12/19/2010

नामर्द -२

भाग -१ पासून पुढे

"तुमी येवडी आठवन ठिऊन येतासा! लय छान वाटतं." गगनची आई मनापासून सांगत होती. "न्हाईतर छोट्या लोकांकडे पाणी प्यायला पण येत न्हाईत लोक."

अभयच्या चेहर्‍यावर वेदना उमटली. त्यानं गगनकडे पाहिलं आणि म्हणाला, "काकू, आता तसलं काही राहिलं नाहीये हो. गगन आणि मी एकत्रच काम करतो, एकत्रच जेवतो. कधी वेगळेपणा वाटत नाही. तुम्ही असं काही बोलू नका हो. एकदम अवघडल्यासारखं होतं!" अभय गगनच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.

त्या फक्त हसल्या. मग त्यांनी गगनच्या धाकट्या बहिणीला बोलावलं आणि अभयच्या पाया पडायला सांगितलं.

"राहू दे राहू दे! बारावीला ना तू? तालुक्याच्या कॉलेजात जातेस ना? दादा सांगत असतो कायम तुझ्याबद्दल!"

तिनं मान डोलावली.

"खूप अभ्यास कर. त्याची स्वप्न पूर्ण कर. तुला मोठ्ठी अधिकारी झालेलं पाहायचंय त्याला. त्यासाठीच तिकडे शहरात राब राब राबतोय तो!" तिच्या डोक्यावर हात ठेवत तो म्हणाला आणि त्यानं स्मित केलं.

त्यांचा सगळ्यांचा निरोप घेऊन तो महारवाड्यातून बाहेर पडून घराकडे निघाला.

अचानक त्याला दूरून छोट्या जमावाचा गोंधळ ऐकू आला, पण तो घराच्या विरूद्ध दिशेनं होता. तिकडे दुर्लक्ष करून तो घराकडे पोचला. तर घराचे सगळे दिवे चालू आणि दरवाजा सताड उघडा. त्याला शंका आली म्हणून तो स्मृतीला हाका मारत घरात शिरला. त्यानं अख्खं घर पालथं घातलं, पण घरात कुणीच नव्हतं. तो एकदम धास्तावला आणि धावतपळतच घराबाहेर पडला. त्याच्या डोक्यात तर्‍हेतर्‍हेचे विचार येत होते. काय करावं ते कळत नव्हतं. आणि अचानक समोरून त्याला गगन येताना दिसला.

"काय झालं साहेब? मी तुमच्याचकडे येत होतो, तुमचा रूमाल राहिला होता घरी."

"अरे माझ्या घरचे सगळे गायब आहेत. घर सताड उघडं आहे." अभय पूर्ण भांबावला होता.

"अरेच्चा!" गगनलाही अर्थबोध होईना. "असं करा, तुम्ही इथे बघा, मी इथून जातो. दहा मिनिटं बघू कुणाच्या घरी गेलेत का? नाहीतर मग सरपंचांकडे जाऊ."

आणि दहाच मिनिटांत गगन ओरडत आला.

"साहेब, साहेब.." त्याला धाप लागली होती.

"काय झालं?"

"साहेब, चावडीसमोर... देवीच्या देवळाच्या पुढ्यात..."

"काय?"

"चला तुम्ही लगेच!" आणि ते दोघे धावत निघाले.

----------

देवळासमोरचं दृश्य पाहून अभय हबकूनच गेला. ५०-१०० लोकांचा जमाव बसला होता. पुढ्यात एक शेकोटी होती. आणि शेकोटीसमोर एका खांबाला स्मृतीला बांधलेलं होतं. तिच्या तोंडात कापडाचा बोळा घातला होता. शेजारी विजयी मुद्रेनं मांत्रिक उभा होता आणि एका बाजूला त्याचं सगळं कुटुंब खाली माना घालून उभं होतं.

अभयला काहीच कळेना. त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. हे सगळं खरंच घडत होतं?

तो खांद्यावर गगनच्या झालेल्या स्पर्शानं भानावर आला.

"ए..." तो जोरात ओरडला आणि धावतच जमावातून रस्ता काढत शेकोटीकडे जायला लागला.

सगळे लोक स्तिमित होऊन त्याच्याकडे बघत होते. तो स्मृतीजवळ पोचला आणि पहिल्यांदा तिच्या तोंडातला बोळा त्यानं काढून टाकला. तिला एकदम ढास लागली. तो तिचे हात सोडवू लागला एव्हढ्यात त्याला मांत्रिकानं मागे ढकललं.

"दूर राहा." मांत्रिक दरडावून म्हणाला.

"काय चाललंय काय इथे? मला माझ्या बायकोपासून दूर राहायला सांगणारा तू कोण?"

"ही तुझी बायको राहिलेली नाही, ही चेटकीण आहे."

"काय?" त्याला धक्क्यांमागून धक्के बसत होते. समोर त्याची हतबल बायको त्याला दिसत होती.

"विचार तुझ्याच आईला. तिनंच सगळ्यांसमोर मान्य केलंय, की हिच्यामुळेच तू चेटूक झाल्यागत वागायला लागला आहेस."

अभयनं विस्मयानं वळून आईकडे पाहिलं. ती मान खाली घालून उभी होती. त्याच्या भावानं मान वर केली आणि स्वतःच्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून पुन्हा मान खाली घातली. अभय आतून पूर्णतः ढासळून गेला होता.

"ही चेटकीण असल्यामुळेच देवाचा कोप होऊन ही वांझ राहिली." मांत्रिक म्हणाला.

"ए...तोंड बंद ठेव तुझं!" अभयच्या अंगात काहीतरी संचारलं आणि त्यानं मांत्रिकाला धक्का दिला. मांत्रिक दोन फूट मागे पडला.

'चेटूक, चेटूक' म्हणून लोक कुजबुजायला लागले आणि एक एक करून उठायला लागले. अभयनं मागे नजर टाकली. गगन कुठेही दिसत नव्हता.

लोक अभयवर चाल करून येणार असं वर्तमान होतं. अभयनं आजूबाजूला नजर फिरवली आणि शेकोटीतलंच एक जळतं लाकूड एका बाजूला धरून उचललं. आणि तयारीत उभा राहिला.

"कुणी पुढे आलं आणि माझ्या बायकोला हात जरी लावायचा प्रयत्न केला, तर माझ्याशी गाठ आहे." अभय पूर्णपणे स्मृतीला कव्हर करून उभा होता.स्मृतीच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.

मांत्रिक उठला आणि पुढे झाला. अभयनं सर्वप्रथम त्याला जोरकस फटका दिला, त्याबरोबर तो मागे कोसळला आणि बेशुद्ध पडला. बाकीचे लोक एकदम घाबरले आणि अभयचा तो आवेश पाहून त्यांची पुढे यायची हिंमत होईना. सगळे थोडे मागे सरले. अभय आईकडे वळला.

"आई.. ही तुला चेटकीण वाटते?"

आई काहीच बोलली नाही.

"ही मुलगी, जिनं तुझं मन राखण्यासाठी माझं वंध्यत्व स्वतःवर घेतलं, ती तुला चेटकीण वाटते?"

आईला एकदम धक्का बसला आणि तिनं वर पाहिलं. भाऊ-वहिनीसुद्धा चकित होऊन पाहायला लागले.

"काय बोलतोयस तू?"

"होय आई. मी नामर्द आहे! तुझा मुलगा. ती वांझोटी नाहीये. तिचे उपकार आहेत तुझ्यावर की ती तुझ्या नामर्द मुलाला सांभाळून घेतेय. हवंतर कुठल्याही डॉक्टराकडून तपासणी करून घे आमची."

त्याच्या आईचा विश्वास बसेना.

"आणि हीच चेटकीण तुझा मुलगा सहा महिने अंथरूणाला खिळून होता, तेव्हा घर एकहाती सांभाळत होती आणि तुझ्या मुलाची शुश्रुषाही करत होती. तीन वर्षांत तू तिला इतकंच ओळखलंस आई? ह्या बाहेरच्या लोकांच्या सांगण्यावरून तुला तिचे हाल करताना काहीच वाटलं नाही?" आईची मान परत खाली गेली.

"आणि तू अमोल, अबोलीसाठी म्हणून गप्प उभा आहेस. पण लक्षात ठेव, हीच वेळ उद्या अबोलीवर येईल, तेव्हा कुणाकडे कुठल्या अधिकारानं पाहशील?" अमोलचीही मान खाली गेली.

"आणि वहिनी? जाऊ दे! तुमचाही काय दोष? तुम्हा सगळ्यांनाच अंधश्रद्धेचा रोग झालाय." तो जोरात ओरडून म्हणाला.

जमावाकडे पाहून म्हणाला. "कुणालातरी त्रास देऊन त्या क्रियेचा असुरी आनंद घ्यायचा रोग आहे हा. माणसं नाही आहात, जनावरं झाला आहात तुम्ही सगळे!"

जमाव गप्प होता.

"अरे तुमच्या घरातल्या बायकांवरसुद्धा अशी वेळ येईल उद्या. ह्या असल्या पाखंडी बाबांच्या नादी लागून आपल्या आयुष्याची वाटोळी कशाला करताय? गावात शाळा आहे ती ओस पडलीय आणि तुम्ही लोक चेटकिणीला मारायच्या कार्यक्रमांना गर्द्या करताय?" त्याच्या आवाजात दुःख ओतप्रोत भरलेलं होतं. जमाव कधीही उठून येईल ही भीती होती.

"चूक आमच्या पिढीची सुद्धा आहे." तो स्वतःशीच बोलल्यागत म्हणाला, पण एव्हढी स्मशानशांतता होती, की सगळ्यांना ऐकू येत असेल, "आम्ही शहरात गेलो आणि तिकडचेच झालो. तिथे जे शिकलो, ते इथे गावात रूजवण्यात आम्ही कमी पडलो. आमच्याबरोबरच गावाचा विकास घडवण्यात कमी पडलो. कदाचित गावाबद्दलच्या आमच्या कर्तव्यातच कमी पडलो."

आणि एकदम वर बघून तो जोरात म्हणाला, "पण ह्या सगळ्याचा अर्थ हा नाही, की कुठलंही अमानुष कृत्य देवाच्या नावाखाली केलं जावं! ह्या बुवाबाबांच्या शब्दांवर निरपराध व्यक्तिंचे बळी दिले जावेत! मी माझ्या बायकोला ह्या सगळ्याची बळी ठरू देणार नाही." असं म्हणून त्यानं ते पेटतं लाकूड वर धरलं.

एव्हढ्यात पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजू लागला. जमाव गप्पच होता. गगन तालुक्याहून पोलिसांना घेऊन आला होता. अभयनं जळतं लाकूड खाली फेकलं. आणि पटकन वळून स्मृतीला सोडवलं. स्मृती झाल्या प्रकारानं पूर्ण उन्मळून गेली होती. तिला चक्कर येऊन ती बेशुद्ध झाली.

----------

स्मृतीला हळूहळू शुद्ध आली. तिनं डोळे उघडले, तर सकाळ झाली होती आणि समोर चिंताग्रस्त चेहरा करून अभय बसला होता. तिनं सभोवताली पाहिलं तर ती त्यांच्या शहरातल्या घरी होती.

"इथे?" ती अस्फुट म्हणाली.

तू उठू नकोस बरं, सांगतो सगळं मी.

"पोलिस आले आणि त्यांनी गुरूजी, मुसळेबाई आणि आईला अटक केली."

"काय?"

"हो. आईला त्यांनी समज देऊन सोडून दिलं, कारण गुरूजी आणि मुसळेबाईंचा ट्रॅक रेकॉर्ड निघालाय तालुक्याचा पोलिसांकडे! त्यांचे सगळे कारनामे काल गावासमोरच सांगितले. आई आणि गावकरी दोघांचेही डोळे उघडलेत."

"पण मग आपण इथे?"

"मला तिथे गुदमरल्यासारखं व्हायला लागलं. आईला तुझी माफी मागायची होती. पण मी म्हटलं पुन्हा कधीतरी!"

"तू पण ना! इतकं का करायचं?"

"हे तू बोलतेयस? तुझे किती हाल झालेत ह्या सगळ्यांत! आणि तुला काही झालं असतं म्हणजे?"

"हो मीच बोलतेय. हाल माझेच झालेत ना? मग मी माफ केलं तर तुला काय?"

"बरं बाई माफ कर मला. मला नाही तुझ्याशी भांडता येत."

"आणि मला तुझ्याशी भांडावंसं वाटत नाही!"

(समाप्त)

ही कथा ह्यापूर्वी मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१० मध्ये प्रकाशित झाली होती.

12/16/2010

नामर्द -१

स्मृती वारंवार अभयच्या चेहर्‍याकडे वळून पाहत होती. रिक्षा मधेच गचके खात होती, पण अभयची लागलेली तंद्री भंग होत नव्हती. स्मृतीला अभयची खूप काळजी वाटत होती. त्याला काय वाटत असेल? त्यानं किती मनाला लावून घेतलं असेल? ह्याचा अदमास घ्यायचा ती प्रयत्न करत होती. डॉक्टरांकडून निघाल्या क्षणापासून अभय तिच्याशी एक शब्द बोलला नव्हता. तो गप्पच होता अजून. घरी गेल्यावर बोलू ह्या विचारानं स्मृती सारखी स्वतःला समजावत होती.

"अभय अरे बोल ना रे काहीतरी!" स्मृतीला शांतता सहन होत नव्हती. पण अभय घरी आल्यापासून सोफ्यावर एकटक कुठेतरी नजर लावून बसला होता.

"अभय..." तिनं त्याचा खांदा हलवला.

"हं.." अभय भानावर आला, "काय झालं गं?"

"अरे मला काय विचारतोयस? असा गप्प नकोस रे बसू!" तिच्या नजरेत काळजी होती.

"हं.." अभयनं एक सुस्कारा सोडला.

"अरे डॉक्टर म्हणालेत ना आपण इन व्हिट्रो करू किंवा दुसरा काहीतरी इलाज होईलच ना रे! वंध्यत्वावर हल्ली खूप उपाय आहेत."

"हं..ते ही आहेच म्हणा!" अभय थोडासा सावरत म्हणाला. "पण थोडंसं वाईट वाटलं गं!" तिनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्यानं तिचा हात हातात घेतला आणि एकदम त्याच्या चेहर्‍यावर त्याचं नेहमीचं स्मित आलं.

"काय झालं रे?" तिनं आनंदून विचारलं.

"आपण मारे तीन वर्षं फॅमिली प्लॅनिंग करत होतो. आणि मॅच आधीपासूनच फिक्स्ड होती!" तो तिला डोळा मारत म्हणाला. मग दोघेही खळखळून हसले. तिच्या मनावरचं एक ओझं कमी झालं.

"आपण लवकरात लवकर पुढचा इलाज सुरू करू." ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली.

"आणि नाहीच जमलं तर मूल दत्तक घेऊ, चालेल तुला?" त्याच्या ह्या उद्गारांनी एकदम चकित होऊन तिनं त्याच्याकडे पाहिलं.

"ऐसे ना मुझे तुम देखो...सीने से लगा लूंगा"

"धत्, उठा आता जेवायला चला!"

----------

"हो आई येऊ ना आम्ही नक्की! अच्छा!" स्मृतीनं फोन ठेवला.

"काय गं? बिनधास्त आपलं येऊ की आम्ही. सुट्टी कोण देणार आहे मला?"

"दोन दिवसही नाही देणार का रे तुला सुट्टी! आई एव्हढ्या आग्रहानं बोलावताहेत. गुरूवारी निघू आणि रविवारी परत येऊ."

"आवरा. तुझं प्लॅनिंग पूर्ण झाल्यावर तू मला सांगतेयस! अगं विचारत जा ना आधी. बिनधास्त कमिट करून टाकते."

"हे बरं आहे. आई तुझी, आग्रह तिचा आणि बोल तू मला लावतोयस."

"बरं बरं. लगेच ट्रॅक नको बदलूस."

"मी ट्रॅक बदलला नाहीये. तूच मला उगाच बोलतोयस."

"तू ट्रॅक बदलला नाहीस? नातेवाईकांवर पोचली नाहीस?"

"माफ कर रे बाबा मला. मला नाही तुझ्याशी भांडता येत." ती त्रासून म्हणाली.

"आणि मला तुझ्याशी भांडावंसं वाटत नाही." तो मिश्किल हसत म्हणाला. "काहीतरी झोलझाल करून सुट्टी मिळवेन मी!"

----------

अभय डोळे चोळत उठला. एकदम अंधार पडला होता.

'च्यायला दुपारी तासभरासाठी म्हणून झोपलो, तर आता संध्याकाळ होत आलीय.' तो आळस देत स्वतःशीच बोलत होता. "ह्या गावच्या मस्त हवेल झोपही मस्त लागते. पण हिनं उठवायचं नाही का मला!'

"स्मृती.." तिला हाक मारतच तो खोलीबाहेर आला. "स्मृती???"

"अरे ती आईसोबत कुठेतरी गेलीय बाहेर!" त्याची वहिनी म्हणाली.

"बरं बरं..पण इतक्या संध्याकाळी म्हणजे कमालच झाली!"

अभ्यास करत बसलेल्या पुतणीच्या टपलीत मारून तो बाहेर व्हरांड्यात जाऊन बसला.

"नाष्टा बनवून ठेवलाय रे. ये खायला, चहा टाकते मी. हे पण येतील एव्हढ्यातच." वहिनी म्हणाली.

"नको वहिनी, ही आली की मग जेवेनच सरळ."

"काय रे जोरू का गुलाम!"

एव्हढ्यात त्याला आई आणि स्मृती येताना दिसल्या. स्मृती एकदम थकून गेल्यासारखी वाटत होती.

"काय गं आई? कुठे घेऊन गेली होतीस हिला?" तो तिचा हात पकडत म्हणाला. तिचं अंग तापलं होतं.

"अरे कुठे नाही... देवळात" आई म्हणाली. पण त्या दोघींची झालेली नजरानजर त्याच्या नजरेतून सुटली नाही.

"तुला ताप भरलाय स्मृती!" चल आत आधी आणि तो तिला घेऊन आत गेला.

"परवा परत जायचंय आपल्याला आणि ताप कसला गं घेऊन आलीस?" तिच्या डोक्यावर तो पट्ट्या ठेवत होता.

"असंच रे..दमणूक झाली." ती त्याच्या नजरेला नजर न देता म्हणाली. त्याला काहीतरी विचित्र वाटलं.

----------

दोन महिने उलटले होते अभय आणि स्मृतीला गावाहून येऊन. अभयचा इलाज चालू होता. पण कदाचित इन व्हिट्रो - आयसीएसआय करावं लागणार होतं. अजून महिन्याभरात काही ना काहीतरी मार्ग निघेलच असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. स्मृती खुष होती कारण अभयनं सगळंच खूप सहज स्वीकारलं होतं.

आणि एक दिवस स्मृती अभयला परत म्हणाली.

"अभय, आईंनी बोलावलंय रे!"

त्यानं तिरक्या नजरेनं तिच्याकडे पाहिलं. "गेल्या वेळेस काय केलं होतंस तिथे लक्षात आहे ना? इथे परत आल्यावरही आठवडाभर आजारी होतीस. अशक्तपणा जाईस्तो महिना उलटला. आणि आता पुन्हा?"

"अरे एकदा आजारी पडले म्हणजे काय नेहमीच पडणार आहे का? आणि ह्यापूर्वीही कित्येकदा गेलोय ना आपण गावाला?"

"बरं माफ कर. मला नाही तुझ्याशी भांडता येत."

"आणि मला तुझ्याशी भांडावंसं वाटत नाही." तिनं हसून टीव्ही चालू केला.

----------

"स्मृती, तू नक्की आमच्याबरोबर येत नाहीयेस? असं शेवटच्या क्षणी काय गं!" अभयचा स्वर दुखावलेला होता.

"नाही रे. मला आईंबरोबर खूप सार्‍या गप्पा मारायच्यात. तू, भाऊजी, वहिनी आणि अबोली जाऊन या ना!"

"पण मग उद्या जाऊ ना आम्ही!"

"असं कसं रे, एव्हढी तयारी करताहेत वहिनी कालपासून."

"मग मी कशाला जाऊ, त्यांना जाऊ देत ना! तिकडे स्पेशली तुझ्यासाठी जायचं होतं. ते ठिकाण काय मी लहानपणापासून हजारदा पाहिलंय."

"असं कसं रे. त्यांना किती वाईट वाटेल. आपण जाऊ ना पुन्हा!"

"अगं पण उशीर होईल गं बये यायला!"

"अरे आहेत ना आई माझ्यासोबत!"

तो चेहरा पाडून गेला, तेव्हा स्मृतीलाच खूप वाईट वाटलं. त्याच्याशी ती कधीच खोटं बोलली नव्हती. तिला खूप अपराधी वाटत होतं.

----------

अभय रिक्षातून उतरला आणि पायवाटेवरून झपझप घराकडे निघाला. घराचा दरवाजा उघडा बघून त्याला शंका आली. आणि एकदम घरातून धूराचा वास येत होता. अचानक घरातून कुणीतरी मंत्रोच्चारण करत असल्याचा आवाज येऊ लागला. तो पटकन आवाजाच्या दिशेनं निघाला. आवाज स्वयंपाकघरातून येत होता. तो आत शिरला आणि आतलं दृश्य पाहून हादरलाच.

