4/28/2010

"बाबा" ची भिंत!

मिथुनदा हे माझं श्रद्धास्थान आहे. अगदी लहानपणापासून. आणि हे थोडं अतिशयोक्तिपूर्ण वाटेल, पण...वाटो.
लहान असताना सिनेमे म्हणजे काय हे ही माहित नसताना मी अमिताभ बच्चनचा 'जंजीर' पाहिला होता. अगदी मनावर ठसला होता तो सिनेमा. ती पांढरा घोडावाली चेन, रात्री स्वप्नात खिंकाळणारा पांढरा घोडा पाहून उठणारा घामाघूम अमिताभ, "यह पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं।" म्हणत खुर्चीला लाथ घालणारा अमिताभ, "यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी" वर रुमाल उडवत नाचणारा केस लाल रंगवलेला प्राण, रुळावर फेकून दिलेला जखमी अमिताभ (आणि टेन्शनमध्ये आलेला मी) आणि ऐनवेळी त्याला रुळावरून खेचणारा(आणि माझ्या दुवा मिळवणारा) प्राण. मी विसरूच शकत नाही. मग पुढे त्याचा खास लहान मुलांसाठी बनवलेला(कुणीही काहीही म्हणो, माझ्या म्हणण्यानुसार तो लहान मुलांसाठीच बनवलेला होता)'अजूबा'. अजूबा तर मी कित्येक वेळा आवडीने बघितला होता(अजूनी लागला की बघतो, कदाचित मी मनाने मोठा झालो नाही{लोकांना सांगायला, "मी तो सिनेमा 'नॉस्टॅल्जिक' होण्यासाठी बघतो"}). मग माझ्या लहानपणी माझा आवडता अजून एक आवडता सिनेमा होता, "हाथी मेरे साथी". त्या सिनेमातलं जास्त काहीही माझ्या लक्षात नाही. पण तो सिनेमा मला तेव्हा जाम आवडायचा, कारण त्यातला हिरो - रामू हत्ती(मला आवडण्याचं अजून एक कारण हेही असावं की मला नावीन्याची हौस आहे{पुलं सांगतात त्याप्रमाणे 'भर वर्गात सदरा काढून डोक्याला गुंडाळण्या'च्या सदरातली हौस नाहीये, पण} आणि एरव्ही नोकरासाठी म्हणून राखून ठेवलेलं नाव हिरोला देण्यात आलं होतं). तो जेव्हा मरतो तेव्हा, रस्त्याने राजेश खन्ना गाणे गात जातो तेव्हा मीही रडायचो. पण त्या सिनेमाशी माझी एक एम्बॅरॅसिंग आठवण पण जुळलेली आहे. त्यातल्या शेवटच्या प्रसंगात राजेश खन्ना व्हिलनला त्वेषाने सांगतो, "मैं तुम्हें नही छोडूंगा", तर हा प्रसंग आई-वडिलांना रंगवून सांगतेवेळी(का सांगत होतो ते आठवत नाही) मी तेव्हढ्याच त्वेषात येऊन, "मैं तुझे नही सोडूंगा" असे म्हणालो होतो. आई-बाबा बराच वेळ हसले, मला कळेना आपलं काय चुकलं. मग त्यांनी बर्‍याच जणांना माझ्या भूमिकेत शिरण्याची ही कथा सांगून माझा साफ वडा केला (अजूनी करतात, त्यानंतर मी त्याच त्वेषाने राष्ट्रभाषा सभेच्या चार परीक्षा 'विशेष योग्यते'त पास करूनही माझ्या कपाळीचा हा डाग पुसला गेला नाही आहे). असो, तर मी नेहेमीप्रमाणेच मुद्द्यापासून बराच भरकटलो आहे, तेव्हा पुन्हा मुद्द्यावर येतो.
मुद्दा हा, की मी लहान असताना माझे काही ठराविक सिनेमे आवडीचे होते(दूरदर्शन एक वर शनिवारी रात्री लागणारे). पण आवडीचा नट एकच. अमिता बच्चन(मी '' नजरचुकीने विसरलेलो नाही). फक्त अमिता बच्चन अशासाठी कारण तो ढिशूम ढिशूम करायचा, राजेश खन्ना नाही कारण त्या सिनेमाचा हिरो रामू होता. पण मग एखादं वर्ष झालं असेल. दूरदर्शनवर "बॉक्सर" हा सिनेमा लागणार होता. आमच्याकडे व्ही.सी.आर. होता, काही ठराविक सिनेमे आम्ही रेकॉर्ड करायचो. मी बॉक्सर ह्या नावानेच प्रभावित झालो होतो, त्यामुळे साहजिकच मी बाबांच्यामागे तो रेकॉर्ड करण्यासाठी धोशा लावला. माझ्या भावाने मला त्या सिनेमाचा हिरो मिथुन चक्रवर्ती याची माहिती पुरवली - "तो गरीबांचा अमिताभ आहे." बस माझ्या डोक्यात ते चांगलंच ठसलं. आणि मला मिथुन एकदम आपला माणूस वाटायला लागला (ह्या घटनेचा सोशिओ-सायको ऍनॅलिसिस असा करता येईल की - मला एव्हढंच माहित होतं की आपण श्रीमंत नाही, म्हणजे आपण गरीबच असलं पाहिजे. आणि आपण गरीब तर गरीबांचा अमिताभ तो आपला अमिताभ. लॉजिक.) बॉक्सर मधल्या मिथुनच्या बॉडीची वाहवा त्यानंतर मी कित्येक दिवस जो भेटेल त्याच्याकडे करायचो (रती अग्निहोत्रीची वाहवा करण्याएव्हढं वय झालं नव्हतं माझं तेव्हा). मी काही मुव्ही बफ नव्हतो तेव्हा, की मिथुन आवडतो म्हणून मिथुनचे सगळे सिनेमे बघ (अर्थात तेव्हा काही सोयही नव्हती, सिनेमांच्या कॅसेटी भाड्याने आणून बघणे ही ३-४ महिन्यांतून एकदा केली जाणारी चैन मानली जायची.). तर इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही माझा मिथुन ह्या माणसाबद्दलचा आदर कमी झाला नाही. 'डीस्को डान्सर', 'डान्स डान्स', वगैरेंबद्दल मी पूर्ण अनभिज्ञ होतो. अमिताभ हा का कुणास ठाऊक फार दूरचा वाटायला लागला. मिथुन आपला माणूस वाटायचा. माझ्या दादाने दिलेल्या तत्वज्ञानाची आणि बालमानसशास्त्राची सांगड घातली, तर कदाचित ह्या अतर्क्य घटनेचा अन्वयार्थ लागण्याची शक्यता आहे(हे वाक्य मी का लिहिलं, ह्या अतर्क्य घटनेच्या मागचं कारण कदाचित आज ऑफिसात कामे सोडून वाचलेले अनेक मराठी ब्लॉग्ज हे असू शकतं). मग त्याचा क्रिष्नन अय्यर येम.ये. आला आणि माझ्या दीवानगीला पुरावा मिळाला. "विजय दीनानाथ चौहान" ह्या गारूड करणार्‍या पात्रापेक्षा मी "क्रिष्नन अय्यर येम.ये." च्या जास्त प्रेमात पडलो, हाच तो पुरावा. "ये लडका, चिंगारी, बडा होके हम सबको, जलाके राख कर देगा. आऐ(ह्या उच्चाराला शब्दबद्ध करण्यासाठी मला मार्गदर्शनाची गरज आहे)." हा डायलॉग मला आवडला पण ,"हम ये लुंगी उठाती, तुमको डिस्को दिखाती" चा जप मी कित्येक दिवस करत होतो.
मग पेपरात मिथुनला त्याच्या "जल्लाद" ह्या सिनेमासाठी "बेस्ट व्हिलन"चं फिल्मफेअर मिळालं हे वाचून मला झालेला आनंद मला आजही आठवतो. जल्लाद हा मिथुनदाच्या पुढे येणार्‍या अनेक "" सिनेमांची नांदी होती. हे बॉलीवूडच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला अलगद बाजूला केलं. त्यालाही फरक पडत नव्हता. त्याने ऊटीमध्ये हॉटेल बांधलं होतंके.एल.व्ही. प्रसाद हा पार्टनर दिग्दर्शक, स्वतः हिरो, स्वस्तातली हिरॉईन, सगळं शूटिंग हॉटेलात किंवा आवारात. आणि एवढ्या स्वस्तात बनवूनही यू.पी. बिहारमध्ये होणारी कमाई, हा फायद्याचाच सौदा होता. मग "गुंडा", "लोहा", "हिटलर", "चीता", असं सगळं चालू होतं. एव्हढ्या गुणी कलाकाराला असं करताना पाहून जीव तुटायचा. "चढ गया उपर रे, अटरिया पे लोटन कबूतर रे" म्हणणार्‍या मिथुनचा राग मात्र कधी आला नाही.
इकडे अमिताभ, ABCL, टॅक्स बुडवणे असले प्रकार करून नजरेतून उतरत होता तेव्हाच कचरापेटीत सापडणालेल्या मुलीला दत्तक घेणार्‍या आणि एकही मेनस्ट्रीम सिनेमा न करून सर्वात जास्त कर भरणार्‍या मिथुनबद्दल वाचून अभिमान वाटायचा. नक्षलवादाची कास सोडून चहाच्या टपरीपासून नव्या आयुष्याची सुरुवात करणारा आणि मोठा माणूस झाल्यावर त्याच टपरीवाल्याला मोठं हॉटेल काढून देणारा मिथुनदा वेगळा आहे ह्याची खात्री पटली.मग मी कॉलेजात आलो. आणि मिथुनचा "तितली" नावाचा बंगाली सिनेमा आल्याचं वाचलं. त्यात अपर्णा सेन आणि कोंकोणा सेन होती. मिथुनदाच्या अभिनयाची स्तुती वाचून तेव्हाही बरं वाटलं होतं. मग वर्षभरातच ती बातमी आली - "मिथुनदा मेनस्ट्रीम सिनेमात परततोय." विक्रम भट्टचा "ऐलान". कॉलेजातल्या मित्रांनी चिडवलं, पण मी म्हटलं, पिंजर्‍यात राहिला म्हणून वाघाची शेळी होत नाही. सिनेमा साफ पडला, पण माझ्यासाठी त्यातलं मिथनदाचं पात्र "बाबा सिकंदर" हे त्याच्या परतीचं द्योतक होतं. मग मी आणि माझे काही टवाळ मित्र कॉलेजात एकमेकांना "हेल मोगॅम्बो" सारखे "जय बाबा सिकंदर" किंवा "बाबा की जय" असे म्हणून ग्रीट करायचो. मग हे लोण बर्‍यापैकी पसरलं, काही माहीत नसणारेही मला असंच ग्रीट करायचे. हळूहळू माझं टोपणनाव बाबा पडलं. त्याच सुमारास मी माझा इंग्रजी ब्लॉग मजा म्हणून ब्लॉगस्पॉट वर चालू केला होता. मी बाबा धर्माची पताका खांद्यावर घेतलेली असल्याने त्याचं युआरएल "द बाबा प्रॉफेट" असं ठेवलं. त्याचं नाव ठेवलं "बाबा की जय!" पासवर्ड होता, "जयबाबासिकंदर" (प्रयत्न करू नका आता बदललाय). आता ब्लॉगरचं युजरनेम गुगल बरोबर मर्ज केलंय, पूर्वी ब्लॉगरला वेगळं युजरनेम असायचं, आणि माझं युजरनेम "द प्रॉफेट" असं होतं. मी खेळाडूंमध्ये राहुल द्रविडचा सच्चा भक्त असल्याने टॅगलाईन होती, "ग्रेट वॉल ऑफ बाबा!". प्रोफाईल फोटो मिथुनदाचा. मग पुढे मी तो ब्लॉग बंद करून सोफिस्टिकेटेड ब्लॉग बनवला. रूढार्थाने मी मोठा झालो.
तीन-चार वर्षे गेली. मी मिथुनदाचे सगळे नवे-जुने सिनेमे पाहिले. "ट्रक ड्रायव्हर सुरज", "कूली शंकर", "हिटलर", "अमावस" सगळ्या लीला पाहिल्या मी. पण तोच "ब" मिथुनदा गुरू मध्ये आपला खरा दर्जा दाखवताना पाहून अभिमानही वाटला. मग मी एक दिवस मराठी ब्लॉगविश्वात प्रवेश केला. माझ्या साईटवरचा माझा मराठी-इंग्रजी ब्लॉग काही कारणास्तव तिथे जोडला गेला नाही, मग मी तब्बल पाच वर्षांनी पुन्हा एकदा ब्लॉगर उघडलं. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. "मराठी ब्लॉगला काय नाव द्यायचं?", हा प्रश्न मला पडलाच नाही. "ग्रेट वॉल ऑफ बाबा" चं "'बाबा' ची भिंत" झालं आणि प्रोफाईल फोटो बदलण्याचा प्रश्नच नव्हता.
मी आजही मिथुनदाचा तेव्हढाच मोठा पंखा आहे. त्याच्या ब सिनेमांची मी कितीही टवाळी केली तरी त्यात कौतुकाचा भागच जास्त असतो. पण हे मात्र खरं की मृगया साठी नॅशनल ऍवॉर्ड घेऊन कारकीर्दीची सुरुवात करणारा आणि अभिनयासाठी दोन नॅशनल ऍवॉर्ड मिळवणारा मिथुन ह्यांच्याबरोबरच, "ये खून नही, मेरे क्रोध का रंग है, चाटेगा इसे?"(क्लासिक डान्स ऑफ लव्ह), "बाप पे पूत, पिता पे घोडा, कुछ नही तो थोडा थोडा!"(गुंडा) आणि "दिखनेमें बेवडा, दौडने मे घोडा और मारने मे हाथोडा हूं मैं" (लोहा) म्हणणारा मिथुनही माझा तितकाच आवडता आहे. कदाचित तारा जुळल्यात.
(तळटीप{वटवट सत्यवानाकडून साभार} - मला बर्‍याच जणांनी ब्लॉगच्या विचित्र नावाबद्दल विचारलं. परवा आनंदशी बोलताना त्याने ह्याबद्दल एक ब्लॉग पोस्ट लिहायची कल्पना सुचवली. मग त्याबद्दल लिहायचं तर हे सगळं आपोआपच आलं. इथपर्यंत वाचलं असाल तर सहनशीलतेबद्दल धन्यवाद. आणि आनंद, कल्पने बद्दल धन्यवाद{लोकहो, शिव्या घालायच्या असतील तर डायरेक्ट त्यालाच घालणे.})
आणि हो ....
मिथुनदा हे माझं श्रद्धास्थान आहे. अगदी लहानपणापासून. आणि हे थोडं अतिशयोक्तिपूर्ण वाटेल, पण...वाटो.

