काही वर्षांपूर्वी मी जेव्हा कर्नल मुअम्मर गद्दाफीबद्दल पहिल्यांदा ऐकलं आणि नंतर वाचलं होतं, तेव्हा मला त्याच्याबद्दल विलक्षण कुतूहल वाटलं होतं. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी त्या मनुष्याच्या हातात एका तेलानं भरलेल्या देशाची सत्ता एकवटली होती. आणि त्यानं ती पस्तीसहून जास्त (आता चाळीसहून जास्त) वर्षं टिकवून ठेवलेली आहे, हे मला फारच नवलाचं वाटलं होतं. पण मग त्याच्याबद्दल वाचल्यावर त्याचे एकंदर रंगढंग पाहून मला त्याच्या एकंदर व्यक्तिमत्वाचा अंदाज आला. पण खरंच वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी हातात इतक्या मोठ्या तिजोरीची चावी येऊन पडणं आणि त्यापुढे चाळीस वर्षं ती चांगल्या मार्गाने नाही, तर धाकदपटशा, क्रूरता आणि खटपटी लटपटी करून टिकवून ठेवणंसुद्धा खाण्याचं काम नाही.
कर्नल मुअम्मर गद्दाफीचं २००९ सालचं संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतलं गाजलेलं ९० मिनिटांचं मूर्खासारखं भाषण, त्याचं जिथे जाईल तिथे विमानानंच स्वतःचं फर्निचर घेऊन जाणं, न्यूयॉर्कमध्ये त्याला कुठल्याही हॉटेलमध्ये हे न जमल्यानं त्यानं रस्त्यावर तंबू ठोकून राहण्याचा विक्षिप्त निर्णय, त्याचं स्त्री-अंगरक्षकांचं पथक, त्याची 'लाडकी' युक्रेनियन नर्स आणि तो अन त्याच्या कुटुंबियांचं ऐषारामी अन बेफाम जगणं ह्या सगळ्या गद्दाफीच्या विविध तर्हा आहेतच, पण मुअम्मर गद्दाफीच्या उदयापासून त्यानं केलेल्या सगळ्याच करामती ह्याहूनही जास्त सुरस आणि चमत्कारिक आहेत.
लिबिया हा देश काही वर्षे इटलीची वसाहत होता. इटली गेल्यानंतर तिथल्या राजाच्या हाती सत्ता आली, ज्यानं स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले होते. लिबियाचा राजा १९६९ मध्ये काही आजाराने ग्रस्त असल्याने तुर्कस्तानात इलाजासाठी गेला होता. त्याच काळामध्ये इस्रायलनं अरब फौजांचे दणादण पराभव केलेले होते. अशा वातावरणामध्ये सैन्यात नवखा असलेला अरब-वर्णावर्चस्वीवृत्तीचा गद्दाफी आपल्या समविचारी तरूणांना गोळा करू लागला. राज्याच्या युवराजाला राजाकडून संमतीपत्र मिळायच्या आतच २७ वर्षांच्या गद्दाफीनं काही त्याच्यासारख्याच तरूण ऑफिसरांच्या मदतीनं युवराजाला अटक करून राजसत्ता बरखास्त केली, आणि लिबियामध्ये प्रजासत्ताक स्थापनेची घोषणा केली. त्यांच्या अरब वर्चस्व आणि अरब स्वाभिमानाच्या ध्येयाबद्दल सहानुभूती असणार्या सैन्याधिकार्यांची ह्या रक्तविरहित क्रांतीला मूक मदत झाली.
