9/07/2015

बंड - उत्तरार्ध


"तुझा डिसूझा अजून कसा नाही आला रे?" नरेंद्रनं घड्याळाकडे बघत अश्विनला विचारलं.
"कळत नाही काही. व्हॉट्सॲपवर दिसत नाहीये आणि फोनही लागत नाहीये त्याचा. बघू थोडा वेळ वाट अजून."
"बरं. पुन्हा कथेकडे वळू." किरणनं शांततेचा भंग करत म्हटलं. "हे दोघे नक्की एकत्र येतात कसे आणि का?"
"ओके. अ आपल्या म्हणण्याप्रमाणे पटकथाकारच आहे. फार सक्सेसफुल नसला तरी बर्‍यापैकी. त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यावर त्यानं ब ला जोडून घेतलं असेल." अश्विननं पुस्ती जोडायचा प्रयत्न केला.
"ते ठीक, पण ते नक्की कसे काय जोडले गेलेत. मला वाटतं. अ ला ज्यानं पैसे देऊन जोडलंय, त्यानंच ब लाही जोडलं असलं पाहिजे. तरच तिथे अनोळखी असल्याचा तणाव आणि पैशांची बांधिलकी आल्याने कथेतल्या निर्मितीवर आलेली बंधनं असा दुहेरी पदर येईल." नरेंद्र आपल्या समोरच्या कागदांकडे पाहत म्हणाला.
कुणीही काहीही म्हणालं नाही. राजेशनं शांतपणे बोर्डवर अ आणि ब चा संबंध लिहिला.
"आता हसन, मुसा, स्टेफान, रमज़ान आणि मकसूद." राजेशनं बोर्डकडे पाहत म्हटलं.
"आता अ आणि ब च्या नजरेतूनच ही पात्रं बांधायची का?" किरणनं विचारलं.
"इंटरेस्टिंग ॲप्रोच." नरेंद्रचे डोळे चमकले.
"म्हणजे?" अश्विन आणि राजेश दोघेही थोडे गोंधळले होते.
"म्हणजे. रोल प्ले करूया. कुणीतरी दोघे अ बनू आणि कुणीतरी दोघे ब बनू. मग ते प्रत्येक पात्राबद्दल काय म्हणतील ते लिहित जाऊ." नरेंद्रनं स्पष्टीकरण दिलं.
"अश्विन तू आणि मी ब बनूयात. नरेंद्र आणि राजेश अ बनतील." किरणनं वाटणी केली.
"अ च्या मते हसन मोठ्या घरातला, पिढ्यानपिढ्या मिलिटरीत घालवलेल्या घराण्यातला एक मुलगा. वडील मिलिटरी उच्च्पदस्थ पण वारलेले. आता हा सैन्यात कॅप्टनच्या हुद्द्यावर." राजेशनं लिहित लिहितच म्हटलं.
"ब च्या मते हसन प्रत्यक्ष युद्धात लढलेला आणि काहीजणांची जबाबदारी घेऊन लढलेला म्हणून तसा अनुभवी पण वयानं लहान असल्यानं उसळत्या रक्ताचा. त्याच्या गटाला मदत लगेच आल्यानं फार नुकसान झालं नाही आणि आणीबाणीचे प्रसंग युद्धात पाहिलेले नाहीत. पण त्या प्रसंगानंतर त्याला वडिलांनी वजन वापरून अंतर्गत पोस्टिंग मिळवून दिलं असल्यानं थोडा नाराज असलेला आणि मग अंतर्गत घडामोडींमुळे एक वेगळं भान आलेला." अश्विन स्वतःजवळच्या कागदावर टीपा काढतच म्हणाला.
नरेंद्रचे डोळे चमकू लागले होते. "ग्रेट."
"अ च्या मते रमज़ान आणि मुसा हे दोन एकत्र काम केलेले आणि एकमेकांवर पूर्ण विश्वास असलेले मिडल रँकिंग ऑफिसर्स असावेत. त्याशिवाय ते सैनिक बंडाळीच्या गोष्टी करू शकत नाहीत. हसनचं महत्व ह्या दोघांसाठी अशासाठी आहे की हसनच्या वडलांमुळे हसनला सर्व मोठ्या लोकांचा ॲक्सेस आहे. तिथल्या बातम्या मिळू शकतात." नरेंद्रनं समोरचे पेपर चाळत म्हटलं.
"ब च्या मते स्टेफान हा एकमेव ख्रिश्चन, सिरियासदृश देशातला अल्पसंख्यांक मिलिटरी ऑफिसर आहे. तोदेखील मिडल रँकर असेल पण, प्रत्येक वेळेस त्याची निष्ठा त्याला सिद्ध करावी लागत असल्याने थोडा चिडलेला आणि नाराज. मुळात बंडाळी करून आलेलं सध्याचं सैनिक सरकार ऐषारामात राहून जनतेशीच प्रतारणा करत असल्याच वाटू लागल्यानं सैनिकी शिस्त मोडायला तयार झालेला." किरण बोलतानाच राजेश बोर्डावर झरझर लिहित होता.
"आता हे चौघे एकत्र कसे आले?" नरेंद्रनं प्रश्न उपस्थित केला.
"एक मिनिट. मकसूदचं काय?" राजेशनं बोर्डाकडे पाहत विचारलं.
"अ च्या मते मकसूद एक उच्च्पदस्थ जनरल आहे आणि मुळातल्या जुन्या सैनिकी बंडाळीतला एक महत्वाचा मोहरा. त्यामुळे सद्य लष्करशहाच्या मर्जीतील लोकांमधला एक. तो सत्तालोलुप आणि अन्यायी लष्करशहाला हटवू इच्छितो, पण मग स्वतःचं आणि कुटंबाचं काय होणार हा प्रश्न त्याला पडतो. स्वतःचा कम्फर्ट सोडवतही नाही आणि चालू असलेल्या गोष्टी सद्सद्विवेकबुद्धिला पटतही नाहीत." नरेंद्र म्हणाला.
"ब च्या मते, सध्याचा लष्करशहा उलथवून स्वतःच ती जागा घेण्याचीही त्याची इच्छा असू शकते. किंवा मुळात मोघम बोलून एखाद्या कटाचा ठावठिकाणा लागतो का हे तो चाचपू इच्छित असेल आणि मग स्वतःच तो कट उधळून लष्करशहाची मर्जी संपादन करण्याचाही इरादा असू शकतो." किरणनं काही विस्कळित मुद्दे मांडायचा प्रयत्न केला.