4/25/2010

ब्लाईंड चान्स, किएस्लोव्स्की आणि मी

"समांतर विश्व" नावाचा एक प्रकार असतो, ऐकला असेल तुम्ही सगळ्यांनी, सगळ्यांनी नाही तरी बर्‍याच जणांनी. थोड्क्यात सांगायचं झालं तर आपण जशी निवड करतो,जश्या शक्यता असतात किंवा जसे निर्णय घेतो, त्यावरून पुढची घटना ठरते. म्हणजे उदाहरणार्थलल्या मोदी सकाळी उठतो, तो ठरवतो की आज थरूरला कोपर्‍यात घ्यायचा, चांगलीच जिरवायची त्याची. 'आपल्याशी पंगा घेतो काय?' मग तो संगणक चालू करतो, जालसंपर्कित(ऑनलाईन - आभार-"शुद्ध मराठी") होतो आणि ट्विटर चालू करतो. कोची टीमच्या काळे पैसे धारकांची नावे टाईप करतो आणि कळ दाबणार तेव्हा -
. तो विचार करतो की जाउ दे. कशाला उगाच नडनडी, आपण पुन्हा एकदा बोलू त्याच्याशी, गॅबीचं प्रकरणही वेगळ्या प्रकारे निस्तरता येईल. शरदकाकांशी बोलून लातूरच्या पार्टीलाही शांत करू आणि वसूमावशींशी बोलून नंदूकाकालाही समजावता येईल. शश्या कसाही असला तरी आपला एकेकाळचा दोस्त आहे. हां आता लडकी की वजह से दोस्ती मे दरार तो आती है, पण दोस्त दोस्त को समझ नही पायेगा तो कौन? आणि तो लिहिलेलं खोडून टाकतो. गॅबीसाठी शश्याला पाठवलेले मेल्स काढून टाकतो. गॅबीला लिहिलेले मेल्स काढून टाकतो. शांत चित्ताने पैश्यांचे नवे आकडे तपासतो आणि संगणक बंद करून पुढच्या कामांना लागतो. मग सगळं ठरल्याप्रमाणे होतं. "एकमेकां साह्य करु, अवघे धरू सुपंथ।"
. तो विचार करतो - "साला मित्राच्या पाठीत खंजीर खुपसतो, तेही एका बाईवरून! रॉट इन हेल!" आणि कळ दाबतो. पुढे काय होतंय ते सगळ्यांना दिसतंय.
ही म्हणजे दोन "समांतर विश्व". एका निवडीवर, एका शक्यतेवर अवलंबून. ही समांतर विश्व खरोखर अस्तित्वात असतात असंही काही लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे, आत्ता मी जसा आहे, त्याहून वेगळा मी पण ह्या अथांग विश्वात कुठेतरी आहे, म्हणजे थोडक्यात माझ्या असंख्य निवडींवरून जन्मलेले असंख्य मी अस्तित्वात आहेत आणि अजून चालूच आहेत. असो, मुद्दा तो नाही. मुद्दा हा की ह्या जबरदस्त संज्ञेचा वापर करून कोणी चित्रपट बनवला नाही तरच आश्चर्य वाटेल. पण सत्य हे आहे की आजवर माझ्या माहितीप्रमाणे ह्यावर जास्त सिनेमे आलेले नाहीत. आणि त्यातले दोन मी स्वतः पाहिलेत, बाकींबद्दल मी फक्त ऐकलंय किंवा वाचलंय. पण जो सिनेमा मी काल पाहिला - 'किएस्लोव्स्की'चा "ब्लाईंड चान्स" - त्याचं गारूड अजूनी उतरत नाहीये.
त्याचं झालं असं. मी इथे 'झी टीव्ही यूके' चा पंखा आहे. पर्यायच नाहीये, माझ्याकडे झी यूके आणि झी सिनेमा यूके एव्हढे दोनच हिंदी चॅनेल्स येतात. तर त्यावरती जे विलक्षण सिनेमे लागतात ते पाहून माझं भारतीय सिनेमाबद्दलचं ज्ञान प्रचंड वाढलंय. नावही न ऐकलेले हिंदी सिनेमे, जुन्या काळचे हिंदी सिनेमे, ते दक्षिणेकडचे डब केलेले सिनेमे असे सगळे प्रकार इथे आवर्जून पाहायला मिळतात. एकदा असाच एक दक्षिणेकडचा सिनेमा डब केलेला लागला होतो.  दाक्षिणात्य भारतीय सिनेमाला माझ्या मनात एक वेगळंच (आदराचं{हे तिरकस पकडायचं की सरळ वळणाचं हे तुमचं तुम्ही ठरवा}) स्थान आहे. त्यामुळे मी मनापासून तो चित्रपट पाहू लागलो. पण काही तसंच महत्वाचं काम निघाल्याकारणे मी तो सिनेमा पाहू शकलो नाही. पुन्हा महिन्याभरात तोच सिनेमा लागला(हे अतिशय सामान्य आहे, चकित होण्यासारखं काही नाही. म्हणूनच एखादा सिनेमा मिस केल्याचं टेन्शन येत नाही). ह्यावेळी मी तासभर पाहिला(मधूनच) पण मला बिलकुल काहीही अर्थबोध झाला नाही. हा माझ्या बुद्धीचा आणि सिनेमाविषयक ज्ञानाचा सरळसरळ अपमान होता. सिनेमाचं नाव होतं 'दो रास्ते-१२B'(रास्तावरून आठवलं - कुठल्याही आर्मीच्या कॅम्पाबाहेर पाटी असते 'यह आम रस्ता नही है।' मी लहान असताना ती पाटी 'यह आम सस्ता नही है' अशी वाचल्याचं आठवतंय.असो.). मग मी विकीमातेला प्रणाम केला आणि माहिती काढली. तर त्या सिनेमाचं मूळ तामिळ नाव "१२B" एव्हढंच होतं. आणि पूर्ण वाचल्यावर कळलं की तो समांतर विश्वाच्या तत्वावर बनला होता आणि मी तो मूळ निवडीचा भाग न बघितल्यामुळे मला अर्थबोध होत नव्हता. आणि हे ही कळलं की तो सिनेमा ग्विनेथ पॅल्ट्रोच्या "स्लायडींग डोअर्स' ह्या इंग्रजी सिनेमावर बेतलेला आहे. मग मी 'स्लायडींग डोअर्स' बद्दल वाचलं तर कळलं त्याची मूल संकल्पना 'ब्लाईंड चान्स' ह्या क्रिश्तॉफ किएस्लोव्स्कीच्या सिनेमावरून घेतलेली आहे. आता किएस्लोव्स्कीचं नाव आलं की माझं डोकं बाकी कामे बंद करून सिनेमाच्या शोधात लागतं आणि अखेर तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर 'ब्लाईंड चान्स' माझ्या हातात आला आणि मी तो काल पाहिला. सिनेमा पाहिल्यानंतर माझी किएस्लोव्स्कीवरची श्रद्धा अधिकच दृढ झाली. माहित नसणार्‍यांसाठी सांगतो(ह्यात कुठेही बढाई नाही, मला किएस्लोव्स्की माहितीये तो ही एक प्रकारचा ब्लाईंड चान्सच, कसा ते पुढे), किएस्लोव्स्की हा एक पोलिश सिनेलेखक, निर्माता आणि दिग्दर्शक होता. त्याने एकाहून एक सरस चित्रनिर्मिती केली आहे. तो आणि त्याचा मित्र आणि सहपटकथालेखक क्रिश्तॉफ पिएसिविच ह्यांनी पोलिश व्यवस्थेवर भाष्य करणारे अनेक जबरदस्त सिनेमे बनवलेत. नुसते पोलिशच नाही तर कॅथॉलिसिझम वर आणि टेन कमांडमेंट्सवर बनवलेले "डेकालॉग" हे दहा लघुपट माझ्यामते जगात ऑल टाईम बेस्ट आहेत. फ्रान्सच्या तिरंग्यावरून बनवलेले ब्ल्यू, व्हाईट आणि रेड हे ही सांकेतिक आणि कलात्मक सिनेमाची अप्रतिम उदाहरणे आहेत.
समांतर विश्वाचा धागा पकडून सांप्रत समाजाची अवस्था आणि व्यवस्था दाखवणं किती लोकांना सुचेल. किएस्लोव्स्कीनं एका काल्पनिक संकल्पनेला वास्तवाची एवढी धार लावलीय, की ती तत्कालीन पोलिश समाजरचनेला आडवा छेद देऊन जाते. एकच मुख्य पात्र, वैद्यकीय शिक्षणाच्या चौथ्या वर्षाला असलेला. थोडंसं वेगळं लहानपण गेलेला तो वडीलांच्या मृत्यूनं आणि मृत्यूपूर्वी त्यांना न भेटू शकल्यानं अस्वस्थ होतो. त्याला सारखं वाटत राहतं की ते त्याला काहीतरी सांगू इच्छित होते. त्या अस्वस्थतेतच तो सुट्टी घेऊन आयुष्याचा पुनर्विचार करू इच्छितो आणि वॉर्साला जायची ट्रेन पकडायला जातो. पण त्याला उशीर झालाय, ट्रेन फलाटावरून निघालीय. तो ट्रेनच्या मागे धावतो. इथे दोन शक्यता आहेत, तो ट्रेन पकडतो किंवा नाही. किएस्लोव्स्की त्यात तिसरी शक्यता टाकतो, तो ट्रेन सुटल्यावर कशी प्रतिक्रिया देतो. त्यावरून तीन समांतर विश्व निर्माण होतात. एकात तो कम्युनिस्ट असतो, दुसर्‍यात तो कम्युनिस्टविरोधी(क्रांतिकारक) असतो आणि तिसर्‍यात तो सरळमार्गी, पापभीरू, बूर्झ्वा मध्यमवर्गीय असतो. त्याच्या तीन समांतर विश्वात तीच पात्र असतात पण त्यांचं महत्व त्या त्या विश्वात वेगवेगळं असतं. सुरुवातीला पडलेली अनेक कोडी उलगडत जातात. शेवट असा नाहीच ह्या सिनेमाला, कारण उद्देश्य चान्स म्हणजे शक्यता ही संकल्पना ठसवणं आणि महत्वाच म्हणजे तत्कालीन पोलिश व्यवस्थेवर भाष्य करणं. शक्यता ही संकल्पना तर इतकी कल्पकपणे वापरलीये, की नीट पाहिलं तर सिनेमातल्या प्रत्येक पात्रावर शक्यतेचा परिणाम झाल्याच जाणवतं.
मी कॉलेजात असताना मित्रांबरोबर गप्पा मारत रस्त्याच्या कडेला उभा होतो. त्यादिवशी मी आतल्या बाजूला उभा होतो. एका गाडीचं नियंत्रण सुटलं आणि ती आमच्या अंगावर आली. दोन्ही मित्र बाहेरच्या बाजूला होते त्यामुळे ते वाचले, गाडीनं मला ठोकलं. पाय फ्रॅक्चर झाला. आणि पुढे त्यातून पाठीचं दुखणं उद्भवलं. त्यामुळे ऐन शेवटच्या वर्षी मी दोन महिने बेडरेस्टवर होतो. मग तेव्हा "जिंदा" नावाचा टुकार सिनेमा आला. घरीच असल्यामुळे मी उगाच नेटवर चाळा करताना रेडीफवर त्याचं परीक्षण वाचलं. त्यातून कळलं की तो 'ओल्डबॉय' ह्या कोरियन सिनेमावर बेतलेला आहे, जो इतका बोल्ड आहे की बघायला जिगर पाहिजे. झालं, मी तो सिनेमा शोधला आणि पाहून कोरियन सिनेमाच्या प्रेमात पडलो. पार्क चान वूक चे सगळे सिनेमे मिळवून पाहिले. घरी बसल्याबसल्या हेच धंदे. मग विचार केला आता फक्त कोरियन का बाकीचेही पाहू. मग बरा झाल्यावरही वेड संपलं नाही. मुंबईच्या प्रभात चित्र मंडळाची सदस्यता घेतली. माझा पहिलावहिला मामि चित्रपट महोत्सव पाहायला गेलो. आणि तिथे डेकालॉग सिरिज चालली होती. मला रोज येणं शक्य नव्हतं. मग ती सिरिजही मिळवली आणि किएस्लोव्स्कीच्या प्रेमात पडलो ते आजतागायत. त्याचे थोडेच सिनेमे असतील आता जे मी पाहिले नाहीयेत. किएस्लोव्स्कीला जाऊनही बरीच वर्षे झालीत.
इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षापर्यंत थेटरात सगळे मिळून सात सिनेमे बघितलेल्या माझा, सिनेमा हा प्राणवायू झाला. कोण कुठला पार्क चान वूक, कोण कुठला किएस्लोव्स्की आणि कोण कुठला मी. हे सगळं कसं आणि का घडलं. मी त्या दिवशी रस्त्याच्या कडेला आतल्या बाजूला उभा होतो म्हणून. ब्लाईंड चान्स.