ह्या गोंधळामध्ये फक्त कॅप्टन असलेला एक तरूण, नवखा सैन्याधिकारी तेलानं ओतप्रोत भरलेल्या एका स्ट्रॅटेजिकली अन भौगोलिकदृष्ट्या युरोपसाठी (म्हणजेच पाश्चात्य जगासाठी) अत्यंत महत्वाच्या अशा एका देशाचा प्रमुख बनला. त्यामुळे साहजिकच सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. गद्दाफीला सत्तेतून उतरवणं अमेरिकेसाठी अवघड नव्हतं. पण क्रिकेटमध्ये म्हणतात ना, ज्याच्याबद्दल काहीच माहित नाही असा खेळाडू नेहमीच धोक्याचा ठरतो, तद्वतच जगाच्या उचापती करणार्या अमेरिकेची गद्दाफीला जोखण्यात चूकच झाली. खरंतर गद्दाफी आल्या आल्या त्याला उडवण्याचा एक 'हिल्टन असाईनमेंट' नामक प्लॅनही बनला होता, ज्यामध्ये परदेशातून भाड्याचे मारेकरी आणून आणि लिबियन तुरूंगांतून कैद्यांना सोडवून एक विचित्र क्रांती घडवण्याचं ठरलं होतं (आयरॉनिकली आज गद्दाफी आपल्याच विरोधातलं बंड मोडण्यासाठी भाड्याचे मारेकरी वापरतोय). पण आयत्या वेळी अमेरिकेच्या कम्युनिस्टद्वेष्ट्या नीतीमुळे गद्दाफी हा पुरेसा कम्युनिस्टद्वेष्टा असल्याचं जाणवल्यानं ह्या कटाला तिलांजली देण्यात आली. पण गद्दाफी हा खरंच माहित नसलेला खेळाडू होता. त्यानं नंतर जे काय करून सत्तेवर मांड बसवली ते नुसतं वाचूनही धाप लागते.
गद्दाफीनं सर्वप्रथम एक गव्हर्निंग काऊन्सिल सदृश व्यवस्था बनवली, ज्याचा प्रमुख तो स्वतः होता. ज्याच्यामार्फत तो 'प्रजासत्ताक' चालवत होता. त्यानं सर्वप्रथम जेव्हढे इटालियन लोक लिबियात राहत होते, त्या सर्वांना बाहेरचा रस्ता दाखवला. स्वतःचय देशाला पश्चिमद्वेष्ट्या लोकांचं आश्रयस्थान बनवून टाकलं. लिबियामध्ये शरिया कायदा लावून टाकला. इस्लाम आणि अरब ह्या गोष्टींना कमालीचं ग्लोरिफाय करून इस्लामी जगतात स्वतःची प्रतिमा बळकट करायचा प्रयत्न केला. काही दिवसांसाठी तो पंतप्रधानदेखील होता. मग एक दिवस प्रजासत्ताकाचं रूपांतर 'जमहिरिया' अर्थात 'थेट-लोकशाही' अशा काहीशा प्रकारात करून त्यानं स्वतःला सर्वोच्च अशा महासचिव पदावर बसवलं. तो ज्या काऊन्सिलचा महासचिव होता, त्याखाली छोट्या स्थानिक स्वराज्य संस्था अशा प्रकारची एक वेगळीच थेट लोकशाही व्यवस्था त्यानं निर्माण केल्याचा आभास उभा केला. आणि दोनेक वर्षांत त्याने सर्व पदांचा त्याग करून स्वतःला 'लिबियन क्रांतीचा गुरूबंधू आणि मार्गदर्शक' अशा अर्थाची एक पदवी देऊन घेतली. तो अधिकृतरित्या लिबियाचा नेता आहेही अन नाहीही, अशी काहीशी ही स्थिती आहे.
कर्नल गद्दाफी ह्या नावाबद्दल मला कुतूहल वाटण्याचं पहिलं कारण होतं, नावातला 'कर्नल'. कारण आजवर ऐकलेले सर्व लष्करशहा किमान 'जनरल' तरी असायचेच, पण हा एकमात्र कर्नल. अधिक माहिती काढता लक्षात आलं, की त्यानं इतर लष्करशहांप्रमाणे स्वतःची सैन्यामध्ये थेट 'जनरलपदी' पदोन्नती करून घेतली नाही. फक्त स्वतःच्या कॅप्टनपदावरून काही वर्षांनी 'कर्नल' एव्हढीच मानद पदोन्नती घेतली. त्यामार्फत तो जगातला एकमेव 'कर्नल' पातळीचा लष्करप्रमुख झाला. गद्दाफीला सगळ्यांच बाबतींत वेगळेपणाची हौस असल्याचं इथेही दिसतं.
