रचंड वीट आला होता. ते आजही ह्या लोकांना शिव्या घालतात. त्यांच्याजागी ते बरोबर असणार, ह्यात वादच नाही. पण मला माझा स्टँड नक्की काय आहे हे आजही माहित नाही.
आता कुणी विचारेल, फोर स्टार हॉटेलमध्ये ह्या लोकांना कसंकाय ठेवू दिलं? तर पैसा हे एक कारण आधीच सांगितलं आणि दुसरं म्हणजे, जसे आमच्या कंपनीतले लोक हॉटेलात राहतात, तसेच आमच्या हॉटेलचं पोलिसांशीही कॉन्ट्रॅक्ट आहे. आमच्या हॉटेलात पोलिसही बरेच राहतात. त्यामुळे ह्या लोकांवर आपसूकच जरब आणि कंट्रोल राहतो. पुन्हा रेडक्रॉसचे लोक असतातच.

तर ही सगळी पार्श्वभूमी अशासाठी की परवा माझ्या ऑफिसातल्या पोस्टवाल्या मित्राशी पुन्हा भेट झाली. ह्यावेळेस कॉफी मशीनवर. मी आणि माझा एक मित्र त्याच्याशी बोलत होतो. गप्पा भारतीय सिनेमावरून तुम्ही कुठे राहतावर आल्या. मग जागेचं नाव सांगताच तो म्हणाला की मी तिथे काही वर्षं कामाला होतो. हे बोलल्यावर माझ्या मित्रानं सध्याच्या ह्या काळ्या लोकांच्या फुकट राहण्या/जेवण्याबद्द्ल त्याच्या भावना त्याला बोलून दाखवल्या, मी त्याचा चेहरा निरखत होतो. आणि तो बोलला, "ते बिचारे निर्वासित आहेत रे. काय करणार आपण? परवाच मी एका निर्वासिताबद्दल बातमी पाहिली. कचर्‍याच्या डब्यात पडलेली बाटली उचलून त्यातला उरलेला ज्यूस पित होता."
त्या माणसाला प्रत्यक्ष स्थिती काय आहे ह्याची जास्त कल्पना नसावी. कारण इथल्या निर्वासितांची तशी चैनच चालू आहे. पण तरीही त्याच्याइतकीच, किंबहुना त्याच्याहूनही कमी माहिती असलेले वेल-टू-डू सुशिक्षित इटालियन लोकही त्या लोकांना ऍट स्लाईटेस्ट प्रोव्होकेशन शिव्या घालायला कमी करणार नाहीत. पण एक अल्पशिक्षित, अल्प पगारावर काम करणारा सामान्य इटालियन मनुष्य ह्या घटनेकडे कुठलाही चष्मा न घालता, निव्वळ माणुसकीनं पाहताना बघून मला एकदमच हलायला झालं.
तो ज्या नजरेनं आम्हाला बघतो, त्याच नजरेनं त्या निर्वासितांकडे पाहतो आणि त्याच नजरेनं इतरही कुठल्या अगदी श्रीमंत इटालियन माणसाकडेही पाहतो. कुठे शिकला असेल तो हे? जे आमच्या ऑफिसात काम करणारे काही गोरे इंजिनियर्सही नाही शिकू शकले? जे आम्हीसुद्धा वर्षानुवर्षं शिकूनही आणि गोर्‍यांचे जुलूम सहन करूनही नाही शिकू शकलो? आमची माणुसकी लिमिटेडच का राहिली?

'शिंडलर्स  लिस्ट' पाहिल्यानंतर मी ओस्कार शिंडलरबद्दल वाचत होतो. त्यामध्ये शिंडलरनं नक्की हे सगळं का केलं? आपला जीव आणि आपली सारी संपत्ती पणाला लावून त्यानं एव्हढ्या ज्यूंचे प्राण नक्की का वाचवले? अचानकच एक संधीसाधू कारखानदार इतका मानवतावादी कसा झाला? ह्याची उत्तरं शोधताना शिंडलरला एका मुलाखतकारानं विचारलं. तेव्हा शिंडलरचं उत्तर अतिशय साधं होतं, "मी त्या सगळ्यांना ओळखत होतो. आणि जेव्हा तुम्ही कुणाला ओळखता तेव्हा तुम्ही त्याच्याशी एका किमान सभ्यतेच्या पातळीनं वागता."
बस? इतकंसं कारण? त्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याइतकं?
तो म्हणतो मी ओळखतो, म्हणजे काय ते त्याचे मित्र किंवा कौटुंबिक मित्र नसतात. ती त्याच्यासारखीच चालती बोलती माणसं असतात, ज्यांना तो रोज बघतो.
अर्थातच अनेक कंगोरे असतील शिंडलरच्या मनात. कितीतरी मोठी द्वंद्व उद्भवली असतील. अगदी सगळं संपल्यावरही, मी गाडी विकली असती तर अजून दहा जीव वाचले असते हे म्हणून शोक करणार्‍या शिंडलरच्या मनाचा ठाव कुठल्याही भाषेतल्या कुठल्याही शब्दांनी घेण निव्वळ अशक्य आहे. पण त्याचे साधे शब्द एक साधी भावना दाखवतात. माणुसकीची भावना. एक माणूस दुसर्‍या माणसाशी कसा वागतो बस. 