अचानकच किरणचा मोबाईल वाजू लागला. तो उठून बाहेर गेला.
"किरणचा मुलगा कसा आहे काही कल्पना आहे का?" अश्विननं नरेंद्रला विचारलं.
"किरणचा मुलगा?" नरेंद्र तंद्रीतून बाहेर येत म्हणाला. "काय झालं त्याला?"
"तुला काहीच माहित नाही? मला वाटलं तुम्ही दोघे चांगले मित्र आहात." अश्विन म्हणाला आणि पुढे बोलू लागला. "त्याचा मुलगा किडनॅप झाला होता."
"काय?" नरेंद्र आणि राजेश एकत्रच ओरडले.
"हो. बरेच दिवस झाले, गेल्या महिन्यात." अश्विन सांगत होता. "मग ५-६ दिवसांनी पोलिसांना एका स्टोअररूममध्ये तो सापडला. अर्धमेला झाला होता आणि धक्क्यामुळे बोलूही शकत नव्हता."
"बापरे! कुणी केलं होतं काही कल्पना?" राजेशनं विचारलं.
"पोलिसांना कळलं नाही काही, पण किरणचं म्हणणं आहे की हे विश्वासराव महाडिकांच्या माणसांचं काम आहे!"
"त्यांचा काय संबंध ते तर सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत." राजेश म्हणाला.
"ओह्ह. आत्ता कळलं मला." नरेंद्रला एकदमच उलगडा झाला. "मध्यंतरी किरण माझ्याकडे एका शोधनिबंधासाठी मदत मागत होता. ज्यामध्ये त्याला काही कागदपत्रांच्या आधारे काही मुद्दे सिद्ध करायचे होते. ती गणपत पाड्यातली जमीन जबरदस्तीनं बळकावल्याबद्दल काहीतरी सांगत होता तो." नरेंद्र म्हणाला.
"मग पुढे काही केलंत का तुम्ही?" अश्विनने विचारलं.
"नाही रे. बहुतेक त्याच वेळेस ते किडनॅपिंग झालं असेल. मला असंही ह्या सगळ्या फंदात पडायचं नव्हतं. त्याची बायको वगैरे व्यवस्थित आहे ना?"
"त्यानं कदाचित बायको अन मुलाला कुठल्यातरी नातेवाईकाकडे पाठवलंय." राजेश म्हणाला.
"तुला कसं ठाऊक?"
"तो मध्यंतरी बराच वेळ आयआरसीटीसी च्या वेबसाईटवर असायचा ऑफिसात."
"कुठे पाठवलं असेल काय माहित? ह्या नेतेलोकांची पोच सर्वत्र असते यार." अश्विन म्हणाला आणि कुठतरी हरवल्यागत झाला. तेव्हढ्यात किरण परत आला.
"राजेश, तुझा फोन डिस्चार्ज झालाय का?" किरणनं विचारलं. "तुझ्या वडलांचा माझ्या भावाला फोन आला होता. नंतर कळव त्यांना. मी भावाला सांगितलंय त्यांना कळवायला की तू माझ्यासोबत आहेस." राजेश फोन चेक करत होता.
"कुणाकडे चार्जर आहे का?" राजेशनं वाक्य पूर्ण करेपर्यंत अश्विननं चार्जर त्याच्यापर्यंत ढकलला.
"ह्याचे वडील तुझ्या भावाला कसे ओळखतात?" अश्विननं विचारलं.
"हा आणि तो एका वर्गात होते, पण ऑफिसात हा माझ्या काम करतो. हा प्रिंटिंग इंजिनियर आहे आणि मी पत्रकार." किरणनं स्पष्टीकरण दिलं.
नरेंद्र एकमार्गी टीपा लिहित होता.
"आता पुढे काय?", राजेश बोर्डकडे बघत म्हणाला, "ते चौघे एकत्र कसे आले?"
"डिसूझा कुठे आहे?" नरेंद्रनं परत विचारलं. "काही महत्वाची इनपुट्स त्याच्याकडूनही येऊ शकतात." तो स्वतःच्या नोट्स निरखत म्हणाला. "तुझा मित्र आहे ना तो?" तो अश्विनकडे पाहत म्हणाला.
"तो माझा मित्र ॲज सच नाही. तो ही सिरियात कामाला होता असं मला किरण म्हणाला. मग मी त्याच्याशी काही जुजबी बोललो, त्याला काही एरिया चांगला ठाऊक होता. माझ्यासारखाच ऑईल-गॅस कंपनीत होता." अश्विन स्पष्टीकरण दिल्यासारखं म्हणाला.
"मला एकदा एक स्टोरी करताना भेटला होता तो. नंबर घेऊन ठेवला होता, मग आपल्यामध्ये सिरियाचा विषय निघाल्यावर मी सहज अश्विनला म्हटलं बोलून बघ एकदा त्याच्याशीही." किरण.
"बरं, ते ठीक आहे, पण ते चौघे भेटले कसे?" राजेश बोर्डसमोर उभा राहून कंटाळला होता.
"आपण कसे भेटलो?" नरेंद्रनं प्रतिप्रश्न केला.
"किरणला हा निर्माता स्क्रिप्ट रायटिंग कॉन्टेस्ट घेऊन स्क्रिप्ट सिलेक्ट करणार आहे हे कळल्यावर त्यानं मला विचारलं, आणि मग त्याला तुझा संदर्भ होताच, तू लेखक असल्याचा आणि तुला कामही हवं असल्याचं माहित होतं. मग तू एका काल्पनिक अरब राष्ट्रांतल्या उठावाचा बॅकड्रॉप दिल्यामुळे त्याच्या डोळ्यासमोर त्याच्याच बिल्डिंगमध्ये राहणारा अश्विन आला, जो सिरिया आणि अन्य अरब देशांमध्ये राहून आला होता. डिसूझाचं तर आत्ताच त्यानं सांगितलं." राजेशनं एका दमात म्हणून टाकलं.