क्वेंटिन टॅरँटीनो कसा विविध आवडते सिनेमे आणि गाणी ह्यांना इनरेफरन्सिंग करून (म्हणजे त्यांसारखे सीन्स, डायलॉग्ज किंवा ती गाणी विविध प्रसंगांमध्ये वाजवून) होमेज देतो, तसंच काहीसं गद्दाफी आपल्या सत्तेच्या अंमलबजावणीत करतो. त्यानं ज्या ज्या नेत्यावरून प्रेरणा घेतली, त्या त्या नेत्याचं इनरेफरन्सिंग त्याच्या वेगवेगळ्या कृतींतून दिसतं. लहान असताना तो गमाल अब्देल नासरचा फॅन होता, मोठा झाल्यावर प्रत्यक्षात जेव्हा तो अन नासर दोघेही शेजारी राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा त्याला काय वाटलं असेल हा विचार करून मला गंमत वाटते. गमाल अब्देल नासरचा 'पॅन-अरब नेशन' चा कन्सेप्ट गद्दाफीनं जसाच्या तसा उचलला. एक अरब राष्ट्र बनवण्याच्या दृष्टीनं काही फसलेले प्रयत्नही त्यानं करून पाहिले. पण पुढे त्याच अब्देल नासरचा देश असलेल्या इजिप्तवर एक दिवस त्यानं हल्लाही केला. स्वतःला क्युबन क्रांतीचा प्रणेता 'चे ग्वेव्हारा' सारखं मॉडेल करण्याचाही गद्दाफीनं प्रयत्न केला. स्वतःच्या विचारसरणीला 'अरब सोशलिझम' असं गोंडस नावही देऊन टाकलं. चीनच्या माओच्या 'लिटिल रेड बुक' सारखं स्वतःचं 'ग्रीन बुक' काढून पाहिलं. गद्दाफीला गॉगल्स आणि सफारी सूट्सचं वेड होतं, पण कालांतरानं वाढत्या वयासोबत त्यानं हुशारीनं कपडे बदलले, तरी गॉगल तसाच राहिला.
गद्दाफीनं स्वतःचं राज्य राखण्यासाठी जसे स्वतःच्या शासनव्यवस्थेत शिताफीनं बदल केले आणि कुणाचीही पक्की मांड कुठेच बसू दिली नाही, त्याचप्रमाणे त्याने आपल्या विरोधकांना क्रूरतेनं दडपण्याचेही धंदे केले. लिबिया सोडून देशाबाहेर गेलेल्या विरोधकांना मारण्यासाठीही एक पथक होतं. त्यांना 'देशात परत या नाहीतर ह्या पथकाच्या हाती येण्यास तयार राहा' सारख्या खुलेआम धमक्याही दिल्या. आंतरराष्ट्रीय दहशतवादाला सर्वतोपरी मदत आणि एव्हढंच नव्हे तर प्रत्यक्ष खुलेआम सहभाग इथवरही गद्दाफीची मजल गेली. पण तरीही त्याचं नशीब बलवत्तर होतं म्हणा किंवा त्याच्या हातात 'मानवाधिकारां'चा डंका पिटणार्या सर्व पाश्चात्य खेळण्यांची चावी अर्थात तेल होती म्हणून तो सर्व प्रकरणांतून टिकून राहिला. अगदी पाश्चात्य नागरिकांनाच विमानाच्या बॉम्बस्फोटात शेकड्यांनी मारूनही तो उजळ माथ्यानं फिरत राहिला. आणि एव्हढंच नव्हे तर ह्याच तेलाच्या ताकदीच्या जोरावर, ह्या विमानस्फोटाच्या आरोपीला थेट युनायटेड किंग्डममधून सोडवून घेऊन आला. मध्यंतरीच्या कालावधीत लिबियावर संपूर्ण पाश्चात्य देशांनी निर्बंध घातले होते. पण कालांतराने ह्या निर्बंधांचा दोन्ही पक्षांना फटकाच बसणार असल्याचं लक्षात आल्यावर मांडवली केली गेली. मग लिबियानं सर्व कुरापतींची 'नैतिक जवाबदारी' स्वीकारली आणि मृतांच्या कुटुंबियांना भलीथोरली भरपाई देण्याचं निश्चित केलं. बदल्यात जगानं लिबियन सरकारला सर्व आरोपांपासून अन प्रलंबित खटल्यांपासून मुक्ती देण्याचं अन निर्बंध उठवण्याचं मान्य केलं. हे जरी वरकरणी असं दिसत असलं तरी प्रत्यक्षात हे तेलाचे प्रताप आहेत. लिबिया हा आफ्रिकेतील सर्वाधिक तेलसाठे असलेला देश आहे, हे एकच कारण मांडवलीसाठी पुरेसं होतं. मग थोड्याच दिवसांनी त्यानं गाजावाजा करून बॉम्बस्फोट आरोपीला सोडवून आणलं. स्कॉटिश सरकार कितीही दया म्हणून सुटका वगैरेची मलमपट्टी करत असलं तरी सगळ्या जगाला माहितीय की ही सुटका राजकीय हेतूंनी प्रेरित आहे. आणि चक्क एका पाश्चात्य सरकारानं आपल्याच देशाच्या नागरिकांना मारणार्या आरोपीला सोडून देण्याची दुर्मिळ घटना ही गद्दाफीच्या उद्दाम नीतीचा एक विजयच म्हटला गेला पाहिजे. ह्या बॉम्बस्फोटाची उघड जवाबदारी घेतल्यानंतरही संयुक्त राष्ट्रांच्या 'मानवाधिकार समिती'वर लिबिया अर्थात गद्दाफीची नुसती नेमणूकच नव्हे तर त्याला अध्यक्ष म्हणून बसवण्याचाही कारनामा पाश्चात्य देशांनी केलेला आहे.