4/20/2010

ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसॉर्डर

परवाच कुठल्याश्या बातम्यांच्या साईटवर मी सेलेब्स(सेलेब्रिटीज)चे विविध ऑब्सेसिव्ह डिसॉर्डर ह्याबाबतचं एक प्रेझेन्टेशन पाहत होतो. बेकहॅम, लिओनार्डो डी कॅप्रिओ आणि अजून कोण कोण. तेव्हाच ते वाचताना मला असं वाटायला लागलं की असल्या बर्‍याच सवयी तर मला सुद्धा आहेत (टीप-ही बढाई नाही). आता हे पहा, दरवाज्याच्या हॅंडलला जीवाणूंच्या भीतीने हात न लावणे, किंवा एखादी गोष्ट वारंवार नीटनेटकी करायचा प्रयत्न करणे (अगदी ती वस्तू जागची हललीही नसली तरी), किंवा लिओनार्डोच्या "एव्हिएटर" प्रमाणे कुठल्याही घराबाहेरच्या व्यक्तिला किंवा वस्तूला हात लावावा लागल्यावर वारंवार हात धुणे ह्या असल्या विचित्र प्रकारांना ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसॉर्डर (ह्यापुढे - ऑकडि) असे म्हणतात.
तर मला काय आहे बरं. हं,मला घरातली हॉट प्लेट बंद केलीय हे तीनचारदा खातरजमा करून घ्यावसं वाटतं. त्याच्या नॉब बरोबर इंडिकेटर लाईट दिलेला असूनही मी दोन दोनदा नॉबला हात लावून बघतो, न जाणो कधी इंडिकेटर लाईट बंद झाला असला तर? मग वरून मी हॉटप्लेटला हातही लावून बघतो (अर्थात अगदी सांभाळून). आता मला सांगा हॉटप्लेट ही बंद केल्याकेल्या कधी थंड होते का? पण तरीही मी हात लावून बघतो. हा तद्दन मूर्खपणा आहे हे मला कळतं, पण वळत नाही. हे सगळं रामायण झालं की मी स्वयंपाकघरातून बाहेर पडताना मोठा दिवा बंद करून पुन्हा हॉटप्लेटकडे बघतो. इंडिकेटर बंद आहे की नाही हे बघायला (नो कॉमेंट्स). मग मी घराबाहेर पडताना आपण किल्ली घेतलीये ना ही काळजी असते. दोनदा खिशात किल्ली चाचपली, की मी दरवाजाबाहेर पडतो. पण दरवाजा लावण्याअगोदर दुसरी शंकेची पाल चुकचुकते. त्याचं काय आहे, मी एका अशा रेसिडेन्समध्ये राहतो, जिथली सगळी व्यवस्था एका हॉटेलची मॅनेजमेंट बघते, त्यामुळे किल्लीचं वगैरे हॉटेलसारखं आहे, राहिली आत किंवा हरवली तर नवीन बनवून मिळते कारण ती इलेक्ट्रॉनिक की असते, सिस्टममध्ये जुनी आपोआप डिसेबल होते. हां तर कुठे होतो, पाल चुकचुकते. तर अशी पाल चुकचुकते की आत्ता की चालते आहे की नाही. कारण दरवाजा बंद केल्यावर मला आत काही राहिल्याचं आठवलं तर खाली रिसेप्शनवर जाऊन पुन्हा किल्ली बनवावी लागेल. असा दगा कधी झालेला नाही, पण इलेक्ट्रॉनिक कीच की हो. मग मी ती खात्री करण्यासाठी चावीचा उघड्या दरवाजावरच प्रयोग करून बघतो. ती चालतेय हे पाहून मी थोडा शांत होतो (आता मला सांगा, जर नसली चालत तर मी काय करणार आहे? पण ऑकडि). मग मी एकदाचा दरवाजा लावतो. मला दरवाजा लावल्यानंतर तो लागलाय कि नाही हे पुन्हा पुन्हा हॅंडल ओढून चेक करायची सवय आहे. पण हे फार सामान्य स्तरावर नाहीये, मी अक्षरशः तीन ते चार वेळा हा प्रकार करतो. त्यामुळे मला हल्ली दरवाज्याचं हॅंडल खिळखिळं झाल्यासारखं वाटायला लागलंय. पुन्हा एव्हढं झाल्यावर मी जसा दूर चालत जातो, दोन तीनदा मागे वळून पाहतो आणि खातरजमा करून बघतो की मी खरंच दरवाजा लावलाय ना! पुढे? मग जिना उतरून खाली आलो की डोक्यात आलंच, हॉटप्लेट व्यवस्थित बंद केलीय ना आपण?
वरील परिच्छेदामध्ये कुठेही मी अतिशयोक्ती अलंकाराचा प्रयोग केलेला नाहीये. मी एकदा व्हेनिसला फिरायला गेलेलो असताना रस्त्यात मला मी हॉटप्लेट बंद न केल्याचं प्रकर्षाने जाणवायला लागलं (अगदी ऑकडि) आणि माझ्याजवळ तेव्हा मोबाईलही नव्हता, तेव्हा मी रस्त्यातल्या एका पब्लिक फोनवरून शेजारच्या अपार्टमेंट मधल्या मित्राला फोन करण्याचा निष्फळ प्रयत्न केला होता. तो घरी नव्हता हे एक, आणि हॉटप्लेट व्यवस्थित बंद केली होती हे दुसरं. वर वर्णिलेला संपूर्ण घटनाक्रम जसाच्या तसा जेव्हा मी सुट्टीच्या दिवशी बाहेर पडतो तेव्हा होतो. ऑफिसच्या दिवशी न होण्याचं एकमेव कारण म्हणजे मी अगदी बसच्या निघायच्या वेळेच्या एक मिनिट आधी हॉटप्लेटच्या प्रसंगापर्यंत आलेलो असतो, त्यामुळे जर मी पुढचा घटनाक्रम बदलला नाही तर माझं दिवसाचं वेळापत्रक बदलू शकतं.
मला दुपारच्या जेवणावेळी संपूर्ण भरलेल्या कॅटीनमधून बरेच वेळा हातातून भरलेला ट्रे घेऊन शेवटच्या बाकाकडे जाताना कुठल्याही क्षणी आपल्या हातून ट्रे पडेल आणि आपली फजिती होईल असं वाटत असतं. लिफ्टमधून एकटं जाताना नेमकी आत्ता लिफ्ट अडकली तर? असं गेली दोन वर्ष त्याच लिफ्टनं प्रवास करूनही वाटतं. कुठल्याही लाईनमध्ये उभा राहिलो की आपल्या नंबरवरंच खिडकी बंद होईल अशी भीती वाटत राहते. एखाद्या सुंदर मुलीसमोर उभं राहून कॉफी पिताना कुठल्याही क्षणी आपल्या हातातला कप निसटून अंगावर सांडेल आणि आपली फजिती होईल असं वाटत राहतं.'अंगावर चट्टा' पाहिल्यावर मला 'डॉक्टरांना भेटा'वं की काय असं वाटायला लागतं. 'नारू टाळ'ण्यासाठी मी 'पाणी गाळतो'. कधी कधी मी जेव्हा स्वतःशी बोलतो, तेव्हा मला वाटायला लागतं की मला स्किझोफ्रेनिया आहे. ब्लड टेस्टहून आल्यावर आपला पांढरपेशा काऊंट कमी येईल की काय असं वाटायला लागतं. पोट बिघडलं की आपल्याला गॅस्ट्रो झाला वाटतं असा विचार मनाला चाटून जातो. ब्लॉग लिहून पोस्ट केला की दर तासाने मला कॉमेंट आली असावी असं वाटत राहतं आणि त्यामुळे मी सारखा मेलबॉक्स चेक करतो. आणि सेलेब्सचे ऑकडि पाहून आपल्यालाही आहे अशी मनाची ठाम समजूत होते.

4/15/2010

योगायोग

आपल्या आयुष्यात कित्येक गोष्टी, घटना अश्या घडत असतात, की ज्यामध्ये कमालीचा योगायोग असतो. आता हे बघा ना, एखाद्या कट्टर हिंदुत्ववाद्याच्या मुलानं/मुलीनं एखाद्या मुसलमान मुलीशी/मुलाशी प्रेमविवाह करावा, अगदी सोवळंओवळं पाळणार्‍या घरातल्या मुलांनी आंतरजातीय विवाह करावे, हे आणि असे अनेक विचित्र योगायोग रोजच्या रोज घडत असतात. जगातल्या मोठमोठ्या माणसांनाही हे असले विचित्र चेष्टाप्रद योगायोग चुकले नाहीत. अहिंसावादी म्हटले जाणारे गांधी बंदुकीच्या गोळीने मेले. कार्ल मार्क्सचा साम्यवादावरचा ग्रंथ कोणी प्रकाशक मिळेना म्हणून एका भांडवलदाराच्या मदतीने प्रकाशित केला गेला. काही योगायोग मात्र काळजाला चटका लावून जातातते योगायोगांपेक्षा जास्त काळाची क्रूर थट्टा म्हणून शोभतात. एखाद्या महान स्वावलंबी माणसाचं जीवनाच्या अखेरच्या काळात परावलंबी होणं, एखाद्या शूर सैनिकाचा रुग्णशय्येवर थोड्क्याच आजाराने अंत होणं. असाच चटका मला माझ्या एका मित्रांनी सांगितलेल्या बातमीने लागला. त्यांचे अतिशय जीवाभावाचे स्नेही असलेले "सर्पमित्र', एका सर्पाच्याच चावण्याने दगावले.
मराठीमध्ये एक शब्द आहे, "दैवदुर्विलास". ह्या शब्दाशिवाय दुसरा कुठलाही शब्द मला सुचला नाही ही बातमी ऐकल्यानंतर. सर्पमित्र सुनील रानडे, ही एक वल्ली होती. अर्थात मी त्यांना प्रत्यक्ष कधीही भेटलो नाही. जेव्हढंही ऐकलं ते सगळं आमच्या कंपनीतलेच एक सहकारी मित्र आहेत, त्यांच्याकडून. हे आमचे सहकारी, सर्पमित्र रानडेंचे स्नेही. दोघेही होमगार्डमध्ये एकत्र होते. त्यावेळी आमचे सहकारी रानडेंचे सिनीयर होते. त्यांची चांगली मैत्री होती. रानडेंनी प्रेमविवाह केला. घरच्यांच्या इच्छेविरोधात जाऊन. त्यावेळीही आमच्या सहकार्‍यांचा त्यांचा विवाह घडवून आणण्यात मोलाचा वाटा होता. साहजिकच, त्यांचे संबंध अत्यंत घनिष्ठ होते. रानडे, परळच्या प्राणिइस्पितळात नोकरीला होते. आणि त्यांच्या कुटुंबासमवेत ते तिथल्याच स्टाफ क्वार्टर्समध्ये राहायचे. दवाखान्यात सापांना ठेवण्याची जागा नव्हती, म्हणून रानडे सापांना आपल्याच घरी ठेवायचे. रानडेंनी एकदा एका जहाजातून अजगरही जिवंत पकडून त्याचे प्राण वाचवले होते. त्यांनी बर्‍याच सापांना असंच जीवदान दिलं होतं.
एक दिवस बायको माहेरी गेली असताना, रात्री सापांना बघताना, किंग कोब्रा त्यांना चावला. त्यांनी स्वतः विष उतरवण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण त्यांना यश आलं नाही. आणि शेजार्‍यांनी त्यांना इस्पितळात नेईपर्‍यंत उशीर झाला होता. वयाच्या अवघ्या अडतिसाव्या वर्षी एका सर्पमित्राचा सर्पाच्याच चावण्याने मॄत्यू झाला. दैवदुर्विलास - दुसरं काय?
आता त्यांच्या पत्नी त्यांच्या मित्रपरिवाराच्या सहाय्याने पुन्हा उभ्या राहायचा प्रयत्न करतायत. मुलांच्या शाळेसाठी म्हणून आणि दुसरी सोय करता यावी म्हणून क्वार्टर्समध्ये थोडा कालावधी वाढवून मिळावा ह्यासाठी आता त्यांचे प्रयत्न चाललेत. साहजिकच आमचे सहकारीही प्रयत्न करतच आहेत.
बातमी ऐकून दुःख झालं होतं, पण त्याहून जास्त हतबलता येते, ती आपण काही करू शकत नाही ह्या भावनेने. दैवाचे क्रूर खेळ तर थांबवू नाही मी, पण प्रार्थनेपलीकडेही कुणासाठी काही करता यावं, ह्यासाठी मात्र प्रार्थना कराविशी वाटतेय; हा काही योगायोग नाही.