एक मांत्रिक एक हवन पेटवून बसला होता. त्याचे पांढरे कपडे, लांब वाढलेले काळे केस, दाढी-मिशा आणि कपाळाचं मोठ्ठं गंध ह्यांबरोबरच असलेल्या दाट भुवयांमुळे तो अजूनच भयावह दिसत होता. शेजारीच त्यांच्या ओळखीतल्या मुसळेबाई होत्या. आणि तो मांत्रिक स्मृतीवर काहीबाही उधळत होता. स्मृतीशेजारी बसून त्याची आई भक्तिभावानं हे सगळं बघत होती. अभयच्या आण्याची कुणालाच कल्पना आली नाही. अभय थिजूनच गेला होता. हे सगळं त्याच्या घरात चालू होतं ह्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. एव्हढ्यात त्या मांत्रिकानं स्मृतीला प्यायला काहीतरी दिलं. आणि अभय भानावर आला.

"थांब स्मृती!" तो जोरानंच म्हणाला.

सगळेच दचकून त्याला पहायला लागले. मुसळेबाई घाबरल्या, आई बावरली, स्मृतीला खूपच वाईट वाटत होतं. मांत्रिक त्याचे लालभडक डोळे रोखून त्याच्याकडे पाहत होता.

"स्मृती हे तू प्यायचं नाहीस!" तो पुढे होऊन तिच्या हातून ते भांडं काढून घेत म्हणाला.

"अरे अभय.."

त्याची आई काही बोलायला सुरूवात करणार इतक्यात मांत्रिक म्हणाला. "का नाही प्यायचं? तिला गरज आहे. तिचं औषध आहे ते."

"तिचं औषध? काय झालंय तिला?" तो अविश्वासानं स्मृतीकडे पाहत म्हणाला.

"ती वांझ आहे!" मुसळेबाई धीर एकवटून म्हणाल्या.

"मुसळेबाई!" अभय कडाडला, "तोंड सांभाळा आपलं! पाहुण्या आहात पाहुण्यांसारखं वागा." तशी मुसळेबाईंची बोलती बंद झाली.

"काय चुकीचं बोलल्या त्या?" आता चक्क अभयची आई म्हणाली.

"आई.." अभयच्या स्वरात दुःख ओतप्रोत भरलं होतं. "तू पण? तुला माहित तरी आहे..."

त्यानं वाक्य पूर्ण करायच्या आधीच स्मृतीनं त्याचा हात धरला. त्यानं स्मृतीकडे पाहिलं. ती त्याला डोळ्यानंच विनवत होती. त्याच्या डोळ्यांत अश्रू आले. मग त्याचं लक्ष मांत्रिकाकडे गेलं आणि अश्रूंची जागा संतापानं घेतली.

"आई, हे सगळं थोतांड बंद कर!" तो मांत्रिकाकडे बोट दाखवत म्हणाला.

"मुला, तू अजाण आहेस म्हणून माफ करतोय तुला. पण तुझ्या बायकोचा इलाज अजून बाकी आहे." मांत्रिक म्हणाला.

"मी तुझ्याशी बोलतोय का?"

"अभय! आदरानं बोल गुरूजींशी, गेल्या वेळेसही त्यांनी प्रयत्न केले, पण गुण येईना म्हणून ह्यावेळेस मोठं हवन ठेवलं. त्यांच्या हाताने गुण येत नाही असं झालं नाही आजवर."

"अच्छा, तर गेल्या वेळेस ह्या कर्मांची फळं भोगली होती स्मृतीनं महिनाभर! चल पाखंड्या उचल आपलं चंबूगबाळं आणि निघ इथून!"

"अरे गुरूजींशी नीट बोल. त्यांना पूर्ण करू दे इलाज. स्मृती बरोबरच म्हणत होती, तू नसतानाच हे सगळं व्हायला हवं होतं." आई बोलतच होती. "गुरूजी माफ करा माझ्या मुलाला. गेली दहा वर्षं शहरात राहून बिथरलाय थोडा!"

"आई!" अभय रागानं नुसता थरथरत होता, "काय झालंय काय तुला? काय बोलतेयस तू? बाबा गेल्यापासून तुझं देवदेवस्की वाढलं होतं, ते मला दिसत होतं. पण ह्या थराला गेलंय ठाऊक नव्हतं. हे सगळं ह्या मुसळेबाईंच्या संगतीमुळे झालंय." अभयनं रागानं मुसळेबाईंकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. "आणि काय इलाज करणार आहे हा! जग कुठच्या कुठे गेलंय आणि तुम्ही ह्याच्या इलाजाकडे काय डोळे लावून बसलाय. आणि करायचाच असेल काही इलाज तर तो माझ्यावर..." स्मृतीनं त्याचा हात घट्ट धरून ओढला. त्यानं तिच्याकडे पाहिलं. त्याला भरून आलं होतं. तो तिच्याकडे ज्या नजरेनं पाहत होता, ते वर्णन करणं अशक्य आहे. अभयनं स्वतःवर ताबा मिळवायचा प्रयत्न केला.

"बरं झालं मला करमेना म्हणून त्यांना अर्ध्यातच सोडून मी परत आलो." बोलून तो मांत्रिकाकडे वळला, "आता निघतोयस बर्‍या बोलानं की धक्के मारून बाहेर काढू तुला सामानासकट!"

मांत्रिकानं एक जळजळीत कटाक्ष त्याच्याकडे आणि त्याच्या आईकडे टाकला आणि तो त्याची पिशवी उचलून निघाला. अभयची आई त्याच्यामागे, त्याची माफी मागत दारापर्यंत गेली. अभयनं मुसळेबाईंकडे पाहिलं. त्या थिजून स्तब्ध उभ्या होत्या, त्या एकदम भानावर आल्या आणि चटकन बाहेर गेल्या.

अभयनं स्मृतीकडे पाहिलं आणि तिला मिठीत घेतलं. आता तिचा आणि त्याचा दोघांचाही बांध फुटला.

----------

अभय आणि स्मृती त्यांच्या खोलीत बसले होते.

"तू आईला बोलली का नाहीस?"

"काय बोलायचं?"

"हेच की दोष माझ्यात आहे. मी नामर्द आहे!"

"बस! काहीबाही बोलू नकोस."

"कळलं आता मला किती वेदना झाल्या असतील, जेव्हा तुझा काहीच दोष नसताना ते लोक तुला वांझोटी म्हणत होते."

"अरे त्यांना काय कळे. अशिक्षित आहेत त्या!"

"अशिक्षित आहेत म्हणून अमानुष व्हायचं? गेल्या वेळेस तुझी काय अवस्था झाली होती ते आईलाही ठाऊक आहे. तरीही तिनं असं करावं?"

"अरे आजी व्हायचंय त्यांना!"

"आहे की ती अबोलीची आजी!"

"अरे नातू हवाय त्यांना!"

अभयनं कपाळाला हात मारला. "आत्ता लक्षात येतंय माझ्या! स्मृती, हे प्रकरण हाताबाहेर जाणार असं दिसतंय मला. आपण उद्याच्या उद्या पहाटेच इथून निघायचं. आय होप, तुझा चांगुलपणाचा आणि सोशिकपणाचा ताप आता उतरला असेल."

"अरे मी विचार केला इलाज होईस्तो त्या जे बोलतील तसं करावं, एकदा आपला इलाज पूर्ण झाला आणि मी गरोदर राहिले की त्यांनाही समाधान!"

"पण हे असले अमानुष प्रकार बघूनही तू गप्प राहिलीस?"

"कशाला दुखवायचं रे त्यांना!"

"हो हो आणि मला दुखवलेलं चालतं ना?" तो तिच्याजवळ गेला आणि तिचा चेहरा हातात घेत म्हणाला, "एव्हढा चांगुलपणा बरा नाही गं!" तिनं फक्त मान डोलावली.

"बरं ऐक आता. शहरात आमच्या फॅक्टरीत माझ्या अंडर एक सुपरवायझर आहे गगन म्हणून, ह्याच गावचा. त्यानं बोलावलं होतं. त्याच्या घरी जाऊन येतो. तू आराम कर, सामान आवर काही हवंतर आणि अमोल-वहिनी आल्याशिवाय खोलीतून बाहेर पडू नकोस. मी लवकरात लवकर यायचा प्रयत्न करतो."

क्रमशः

ही कथा ह्यापूर्वी मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१० मध्ये प्रकाशित झाली होती.

12/12/2010

निवड - पुन्हा

मागे एकदा निवड ह्या विषयावरच पोस्ट लिहिली होती, त्यामुळे वरती एक पुन्हा टाकलंय (नंतर अजून एखादी टाकली तर 'पुन्हा एकदा', त्यापुढे 'पुन्हा पुन्हा एकदा' आणि मग 'अजून पुन्हा पुन्हा एकदा'... असो फार पाणचटपणा झाला आणि नेमका विषय थोडा गंभीर आहे, त्यामुळे आवरतो).

तर निवड, म्हणजे एखादा मार्ग निवडणे हे कितपत आपल्या हातात असतं, किंवा ती निवड करायला कुठले घटक कारणीभूत ठरतात, ह्याची "अ क्लॉकवर्क ऑरेंज" ह्या सिनेमाच्या अनुषंगानं गेल्या वेळेस मी थोडी चर्चा करायचा बाळबोध प्रयत्न केला होता, आणि ह्यावेळेस बेसिकली चांगलं आणि वाईट हे नक्की कसं ठरू शकतं, ह्याशी थोडीशी निगडीत चर्चा 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई' ह्या कमर्शियलकडे झुकणार्‍या परंतु जाणते-अजाणतेपणी एक विचित्र गडद थीम दर्शवणार्‍या सिनेमाच्या अनुषंगानं करायचा अजून एक बाळबोधसा प्रयत्न.

मी 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई' चांगला आहे असं सगळ्यांनी सांगूनही बघायचं टाळत असण्याचं एकमेव कारण म्हणजे मी सहसा कुठल्याही 'गँगस्टर'चं आणि बहुतेकदा 'दाऊद'चं उदात्तीकरण (जाणते-अजाणतेपणी) करणारे सिनेमे (मीडिऑकर असतील तर) सहसा टाळतो. कारण मीडिऑकर असल्यानं त्यातनं सिनेमॅटिक अनुभवही मिळत नाही आणि फुकट गँगस्टरांची पब्लिसिटी होते हे पाहून मला त्रास होतो. अर्थात पब्लिसिटी फुकट नसते, त्यांचेच पैसे लागलेले असतात सिनेमात म्हणा. तर 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई'चं असंच काहीसं असावं असं माझ्यावर इम्प्रेशन होतं. त्यामुळे मी फारसा उत्सुक नव्हतो, पण विमानात झोप येत नव्हती आणि त्यात रणदीप हूडा असल्याचं दिसलं (जे मला माहीत नव्हतं) त्यामुळे मी बघण्याचा निर्णय घेतला.

बर्‍याच केसेसप्रमाणे रणदीप हूडाच्या बाबतही लोकांचे माझ्याशी तीव्र मतभेद असू शकतात. पण पोलिसाच्या भूमिकेमध्ये रणदीप हूडाईतका अक्षय कुमार सोडल्यास सांप्रतच्या कलावंतांमध्ये कुणीही शोभत नाही, हे माझं ठाम मत आहे. असो. तर हूडानं ह्यामध्ये पोलिसाची भूमिका केलीय. सिनेमाची सुरूवात एका विचित्र वळणावर होते. १९९३ सालच्या मुंबई बॉम्ब ब्लास्ट्स नंतर डीसीपी ऍग्नेल विल्सन (रणदीप हूडा) आत्महत्येचा प्रयत्न करतो. आणि त्याचं कारण त्याला कमिश्नर विचारतो तेव्हा तो मुंबईच्या आजच्या अवस्थेला स्वतः कारणीभूत असल्याचं सांगत काही वर्षांपूर्वी घडलेला घटनाक्रम सांगायला सुरूवात करतो आणि त्यातून सुलतान मिर्ज़ा (अजय देवगण) हा हाय-प्रोफाईल स्मगलर (हाजी मस्तानशी साम्य दर्शवणारं पात्र) आणि शोएब खान (इमरान हाश्मी) हा कुठल्याही मार्गाने पैसा आणि अनिर्बंध ताकद आणि सत्ता मिळवायची स्वप्न असलेला बेदरकार आणि उलट्या काळजाचा तरूण (दाऊदशी साधर्म्य दाखवणारं पात्र) ह्यांची गोष्ट आपल्यासमोर उलगडत जाते.

सुलतान मिर्ज़ाचा रंकापासून राजापर्यंतचा प्रवास, मग त्याला प्रसिद्धीची आवड असणं, छानछोकीची आवड असणं, तरी कायम गरीबांची (एस्पेशली डोंगरी भागातल्या) मदत करून तिथल्या भागातलं प्रतिसरकार सारखं बनणं हे सगळं थोड्याशा फिल्मी पद्धतीनं दाखवलं गेलंय. सुलतान हा गोदीमध्ये लहानाचा मोठा झालेला एक तस्कर. सोनं आणि परदेशी घड्याळं (ज्यांवर पूर्वीच्याकाळी बरीच कस्टम ड्यूटी पडायची) ह्यांची तस्करी करून सर्वांत मोठा बनलेला असतो. सुलतानचा शब्द मुंबईच्या गुन्हेगारी जगतात शेवटचा समजला जातो, कारण त्यानं सर्व गुन्हेगारांना भाग वाटून देऊन आपापसांत भांडण्यापासून अडवलंय. मुंबईतले रस्ते आणि सामान्य माणसं सुरक्षित आहेत, कारण त्याचे स्वतःचे धंद्याबाबतचे काही नियम आहेत. जसे ड्रग्ज आणि दारूची तस्करी न करणे, सुपार्‍या घेऊन खून न करणे इत्यादी. पण बाकी बेकायदेशीर कामं करण्यास त्याची ना नाही. सुलतानची निवड धार्मिक प्रभावांखाली ठरल्यासारखं जाणवतं. त्याच्या योग्य अयोग्याच्या कल्पना धार्मिक बाबींवर मूलतः अवलंबून आहेत आणि बाकीच्या पोटापाण्यावर त्या त्या वेळच्या सोयीनुसार. पण इथे ही थीम येते, की प्रसिद्धी माध्यमं आपल्या सवंगपणानं सुलतानला हिरो बनवून टाकतात आणि मोठी स्वप्नं असलेला प्रत्येक बेकार तरूण सुलतानला आपला आदर्श समजू लागतो. इथेच त्याकाळी एसीपी असलेला ऍग्नेल विल्सनची विचारसरणी पहिल्यांदाच आपल्यासमोर येते.

ऍग्नेल सरकारी नोकर आहे, आणि त्याचा सरकार ह्या व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. भले सरकारी कारभारामध्ये काहीजणांवर अन्याय होत असेल, तरीही मी त्या व्यवस्थेसाठी काम करतो आणि तीच सर्वोत्तम मार्ग असून तिच्याविरुद्ध उठणारी प्रत्येक गोष्ट अयोग्य असल्याचा दुर्दम्य विश्वास ऍग्नेलमध्ये आहे. आणि तो आपल्या मानलेल्या कर्तव्यपूर्तीपुढे स्वतःच्या जीवाचाही विचार करत नाही. त्याची निवड मूलतः सामाजिक आणि शैक्षणिक प्रभावाखाली ठरते आणि तो आपल्या निवडीबाबत पूर्णपणे ठाम आहे. त्यामुळे साहजिकच सरकारी महसूल बुडवून तस्करी करून मग गरीबांची थोडी मदत करून मसीहा बनलेल्या सुलतानबद्दल ऍग्नेलला केवळ तिरस्कार वाटतो. आणि त्याचं समाजासमोर ग्लोरिफिकेशन होत असलेलं पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तो सुलतानची पाळंमुळं खणून काढायचा निर्णय घेतो. सुलतानची गर्लफ्रेंड असलेली सिनेनटी रेहानावर दबाव आणून तिच्याकडून काही पुरावे मिळवायचा प्रयत्न करताना रेहाना आणि सुलतान बनाव रचून त्याला लाच घेताना मीडियासमोर आणून त्याचा पाया हलवतात. ह्या घटनेमुळे तर पोलिसातही सुलतानचे प्रशंसक वाढलेले पाहून ऍग्नेल दुखावतो, पण तो सुलतान ह्या फिनॉमेनाला संपवायचे मार्ग शोधत राहतो. तो वेळोवेळी सुलतानसकट त्याच्या जवळच्या लोकांनाही त्यांच्या सो कॉल्ड समाजसेवेतला फोलपणा समजावत राहतो पण पालथ्या घड्यावर पाणी पडत राहतं. सुलतानच्या करिष्म्यानं अनेक राजकीय पक्षदेखील प्रभावित असतात. आणि अशातच मग सुलतानसमोर शोएब येतो. शोएबमधलं वेड पाहून सुलतान त्याला आपल्या पंखाखाली घेतो आणि शोएबची प्रगती होऊ लागते. पण शोएबची निवड फारच सरळसोट असते. त्याला नीतीमत्ता नावाचा प्रकारच माहित नसतो. फक्त पैसा आणि अनिर्बंध सत्ता एव्हढ्या दोनच लक्ष्यांकडे त्याची दौड सुरू असते. त्यामध्ये चांगलं-वाईट वगैरे वर्गीकरण करण्याची त्याला गरज नसते. त्याला एक दिवस सुलतानसारखं बनायचं असतं आणि त्यासाठी कुठल्याही थराला जायला त्याची ना नाही.

ऍग्नेल सर्व पाहून डोळे मिटून बसतो कारण त्याला शोएबच्या रस्त्यांमध्ये सुलतानच्या मूलभूत नियमांशी फारकत दिसते. विष विषाला मारतं तद्वतच तो शोएबच्या उन्नतीचा वापर सुलतानच्या अस्तासाठी करायचं ठरवतो आणि शोएबला अजाणतेपणीच आयतं मोकळं रान मिळतं. मग एक दिवस सुलतानला स्वतःच्या प्रभावाला राजमान्यता मिळवावीशी वाटते आणि तो राजकीय पक्षात प्रवेश करण्यासाठी दिल्लीला जायचं ठरवतो. आणि काही दिवसांसाठी तो शोएबच्या हाती सत्ता देतो आणि इथेच ऍग्नेलचा प्लॅन यशस्वी होण्याची बीजं दिसू लागतात. शोएब पैशांसाठी कुठलंही बरंवाईट काम करू शकतो आणि तो ते करूही लागतो. अल्पावधीतच शोएब गुन्हेगारी जगतामध्ये खूप पुढे निघून जातो. पण सुलतानचा पूर्ण व्यवसायच सुलतानच्या अनुपस्थितीत पालटून जातो. आपल्या राजकारण प्रवेशाची व्यवस्था लावून सुलतान परततो तेव्हा घडलेल्या घटनांनी तो हादरून जातो. शोएबला अपमानित करून तो टोळीबाहेर काढतो. पण आपल्या नियमांमुळे सुलताननं पूर्वीपासूनच अनेक छुपे शत्रू निर्माण करून ठेवलेले असतात. त्यातलाच एक शोएबला हाताशी धरून सुलतानचा काटा काढायचा प्लॅन करतो.

एव्हाना ऍग्नेलला आपल्या हातून घडलेल्या प्रमादाची कल्पना आलेली असते. पण आता शोएब हाताबाहेर गेलेला असतो. आणि सुलतानला संपवून तो गुन्हेगारी जगताचा सम्राट बनतोच आणि मुंबईला कायमचं गुन्ह्यांच्या छायेखाली आणतो. आणि एक दिवस ह्याचीच परिणती १९९३ ब्लास्ट्समध्ये झाल्याचं ऍग्नेल शेवटाकडे सूचित करतो. त्यामुळेच सुलतान आणि शोएबमधल्या एकाची निवड करण्यात स्वतःची चूक झाल्याचं मान्य करत तो अपराधी भावनेनं आत्महत्येचा प्रयत्न करतो.

शेवटी तो सांगतो की दोन चुकीच्या गोष्टींमधली एकाची निवड करणं अवघड असतं. आणि त्यातच त्याची चूक झाल्याचं सांगतो. पण खरंच तसं असतं का? ऍग्नेल तत्वनिष्ठ आणि स्वच्छ चारित्र्याचा पोलिस असतो. पण सुलतान त्याला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकवतो. ऍग्नेलच्या जवळ असणारे अनेकजण सुलतानचे चाहते असतात ज्यामुळे वेळोवेळी ऍग्नेल तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत असतो. कदाचित ह्याच कारणांमुळे फक्त सुलतानला संपवणं हेच त्याचं लक्ष्य बनून जातं आणि त्यात शोएब कामास येऊ शकतो हे पाहून तो परिणामांची पर्वा न करतो 'फ्रँकेनस्टाईन मॉन्स्टर' बनवतो (आपल्या निर्मात्यालाच संपवणारा) असं एकंदर जाणवतं. अर्थात प्रत्यक्षात दिग्दर्शकाला इतका ऊहापोह करायचा असावा असं मला वाटत नाही. मीच कदाचित झोप न झाल्याने सिनेमाचा फार खोलात विचार केला.

सिनेमा पूर्णतया कमर्शियल होता हे त्यामध्ये जोडलेली चांगल्या गाण्यांची ठिगळं आणि बिनकामाच्या हिरॉईन्सवरून कळतं. पण तरीही जाणते-अजाणतेपणी सिनेमा मानवी स्वभावाच्या काही पैलूंवर प्रकाश टाकतोच. अजय देवगण भूमिका जगतो. पण त्याचा रोल बराचसा फिल्मी झालाय. इमरान हाश्मीऐवजी एखादा अजून चांगला नट घेता आला असता. तरीदेखील काही अपवादात्मक प्रसंगांमध्ये इमरानही छाप सोडतो. रणदीप हूडाचं नाव सुरूवातीला स्पेशल ऍपिअरन्स म्हणून येतं बहुतेक, पण त्याचा रोल बर्‍यापैकी मोठा आहे. आणि मला तरी त्याचा अभिनय इमरानपेक्षाही चांगला वाटला. काही प्रसंगांमध्ये तो अजयसमोरही घट्ट पाय रोवून उभा राहतो. त्यातून त्याची पर्सनालिटी त्याच्या व्यक्तिरेखेला शोभते.