इतकं साधं आहे सगळं. पण तसं वागणं महा कर्मकठीण. माणसांतली माणुसकी बाहेर यायला बरेचदा त्याच्यातल्या माणसावरच हल्ला होणं गरजेचं ठरतं. जसं, 'डिस्ट्रिक्ट ९' सिनेमातला विकस जसजसा माणसापासून परग्रहवासीय जीवांमध्ये ट्रान्स्फॉर्म होत जातो, तसतसं त्याच्यातलं माणूसपण, त्याच्यातली माणुसकी वाढत जाते.
थोडक्यात, माणसाचा जन्म घेऊन माणूस बनणंच जगातली सर्वांत कठीण गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही.

11/07/2011

मुखवटा

"डॉक्टर, हे घ्या आजचं पत्र!" नर्सनं एक कागद आणून डॉ. म्हांब्रेंकडे दिला.
"हे तेच का?" अभिजीतनं विचारलं.
"होय." डॉक्टर तो कागद नीट निरखत म्हणाले. "लिखाण बरंचसं गचाळ होऊ लागलंय." डॉक्टर तो कागद अभिजीतच्या हातात देत म्हणाले.
"ह्म्म. म्हणजे केस बिघडत चाललीय की सुधरत चाललीय." अभिजीत त्या लेखनाचा अर्थ लावायचा प्रयत्न करत होता.
"मला वाटतंय सुधारणा आहे. कारण बिघडलेलं हस्ताक्षर म्हणजे त्याच्या दुसर्‍या पर्सनालिटीचा त्याच्यावरचा कंट्रोल कमी कमी होतोय."
"पण कदाचित हे फ्रस्ट्रेशन वाढल्याचंही लक्षण असू शकतं ना? म्हणजे, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट डॉक्टर, पण माझ्या थिसिससाठी मी इतर ज्या केसेस बघितल्या, त्यावरून असं वाटलं मला."
"ह्म्म शक्य आहे." डॉक्टर चष्म्याची काच साफ करत म्हणाले.
अभिजीत ते पत्र निरखून वाचू लागला.