"ग्रेट. मग इथे सेम लॉजिक लावता येईल. अ च्या मते, रमज़ान आणि मुसा हे घट्ट मित्र. सेम रँकिंग ऑफिसर्स. कदाचित एकत्रच ट्रेनिंग घेतलेले आणि एकत्रच युद्धभूमीवर तैनात झालेले. जिवाभावाचे मित्र. रोजची राजकारणं, लष्करशहाची राहणी, सामान्य लोकांचं जगणं आणि इतर अरब राष्ट्रांत चाललेले उठाव पाहून त्यांना कल्पना सुचते ती एका बंडाळीची. ते फार विचाराअंती कर्नल स्टेफानला विश्वासात घेतात. जो आधी थोडा आढेवेढे घेतो पण मग त्यांना जॉईन होतो. हसन हा रमज़ानच्या अंडर सैन्यात असलेला एक असतो, ज्याची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि एकंदर सवयी आणि वागणूक पाहून रमज़ान त्याला विश्वासात घेतो."
"हे सगळे सीन्स उभे करावे लागतील." राजेश लिहिताना म्हणतो.
"आणि ब च्या मते, स्टेफानसोबत बर्‍याच गाठीभेटींनंतर आणि प्रत्यक्ष युद्धभूमीवरील अनुभवांच्या आधारे, मुसा आणि रमज़ान त्याचं नाव निश्चित करतात आणि त्याला ॲप्रोच करतात. स्टेफान कदाचित स्वतःच्या आयुष्यातही असमाधानी असू शकतो. काहीतरी मोठं करून दाखवण्याची संधी म्हणूनही तो बंडाकडे पाहत असेल. स्वार्थ त्याचादेखील असूच शकतो."
"मग मुळात मी जे टिपण दाखवलं होतं मगाशी, जिथून चर्चा सुरू झाली. ते घडतं. त्यांची मीटिंग. मग ते शस्त्रास्त्रं, किती माणसं लागतील, कुठली कुठली माणसं टारगेट करावी लागतील, कुठे कुठे इत्यादी तपशील ठरवतील." नरेंद्र म्हणाला.
"हो, पण त्यासाठी खरंच कुणीतरी मिलिटरी बॅकग्राऊंडवाला लागेल." किरण परत म्हणाला.
"हम्म. मग तो सीन शेवटी डेव्हलप करू." नरेंद्र विचार करत म्हणाला.
अचानक दरवाजा वाजला.
-----
"ही बॅग कसली रे डिसूझा?" अश्विननं सहज विचारलं.
"काही कागद आहेत." डिसूझा किरणकडे अस्वस्थपणे पाहत, कपाळावरचा घाम पुसत म्हणाला.
"ओह. अच्छा!" म्हणत अश्विन दाराकडे जाऊ लागला. "एक फोन करून येतो मी."
नरेंद्र डिसूझाची जनरल चौकशी करतच होता की घाईघाईतच अश्विन परत आला.
"झालासुद्धा फोन?" राजेशनं आश्चर्यानं विचारलं.
अश्विननं बहुतेक ऐकलंच नाही आणि तो एकदम म्हणाला. "पण आपल्या निर्मात्याला ही स्क्रिप्टच पटली नाही तर?" सगळ्यांनी प्रश्नार्थक चेहरे केल्यानंतर तो पुढे म्हणाला, "म्हणजे, त्याला जर कमर्शियल सिनेमा बनवायचा असेल, तर तो असली गुंतागुंतीची स्क्रिप्ट का निवडेल?"
"इंटरेस्टिंग!" नरेंद्र स्वतःशीच विचार करू लागला. 'मुळात मी इथे माझ्या कादंबरीच्या कामासाठी येतोय. ही स्क्रिप्ट निवडली जाणार नाही ह्याची मला पुरेपूर कल्पना होतीच, म्हणून मी माझी कादंबरीची टिपणं काढतोच आहे, पण मी हा विचार केलाच नाही की जर ही स्क्रिप्ट कमर्शियल नाही म्हणून निवडली जाणार नाही, तर माझी कादंबरी तरी का खपेल? मी शेवटी मला आवडतंय, रूचतंय त्याचकडे वळलो. मुळात ज्या कारणानं मी फेल जातोय, त्याच कारणाकडे परत वळलो. गंमतच आहे. पुन्हा नकळतच ह्या तिघांशी मी का प्रतारणा करतोय?'
"मी निर्मात्याशी बोललोय आणि त्यानं मला स्पष्ट केलं होतं की त्यांचा प्रेफरन्स गुंतागुंतीच्या आणि इनोव्हेटिव्ह कथांनाच आहे. कारण हा वेगळा बॅनर आहे, ह्या बॅनरखाली फेस्टिव्हल सर्किट सिनेमेच बनवले जातात." किरणनं स्पष्ट केलं.
'चला म्हणजे, स्क्रिप्ट सिलेक्ट व्हायचे चान्सेस आहेत तर.' नरेंद्र पुन्हा मनातच विचार करू लागला. 'पण मग कादंबरीचं काय होणार? छ्या! आता आपल्या हातून कुणाचं नुकसान होत नसल्याचा आनंद करू की कादंबरी अडकण्याच्या शक्यतेचं दुःख?'
"काय झालं रे?" किरणनं नरेंद्रची तंद्री तोडत म्हटलं.
"हं. काही नाही. मी काय विचार करत होतो. की हा एक ॲन्गल ॲड करता येईल की." नरेंद्र म्हणाला, "अ आणि ब जेव्हा पात्रांपासून सीनपासून स्क्रिप्ट डेव्हलप करू लागतात, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की ते एक डार्क आणि निराशावादी पटकथा बनवताहेत. पण त्यामध्ये सत्य आहे आणि तत्कालीन सामाजिक स्थितीवर भाष्य आहे. आणि ती कथा काल्पनिक राष्ट्राबद्दलच न राहता, आपल्याच आजच्या व्यवस्थेवर भाष्य करणारी बनू लागते, क्रांतीच्या ग्लोरिफिकेशनबद्दल न राहता, सामान्यांच्या स्थितीबद्दल बनू लागते. पण निर्माता हा सिनेमा फक्त आणि फक्त मिळालेल्या फंडिंगप्रमाणे करत असतो. फंडिंग करणार्‍यांचे अरब राष्ट्रांत हितसंबंध असतात आणि त्यामुळेच त्यांना त्यांच्या अजेंड्याशिवाय काहीच मान्य नसतं, अन्यथा फंडिंग रद्द. त्यामुळे निर्माता त्या दोघांना पटकथा बदला अथवा पैसे न मिळण्याची ताकीद देतो. त्यावर ते दोघे सत्य, कला आणि कथेशी प्रामाणिक राहायचं आणि स्वतःच्या पैशासाठीच्या असहायतेविरूद्ध बंड करायचं का सन्मानानं बाहेर पडून स्वतःच्या ताकदीवर काही करण्याचा प्रयत्न करायच्या ह्या वळणापाशी येऊन थांबतात."