एकंदर चांगल्या संवादांबरोबरच चांगली कथा असल्यानं (पटकथा थोडी लेटडाऊन करते) सिनेमा मनोरंजन तरी चांगलं करतो. मी वरती जेव्हढं निवड वगैरेंवरून पकवलं त्या सगळ्याचा विचारही न करतादेखील एकदा आरामात बघता येईल.

12/08/2010

चान्स पे डान्स

कुठेतरी वाचलं होतं, की यशस्वी माणूस तो असतो, जो कुठलीही स्थिती स्वतःला अनुकूल बनवून घेऊ शकतो. आणि गेल्या काही दिवसांत मला ह्याचा बरेचदा प्रत्यय येत होता, पण नजीकच्या काळात दोन प्रसंगांमध्ये मात्र प्रकर्षानं ह्या सत्याची जाणीव झाली.

'मुन्नी' नं बदनाम होताना झंडू बाम लावला तेव्हा झंडू बामवाले गपचूप बसून मजा बघत राहिले. मग एकदा मुन्नी पुरेशी बदनाम झाल्यावर कॉपीराईटची धमकी देऊन मलाईका अरोराला फुकटात ब्रँड ऍम्बॅसेडर (भूषण अग्रदूत) म्हणून करारबद्ध करून घेतलं. ही बातमी ऐकून खरंतर माझा झंडू बामबद्दलचा आदर द्विगुणितच झाला होता. पण आज एक अजून जबरा बातमी ऐकायला मिळाली आणि बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे झंडू बामबद्दलच्या आदराच्या रेषेशेजारी एक अजून मोठी रेषा ओढली गेली, बर्नी एक्लस्टनबद्दल.

बर्नी एक्लस्टन, हा ८० वर्षांचा गृहस्थ, फॉर्म्युला वन, अर्थात एफ-वन, ह्या जगातल्या सर्वांत महागड्या कार रेसिंग खेळांच्या कंपनीचा अध्यक्ष आणि सीईओ. तो गेल्या आठवड्यात आपल्या ऑफिसबाहेर पडून आपल्या गाडीत बसत असताना त्याच्यावर काही भामट्यांनी हल्ला केला आणि एक-दोन गुद्दे लगावून त्याच्या हातावरचं 'हुब्लो' ह्या लग्झरी घड्याळ कंपनीचं १७००० अमेरिकन डॉलर्स किंमतीचं (सुमारे ७ लाख भारतीय रुपये) मनगटी घड्याळ हिसकावून पळून गेले. लगावलेल्या गुद्द्यांमुळे बर्नीचा एक डोळा काळा-निळा झाला आणि चेहर्‍यावर एखाद दोन छोट्या जखमाही आहेत. एकतर बर्नीचं वय ८०, त्यात असा मार बसलेला, आणि अशा स्थितीत त्याच्या बायकोनं त्याचा फोटो तिच्या कॅमेरात काढला. दोन दिवसांनंतर बर्नी हुब्लो कंपनीच्या सीईओ वगैरे लोकांबरोबर सहज बोलत होता, की तुमच्या घड्याळापायी मला मार पडला वगैरे. तेव्हा अचानक बर्नीला 'फ्लॅश ऑफ जिनियस' झाला. तो म्हणाला, "माझ्या बायकोच्या मोबाईलमध्ये माझा फोटो आहे. तो घ्या आणि त्याला हाय डेफिनेशन वगैरे बनवा आणि हवंतर तुमच्या जाहिरातीसाठी वापरा." झालं, 'हुब्लो' वाल्यांनी पडत्या फळाची आज्ञा घेत त्याचा फोटो घेतला आणि "'बघा, हुब्लो' घड्याळांसाठी लोक काय काय करतात?" अशा काहीशा अर्थाची एक टॅगलाईन बनवून जाहिरात बनवली आणि हल्ल्याच्या घटनेला आठवडा होण्याच्या आतच ती मासिकांमध्ये देखील झळकली.

ह्या 'हुब्लो' च्या सीईओची सीएनएन वाला मुलाखत घेत होता, तेव्हा 'हुब्लो' च्या सीईओनं काही पथप्रदर्शक वक्तव्यं केली. जसे, "आता आपण नव्या शतकात जगत आहोत, जिथे लग्झरी ही एक जीवनपद्धती आहे. लग्झरी ही आता केवळ चैन नसून गरज बनतेय." माझे डोळे खडाखड उघडत असतानाच, सीएनएन वाल्यानं प्रश्न केला, की अशा प्रकारे हल्ल्याला ग्लॅमराईज करणं योग्य आहे का? तेव्हा 'हुब्लो'चा सीईओ म्हणाला, "हिंसा ही निंदनीयच आहे आणि आम्ही आमच्या जाहिरातीतून हिंसेला कुठेही ग्लॅमराईज करत नाही आहोत. आज हिंसा किती वाढलीय वगैरे वगैरे." आणि प्रश्नाला साफ बगल देऊन त्यानं माझा त्याच्याबद्दलचा आदर अजून वाढवला.

त्यापुढे सीएनएन वाल्यानं विचारलं की तुम्ही बर्नी एक्लस्टनला रिप्लेसमेंट घड्याळ दिलंत का? तेव्हा त्यानं दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक होतं. तो म्हणाला की, "आम्ही बर्नीला भेटायला त्याच्या घरी गेलो होतो, तेव्हा आम्ही रिकाम्या हातांनी तर जाऊ शकत नव्हतो. त्यामुळे आम्ही एक छोटीशी भेट म्हणून एक घड्याळ घेऊन गेलोच होतो."

आता ह्यावर सीएनएन वाला जे म्हणाला तेच मी म्हणेन, "कधी आम्हालाही भेटायला या!"

12/05/2010

दूधखुळा

तुम्ही अझरूद्दीन दुर्दैवीरित्या धावबाद झाला म्हणून घरातच चीडचीड केलीत. भारत दक्षिण आफ्रिकेकडून वाईट पद्धतीनं हरल्यामुळे तुमचा अख्खा दिवस वाईट गेला. आणि दक्षिण आफ्रिकेची शेवटची विकेट पडायची वाट पाहत, लाईट गेलेत म्हणून तुम्ही रेडिओवर कानात प्राण आणून कॉमेंट्री ऐकताय आणि विकेटच पडत नाहीये म्हणून तुम्ही रडकुंडीला आलायत शेवटी ज्या क्षणी तुमच्या डोळ्यांतून अश्रू गालांवर ओघळतात, त्या क्षणीच एकदाचा पॉल ऍडम्स आऊट होतो आणि तुम्ही आनंदानं ओरडून आईनं तासाभरापूर्वी वाढून ठेवलेलं ताट एकदाचं समोर ओढता. आणि...

आणि ५-६ महिन्यांनी पेपरांमध्ये बातम्या येतात, अझरूद्दीन आणि दक्षिण आफ्रिकन कप्तानानं जवळपास प्रत्येक मॅच फिक्स केलेली होती.

तुमची प्रत्येक आरोळी, तुमचं हास्य, तुमचं दुःख, तुमची निराशा, तुमचा आवेग, तुमचं दुःख, तुमचे अश्रू, तुमची प्रत्येक भावना काय किंमतीची राहिली? ही भावना माझ्या चांगल्याच ओळखीची आहे. विश्वासघात झाल्याची, पण त्याहून जास्त बोचतं ते हे सत्य की तुम्हाला मूर्ख बनवलं गेलं. जगात सर्वांत वाईट दोन भावना असतात, एक म्हणजे तुमच्याशिवायसुद्धा तुमच्या भोवतालच्या प्रत्येक माणसाचं सगळं काही व्यवस्थित चालू शकतं ही आणि दुसरी म्हणजे तुमच्या नकळत तुमचा वापर करून घेतला गेल्याचं लक्षात येणं ही. पण सर्वांत वाईट सत्य हे आहे, की ह्या दोन्ही गोष्टी समजायला लागल्यापासून ते मरेपर्यंत वारंवार तुमच्याबरोबर होत राहतात, पण तरीदेखील त्यामुळे तुम्हाला लागणारी बोच कमी होत नाही. तुम्ही तितकाच त्रागा करून घेता किंवा मनातल्या मनात कुढत राहता.

ओके. आता आपण तुम्ही ऐवजी मी म्हणूया. कारण माझ्याबरोबर हे सगळं असंच्या असं झालेलं आहे. आणि कुठल्याही सामान्य भावनिक 'इमोशनल फूल' भारतीय माणसाप्रमाणे मी अनेकदा वापरला गेलोय. अगदी शाळकरी वयापासून ते 'सुजाण' मतदाता बनेपर्यंत, प्रत्येक पावलावर मी भावनेच्या भरात अनेक गोष्टी केल्यात आणि नंतर सत्य समजल्यावर मनातल्या मनात स्वतःला कोसलंय.

भारतीय क्रिकेट संघासाठी जीव टाकण्याच्या वेडापासून सुरूवात झाली ती पार राज ठाकरेंच्या 'माझी घुसमट होतेय' ला मनातून समर्थन देण्यापर्यंत मी भावनिक मूर्खपणा खूप केलाय. मी जरी मनातून भाजपबरोबरच होतो तरी राज ठाकरेंवर 'अन्याय' होतोय ही भावना माझ्यावर योग्य पद्धतीनं 'रोपित' झाली होती. पण सुदैवानं राहुल गांधीला केलेल्या शून्य विरोधापासून ते अशोक चव्हाणांच्या समर्थनापर्यंत अनेक गोष्टी माझ्या दुर्दैवानं संशयी आणि अतिचिकित्सक असलेल्या राजकीय मेंदूच्या लक्षात येत गेल्या आणि तीच भावना निर्माण होत गेली.

अटलबिहारींचं सरकार एका मतानं कोसळलेलं लाईव्ह टीव्हीवर पाहून अश्रू ढाळणारा मी आणि नंतर तेरा महिन्यांसाठी आणि त्यानंतर पूर्ण वेळासाठी सरकार विश्वासमत जिंकल्यावर आनंदित झालेला मी, अटलबिहारींचा वारस म्हणवणार्‍या प्रमोद महाजनांचे उंची लाईफस्टाईल आणि विविध भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले हात पाहून आणि सेंटॉर घोटाळ्यापासून ते शवपेट्या आणि बंगारू लक्ष्मणचे प्रताप पाहून मनातल्या मनात काय भोगत होतो ते मलाच ठाऊक आहे.

नीरा राडियाच्या टेप्स ऐकून आपलं सरकार आणि आपले मंत्री कुठल्या पद्धतीनं बनवले जातात हे उघडं सत्य पहिल्यांदाच प्रत्यक्ष नागडं झालं. आपल्याला बातम्या देणारी मंडळीच बातम्या बनवण्याच्या खेळामधले हीन दर्जाचे दलाल आहेत हीदेखील ऐकीव माहिती खरी असल्याचं समोर आलं. आणि माहित असलेल्याच गोष्टींवर शिक्कामोर्तब होतानाही एक कळ मात्र अजाणतेपणीच उठली. का? कशासाठी? सगळंच तर ठाऊक होतं. पण कदाचित मीच दूधखुळा ज्याला कुठेतरी माहित असलेलं सगळं अतिरंजित असेल अशी एक भाबडी आशा होती आणि कदाचित त्या आशेचाही गळा घोटला गेल्यावर मात्र वेदना अनावर झाली आणि कळ उठली.

लहानपणापासून संघाची शिस्त आणि राजकारण ह्यांचा मिलाफ म्हणून भाजपाकडे मी एका वेगळ्या नजरेनं पाहायचो. मी कधी संघाच्या शाखेत गेलो नाही, पण संघाची विचारसरणी मला बर्‍यापैकी ठाऊक आहे ती माझ्या संघचालक वडिलांमुळे. पण जेव्हा भाजपामध्ये चाललेली चिखलफेक पाहिली आणि अगदी आमच्या भागातले नगरसेवकापासून ते आमदारकीसाठीचे उमेदवार कसे पैसे देऊन उमेदवारी मिळवताहेत, हे माझ्या वडिलांच्याच तोंडून ऐकलं तेव्हा माझी झालेली चीडचीड मला अजून आठवते. पण त्याहून जास्त त्रास ह्या गोष्टीचा विचार करून झाला, की वर्षांनुवर्षं संघाची विचारसरणी अक्षरशः जगणार्‍या माझ्या बाबांसारख्या अनेकानेकांना ह्या सर्व गोष्टींचा किती त्रास होत असेल. आणि दुसर्‍या दिवशी सकाळीही उठून जेव्हा बाबा नेहमीप्रमाणे शाखेत निघाले तेव्हा मला काहीच समजेनासं झालं. ही माणसं कदाचित ह्या भावनेवर मात करायला शिकली आहेत.

एखादेवेळेस मी ही त्या वयाचा होईपर्यंत असाच होईन असंच मला वाटायचं. पण कदाचित तसं होणार नाही. कारण वारंवार फसवलं गेल्यानंतर माणसं एकतर सहन करायला शिकतात किंवा प्रत्येक गोष्टीवर संशय घेऊ लागतात. मी दुसर्‍या प्रकारात मोडणारा झालोय.

दोनेक महिन्यांपूर्वी विकिलीक्सच्या कार्यामुळे मी आनंदित झालो होतो आणि ते करत असलेल्या कार्यामध्ये मला क्रांतीची बीजं दिसत होती. मी अतिशय प्रभावित होऊन एक कौतुक करणारी आणि शुभेच्छा देणारी पोस्टही लिहिली होती. पण त्यानंतर घडत गेलेल्या घटनांनी मी द्विधा मनःस्थितीत पडलोय. अमेरिकेची काही गुपितं उघड करून विकिलीक्सनं अमेरिकेची जगहसाई तर व्यवस्थित केली. पंण...

पण थोडा नीट विचार केला तर काय दिसतं. व्हिडिओगेम्सप्रमाणे नागरिकांना हसत हसत मारणारे अमेरिकन सैनिक, हे काय जगाला ठाऊक नसलेलं सत्य होतं? अबू-ग़रेब च्या आठवणी विस्मृतीच्या गर्तेत गेल्या होत्या एव्हढंच, नाहीतर अमेरिकन कारनामे येन केन प्रकारेण लोकांसमोर येतच होते. त्यामुळे अमेरिकेचा बुरखा फाटला हे जरी सत्य आणि स्तुत्य असलं तरी त्यामुळे अमेरिकेला प्रत्यक्षात काहीच फरक पडला नाही. 'आमच्या युद्धनीती जगासमोर येतील आणि शत्रू प्रबळ होईल' अशी कोल्हेकुई अमेरिकेनं केली हे जरी सत्य असलं, तरी प्रत्यक्षात तसलं काहीच घडलंय असं कुठे वाचण्यात आलं नाही, कारण विकिलीक्स डॉक्युमेंट्स संपादित करून प्रकाशित करतंय. विकिलीक्सला मिळणार्‍या फुटलेल्या कागदपत्रांची 'संख्या', 'प्रमाण' आणि 'सातत्य' संशयाचं वलय निर्माण करतं. कारण एव्हढे महिने उलटूनही अमेरिकेला एकही गळका नळ बंद करता आलेला नाही हे अविश्वसनीय वाटतं (किंवा जरी त्यांनी जगहसाईच्या भीतीनं गुप्तपणे काही नळ बंद केले असले, तरीदेखील गळती एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर चालूच रहावी हे अविश्वसनीय वाटतं). आणि ज्युलिअन असाँजवर अद्यापही 'एस्पिओनेज ऍक्ट' लावण्यात अमेरिकन सरकार दिरंगाई का करतंय हा अनुत्तरित प्रश्न आहे. आणि ह्याच क्षणी थोडंसं सिंहावलोकन करता एक गंमतीशीर गोष्ट लक्षात आली. पहिली मोठी गळती प्रकाशित केल्या केल्या असाँजवर बलात्काराची केस टाकली गेली आणि चोवीस तासांत मागे घेतली गेली. ह्यावर माझ्यासकट सर्व भावनिक माणसांनी अमेरिकन बाळबोधपणाची खिल्ली उडवली. पण कदाचित तेच अमेरिकेला हवं होतं? अमेरिकेसारखी पाताळयंत्री शक्ति इतकी सरळसोट चूक करेल? पण कदाचित त्यांना आपल्या दूधखुळेपणावर प्रगाढ विश्वास असावा. आणि अजून एक म्हणजे (कदाचित सैतानी विधान वाटेल पण) असाँज अजून जिवंत किंवा पूर्णपणे धडधाकट कसा? त्याच्यावर अजून एकही हल्ला झाला नाही?

मी स्वतःचा माझे मुद्दे फिरवतोय का? असं मला वाटू लागलंय म्हणून थोडीशी ताजी निरीक्षणं अशी की नुकत्याच प्रकाशित 'डिप्लोमॅटिक केबल्स' चा परिणाम नीट अभ्यासल्यास पुढचे मुद्दे समोर येतात.

१. उत्तर कोरिया आणि चीनच्या संबंधांत संशय निर्माण होऊ शकतो.

२. इराण आणि मध्यपूर्वेच्या देशांच्या संबंधांत असुरक्षितता निर्माण होऊ शकते, जी इराणच्या वाईटासाठी आणि इस्रायलच्या पथ्यावर पडणारी आहे.

हे दोन्ही मुद्दे सरळसरळ अमेरिकेच्याच पथ्यावर पडणारे दिसतात. आता उत्तर कोरिया, चीन आणि इराण काही चांगली सरकारं आहेत अशातला भाग नाही, पण अमेरिकेच्या केबल्स रिलीज करून आम्ही अमेरिकेचा बुरखा फाडतोय असा जो आविर्भाव एकंदर आहे तो दिशाभूल करणारा आहे. अर्थात त्याच केबल्समधील काही ह्या अमेरिकन मित्रराष्ट्रांच्या नेत्यांची खिल्ली उडवणार्‍या देखील आहेत, पण अर्थात जर सगळाच बनाव असला तर असल्या गोष्टींची पूर्वकल्पना देता येऊ शकते आणि केली गेलेली विधानं ही उघड गुपितंच आहेत.

संशयी मन ह्या सगळ्यांचा असा निष्कर्ष काढतंय की अमेरिका विकिलीक्सला वापरतंय, स्वतःला दोन चापट्या मारून जगाची दिशाभूल करत शत्रूंना धोबीपछाड घालायचा प्रयत्न करतंय. पण कदाचित उलटही असेल, की रशिया किंवा चीन अमेरिकेला धोबीपछाड घालण्यासाठी स्वतःला चापट्या मारतंय. पण दोन्ही केसेसमध्ये दोन गोष्टी अनुत्तरित राहतात, एक म्हणजे एव्हढी कांडं करण्यासाठी लागणारा भरमसाठ पैसा विकिलीक्सकडे येतो कुठून आणि दुसरा म्हणजे आपण कुणावर विश्वास ठेवायचा? कारण दोन्ही केसेसमध्ये आपण मॅनिप्युलेटच केले जातोय. अर्थात लगेच विकिलीक्सवरचा माझा विश्वास उठलाय अशातला भाग नाही. पण जोवर खरंच अमेरिकेला किंवा कुठल्याही अनैतिक शक्तिला प्रत्यक्ष नुकसान पोचवणारं असं काही विकिलीक्स समोर आणत नाही तोवर संशयाला जागा राहतेच.

मग मात्र प्रचंड वैचारिक मंथन होतं आणि शेवटी मी निष्कर्ष काढतो की दूधखुळा राहण्यातच सोय आहे. विश्वासघात झाल्याचं कळेपर्यंत तरी आपण आनंदी असतो. आणि झाल्यावरदेखील काळासोबत आपण पुन्हा पूर्वीसारखेच दूधखुळे बनू शकतो. फुकाचं वैचारिक मंथन काय कामाचं राव!

12/02/2010

कधी कधी वाटतं...

(टीप - सदर कविता स्वतःच्या जवाबदारीवर वाचावी. आधी ही कविता आहे का हेच नक्की नाहीय, तरीही.)

कधी कधी वाटतं...

आरशात पाहताना प्रतिबिंब दिसावं...आणि ते ओळखता यावं...

कधी कधी वाटतं...

आरशातल्या प्रतिबिंबाशी नजर मिळवावी...आणि कुणाचीच नजर झुकू नये...

कधी कधी वाटतं...

गुलाब कुस्करला जाताना...बोटही रक्तबंबाळ व्हावं...

कधी कधी वाटतं...

वाट फुटत राहावी ...निवडावी लागू नये...

कधी कधी वाटतं...

पावलं पडत राहावीत...अन् वाट कधी संपू नये...

कधी कधी वाटतं...

चुकीच्या वाटेवर चालतानासुद्धा...धीर मात्र खचू नये...

कधी कधी वाटतं...

मागे वळून पाहताना...नजर अनोळखी वाटावी...

कधी कधी वाटतं...

श्वासांचं गणित मांडताना...एखादा हातचा निसटून जावा...

कधी कधी वाटतं...

एकदातरी उडता यावं...अन् क्षितिजापुढचं पैलतीर दिसावं...

कधी कधी वाटतं...

