4/25/2016

सुटका -उत्तरार्ध

----
भैरप्पानं सगळं आयुष्य उलटं पालटं करून ठेवलंय माझं. पोटी मुलगा व्हावा म्हणून देवांना नवस सांगून सांगून थकले होते. नवर्‍यानं पहिली झालेली मुलगी नरड्याला नख लावून डोळ्यांदेखत संपवली. आठ दिवस अन्नपाणी घेतलं नव्हतं मी. दुसर्‍या वेळेस मी इतकी घाबरले होते, की गर्भावर परिणाम होतो का काय असं वाटलं होतं. पण झाला मुलगा नशीबानं. भैरप्पा. मी गपचूप जाऊन ऑप्रेशन करून घेतलं होतं गावातल्या सुईणीच्या मदतीनं. परत हे सगळं नको.
मी यल्लम्मा. हो ती देवी असते तेच नाव. नवर्‍यानं अन त्याच्या घरच्यांनी ठेवलेलं. माझ्या घरात सर्वांत जास्त शिकलेली मीच होते. सातवी पास. पण सगळ्यात अनाडी नवरा माझ्याच कपाळी. भैरप्पा झाल्यावर तीन वर्षांत लगेच वैधव्य. सावरलं पुढे सगळं. पण छोट्या गावातल्या विधवेची दुःख तिची तिलाच कळतात. पुन्हा ज्याला सगळं समजतं, त्याला त्रास जास्त. कधी कधी शिकलेच नसते तर बरं झालं असतं असं वाटतं. पण असो.
भैरप्पा तसा निरूपद्रवी पण बापावर गेलेला. ना धड शिकला ना कशात त्याला गती. पण पोटचा गोळा माझ्या. मायेला ह्या सर्व गोष्टींचा अडथळा नसतो. पण जगात चलनी नाणीच चालतात. भैरप्पाचं लग्न फार उशिरानं लागलं. भैरप्पा दारू प्यायचा पण त्याच्या कधी तक्रारी माझ्यापर्यंत आल्या नव्हत्या. पण मला ठाऊक होतं. भैरप्पाची घुसमट होत होती. वय वाढत होतं. मित्रांची लग्न लागत होती. घरात अठरा विश्वे दारिद्र्य. माणसानं मन रमवावं तरी कुठे. त्यामुळे मी तो रात्री कुठल्या गुत्त्यावर जातो. काय करतो ह्याबद्दल कधी चौकशी केली नाही. तो घरी येत होता. मी केलेलं जेवत होता आणि मला त्रास देत नव्हता तोवर ठीक होतं.
पण हळूहळू तो चिडचिडा होऊ लागला. एक दिवस रात्री फार उशीरा आला आणि माझ्यावर पहिल्यांदाच त्यानं हात उगारला. शिवीगाळी करत झोपला. सकाळी उठून एक शब्दही न बोलता बाहेर पडला. त्या रात्रीनंतर त्यानं माझ्याशी बोलणं जवळजवळ टाकलंच. माझ्या नजरेला नजरही देत नसे तो. त्या रात्री तो नक्की काय करून आला ते मला कधीच कळलं नाही. कळून घ्यायचंही नव्हतं. मला फक्त माझ्या पोराची काळजी होती. पण नशीबानं ही लक्ष्मी त्याला मिळाली आणि माझी सुटका झाली.
पण भैरप्पालाही पहिली मुलगीच झाली. खरं सांगायचं तर मला मुलगी किंवा मुलगानं तसा फार फरक पडत नव्हता. पण मुलगी झाली तर तिचं काय होणार, ह्याचीच मला काळजी. माझं जे झालं, त्यानंतर मला अजून एका मुलीचं आयुष्य वाया जाताना पाहायचं नव्हतं. पुन्हा भैरप्पासारखा नाकर्ता बाप काय दिवे लावणार हे मला चांगलंच दिसत होतं.
लक्ष्मीसुद्धा त्रासदायकच होती. क्षुल्लक कारणांवरून भांडणं उकरून काढायची. तिचंही बरोबर होतं. लग्नानंतर हौसमौज नाही मग तगमग होणं साहजिक. पण आपलं लग्न कशा परिस्थितीत झालं ह्याची अक्कल असायलाच हवी ना. मीसुद्धा आयुष्यभर त्रासच भोगला, आता हिला पण मीच समजून कशाला घ्यायचं. मग मी तिला मुलगी झाल्यावरून बोल लावायला सुरूवात केली. काहीतरी कारण हवं ना उलटून त्रास द्यायला. पण ती त्याचंच भांडवल करत बसायची.
ह्या त्रासाला वैतागून भैरप्पा पुन्हा त्याच्या जुन्या मित्रांच्या संगतीला लागला. मला चित्र काही फार छान दिसत नव्हतं. पण खरं सांगायचं तर मी कंटाळले होते. थकून गेले होते सगळं सांभाळत. अशात एका रात्री भैरप्पा पुन्हा उशीरा आला आणि अगदी त्या रात्रीसारखाच. पण ह्या वेळेस तो शांत होता. एका शब्दानं काहीही बोलत नव्हता. डोळे तारवटलेले होते. काहीतरी भयानक पाहिल्यासारखे, किंवा केल्यासारखे. त्यानं त्या रात्रीप्रमाणेच सर्व केलं असतं पण आपल्या घरात लहान मूल आहे ह्या जाणिवेनं तो गप्प पडून राहिला. आणि दुसर्‍या दिवशी पहाटे सगळं आवरून मुंबईला नोकरीसाठी जातो म्हणून निघून गेला.