बाकी चौघेही स्तब्ध होते.
"तू खरंच हाडाचा लेखक आहेस." किरण मनापासून म्हणाला.
'स्वतःचाच दर्द आहे तो.' नरेंद्र स्वतःशीच म्हणाला.
आणि दार पुन्हा वाजू लागलं. पण ह्या वेळेस ते नुसतं वाजत नव्हतं. लगेच धडधडू लागलं. सगळेचजण गोंधळून गेले आणि काही समजायच्या आतच दार तुटलं. सगळेच स्तब्ध झाले. तीन गुंड एकदमच घरात घुसले आणि त्यांनी सगळ्यांसमोर बंदूक धरली.
"कुठली बॅग रे?" त्यांच्या म्होरक्यानं अश्विनला विचारलं. अश्विननं डिसूझानं आणलेल्या बॅगकडे अंगुलीनिर्देश केला. किरण आणि नरेंद्रला सगळा प्रकार लक्षात आला, पण राजेश अजूनही गोंधळलेलाच होता.
त्यांच्यातल्या एकानं एका हातात बंदूक धरत ती बॅग उघडली. आतमध्ये काही जमिनींची कागदपत्रं होती आणि काही फोटोज होते. राजेशच्या लक्षात आत्ता सगळा प्रकार आला.
"गद्दार! पाजी!" राजेश एकदमच म्हणून गेला. अश्विननं मान खाली घातली.
किरण शांत होता. गुंडाचा म्होरक्या पुढे झाला आणि त्यानं किरणच्या डोक्यासमोर बंदूक धरली.
"मला मारून आणि ही कागदपत्रं घेऊन काही उपयोग नाही. ह्याच्या बर्‍याच कॉपीज बर्‍याच इतर लोकांकडे आहेत." त्यानं बोलणं पूर्ण करण्याच्या आत बंदुकीचा आवाज झाला आणि किरणच्या निष्प्राण देह खाली पडला. सगळेजण अवाक् होतेच की त्यानं वळून अश्विनच्या डोक्यासमोर बंदूक धरली आणि तो काही बोलायच्या आत परत बंदूक चालवली. तोंडाने तो "गद्दार" असं पुटपुटल्याचं नरेंद्रला जाणवलं आणि एकदम नरेंद्रच्या लक्षात आलं की अश्विनला मारल्यावर बाकीचे गुंडसुद्धा थोडे गोंधळले आहेत. त्यानं राजेशला इशारा केला आणि एकदम रायटिंग टेबल उचलून त्या माणसांवर ढकलून दिलं. राजेशनं त्यातल्या एकाची बंदूक घेऊन तिघांनाही मारलं.
"तुला बंदूक चालवता येते?" नरेंद्रनं अविश्वासानं विचारलं.
"मग तू कशाच्या जीवावर टेबल उडवलं होतंस?"
"पळून जायचा विचार होता माझा."
"मी सैनिक स्कूलमध्ये गेलोय." राजेश म्हणाला, "आणि पळून तर आताही जावंच लागणार आहे आपल्याला."
"का? पोलिसांना बोलावू ना." नरेंद्र गोंधळत म्हणाला.
"हे पोलिसच होते. बिनावर्दीचे."
"काय?" नरेंद्रला आपण स्वप्नात तर नाही ना असं वाटत होतं.
"ही रिव्हॉल्व्हर बघ. सर्व्हिस रिव्हॉल्व्हर आहे." राजेश ती बंदूक चाळत म्हणाला.
"मग आता?"
"ती कागदपत्रं उचल. ते आणि बंदुका. आता हेच आपली ढाल आहेत." राजेश म्हणाला आणि बंदुका उचलू लागला.
नरेंद्र अजूनही शॉकमध्येच होता, पण त्यानं ती बॅग उचलली, आजूबाजूची कागदपत्रं उचलली आणि राजेशच्या मागे निघाला. बाहेर पडताना एकदम त्याला काहीतरी वाटलं आणि तो परत आत गेला आणि त्यानं स्वतःची सर्व टिपणं उचलली आणि पुन्हा बाहेर गेला. बंदुकीच्या आवाजांनी आजूबाजूचे लोक घाबरून घरात बसले असावेत अशी शांतता पसरली होती. कुणीतरी पोलिसांना फोनही केलेला असावा.
"किरणच्या घरालाच शाप लागलाय." म्हणत राजेश परत आत गेला आणि किरणच्या गाडीची चावी घेऊन परत आला. "चल."
-----
ते दोघेजण गल्लीच्या टोकापासून गाडी बाहेर काढेपर्यंत पोलिसांनी त्यांचा माग काढायला सुरूवात केली आणि तुफान गोळीबार झाला. कसंबसं त्यांना चुकवत राजेशनं गाडी एका आडरस्त्याला घातली आणि एका छोट्याशा वस्तीजवळ आल्यावर तो गाडीतून उतरला. रस्त्याच्या कडेला बर्‍याच गाड्या उभ्या होत्या, त्यातल्या एका गाडीचं लॉक राजेशनं उघडलं.
"ते माझं घर." राजेशनं समोरच्या एका इमारतीकडे अंगुलिनिर्देश करत म्हटलं. आणि तो एकदम कोसळला. नरेंद्रनं घाबरून पाहिलं तर त्याच्या पाठीमागे रक्ताची धार लागलेली होती. शर्ट मागून पूर्ण लाल होता. पोलिसांच्या गोळीबारात त्याला पाठीत गोळी लागली असावी.
"ही गाडी घेऊन जा तू. माझ्या पाकिटात काही पेपरांच्या संपादकांचे नंबर्स आहेत. त्यातले काही भ्रष्ट असतील, काही नसतील. प्रयत्न करून बघ काही होतं का. नाहीतर विरोधी पक्षनेत्यांकडे जाऊन बघ."