एकदातरी...स्वतःला डोळेभरून पाहता यावं...

11/28/2010

द हँगओव्हर

मी सिनेमांवर लिहिणार नाही असं नेहमी ठरवतो पण कुठलातरी सिनेमा पाहतो, खूप आवडतो आणि मग दोन तीन दिवस मी फक्त त्याच सिनेमाचा विचार करत राहतो. त्या सिनेमाबद्दल मिळेल ते वाचत राहतो आणि दुसरा कुठलाच विषय डोक्यात नसल्यानं (आणि इतर अनेक महत्वाच्या चालू घडामोडींवर बरेचजण बरंच सकस लिखाण करतातच) माझ्यासमोर त्या सिनेमाबद्दलच काहीतरी लिहिण्याशिवाय पर्याय नसतो. विनोदी सिनेमांमध्ये अनेक प्रकार असतात. काही चुरचुरीत संवादांवर आधारलेले तर काही कमरेखालच्या विनोदांवर आधारलेले, काही पूर्णपणे अभिनेत्याच्या क्षमतेवर अवलंबून तर काही निव्वळ परिस्थितीजन्य विनोद दर्शवणारे. 'द हँगओव्हर' हे परिस्थितीजन्य विनोदावर आधारलेल्या सिनेमाचं एक ठळक उदाहरण.

'द हँगओव्हर' चा एक अभिनेता एड हेल्म्स एका मुलाखतीत सांगतो, की ह्या सिनेमाची खासियत हीच आहे, की ह्यात कुठलंही पात्र चुरचुरीत संवाद म्हणत नाही, किंवा कुठलंही एक पात्र स्मार्ट किंवा हुशार असं नाही, ज्यामुळे विनोदनिर्मिती व्हावी. ह्यातली विनोदनिर्मिती फक्त घडणार्‍या घटनांमुळेच आहे. आणि ह्या घडणार्‍या प्रत्येक घटनेत त्यातली पात्र मात्र पूर्णपणे गंभीर असतात. आणि एडचं म्हणणं शंभर टक्के खरं आहे. 'द हँगओव्हर' मधले मित्र सिनेमाच्या अनेक भागांमध्ये मार खात असतात किंवा त्यांची फजिती होत असते किंवा ते पूर्णपणे भांबावलेले असतात आणि आपण इथे हसून हसून लोटपोट होत असतो.

'डग' चं 'ट्रेसी' बरोबर लग्न ठरलंय. त्याचं लग्न रविवारी आहे आणि त्याच्या दोन मित्रांनी(फिल आणि स्टू) त्याची 'बॅचलर्स पार्टी' शुक्रवारी रात्री 'लास व्हेगास' मध्ये साजरी करायची ठरवलीय. डगनं ट्रेसीचा थोडा विक्षिप्त भाऊ 'ऍलन' ला देखील आपल्या बॅचलर्स पार्टीला न्यायचं ठरवलंय. फिल हा एक शाळाशिक्षक आहे आणि स्टू हा एक डेंटिस्ट. फिल हा हॅपिली मॅरीड विथ अ बॉय आणि स्टू लवकरच आपल्या हुकूमशहा गर्लफ्रेंडला प्रपोज करण्याच्या विचारात आहे. डगचा समजूतदार सासरा त्याला स्वतःची अत्यंत लाडकी व्हिंटेज मर्सिडीज लास व्हेगासला घेऊन जाण्यासाठी देतो. आणि चौकडी बॅचलर्स पार्टीसाठी व्हेगासकडे रवाना होते. व्हेगासमधल्या एका महागड्या हॉटेलमधला एक महाग स्वीट बुक करून चौघेजण लपून छपून हॉटेलच्या छतावर पार्टीची सुरूवात करायला जातात. तिथे दारू पिऊन मग जेवण आणि जुगार, स्ट्रिप क्लब इत्यादी 'बॅचलर्स पार्टी' स्पेशल कार्यक्रम करायचे प्लॅन्स करतच चौघे दारू प्यायला सुरूवात करतात आणि मग आपल्याला थेट सकाळ दिसते. हॉटेलचा आलिशान स्वीट अस्ताव्यस्त झालाय. एक कोंबडी स्वीटमध्ये फिरतेय. स्वीटचा दरवाजा उघडून बाहेर पडणारे एका बाईचे पाय आपल्याला दिसतात. आणि जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेला स्टू आपल्याला दिसतो. मग कुठूनतरी ऍलन उठतो आणि बाथरूममध्ये जातो. आणि आत त्याला चक्क एक वाघ दिसतो. ऍलनची पाचावर धारण बसते आणि तो धावतच बाहेर येतो. फिलदेखील जागा होतो आणि वाघ बघून सगळेच घाबरतात. त्यातच 'डग'चा काहीच थांगपत्ता नसतो. तो जिथे झोपला असावा तिथली गादीदेखील गायब असते. आणि एका कपाटामधे एक रडणारं बाळ असतं. सगळे विचारात पडतात की नक्की असं काय झालं काल रात्री? गंमत म्हणजे कुणालाच काही आठवत नाही. फिलच्या हाताला हॉस्पिटलमध्ये बांधतात तो बँड आहे. ते जेव्हा व्हॅलेट पार्किंगमधून आपली गाडी मागवतात तेव्हा मर्सिडीजऐवजी एक पोलिस कार येते. आणि हॉटेलच्या आवारातल्या एका मोठ्या पुतळ्यावर 'डग' ज्या गादीवर झोपला होता ती गादी अडकल्याचं दिसतं. तिघेहीजण आता मोठ्याच काळजीत पडतात. आधी ते हॉस्पिटलमध्ये जातात ज्यावरून त्यांच्या लक्षात येतं की त्यांनी आदल्या रात्री रोहिप्नॉल (उच्चार नक्की माहित नाही मला) हे 'डेट रेप ड्रग' घेतलं होतं, ज्यामुळे त्यांची आदल्या रात्रीची पूर्ण स्मृती गेलेली आहे. मग ते हळूहळू आदल्या रात्रीचे संदर्भ जुळवायचा प्रयत्न करू लागतात. आणि त्यातनंच त्यांनी आदल्या रात्री दारूच्या नशेत गाजवलेले चित्रविचित्र पराक्रम एक एक करून त्यांच्यासमोर येऊ लागतात. बाथरूममधला वाघ, ते बाळ, ती बाई, पोलिस कार आणि त्यांच्या पेयांमध्ये आलेलं रोहिप्नॉल अशी सगळी कोडी हळू हळू उलगडत जातात. डगचं गायब असणं हळूहळू खूप तणावपूर्ण होऊ लागतं आणि अचानकच शेवटाकडे ह्या उर्वरित रहस्याचाही उलगडा होतो. आपली मात्र हसून हसून मुरकुंडी वळलेली असते. आणि त्यातच शेवटी त्यांना कॅमेरा सापडतो ज्यामध्ये आदल्या रात्रीचे त्यांचे सगळे फोटो असतात. ते सगळे एकमेकांशी ठरवतात की एकदाच बघून पूर्ण डिलीट करायचे. आणि सिनेमाच्या क्रेडिट्सबरोबर आपल्याला हे फोटो पहायला मिळतात.

सिनेमा तसं बघायला गेला तर 'बॉय ह्यूमर' कॅटॅगरीत मोडणारा आहे. बहुतेककरून पुरूष ऑडियन्सला डोळ्यासमोर ठेवून बनवलेला आहे. पण तरी सिनेमाची गंमत कमी होत नाही. स्वतःला शहाणं समजणार्‍यांची होत असलेली फजिती हा विनोदनिर्मितीचा हुकमी एक्का दिग्दर्शक टॉड फिलिप्स वापरतो. ब्रॅडली कूपर (कूलड्यूड शाळाशिक्षक), एड हेल्म्स (भिडस्त डेंटिस्ट) आणि झॅक गॅलिफिआनाकिस (विक्षिप्त ऍलन) ही त्रयी आपल्या वावरानं धमाल उडवते. त्यांचे एक एक कारनामे समोर येताना त्यांची जी गोची होत राहते ती ह्या तिघांच्या अभिनयामुळे खूपच गंमतीशीर वाटते.

ह्या सिनेमाचं कथानक एका प्रोड्यूसरच्या स्वानुभवावर आधारलेलं आहे. पण बाथरूममधला वाघ वगैरे काही गोष्टी दिग्दर्शक टॉड फिलिप्सच्या सुपीक डोक्यातून आलेल्या आहेत. एकंदर सिनेमा आपल्याला थोडा वेळ एका वेगळ्याच विनोदी सफरीवर घेऊन जातो. 'सम गाईज जस्ट कान्ट हँडल व्हेगास' ही सिनेमाची टॅगलाईन अक्षरशः खरी होताना आपल्याला दिसते. सिनेमात अनेक ठिकाणी 'अमेरिकन कल्चर' (उदा. बॅचलर्स पार्टीचा कन्सेप्ट, 'व्हॉटेव्हर हॅपन्स इन व्हेगास, स्टेज इन व्हेगास' हा डगच्या सासर्‍याचा डोळे मिचकावत मारलेला डायलॉग वगैरे) पुरेपूर दिसून येतं. पण तरीही सिनेमातला विनोद अगदी बोटांवर मोजता येईल इतक्याच वेळा कमरेखाली जातो.

टॉड फिलिप्सचा वेगळाच 'सेन्स ऑफ ह्यूमर' पारंपारिक भारतीय प्रेक्षकांना कितपत रूचेल ठाऊक नाही पण भारतात काही निर्मात्यांनी ऑलरेडी 'द हँगओव्हर'चा ऑफिशियल रिमेक बनवण्याची तयारी सुरू केल्याचं ऐकिवात आलं होतं मध्यंतरी. तो येईल तेव्हा येईल, पण सध्या तरी मी टॉड फिलिप्सचा नवा सिनेमा 'ड्यू डेट' ची वाट पाहतोय. ह्यात झॅक गॅलिफिआनाकिस आणि माझा प्रचंड आवडता अभिनेता रॉबर्ट डाऊनी ज्युनियर आहे, त्यामुळे ही ट्रीटच असण्याची शक्यता आहे. पाहू.

11/26/2010

माझे सणजीवन -२

भाग १ पासून पुढे

त्यानंतर येते वर्षप्रतिपदा अर्थात मराठी नववर्षदिन. गुढीपाडवा. गुढीपाडव्याला मला फारसं काही खास वाटत नसलं, तरी गुढी उभारणं आणि त्यावर लागलेली ती साखरेची पदकं खाण्याची संध्याकाळपर्यंत वाट पाहत राहणं ह्यासाठी तो दिवस मला चांगलाच लक्षात राहिलाय. मला ती साखरेची पदकं दोर्‍यावरून खायला जाम म्हणजे जाम मजा वाटते. अजूनी. पण गेल्या काही वर्षांपासून ती संधी हुकतेय. काहीतरी गोडधोड बनतं, ते खायचं आणि एन्जॉय करायचं. तसा मस्त असतो हा सणपण. पण जास्त लिहिण्यासारख्या ती पदकं सोडल्यास काही आठवणी नाहीत.
गुढीपाडव्यानंतर आमच्या घरी वेध लागतात ते हनुमान जयंतीचे. हनुमान जयंती आमच्या कुटुंबात शंभरहून जास्त वर्षं साजरी केली जातेय. हनुमान आमचं मानलेलं कुलदैवत आहे असं कधीतरी बाबा सांगत होते. त्यामुळे आमच्यात हनुमान जयंतीचं प्रस्थ असतं. हनुमान जयंतीच्या सात दिवस आधीपासून घरातल्याच हनुमानाची सेपरेट प्रतिष्ठापना करतात आणि त्याच्याशेजारी सात दिवस सलग एक समई तेवत ठेवतात. मला लहानपणापासून त्या विझू न देण्याच्या समयीबद्दल जाम कुतूहल वाटतं. ती विझू नये म्हणून सात दिवस त्या खोलीतला पंखा बंद. सहसा प्रतिष्ठापना हॉलमध्ये. पुन्हा हनुमान जयंती उन्हाळ्यातच, आणि कहर म्हणजे टीव्ही हॉलमध्ये. सात दिवस फुल गेम. एका वर्षी पाहुणे आले होते कुणीतरी. तर आतमध्ये झोपताना मला आणि भावाला जाम छोट्याशा जागेत झोपण्याची पाळी आली होती. मग मी म्हटलं, मी झोपतो हॉलमध्ये आणि मोठ्या धैर्याने उकाड्याला सामोरा गेलो. अर्धी रात्र बिन झोपेचा, घामाघूम तळमळत होतो. नशीबाने पाहुणे एकच रात्र आधी आले होते. आणि जयंतीच्या दिवशी पहाटे सगळे लवकर उठतात. मोठे उठल्यावर मी पटकन आत जाऊन पंख्याखाली तासभराची एक्स्ट्रा झोप घेतली होती.
पण एव्हढं सगळं असलं तरी हनुमान जयंती म्हटली की माझ्या डोळ्यासमोर आधी चणे आणि गुळाची खिरापतच येते. मस्त मजा यायची नेहमीच. सात दिवस आरत्या म्हणायच्या. ऐन हनुमान जयंतीच्या दिवशी मी कधीतरी हट्ट करून बाबांसारखं सोवळं नेसायचो, हट्टाने आरतीचं ताट धरायचो (हट्ट अति होत होता नै..पण आता समजून काय उपयोग!) अजूनी आई-बाबा तसेच हनुमान जयंती साजरी करतात. ज्या आत्यांना जमतं त्या जयंतीच्या दिवशी येऊन जातात. हनुमान जयंती तसा मोठा सण नसल्याने आणि महत्वाचं म्हणजे 'बँक हॉलिडे' नसल्याने सगळ्यांनाच येणं जमत नाही. पण माझ्या सणजीवनाचा हनुमान जयंती हा एक अविभाज्य घटक आहे.
हे सगळे पूर्वार्धातले सण. त्यानंतर थेट येतो तो गणेशोत्सव. म्हणजे मधे असतील काही पण माझ्या विशेष लक्षात राहिलेत असं काही सुचत नाहीये. पण गणेशोत्सव मात्र चांगलाच म्हणजे चांगलाच लक्षात राहतो. आमच्या घरी गौरी-गणपती असतात. म्हणजे ज्या दिवशी गौरी जातात, त्याच दिवशी गणपती. पण मजा भरपूर येते. घरात मोठ्या प्रमाणावर पक्वान्न बनतात. माझे आवडते उकडीचे मोदक बनतात. पाच-सहा दिवस सण असल्यासारखं वाटतं. हट्टाने पूजा करायला किंवा सांगायला बसणे हा माझा लहानपणापासूनचा शिरस्ता आहे (हट्ट फार झालाय ना लेखातसुद्धा). मग हळूहळू जसाजसा मोठा झालो, तसतसा समजूतदारपणे वडिल जे सांगती ते करू लागलो. पण असं आहे ना, की जेव्हा पूजा चालू असते, तेव्हा जर मी तिथे इन्व्हॉल्व्ह नसेन, तर मला प्रचंड कंटाळा येतो. आई पोहे वगैरे काहीतरी बनवत असते आणि मला भूक लागलेली असते. पण काही खाता येत नाही. पूजा हॉलमध्ये, टीव्ही तिकडे. फुल बोर होतं. त्यामुळे पूजेत बसणं, कुठल्याही भूमिकेत हे नेहमीच सोयीस्कर!
एकदा पहिली पूजा झाली, की मग सकाळ संध्याकाळच्या आरत्या, प्रत्येक आरतीच्या वेगवेगळ्या प्रसांदांमध्ये मला लहानपणापासूनच आरतीपेक्षा जास्त इंटरेस्ट राहिलेला आहे. लहान असताना एकदा मित्राच्या घरी त्याच्या वडिलांनी रात्रभर जागून वगैरे केलेली आरास पाहिली होती. मित्र आणि त्याचे वडिल व काका नेहमी एक अख्खी रात्र जागून आरास करायचे, ह्याचं मला अप्रूप वाटायचं. आमच्या घरी एकदम साधं प्रकरण. एखादा काहीतरी स्टिकर आणून लावायचा. बाकी दोन समया आणि चांगलंस उपरणं गणपतीला, बास. कारण आमच्यात कलाकार कुणीच नाही. पण मला एकदा खूप म्हणजे खूप न्यूनगंड म्हणतात तो झाला. म्हटलं, ह्यावर्षी आपण पण आरास करायची. आई-बाबांनी थोडं समजावून पाहिलं. पण मी बधलो नाही. ते नाईलाजानेच काही थर्मोकोलच्या गोष्टी घेऊन आले. मलापण रात्रभर जागून आरास करायची होती. प्रत्यक्षात आई-बाबांनी रात्रभर जागण्याएव्हढं सामान हुशारी करूनच आणलं नव्हतं. एक डोक्यामागे लावायचं दिवे लावलेलं फिरणारं चक्रही आणायला मी बाबांना भाग पाडलं होतं. जे काही आणलं होत त्यात मी माझ्या अप्रतिम कलाकुसरीने वाकडं तिकडं कापून थोडंफार वाया घालवल्यावर आई म्हणाली, 'केलीस तेव्हढी मेहनत खूप केलीस' आता जाऊन झोप. बाबा माझ्यासारखेच कलाशत्रू. त्यातल्यात्यात माझ्या आईच्या हातात कला आहे. तिनं आपलं जागून कसंतरी काहीतरी बरं दिसेलसं उभं केलं.  मला मिळायचा तो धडा मिळाला होता. त्यानंतर आई-बाबा जी छोटीशी सजावट करतात (आईच करते, बाबा टीपी करतात) त्यात गणपती आणि मी दोघेही समाधान मानतो. त्यावेळेस आणलेले मखराचे खांब अजूनी कुठल्यातरी माळ्यावर पडलेले असतील, किंवा फेकून दिले असतील. गंमतच होती सगळी! अजूनही कुठे कुठे केलेली आरास, मखर पाहतो, तेव्हा हे सगळं डोळ्यांपुढे येतं.
गणपती संपल्यावर येते नवरात्र. नवरात्राचं माझ्या जीवनात वेगळंच स्थान आहे ते दोन गोष्टींमुळे (आता तुम्ही म्हणाल प्रत्येकच सणाचं वेगळं स्थान आहे. पण आहे तर काय करू!) एक म्हणजे आमच्या पहिल्या घराशेजारी, जिथे मी नववीपर्यंत राहिलो, एक मैदान आहे. जे नवरात्रीत गरबा-दांडियासाठी भाड्यानं दिलं जातं. एकेकाळी तिथला दांडिया खूप फेमस होता. जॉनी लीव्हर वगैरे फेमस असताना तिथे येऊन गेलेला होता. असो. तर तिथे रात्रभर दंगा चालत असे. त्यावेळी रात्री दहा वगैरेंची बंधनं नव्हती. त्यामुळे ते भगभगलेले दिवे आणि रात्रभर येणारा प्रचंड आवाज अजूनही मला आठवतात. आम्हाला सगळ्यांनाच त्या गोंगाटाची इतकी सवय झालेली होती, की आम्ही अत्यंत सहजगत्या त्या गोंगाटात झोपू शकायचो. तिथे मिळालेल्या ह्या ट्रेनिंगमुळेच आमच्यातलं कुणीही, कितीही आवाजामध्ये झोपू शकतं. झोपायसाठी शांतता लागते म्हणणारे भेटले की हसू येतं. एव्हढं शेजारीच मैदान असून मी कधी दांडियाला गेल्याचं आठवत नाही. कदाचित एकदा कधीतरी कुणातरी ओळखीच्यांकडच्या इमारतीत गेलो असेन पण खरंच आठवत नाही.
नवरात्रीचं आयुष्यात स्थान असण्याचं दुसरं कारण म्हणजे मी शाळेत असताना, बहुतेक चौथी-पाचवीत होतो, आमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये आमच्या वर्गशिक्षिकेनं आमच्या वर्गाचं दांडिया नृत्य बसवलं होतं. त्यांनी काय समजून माझी निवड केली होती मला ठाऊक नाही, पण मी त्यात होतो. दांडिया येत नव्हता, फक्त त्यावेळी वाजणारी गाणी माहित होती. मी नक्कीच बर्‍यापैकी चांगलं सादरीकरणही केलं असावं बहुदा. ते एव्हढं लक्षात नाही. पण नाच झाल्यावर आम्हा सहभागी मुलांना नाष्ट्याचं कूपन दिलं गेलं होतं आणि काही गडबडीमुळे ते मला मिळालं नाही. मग आमच्या वर्गशिक्षिकेनं त्यांना मिळालेलं कूपन माझ्या हातात दिल्याचं आठवतं! छ्या राव, जाम नॉस्टॅल्जिक व्हायला होतं कधीकधी! कशावरून काय आठवेल ना, त्याचा नेम नाही.
हे सगळं सोडलं तर आमच्या घरामध्ये नवरात्र म्हणजे घटस्थापना आणि नऊ दिवस उगवणारी ती नाजूकशी रोपं! रोज त्याच्यावर एक एक माळ आई चढवायची. त्याचीही एक वेगळी गंमत वाटायची. पण अशाच एका नवरात्राच्या दुसर्‍या माळेला माझी आजी (माझ्या आईची आई) गेली होती. मला धूसरसंच आठवत होतं. पण नुकतंच आईशी बोलणं झाल्यानं आत्ता चांगलंच लक्षात आहे.
त्यानंतर येतो खरा मोठा गेम. दिवाळी. ज्यावरून हा सगळाच लेखनप्रपंच सुरू केलाय. दिवाळी म्हणजे सगळ्यांसाठीच पर्वणी. देशात जवळपास सर्व भागांमध्ये सारख्याच उत्साहाने साजरा केला जाणारा बहुतेक देशातला सर्वांत मोठा सण. लहानपणापासून दिवाळी म्हणजे अभ्यंगस्नान, फराळ आणि फटाके सर्वप्रथम आठवतात. आईनं उटणं लावून घातलेलं अभ्यंगस्नान म्हणजे दिवाळीची खरी सुरूवात. शाळेची दिवाळीची सुट्टी खूप आधी सुरू झालेली असायची. दिवाळीचा अभ्यास आणि फंड उभा करण्यासाठी खपवायला दिलेलं वीस तिकिटांचं पुस्तक घेऊन सहामाही परीक्षा संपवून आम्ही घरी यायचो. वेगळेच दिवस होते. अगदी शाळा संपण्याचा दोनेक वर्षं आधी अक्कल आली की परीक्षा संपल्यासंपल्याच दिवाळीचा अभ्यास उरकून ठेवावा, म्हणजे सुट्टी मजेत जाते. नाहीतर आम्ही मूर्खासारखे सुट्टी संपत आली की एकतर सहामाहीचा निकाल आणि दिवाळीचा अभ्यास ह्या दुहेरी भीतीनं कावरेबावरे होत असू. ती पावतीपुस्तकं इमारतीतल्याच काका लोकांच्या माथी तिकिटं मारून आम्ही संपवत असू.
दिवाळीचे वेध लागले की फटाक्यांची दुकानं ओव्हरटाईममध्ये चालायची. बाबांच्या मागे लागून (इथे हट्ट नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी) आमची वरात (मी, दादा आणि बाबा) फटाक्यांच्या दुकानात. तिथे तुफान गर्दी! मग त्या काऊंटरवरून छापलेला फॉर्म घ्यायचा. कुठले फटाके किती हवेत हे त्यात भरायचं. आमचं बजेट ठरलेलं असायचं नेहमी. त्यामुळे जास्त वेळ लागायचा नाही. तसा मी बालपणापासून फटाक्यांच्या बाबतीत घाबरट होतो. अगदी सहावी सातवीपर्यंत मी लक्ष्मीबॉम्ब आणि सुतळीबॉम्बला बिचकूनच असायचो. माझी झेप म्हणजे झाडं (अनार) आणि भुईचक्र आणि रॉकेट्स! त्यातल्यात्यात रॉकेट उडवणं हे मला एकदम शौर्याचं लक्षण वाटायचं. मग हळूहळू ह्या फोबियातूनही बाहेर आलो. सगळे फटाके निर्धास्त उडवू लागलो. पण एकंदरच आमच्यात जास्त फटाके आणण्याची पद्धत नव्हती. इतरांना भरपूर फटाके उडवताना पाहत हेवा करत बसायचो कधीकधी. नंतर नंतर त्यातला फोलपणा कळला, पण तोवर मी मोठा झालो होतो.
नववीत असताना आम्ही घर बदललं होतं. तिथूनही आम्ही वर्षभरात अजून एकदा घर बदललं नंतर. पण त्या एका वर्षीची दिवाळी माझ्या दिवाळीजीवनाला कलाटणी देणारी ठरली. पूर्वीच्या इमारतीत आम्ही गच्चीवर फटाके उडवत असू. पण इथे तळमजल्यावर फटाके उडवण्याची पद्धत होती. रॉकेट्स सुद्धा जमिनीवर बाटल्या ठेवूनच. असंच एकदा मी रॉकेट पेटवायला गेलो. हातात उदबत्ती होती. रॉकेट काही पेटेना. मी आपला शक्य तेव्हढं अंतर राखत, बाटली पडू नये ह्याची काळजी घेत उदबत्ती वातीला लावत होतो. एव्हढ्यात मागे उभा असलेला आमच्याच इमारतीतला जमाव ओरडू लागला. मी मागे वळून पाहिलं. सगळे काहीतरी ओरडत होते, पण सगळे एकत्र वेगवेगळं काहीतरी बोलत असल्याने मला काहीच अर्थबोध होईना. मी दुर्लक्ष करून पुन्हा समोर पाहिलं आणि नकळतच थोडा वाकलो आणि झर्रकन माझ्या डोळ्यांपासून जवळपास एक इंचावरून रॉकेट उडालं. प्रकाशाच लोळ डोळ्यात जावा असं क्षणभर वाटलं. दोन-चार सेकंद काही दिसेना. मी घाबरलो. म्हटलं गेले डोळे. पण मग एकदम नॉर्मलला आलो. शांतपणे मागे गेलो. ते सगळे मला 'रॉकेट पेटलंय, मागे ये', असंच सांगत असल्याचं मला नंतर कळलं.
त्यादिवशी मी कुठलीही दुखापत न होता बचावलो. मग दुसर्‍या दिवशी मी पाच भुईचक्र ओळीनं ठेवली आणि एकाच फुलबाजीनं ती लावायला सुरूवात केली. उगाच मस्ती! धडाधड पाच लावली आणि पुढे सहावं होतं. मला समजेना, मी सहावं कधी ठेवलं. म्हटलं असेल चुकून ठेवलेलं. पण ते कुणाचं तरी अर्धवट चालून थांबलेलं भुईचक्र होतं. मी फुलबाजी लावताच ते फुटलं आणि पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर प्रकाशाचा लोळ. ह्यावेळेस हात भाजला होता. अंगठ्याचं कातडं भाजलं होतं. माझा फटाके उडवायचा उत्साह अर्ध्याहून जास्त कमी करण्यास ही दिवाळी जवाबदार ठरली.
त्याच्या पुढच्या दिवशी अजून एका नव्या घरात. जिथे मी अजून राहतो. आदल्या वर्षीच्या घटनाक्रमानंतर राहिलेले फटाके शिल्लक होते. तेव्हढेच फोडायचं ठरवलं होतं. मी आणि भाऊ जाऊन हळूहळू लक्ष्मीबॉम्ब वगैरे लावत होतो. मी थोडासा हात आवरूनच, पण मला भीती बसू द्यायची नव्हती, म्हणून हे सगळं चालू होतं. तेव्हढ्यात कंपाऊंडमधून रस्त्यावरची काही पोरं आम्हाला बघत होती. कारण आमच्या इमारतीत आम्ही दोघेचजण फटाके फोडत होतो. कदाचित माझ्या भावाची कल्पना, किंवा आईनं वरून बघून सांगितलं ते लक्षात नाही पण आम्ही त्या मुलांना बोलावून त्यांनाच ते फटाके फोडायला दिले, आमच्याच समोर. त्यांनाही बरं वाटलं, आम्हालाही. सगळे फटाके संपले. आणि माझ्या आयुष्यातलं फटाके पर्व संपलं.
हल्ली पहाटे चारचार पर्यंत फटाके फोडतात. आणि हल्ली आवाजाच्या फटाक्यांचं प्रस्थ वाढलंय. मला दिवाळीत धुराचा जाम त्रास होतो. पूर्वी का व्हायचा नाही ठाऊक नाही. किंवा होत असेल, पण मी दुर्लक्ष करत असेन. पण हल्ली आवाजाच्या फटाक्यांच्या अतिरेकामुळे दिवाळी बेरंग होऊन गेलीय. त्यामुळे मी गेल्या तीन दिवाळ्या घराबाहेर असूनही मला हायसंच वाटतं. फक्त आई घालते ते उटणं लावून अभ्यंगस्नान आणि फराळ नसल्याने खूप चुकल्यासारखं वाटतं.
सगळ्याच सणांना बहुतेक करून सकाळी आम्हाला ठेवणीतल्या सोन्याच्या चेन्स घालायला मिळायच्या. सकाळी नवे कपडे घालून, त्या चेन्स घालून भावाबरोबर आणि नंतर मित्रांबरोबर आई देवळात धाडायची. त्या देवळात जाण्याचीपण एक मजा असायची. मी कधी एकदम श्रद्धेने देवळात गेलोय असं मला स्मरत नाही, पण तो सगळाच एक सोहळ्याचा भाग असायचा. त्यातली खुमारी वेगळीच. एकदा देवळातून आलं की चांगलंचुंगलं खायचं. पुन्हा मित्रांबरोबर खेळायला जायचं, ते थेट दुपारी गोडाधोडाचं खायला परत. त्यानंतर वामकुक्षी आणि मग पुन्हा फराळ, खेळ! ते दिवस आता तसेच राहिले नाहीत. जवळचे मित्र पांगलेत. शहरात कुणीच नाही. कधीतरी चुकून आम्ही सणावारांना एकत्र भेटतो. भावाचं कुटुंब आहे. सणांना सगळे भेटतो, पण आम्ही आता लहान राहिलो नाही. सगळीच गणितं बदलल्याचं जाणवतं.
मी गेल्या तीन वर्षांपासून एकाही उपरोल्लेखित सणाला घरी नाही. आता वर्षाभराने कधीतरी जेव्हा कायमचा परतेन, तेव्हा येणार्‍या सणांना काय नवीन बघायला मिळेल कुणास ठाऊक! बदल होतच राहतात. नीट पाहिलं तर कधीकधी त्यातही वेगळी मजा असते. तीच शोधायचा प्रयत्न करेन बहुदा!
लिहिता लिहिता फारच लिहून गेलो. वाचल्याबद्दल खूप धन्यवाद!
तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना ही दिपावली सुखसमृद्धीची, आनंदाची आणि आरोग्यपूर्ण ठरो!