-----

फेड इन. पाण्याची मोठी लाट दरवाज्यावर एकदा धडकते. फेड आऊट. कट टू बेडरूम. पाच वर्षांचे सुशील आणि आयुब पलंगावर घाबरून बसलेत. कट टू आऊटसाईड. पाण्याची लाट खिडक्यांवरही आदळतेय. कट टू इनसाईड. पाण्याचा लोट दरवाजा तोडून आत शिरतो आणि हॉलमधला टीपॉय त्यात वाहतो आणि फिशटँकचा स्टँड कोलमडल्यामुळे फिशटँकही पाण्यात पडतो. प्रिफरेबली फिशटँक न फुटता, पाण्यातच तरंगत राहतो. आतल्या माशांच्या मोशनवर झूम इन. थोड्याच वेळात कशावरतरी आपटून फिशटँक फुटेल तोपर्यंत फॉलो करायचा. कट टू बेडरूम. सुशील आणि आयुब एकमेकांना घट्ट धरून बसलेत.चादरी स्वतःभोवती गुंडाळून. कट टू आऊटसाईड बेडरूम. पाण्याचा लोंढा बेडरूमचा दरवाजाही तोडून आत शिरतो. कट टू आऊटसाईड. पाण्याचा दुसरा लोंढा खिडक्या तोडून आत शिरतो. कट टू स्काय व्ह्यू. चहूकडे पाण्याचं थैमान. पाण्याखाली गेलेली घरं. भल्याथोरल्या झाडांचे नुसते दिसणारे शेंडे. कट टू बेडरूम. आयुब छताजवळच्या झरोक्यात थोडासा अडकतो आणि त्यातून बाहेर फेकला जातो. कट टू शेजारच्या घराचं छप्पर. आयुब तिथेच बेशुद्ध पडलाय. पाऊस मंदावलाय. पाणी ओसरलंय. कट टू रोड. बंद पडलेल्या असंख्य गाड्या. कट टू वन पर्टिक्युलर कार. एक जोडपं काचा बंद असलेल्या गाडीत गुदमरून मेलंय. कट टू आयुब. तो डोळे चोळत उठतो आणि घराकडे बघतो. कट टू झरोका. अंगानं लहानसा आयुब त्यात अडकल्याचा फ्लॅश. पुन्हा झरोक्याचा स्टिल शॉट. अन मग हळूहळू कॅमेरा खाली येऊन उघड्या खिडकीवर स्थिरावतो. कट टू इनसाईड बेडरूम. सगळं अस्ताव्यस्त, पण कुठेही सुशील नाही. कॅमेरा एका मोडक्या फोटोफ्रेमवर स्थिरावतो. सुशील अन त्याच्या आईवडलांचा (बंद कारमधलं मृत जोडपं) फोटो. कट टू स्काय व्ह्यू. शहरभर पडलेल्या मोडक्या कार्स, घरांचे भाग, झाडं अन प्रेतं. कट टू आयुबचा क्लोज-अप. फेड आऊट.
एव्हढं लिहून त्यानं वर पाहिलं. दूरवर निरूद्देश नजर फिरवली आणि एक उसासा टाकून चहाचा अजून एक घोट घेतला. पुन्हा एकदा लिहिलेल्या मजकुराकडे पाहिलं. त्याला एकदम जडत्व आल्यासारखं वाटलं. हातातलं पेन त्यानं खाली ठेवलं आणि पुन्हा दूरवर पाहण्यात हरवून गेला.
"एक्सक्यूज मी." त्यानं आवाजाच्या दिशेनं पाहिलं. "मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. रोज तुम्हाला इथे बसून लिहिताना पाहतो." त्याच्या चेहर्‍यावरचे त्रासलेले भाव पाहून तो पोरगेलासा युवक घाईघाईनं पुढे म्हणाला. "तुम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं. पण उद्या मी देश सोडून दोन-तीन वर्षांसाठी शिकायला परदेशी चाललोय. तर जाण्यापूर्वी तुमची सही घ्यावी म्हणून तुम्हाला डिस्टर्ब केलं. खरंच सॉरी!"
तो हलकंसं हसला आणि त्यानं पेन उचललं. त्या युवकानं स्वतःच्या बॅगेतून चटकन त्यानंच लिहिलेलं एक पुस्तक काढलं आणि त्याच्यासमोर धरलं. त्यानं स्वतःच्या पुस्तकाचं कव्हर निरखलं. पुस्तकावर एका चेहर्‍याची सावली अर्धी काळी आणि अर्धी पांढरी काढलेली होती आणि मानेच्या मुळाशी 'मुखवटा' हे शीर्षक फराटे ओढल्याप्रमाणे लिहिलेलं होतं. आणि कोपर्‍यात त्याचं नाव. स्वतःचं नाव त्यानं बराच वेळ टक लावून पाहिलं आणि मग पुस्तकाच्या नावाकडे पाहून तो स्वतःशीच हसला. मग पहिल्या पानावर त्यानं संदेश लिहिला, "स्वतःची ओळख बनवा." आणि खाली स्वाक्षरी करून त्याला दिलं. एव्हढ्यात मोठे फटाके फुटल्याचा आवाज आला आणि पाठोपाठ काचा फुटल्याचा. दोघांचीही नजर आवाजाकडे गेली आणि त्यांच्या सर्वांगाचा थरकाप उडाला. दारात दोन मशीनगनधारी तरूण उभे होते. अन त्यांच्या कोवळ्या चेहर्‍यांवर खुनशी भाव होते. त्यांनी खिशातून दोन ग्रेनेड्स काढून भिरकावली. प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे हे दोघेजण टेबलखाली शिरून पाहू लागले. धूर कमी झाल्यावर थोडं नीट दिसू लागलं एव्हढ्यात दोघांची बखोटी धरून एकानं त्यांना टेबलाखालून बाहेर ओढलं आणि त्यांच्यावर मशीनगन रोखून उभा राहिला. त्यांचं टेबल भिंतीकडे असल्यानं ते सापळ्यातच अडकलेले होते. दुसर्‍यानं बंदुकीचा धाक दाखवून उर्वरित टेबलांवरच्या अद्याप जिवंत असलेल्या लोकांना ह्यांच्याजवळ आणलं आणि एका ओळीत उभं केलं. ह्या गदारोळात तो लिहित असलेले कागद इतस्ततः पसरले. तो विषण्णपणे सर्वत्र पसरलेला रक्त अन मांसाचं थारोळं पाहत होता. त्यानं असंच थारोळं कित्येक वर्षांपूर्वी पाहिलं होतं, फक्त कारणं वेगळी अन कर्ते वेगळे. त्यावेळेसचं संकट अस्मानी होतं, ह्यावेळेस इन्सानी. त्याच्यासोबतचा मुलगा पुरता गर्भगळित झाला होता.