गद्दाफीनं पाकिस्तान, चीनपासून ते भारतापर्यंत अनेकांकडून आण्विक शस्त्रे मिळवण्याचा अयशस्वी प्रयत्न केलेला आहे. त्यानं अनेक इदि अमीन आणि स्लोबोदान मिलोसेविच सारख्या जेनोसाईड करणार्या क्रूरकर्मांना वेळोवेळी पाठिंबाही दिलेला आहे. इदि अमीनशी तर त्याचे इतके मधुर संबंध होते की इदि अमीननं त्याच्या मुलीशी लग्नही केलं होतं. पुढे त्याच्या मुलीनं इदि अमीनशी घटस्फोटही घेतला.
स्वतःच्या सर्व विरोधक अन शत्रूंना क्रूरपणे ठेचणारा क्रूरकर्मा गद्दाफी आपल्या मुलांच्या बाबतीत मात्र अगदी जवाबदार बाप आहे. त्यानं आपल्या सर्व मुलांना योग्य प्रकारे देशातल्या विविध महत्वाच्या पदांवर बसवून ठेवलंय. एकजण महत्वाचे सरकारी उद्योग पाहतो, एकजण सुरक्षा सल्लागार, एकजण ऑलिम्पिक समितीचा अध्यक्ष, एकजण उदारमतवादी मुखवटा अन एकजण सागरी उद्योगांचा व्यवस्थापकीय सल्लागार. त्याचबरोबर स्वतःची मुलगी अन जावयाचीही व्यवस्थित सोय लावून गद्दाफीनं आपला देश स्वतःच्या मुलांसाठी खर्या अर्थानं 'बाप की जागीर' बनवून ठेवलाय.
सर्व पाश्चात्य देशही निर्बंध उठल्यापासून कधी काही घडलंच नाही अशा प्रकारे गद्दाफीचा उदोउदो करण्यात मग्न. इटलीनं तर गद्दाफीसोबत मोठमोठे करार केलेत. 'एनी' ही मोठी एनर्जी कंपनी लिबियात फार मोठा सेटअप बांधून आहे. इटलीतील 'युनिक्रेडिट' ह्या बँकेत 'लिबियन सेंट्रल बँक' ची मोठी गुंतवणूक आहे, इटलीतील नावाजलेला फुटबॉल क्लब 'युव्हेंटस'मध्ये गद्दाफी कुटुंबियांचे हितसंबंध अन समभाग आहेत. ह्यासर्वांसोबत इटलीला भरमसाठ इंधनांचा पुरवठा करण्याबदल्यात इटलीकडून गेल्या काही वर्षांपासून गद्दाफीला भलीथोरली मदत मिळते. नुकताच गद्दाफी कुटुंबियांचं यूके मधील आलिशान घर गोठवण्यात आल्याचीही बातमी आली. टुरिस्ट बेट असलेल्या सेंट बार्ट्स बेटावर 'बियॉन्'से, 'नेली फुर्ट्याडो', 'मारिया कॅरे', 'अशर' अशा अमेरिकेतील मोठमोठ्या कलाकारांनी गद्दाफीच्या खाजगी नववर्षाच्या पार्टीत आपली 'कला सादर' केल्याच्याही नुकत्याच बातम्या आल्यात आणि त्याचे 'व्हिडिओज' देखील. लगोलग ह्या लोकांनी घाबरून आम्ही त्यावेळी मिळालेलं मानधन समाजकार्यासाठी दान करत असल्याचं जाहीर करून टाकलं. (न जाणे का मला दाऊदच्या पार्ट्यांमध्ये नाचणारे