(समाप्त)
टीप - हा माझा जालरंग प्रकाशनच्या इ-दिवाळी अंकातील पूर्वप्रकाशित लेख आहे. पूर्ण लेख फार लांब असल्याने एकाहून अधिक भागांमध्ये देत आहे.

11/25/2010

माझे सणजीवन -१

सण ह्या गोष्टीला आपल्या भारतीय समाजपरंपरेमध्ये फार महत्वाचं आणि अढळ स्थान आहे. सणांमुळे आपण आपल्या नातेवाईकांच्या किंवा शेजारीपाजारी किंवा एकदम समाज वगैरेंच्या संपर्कात येतो आणि आपले अनुभवविश्व, भावविश्व आणि कसली कसली विश्व समृद्ध होतात असली वाक्य बर्‍याच सांस्कृतिक मासिकांमध्ये वगैरे वाचायला मिळतात. आता ही वाक्य अगदीच खोटी असतात असं मी म्हणत नाही, पण अशा भाषेमुळे खरा संदेश लोकांपर्यंत पोहोचता पोहोचता राहतो ना हो, निबंध वगैरे लिहायला ठीक असतात असली वाक्य! पण सणांमध्ये मजा असते हे मात्र खरं! बहुदा सगळ्यांना सुट्या असतात, बहुदा घरातले सगळे चांगल्या मूडमध्ये असतात, बहुदा घरातल्यांसाठी खरेदी होते आणि बहुदा घरामध्ये काहीतरी स्पेशल खाद्यपदार्थ बनतात (किंवा हल्ली विकत आणले जातात).
प्रत्येकाचे सणांचे आपले आपले अनुभव असतात. आणि प्रत्येकाच्या केसमध्ये बरेचदा प्रत्येक सणाशी निगडीत काही अविस्मरणीय असे अनुभव असतात की त्या सणाचा उल्लेख आला रे आला की तोच अनुभव पहिला आठवावा. माझ्या बाबतीत अनेक सणांच्या नुसत्या उल्लेखाला माझ्या डोळ्यासमोर विविध गोष्टी आणि विविध प्रसंग उभे राहतात. आता दिवाळी आलीय (आम्हा मित्रांमध्ये 'दिवाळी आलीय?' ह्या प्रश्नाचा अर्थ होतो, 'तुला अतिमहत्वाकांक्षेची बाधा झालीय!' पण ऐन दिवाळीच्या आधी ह्या ताकदवान शब्दप्रयोगातली हवाच निघून जाते). आणि दिवाळी म्हणजे सणांचा राजा/राणी असं काय काय म्हणता येईल. त्यामुळेच म्हटलं की माझ्या आजवरच्या सणजीवनाचा एक तात्विक परामर्श घ्यावा.
आपण सुरूवात करू इंग्रजी वर्षाच्या सुरूवातीपासून. संक्रमण किंवा संक्रांत. तसं पाहायला गेलं, तर दिवाळी संपली रे संपली की मुंबईमध्ये संक्रांतीचे लागलेले वेध आकाशात पतंगरूपाने विहरताना दिसतात. मी लहान असल्यापासून संक्रांत म्हणजे पतंग हे समीकरण डोक्यामध्ये प्रचंड फिट बसलेलं आहे. खरं म्हणजे लोकांना संक्रांत म्हटलं की तीळगूळ, गुळपोळ्या आणि तूप असलं काही काही सात्विक दिसतं, पण आम्हाला (पक्षि- अस्मादिक) फक्त रंगीबेरंगी पतंग आणि त्यांचे विविध जाडीचे (विड्थ - सांगणेस कारण की ह्यास विशेषण समजून गैरसमज उद्भवू नयेत) मांजे डोळ्यासमोर येतात. तीळगूळ, गुळपोळ्या वगैरे चीजा नंतर येण्याचं कारण की ते सगळे एक दिवसाचे चोजले असतात. पण पतंग आणि मांजे ही जवळपास दोन-अडीच महिन्यांची अशक्य मेहनत असते. संध्याकाळी शाळेतून घरी येताना मुंबईतल्या एस.व्ही.रोडसारख्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या रस्त्यावरून समोर न पाहता वर आकाशात पाहत घरी येणं असो, की घरी आल्यावर दप्तर टाकून कसंबसं काहीतरी घशात कोंबून कधी कपडे बदलून किंवा कधी न बदलताच दौडत थेट गच्चीवर जाणं असो, किंवा आपल्या कुठल्याही खिडकीत एखाद्या पतंगाचा मांजा अडकलाय का हे ख्रिसमसच्या दिवशी सांताक्लॉजने रिकाम्या मोज्यात काही टाकलंय का हे पाहण्याच्या परदेशी खुळापेक्षा जास्त खुळेपणाने पाहण असो, किंवा मग गच्चीच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जीवाचीही तमा न बाळगता हवेतून लटकत चाललेला मांजा पकडण्यासाठी घेतलेली वेडी धाव असो, किंवा एखादा पतंग गच्चीवर न येता खाली कंपाऊंडमध्ये पडण्याची चिन्ह दिसताच पाचव्या माळ्याच्या गच्चीपासून थेट तळमजल्याकडे चार-चार जिन्यांच्या उड्यांनी घेतलेली बेफाम धाव असो, संक्रांत म्हणजे माझ्यासाठी नेहमीच मेहनतीचं आणि वेडाचं प्रतीक राहिल.
आम्ही तीन समवयस्क मुलं होतो. आमच्या इमारतीत आमच्यापेक्षा ५ ते ८ वर्षं मोठा असा एक मुलांचा गट होता किंवा आमच्याहून ६-१० वर्षं लहान असा एक गट, त्यामुळे आम्ही अल्पसंख्यक गट होतो. पण तरीही आम्हाला कसल्याही सवलती नव्हत्या. वयामुळे आमच्या नशीबी फक्त मोठ्या मुलांची फिरकी धरणं आलं होतं (ह्यामध्ये माझा थोरला भाऊही होता). पुन्हा त्यांना पाहून पतंग उडवणं ही काहीतरी अप्राप्य कला असावी असा आमच्या निरागस बालमनांचा समज झाला होता. त्यामुळे आम्ही आपले कौतुकानं त्यांना पतंग उडवताना, 'कायपो छे' म्हणून ओरडताना किंवा 'ए लप्पेट' म्हणून ओरडताना पाहायचो आणि आपल्या हातात फिरकीऐवजी कधीतरी मोठं झाल्यावर मांजा येईल ह्या आशेत दिवस कंठायचो. कधीतरी आकाश निरभ्र आणि निर्धोक निर्पतंग असेल तर आम्ही ज्याची फिरकी धरलीय तो उदार, दयाळू आण कनवाळू वगैरे होऊन बागडोर आमच्या हातात सोपवायचा. पतंग दिसणारही नाही एव्हढ्या उंचीवर असायचा. आम्ही आपले आपल्याला पतंग उडवता येतो ह्या थाटात विविध हातवारे करायचो. पुन्हा जवळपास धोका दिसला की आमच्या समर्थ हातांतून मांजा हिसकावला जायचा आणि पुन्हा फिरकी हाती यायची. मांजाचे दोन प्रकार, एक 'ढील' द्यायचा मांजा आणि दुसरा 'घसटी' मांजा. ढीलवाला मांजा जाड असतो म्हणून बोट कापतं आणि घसटी मांजा बारीक असतो म्हणून हे ऐकून आम्ही पतंग उडवणं ह्या कलेपासून फारकत घेतली होती.
पण कधीतरी पाचवी सहावीत आमच्यातल्या एकाला भन्नाट कल्पना सुचली की आपण पतंग उडवू शकत नाही, तर किमान पकडू तरी शकतो. आपल्याला कुणी पतंग उडवू देत नाहीत आणि उडवायला शिकवतही नाहीत, तर आपण पतंग पकडू आणि जमा करून ठेवू. झालं, त्या वर्षीपासून आमच्या पतंगतपश्चर्येला सुरूवात जाहली. वर वर्णन केल्याप्रमाणे दोन ते अडीच महिने 'एकच ध्यास, एकच भास हा पतंग आमचा आहे आणि आगच्चीतळमजला सार्‍या भागावर आमचं राज्य आहे.' कुणाचा विश्वास बसणार नाही. एकाच सीझनमध्ये आम्ही तीन मस्केटियर्सनी तब्बल दोनशेच्या जवळपास पतंग पकडले होते. पुन्हा आमच्यात अनहेल्दी कॉम्पिटिशन असायची. अनहेल्दी अशासाठी की कधीकधी पतंग कुणाचा यावरून जबरा वाद व्हायचे. कारण बरेचदा मांजा एकाच वेळी दोघांनी आणि कधीकधी तर तिघांनी पकडलेला असायचा. मग ह्या खटल्याचा निकाल ठरलेला असायचा. विवादित पतंगाचं त्रिभाजन व्हायचं (हे सोल्यूशन आम्ही अलाहाबाद उच्चन्यायालयाच्या आधी शोधलं होतं)!
धरपकडीचं धोरण लागू झाल्यानंतरच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या सीझनमध्ये मी एकट्याने शंभर धरले होते. हा माझा वैयक्तिक रेकॉर्ड आहे आणि बहुतेक तो अजून अबाधित असावा (कदाचित दुसर्‍या दोघांपैकी कुणीतरी बरोबरी साधली असेल, पण मोडला नक्कीच नाहीये). तर असं आमचं धरपकडीचं धोरण गोमटी फळं आणत होतं. घरच्या माळ्यावर पतंगांची चळत बनली होती आणि मी हट्टानं ते माझ्या भावाला मिळू नयेत अशी तजवीज केली होती. तोवर भाऊही कॉलेजात डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला पोचला होता बहुधा. सीए चालू होतं, त्यामुळे त्याचा संक्रांतीचा उत्साह कमी झाला होता. मग अशातच एक दिवस मी आणि माझ्या एका मित्रानं क्रांती घडवण्याचं निश्चित केलं. माळ्यावरचे पतंग खाली आले. अर्ध्याहून अधिक फाटले होते. जेव्हढे धड होते तेव्हढे गच्चीत नेण्यात आले आणि थोड्या प्रयत्नांनंतर इतके दिवस अप्राप्य वाटणारी कला आम्हाला सहज वश झाली. आयुष्यातला एक बोळा निघाला, पाणी वाहतं झालं (हे सखाराम गटणेतलं वाक्य ढापलं, इथे फारसं शोभत नाही पण टाकावंसं वाटलं म्हणून टाकलं). त्यानंतर माझं पतंग पकडण्यावरच प्रेम कमी होऊन उडवण्यावर बसलं. पण मी मूलतः कंजुष ह्या प्रकारात मोडणारा असल्याकारणे महाग मांजा आणणं माझ्या जीवावर यायचं. मग मी कल्पना लढवली आणि पकडलेल्याच पतंगांचे मांजे जोडून चक्क फिरकीभर मांजा गोळा केला आणि ह्याच गाठी गाठीच्या मांजाने मी पतंग उडवू लागलो. त्यामुळेच माझे पतंग कल्पनेतच दुसर्‍यांचे कापायचे, प्रत्यक्षात स्वतःच हुतात्मे व्हायचे. ह्यामुळे लवकरच माझा साठा संपला आणि मला नव्या बायकोचे लाड पुरवण्यासाठी पहिल्या बायकोचा अर्थात पतंग पकडण्याच्या कलेचा वापर करावा लागला. आणि तिनेही पतिव्रतेप्रमाणे माझी पुढचे दोन ते तीन सीझन पूर्ण साथ दिली. संक्रांत संपली की बोटांवरच्या कापलं गेल्याच्या खुणा शौर्याच्या खुणा वाटायच्या. आजूबाजूच्या गुजरात्यांच्या इमारतींवर लावलेले डेक, हवेत विहरणार्‍या अनेकांतला एक आपला पतंग, उन्हं, डोक्यावरची टोपी, कानापाशी लागलेली घामाची धार आणि एकेकाळी अनहेल्दी कॉम्पिटिशन करणारे आता एकमेकांना पतंग पकडून देणारे आम्ही थोडे मोठे झालेले मित्र, ते सगळं भारावलेलं वातावरण अजूनही माझ्या डोक्यात ताजं आहे.
त्यानंतर वडलांनी क्वार्टर सोडली (कंपनीने दिलेली जागा). आणि आम्ही नव्या इमारतीत आलो. एक वर्ष मी पुन्हा जुन्याच ठिकाणी संक्रांतीसाठी आलो. पण त्याच्या पुढच्या वर्षी माझ्या साथीदारांनीही इमारत सोडल्यावर माझा पतंग ह्या प्रकरणाशी जवळपास काडीमोडच झाला. वर्षभरातच जागा पुन्हा बदलून जिथे आलो तिथे पतंग उडवणारा मी एकटाच. उत्साहाचा पतंग एका वर्षातच खाली आला. तेव्हापासूनच संक्रांत म्हणजे फक्त गुळपोळ्या आणि तीळगूळांपर्यंतच मर्यादित झाली. आता प्रत्येक संक्रांतीला जुन्या दिवसांच्या, त्या पाच-सहा झपाटलेल्या वर्षांच्या आठवणी काढत उसासे टाकण्याखेरीज काहीच करता येत नाही.
मग पुढे निघाल्यावर आपल्याला भेटते होळी. होळी म्हणजे फुल टीपी (टीपी- टाईमपास) प्रकार असतो. होळीचे दोन दिवस असतात. एक म्हणजे पेटवायची (आणि बोंबा ठोकायची) होळी आणि दुसरी म्हणजे खेळायची होळी!
पेटवायची होळी हा माझा खास जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे मला आग लावायला आवडतं आणि दुसरं म्हणजे मला बोंबा मारायला आवडतं. असो. विनोदाचा भाग सोडला, तर होळीविषयी इतकं वाटण्याचं कारण म्हणजे आम्ही तीन मित्रांनी आमच्या इमारतीमध्ये होळीची सुरूवात केली होती. अवघी १२ वर्षांची आम्ही मुलं होतो. आमच्याकडे कोण लक्ष देणार. पण आम्ही कंपाऊंडमध्येच पडलेल्या काटक्या गोळा केल्या आणि माळ्याच्या खोलीसमोर छोट्याशा जागेत होळी पेटवली. होळी कसली, छोटीशी शेकोटी होती. पण आमच्यासाठी ती अचिव्हमेंट होती. दोन तीन काकूंनी खाली येऊन होलिकेची पूजाही केली आणि आम्हाला ऍप्रूव्हल मिळालं. त्यातल्या एका काकूंनी एका फुलपात्रातनं अर्घ्यासारखं काहीतरी ओतलं आणि आमची होळी चक्क विझली! आम्ही एकमेकांकडे केविलवाणे दृष्टिक्षेप टाकले. होळी विझली होती, पण निखारे अजून तप्त होते.
पुढल्या वर्षी आम्ही होळी पेटायच्या महिनाभर आधीपासून पेटलो होतो. बर्‍याच काकांना आमची दखल घ्यायला आम्ही भाग पाडलं होतं. मोठी जागा मिळाली. आणि ह्यावेळेस चक्क होळीच्या दिवशी सगळी मोठी माणसंही आली होती. आम्ही महिनाभर बरीच लाकडं काकालोकांच्या मदतीनं जमवली होती. त्यामुळे मस्त होळी जमली. अगदी आजूबाजूच्या इमारतींतूनही माणसं आली. त्यानंतरही मी दोन-तीन वर्षे तिथं जात राहिलो. नंतर जाणं झालं नाही होळीत, पण होळी अजून सुरू असल्याच ऐकिवात होतं. ते काहीही असलं, तरी झटक्यात विझलेली पहिली होळी आणि दुसर्‍या वर्षीच्या पहिल्या यशस्वी होळीनंतर आम्ही तिघांनी एकमेकांना मारलेली मिठी अजून आठवते.
मी जेव्हा एकदम लहान होतो (पर्यायाने निरागस) तेव्हा मी होळीच्या रंगांना प्रचंड म्हणजे प्रचंड म्हणजे प्रचंड घाबरायचो (तसा मी फटाक्यांच्या आवाजांनाही घाबरायचो, पण ते पुढे विस्ताराने येईल). का माहित नाही. पण मी रंगपंचमीला घरीच लपून बसायचो. त्यावेळेस महिनाभर आधीपासून फेकून मारायच्या पिशव्या मिळत नव्हत्या. इज्जतशीर मेहनत करून फुगे फुगवावे लागायचे! त्यामुळे टेन्शन फक्त एका दिवसाचं असायचं. पण असंच कुठल्यातरी वर्षी, बहुतेक चौथी-पाचवीत असेन, मी गच्चीमध्ये रंगपंचमी खेळायला गेलेल्या माझ्या भावाला आणि बाबांना बोलवायला गेलेलो. दुपार झालेली, बहुधा लोकं शांत झालेले असतात. मी दबकत दबकतच वर चाललेलो. तेव्हा एक मुलगा रंग खेळून खाली उतरत होता.मी त्याला चेहर्‍यावर रंग लावलेल्या अवस्थेत एकदम खिदळताना आणि एन्जॉय करताना पाहिलं. मला तो प्रसंग अजूनही स्वच्छ आठवतो, खरंच! माझं एका क्षणात मतपरिवर्तन झालं होतं. मी मनाचा हिय्या करून  पुढे झालो आणि त्याला म्हटलं, मला लाव रंग! तो पण एकदम चाट पडला. त्यानं थोडासा लावला माझ्या गालांना. मग मी पण त्याच्याचकडून रंग घेऊन त्याला लावला. मला जाणवलं आपल्याला गंमत वाटली (हे अति मेलोड्रामाटिक होत चाललंय). खरंच असं झालं होतं. मी वर गेलो आणि बाबा पण मला बघून चाट पडले. मी दोघा तिघांना माझ्या पाठीवर फुगे फोडायला लावले.माझ्या मते हा मानसशास्त्रावरचा उत्तम धडा होता (लाल करणेस सुरूवात). मी स्वतःच्या फोबियावर स्वतःच यशस्वीरित्या मात केली होती (इति लाल करणे).
त्यावेळी आमच्या इमारतीत एक प्रथा होती, की रंग खेळून झाले की सगळी कुटुंबं जवळच्याच समुद्रावर गाड्या काढून जायचे आणि तिथे आंघोळ वगैरे करून मग तिथला 'बर्फाचा गोळा' खायचे. हा कार्यक्रम उरकूनच मग सगळी कुटुंब परत यायची मग जेवणं बिवणं. मी नेहमीप्रमाणेच घाबरट. समुद्राला प्रचंड घाबरायचो. सुरूवातीला तर पाण्याला स्पर्शही नाही करायचो, पण नंतर नंतर कंबरभर पाण्यापर्यंत मजल गेली. पण हा एक फोबिया आजवरही मात न करता आलेला आहे. पण असो. तिथला गोळा खाणे हा देखील एक सोहळा होता. त्यानंतर घरी येऊन पुरणपोळी!
आम्ही ती इमारत सोडण्याच्या काही वर्षे आधी पाणी भरायच्या पिशव्यांचं पेव फुटलं होतं. अतिशय सोपं काम. नाहीतर ते फुगे आणा आणि बोटं लाल होईस्तो नळाच्या तोटीला लावण्यासाठी त्यांची तोंडं ताणा, ते करताना अर्धे हातातच फाटायचे. मग सगळ्यांत वाईट प्रकार गाठी मारणे. त्या स्टेजला अजून २५% दम तोडायचे. १०० फुग्यांच्या पुड्यात ४० तयार झाले तरी नशीब. त्यामुळे फुगे फोडण्याची एक किंमत वाटायची. पण ह्या पिशव्यांनी त्या मेहनतीलाच चाट दिली. किंमत राहिली नाही. कुणीही सोम्यागोम्या फुगे आय मीन पिशव्या फोडू लागला. मग इमारतीच्या गच्चीतून किंवा घराच्या गॅलर्‍यांतून रस्त्यावरच्या लोकांवर पिशव्या फोडण्याचं लोण पसरू लागलं. फुग्यांच्या जमान्यात हे नव्हतं असं नाही, पण त्या धंद्यासाठी मेहनत आणि भांडवल दोन्ही जास्त लागायचं, त्यामुळे कमी होतं. पण ह्या पिशव्यांनी गैरप्रवृत्ती फोफावल्या. रंगपंचमीच्या आधीच १० दिवस टेन्शनमध्ये जाऊ लागले. सुरूवातीला मलाही मजा वाटलेली. गच्चीत उभं राहून आम्ही मित्रांनीही दोन तीन पिशव्या एस.व्ही.रोडवर भिरकावल्या. पण मग एक दिवस, आमच्या शाळेत बातमी झाली. आमच्या एका सिनियर मुलीच्या डोळ्यावर फुगा किंवा पिशवी लागल्याने डोळ्याला दुखापत झाली म्हणून. ही बातमी ऐकली आणि गच्चीतून फुगे फेकण्याची विकृती जी आमच्यांत मूळ धरत होती, ती तिथेच उपटून फेकली. अजूनही रंगपंचमीत अशा बातम्या ऐकल्या की वाईट वाटतं. अजून कुणाकुणाला असं जवळच्या लोकांना त्रास झाल्यावरच अकला येणार कुणास ठाऊक! असो.