-----

"हे काही नीट वाचता येत नाहीये डॉक्टर." अभिजीत वाचण्याचा प्रयत्न सोडत म्हणाला.
"मजकूर नेहमी तोच असतो, त्यामुळे मला सवयीनं वाचता येतो." डॉक्टर स्मित करत पुढे म्हणाले. "तुमच्यासाठी सुरूवातीच्या काळातलं एक पत्र काढतो." असं म्हणत डॉक्टर उठून त्यांच्या कपाटाकडे गेले.
"पण असं नक्की काय घडलं होतं त्यादिवशी की ह्यांच्या डोक्यावर इतका परिणाम झाला." अभिजीत म्हणाला.
"नक्की काय घडलं ते, ते स्वतः सोडून कुणालाच माहित नाही आता." डॉक्टर एक फाईल काढत पुढे म्हणाले, "नेहमीच्याच कॅफेमध्ये बसून पुढच्या सिनेमाची स्क्रिप्ट लिहित होते. तेव्हा अतिरेकी हल्ला झाला. अतिरेक्यांनी ग्रेनेड्स फेकली आणि अंदाधुंद गोळीबार केला. हे एका प्रेताखाली अडकले आणि चारीबाजूंनी रक्तामांसाचा खच पडला होता. हे निश्चेष्ट पडून राहिल्यामुळे बहुतेक हे जिवंत की मेलेले ते अतिरेक्यांनाही कळलं नसावं, त्यामुळे ते तिथून निघून गेले. पुढे अतिरेक्यांचंही एन्काऊंटर झालं. त्यामुळे त्या कॅफेमध्ये असलेल्यांपैकी हे एकटेच जिवंत आहेत आता."
डॉक्टरांनी एक कागद काढून अभिजीतसमोर धरला.

-----

"भाईजान, जल्दीसे उडा डालते हैं सबको, आगे भी जाना है. यहां से स्टेशन और फिर हो सके ते अस्पताल में जाके बाकी भाईयों की मदद करनी है!" ह्या वाक्यानं सगळ्यांचीच गात्रं गोठली. पण त्याच्या चेहर्‍यावर एक वेगळंच समाधान झळकू लागलं. तो वेगळ्याच नजरेनं त्या हलणार्‍या बंदुकींच्या नळ्यांकडे पाहू लागला. त्याला काही ऐकू येईनासं झालं. ते रक्त-मांसांचं थारोळं अन पस्तीस वर्षांपूर्वीची ती चित्र, सगळं एकामागोमाग एक त्याच्या डोळ्यांपुढे फिरू लागलं. आणि अचानक बंदुकीच्या नळीच्या धक्क्यानं तो भानावर आला.
"चले पँट उतार." दोघांमधला एकजण त्याच्या बरगडीवर बंदुकीची नळी आपटत त्याला दटावत होता. त्याला काहीच कळेना.
"चल उतार साले पँट, नहीं तो ऐसेही उतार दूंगा गोली." असं म्हणून त्यानं बंदुकीची नळी त्याच्या बक्कलात अडकवून ओढली आणि त्याची पँट खाली पडली. बंदुकीची नळी त्यानं जेव्हा अंतर्वस्त्रात घातली तेव्हा त्याचं डोकं ताळ्यावर आलं आणि त्याला सगळ्या गोष्टींचा संदर्भ लागला. त्याचं लक्ष बाकीच्यांकडे गेलं आणि बंदुकीचा दस्ता त्याच्या डोक्यात बसला आणि तो खाली पडला. डोक्यात पुढचा काही विचार येण्याच्या आतच उभ्या सगळ्यांवर गोळ्यांचा वर्षाव झाला. तो जमिनीवर स्वतःच लिहिलेल्या कागदांच्या आणि रक्त-मांसाच्या चिखलात पडला होता. "मुझे भी मारो. मुझे भी मारो." असं त्याला ओरडावंसं खूप वाटत होतं पण तोंडातून शब्दच फुटत नव्हते. त्याची सही मागणार्‍या मुलाचं प्रेत त्याच्या अंगावरच पडलं होतं आणि त्याला अचानकच खूप जडत्व आल्यासारखं वाटू लागलं. तो तसाच निपचित पडून राहिला.

-----

अभिजीत परत परत ते पत्र वाचत होता.