"आणि तू." नरेंद्रला आता रडू येत होतं. सायलीची प्रचंड आठवण येत होती.
"मी आता घरीच जाईन. तिथेच संपू दे सर्व. आता ताकद नाही धावायची."
----
गाडी ट्रॅफिकमध्ये थांबली होती आणि नरेंद्रचं लक्ष उलट्या जाणार्‍या रस्त्याच्या बाजूकडे गेलं. तीन-चार कावळे एका उंदराच्या पिल्लाचा पाठलाग करत होते आणि ते थोड्याशा गाडी नसलेल्या पॅचमध्ये रस्त्यावर धावत होतं. गाडी नसल्याने कावळेही अगदी खालून उडत होते आणि त्यातल्या एकानं त्याला पायांमध्ये पकडलं आणि डिव्हायडरवरच्या एका खांबावर येऊन बसला. त्याच्यासोबत बाकीचे दोन कावळेही होते. ते पिल्लू जिवंत होतं आणि चळवळ करत होतं. त्याची शेपूट कावळ्याच्या पायात होती. कावळा त्याला वर ओढायचा प्रयत्न करत होता, तेव्हढ्यात ते त्याच्या हातून निसटलं आणि खाली पडलं. कावळे पुन्हा झेपावले तेव्हढ्यात तिकडचा सिग्नल सुटला आणि एकदमच दुरून पोलिस सायरनचा आवाज झाला आणि नरेंद्र एकदम शहारला. ट्रॅफिक मोकळं होतं होतं. त्यानं शेजारच्या सीटवर रूमालाखाली लपवलेल्या बंदुकींकडे एक नजर टाकली आणि मागच्या सीटकडे पाहिलं. त्याच्या कादंबरीची आणि स्क्रिप्टची टिपणं वा-यावर फडफडत होती. मागच्या गाडीनं हॉर्न दिला आणि नरेंद्र डोळ्यातलं पाणी आवरत पुढे निघाला. अज्ञाताकडे!
सिग्नल सुटल्यावर येणार्‍या गाड्यांमुळे कावळे घाबरून बाजूला झाले, पण ते पिल्लू गाडीखाली येऊन मेलं. गाड्या पास झाल्यावर दबा धरून बसलेले कावळे पुन्हा झेपावले आणि पिल्लाचा मृतदेह घेऊन पुन्हा खांबावर जाऊन बसले.


--समाप्त--

9/06/2015

बंड - पूर्वार्ध

"जनरल मकसूद आपल्यासोबत आहेत." हसननं फार मोठा गौप्यस्फोट केल्याच्या आविर्भावात सांगितलं.
तो बहुतेक तितकाच मोठा बॉम्बगोळा असावा, कारण सगळेजण त्याच्याकडे अवाक् होऊन पाहू लागले.
"जनरल मकसूद?" कर्नल स्टेफाननं नीट ऐकू आल्याच्या खातरजमा करण्यासाठी पुन्हा एकदा विचारलं. 
"होय." हसन तितक्याच ठामपणे म्हणाला.
"कसं शक्य आहे? आणि तुला कोण म्हणालं?" मेजर मुसाचा अजूनही विश्वास नव्हता. त्याचे दोन्ही हात एकमेकांमध्ये घट्ट गुंफलेले होते. नर्व्हस झाला की सहसा तो आखडून जायचा.
"त्यांची मुलगी माझ्या बहिणीच्या वर्गात होती. त्या दोघींच्या गुप्त भेटी होत असतात. काल ती सांगत होती." हसन नीरगाठ उकलावी तसं सांगू लागला.
"काय सांगत होती नक्की?" मेजर रमज़ान अस्वस्थ झाला होता.
"सांगतो." हसन रॅंकमध्ये इतर सर्वांमध्ये जरी खालचा असला तरी त्याचा प्रत्यक्ष युद्धातला अनुभव आणि त्याचं मोठ्या घराण्यातलं असणं हे त्याचे गुण ह्या गटासाठी फार महत्वाचे होते.
"सैन्याच्या उच्च अधिकार्‍यांमध्ये एका बंडाळीच्या शक्यतेची चर्चा सुरू आहे म्हणे आणि तिचे वडील म्हणजे जनरल मकसूद बंडाळीबद्दल चांगलं बोलत होते. म्हणजे त्यांच्या मते बंडाळी होणं गरजेचं आहे आणि झालीच तर त्यांची पूर्ण सहमती आणि पाठिंबा असेल असं म्हणत होते." हसननं सांगून पूर्ण केलं आणि आपण काहीतरी फार मोठं काम केल्यासारखा चेहरा केला.
"बास? एव्हढंच?" मुसा, रमज़ान आणि स्टेफान जवळपास एकत्रच म्हणाले.
"म्हणजे? अजून काय हवं?" हसन आश्चर्याने म्हणाला, "जनरल मकसूदसारखा सैन्यातला उच्च अधिकारी बंडाळीला समर्थन देईल म्हणतो."
"पण म्हणजे आपल्याला समर्थन देईल असं नाही." मुसा त्याला मध्येच तोडत म्हणाला. "ह्या सगळ्या कुटुंबासमोर बोलायच्या गोष्टी असतात. आपला पुरोगामी, मवाळ चेहरा दाखवायला."
"प्रत्यक्षात आपण पकडले गेलो, तर फायरिंग स्क्वॉडसमोर आपल्याला फेकताना दोनदाही विचार करणार नाही तो." स्टेफान मुसाचं वाक्य पूर्ण करत म्हणाला.
"असं कसं रे. इतका विरोधाभास?"
"हसन, तू युद्धभूमीवर लढलायस. आम्ही मिलिटरी उच्चालयातली राजकारणं रोज बघतो. आणि आपल्याकडे तर काय, सत्ताही मिलिटरीच्याच हातात. फार विषारी समीकरण आहे हे." रमज़ान समजावणीच्या सुरात म्हणाला.
-----

"ह्म्म!" किरणच्या एव्हढ्याच प्रतिक्रियेनंतर सगळे त्याच्याकडे पाहू लागले. त्याच्या पुढच्या शब्दांकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं. "हे इंटरेस्टिंग वाटतंय खरं. पण आपल्याकडे मिलिटरी नॉलेज अजून जास्त असलेला एखादा मनुष्य हवा. नाहीतर मग विश्वासार्हता थोडी कमी पडेल. मग ह्या कथेतलं प्रत्येक कॅरॅक्टर वेगवेगळं डेव्हलप करून एक पटकथा आकार घेऊ शकते."