वर्षातून एकदा चोरासारखा यायचा. दिवस-दोन दिवस लपून छपून राहायचा आणि परत जायचा. एक दिवस त्याच्या बलात्काराच्या आरोपात जेलमध्ये जायची बातमी आली आणि ही सटवी लगेच त्या शिवाचा हात धरून पळून गेली. त्यांचे चाळे काय मला आधीच दिसत नव्हते का? पण मी गप्पच होते. कारण तेव्हढं एकच मी करू शकत होते. आपलंच नाणं खोटं. आपलाच जन्म शाप. त्यात ही पोर माझ्या गळ्यात मारून गेली. काय तर म्हणे तो शिवा पैसे पाठवेल. कसले पाठवणार होता तो. त्यानं कधीच पाठवले नाहीत पैसे.
पण भैरप्पाची पोर होती मोठी गोड. भैरप्पासारखी नव्हती. थोडी आजीवर गेली होती. फुकट प्राथमिक शिक्षणासाठी मी तिला घातलं. भराभरा मोठी होत होती. तेव्हाच अचानक तो रिपोर्टर माझा माग काढत आला. भैरप्पाला सोडवायचंय म्हणाला. भैरप्पानी काही केलं नाहीय म्हणाला. आत्ता? बारा वर्षांनंतर? काही अर्थ आहे का सगळ्याला?
पण शेवटी तो माझ्या पोटचा गोळा. सुटत असेल तर चांगलंच. मी सगळं व्यवस्थित अन छान छान सांगितलं त्या रिपोर्टरला. कशाला त्याच्या व्यसनांबद्दल बोलायचं. त्या सगळ्याचा काय संबंध. काय करणार आहे तो रिपोर्टर कोण जाणे!
----
मी भैरप्पाच्या गावी गेलो. त्याच्या आईशी बोललो. त्याच्या आईकडून सुनेचा पत्ता मिळवला. भैरप्पाच्या पूर्वीच्या बायकोकडे गेलो. पण सगळ्यांत गंमत अशी की भैरप्पांच्या गाववाल्यांवर विश्वास ठेवावा तर भैरप्पाची आई आणि बायको, दोघीही खोटं बोलतायत. भैरप्पा आईशी फारसा चांगला कधीच वागला नाही आणि बायकोशी वाईट कधीच वागला नाही. पण दोघीही उलट बोलत होत्या. भैरप्पाच्या केससाठी ह्या सर्वांचा थेट उपयोग नाही पण टीआरपी चांगला आहे. भैरप्पाच्या आईचा इंटरव्ह्यू परफेक्ट आहे. गाववाल्यांची वाक्य एडिट करून छापावी लागली.
पण भैरप्पाच्या गौडबंगालानं मला चांगलंच घेरलं होतं. मी त्याला जेलमध्ये भेटून आलो. तो शांत वाटला. त्याची नजर विलक्षण होती. लालसर डोळे, रोखून बघणारे. तो गरीब वाटत नव्हता. एक वेगळीच वेदना होती डोळ्यांत. पण त्यानं जे घडलं होतं ते सगळं मान्य केलं होतं. तो धुमसत नव्हता, चिडला नव्हता, अन्यायग्रस्त नव्हता. सुटकेची आशा होती थोडी ती फक्त त्याच्या बोलण्यात.
पुढे काय? हा त्याच्यासाठीचा सगळ्यांत मोठा प्रश्न होता. माणसाला अस्थिरता किंवा अनिश्चितता नको असते. मग ती चांगली का असेना. जेलमध्ये सगळं ठरलेलं होतं. बाहेर जाऊन करणार काय? बायको पळाल्याचं त्याला ठाऊक होतं. मुलगी अन आई गेल्या बारा वर्षांत त्याला भेटले नाहीत. त्यांचा ठावठिकाणा काय. कसं कुठे केव्हा. कशाचाच पत्ता नाही. सुटलो तर काय ह्या प्रश्नानं भेदरला होता तो. विचित्र परिस्थिती होती. मला वाटलं होतं सुटकेच्या शक्यतेनं तो खूष होईल पण इथे भलतंच.
मला ते सगळं महत्वाचं नव्हतं. त्याचे खटला संपेपर्यंतचे रोजचे इंटरव्ह्यू, त्याचा दिनक्रम हे सगळं हवं होतं. मला खूप प्रसिद्धी मिळत होती. पैसे मिळत होते. नव्या जॉब ऑफर्स होत्या. मी पण प्रचंड मेहनत करत होतो. त्याच्या गावाकडे व्हिजिट्स, चंद्रीचा इंटरव्ह्यू आणि भैरप्पाचे रोजचे अपडेट्स सगळं एकटाच मॅनेज करत होतो. तो अनुपसुद्धा तीच तीच स्टोरी परत परत सांगत होता. माझ्या करियरचा हायपॉईंट होता.