"तारीख - २७ नोव्हेंबर

सुशील,

कुठे आहेस तू? आहेस ना तू खरंच? तू असायलाच हवंस रे. तू जर नसशील तर कसं चालेल. मी किती ओझी उचलू रे! हे ओझं असह्य होत होतं म्हणून मी ते उतरवायचा प्रयत्न करत होतो. पण त्यात दुसरंच ओझं डोक्यावर आलं. आणि आता हे नुसतंच असह्य नाही तर अशक्य झालंय. मी एकटा हा भार उचलू नाही शकणार. एक तर तू ये, नाहीतर मला यावं लागेल. आजपासून शंभर दिवस मी तुझी वाट पाहीन. त्यानंतर मी तुझ्याकडे येईन.

तुझाच आयुब."

"हा आयुब नक्की कोण डॉक्टर?" अभिजीत म्हणाला.
"हा सुशीलकुमारांचा लहानपणीचा जिवलग मित्र."
"?"
"सुशीलकुमारांच्या आई-वडलांकडे घरकामाला येणार्‍या बाईचा तो मुलगा. ते लहान असताना, घरकामाची बाई आयुबला सुशीलकुमारांच्या घरी सोडून इतर घरी कामांना जायची. ज्यादिवशी अचानक पूर आला, त्यादिवशी सुशीलकुमारांचे आई-वडील पावसाचा रागरंग बघून अत्यावश्यक सामानाचा साठा करावा ह्या इराद्यानं बाहेर पडले आणि लगेच येता येईल हा अंदाज असेल कदाचित, पण त्यांनी मुलांना घरीच ठेवलं. अन बाहेर मात्र ट्रॅफिकचे बारा वाजले आणि अचानक आलेल्या पुरानं सगळंच गणित बिघडवलं. पुरात सुशीलकुमार वाचले, पण आयुब मात्र कुठेतरी वाहून गेला. तो कुठे गेला ते कुणालाच कधीच कळू शकलं नाही. सुशीलकुमारांच्या आई-वडीलांना त्यांच्या पालकांनी, प्रेमविवाह केल्यामुळे टाकलं होतं. पण ह्या दुर्घटनेनंतर त्यांनी कधी तोंडही न पाहिलेल्या आपल्या नातवाला जवळ केलं, अन सुशीलकुमारांचं आयुष्य वाया जाण्यापूर्वी सावरलं. पण त्या जखमेच्या खुणा त्यांच्या मनावरून कधीच पुसल्या गेल्या नाहीत. त्यांनी आजवरची सगळी पुस्तकं आयुबला डेडिकेट केलीत आणि प्रत्येक सिनेमाच्या सुरूवातीला त्यांच्या आई-वडलांच्या फोटोनंतर ज्या ओळी लिहून येतात, त्यात हा सिनेमा आयुबला डेडिकेट केल्याचंही लिहून येतं."
"येस, येस, तो फोटो जो येतो, तो पुरातूनही वाचलेला त्यांच्या आई-वडीलांचा एकमात्र फोटो आहे नाही का? तो अर्धा फाटलेला आहे पुरात. वडलांचं धड आणि सुशीलकुमार अख्खेच त्यामधून गायब आहेत. फक्त आई आणि वडलांचा चेहरा."
"होय बरोबर. तर असा हा आयुब. इम्प्रेशनेबल एजमध्ये असं झाल्यावर मनावरचे ओरखडे कायम राहतात." डॉक्टर गंभीरपणे म्हणाले.
"तरी मृत्यूच्या तांडवामुळे डोक्यावर परिणाम होणं समजू शकतो मी. पण पस्तीस वर्षांपूर्वी ताटातूट झालेल्या मित्राच्या पात्राची कल्पना करून आपण स्वतःच तो आहोत असं कल्पून मग स्वतःलाच रोजरोज पत्र लिहिण्याचं कारण मला समजू शकत नाहीये." अभिजीत म्हणाला.
"आधी मला पण कळत नव्हतं की ह्या दोन घटनांचा संबंध कसा लावायचा. मग त्यांच्या सेक्रेटरीनं मला सांगितलं की जेव्हा हा हल्ला झाला, तेव्हा ते ज्या सिनेमाची स्क्रिप्ट लिहित होते, तो त्यांच्या स्वतःच्या आयुष्यावरच बेतलेला होता. त्यांची आत्मकथा. त्यामध्ये ते पाच वर्षांचे असताना आलेला तो पूर आणि त्यामध्ये ते कसे त्यांच्या मित्राबरोबर अडकले आणि कसे ते एकटेच वाचले आणि ह्या सगळ्यामुळे त्यांच्या आयुष्याला वेगळंच वळण कसं लागलं, हे सगळं ते दाखवणार होते. कदाचित हा सगळा स्क्रिप्टचा एक भाग असेल जो ते तेव्हा लिहित होते. तशीही त्यांच्या सिनेमाची स्टाईल थोडी फँटॅस्टिकलच असते."
"पण म्हणून असं? दिवसरात्र फक्त त्याचाच ध्यास घ्यायचा, आणि इतका की आपण स्वतःच आयुब आहोत असं समजू लागायचं?"
"मानवी मनाचे खेळ शंभरातून नव्याण्णव वेळा कुणाच्याही समजण्यापलीकडचे असतात.