अश्विन आणि राजेशनं माना डोलावल्या. पण नरेंद्र त्याच्याच विचारांमध्ये होता.
"नरेंद्र?" आपल्या बोलण्याकडे त्याचं लक्ष नसावं असं समजून किरणनं त्याला भानावर आणायचा प्रयत्न केला.
"हां. कळलं मला तुला काय म्हणायचंय ते. पण मला असं वाटतं की मिलिटरी ॲस्पेक्ट फारसा सखोल नसला तरी फार फरक पडणार नाही. आजूबाजूची परिस्थिती, सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक ती दर्शवणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्यामध्ये आपल्याला अश्विन आणि त्याचा मित्र डिसूझाची जास्त मदत होईल कारण ते दोघेही सिरियात राहून आलेले आहेत."
"पण आपण सिरिया रेफरन्स का घेतोय?" किरण
"कारण आपल्याकडे फर्स्ट हँड माहितीचा सोर्स आहे."
"पण असली पटकथा कशाला लिहायची ज्याचा आपल्याशी दूरान्वयानेही संबंध नाही?" राजेश
"अरे ही फक्त पहिली स्टेप आहे. पटकथेमध्ये अजून लेअर्स आहेत. ही पटकथा लिहीणार्‍यांची कथा हाच चित्रपटाचा मूळ गाभा असेल."
"म्हणजे?" बाकी तिघेही गोंधळून गेले.
"म्हणजे, 'मिलिटरी कू" ह्या विषयावर पटकथा लिहिणार्‍या दोन पटकथालेखकांच्या मनस्थितीवर आणि खाजगी आयुष्यावर त्या प्रोसेसचा कसा परिणाम होत जातो, असं काहीसं माझ्या डोक्यात आहे." नरेंद्र एक एक शब्द जपून म्हणाला.
बाकी तिघेही एकमेकांकडे पाहू लागले.
"मला ठाऊक आहे तुमच्या मते हा वेडगळपणा वाटतोय ते, पण आपण चर्चा करू, जर वेडेपणा वाटला तर नवा काहीतरी विचार करू. मग तर झालं?" नरेंद्र म्हणाला.
बाकीच्यांनी तात्पुरत्या माना डोलवल्या.
-----
"आपण आधी सगळ्या पात्रांची यादी करूया का?" अश्विनने प्रस्ताव मांडला. तो लगेच मान्य झाला.
"हसन, रमज़ान, मुसा, स्टेफान आणि मकसूद." राजेशनं जंत्री केली.
"हसनची बहिण आणि मकसूदची मुलगी?" किरणचा प्रश्न.
"माझ्या मते त्यांचा विचार नंतर करावा, कारण जेव्हढी कमी मध्यवर्ती पात्रं घेऊ, तितकी ती जास्त चांगली रेखाटता येतील." अश्विन म्हणाला.
"मान्य. मग ह्यातली कमी जास्त वाईट कोणती?" किरण म्हणाला.
"एक मिनिट किरण." नरेंद्र मध्येच म्हणाला. "काय म्हणालास तू?"
"कमी जास्त वाईट."
"इंटरेस्टिंग पॉईंट ऑफ व्ह्यू." नरेंद्र विचार करत म्हणाला. "ही पात्रं निर्माण करणारी माणसं आपोआपच स्वतःचे अनुभव, निरीक्षणं आणि दृष्टीकोन पात्रांमध्ये उतरवत असतात. जर आपण ही पात्रं तुझ्या हातून निर्माण केली, तर तू ती कमी-जास्त वाईट बनवशील, अश्विन त्यांना कमी-जास्त चांगलं बनवेल, मी काहीतरी अजून वेगळं करेन."
"तुला म्हणायचं काय आहे?" किरण आपले हात एकमेकांमध्ये गुंफत म्हणाला. "माझा दृष्टीकोन चांगला नाहीये का पात्रांकडे पाहायचा?"
"नाही, नाही. उलट तुझ्यामुळे मला आपल्या उर्वरित दोन मध्यवर्ती पात्रांकडे पाहायची कल्पना मिळाली."
"पटकथालेखकांची?"
"होय. सध्या आपण त्यांना अ आणि ब म्हणूया." 
"पण त्यांचा विचार आधी करून काय होणार?" राजेशनं शंका काढली.
"होणार असं की, पटकथेतली मध्यवर्ती पात्रं ही त्या दोघांच्या अनुभवांतून, निरीक्षणांतून, आर्थिक-सामाजिक-राजकीय जडणघडणीतून निर्माण होणार आहेत, त्यामुळे ती पात्रं सहज उभी करण्यासाठी अ आणि ब नीट उभे केले की झालं!" अश्विनने मध्येच उत्तर देऊन टाकलं.
नरेंद्रनं विजयी मुद्रेनं अश्विनकडे पाहिलं. "ग्रेट. हळूहळू आपण सर्वजण एका पानावर येतोय तर."
-----
"अ चा सैन्याशी काहीतरी संबंध असायला हवा." व्हाईटबोर्डवरती वर्तुळ काढून त्यात मधोमध 'अ' लिहित राजेश म्हणाला. "तसा 'ब' चा असला तरी चालेल."
"दोघांपैकी एकजण तरी कट्टर विचारसरणीचा असायला हवा. नाहीतर मग सैन्याचं बंड आणि ते ही इस्लामिक देशांमध्ये असा विषयच येणार नाही." किरणनं आपला मुद्दा मांडला.
"मला पटत नाही. कट्टरतावाद आणि हा विषय ह्यांचा बादरायण संबंध जोडतो आहोत आपण. उलट मला तर वाटतं, एखादा कम्युनिस्ट विचारसरणीचा मनुष्यच असले विचार करू शकतो." राजेश म्हणाला.
"आपण भरकटतोय, एकमेकांच्या विचारसरणीवर अप्रत्यक्ष टीका करण्यापेक्षा आपण अ आणि ब ला विचारसरणी बहाल करूयात का?" नरेंद्र म्हणाला.