4/11/2010

अ, ब आणि क

मी जेव्हापासून सिनेमे अनुभवण्यासाठी म्हणून बघायला लागलो, तेव्हापासून माझी नजर नुसतीच गोष्ट किंवा अभिनय किंवा आवडते नट-नट्या (नट आपलं उगाच जोडशब्द म्हणून लिहिलंय) ह्याकडे न राहता इतर अनेक गोष्टींकडे जाऊ लागली (हे लिहिणार होतो म्हणूनच आवडते नट-नट्या{पुन्हा नट ...} आधी लिहिण्याचा खटाटोप). असो. तर इतर गोष्टी म्हणजे कॅमेरा ऍंगल, प्रकाशयोजना पण ह्या तांत्रिक गोष्टी फारश्या समजत नसल्यामुळे त्यांचा जास्त विचार न करता माझी गाडी वळते ती संवाद आणि संवादफेकीकडे.
मला वैयक्तिकदृष्ट्या ब-क दर्जाचे सिनेमे फक्त संवाद आणि संवादफेकीसाठी आवडतात (उदाहरणार्थ, मिथुनदांचं सेल्ल्युलॉईडवरचं महाकाव्य - "गुंडा"(१९९८)). हे सिनेमे तद्दन भिकार वाटू शकतात लोकांना. वाटोत, बिचार्‍यांना आयुष्यातल्या केव्हढ्या मोठ्या आनंदाला मुकावं लागतं ते त्यांना नाही कळायचं.  मला हे सिनेमे आवडण्याचं एकमेव कारण म्हणजे, ते कुठेही सत्य किंवा पाथब्रेकिंग वगैरे असण्याचा आव आणत नाहीत. नागवे तर नागवे, उगाच 'नग्नचित्र ही काय कला आहे तुम्हाला नाही कळायचं' असले आव आणणं नाही. म्हणूनच मला त्यातून निर्मळ मनोरंजन मिळतं. अर्थात, त्यामध्ये बीभत्सपणा अंमळ जास्त असतो, पण शेवटी ह्या सिनेमांचा टारगेट ऑडियन्स असतो. आता वानगीदाखल गुंडातला पुढचा संवाद पहा,
"ए कौन है बे तु?"-एक व्हिलन मिथुनदाला.
"मैं हूं जुर्म से नफरत करनेवाला, गरीबों के लिये ज्योती और तुझ जैसे गुंडों के लिये ज्वाला।"-मिथुनदा.
"बना के तुझे मौत के मुंह का निवाला, गाड दूंगा तेरी छाती में मौत का भाला।"-....
आता मला सांगा ह्या असल्या फालतू संवादांपासून सिनेमातले जवळपास सगळे संवाद यमक जुळवून आहेत, काही बीभत्स, काही खरंच विनोदी. मग का नाही मी ह्या सिनेमाला महाकाव्य म्हणायचं. असेच संवाद मिथुनदा आणि धर्मेंद्रच्या उतारवयातील अनेक सिनेमांमध्ये आहेत. पण असो, मी जर सुरु झालो तर फक्त संवादांचाच एक ब्लॉग होईल.
ह्या सिनेमांमध्ये आपले मराठीतले आघाडीचे अभिनेते मोहन जोशी हटकून असतातच. गुंडा, लोहा अश्या अनेक सिनेमांमधून त्यांनी आपल्या ब-अभिनयाचा लोहा मनवलेला आहे. तर आपण कुठे होतो. संवाद आणि संवादफेक. तर अश्या सिनेमांमध्ये बरेचसे कलाकार फडतूस असतात. स्वस्तात कामे करणारे. त्यामुळे त्यांचा दर्जा हा सिनेमाच्या एकूण दर्जाशी साधर्म्य साधणारा असतो. पण ह्या सिनेमांमध्ये जे मिथुनदा, धर्मेंद्र, शक्ति कपूर सारखे मंझे हुए कलाकार असतात त्यांचीसुद्धा खास ह्या सिनेमांसाठी एक टाळ्या घेणारी संवादफेक असते. एरव्ही "आय एम कृष्णन अय्यर येम ये." म्हणून अप्रतिम अभिनय करणारा मिथुनदा, जेव्हा "दो..चार..छे..आठ..दस.....बस.." म्हणतो, तेव्हा तो फक्त कूली शंकर असतो. "मेरा नाम है सुरज..ट्रक ड्रायव्हर सुरज." ह्या संवादाची कल्ट फॉलोईंग तर "द नेम इज बॉन्ड.." पेक्षाही जास्त असेल. धर्मेंद्रचं "कोई हसीना जब रूठ जाती है तो..." हे तुम्हाला पानीकम वाटायला लागेल, जर तुम्ही "पुट ऑन द घुंगरू ऑन माय फीट ऍंन्ड वॉच माय डीराम्मा.."(तहलका) पहाल. आणि तुम्ही जगप्रसिद्ध "सुसाsssईड" म्हणणारा हाच का धर्मेंद्र असा विचार कराल जेव्हा तो "मैं हूं गरम धरम...मुझे कैसी शरम."(पुन्हा तहलका) असं म्हणत नाचतो.
हे सिनेमे नुसतेच भिकार असतात अशातला भाग नाही, कधीकधी अत्यंत हिडीस उपमा देऊन संवादांना नटवलेलं असतं. आता लोहामध्ये एक भिकार सिच्युएशन आहे. एकेकाळचा मोठा भाई दीपक शिर्के('एक शून्य शून्य वाला) आता अगदी बरबाद आहे आणि तो दुसर्‍या एका भाईकडे मदतीची याचना करायला आलाय. त्याच्या ओळी आहेत, "मैं बिना पेट्रोल की गाडी हूं, मैं बिना नशे की ताडी हूं, मैं वो फटेली साडी हूं, जिसे कोई हिजडा भी नही पेहनेगा।"
अशा वेळी माझा सलाम जेव्हढा त्या कलाकाराला असतो, तेव्हढाच त्या सिनेमाच्या लेखक दिग्दर्शकाला. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन पुन्हा ओरडून पहा मी किती खालच्या पातळीवर आहे हे सांगण्यासाठी कलेजा लागतो, तो जर चोप्रा आणि जोहरकडे असता, तर "कांताबेन" आणि "ये कान में डाल.."(कल हो ना हो), "बोमन इराणीचं दोस्तानामधलं पात्र" आणि "सेक्सी सॅम" (कभी अलविदा ना कहना) हे बीभत्स विनोद आजची पिढी किंवा मॉडर्न सोसायटीच्या नावाखाली खपवण्याचा दांभिकपणा त्यांनी केला नसता. असो. माझे मुद्दे, दृष्टीकोन सगळ्यांनाच पटतील असं नाही. ते पटावेत असा अट्टाहासही नाही. आपण पुढे जाऊ.
माझी अजून एक आवडती गोष्ट म्हणजे एक्स्ट्रा. नाचातले नाही. एकूणातच सिनेमातले, किंवा अगदी हल्लीच्या सिरियलमधलेही (होय मी सिरियल्स बघतो. मी खुल्लम खुल्ला सांगतो की मी सिरियल्स बघतो). आणि हे फक्त ब-क वाले नाही सगळ्याच अगदी मेनस्ट्रीम (इथे द्व्यर्थ आहे का? मेन म्हणजे पुरुष सुद्धा होतं) सिनेमातलेही. हे लोकसुद्धा एक प्रकारचे 'ब आणि क'च, कारण मुख्य पात्र म्हणजे 'अ', हे आपले उगाच पूरक. ह्याचा अर्थ मला ब आणि क हा प्रकार एकूणातच भलताच आवडतो असा होतो. पण शाळेत मी 'अ' वर्गात होतो आणि गणितातल्या 'ब, क आणि ड' गटाशी माझे फारसे सलोख्याचे संबंध नव्हते.