(क्रमशः)

भाग २

टीप - हा माझा जालरंग प्रकाशनच्या इ-दिवाळी अंकातील पूर्वप्रकाशित लेख आहे. पूर्ण लेख फार लांब असल्याने एकाहून अधिक भागांमध्ये देत आहे.

11/21/2010

परतावा

"ठरलं तर मग!" शेठजी खुर्चीतून उठत म्हणाले. त्याबरोबर सगळं विश्वस्त मंडळ उठून उभं राहिलं. मग शेठजींनी नमस्कार केला आणि ते खोलीतून बाहेर पडले. बाहेर त्यांचा स्वीय सहाय्यक होताच, त्यानं लगेच गाडी बोलावली आणि काही क्षणांमध्ये शेठजी आपल्या गाडीत बसून पुन्हा शहराकडे प्रयाण करते झाले.

शेठजींची ह्या देवस्थानावर फार श्रद्धा होती. लाखो भक्तांप्रमाणेच शेठजींसाठीदेखील हे देवस्थान नेहमीच जागृत ठरलं होतं. छोटासा कापडाचा व्यापारी ते आजचा कपडेसम्राट हा त्यांच्या प्रवास केवळ देवाच्या त्यांच्या कृपेमुळेच घडल्याचं शेठजींचं ठाम मत होतं. त्यामुळे शेठजींनी पदरचे कित्येक लाख खर्च करून मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. पण शेठजींसारखेच देवस्थानाचे अनेकानेक श्रीमंत भक्त होते. आणि सामान्य भक्तही देत असलेली रक्कम ह्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये हे देवस्थान देशातल्या सर्वांत श्रीमंत देवस्थानांपैकी एक म्हणून गणलं जाऊ लागलं होतं. मंदिर चकाचक होतंच आणि व्हीआयपी दर्शनार्थींची चोख व्यवस्था हे देवस्थानाचं वैशिष्ट्य होतं. हां, आता एव्हढी सगळी व्यवस्था करताना कधी कधी सामान्य भक्तांची गैरसोय होत असे, पण त्याला काही इलाज नव्हता. देवळामुळे अनेक फुलवाले आणि प्रसाद बनवणार्‍यांबरोबर लोकांना गंडे घालणार्‍या बडव्यांच्याही रोजगाराची सोय झाली होती, पण शेवटी प्रत्येक ठिकाणी चांगल्याबरोबर वाईट असतंच. आता देवस्थान श्रीमंत झाल्यामुळे देवाची आपल्यावर जास्तीत जास्त कृपा होण्यासाठी श्रीमंत भक्तांनी देवाच्या कृपेची किंमत हळूहळू लाखांच्या घरात नेली होती. त्यामुळे आता चांदीच्या पादुका, सोन्याची छत्री वगैरे गोष्टी देवाला मिळू लागल्या होत्या. आणि देवानं नवस पूर्ण करायचे आणि परताव्याखातर देवाला महागातले दागिने मिळत होते. आणि त्याचबरोबर देवाला त्या त्या वस्तूच्या दुप्पट किंवा तिप्पट किंमतीची अजून कृपा करायची होती. एव्हढी माफक अपेक्षा ठेवून देवालयाला असा दानधर्म करण्याची श्रीमंत भक्तांमध्ये अहमहमिका लागली होती. त्यातच आज शेठजींनी बाजी मारली होती.

शेठजींनी देवाला आजवरची सर्वांत महाग भेटवस्तू, अर्थात २५ किलो वजनाचं संपूर्ण सोन्यानं बनलेलं आणि विविध माणकांनी मढवलेलं सिंहासन देण्याचं ठरवलं होतं आणि त्याबाबतच विश्वस्त मंडळाशी चर्चा करून मोठ्या प्रसन्न आणि समाधानी मनानं ते परत निघाले होते. त्यातच त्यांच्या कॉलेजात जाणार्‍या कन्येचा फोन आला होता आणि तिनं बारावीची परीक्षा उत्तम गुणांनी पास केल्याची बातमी दिली होती. त्यामुळे अजून एक नवस पूर्ण झाल्याच्या आनंदातच त्यांचा प्रवास सुरू होता. परतीचा रस्ता गावांमधून जाऊन मग महामार्गाला मिळत होता. ह्या रस्त्याच्या दुतर्फा, थोड्या थोड्या अंतरावर छोटी छोटी गावं वसलेली होती. उन्हं उतरली होती आणि हळूहळू अंधार पडू लागला होता. गावांमधली दिवेलागण सुरू झाली होती. पण अचानकच थोड्या वेळानं आजूबाजूच्या गावांच्या पट्ट्यातले दिवे गेले. रस्त्यावर येणार्‍या जाणार्‍या गाड्यांच्या उजेडाशिवाय दुसरा उजेड नव्हता आणि त्यातच थोड्या अंतरावर असणार्‍या गावांमधले दिवेही दिसेनासे झाले. मधेच एखादा कंदिल दिसत होता आणि थोड्याशा चांदण्याचाच काय तो आधार उरला होता. आणि अशातच वळणावर समोरून एक मोठं वाहन आलं आणि त्या चालकाचं नियंत्रण सुटलं. शेठजींच्या गाडीला जबर धडक बसली आणि गाडी उलटीपालटी होऊन रस्त्यावरच मागे फेकली गेली. शेठजी बसले होते तो दरवाजा मोडला आणि शेठजी रस्त्यावर पडले. ड्रायव्हर आणि गाडी त्यांच्यापासून शंभर मीटरावर आणि ट्रक रस्त्यावरून बाहेर जाऊन उलटला.

अचानक बसलेल्या धक्क्यानं शेठजींना काही क्षण उमजेनासं झालं होतं. अर्धवट शुद्धीत की अर्धवट बेशुद्धीत ह्याचंही भान त्यांना नव्हतं. अशातच एकदम एक दिवा जवळ येत असल्याची भयावह जाणीव त्यांना झाली. त्यांनी त्या दिव्याकडे पाहिलं. एक गाडी वेगानं त्यांच्या दिशेनं येत होती. शेठजींनी हात-पाय हलवायचा क्षीण प्रयत्न केला, पण वेदनेमुळे किंवा निव्वळ भयामुळे त्यांचे हात-पाय थिजून गेले होते. त्यांनी डोळे मिटून घेतले आणि देवाचा धावा करायला सुरूवात केली. गाडी जवळजवळ येत असल्याची जाणीव तीव्र होत होती आणि एकदम कुणीतरी त्यांच्या हात धरल्याचं आणि जोरात ओढल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्या जोराबरोबर ते रस्त्यावरून बाजूला ओढले गेले आणि गाडीपासून वाचले. त्यांनी डोळे उघडून पाहिलं तर एक धूसर आकृती त्यांना दिसत होती. त्या आकृतीचा हात त्यांच्या मानेकडे येत असल्याचं त्यांना जाणवलं. एकदम शेठजींना जाणवलं की त्यांच्या गळ्यात कित्येक तोळ्याच्या सोन्याचा चेन्स आहेत. पण तो हात त्यांच्या मानेखाली गेला आणि दुसरा हात त्यांच्या गुडघ्याखाली गेला आणि शेठजी हवेत उचलले गेले. आणि त्या आकृतीनं शेठजींना रस्त्यापासून थोडं दूर गवतात नेऊन ठेवलं. शेठजींना मनातल्या मनात स्वतःच्याच विचारांची घृणा वाटली. ती आकृती दूर दूर निघाली. शेठजींना 'जाऊ नको' म्हणून ओरडावंसं वाटत होतं, पण त्यांचा आवाजही फुटत नव्हता. दहा मिनिटांनी ती आकृती परत आली आणि तिनं शेठजींना उचललं आणि एका हातगाडीवर ठेवलं.

----------

शेठजींना हळूहळू शुद्ध आली आणि त्यांनी समोर बघितलं तर एक पस्तिशीचा गावकरी गृहस्थ त्यांच्या शेजारी बसला होता.

"कसं वाटतंय आता?" त्यानं विचारलं.

"अं.." शेठजींना अजूनही पूर्ण अर्थबोध झाला नव्हता. त्यांनी हालचाल करायचा प्रयत्न केला, तर एकदम कळ उठली.

"असू दे. थोडा वेळ अजून आराम करावा लागेल बहुतेक. ही गरम पाण्याची पिशवी घ्या. जेवणासाठी तरी थोडं उठून बसा." असं म्हणत त्या गृहस्थानं त्यांना उठून बसायला मदत केली आणि बायकोला हाक मारत खोलीतून बाहेर पडला.

शेठजी विचारात होते. नकळत त्यांचा हात गळ्याकडे गेला. त्यांचे सगळे दागिने जागच्या जागी होते. एव्हढ्यात तो मनुष्य आत आला.

"मी पोलिसांना अपघाताबद्दल कळवायला आमच्या गावातल्या एकाला पाठवलंय." तो म्हणाला.

"आणि माझी गाडी आणि ड्रायव्हर?" शेठजींनी विचारलं. त्यातच आपण ड्रायव्हरच्या आधी गाडीचा उल्लेख केल्याचं शेठजींना स्वतःलाच आश्चर्य वाटलं.

"गाडी अशीही रस्त्याच्या एका बाजूलाच फेकली गेली होती. पण तुमचा ड्रायव्हर आणि दुसर्‍या गाडीचा चालक दोघेही वाचू शकले नाहीत. मी इतर गावकर्‍यांच्या मदतीनं त्यांची प्रेतं बाजूला करून ठेवली आहेत. पोलिसच ऍम्ब्युलन्स घेऊन येतील."

"इथे हॉस्पिटल नाहीये जवळपास?" शेठजींनी कसंतरी विचारलं.

"इथे काहीच नाहीये शेठजी." तो ओशाळत म्हणाला. एव्हढ्यात त्याची बायको जेवण घेऊन आली. त्यानं तिच्याकडून ताट घेतलं आणि शेठजींना मदत करू लागला. जेवण उरकल्यावर हात धुवायला पाणीही तो घेऊन आला.

शेठजी त्याचं घर निरखत होते. घर यथातथाच होतं आणि जेवणावरूनही तो गृहस्थ सुखवस्तू वाटत नव्हता. 'एव्हढं सगळं कोण करतं परक्यांसाठी? आपल्या गळ्यातल्या सोन्याच्या चेन्सचा इफेक्ट असावा.' शेठजी मनाशीच विचार करत होते. एव्हढ्यात तो परत आला.

"आता तुम्ही आराम करा. तुम्ही बेशुद्ध होतात तेव्हा डॉक्टर येऊन गेले गावातले. ते म्हणाले की तुम्हाला फक्त मुका मार बसलाय. थोड्या आरामानं ठीक होईल."

"इथे फोन आहे का? आणि माझा सेलफोन?" शेठजी खिसे चाचपायचा प्रयत्न करत म्हणाले.

"तुमच्याजवळ फोन होता का? मला तिकडे रस्त्याजवळ दिसला नाही अंधारात." तो मान खाली घालून म्हणाला. "आणि आमच्याकडेच पूर्ण गावात एकच फोन आहे, पोस्ट ऑफिसात. ते बंद झालं असेल आता. उद्या सकाळी करता येईल. तोवर तुम्ही आराम करा."

शेठजी विचारात पडले. 'घरचे सगळे काळजीत असतील. पोलिस इथेपर्यंत आले, तर काहीतरी होऊ शकतं.'

"अरे हो, माझ्याबद्दल सांगितलंच नाही ना मी." तो बोलला. "मी सदाशिव. गावातल्या शाळेत शिक्षक आहे. मी काही कामानिमित्त मुख्य रस्त्याजवळ गेलो होतो, तेव्हा अपघात नजरेस पडला. आता गावात काय, गावाच्या जवळपासही कुठे सोयी नाहीत. त्यात तुम्हाला कितपत इजा झाली असेल ह्याचा अंदाज आला नाही, म्हणून तुम्हाला घरीच घेऊन आलो."

"बरं बरं." शेठजी म्हणाले. "पोलिसांना इथेही बोलवा आले तर."

"बरं शेठजी मी लक्ष ठेवतो. तुम्ही आराम करा." असं म्हणून तो गेला.

----------

सकाळी शेठजींनी डोळे उघडले आणि क्षणभर आपण कुठे आहोत हा प्रश्न त्यांना पडला. मग एकदम काल रात्रीचा विचित्र घटनाक्रम त्यांना आठवला. आणि त्यांनी हालचाल करून पाहिली. वेदना थोड्या कमी झाल्या होत्या. शेजारी ठेवलेल्या तांब्या-भांड्यातून त्यांनी मोठ्या मुष्किलीनं पाणी प्यायलं आणि ते उठून बसले. त्याला हाक मारावी का ह्या विचारातच शेठजी असताना तो आत आला.