"अरे पण तेच होणार ना, आपली विचारसरणी आपण बनवत असलेल्या पात्रांमध्ये प्रतिबिंबित होणारच ना."
"होऊ देत, पण पात्रं प्रेडिक्टेबल नकोत. कुणीही कायम कट्टरतावादी किंवा कायम कम्युनिस्ट नसतो. एकेका क्षणीच्या व्यक्त होण्यानं माणसांना लेबलं लागतात आणि मग माणसांच्या वागण्याप्रमाणे लेबलं नाहीत तर लेबलांप्रमाणे माणसं वागू लागतात." नरेंद्रनं त्याची मांडणी केली.
"हम्म" अश्विननं सुस्कारा सोडला. "मग काय ठरतंय. एक बेसलाईन विचारसरणी दिलीच पाहिजे की नाही?"
"माझ्या मते नको. मग त्यांची डेव्हलपमेंट त्याच नजरेतून होत राहील."
"नरेंद्र, आपण पटकथा लिहितोय. कादंबरी नाही. कुठेतरी बंधनं घालून घेणं भाग आहे."
"ठीक आहे. बेसिक लेव्हलवर एक एक दिशा निश्चित करू मग त्या आधारे त्यांची पार्श्वभूमी वगैरे ठरवू."
"अ एक आनंदी, आशावादी आणि आयुष्यात खूप काही करण्याची महत्वाकांक्षा असलेला असू शकतो आणि ब थोडा वास्तववादी, आयुष्यात बरंच काही पाहिलेला आणि थोडासा निराशावादी असू शकतो." राजेशनं बोर्डवर लिहायला सुरूवात केली.
"म्हणजे एक लहान मूल आणि एक प्रौढ. मानसिकदृष्ट्या. भावनिकदृष्ट्या." नरेंद्रनं निष्कर्ष काढला.
"हम्म. म्हणू शकतो तसं." किरणनं दुजोरा दिला. "आता ते असे का झाले असतील?"
"ब हा सैनिकी पार्श्वभूमीचा असू शकतो. एखाद्या लढाईचा किंवा तत्सम अनुभव आल्यानंतर माणूस वास्तववादी आणि निराशावादी एकत्रच होऊ शकतो." अश्विन म्हणाला.
"तो एकतर कारगिलमध्ये लढलेला असेल किंवा मग सीआरपीएफ मध्ये वगैरे असेल आणि नक्षलवाद्यांशी लढला असेल." राजेशनं मत मांडलं.
"सीआरपीएफ ठीक आहे. कारगिल फार क्लिशे वाटू शकतं. आणि आपल्याकडे नक्षलवाद्यांशी लढणारे फारसे हायलाईट होत नाहीत." नरेंद्रनं आपलं वजन टाकलं.
"ठीक. मग तो वयाच्या पस्तिशीजवळ असेल, नाहीतर मग ते अनुभव पुरेसे मॅच्युअर्ड वाटणार नाहीत." किरण
"आणि अ?" अश्विन.
"आधी ब. संपवूया का? गोंधळ होत राहील नाहीतर." किरणनं त्याला मधेच तोडलं.
"नाही. जसं जुळत जाईल तसं जाऊ दे. नाहीतर मग पात्रांमधली डिपेन्डन्सी निर्माण होणार नाही. थोडी कृत्रिम वाटतील पात्रं." नरेंद्र. "अ आणि ब ला जोडणारा धागा काय असू शकतो?"
"सिनेमाचं प्रेम?" राजेश
"नाही. ते फार सोयीचं आहे. त्या नात्यात थोडा तणावही हवा. नाहीतर मग पटकथेमुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यांमध्ये उलथापालथ होणारच नाही." नरेंद्र
"ह्म्म. मग बालपणीचे मित्र? किंवा कॉलेजातले मित्र?" किरण
"नको."
"कन्सल्टंट?" अश्विननं एकदम वेगळाच स्पिन दिला.
"म्हणजे?" नरेंद्रला उत्सुकता जाणवू लागली.
"म्हणजे, अ एक पटकथा लेखक आहे, ज्याला परदेशात ही कथा पाठवायची आहे, पण ऑथेन्टिसिटीसाठी त्याला सल्लागार हवाय आणि तो म्हणजे ब. ब ला मनापासून फार रस नाहीये, पण मिळणारे पैसे महत्वाचे आहेत." अश्विननं एकाच दमात सांगून टाकलं.
नरेंद्रनं मुद्दाम आपलं मत व्यक्त केलं नाही, नाहीतर मग सगळं त्याच्या मनाप्रमाणे होतं अशी तक्रार लोकांच्या मनात निर्माण व्हायची त्याला भीती होती.
किरण आणि राजेशनं एकमेकांकडे पाहिलं आणि मग नरेंद्रकडे पाहिलं. खोलीभर एक शांतता भरून राहिली. अश्विननं राजेशकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. राजेशनं मान डोलावली आणि मग किरणनंही सहमती दर्शवली. नरेंद्रनं सुटकेचा निश्वास टाकला.
"बेस्ट. आपल्याकडे एक बेसलाईन तयार झालीये. आता ह्यांच्यामध्ये रंगणारे सीन्स ठरवले पाहिजेत." नरेंद्र पुढे म्हणाला.
-----
नरेंद्रनं चहाचा कप उचलून धुवून ठेवला आणि परत टेबलापाशी येऊन बसला. सायली दुरूनच त्याचा आविर्भाव पाहत होती. तिनं स्वतःशीच एक सुस्कारा सोडला आणि परत भाजी चिरण्यामध्ये मग्न झाली. नरेंद्रनं तिच्याकडे पाहिलं तेव्हा ती भाजी चिरण्यात मग्न होती. तिच्या चेहर्‍याचा रंग उडालेला होता. लग्नापूर्वी उत्फुल्ल आणि आनंदी असणारी सायली उदास कधी झाली आणि विझून कधी गेली हे त्याला कधी जाणवलंच नाही असं नाही, पण त्यानं तिकडे दुर्लक्ष केलं होतं हे नक्की.