तर आपण ब आणि क कॅटेगरीच्या पात्रांवर होतो. म्हणजे बघा हिरो हिरॉईनला पाणीपुरी खायला घालतोय, तेव्हा पाणीपुरीच्या गाडीवाल्याच्या चेहर्‍याचं कधी निरीक्षण केलंय तुम्ही कधी? अगदी मजेदार भाव असतात. म्हणजे कधी कधी एखादा हळूच आपण कॅमेरात दिसतोय की नाही हे डोळ्यांच्या कोपर्‍यातून बघत असतो, एखादा जबरदस्त कॅमेरा कॉन्शस असतो आणि तो इस्त्री (मला कधीकधी प्रश्न पडतो, काही उत्तर भारतीय, 'स्कूल'ला 'इस्कूल' 'स्तर'ला 'इस्तर' म्हणतात, मग ते 'स्त्री' ला 'इस्त्री' म्हणत असतील का?{समस्त स्त्रीवर्गाची आत्ताच माफी मागतो}) मारल्यागत करून उभा राहतो, एखादा जबरदस्त कॅमेरा कॉन्शस असतो पण त्याला दाखवायचं नसतं की तो कॅमेरा कॉन्शस आहे, मग तो उगाच खोटं हसू किंवा आपण आजूबाजूला बघण्यात गर्क आहोत असा आव आणत राहतो किंवा एखादा एवढा कॅमेरा अनकॉन्शस असतो की आपण सीनचा भाग नसून आपणपण शूटींग बघायला आल्यासारखा पूर्ण सीनभर हिरो हिरॉईनकडे पाहत राहतो. मग एखाद्या सीनमध्ये, स्पेशली ९०' च्या दशकातल्या सिनेमांमध्ये हिरो किंवा हिरॉईन रस्त्यावर नाचगाणी करत असतात, तेव्हा उभ्या क्राऊडमध्ये एखाद्याकडे जाऊन काहीतरी वेगळं म्हणजे त्याची टोपी काढतात किंवा त्याची दाढी कुरवाळतात किंवा त्याचा विग काढतात वगैरे, तेव्हा त्या एका माणसाचा चेहरा बघण्यासारखा असतो. कारण हे क्राऊड म्हणजे बरेचदा खरंच रस्त्यावरचं शूटींग बघायला आलेलं क्राऊड असतं, तेव्हा सिनेमाच्या मुख्य कलाकाराबरोबर आपण एका सीनमध्ये आहोत हा अनुभवच त्यांचा चेहरा तेजोमय करायला पुरेसा असतो, त्यामुळे बरेचदा त्यांची फजिती होतेय असा सीन असतो, पण त्या माणसाच्या चेहर्‍यावर असे भाव असतात की त्यावेळी समर्थांनी त्याला विचारलं की "जगी सर्व सुखी असा कोण आहे?' तर तो "मी" असं छाती ठोकून उत्तर देईल(मला माहितेय की ही जरा ओढून ताणून उपमा झालीय, खरं म्हणजे मी "स्वतः मेनका त्याचे पाय चोळून देतेय" असे भाव असतात असं लिहीणार होतो, मग अचानक पुलंचं 'असा मी असामी' आठवलं, मग म्हटलं टॅरॅंटीनो स्टाईल 'होमेज' देऊया. आणि बघा एकाच कंसात मला पुलं आणि टॅरॅंंटीनो दोन्ही माहितीयेत हे सांगूनही झालं). पण त्याहून जास्त मजेशीर भाव असतात ते ह्या फजिती होणार्‍याच्या शेजारी उभे असणार्‍यांच्या चेहर्‍यावर. आपण कॅमेरात व्यवस्थित येत असू की नाही ह्याची एकीकडे काळजी आणि येत असू तर नीट दिसत असू ना ही विवंचना (कारण सिनेमा रिलीज झाल्यावर नातेवाईक, शेजारी, सहकारी सगळ्यांना दाखवायचं तर धड दिसायला तर हवं ना). माझा हा पर्सनल एक्स्पिरियन्स आहे, मी लहान होतो तेव्हा - साधारण सहावी सातवीत असेन - माझ्या एका मित्राच्या आईने "ताकधिनाधिन" ह्या तेव्ह्याच्या सह्याद्रीवरच्या हीट टीव्ही शोसाठी पासेस मिळवले होते. तो शो होता "लहान मुलांचा खास", त्यामुळे माझा मित्र, मी आणि अजून एक अशी आम्ही तीन लहान मुलं गेलो होतो शूटींगला. आम्ही नशीबवान म्हणून ऍंकर उभे राहतात त्यांच्या शेजारीच आम्ही होतो. आपल्या तिरंग्याच्या तीन रंगाच्या टोप्या पोरांना वाटल्या होत्या. मला भगवा मिळाला होता. ती टोपी मी बरेच वर्ष जपून ठेवली होती, अजूनही घरी कुठेतरी असेल. च्यायला अर्ध्या तासाचा तो शो पण त्याचं शूटींग पाच तास चाललं होतं. प्रत्यक्ष शूटींगमध्ये तुम्ही मुख्य कलाकार नसाल तर काहीच मजा नसते हे तेव्हा माझ्या बालमनाला पहिल्यांदाच कळलं होतं. असो, तर मी एंकर्स च्या शेजारी बसलो होतो त्यामुळे प्रत्येक फ्रेममध्ये आपण असू असं वाटत होतं (अर्थात ते थोडंफार खरंही होतं), त्यामुळे जेव्हाही ते ऍक्शन म्हणायचे मी एकदम विचारवंतासारखा चेहरा करायचो आणि स्पर्धकांबरोबर काही विनोद झाला की उगाच फार मोठा विनोद झाल्यागत कंपल्सरी हसायचो. आणि त्यांनी टाळ्या वाजवायला सांगितल्या की अगदी जीवाच्या आकांताने टाळ्या वाजवायचो. अर्थात माझ्या मेहनतीचं मार्जरीन झालं (चीजमध्ये खूप अनवॉन्टेड फॅट्स असतात), कारण कधीतरी कुणीतरी तो एपिसोड पाहून, तू त्यात होतास का, म्हणून विचारल्याचं आठवतंय, नाही नाही एक मिनिट, त्यांनी विचारलं, तेव्हा मी ती भगवी टोपी घातली होती काय? च्यायला, कुठून तुम्हाला सांगायला गेलो, आयुष्यातल्या एका निखळ आनंदाच्या क्षणावर कायमसाठी संशयाचा बोळा फिरला. जाऊ द्या.
त्यानंतर असेच मस्त हावभाव न्यूज चॅनेलचे पत्रकार ज्या राह चलत्या आम आदमीचे इंटरव्ह्यू घेतात त्यांचे असतात ("अ वेन्सडे" चित्रपटात स्नेहल दाभी ह्या कलावंताने ते अप्रतिम दर्शवलेत). आपण कोणीतरी फार जाणकार दिसतो म्हणून आपल्याला विचारताहेत असं काहींना वाटत असतं, तर काहींना आपण स्मार्ट दिसतो असं वाटत असतं, तर काही आपण खरंच विचारवंत आहोत असं समजून पल्लेदार वाक्य फेकतात. तर त्याच्या आजूबाजूला उभे असलेले 'ह्यालाच का विचारतायत" असा विचार करत असतात, तर काही त्याच्यानंतर आपल्याला विचारलं तर आपण काय उत्तर द्यायचं ह्याची जुळवाजुळव (मनातल्या मनात) करण्यामध्ये गुंतलेले असतात, तर काही घरी फोन करून अमका चॅनेल लावा, मी दिसतोय का बघा आणि शेजार्‍यांना सुद्धा सांगा वगैरे करण्यात व्यस्त असतात. इथे सुद्धा पर्सनल एक्स्पिरियन्स आहे (आहेच का? म्हणजे काय, माझा ब्लॉग आहे, मी स्वतःची लाल नाही करणार तर कोणाची). एकदा आमच्या कॉलेजात एक न्यूज चॅनेलवाले आले होते, मी तेव्हा जी.एस. असल्याने (कळला ना महत्वाचा मुद्दा, मी जी.एस. होतो, बाकी नाही वाचलंत तरी चालेल) मी समन्वय करत होतो. सगळी जनता कॅमेरासमोर उभी झाली. मग त्यांनी "बसमध्ये कंडक्टर २५ पैश्यांचं नाणं परत देईल तर तुम्ही काय कराल?" असला काहीतरी प्रश्न विचारला. कोणी कोणी काय काय पुड्या सोडत होतं, कसलं उत्तर आणि कसलं काय, सगळं लक्ष कॅमेराकडे. नाहीतर आम्ही, कॅमेराचं आमच्याकडे बिलकूल लक्ष नसूनही नेटाने फ्रेममध्ये येण्याचा प्रयत्न करत होतो. कुणी घरी फोन लावले, मी मात्र मला विचारलं तर मी काय सांगावं ह्याची जुळवाजुळव करण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होतो. व्यर्थ अशासाठी की मी प्रश्न नीट ऐकलाच नव्हता आणि दुसरं मी समन्वयक असल्याने तांत्रिकदृष्ट्या मी कॅमेराच्या मागचा माणूस होतो आणि त्या निर्दयी कॅमेरामनने माझं कॅमेरासमोरचं टॅलेंट लोकांसमोर येउ नये ह्याची पुरेपूर खबरदारी घेतली. म्हणतात ना मीडिया बायस्ड आहे, खरंच.
तर असो. मुद्दा हा की सगळ्यांनी आजपासून मुख्य पात्र, कथा, आणि आवडत्या नट-नट्या (पुन्हा नट..) यांच्या पलीकडे बघायला सुरुवात करा. कारण तरच तुम्ही कुठल्याही कलाकृतीतला निखळ आनंद घेउ शकाल आणि त्या पात्रांनाही(आमच्यासारख्या) त्यांचं ड्यू क्रेडीट मिळेल.