अभिजीत ते जुनं पत्र आणि त्यादिवशीचं ताजं पत्र ताडून पाहत होता. आणि एकदम तो चमकला.
"डॉक्टर, हे त्यांनी लिहिलेलं पहिलं पत्र आहे?"
"हो. का? काय झालं?"
"डॉक्टर, ह्याच्यावरची तारीख वाचलीत? २७ नोव्हेंबर."
"हो २६ नोव्हेंबरला दुर्घटना झाली आणि २७ ला ते इथे भरती झाले."
"डॉक्टर! आज ६ मार्च आहे." अभिजीत उठून उभा राहत म्हणाला.
"मग?" डॉक्टरांना कळेना.
"डॉक्टर आज शंभरावा दिवस आहे."
"डॅम!" डॉक्टर ताडकन उठत म्हणाले. टेबलावरची बेल वाजवत त्यांनी कोट उचलला आणि ते केबिनबाहेर पडले. पाठोपाठ अभिजीतही बाहेर पडला.
"नर्स, सुशीलकुमारांवर आज स्पेशल लक्ष ठेवा. आज काहीतरी होऊ शकतं. चला आधी माझ्यासोबत, मी एकदा चेक करतो त्यांना."
डॉक्टर अन अभिजीत नर्ससोबत सुशीलकुमारांच्या खोलीकडे गेले. नर्सनं खिडकीतून डोकावून पाहिलं.
"झोपलेत ते." नर्स म्हणाली अन तिनं दरवाजा उघडला.
डॉक्टर अन अभिजीत आत गेले. डॉक्टरांनी नस चेक केली अन त्यांना धक्काच बसला. दोन्ही हातांच्या नस इंटॅक्ट होत्या, गळा नॉर्मल होता. तेव्हढ्यात डॉक्टरांनी प्रेताचा खिसा चेक केला. आणि त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. त्यांनी प्रेताचं तोंड उघडलं आणि त्याच्या घशामध्ये कोंबलेला एक कागदाचा बोळा बाहेर काढला.
"स्मार्ट वे टू कमिट स्युसाईड." डॉक्टर उसासा टाकत म्हणाले.
"हे काय आहे?" अभिजीतला कळेना.
कागदाचा बोळा उघडत डॉक्टर म्हणाले, "आयुबचा लहानपणीचा फोटो. ते कायम स्वतःजवळ ठेवायचे. नो वन थॉट ऑफ धीस."
अभिजीत तो फोटो निरखत होता. 'कुठल्यातरी मोठ्या फोटोतून फाटून उरलेला वाटतोय.' तो स्वतःशीच म्हणाला.

(ही कथा मोगरा फुलला'२०११ च्या दिवाळी अंकातही इथे प्रकाशित झालेली आहे.)

11/03/2011

बिल

"साहेब, ह्यावेळच्या विस्तारातपण जर त्या समाजाला एकही मंत्री मिळाला नाही, तर ते परत दहा आमदारांची धमकी द्यायला लागतील."
"अहो लक्ष देऊ नका तिकडे. दहा आमदारांच्या धमक्या गेली अडीच वर्षं देताहेत. समित्यांवर बसून मजा मारायला मिळतेय, ती पण जाईल त्यांची. पुन्हा दहानं मोठा फरक पडायचा नाही, तीन-चार इथून तिथून सहज मिळून जातील. तुम्ही त्यापेक्षा गृहमंत्रीपदाचं काय करता येतं ते बघा. मागच्या अतिरेकी हल्ल्यात राजीनामा घेतला होता आपण आबांचा, आता तर एक निवडणुकही उरकलीय, बराच काळ गेलाय. पुन्हा बसवा त्यांनाच."
"अहो पण साहेब ते मित्रपक्षाचे लोक.."
"त्यांना बोंबलू दे हो. त्यांची मलिदेवाली खाती जाणार नाहीत तेव्हढं बघा म्हणजे झालं. आणि दोन-चार राज्यमंत्री इथे-तिथे देऊन टाका."
"पण ते ह्यावेळेस अजून मंत्री मागणार नाहीत कशावरून."
"मागतील ना, पण आमदार आपले जास्त आहेत. गेल्यावेळेस त्यांचे जास्त होते, तेव्हा त्यांची दादागिरी आपण सहन केली. आघाडीचा धर्म आहे तो!"
"ह्म्म.. पण साहेब, ह्या विस्ताराची आत्ता फारशी गरज नव्हती. फुकटच मित्रपक्षाला दोन-चार मंत्रीपदं खैरातीत द्यावी लागणार, आपले आमदार कमी होते, तेव्हा आपल्याला खूपच कमी मंत्रीपदं होती."
"भाऊ, अहो आपल्याला आपले अपक्ष राखायचेत की नाहीत? आणि उद्या विकास पार्टीवाल्यांची कुलंगडी बाहेर पडली आणि त्यांचा राजीनामा मागायची आपल्यावर पाळी आली, तर त्यांचे वीस आमदार राजीनामे फडकवतील, तेव्हासाठी बॅक अप हवा आपल्याकडे."
"ह्म्म."