तिनं संसार चालवायचा आणि त्यानं त्याचं आवडतं काम, लेखन करायचं असा एक अलिखित करार होता त्यांच्यात, पण तशी कधी वेळ येणार नाही असा त्याचा एक ठाम विश्वास होता. सुरूवातीला त्यानं मालिकांसाठी लेखन करून चार पैसेही आणले होते, पण मग तेच तेच रटाळ पाणी घालणं त्याच्याच्यानं होईना. सायलीच्या मते, सिरीयलचे रेटिंग पडल्यामुळे निर्मात्यांनी त्याला काढून टाकलं होतं, पण त्याला ते आजही मान्य नव्हतं. कसंही असलं तरी एकंदरित तो अयशस्वी होता.
कॉलेजात असताना संपूर्ण साम्यवादी मित्रगटामध्ये, एकमेव भांडवलवादी असलेला तो, भांडवलशाहीची शिक्षा भोगत होता आणि त्याचे सर्व साम्यवादी मित्र, शिक्षणानंतर नोकरीस लागून भांडवलशाहीतला आनंद भोगत होते. ह्या विरोधाभासावर त्यानं जेव्हाही विनोद केला होता, तेव्हा तेव्हा सायली हसली होती. पण सुरूवातीचीच काही वर्षं. नंतर तिनं त्याच्याशी बोलणंही जवळपास बंदच केलेलं होतं. त्याला लेखनातून पैसा हवा होता, कुटुंबासाठी सुखसोयी हव्या होत्या, पण प्रत्यक्षात अनुभव विचित्रच आला होता. त्याचा स्वतःच्या लेखनावर पूर्ण विश्वास होता, पण कुठेतरी काहीतरी अडत होतं. काय, ते त्याला कळत नव्हतं. सायलीची नोकरी हा त्या गुदमरलेल्या संसारातला एक्झॉस्ट फॅन होता आणि त्या बळावरच ते दोघे दिवस ढकलत होते.
त्याक्षणीदेखील त्याला तिच्या चेहर्‍याकडे पाहताना त्या घुसमटीची धग जाणवली आणि त्याचं काळीज हललं. 'जर ह्या पटकथेचा प्रयोगही फसला, तर मात्र काहीतरी नोकरी करावीच लागेल.' त्यानं मनाशी विचार केला. 'मी तिला गमावू नाही शकत. की मी आधीच तिला गमावलंय?' नेहमीप्रमाणे प्रश्न-प्रतिप्रश्नांच्या आवर्तात तो शिरू लागला आणि त्यानं सारे विचार झटकले. घड्याळात पाहिलं आणि समोर पडलेले सगळे कागद गोळा केले.
"मला उशीर होईल गं परत यायला. अन्न फ्रीजमध्ये ठेवून दे." पायात चपला अडकवत बाहेर पडत तो म्हणाला. तिची प्रतिक्रिया बघण्याची त्याची इच्छा नव्हती की हिंमत हे त्यालाही ठाऊक नव्हतं.
----
क्रमशः

4/12/2015

स्मारक

फार पूर्वी शेजारी शेजारी दोन राज्यं होती. राज्यांमध्ये प्रचंड वैर होतं. दोन्ही राज्यांच्या जनतेमधून विस्तवही जात नव्हता म्हणा ना. कारण काय? तर त्याहूनही फार पूर्वी एक नदी दोन राज्यांमधून वाहत होती. एका राज्यात उगम पावून दुसर्‍या राज्यात वाहायची. उगमवाल्या राज्याला पुरेसं पाणी मिळत नसे, म्हणून ते बंधारे घालायचे, तर दुसर्‍या राज्यात तुटवडा निर्माण व्हायचा. मग त्यावरनं चकमकी झडायच्या, माणसं मरायची. मग पाणीवाटपाचे करार व्हायचे. पुन्हा उन्हाळा आला की पुन्हा तेच जुनं चक्र.
उगमवाल्या राज्यानं गपचूप बरीच वर्षं मेहनत करून पाण्याचे नवे साठे शोधून काढले आणि नदीचा एक छोटा प्रवाह आपल्या राज्याकडे वळवून घेतला. त्यामुळे त्यांचं पाण्याचं दुर्भिक्ष बंद झालं आणि बंधारे बांधायची गरज संपून गेली. उन्हाळा आला आणि त्यांनी बंधारेच घातले नाहीत. दुसर्‍या राज्याकडे पुरेसं पाणी गेलं. दुसर्‍या राज्याचा राजा काळजीत पडला. त्याला वाटलं ह्यात काहीतरी खेळी आहे. सैनिक रिकामे बसले. 
अशी सलग पाच वर्षे गेली. सैनिक रिकामे बसून बसून सुस्तावले. आणि एक वर्षं दुष्काळ पडला. नदीचं पाणी आटलं. उगमवाल्या राज्याकडे पर्यायी साठे होते. ते निवांत होते. पण दुसर्‍या राज्यात परिस्थिती बिकट झाली. त्या राजाला वाटलं पुन्हा बंधारे घातले गेले. त्याला हायसं वाटलं आणि त्यानं सैन्याला पुन्हा चकमकींचा आदेश दिला. सैन्य सुस्तावलेलं होतं त्यामुळे त्यांचा सहज पाडाव झाला. लज्जास्पद पराभवानं राजाला वाटू लागलं की नदीच्या पाण्यातच काहीतरी कालवून पलीकडचं राज्य गेली पाच वर्षं पाणी पाठवत होतं. त्यामुळे आपल्या राज्यातले लोक कमकुवत झालेत. 
त्या राजानं मग दुसर्‍या बाजूकडल्या एका राज्याकडे सैन्याची मागणी केली. त्या राज्यानं लगेच मदत देऊ केली. तिसर्‍या राज्याचं सैन्य दुसर्‍या राज्यात आलं आणि एका घनघोर युद्धाला सुरूवात झाली. रक्ताचे पाट वाहिले. जिंकलं कुणीच नाही पण तिसर्‍या राज्याच्या सैनिकांनी पहिल्या आणि दुसर्‍या राज्यातल्या उद्ध्वस्त इमारतींवर स्वतःच्या सैनिकांची स्मारकं बांधली आणि ती उजाड भूमी सोडून ते सगळी मालमत्ता आणि जडजवाहिरं घेऊन ते आपल्या भूमीवर निघून गेले.
शेकडो वर्षं गेली त्या राज्यांमधून नदी तशीच वाहत राहिली, राजघराणी बदलली, सत्ताधीश बदलले, वैर अजूनही तसंच होतं, पण आता ते युद्धस्मारकं पाडण्यावरून होतं.