फ्क्त एकच गोष्ट सलत होती. भैरप्पाचे गाववाले, भैरप्पाच्या ग्रुपबद्दल जास्त बोलत नव्हते. फक्त एकानं सांगितलं की भैरप्पाच्या ग्रुपमधले दोघेजण संशयास्पदरित्या मेले होते आणि बाकीचे एक एक करून परागंदा झाले होते. दुसरा मेला तेव्हाच भैरप्पाही मुंबईला गेला होता. पण ह्या सगळ्याचा भैरप्पाच्या बलात्कार खटल्याशी थेट काहीच संबंध नव्हता. मी पोलिसांशीही बोललो होतो. त्या दोन्ही आत्महत्यांच्याच केसेस होत्या. त्यात खून असेल अशी कुणालाच शंका नव्हती. पण ते नक्की होतं काय, हे मला भैरप्पाही नीट सांगत नव्हता. तो फक्त नीट आठवत नाही एकच टेप लावून बसला होता.
पण असंही आता बाकी विचार करायला वेळ नव्हता. वकील आणि एनजीओ वाल्यांच्या प्रयत्नांनी आणि चंद्रीबाईच्या गुन्ह्यांमुळे बाईच्या कॅरॅक्टरवरच शंका उभी राहिली अन कोर्टानं सबळ पुराव्यांअभावी भैरप्पाला मुक्त केलं. पण भैरप्पा गावी जायला तयार होईना. तो म्हणू लागला की आई अन मुलीलाच इथे बोलावणार एकदा बंदोबस्त झाला की. एनजीओ वाले त्याला सर्वतोपरी मदत करणारच होते. पण मला हे वागणं खटकत होतं. केसतर झोकात निघाली होती पण मला काहीतरी खात होतं.
मी पोलिसांनी केलं ते सर्व परत केलं होतं. हॉटेलच्या तेव्हाच्या मॅनेजरशी बोलून आलो होतो. त्यानं भैरप्पाला पाहिल्याचं मान्य केलं होतं, पण इतके लोक येत जात असतात आणि सगळेच दारूडे, गांजेकस, छोटेमोठे गुन्हेगार असतात, त्यामुळे कोण काय करतोय किंवा किती शुद्धीवर आहे हे कुणी बघत नाही. त्या खोलीत नक्की काय झालं आणि चंद्रीचं डोकं जमिनीवर कुणी आणि का आपटलं हे समजतच नव्हतं.
भैरप्पाचं संशयास्पद वागणं मला कुठेतरी खटकत होतं. किंवा कदाचित डोक्यात एकदा शिरलेल्या कीड्यामुळे असेल. किंवा त्याच्या आई अन बायकोच्या उलट सुलट जबानीमुळे किंवा गावकर्‍यांनी रंगवलेल्या वेगळ्याच चित्रामुळे, किंवा त्याच्या दोन मित्रांच्या गूढ मृत्युंमुळे किंवा मग फक्त हा खटला अपेक्षेपेक्षा चटाचट संपून भैरप्पा मुक्त झाल्यामुळे मला आलेल्या जबाबदारीच्या जाणिवेमुळे. नक्की काय ते कळत नाही. भैरप्पाच्या दोषी असण्यावर जरी शेकडो प्रश्नचिह्नं असली, तरी त्याचं निर्दोष असणं तितकंच सरळही नाही. किंवा कदाचित मग त्या एका तपशीलामुळे मी गोंधळलो असेन.
तसा फार महत्वाचा तपशीलही नाही तो. मी जेव्हा चंद्रीच्या सोबत त्या वेळेस काम करणार्‍या इतर बायकांना शोधत त्यांच्याशी बोलत फिरत होतो, तेव्हा एक दोघींनी भैरप्पाला कदाचित बघितलं असेल असं सांगितलं होतं. म्हणजे, कदाचित तो त्यांचा एक कस्टमर असण्याची शक्यता वर्तवली होती. आणि महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्याजणींसाठी रोजच्या कामातच इतके बलात्कार लिहिलेले असतात की कुणी अमुक एकानं काही केलं असं वेगळं लक्षात ठेवणं कठीण. त्यात मी १२ वर्षांपूर्वीची गोष्ट सांगत होतो.
अर्थात ह्यातनं काही सिद्ध होत नाही, पण भैरप्पानं असंच काही इतरजणींसोबतही केल्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. पण वेश्यांवर बलात्कार हा कन्सेप्ट मुळात त्या स्वतःच मानत नाहीत, तर समाजाचं अन पोलिसांचं सोडूनच द्या. आधीच म्हणालो ना, पोलिसांना फार बाकीची कामं असतात, सुओ मोटो केस सोडवण्याइतका त्यांना कशातच इंटरेस्ट नसतो. त्यांचं निबर होणं, हे ऑक्युपेशनल हॅझार्ड असतं. पण ते असो.
मुद्दा हा की, माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकतच होती. जरी चंद्रीच्या म्हणण्यानुसार तिला अनुप तिथे घेऊन गेला होता, तरी ती अनुपला वाचवण्यासाठी पुढचं खोटं बोलत नव्हती कशावरून? कशावरून अनुप तिचा दलाल नव्हता? कशावरून सगळं अनुपनंच केलं नसेल? सगळीच प्रश्नचिह्नं. 