आपले बॉलीवूडचे सितारे आठवले.) गद्दाफीनं रशियापासून ते व्हेनेझुएलापर्यंत सगळ्या अमेरिकाविरोध्यांशीही सलोख्याचे संबंध बनवले. राजकीय डावपेचांमध्ये बहुदा गद्दाफी बहुतेक अरब हुकूमशहांना मागे टाकतो. त्यानं युरोपच्या भळभळत्या जखमेवर हळुवार फुंकर घालून युरोपला आपल्या बाजूला वळवलं. युरोपची भळभळणारी जखम म्हणजे उत्तर आफ्रिकेतून येणारे इमिग्रंट्स. लिबियाची भौगोलिक जागा अशी आहे, की त्यांनी ठरवल्यास बहुतेक मानवी तस्करीला चाप बसू शकतो. त्यानं स्वतःची सागरी यंत्रणा लावून ही तस्करी कमी करायला हातभार लावला आणि युरोपचा पाठिंबा मिळवला. अशा प्रकारे विविध गटांना खूष करून तो आपलं राज्य राखण्यासाठी काहीही करायला मोकळा झाला. अन त्याचे दडपशाही उद्योग सुरूच राहिले.
पण नुकत्याच उठलेल्या अरब क्रांती लाटेमध्ये लिबियन जनतेलाही मानसिक सामर्थ्य मिळालं आणि तीदेखील पेटून उठली. योगायोग असा की ज्या बेनगाझीमध्ये गद्दाफीनं सैनिक प्रशिक्षणाचे धडे गिरवले त्याच बेनगाझीमध्ये त्याच्याविरोधी उठावाची ठिणगी पडली आणि सर्वप्रथम 'स्वतंत्र' होणारं शहर बेनगाझीच ठरलं. इतर अरब देशांप्रमाणेच लिबियादेखील विविध अरब टोळ्यांनी बनलेला प्रदेश आहे. त्या सर्व टोळ्यांना एका मोटेत बांधून ठेवण्याची तारेवरची कसरत इतकी वर्षे गद्दाफी करत होता. पण बेनगाझीमध्ये त्याच्याविरोधी असंतोष अनेक वर्षे धुमसत होता. तो ह्या निमित्तानं बाहेर पडला. गद्दाफीचं स्वतःचं सैन्यही काही प्रमाणात बंड करून उठलं आणि त्यामुळे यादवीसदृश स्थिती निर्माण झाली. क्रूरकर्मा गद्दाफीनं थेट आपल्याच नागरिकांवर आपलंच सैन्य सोडल्याचा हा परिणाम होता. काही वैमानिक तर बॉम्बर विमानं घेऊन थेट माल्टाला पळून आले, स्वतःच्याच बांधवांवर बॉम्ब कसे टाकायचे म्हणून. लोकांचा रेटा अन बंड केलेले सैनिक ह्यांनी हळूहळू गद्दाफीच्या हल्ल्याला तोंड देत पूर्वेच्या बेनगाझीकडून पश्चिमेच्या राजधानी त्रिपोलीकडे कूच चालू ठेवली आहे. रोज शेकडो नागरिक अन सैनिक धारातीर्थी पडताहेत. पण लिबियन जनतेला बाहेरून सैनिकी मदत नकोय. त्यांना त्यांचा लढा स्वतःच्या हिमतीवर जिंकायचा आहे. जमलीच तर जगानं राजकीय अन अन्न तसंच वैद्यकीय मदत करावी पण लढाईत नको असंच त्यांचं ठाम मत आहे.