4/08/2010

कहानी में ट्विस्ट!

आज संध्याकाळी ('संध्या काळी' नव्हे, सांजवेळ) घरी आलो, तेव्हा 'झी सिनेमा'वर ऑल टाईम हीट "यादों की बारात" लागला होता. मग तो बघता बघता ७०' ते ८०' च्या कालावधीतले बरेच सिनेमे आठवायला लागले. मग 'अचपळ मन माझे' त्यांच्या फॉर्म्युलाचा विचार करू लागले. मग(ही सगळी प्रस्तावना, मला सिनेमातलं बरंच कळतं हे सांगण्यासाठी चालली आहे, हे सुज्ञांस सांगणे न लगे(अगदी 'औषध नल गे{आता किती कंस आणि किती समजवा समजवी, पुन्हा सुज्ञांस सांगणे म्हटले तर इनफायनाईट लूप होणार} आणि न लगे मजला' [आता समजावू की नको, जाऊ द्या, सुज्ञांस..च्यायला पुन्हा इनफायनाईट लूप] सारखंच))(मायला संपले एकदाचे. किती अर्थबोध होतोय कुणास ठाऊक, अर्थात सुज्ञांस सांगणे न लगे (नाही हां, आता कंस संपलाय, इनफायनाईट लूप होणार नाही).
जाऊ द्या मूळ विषय राहिला बाजूलापण विषयावरून आठवलंपरवा बाबा सांगत होतेकुठल्यातरी पौराणिक कथेतएक राजा आपल्या मुलाला मारण्यासाठी (आता का ते विचारू नका, माहीत नाहिये मलापण, पण तो मुद्दा महत्वाचा नाही) त्याला एक पत्र लिहून देतो आणि सांगतो की त्या दुसर्‍या राज्याच्या राजाला जाऊन दे आणि तो जे देईल ते घेऊन ये. पत्रात लिहिलं, " विष यासी द्यावे।". (मायला, आता पत्रात कोणी असली काव्यात्मक वाक्य लिहितो का? ते काय प्रेमपत्रं होतं? पण जाऊ दे, कारण हा मुद्दा महत्वाचा आहे पुढे) मग तो मर्यादा पुरुषोत्तम आज्ञाधारक राजपुत्र निघाला मजल दरमजल करत. (हा शब्दप्रयोग मॅडेटरी आहे, नाहीतर इथे एक फाऊल धरला जाईलपोचला पलीकडच्या राज्यातथकलाभागला एका उद्यानात (अजून एक फाऊल वाचवलाआडवारला (धरा खुशाल फाऊलच्यायला पोचलायस ना राज्यात, मग झोपा कसल्या काढतोस?) तर एका सुंदर ललनेने त्याला पाहिले. (मी वाटच पाहत होतो, केव्हा येते, केव्हा येते) बघताक्षणी प्रेमात पडली. (कशी काय, ते विचारू नका, ष्टोरी पुढे नको का जायला!) त्याच्या शेजारी बसून ती त्याला निरखू लागली. (कलियुगात रोल्स एक्स्चेन्ज झालेत नाही का?) तिची नजर पत्रावर गेली. (आता ह्या दीड शहाण्यानं इतकं महत्वाचं पत्र असं वेंधळ्यासारखं ठेवावं, पण तो नायक आहे, त्याला सगळं अलाऊड आहे, इथे च्यायला अप्रेझल लेटर कुणाला दिसू नये म्हणून आमचा जीवाचा आटापिटा आणि हा..) तिनं पत्र उघडलं आणिकाही नाही, वाचलं. मग बालाजीच्या सिरियल्ससारखा तिच्या चेहर्‍यावर दोनतीनदा क्लोजअप शॉट, म्युझिक सकट हवा तर.
कट टू, राजमहाल.(पोरगी वगैरे सगळं गायब. डायरेक्ट क्लायमॅक्सआपले दिग्दर्शक उगाच हॉलीवूड हॉलीवूड करतात, खरं इन्स्पिरेशन इथे आहेराजा पत्र वाचतोमग एकदा त्याच्याकडे आणि एकदा पत्राकडे पाहतोआणि उगाच काही मचमच न करताआपल्या पोरीचं लग्न त्याच्याशी लावून देतो.
काय भौकळलं नाही नाआता आपण टॅरॅंटिनो इष्टाईल (पुन्हा हॉलीवूडकालमानामध्ये थोडे मागे जाऊती पोरगीजी उद्यानात होतीतीच राजपुत्री होतीतिनं   पत्र वाचलं आणि ... गेम केला. "विष यांसी द्यावेचं "विषयासी द्यावेअसं केलं आणि मग कायआयला मेन तर सांगायचंच राहिलंत्या राजपुत्रीचं नाव "विषयाहोतं. आता राजानं "विषयासी द्यावे" वाचल्यावर डायरेक्ट पत्रंच विषयाला का नाही दिलं? हा सामान्य प्रश्न माझ्या सामान्य बुद्धिला पडला होता, पण मग माझ्याच तैलबुद्धीनं उत्तरही दिलं, की पत्र ऍक्च्युअली मोठं होतं, मायना-बियना, मग हे माझं कार्टं-बिर्टं आणि शेवटी पंचलाईन असेल. पण दुसर्‍या राजाला, हे कार्टं-बिर्टं लाडाचं वाटलं असेल आणि पंचलाईन वाचून झाला मोकळा.
आईशप्पथ, 'विषया'वरून केव्हढं विषयांतर झालं. तर मी काय सांगत होतो. झी सिनेमा, यादों की बारात, सिनेमे, ७०' आणि ८०' चे सिनेमे आणि फॉर्म्युला(हा सिक्वेन्स आहे माझ्या मेंदूच्या आज्ञावलीचा). तर ह्या फॉर्म्युला सिनेमांमध्ये असले धमाल कन्सेप्ट असायचे की विचारू नका. मी ह्या कन्सेप्ट्सचा आणि त्यामुळे निर्माण होणार्‍या ट्विस्ट्स चा फॅन आहे.
हिरोचं अख्खं कुटुंब, सहसा दोन तीन भाऊ आणि किंवा एक बहीण (आता बहीण एकच का हा प्रश्न निरर्थक आहे), आई बाप आणि हिरो (ऑब्व्हियसली, ह्यावरून एक कोडं आठवलं लहानपणचं! चिंगूच्या आईला चार मुलं, इन, मीन आणि तीन, तर चौथ्याचं नाव काय?) सगळे जण कुठलं तरी गाणं गात असतात. (हेच गाणं गाऊन पुढे बिछडी हुइ फॅमिली भेटणार, लिहून घ्या) शक्यतो बाप किंवा आई पियानो वाजवत असतात आणि वाजवता वाजवता (आणि गाता गाताही) मुलांना शिकवतही असतात. (आता पियानोच का? तर माझे चार आणे असे की संगीतकारांची वाजवावाजवी रियलिस्टीक वाटायला सोपं जात असेल.) आणि अगदी ह्याच कौटुंबिक आनंदाच्या परमोच्च क्षणी व्हिलन हल्ला करतो. आई-बाप मरतात किंवा कोणीतरी एक मरतो आणि व्हिलनचा चेहरा किंवा काहीतरी स्पेशल खूण हिरो लहानपणीच बघून ठेवतो. आता हे असले व्हिलन नेहमी हिरोच्या सोईसाठी काहितरी खूण घेउनच फिरतो. हां, ती खूण किंवा व्हिलनचा चेहरा घरातला वफादार नोकर, किंवा व्हिलनबरोबरचाच एखादा कमजोर कडी-जो नंतर पश्चात्तापदग्ध वगैरे होतो- तोही बघून ठेवू शकतो. (खूण कोण बघणार, हे लेखकाच्या कल्पनाशक्तीवर किंवा निर्मात्याच्या बजेटवर अवलंबून असतं).