"शेठजी, उठलात होय तुम्ही. जास्त वेळ नाही ना झाला?"

शेठजींनी नकारार्थी मान डोलावली. "पोलिस?" त्यांनी विचारलं.

"पोलिस आले होते पहाटे पण तुम्ही गाढ झोपला होता. मग त्यांना म्हटलं ३-४ तासांनी या." तो निरागसपणे म्हणाला. "चहा आणू."

"नको मला आधी फोन करायचाय." शेठजी उठायचा प्रयत्न करत म्हणाले. पण वेदना अजूनही खूप होत्या. तो एकदम पुढे झाला. आणि त्यांना आधार देत त्यानं उठवलं.

"आधी थोडं खाऊन घ्या, कदाचित बरं वाटेल." असं म्हणून तो त्यांना खोलीबाहेर घेऊन आला. आणि त्याचं घर पाहून शेठजींना धक्काच बसला. शेठजी ज्या खोलीत झोपले होते, ती खोली सोडून बाहेर एकच छोटी खोली होती आणि संडास-मोरी होते. छोट्या खोलीत एका कोपर्‍यात चूल होती. बहुतेक तो, त्याची बायको आणि आत्ता दिसणारी ८-९ वर्षांची मुलगी सगळे उर्वरित चिंचोळ्या जागेत कालची रात्र झोपले होते. तो त्यांना मोरीकडे घेऊन गेला आणि बाहेर उभा राहिला.

शेठजी त्यांच्या खोलीत बसून नाश्ता करत होते. तो शेजारीच बसला होता.

"मुलगी कितवीत शिकते?" शेठजींनी काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं.

"चौथीत आहे." तो म्हणाला.

"म्हणजे आता मोठ्या शाळेत जाईल पुढच्या वर्षी! तुम्ही आहातच त्यामुळे बरं आहे." शेठजी सहज म्हणाले.

"कसली मोठी शाळा शेठजी. गावात चौथीच्या पुढची शाळा नाही. एव्हढ्याशा पोरीला रोज दूर कसं पाठवायचं हीच काळजी आहे. आता जिथे शाळा जवळ असेल अशा ठिकाणी कुठेतरी नोकरी शोधायची नाहीतर पोरीला घरी बसवायचं हेच दोन पर्याय आहेत." तो खिन्न होत म्हणाला.

शेठजींच्या डोळ्यांपुढे त्यांची स्वतःची मुलगी आली क्षणभर. कालपासून शेठजींना खूपच विचित्र वाटू लागलं होतं. एव्हढ्यात पोलिस आले. शेठजींनी योग्य ती नावं सांगितली आणि लगेच हालचाली झाल्या. शेठजी मोठा माणूस असल्याचं सदाशिवच्या आधीच लक्षात आलं होतं, पण शेठजी खूपच मोठे माणूस असल्याचं त्याला पोलिसांनी सांगितल्यावर कळलं. चटाचट शेठजींसाठी खास हेलिकॉप्टरची सोय झाली.

हेलिकॉप्टर आल्यावर शेठजींना घ्यायला दोन वॉर्डबॉय आले. शेठजींनी गळ्यातल्या दोन मोठ्या चेन्स काढल्या आणि सदाशिवच्या हातात ठेवल्या. सदाशिव एकदम चमकला आणि त्यानं त्या परत शेठजींच्या हातात दिल्या.

"शेठजी, मी माणुसकी म्हणून केलं सगळं."

शेठजींना धक्का बसला आणि ते थोडे खजील झाले. त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं. वॉर्डबॉयनं आणलेल्या व्हिलचेअरवर बसून शेठजी जेव्हा निघाले, तेव्हा त्यांच्या मनात विचारांचा कल्लोळ उठला होता. वॉर्डबॉय आपापसात बोलत होते.

"अरे तू बातमी ऐकलीस का? दोनच महिन्यांनी देवस्थानामध्ये २५ किलो वजनाचं सोन्याचं बनलेलं आणि माणकांनी मढवलेलं सिंहासन स्थापित होणार आहे. अनाम भक्ताची भेट आहे. मोठा सोहळा असेल. येणार आहेस की नाही तू?"

शेठजी एकदम थांबले. आणि त्यांनी सदाशिवला बोलवायला सांगितलं. सदाशिव प्रश्नार्थक चेहर्‍यानं आला.

"तुला दुसरीकडे कुठेही जायची गरज नाही. आणि तुलाच काय कुणालाच कुठेही जायची गरज नाही." शेठजी बोलले.

सदाशिवला काहीच अर्थबोध होत नव्हता.

"आता गावातच माध्यमिक शाळा निघणार आहे. आणि जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर हॉस्पिटल." शेठजी बोलत होते आणि सदाशिवचा चेहरा उजळत होता. तो शेठजींना वारंवार नमस्कार करत होता.

----------

वॉर्डबॉईजनी शेठजींना व्हिलचेअरसकट हेलिकॉप्टरमध्ये चढवलं. आणि ते त्यांच्या शेजारीच बसले. शेठजी त्यांच्याकडे वळले आणि म्हणाले,

"ती सिंहासन स्थापनेची बातमी खरी नाहीये. फक्त अफवा आहे."

वॉर्डबॉईज एकमेकांकडे आश्चर्यानं पाहू लागले. शेठजींच्या चेहर्‍यावर फक्त एक समाधानी स्मितहास्य होतं.


'स्टार माझा' नं आयोजित केलेल्या 'ब्लॉग माझा' स्पर्धेमध्ये ह्या ब्लॉगला उत्तेजनार्थ बक्षीस जाहीर झालं आहे. हे सगळं केवळ सर्व वाचकांनी वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच शक्य झालं आहे. सर्व वाचकांचे खूप खूप आभार आणि अभिनंदनही कारण बक्षीस मिळण्यात मोठा वाटा तुमचाही आहे!

11/18/2010

आवर रे-२

(स्थळ - कॉलेजचं कॅंटीन.)

बभ्रुवाहन प्रचंड टेन्शनमध्ये जर्नल वाचत होता. टेबलावर जर्नलशेजारीच कटिंगचा ग्लास होता. आणि दृष्टद्युम्न खांद्याला बॅग लटकवलेल्या अवतारात कँटीनच्या प्रवेशद्वारातून अवतीर्ण झाला.

"बब्या!!!" दृष्टद्युम्नाचा आवाज कँटीन फारसं भरलेलं नसल्यानं घुमला, पण एका कोपर्‍यात गलका करणार्‍या टग्या ग्रुपने मात्र वळून पाहिलंच आणि त्या ग्रुपबरोबर बसलेल्या सुंदर मुलीनंही बब्या कोण, हे वळून पाहिल्यानं बब्या जास्तच ओशाळला.

"काय रे डी! आयुष्यात पहिल्यांदाच मला पाहिल्यासारखा काय बोंबलतोस?" बब्या डोळ्यांच्या कोपर्‍यातून, अजून ती आपल्याकडे बघतेय का हे चेक करत म्हणाला.

"च्चच्च.. पहिल्यांदा कसा रे? दुसर्‍यांदा किंवा बर्‍याच गॅपने बघितल्यासारखा म्हण. पहिल्यांदाच पाहिला असता तुला, तर तुझं नाव घेऊन बोंबललो असतो का रे?" डी नेहमीप्रमाणेच भावशून्य चेहर्‍याने म्हणाला आणि बॅग टेबलावर ठेवत बसला. बब्या त्याच्याकडे असूया, संताप, हेवा आणि अन्य अनेक मिश्र भावनांनी पाहत होता.

"काय वाचतोयस?" डी बब्याचं जर्नल ओढत म्हणाला.

"तू आत्ता जी व्हायव्हा देऊन आलायस तेच वाचतोय!" बब्या ते त्याच्या हातून हिसकून घेत म्हणाला.

"ते मलाही ठाऊक आहे, मी नक्की कुठला पार्ट वाचतोयस ते विचारत होतो!" डी कटिंगचा ग्लास उचलून घेऊन निरखून पाहत शांतपणे म्हणाला.

"तुमच्या बॅचची संपली का? आणि आमची ठरलेल्या वेळीच सुरू होणार आहे की उशीर लागणार आहे? फटाफट देतोय सर सह्या की पीडतोय?" बब्या डीच्या विक्षिप्त चाळ्यांकडे दुर्लक्ष करत स्वतःच्या टेन्शनला वाट करून देत होता.

"मला सांग, हा ग्लास अर्धा रिकामा आहे की..." डीला वाक्यही पूर्ण करू न देता बब्या ओरडला, "ही फिलॉसॉफीची वेळ नाहीये डी!" आणि टग्या ग्रुप आणि त्यातल्या सुंदर मुलीसकट सगळ्यांनी बब्याकडे पाहिलं. बब्या ओशाळला.

डीनं एकदा बब्याकडे नेहमीच्याच शांत नजरेनं पाहिलं आणि ग्लास खाली ठेवला. "मी विचारत होतो, की हा चहा तू अर्धा प्यायला आहेस की कटिंगच मागवला होतास! ग्लासच्या ओघळांवरून कटिंग दिसतोय, मला पिता आला असता म्हणून विचारलं."

बब्या अजून ओशाळला. "अबे, मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतोयस का?" बब्यानं थोडं वैतागून विचारलं.

"हं विचार!" डी बॅगेतून ताजं वर्तमानपत्र काढत म्हणाला.

बब्यानं पुन्हा एकदा दुर्लक्ष करत आपले प्रश्न विचारायला सुरूवात केली. "आमच्या बॅचची किती वाजता सुरू होणार?"

"होईल नेहमीच्या वेळीच बहुतेक." डी अगदी वर्तमानपत्रात हरवूनही गेला.

बब्याला डीच्या ह्या रूपाची सवय होतीच, त्यामुळे तो ही रेटत राहिला, "मग काय विचारलं सरांनी?"

"आँग सान सू ची पुढे काय करणार?" डी.

"काय?" बब्या पुन्हा ओरडला. पुन्हा टग्या ग्रुप आणि सुंदर मुलीनं पाहिलं, पण त्यात ह्यावेळेस गल्ल्यावरच्या तंबीनं आणि टेबल पुसणार्‍या छोटूनंही पाहिलं त्यामुळे बब्याचं ओशाळणं चौपट होतं. "तो पेपर बाजूला ठेव ना बे! मी तुला प्रश्न काय विचारतोय, तू उत्तरं काय देतोयस?"

"अरे पण भावा, हाच प्रश्न विचारला मला सरांनी!" डी पेपराची घडी घालून ठेवत म्हणाला.

"काय?" बब्यानं ह्यावेळेस नियंत्रणात आश्चर्य व्यक्त केलं. "सरांनी आँग सान सू ची बद्दल विचारलं?"

"वेल. तुला असं वाटतं का?" डीनं बब्याच्या चेहर्‍यावरचे अवर्णनीय भाव निरखत एक क्षणाचा पॉज घेतला आणि पुढे म्हणाला, "काय आहे ना, आपल्याला सांगितल्या गेलेल्या बर्‍याचशा गोष्टींवर विश्वास ठेवायची सवय असते."

"अरे पण मी कुठे विश्वास ठेवला."

"मी जर ए. राजासारखी काहीतरी थाप विणून सांगितली असती तर तू विश्वास ठेवला असतास?" डी बब्याकडे रोखून पाहत म्हणाला.

"आवरा!"

"काही उत्तर नसलं की आवरा.." डी शांतपणे म्हणाला.

बब्याला नवीन वादाचा वास येऊ लागला. "तू काय रेडबुल मारून आलायस का?" बब्या वातावरणातला ताण हलका करायचा प्रयत्न करत म्हणाला.

"व्यसनं वाईट आणि निर्व्यसनी असणं चांगलं, हे लहानपणापासून ठसवलं जातं ना आपल्या मनावर." डीची मुद्रा विचारमग्न वाटत होती. बब्या थोडा सावध झाला. डी गंभीर असला की ज्वालामुखीसदृश स्थिती असते.

"डी तुझ्यासाठी पण एक चहा मागवू का रे?" बब्या म्हणाला आणि वळला, "छोटू, एक कटिंग रे!"

"बापाचं चहाचं व्यसन चांगलं, पण पोराचं सिगरेटचं व्यसन वाईट. अमुक एक गोष्ट चांगली, तमुक एक गोष्ट वाईट. चांगलं-वाईट नावाचा प्रकार असतो काय नक्की?" डीचा आवाज थोडा चढला होता. आपण काहीही बोललो तरी निखार्‍याला हवा घालणं होईल, हे समजून बब्या शांत बसला.

"सांग ना मला तू, चांगलं आणि वाईट म्हणजे नक्की काय? तुझ्यासाठी मांस खाणं वाईट आहे, ते सातासमुद्रापारच्या माणसासाठी पवित्र आहे, अफू घेतल्यानं पण किक लागते आणि ध्यानधारणा केल्यानं पण जवळपास तोच अनुभव येतो तर मग नक्की चांगलं काय आणि वाईट काय?" डीनं बब्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. बोलणं भाग होतं.

"अरे जे केल्यानं आपल्याला समाधान मिळतं, ते चांगलं आणि जे केल्यानं वाईट वाटतं ते वाईट" बब्या ह्या वाक्यात बर्‍याच कमकुवत जागा असल्याचं जाणून होता.

"पण मला समाधान का मिळतं, कारण मला लहानपणापासून हेच सांगितलं जातं, की हे चांगलं आहे, ध्यानधारणा केल्यानं पुण्य मिळतं, आणि अफू घेणं वाईट आहे, त्यानं पाप लागतं. आपल्या मनावर आपण ज्या समाजात राहतो, त्याचे नियम बिंबवले जातात. आणि तेच नियम आपल्यासाठी चांगल्या-वाईटाचे निर्णय घेत असतात. माणूस कधीच निर्णय घेत नाही, समाज आणि त्याच्यावरचे संस्कार घेतात, थेट किंवा आडून. आपल्या चांगल्या वाईटाच्या व्याख्या कुठला ना कुठला समाज ठरवत असतो." डी आज भलताच सिरियस झाला होता.

बब्याला बोलण्याची उबळ आली (आणि एका शर्टाच्या दुकानावर लिहिलेली पाटी आठवली, "बोलना सरल है, मौन कठीन है"), "अरे पण आपण म्हणतो, की जेव्हा मी माझ्या अंतरात्म्याचं ऐकून निर्णय घेतलाय आणि तो योग्यच आहे."

"हो. जेव्हा आपण असे काही निर्णय घेतो तेव्हा ते योग्य किंवा अयोग्य म्हणून नाही तर कुठल्यातरी आंतरिक ऊर्मीनं किंवा कधीतरी नकळत घडलेल्या कुठल्यातरी संस्कारानं असेल, पण तो योग्य किंवा अयोग्य म्हणून घेत नसतो आपण. बस आपण एक निवड करत असतो. मग स्वतःला बळ देण्यासाठी, त्याला 'योग्य' 'असण्याची' लेबलं लावतो."

"अरे पण तो निर्णय आपल्याला योग्यच वाटत असतो ना."

"एग्झॅक्टली. योग्य 'वाटतो', योग्य 'असतो' नाही. तू कधी ऑब्झर्व्ह केलंयस? आपल्याला सगळं वाटतं. आनंद वाटतो, वाईट वाटतं. ह्या आपल्या जन्मापासून घडत गेलेल्या आंतरिक व्याख्या असतात, प्रोग्रॅमिंग म्हण, ज्यामुळे आपली प्रत्येक सिच्युएशनला रिऍक्ट होण्याची एक पद्धत बनते. थोडक्यात रेफरन्स पॉईंट्स बनतात. संस्कार, आपण राहतो तो समाज ह्या सगळ्यानी घडवलेले रेफरन्स पॉईंट्स. मग आपण प्रत्येक गोष्ट क्लासिफाय करत राहतो. हे चांगलं, हे वाईट, हे सुंदर, हे कुरूप. पण प्रत्यक्षात काही असतं का? काहीच नाही. प्रत्यक्षात ह्या गोष्टी फक्त असतात, त्यांचं वर्गीकरण आपण आपल्या सोयीसाठी करतो. तू एक गोष्ट करतोस, मी एक गोष्ट करतो, पण आपण त्या गोष्टीचं मूल्यमापन करत बसतो. फक्त एक गोष्ट केली, एव्हढं ढोबळ वर्णन आपण करूच शकत नाही."

"अरे पण तुला म्हणायचं काय आहे?"

"मला हे म्हणायचंय, की ह्या जगात हत्ती, मुंग्या, कोल्ह्या, माशा, डास ह्यांच्या अतित्वाला जो अर्थ आहे, तोच अर्थ माणसाच्या जीवनाला आहे." डीनं नेहमीप्रमाणे बॉम्बगोळा टाकला आणि शेजारी थिजून उभा असलेल्या छोटूच्या हातून कटिंगचा ग्लास घेतला.

"अरे पण आपल्याला मेंदू आहे, आपण प्रगत आहोत." बब्याला ठाऊक होतं, ह्याही वाक्याचं पानिपत होणार, पण त्याला आज मजा येत होती. कधी नव्हे तो डी वाहावत चालला होता.

"प्रगत? हा शब्द कुणाचा? आपला! आपल्यासाठी प्रगती. आपण ठरवलं की ही प्रगती. टेलिफोन, तारा, विमानं, रेल्वे, इंटरनेट, कॉम्प्युटर ही प्रगतीची व्याख्या. सगळंच पर्सेप्शन आहे. मानण्यावर. मी मानतो की माझ्याकडे कॉम्प्युटर आला आणि मी हजार मैलांवर कुणाशीतरी बोललो म्हणजे मी प्रगती केली. काय मिळालं प्रगती करून? काय उखडलं मानवानं?"

"अरे प्रगतीतूनच तर माणसं सुखी झाली."

"सुखी झाली? मग सहस्रकांपूर्वी शोधलेल्या ध्यानधारणेकडे कशासाठी वळताहेत प्रगत माणसं?"

"ते काहीजणांचं 'पर्सेप्शन' आहे समाधान आणि शांतता मिळवण्यासाठीचं!" बब्या 'पर्सेप्शन' शब्दावर जोर देत म्हणाला.

"बरं. असो पर्सेप्शन. झाले लोक सुखी तुमच्या 'प्रगती'नं. मग पुढे? काय फरक पडला? तुम्ही जर प्रगती केलीच नसती. म्हणजे तुम्ही अश्मयुगातच असतात, तर काय फरक पडला असता. मनुष्य तेव्हाही सुखीच असेल की!"

"हो पण आम्ही विविध औषधांचा शोध लावला. ज्यामुळे मानवजात कित्येक एपिडेमिक्सपासून वाचली. पेनिसिलिनचा शोध लावला!"

"ओह्ह...आणि पेनिसिलिनचा शोध लावणारा काय आकाशातून पडला? त्याच्या आधी मानवजात टिकली नाही? आणि ही एपिडेमिक्स कुणाच्या कर्मानं वाढली? आणि बाय द वे, लगेच 'आम्ही' आणि 'तुम्ही'? मी काय एलियन आहे का?"

"अरे पण मग तुला म्हणायचं काय आहे?" बब्या थोडा वैतागला.

"मला एव्हढंच म्हणायचंय की आपण आणि इतर सजीव, ह्यांची जगाच्या लेखी किंमत एकच आहे. आपण सगळे जगाच्या चक्राचा एक भाग आहोत. आपल्याला वाटतं की आपण वरचढ वगैरे आहोत. ह्यात तथ्य दिसत नाही. अगदी बेसिक लेव्हलवर विचार कर. त्रयस्थपणे पृथ्वीच्या बाहेरचा तू कुणी जीव आहेस असा विचार कर. मानवाची जागा काय आहे बघ. नीट पाहिलं तर जाणवेल की आपण जास्तीत जास्त जगाच्या चक्राचा वेग थोडा कमी जास्त करू शकतो, ते ही आपल्यासाठी पण ते चक्र थांबवणं किंवा सुरू ठेवणं आपल्या हातात नाही. जग जसं चालायचंय तसंच चालतंय. आपण स्वतःच स्वतःसाठी चौकटी आखून घेतल्या आहेत आणि निष्कारण स्वतःच्या काही समजूती करून घेतल्या आहेत..."

"एक मिनिट, एक मिनिट डी.." बब्या त्याला तोडत म्हणाला, "आता हे खूप आवरा होतंय."

"ओके. टू कट द लॉन्ग स्टोरी शॉर्ट. आपला आनंद आणि आपलं दुःख हे सगळं आपण बनवलेलं असतं. जगात आनंद, दुःख अशी गोष्ट अस्तित्वातच नाही. आपण स्वतःच स्वतःच्या गरजा बनवतो आणि मग पूर्ण नाही होत म्हणून दुःख करतो किंवा पूर्ण झाल्या म्हणून आनंद. आपली मूलभूत गरज फक्त अन्न हीच होती, पण आपल्या अट्टाहासामुळे आपण स्वतःच्या विविध गरजा बनवल्या आणि उत्क्रांती होत होत आपण आपल्या मूलभूत गरजा अगदी इंटरनेटपर्यंत आणल्यात. त्यामुळे डोन्ट क्राय फॉर एनिथिंग. इट्स ऑल युअर पसेप्शन." डी बोलत होता.

"यू नॉ व्हॉट डी." बब्या अनकॅरॅक्टरिस्टिक शांतपणे म्हणाला. "गौतम बुद्ध वर्षानुवर्ष बोधीवृक्षाखाली बसले आणि त्यांना साक्षात्कार झाला की इच्छा हे सर्व दुःखांचं मूळ आहे."