यूकेतल्या सत्तापलटानंतर आलेल्या हुजूर पक्षाच्या सरकारनं तर गद्दाफी देशातून पळून व्हेनेझुएलाला गेला अशी अफवा उठवून आपल्यापरीनं गद्दाफीला खिंडीत गाठायला सुरूवात केली. युरोपियन देश लोकलज्जेस्तव पुन्हा निर्बंधांच्या गोष्टी करताहेत. अमेरिका इजिप्तच्या वेळी ज्या जोमानं उडत होती, तितकीच आता गप्प आहे. पण खिंडीत सापडलंय इटली. गद्दाफी पडला तर तेलाचं काय होणार ह्यावर इटलीचे डोळे लागलेत. इटली हा लिबियाचं सर्वांत मोठं गिर्हाईक आहे. त्यातच इटलीत पंतप्रधान वादाच्या भोवर्यात आहे. त्यामुळे इटली कुठल्याच मुद्दयावर थेट विरोध दर्शवत नाही.
लिबियातल्या लढाईमुळे एकीकडचा ट्युनिशिया अन दुसरीकडचा इजिप्तकडे परदेशी कामगारांचे लोंढे येताहेत, त्यामुळे आधीच अस्थिर असलेल्या ह्या भागामध्ये गोंधळ उडाला आहे. गद्दाफीनं परदेशी भाड्याचे मारेकरी आणल्याच्या बातम्यांमुळे परदेशी कामगारांनाही संशयाचं बळी व्हायची पाळी आलीय. अराजकाच्या अन अस्थिरतेच्या वातावरणात बेनगाझीतल्या जनतेनं प्रतिसरकार स्थापन करून स्वतःची नवी व्यवस्था बांधायला घेतलीय.
तिकडे गद्दाफीचं सरकारी टीव्हीवर विक्षिप्त भाषणं देणं वगैरे चालूच आहे. पण आताशा लढाई भलतीच हातघाईची होत चाललीय. त्रिपोली हाच गद्दाफीचा गड आहे, ज्यादिवशी तो पडेल, गद्दाफीचा अंतही तिथेच असेल. गद्दाफी अन त्याचा वारसपुत्र सैफ-अल-इस्लाम (इस्लामची तलवार) दोघेजण मुलाखती देत सुटलेत. आमच्या सच्च्या नागरिकांचं कसं आमच्यावर प्रेम आहे आणि जे विरोधक आहेत, ते सगळे अल-कायदा, अमेरिका अन इटलीनं चिथवलेले किंवा ड्रग्ज घेतलेले तरूण आहेत वगैरे गोष्टी बडबडत सुटलेत. नुकतीच प्रसिद्ध झालेली ख्रिस्तियान अमानपोरनं घेतलेली
गद्दाफीची मुलाखत बरीच गाजली अन त्याची टवाळी झाली. त्यामध्ये तो माझ्या लोकांचं माझ्यावर प्रेम आहे वगैरे बडबडतो. त्यामुळे त्याला मुअम्मर 'माय पीपल लव्ह मी' गद्दाफी असं टोपणनावही पडलंय! पण ह्यात आश्चर्य वाटण्याजोगं काहीच नाही, कारण इतकी वर्षं असंच असंबद्ध बोलूनही जगामध्ये उजळ माथ्यानं वावरलेला तो मनुष्य आहे. त्याला ठाऊक आहे की ह्या स्थितीमधून पुढे जर तो हा उठाव क्रूरपणे दडपण्यात यशस्वी झाला तर वर्षा-दोन वर्षांत सगळं पाश्चात्य जग त्याला पुन्हा स्वीकारेल. हेच कटू सत्य आहे. आज मानवाधिकाराच्या गप्पा मारणार्या पाश्चात्य देशांचे इतिहास किती मानवाधिकारांची पायमल्ली करणारे आहेत आणि ह्यांना ह्याच गद्दाफीचं सत्य आजपासून महिनाभरापूर्वीपर्यंत दिसत नव्हतं?
पण उठाव अन लढा अजून चालू आहे आणि ह्यावेळेस लोकं हवं तेव्हढं रक्त सांडायला तयार आहेत. ४२ वर्षांपूर्वी रक्तहीन क्रांती करणार्या गद्दाफीला उखडून फेकण्यासाठी मात्र रक्तरंजित क्रांतीमध्ये रक्ताचे सडे पाडावे लागताहेत हा केव्हढा मोठा दैवदुर्विलास आहे. आता सर्व पिचलेल्या अन सदसद्विवेकबुद्धी जागृत असलेल्या जगाच्या शुभेच्छा लिबियन जनतेसोबत आहेत आणि ही सैफ-अल-अवाम (जनतेची तलवार) गद्दाफी राजवटीचं शिर कापूनच म्यान होईल हीच शुभेच्छा!