मग हिरो(लहानपणचापोळी वगैरे चोरताना पळतो आणि त्याच्यामागे पोलिस किंवा लोक लागतात.कॅमेरा हिरोच्या पायांवर असतो आणि पळतापळताच हाफ पॅंंटची फुल पॅंट होते. कधीकधी त्याला कोणी चांगला चोर बाबा भेटतो, किंवा हिरोने व्हिलनचा चेहरा बघितला नसेल तर त्याला व्हिलनच गॉडफादर म्हणून भेटतो.(ह्या सिच्युएशनमध्ये व्हिलनला एक पोरगी असते जी पुढे हिरॉईन होणारमग शिरस्त्याप्रमाणे हिरो चोर किंवा पाकीटमार किंवा तत्सम काहीतरी होतोमग त्याचा त्या धंद्यात हात धरणारा कुणी नसतो. 'ग्यारह मुल्कों की पुलिसवगैरे मागे लागते. पण त्याची सूडभावना अजूनही धगधगती असते. त्याने व्हिलनला पाहिलं असेल तर व्हिलनने एवढ्या वर्षांत गेटप बदललेला असतो. नसेल पाहिलं तर त्याची ती स्पेशल खूण आजही हिरोच्या स्वप्नांत येत असते. पण समहाऊ त्याला व्हिलन भेटत नाही. मग दोन-चार गाणीबिणी झाली की एकदम सगळी पात्र भेटायला लागतात. वफादार नोकर, व्हिलनचा पश्चात्तपदग्ध सहकारी वगैरे पब्लिकपण येतं, पण हाय रे दुर्दैवा आयडेंटीफिकेशनच्या आधीच (माझं पर्सनल फेव्हरेट "दोन पायांत वेगळ्या साईझचे बूट" हे आहे) व्हिलन(कारण त्याने हिरोला आधीच ओळखलेलं असतं) (किंवा त्याचा वफादार सहकारी ऐनवेळी) कोणालातरी उचलून आणतोव्हिलनची जागा पण धमाल असते, कळ दाबून उघडणारे दरवाजे, टाळ्या वाजवून चालू बंद होणारे लाईट वगैरे. मग काहीतरी डेडली छळाचे प्रकार होतात (हळूहळू भरणारं पाणीदोन बाजूनी खिळे लावलेल्या हळूहळू सरकणार्‍या भिंतीकिंवा दोन हिरोंची आपापसातली फाईट, पण माझं पर्सनल फेव्हरेट आहे, "बता तेरे दो बेटों में किसकी मौत पेहले देखना पसंद करोगे/करोगी तुम?" मग दोन्ही हिरो मा मुझे मर जाने दो वगैरे म्हणणार आणि व्हिलन गडगडाटी हसणार). मग कधी कधी एखादा हिरो व्हिलनचाच पोरगा वगैरे असतो. मग काय, एकतर हिरो काहीतरी झोलझाल करून बेड्या तोडतो किंवा त्याच्यावर एकतर्फी प्रेम करणारी व्हॅम्प (व्हिलनीण) त्याच्या बेड्या उघडून त्याच्या हातात बंदूक देते. मग ढिशॅं‌व ढिशॅंव, थोडी तोडफोड, युजुअली व्हिलनच्या अड्ड्यावर मारामारीच्यावेळी रिकामी पण शेवटी आग वगैरे लागली तर पेट्रोल किंवा तत्सम पदार्थ भरलेली पिंपं असतात. हिरोने लटकून दोघातिघांना लाथाडावं म्हणून एखादा दोरखंड वगैरे. आवडते ही फाईट आपल्याला, व्हिलनची किंवा त्याच्या माणसांची एकही गोळी हिरोला लागत नाही अगदी मशीनगनचीही, पण हिरो अभिमन्युसारखा आईच्या पोटातूनच नेमबाजी शिकून आलेला असतो.
शेवटी ती एकतर्फी प्रेमवाली व्हॅम्प (व्हिलनीण) किंवा हिरॉईन नसलेला एखादा हिरो हे बलिदान देतात आणि बराच वेळ गोळी चघळत कुणाच्यातरी मांडीत काहीतरी सेंटी मारतात. बाकी जनता एकदा डॉक्टरला बोलवायची हालचाल करते, मग मरणारा "मैं जानता हूं, ये मेरा आखरी समय हैं" म्हणाला, की पडत्या फळाची आज्ञा घेऊन मजा बघत उभी राहते. त्या मरणार्‍याचे डायलॉग संपले, की तो मान टाकतो. हा पोलिसांच्या येण्याचा क्यू असतो. मग पोलिस येतात. एखादा इन्स्पेक्टर " गिरफ्तार कर लो इन्हे" म्हणून व्हिलन्सकडे बोट दाखवतो. मग आपला थोडावेळपूर्वीपर्यंत 'बेस्ट इन डर्टी बिझनेस' असलेला हिरो स्वतःला 'कानूनच्या हवाले' करतो. हिरॉईन करारी चेहरा करते. अरे पण काहीतरी राहतंय. हां. पाठलाग राहिलाच. क्लायमॅक्स पूर्वी एक हॉलीवूड्ला लाजवेल असा पाठलाग असतो. व्हिलनच्या मागे हिरो असतो, जनरली व्हिलनच्या गाडीत हिरॉईन किंवा आई असते. मग पुढून व्हिलनची नवशिकी माणसं चिक्कार गोळ्या घालतात पण हिरोला एकही लागत नाही. पण ह्या पाठलागांची खरी स्पेशालिटी असते की ठराविक वाहनाचा ठराविक वाहनानेच पाठलाग होतो, नाहीतर फाऊल धरला जातो. उदाहरणार्थ, जीपच्या मागे घोड्याशिवाय काही असूच शकत नाही, किंवा साध्या कारमागे साधी कारच हवीट्रेनबिनचा पाठलाग असेल तर बाईकला पर्याय नाही.
हां तर आपण हिरॉईनच्या करारी मुद्रेकडे होतो. तेव्हा, आपला इन्स्पेक्टर हिरोला म्हणतो, "फिक्र मत करो, मैं अदालत से गुजारिश करूंगा की तुम्हे कमसे कम सजा हो।". मग अदालत हिरोने समाजकार्य केल्याबद्दल त्याला टोकन शिक्षा देते आणि मग डायरेक्ट दोन वर्षांनी सेंट्रल जेल असे लिहिलेल्या फिल्मसिटीतील सेटसमोर अख्खं कुटुंब उभं असतं आणि दरवाजा उघडल्यावर नुकताच शेव्ह करून आलेला हिरो खाली वाकून येतो. आणि जणू काही कोणी येणारच नाही असे गॄहित धरून आल्यासारखा कुटुंबाला बघून आश्चर्यचकित होतो. मग पुन्हा ते कौटुंबिक समूहगान वाजायला लागतं. मग काही ठराविक पाट्या येतात. "द एन्डहे अगदीच अनक्रियेटीव्ह लोक टाकतातबाकी लोक, "फिर मिलेंगे", "धिस इज द बिगिनिंगवगैरे टाकतात.
ह्यामध्ये अजून थोडी गुंतागुंत वाढवायला हिरोचा बाप तुरूंगात व्हिलनमुळे आणि हिरोला माहितच नाही, आई उगाच खोटंखोटं विधवेचं नाटक करते वगैरे पण टाकता येतं, पण ते पुन्हा लेखकाच्या कल्पनाशक्तीवर किंवा निर्मात्याच्या बजेटवर अवलंबून असतं.
बरं आता कुणी विचारेल की, हे सगळं लिहिण्यामागचा उद्देश काय? तर काही नाही. दोन घटका (आमची) करमणूक आणि आम्हाला सिनेमातलं किती कळतं हे दाखवायचा एक सफल(?) प्रयत्न.
बाय द वे, चिंगूच्या आईच्या चौथ्या मुलाचं नाव कळलं की नाही?