सगळा वेडेपणा होता का माझा. एकदा त्याला सोडवण्यासाठी चक्रं फिरवू लागलो आणि मग तो सुटल्यावर उलट दिशेनं विचार. जेलमधल्या त्याच्या सोबतच्या लोकांनीही भैरप्पानं दारू प्यायल्यावर अन त्यासोबत गांजा ओढल्यावर काहीच लक्षात राहत नाही अशी कबुली दिल्याचं मला सांगितलं. आणि असं त्या घटने आधीही झाल्याचं त्यानं सांगितलं होतं. पण मी विचारल्यावर आजही भैरप्पा नकार देतो. त्याचे सहकैदी खोटं कशाला बोलतील? आणि मुख्य म्हणजे भैरप्पा खोटं का बोलतोय किंवा त्यांच्याशी खोटं का बोलला? की तुरूंगात इमेज बनवायला काही उलट सुलट क्लेम्स केले गेले. ते ही शक्य असतं.
माझं भैरप्पाच्या दोषी असण्याबद्दलचं ऑब्सेशन वाढतच गेलो. मी भैरप्पाच्या राहत्या जागेवर पाळत ठेवू लागलो. एकदा रात्री तो नसताना त्याच्या खोलीत शिरून छुपा मायक्रोफोन बसवून आलो. पण तो आक्षेपार्ह वागतही नव्हता आणि बोलतही नव्हता. तो फक्त नव्यानं मिळालेल्या कन्स्ट्रक्शनच्या कामावर जात होता. दारूपासून दूर राहत होता आणि रात्री फोनवर आईशी अन मुलीशी जुजबी बोलत होता.
अन एक दिवस त्याचा एक मित्र रात्री त्याच्यासोबत राहायला आला.
त्या रात्री मी जे काही ऐकलं त्यानंतर माझ्या सगळ्या थिअरीज, सगळे प्रश्न आणि सगळी उत्तरं, उलट सुलट झाली आणि नवेच प्रश्न आणि नैतिक संदेह उभे राहिले. मी त्या धक्क्यातून अजून सावरलो नाहीये.
मी त्याच्या खाजगी आयुष्यात नक्की का नाक खुपसलं हे मला समजत नव्हतं. मी कदाचित एका अपराधी माणसाला सोडवलं तर नाही ना हा प्रश्न मला कुणाच्या खाजगी आयुष्यात नाक खुपसायचा अधिकार देतो का? मुळात मी हे सगळं आधीच विचार करून करायला नको होतं का? पण पुन्हा, ह्या प्रश्नांना उत्तरं नाहीत आणि कुठल्या तरी एग्झिस्टेन्शियल कादंबरी किंवा सिनेमामध्ये मुख्य पात्रांच्या विचारशृंखलेमध्ये शोधण्याइतकंच ह्या प्रश्नांचं मूल्य. प्रत्यक्ष आयुष्यातले निर्णय इतके गुंतागुंतीचे नसतात. मी एकतर पूर्ण पुढे जाऊन प्रश्नाचं उत्तर शोधतो, किंवा झालं गेलं विसरून नव्या घटनेमागे धावतो.
----
माझी सुटका झाल्यापासून माझ्यावर पडलेली ही प्रसिद्धी मला नको आहे. मला शांत जगायचं आहे बस. मग ते तुरूंगात असो वा बाहेर. मला बाहेर यायचीही फार इच्छा नव्हती. आई कष्ट करून का होईना मुलीची काळजी घेत होती. मी माझ्या मित्रांकरवी थोडे थोडे पैसे पाठवत होतो. मला खरं सांगायचं तर कुढून कुढून जगण्याचा कंटाळा आला होता. 
दारू प्यायली आणि गांजा घेतला की मी काय करतो हे मलाही कळत नाही. असं गावाकडे बरेचदा झालं होतं. म्हणूनच मी कटाक्षानं ह्या सगळ्यापासून दूर राहत असे. पण त्या रात्री मित्राच्या जबरदस्तीनं मी दारू ढोसल्यावर एक दोन कश घेतले आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं. मी काही माझ्या आयुष्यात खूष होतो अशातला भाग नाही. पण म्हणायची पद्धत म्हणून.
आता तुम्हाला सगळं खरं सांगतो. आयुष्यभर छातीवर घेऊन वावरलो आहे असं एक गुपित. गुपित कसलं. एव्हाना तुम्हाला कळलंच असेल काय ते. मी काय आहे ते, अन माझे 'मित्र' म्हणजे कोण ते. माझं असं असणं मी कधीच मान्य करू शकलो नाही. कधी करणारही नाही कदाचित. पण त्यामुळे किती आयुष्यांची नासाडी झाली ते मला मोजत बसायचं नाही. नैतिक आणि समाजमान्य ह्या प्रश्नांभोवती हेलकावे खाण्यातच मी आयुष्य काढणार ह्याची मला पूर्ण कल्पना होती. पण जगणं कुणाला चुकलंय. गावाकडे जे मी गांजा घेतल्यावर केलं त्यानंतर मला असंच वाटतं. माझ्या मित्रांनीही कधी स्वतःबद्दल ते मान्य केलं नाही आणि त्यांनी आत्महत्या केल्या. मी ते कधी करू शकलो नाही आणि संसारात रमायचा प्रयत्न केला पण ते ही धड जमलं नाही. पण ह्या सगळ्याचा अर्थ हा नाही की मी त्या बाईला काहीच त्रास दिला नसेल. मी तिचा छळ केला ही असेल. तिला मारहाण केलीही असेल. पण मला खरंच काही आठवत नाही.