"मग?" डी पुन्हा शांत होता.

"आणि आपल्याला चौथीच्या पुस्तकात हे लिहून दिलं होतं की इच्छा हे सर्व दुःखांचं मूळ आहे."

"ह्म्म" डीला कळत होतं गाडी कुठे निघालीय ते.

"पण एव्हढं मोठं सत्य आपल्याला इतक्या सहज मिळूनही काही फरक पडला का? आपण अजूनही इच्छा करतच राहतो. तस्मात् तू आत्ता मला इतकं ज्ञानामृत फुकटात पाजलंयस तरी मी तुला चहा पाजला हे माझं पर्सेप्शन मी बदलणार नाही. तू बोलत असलेलं सगळं मला पटतं आणि इच्छा हे सर्व दुःखांचं मूळ आहे हे ही पटतं, पण सॉरी, मी ते आचरणात आणू शकत नाही. मला असंच 'सामान्य' माणसासारखं समाजात राहायचंय आणि जमलं तर 'माणसांसाठी' काहीतरी असामान्य करून दाखवायचंय. जगाच्या चक्रात कुठलीही भर न घालता अवतार संपवायचाय."

"बाय द वे. तुझ्या जर्नल चेकिंगची वेळ होत आली असेल. बेस्ट ऑफ लक." डी नेहमीच्या निर्विकार मुद्रेनं म्हणाला.

बब्यानं आश्चर्यानं घड्याळात पाहिलं. "साल्या, माझी एकदा रिव्हिजन झाली असती इतक्या वेळात. दळण दळत होतास ते!"

"कालपासून तू १५ वेळा रिव्हाईज केलं असशील. वाचलेलं मुरायलाही वेळ दिला पाहिजे ना. नेमका तोच तू देत नाहीस आणि परीक्षेत फाफलतोस."

"म्हणून तू हे सगळं..." बब्या अविश्वासानं डीकडे पाहत होता.

"काल रात्री अभ्यास करताना तुझ्या बाबांचं एक पुस्तक टीपॉयवर पडलं होतं. त्यात हे सगळं होतं. कुठलंही वाचन वाया जात नाही म्हणतात, ते सत्य आहे." डी मिश्किल हसत म्हणाला.

बब्या दप्तर आवरून लॅबकडे पळत सुटला.

11/15/2010

'तो'

सकाळी नऊचं लेक्चर संपतंय. पुढचा लेक्चरर येईस्तो दहा मिनिटं जातीलच. 'तो' उठतो आणि म्हणतो, "चल रे चहा पिऊन येऊ." आमच्या सहा जणांच्या ग्रुपमधल्या उर्वरित पाचांपैकी किमान तिघे त्याच्याकडे शून्य नजरेनं बघतात. "तल्लफ आलीय यार. चला ना!" मग कुणीतरी दोघे त्याच्याबरोबर जाऊन चहा पिऊन येतात. हे इंजिनियरिंगची चार वर्षं अक्षयी होत राहतं. त्यातच त्याचं टोपण नाव ठरतं "चहा, कॉफी..." जाऊ दे.

-----

"का रे, असाईनमेंट लिहिली का?" आमच्यापैकी कुणीतरी एक नेहमीप्रमाणेच कुणातरी एकाला विचारत असतो. "'त्या'नं लिहिली असेल ना!" अपेक्षित उत्तर येतं. 'तो' कुठेतरी कोपर्‍यात बसून दुसरी एखादी असाईनमेंट किंवा जर्नल लिहित असतो. "काय रे नेहमी सगळं सगळ्यांच्या आधी लिहून दाखवतो, आमची लागते ना!" म्हणत म्हणत आम्ही त्यानं लिहिलेल्याची झेरॉक्स काढायला घेतो. तो फक्त "मारा, मारा अजून" ह्या अर्थी मान हलवतो.

-----

"काय रे, ह्या पुस्तकातनं काही कळत नाहीये रे!" आमचा नेहमीचा प्रेमसंवाद सुरू असतो. "हे फक्त मार्क मिळवायचं पुस्तक आहे रे, ह्यामधनं कळणार काहीच नाही, पण प्रश्न मात्र सगळे ह्यातनंच येतील बहुतेक!" दुसरा कुणीतरी नुकतंच कुठेतरी सिनीयरकडून ऐकलेलं ज्ञानामृत पाजतो. "अरे त्यापेक्षा ते रेफरन्स बुक वाचा ना. त्यामध्ये सगळे कन्सेप्ट्स एकदम क्लिअर होतील." हे कोण बोलिले बोला म्हणून आम्ही पाहतो तर अपेक्षेप्रमाणेच तो ओशाळून आमच्याकडे पाहत असतो. "च्यायला तू पण ना, पुस्तकांशीच लग्न कर. किती वाचणार? अरे ते स्वर्गातून बोंबलत असतील, आम्हाला सोड, आम्हाला सोड म्हणून." आणि कुणाच्यातरी ह्या जोकवर सगळे मनसोक्त हसतात. तो नेहमीसारखाच "मारा, मारा अजून" ह्या अर्थी मान हलवतो आणि ओशाळवाणं हसतो.

-----

"च्यायला 'हा' बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वाधिक पुस्तकं वाचण्याचा रेकॉर्ड तोडणार आहे." परीक्षा डोक्यावर असताना रिकाम्या वर्गात बसून सिलॅबसकडे नजर टाकताना आणि त्यातली रेफरन्स बुक्सची नावं वाचताना सुचलेला माफक विनोद. "का रे? ह्यातली कुठली कुठली, किती झाली वाचून?" अजून कुणीतरी त्याला टोकतो. तो नेहमीसारखी मान डोलावतो आणि म्हणतो, "चला ना यार, चहाची तल्लफ आलीय."

-----

परीक्षेचा पेपर सुरू आहे. सगळे प्रचंड तणावाखाली आहेत. जनरली आमच्या ग्रुपमधली सगळी पोरं जवळपास फर्स्ट क्लासातली, त्यामुळे पेपर एकसारखेच जातात. त्यात आजच्या पेपराला 'अर्ध्याहून जास्त सिलॅबसबाहेरचं' आहे. कुणीही जास्त लिहू शकत नाहीये. आणि 'हा' दुसरी पुरवणी मागतो. पेपर संपतो, तरी हा लिहितोच आहे. संपल्या संपल्या, त्याच्या वर्गात असणारा आमच्यातला एक पोरगा त्याच्याजवळ जातो आणि म्हणतो, "लागलीय यार." "अरे काय, सिंपल होता!" 'हा'. आम्ही सगळे कॉलेजच्या इमारतीबाहेर ही कथा ऐकून गारद. आणि निकाल लागल्यावर आमच्यामध्ये सर्वांत कमी मार्क 'त्या'लाच. "सगळ्यांत जास्त अभ्यास करून, सगळ्यांत कमी मार्क का मिळतात यार त्याला?" आम्हा सगळ्यांनाच त्याचं दुःख.

-----

पहिल्या सेमिस्टरमध्ये त्याला केटी लागते. तो पेपर रिव्हॅल्युएशनला टाकतो, पण रिव्हॅल्युएशनचा निकाल येण्यापूर्वी केटीची परीक्षा उगवते. हा परीक्षा देतो आणि नंतर कळतं की हा रिव्हॅल्युएशनमध्ये पास झालाय आणि केटीमध्ये सुद्धा. ऑफकोर्स तो रिव्हॅल्युएशनचा निकाल मार्कशीटवर प्रीफर करतो. पण ह्या सगळ्यामध्ये तो अर्ध्याहून जास्त सेमिस्टरभर अर्ध्या डझनाहून जास्त वेळा युनिव्हर्सिटी ऑफिसच्या चकरा मारतो. आम्ही त्याला नेहमी चिडवतो, की "तू युनिव्हर्सिटी एक्स्पर्ट आहेस." जेव्हा कुणी नवा मुलगा युनिव्हर्सिटीत अमुक ऍप्लिकेशन कसं करायचं विचारतो, आम्ही 'त्या'च्याकडे बोट दाखवायचो, "हा तुला बस स्टॉप पासून, कुठला क्लार्क आणि कुठला फॉर्म कुठे मिळेल हे सगळं सांगेल!" आणि हसायचो. तो फक्त नेहमीसारखीच मान हलवायचा.

-----

आम्ही सगळे एकदा कॉलेजकडून घरी निघालो होतो. एका ठिकाणी रस्त्याला फाटा फुटायचा आणि तो वळणदार होता, अगदी जाणवेल इतका वर्तुळाकार फाटा. तर आम्ही सगळे चालत स्टेशनाकडे निघालो होतो. अचानक, एका गाडीतून माणसानं काच खाली करून मला विचारलं, "अमुक ठिकाणी कसं जायचं?" मी काही बोलायच्या आत 'हा भाई' पुढे सरसावून "यहां से सीधा जाओ, सीधा जाओ" असं तोंडानं सीधा म्हणत हात वर्तुळाकृती फिरवून दाखवत होता. आम्ही त्यानंतर घरी पोचेपर्यंत सारखे सीधा सीधा म्हणत गोलाकार हात फिरवून लोटपोट होत होतो. आणि तो नेहमीसारखीच मान डोलवत होता.

-----

२६ जुलैच्या प्रलयंकारी पावसात माझ्याबरोबर तो आणि अजून एकजण होता. आम्ही वडलांच्या एका मित्राकडे रात्र काढून सकाळी चालत अंधेरीपासून मालाडपर्यंत आलो होतो. माझ्या घरी दुपारचं जेवण करून मग पुढे जा, असा आईचा आदेश होता. त्यादिवशी २७ जुलैला 'त्या'चा वाढदिवस होता. आईनं काहीतरी गोड केलं आणि त्याचा वाढदिवस अगदी साधाच साजरा केला. मी त्याला गंमतीनं म्हटलं, "हा तुझा सर्वांत संस्मरणीय वाढदिवस बघ!" त्यानं नेहमीसारखीच फक्त ह्यावेळी आनंदानं मान डोलावली.

-----

मी मोठ्या धामधुमीतून, निवडणुका, गैरसमज अशा वाईट वातावरणात जी.एस. म्हणून निवडून आलो होतो. त्या काळामध्ये मला कुणाचा आधार होता, तर आमच्या पाच जणांचा. पडेल ते काम आणि गरज लागेल तेव्हा साथ ह्या गोष्टी निःस्वार्थीपणे सगळ्यांनी दिल्या त्या वेळी. कॉलेजच्या फेस्टिव्हलच्या वेळेस, "अरे तू इथे जा, अरे तू तिथे जा", करून आमच्या सगळ्यांनी जवाबदार्‍या वाटून घेतल्या होत्या, तेव्हा सगळ्यांत नॉन-ग्लॅमरस आणि कंटाळवाणं काम कुठल्याही तक्रारीशिवाय फक्त मैत्रीखातर करणारा 'तो' होताच.

-----

कॉलेजच्या तिसर्‍या वर्षापासूनच त्यानं एम.बी.ए. करायचं ठरवलं होतं. तो मेहनती होता, पण कदाचित ऍप्टिट्यूडमध्ये आणि पब्लिक स्पीकिंगमध्ये कमी पडायचा. त्यामुळे आम्ही त्याला "तू एम.बी.ए. कशासाठी होतो? तू होऊन काय करणार?" वगैरे पीडायचो. पण त्याच्या मनाने ते घेतलेलं होतं. की त्याला एम.बी.ए. करायचंय. तो परीक्षा देतच होता. त्याला नोकरी लागली. इंजिनियरिंग पूर्ण झाल्यावरही, तो एम.बी.ए. ची एन्ट्रन्स पास करू शकला नव्हता. त्यानं नोकरी सुरू केली आणि त्याच्या ट्रेनिंग बॅचपैकी त्याचं एकट्याचं पोस्टिंग बँगलोरला झालं. तो तरीही एम.बी.ए. साठी प्रयत्न करत होता. फायनली त्यानं मुंबई पोस्टिंग मिळाल्यात जमा होतं. तो मुंबईत आला आणि त्याला एम.बी.ए.ला ऍडमिशन मिळाली. गंमत म्हणजे, त्याच्या कंपनीनंही गुडविलमध्ये त्याचा बॉन्ड माफ केला. तो अतिशय खुष होता. आणि शेवटी एकदाचं त्याचं स्वप्न पूर्ण होतंय म्हणून आम्ही. माझ्याशी त्याचं अधूनमधून फोनवर बोलणं व्हायचं. "गेम झालाय रे!" हा त्याचा तकिया कलाम बनला होता. पण तरी त्याची इच्छाशक्ती शिल्लक होती. आता ह्यावेळेस त्याला भेटेन तेव्हा, "गेम झालाय रे!" ऐकायला मिळणार नाही, ह्याची खात्री होती. आणि अचानक एक दिवस कॉलेज सुरू झाल्याच्या काही दिवसांतच तो हॉस्पिटलाईज झाल्याची बातमी आली.

बँगलोरपासूनच तो डोकेदुखी घेऊन आला होता. दिवसातून दोन-तीन ऍस्पिरिन्स घेण्यापर्यंत स्थिती पोचलेली होती. तो आय.सी.यू. मध्ये होता. मला मुंबईला यायला अजून वीसेक दिवस होते. मग अचानक त्यानं थोडी रिकव्हरी केल्याचं कळलं. मी त्याला फोन केला. "गेम झालाय रे! वाचता पण येत नाही. डोकं दुखत राहतं." पण तरी त्याच्या आवाजात थोडा तजेला जाणवला. मी म्हटलं, "डोन्ट वरी, मी येईन तोवर होशील ठीक. आल्यावर बोलूच अजून. आराम कर." पण.. ते शेवटचंच बोलणं होतं आमचं. 'तो' गेला.

हजारो स्वप्न उराशी बाळगलेला आमचा जिवाभावाचा मित्र गेला. मी त्याला शेवटचा भेटूही शकलो नाही. दोन वर्षांपूर्वी १३ नोव्हेंबरला तो गेल्याचा मेल मी सकाळी ऑफिसला पोचल्या पोचल्या मला मिळाला होता. त्याला जाऊन दोन वर्षं झालीत, ह्यावर अजूनही विश्वास बसत नाही. दरवेळी आम्ही भेटतो, तेव्हा त्याचा उल्लेख होतो, त्याची कमतरता जाणवते. आमच्यातला सर्वांत लो-प्रोफाईल आणि बरेचदा कुणाचीतरी पंचिंग बॅग ठरणारा तो आमच्या सर्वांमधला एकमेव अजातशत्रू होता, ह्यावर कुणाचंही दुमत होणार नाही. त्याची किंमत आम्ही कधी केली नाही असं नाही, पण कुणाच्याही जाण्यानंतर त्याची जी उणीव भासते, त्यावरून त्याचं आपल्या आयुष्यातलं स्थान किती महत्वाचं होतं ह्याची जाणीव होते. आम्ही भेटलो की त्याच्या उल्लेखानंतर आम्ही कधी त्याच्याबद्दल फार बोलत नाही, पण आम्ही सगळेच त्याला फार मिस करत असतो हे दोन क्षण जाणवणार्‍या तणावावरून कळतं. वर लिहिलेले आणि ह्याहूनही कित्येक जास्त प्रसंग जे आमच्या आयुष्यांत आले, त्यांच्या रूपानं तो अजूनही आमच्यामध्येच आहे. कदाचित वरती त्याच्या आवडत्या रेफरन्स बुक लेखकांच्यात बसून तो आमच्याकडे पाहून गालातल्या गालात हसत असेल, आणि नेहमीसारखीच मान डोलावत असेल.

हा लेख लिहिण्याचं मी परवापासून ठरवत होतो. पण लिहू की नको ह्या विवंचनेत होतो. मग पोस्ट करू की नको ह्या विचारात. 'त्या'च्यासाठी नाही, तर माझ्यासाठी कदाचित, पण मी हा लेख पोस्ट करतोय.

11/14/2010

वैचारिक साखळ्या आणि योगायोग

कुठेतरी वाचलं की बहुतेक संजय लीला भन्साळीचा हृतिक रोशन, ऐश्वर्या राय स्टारर 'गुज़ारिश' हा 'द इल्युजनिस्ट' ह्या इंग्रजी चित्रपटावर बेतलेला असण्याची शक्यता आहे. आता ह्यात नवीन काही नाही, पण मी सहजच कास्ट बघितली, तर एडवर्ड नॉर्टन ह्या नटाचं नाव मी त्यात वाचलं. आणि एकदम एक विचित्र विचारांची साखळी तयार झाली.
एडवर्ड नॉर्टन म्हटलं की माझ्या डोळ्यांसमोर लेजेन्डरी 'फाईट क्लब' येतो (हिंदीतही ह्याच नावाने सिनेमा आला होता. सुदैवाने तो कॉपी नव्हता, आणि बराही होता, पण मूळ 'फाईट क्लब'ला त्यात रेफरन्स केलं असतं तर अजून बरं वाटलं असतं. असो.) ब्रॅड पिट नावाच्या स्टाईलिश, हॅन्डसम, पीळदार शरीरयष्टीच्या आणि गुणी अभिनेत्याच्या वावटळीत साधा, हडकुळा आणि निरागस चेहर्‍याचा नॉर्टन घट्ट पाय रोवून उभा राहतो आणि सिनेमाला वेगळ्याच पातळीवर घेऊन जातो. सिनेमाच्या पोस्टरपासून सगळीकडे गाजला तो ब्रॅड पिट, पण प्रत्यक्ष सिनेमा पाहिला तर नॉर्टन कित्येक प्रसंगांमध्ये भारी पडताना दिसतो. त्यावेळेसच नॉर्टनबद्दल थोडीशी माहिती काढायचा प्रयत्न केलेला. नॉर्टन हॉलीवूडचा स्टार असूनही मेट्रोनं प्रवास करतो. साधा राहतो. आणि त्याला आयुष्यात कधीही हे बंद व्हावं असं वाटत नाही. हे नॉर्टनचं साधेपण मला त्याच्याशी कनेक्ट करून गेलं.
त्याच काही दिवसांमध्ये त्याचे इतर सिनेमे शोधताना 'प्रायमल फिअर' ह्या नावावर नजर स्थिरावली. अनेक दिवसांपूर्वी अजय देवगण आणि अक्षय खन्नाचा 'दीवानगी' पाहिल्यानंतर मित्र म्हणाला होता की हा 'प्रायमल फिअर' वरून जसाच्या तसा ढापलेला आहे, ते एकदम आठवलं. मग लगेच जुगाड करून 'प्रायमल फिअर' मिळवला आणि मित्र म्हणालेलं संपूर्ण सत्य असल्याचं उमगलं. पण फरक एव्हढाच होता की 'दीवानगी' 'प्रायमल फिअर'ची पायरेटेड कॉपी आहे. तर 'प्रायमल फिअर' मधला कोवळा एडवर्ड नॉर्टन, त्याची स्प्लिट पर्सनालिटी आणि त्याची आणि रिचर्ड गिअरची जुगलबंदी हे सिनेमाचे हायपॉईंट्स होते. पण सिनेमाचा अजून एक अविभाज्य घटक होता त्याचा अप्रतिम साऊंडट्रॅक. सिनेमात दोन अतिशय सुंदर स्पॅनिश-पोर्तुगीज धाटणीची गाणी तर जितक्या वेळा ऐकावी तितकी थोडी. शेवटची नावं येताना वाजणारं 'कन्साओ दो मार' ची तर मी कित्येक पारायणं केलीत. पण इथे अजून एक गंमत आहे. सुरूवातीलाच उल्लेख केलेल्या 'गुज़ारिश' मध्ये संजय लीला भन्साळीनं अशीच स्पॅनिश-पोर्तुगीज धाटणीची गाणी टाकली आहेत.
एका विचारावरून दुसर्‍या विचारावर जाताना मनाला क्षणभरही पुरतो, पण कधी कधी एक धागा दुसर्‍या धाग्याला जाऊन मिळतो तेव्हा खूप विचित्र वाटतं. 'गुज़ारिश' आणि 'द इल्युजनिस्ट' वरून सुरू झालेला धागा 'प्रायमल फिअर' च्या संगीतावरून पुन्हा 'गुज़ारिश' पर्यंत पोचला आणि मलाच गंमत वाटली.
असं अजून एकदा झालं होतं. तेव्हा तर फारच विचित्र गोष्ट घडली होती. मी 'फास्टर पुसीकॅट, किल! किल!' हा सिनेमा पाहिला होता. हा एक तत्कालीन 'ब' दर्जाचा हॉलीवूड सिनेमा असूनही हिंसाचारी स्त्रियांवर असल्याने नंतर कल्ट सिनेमा बनला आहे. आणि हा सिनेमा पाहिल्या पाहिल्या दुसर्‍या दिवशी मी 'द एग्झॉर्सिस्ट' पाहिला. मग शिरस्त्याप्रमाणे मी विकीपीडिया शोधलं आणि नट-नट्यांची माहिती शोधू लागलो. 'द एग्झॉर्सिस्ट'चा मुख्य नट 'जेसन मिलर' बद्दल वाचताना त्याच्या दुसर्‍या बायकोचं नाव (सुझान बर्नार्ड) ओळखीचं वाटलं. आणि मी त्या नावावर क्लिक केलं, तर लक्षात आलं की 'फास्टर पुसीकॅट, किल! किल!' ह्या सिनेमातला घाबरलेल्या तरूणीचं काम करणारी हीच ती नटी!
(टीप : 'द एग्झॉर्सिस्ट' आणि 'फास्टर पुसीकॅट, किल! किल!' हे दोन्हीही उत्तम सिनेमे आहेत.)