-----

"ए अकबर, ती हातोडी दे रे." विनय ओरडला.
पंधरा वर्षांचा अकबर धावत धावत हातोडी घेऊन आला. विनयनं अलगद खाली वाकून ती हातोडी घेतली आणि मग सराईतपणे बांबूंच्या त्या सांगाड्यावरून चढत वर गेला. कोपर्‍यावरती खिळा ठोकून त्यात कापडाचं टोक अडकवलं आणि पुढच्या कोपर्‍याकडे गेला. अकबर कुतूहलानं हे सगळं पाहत होता.
भव्य मैदानावरती तितकाच भलाथोरला तंबू उभारण्याचं काम सुरू होतं. दुसर्‍या दिवशी मंत्रिमंडळाचा शपथविधी तिथे होणार होता. वातानुकूलित तंबूचं बांधकाम युद्धपातळीवर सुरू होतं. मैदानाच्या दुसर्‍या कोपर्‍याशी डेकोरेटर्सचा तांत्रिक चमू काहीतरी करत होता. विनय भल्याथोरल्या बांधकामामध्ये कुठेतरी हरवलेला पाहून अकबर तांत्रिक चमूचं काम पाहण्यासाठी निघून गेला.

"काय रे अकबर, कधीपासून लागलास शेठकडे?" दुपारी टपरीवर जेवताना विनयनं विचारलं.
"कलहीच." अकबर तिखट लागल्यामुळे नाकातून वाहणारं पाणी पुसत म्हणाला.
"तुला काही शाळा-बिळा नाही का?" विनयनं अचानक विचारलं.
अकबरला क्षणभर सुचेचना काही. त्यानं टेबलावर नजर फिरवली, सगळे दमलेभागलेले जीव बकाबक खात होते, फक्त विनय थांबून अकबरच्या उत्तराची वाट पाहत होता.
"महिन्याभरापूर्वी अब्बा वारले माझे..."
"बस बस. कळलं मला. जेव आता." विनय एकदम घाईघाईत त्याला पुढे बोलू न देता म्हणाला.

-----

एक जुनाटशी ऍम्ब्युलन्स थडथडत म्युनिसिपल हॉस्पिटलच्या कंपाऊंडमध्ये शिरत होती, तेव्हाच विनय हॉस्पिटलच्या गेटसमोर रिक्षातून उतरला. रिक्षावाल्याला पैसे दिले आणि लक्षपूर्वक हाताचा आधार देऊन रिक्षामधून आपल्या आईला उतरवू लागला.
"तिथे लाईनमध्ये जाऊन बसा." इमर्जन्सी वॉर्डातल्या नर्सनं कोर्‍या चेहर्‍यानं भल्याथोरल्या हॉलच्या एका टोकाकडे बोट दाखवत म्हटलं.
विनय खोकणार्‍या आईला आधार देत कोपर्‍याकडे निघाला. 'जुनी असल्यामुळे प्रशस्त बिल्डिंग्ज आहेत.' विनय मनाशीच विचार करत होता.
दोनेक तास लाईनमध्ये बसून आणि आईचा खोकला वाढतच चालल्यानं त्याचा संयम संपला. त्यानं मोबाईलवरून मित्राला फोन लावला आणि थोड्याच वेळात तो एका खाजगी क्लिनिकमध्ये पोचला. चटकन एक्स-रे काढण्यात आला आणि त्याला एका डॉक्टरांचा रेफरन्स देण्यात आला, आणि त्यांच्या कन्सल्टेशन रूमसमोर नेऊन त्याला बसवण्यात आलं. आतला पेशंट बाहेर आला की पुढचा नंबर त्याचा.\

डॉक्टरांची फी फार जास्त नसली तरी बजेटच्या बाहेरच होती, पण आईच्या तब्येतीपुढे काहीच नव्हतं. घोळ तिथेच झाला होता. आईला टीबी झाल्याचं निदान होतं. तिला हॉस्पिटलाईज करणं भाग होतं. त्यातल्या त्यात चांगलं पण स्वस्त असं हॉस्पिटल डॉक्टरांनीच सजेस्ट केलं. आणि औषधं लिहून दिली, जी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना वाचायला देण्यास सांगितलं.
त्यानं आईला हॉस्पिटलाईज केलं आणि मग डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या परवानगीनुसार घेऊन आला. आईला कदाचित तीन-चार दिवस तिथेच राहावं लागेल असं त्याला डॉक्टरांनी सांगितलं होतं आणि तिच्या वॉर्डबाहेर रात्री थांबण्याची परवानगी दिली. मग तो धावतपळत घरी गेला आणि आईसाठी काही हलकं जेवण तयार करून पुन्हा हॉस्पिटलला पोचला.