मी जे आहे ते मान्य करण्यापेक्षा मी बलात्कारी म्हणून जेलमध्ये बरा होतो. आता सुटका झाली, करू काय ते कळत नाही. तो रिपोर्टर अद्वैत सारखा मागावर होता, चित्रविचित्र प्रश्न विचारायचा, कधीतरी रात्री अपरात्री घराबाहेर उभा असायचा. त्याला वाटायचं मला कळत नाही, पण मला कळत होतं. आणि एक दिवस माझा एक मित्र घरी आला रात्री, गावाहून मला भेटायला. त्या रिपोर्टरनं माझ्या घरी मायक्रोफोन ठेवला हे मला माहित नव्हतं. पण त्या मायक्रोफोनमुळे त्याला सगळं कळलं. मला दुसर्‍या दिवशी सकाळी तो भेटायला आल्यावर कळलं. 
तो स्वतः अंतर्बाह्य हलून गेला होता. त्याला विश्वासच बसत नव्हता. मी ही गोंधळलेलोच होतो. माझं सगळं आयुष्यच चव्हाट्यावर येत होतं. तो जरी म्हणाला की कुणाला काही सांगणार नाही, तरी त्याच्या टोकदार प्रश्नांची मी किती वेळा उत्तरं देणार होतो? हे सगळं कुठे थांबणार होतं? माझं मलाही कळत नव्हतं. माझी ह्या सगळ्यातून कशी अन केव्हा सुटका होणार ह्या एकमेव प्रश्नानं मी हैराण झालो होतो.
----
माझ्या वडलांबद्दल मला कधीच फारशी माहिती नव्हती. जेव्हापासून आठवतं, तेव्हापासून आजीच माझं जग होती. आई कुठे गेली, बाबा कुठे गेले हे प्रश्न मी विचारले तरी फारशी उत्तरं कधीच मिळाली नाहीत. पण जशी जशी मोठी होऊ लागले तेव्हा गावातल्या इतरांच्या बोलण्यातून अर्धवट, तुटक माहिती कळत होती. आजीला विचारलं तर आजी ओरडेल ह्या भीतीनं मी कधी फार चौकशी केली नाही, पण वडील जेलमध्ये आहेत आणि आई दुसर्‍या गावी वेगळ्या कुटुंबात राहते, एव्हढंच कळलं होतं.
आणि अचानकच मी आठवीत असताना माझे वडील जेलबाहेर आले अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली. आणि मग ते रिपोर्टर काका घरी आले. त्यांनी माझे वडील लवकरच घरी येतील असं सांगितलं. पण मग वडील कधीच घरी आले नाहीत. काही दिवस ते रात्री फोन करायचे अन बोलायचे. पण मग एक दिवस एकदम ते मेल्याचीच बातमी आली. मला कुणी फार काही बोललं नाही, पण कदाचित त्यांनी आत्महत्या केली असं ते शेजारचे बोलत होते. आत्महत्या म्हणजे नक्की काय ठाऊक नाही पण काहीतरी वाईट असावं. आजी फार बोल लावत होती त्यांना.
त्यानंतर रिपोर्टरकाका परत घरी आले आणि आजीशी काही महत्वाचं बराच वेळ बोलून गेले. मी आता मुंबईला एका मुलींच्या शाळेत होस्टेलला राहते. रिपोर्टर काका भेटायला येतात दर रविवारी. बहुतेक त्यांनीच मला इथे आणलं असावं आजीला सांगून. दोन महिन्यांमध्ये एकदा आजी पण भेटायला येऊन जाते. तसं सगळं छान चालू आहे. पण आजीचं वाईट वाटतं. तिला माझी खूप आठवण येत असेल ना. मलाच इतकी येते तर!
--- समाप्त---

सुटका -पूर्वार्ध

तुम्ही ‘मेकिंग अ मर्डरर’ पाहिलंय? नाही पाहिलं असलंत तरी हरकत नाही. माझी गोष्ट फार नाही, पण थोडीशी त्या वळणाने जाते. स्टीव्हन एव्हरी, अमेरिकेमध्ये एका गावातला एक सामान्य माणूस, ज्याच्या नावावर दोन चार घरफोड्या आहेत, तो बलात्काराच्या आरोपाखाली पकडला जातो आणि अठरा वर्षें जेलमध्ये काढतो. प्रत्यक्षात त्याने गुन्हा केलेलाच नसतो. पण एकदा पूर्वग्रहातून त्याला पकडल्यानंतर आपला निर्णय खरा ठेवण्यासाठी संपूर्ण पोलिस प्रशासन त्याला गुन्हेगार सिद्ध करण्यासाठी जंग जंग पछाडतं आणि शेवटी अठरा वर्षांनी त्याची डीएनए पुराव्यामुळे त्याची सुटका होते.
माझ्या कथेमधला स्टीव्हन एव्हरी आहे भैरप्पा. एक सामान्य कानडी मनुष्य. मुंबईत चरितार्थासाठी आलेला. छोट्याशा टपरीवर काम करायचा. पहाटे उठून चहा आणि बटाटा वड्यांची तयारी सुरू करायची. मग पार दुपारी दीड-दोनपर्यंत चहा, वडा तळून झाले की अर्धा तासाचा ब्रेक. त्यामध्ये तो थोडंसं पोटात ढकलून आडवं पडायचा. मग पुन्हा रात्री दहापर्यंत तेच. हाच दिनक्रम आठवड्याचे सातही दिवस. महिन्यातून एक दिवस रविवारची सुट्टी. तेव्हढंच टपरीवर सगळ्यांनाच आराम. आता शनिवार रात्री अंग मोडून काम केल्यावर हा दुसरं काय करणार? टाकायचा दोन चार देशीचे क्वार्टर आणि पडायचा कुठेतरी रस्त्याच्या कडेला.