4/04/2010

पाऊस

खरं म्हणजे महिनाभरापूर्वी जेव्हा मी 'गाभ्रीचा पाऊस' पाहिला, तेव्हाच मी लिहिणार होतो, पण असो. आज टीव्हीवर 'समर २००७' हा पडलेला पण एक चांगला प्रामाणिक प्रयत्न असलेला सिनेमा पाहताना मला 'गाभ्रीचा पाऊस'ची प्रकर्षाने आठवण झाली. 'समर २००७' सुद्धा विदर्भातल्या शेतकर्‍यांच्या हलाखीच्या परिस्थितीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. शहरातल्या लोकांची ह्या समस्येकडे पाहण्याची मानसिकता दाखवतो. अतिशय अंगावर येणारे असे काही प्रसंग आहेत ह्या सिनेमात. पण आपल्या कचकड्याच्या दुःखांमध्ये रमणार्‍या प्रेक्षकांनी अपेक्षेप्रमाणेच ह्या सिनेमाकडे पाठ फिरवली. त्या दिग्दर्शकाने व्यावसायिक सिनेमाचं भान ठेवूनही एक विचारप्रवृत्त करणारा, अंगावर येणारा असा सिनेमा बनवल्याबद्दल त्याचं कौतुकच वाटलं मला.
पण 'गाभ्रीचा पाऊस' हे एक वेगळंच प्रकरण आहे. गावात एक शेतकरी आत्महत्या करतो, आणि त्याच्या मित्राच्या बायकोला आपलाही नवरा असं काही करेल ही भीती वाटायला लागते. मग ती त्याची प्रत्येक कृती संशयाने बघायला लागते. चोवीस तास त्याच्यावर पाळत ठेवायला लागते. तो घराबाहेर पडला की मुलाला त्याच्याबरोबर धाडते. त्याला आवडेल असं सगळं करायचा आपल्या ऐपतीबाहेर प्रयत्न करू लागते. "गडद विनोदा"ची-कधीकधी अंगावर शहारे आणणार्‍या विनोदाची- झालर देऊन सिनेमा पुढे सरकत राहतो. आपणही कळत नकळत शेतकर्‍याच्या एकतर्फी लढाईचा भाग होत जातो. शेतकर्‍यांची हतबलता, दुसर्‍याच्या मृत्यूत आपला फायदा शोधणारी माणसं, नोकरशाहीरूपी अदृश्य शत्रू, त्यातही काही जणांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आशावाद, शत्रू बनलेली नियती आणि आधी बिलकुलच न पडलेला आणि नंतर धोधो कोसळून नकोसा झालेला सगळ्यात मोठा खलनायक-पाऊस.
सिनेमात सुरुवातीला शेतकर्‍याचा मुलगा पावसाला 'गाभ्रीचा पाऊस' म्हणतो, तेव्हा शेतकरी त्याला दामटतो, 'गाभीचा' ही विदर्भाकडची शिवी आहे. पण नंतर स्वतः शेतकर्‍यालाच पाऊस 'गाभ्रीचा' वाटू लागतो. पिकाचं दोनदा नुकसान झाल्यावर जेव्हा एक दुसरा शेतकरी पहिल्याला म्हणतो, की आकडा टाकून वीज घे, तेव्हा त्या हत्बल परिस्थितीतही तो शेतकरी म्हणून जातो 'पण हा गुन्हा आहे'. इथे शहरात सगळं सुखासुखी असूनही आपण ड्रायव्हिंग लायसन्स पासून, ट्रॅफिक सिग्नल पर्यंत सगळीकडे 'गुन्हे' करत असतो आणि आपण त्यांना गुन्हेही मानत नाही आणि तो सगळा संसार उसवण्याच्या मार्गावरचा शेतकरीही जेव्हा आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत असल्याचे दाखवतो, तेव्हा कुठेतरी खोल एक वेदना उमटते.
आपण शहरात पाऊस पडला की काय विचार करतो. माझ्यासारखे अरसिक 'आज बाहेर जायचे वांधे' म्हणणार, काही थोडे जास्त रसिक गरम चहा आणि गरमागरम भजी खात खिडकीत बसून पाऊस बघत गप्पागोष्टी करणार, काही त्याहून थोडे जास्त रसिक गाणी ऐकणार, त्याहून थोडे जास्त गाणी म्हणणार, त्याहून जास्त असतील तर त्यांना भन्नाट कल्पना अशाच वेळी सुचतात आणि अगदीच रोमॅटीक लोक पावसात भिजणार. पण आपण इतके करंटे की पाऊस ही आपल्यासारख्या देशाला किती महत्वाची गोष्ट आहे ह्याचा विचारही आपल्या कोणाच्या मनात येत नाही. पाऊस पडण्या न पडण्यावर कित्येक लोकांचं आजचं जेवण अवलंबून आहे ह्याचा विचारही आपल्याला शिवत नाही. पण महत्वाचं हे की आपलंही आजचं नसेल, पण उद्याचं जेवण ह्याच पावसावर अवलंबून आहे हे आपल्याला कळत नाही. बातम्या संपल्या की हवामान वृत्ताला आपण वाहिनी बदलतो, पण त्या वृत्तावर कुणाची आजची शांत झोप अवलंबून असेल असं आपल्याला वाटतं का?
आजकाल मी पाऊस पडून कुठे बाहेर पडण्याचा बेत रद्द झाला तरी चिडचिड करत नाही. हवामान वृत्त आवर्जून बघतो. आणि हो, आता 'गुन्हे' न करण्याचं ठरवलंय.