-----

"तुझे वडील मिल्ट्रीत होते ना? त्याचा काही उपयोग होत नाही काय सरकारी हॉस्पिटलांमध्ये?" रमाकांत विचारत होता. विनयनं शेठकडे फोन करून कळवलं होतं की दोन दिवस यायला जमणार नाही म्हणून. शेठ आधी पगार कापायची धमकी देत होता, पण आई आजारी आहे सांगितल्यावर एक दिवसाची भरपगारी रजा मंजूर केली होती. मग शेजारीच चालू असलेल्या साईटवर काम करणारा रमाकांत त्याला भेटायला हॉस्पिटलात आला होता.
"त्याचा काही उपयोग नाही रे." विनय शून्यात बघत म्हणाला.
"अरे चहा पी. थंड होईल." रमाकांत हातातल्या कटिंगचा एक घोट घेत म्हणाला. दोघे हॉस्पिटलबाहेरच्या टपरीवर बसले होते.
"माझा बाप युद्धात शहीद झाला. पण आम्हाला चक्राशिवाय काही नाही मिळालं." विनय थोडासा कडवटपणे म्हणाला.
"पैसे?"
विनय कुत्सित हसला, "मिळाले ना. बाप मेल्याच्या तीन वर्षांनंतर मिळाले. माझी शाळा सुटली होती. वीरचक्र मोडून विकून झालं होतं आणि मीच गावच्या सुताराकडे काम करताना सुट्ट्या टाकून सरकारी ऑफिसांमध्ये खेटे घालून ते मिळवले." विनयनं चहाचा एक घोट घेतला.

-----

"काय रे आई कशी आहे?" रमाकांतनं ऑफिसात शिरणार्‍या विनयला पाहून विचारलं.
"डॉक्टर सांगताहेत बरी आहे आता. औषधं लिहून दिलीत आणि आराम करायला सांगितलाय. चाळीतच एक बाई डबा देतात, त्यांना सांगून आलोय."
"मग आजपासून काम सुरू तुझं?"
"हो रे. म्हणून तर आलो. शेठनं एकच दिवस भरपगारी दिली होती रजा. आधीच हॉस्पिटलचं बिल अन औषधांच्या खर्चाचे लाखभर झाले रे. बँक अकाऊंट रिकामं होत आलंय. त्यात दोन दिवसाचा पगारही गेला."
"गेला नाही. तुझी रजा भरपगारी करायला सांगितलीय शेठनी." अकाऊंटंटचा असिस्टंट रघू म्हणाला. तो सिगरेट फुकून आत शिरत होता.
"काय सांगतोस?" विनयच्या चेहर्‍यावर एकदम वीतभर हसू उमटलं.
"अरे मोठा लग्गा लागला ना आपल्याला!" रघू त्याची पाठ थोपटत आत गेला.
विनयला अजून उलगडा झाला नाही.
"विनय, तू रमाकांतबरोबर जा. तो शपथविधीचा तंबू उतरवायचाय." सुपरवायझर सांगून आत गेला. विनय सही करायचं रजिस्टर शोधू लागला.
"अरे पण शपथविधी तर परवाच होता ना? आज कसा तंबू?" विनय सही करत म्हणाला.
"तोच तर लग्गा, रघू म्हणत होता तो. म्हणूनच शेठ खुषीत आहे." रमाकांत हसून म्हणाला. "चल रस्त्यात सांगतो."

------

गाडी चालवता चालवता रमाकांत बोलत होता, "अरे शपथविधी झाला आणि दहा नवे मंत्री बनले. पण एकाही मंत्र्यानं पंडाल काढायची ऑर्डर दिली नाही. शेठनं तंबू तसाच ठेवला. दोन दिवस एक्स्ट्रा झाले. वीस लाखाचं जास्तीचं बिल झालं. शेठनं मंजूर पण करून घेतलं. सरकारला काय वीस लाख म्हणजे...."

(ही  कथा जालरंग प्रकाशनाच्या 'दीपज्योती-२०११' ह्या दिवाळी अंकातही इथे प्रकाशित झालेली आहे.)