त्या विलक्षण दिवशीसुद्धा त्यानं हेच केलं. रात्री ११.३० च्या आसपास भैरप्पा मोकळा झाला. गाडी आवरून टाकली. काम करणारा एक मणिपूरचा पोर्‍या होता तो त्याच्या गाववाल्यांसोबत त्यांच्या अड्ड्यावर निघून गेला. टपरीचा मालक चक्कर टाकून गल्ल्याचा हिशोब करून गेला. मालक कसला, गुंडच तो. सगळी मेहनत भैरप्पाचीच, पण पोलिस सेट करणे, सार्वजनिक जागेवर कब्जा, इत्यादी ‘धंदेवाईक’ गोष्टी तो बघत असल्यानं तो मालक.
भैरप्पानं विडी शिलगावली आणि तो अंधेरी स्टेशनपासून थोड्याच दूर असलेल्या नेहमीच्या ठरलेल्या झोपडपट्टीकडे निघाला. एकमेकांना चिकटून असलेली घरं सराईतप्रमाणे ओलांडत तो ठरलेल्या घराजवळ आला आणि त्यानं दार वाजवलं. त्या छोट्याशा झोपडीचा दरवाजा उघडल्याबरोबर देशीचा उग्र भपकारा आला आणि भैरप्पाचा जीव सुखावला.
दुसर्‍या दिवशी सकाळी भैरप्पा उठला तो थेट रॉयल पॅलेस हॉटेलच्या खोली क्रमांक १०२ मध्ये. विवस्त्र अवस्थेत. तो स्वतः बेडवर होता आणि बेडशेजारी जमिनीवर एक बाई पडलेली होती. भैरप्पा घाबरला. कधीमधी दारू पीत असला, तरी होता पापभीरू. गावाकडे लग्नाची बायको, म्हातारी आई आणि पोटची पोरगी. हे आपण काय करून बसलो, असा विचार करतानाच भैरप्पाचं लक्ष त्या बाईच्या डोक्याकडे असलेल्या रक्ताच्या छोट्याशा धारेकडे गेलं आणि तो हबकलाच. त्याला आदल्या रात्रीचं काही म्हणजे काही आठवत नव्हतं. धडपडत उठत त्यानं कपडे घातले आणि तो जवळ जाऊन ती जिती आहे का मेली ते पाहायला लागला आणि एकदम तिनं हालचाल केली. ती बेशुद्ध असावी असा विचार करून भैरप्पा माणुसकीच्या नात्यानं आजूबाजूला पाणी सापडतं का बघू लागला. तोवर ती बाई – चंद्री – उठून बसली आणि तिनं आवाज केला.
पुढे माणसं गोळा झाली, पोलिस आले आणि भैरप्पा बलात्काराच्या आरोपाखाली आत गेला.
हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय. तर मी अद्वैत. अद्वैत फुरसुंगीकर. रिपोर्टर म्हणवतो स्वतःला. क्राईम बीटला आहे. छोट्यामोठ्या गुन्हेगारांना ब्लॅकमेल करून पैसे कमवायचे हा सगळ्यात मोठा उत्पन्नाचा मार्ग. बाकी मात्र पत्रकार पेशाबद्दल प्रचंड अभिमान वगैरे बाळगतो. कधीतरी प्रेस क्लबमध्ये आपला सत्कार व्हावा अशी इच्छा बाळगून असतो. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस. सर्व काही एकच आपलं. नाही नाही, मी ‘नाईटक्रॉलर’ वगैरे सारखा सायको नाही. सामान्य पत्रकार. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन शिकल्यावर फार हुशार नसलेल्यांनी करायचं काम करू लागलो. लागेबांधे नाहीत, ओळखी नाहीत आणि फार ब्राईट नाही, त्यामुळे क्राईम बीट मिळाली. दुसरा ऑप्शन पेज थ्री होता. तेव्हा फार धडाडीच्या पत्रकारितेचं भूत सवार होतं म्हणून ते सोडून हे करू लागलो. अर्थात पेज थ्री मिळालेला सहकारीही रडतच असतो. जाऊ दे त्याचं रडगाणं तुम्हाला कुठे सांगत बसू, ती वेगळी कथा होईल.
तर मी क्राईम बीट असल्यामुळे पोलिस स्टेशनं हा बातम्या मिळवायचा महत्वाचा अड्डा.
तुम्ही कधी पोलिस स्टेशनला गेला आहात? म्हणजे कुणावर वेळ येऊ नयेच उगाच, पण सहज गंमत म्हणून? बरोबर आहे, गंमत म्हणून पोलिस स्टेशनला कोण जाईल. पासपोर्टवर सह्या घेण्यापुरता मध्यमवर्गाचा आणि पोलिस स्टेशनचा संबंध. तिथे पण पोलिस असा हिसका दाखवतात की खरा गुन्हा घडला असेल तर काय चालत असेल, असाच बहुतांश मध्यमवर्गीयांचा ग्रह असतो. तो बरोबर देखील आहे म्हणा. पण पोलिस असणं म्हणजे काय, हे पाहायचं असेल तर बसा एकदा पोलिस स्टेशनात सकाळपासून संध्याकाळपर्यंत. रात्रीपर्यंत म्हणणार होतो, पण ते जरा जास्त होईल.
एका भाजीवाल्याने दुसर्‍याची गाडी उधळली, किंवा १०० रूपये चोरले, इथपासून ते, मोबाईल हरवला, पाकीट हरवलं, रिक्षाने धडक दिली, छेडछाड, विनयभंग असे काय वाट्टेल ते गुन्हे नोंदवायला लोक येतात. गुन्हा नोंदवणं, म्हणजे फाईल उघडणं. ती बंदही करावी लागते. पाकीट हरवलं, किंवा चोरीला गेलं, ह्याची फाईल उघडणं कितपत मानवेल मला सांगा? पुन्हा भाजीवाल्यांची भांडणं अवलीच. थेट पोलिसात येतात अन रात्री एकाच देशी गुत्त्यावर बसून सहा जण एका १० बाय १० च्या खोलीत झोपतात. विनयभंग किंवा छेडछाडही बरेचदा सूड उगवण्यातून असते. कित्येक लोक फक्त वस्तू हरवल्याचा रिपोर्ट करायला येतात, कारण त्यांना ऑफिसात प्रूफ द्यावं लागतं वस्तू खरंच चोरीला गेलीय म्हणून. ह्या केसेस पोलिसांना आवडतात कारण करायचं काहीच नसतं. आणि हे सगळे तण बरं का, मोठे गुन्हे, खून, दरोडे, बलात्कार हे होतच असतात आणि विविध पार्ट्या (गुन्ह्याशी संबंधित) आपल्या ओळखी वापरून कामकाजासाठी तपासावर दबाव टाकत असतात. पुन्हा पोलिसांनीच येता जाता छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये पैसे घेण्याची संस्कृती निर्माण करून ठेवलीय, मग अशा वेळेस हे नको तसे घेतलेले उपकार अंगाशी येतात. पण महत्वाचं ते सर्व नाही.
मी रात्री अपरात्री जाऊन पोलिस स्टेशनला बसतो आणि हे सर्व पाहत राहतो. एखादा मजेदार गुन्हा नोंदवायचा, अन मग हवालदाराला किंवा गुन्हा नोंदवणार्‍यालाच चार पैसे देऊन डिटेल्स मिळवायचे. एखादी सुटलेली केस घ्यायची अन छापायची. रंगतदार गुन्हा निवडणंसुद्धा कर्मकठीण. मुळात आमचा पेपर फडतूस. त्याच्या मुख्य बातम्या कुणी वाचत नाही, क्राईम बीट कोण वाचेल. पण माझा अंदाज चुकलाच.
मी भैरप्पाची न्यूज गंमत म्हणूनच दिली होती. पण प्रकरणाने चांगलीच हवा पकडली. १२ वर्षांच्या खटल्यानंतर भैरप्पाच्या बलात्काराच्या खटल्यात नवं वळण आलं होतं. मुळात मुंबईसारख्या ठिकाणी जिथे असंख्य बकाल वस्त्या आहेत, तिथे अनेक असे गुन्हे होतात जे मेनस्ट्रीम मीडियामध्ये येत सुद्धा नाहीत. मीडियामध्ये फक्त विकतं तेच दाखवलं जातं. निर्भया प्रकरण झालं नसतं, तर छापल्या गेलेल्यातल्या अर्ध्यासुद्धा बलात्काराच्या बातम्या पेपरांमध्ये आल्या नसत्या. असो. तर मुद्दा तो नाही.
मला एका हवालदारानं चहा पिता पिता भैरप्पाची केस सांगितली. पस्तिशीचा भैरप्पा आत गेला आणि पन्नाशीला आला होता. पोलिसांनी त्याला हॉटेलातनं उचलला होता पण तो तिथे कसा पोचला हे त्याला कधीच सांगता नाही आलं. बाई तिथून पळाली ती थेट दोन दिवसांनी उगवली होती. पोलिसांनी फक्त बघ्यांच्या सांगण्यावरून भैरप्पाला आत टाकलं आणि गरीबाचा जामिन कोण देणार, त्यामुळे तो पुढची चक्र फिरेपर्यंत आतच राहिला. बलात्कार झाल्याचं फॉरेन्सिकमध्ये ७०% मान्य होत होतं, पण दोन दिवस गेल्यामुळे कोण हे स्पष्ट होत नव्हतं. भैरप्पाला स्थितीजन्य पुराव्यांवरून अन बाईच्या जबानीवरून कोंडलं गेलं. पुढच्या केसेस लढायला पैसे नाहीत, अन गावाकडच्यांनी नुसते आरोप ऐकूनच पाठ फिरवलेली. अशा स्थितीत भैरप्पा आतच सडला. केसचा निकाल कधी लागलाच नाही. नुसत्या तारखा पडत राहिल्या. एक दिवस बाई गायब झाली अन मग तर काय. भैरप्पाचा स्वतःचाच सुटकेतला इंटरेस्ट संपला.
अचानकच एक दिवस चंद्री पोलिसांच्या तावडीत सापडली. कुठल्याशा हायवेवर लिफ्ट मागून लुटणार्‍या टोळक्यासोबत. अन संबंधित इन्स्पेक्टरने सिस्टममध्ये सहज शोध घेतल्यावर त्याला ही केस सापडली. त्यानं इथल्या ऑफिसरला कळवलं आणि इन्स्पेक्टरने हवालदाराला.
इथेच कथेमध्ये माझा प्रवेश होतो.
मी म्हटलं ना माझा अंदाज चुकला. आमचा पेपर लोक क्राईम बीटसाठीच वाचतात ह्याचा साक्षात्कार मला झाला, जेव्हा माझ्या पाच ओळींच्या बातमीसाठी मला ५ थोड्या मोठ्या पेपरांच्या क्राईम बीटवाल्यांचे फोन आले. मी सहसा बातमीमध्ये फार ओळखदर्शक माहिती देत नसे, त्यामुळे माझी किंमत थोडी वाढली होती. अर्थात, हे सगळे क्राईम बीट पत्रकार होते, पोलिसांकडून यथासांग माहिती काढण्यास त्यांना फार वेळ लागला नसता. दोन चार नोटा जास्त गेल्या असत्या एव्हढंच. त्यामुळे मी चान्स घेतला आणि माझ्या नावासकट बातमी छापण्याचा आग्रह धरला. मला तेव्हढेच चार दोन चॅनेल्सवर इंटरव्ह्यू द्यायला मिळाले.
पण भैरप्पाचं काय? केस अजून सुरूच होती. मी चंगच बांधला होता आता भैरप्पाला सोडवायचा. एक प्रसिद्धीलोलुप वकीलही फुकटात केस लढवायला तयार झाला. पण तरी केसचा खर्च हा होतोच. कोर्टाच्या फीया, शेकडो कागदपत्रं. कोर्ट ही संकल्पना सामान्य माणसासाठी अजिबातच नाहीये हे प्रत्येक पावलागणिक कळत जातं. अर्थात मला हे सगळं करायला अजिबात वेळ नव्हता. मला फक्त लोकांचा केसमधला इंटरेस्ट टिकवून ठेवायचा होता आणि भैरप्पाला ॲक्सेस मिळवायचा होता. मी एक एनजीओ गाठला. पुरूषांच्या प्रॉब्लेम्ससाठी काम करणारे आणि अर्थात काळ्याचा पांढरा करणारे. मी त्यांना केस पटवून दिली आणि त्यातल्या प्रसिद्धीचा ॲन्गल नीट समजावून दिला. पैशाचा प्रश्न सुटला. मी आता एकमार्गी भैरप्पावर कॉन्सन्ट्रेट करायला मोकळा झालो.
-----
माझं खरं नाव काय हे मला कधीच कळलं नाही. लहानपणापासून ‘चंद्री’ एव्हढंच ऐकत आले. ते चंद्रभागा आहे की चंद्रिका, की अजून काही, ते बहुतेक मला कधीच कळणार नाही. माझा जन्म नेमका कुठे झाला हे ही मला ठाऊक नाही, कारण तो कुठे आणि कसा झाला हे माहित असणारं कुणीच मी मोठी होताना माझ्या जवळ नव्हतं. मी बहुतेक चोरलेलं बाळ होते. कुठून कुठे अन कशी आले, पण शेवटी धंदा करणार्‍यांमध्येच लहानाची मोठी झाले. तेव्हढा एकच धंदा ठाऊक होता. त्यातच पडले.
मला कल्पना आहे की तुम्हाला फक्त त्या रात्री नक्की काय घडलं, त्यातच रस आहे, पण मागचं पुढचं समजल्याशिवाय जे घडलं ते कसं अन का घडलं ते कळायचं नाही तुम्हा लोकांना.
तर मी धंदेवाली. मध्यमवर्गीयांना अस्वस्थ करणारा शब्द आहे हा. पण पब्लिकमध्ये. प्रायव्हेटमध्ये हल्ली अस्वस्थ करणारं काहीच उरलेलं नाहीये. हे मी तत्व का काय ते नाही सांगत, अनुभव आहे, त्याप्रमाणे सांगतेय. असो. तर माझं काम ठरलेलं. संध्याकाळ झाली की एक एरिया. मग जसजशी रात्र होत जाईल, तसतसं मेन रोड्सच्या दिशेनं सरकत जाणं. दिवसभर श्रमाचं काम करून आलेले कष्टकरी हे मेन कष्टमर. अतिशय अवघड जमात. पैसे द्यायची फार किचकिच. त्यामुळे आधीच पैसे घ्यायचे. त्यात ते कष्टकरी, हाणामारी, शक्तीचे प्रयोग, कशाचा भरवसा नाही. पण फार सुंदर नसल्यामुळे हीच एक कॅटेगरी. पण ते सर्व महत्वाचं नाही.
महत्वाचं हे, की त्या रात्रीसुद्धा मी अशीच स्टेशनरोडजवळ फेर्‍या मारत होते. तेव्हा अनुप आला. नाही नाही. अनुप म्हणजे माझा दलाल नव्हे. असल्या स्टोर्‍यांमध्ये नेहमी एक दलालाचं कॅरेक्टर असतं. आमचाही होता, पण तो अनुप नाही. अनुप म्हणजे माझा लव्हर म्हणता येईल.
मितभाषी. भैय्या. दादरला भाजी मार्केटमध्ये हमालीचं काम करतो. यूपी नाहीतर बिहार कुठलातरी आहे. मला आवडायचा तो खूप. सगळ्यांत साधा होता. अर्थात धंदेवालीकडे यायचा म्हणजे तितकाही साधा नव्हता, पण त्रास द्यायचा नाही फार. आणि मुख्य म्हणजे मला ह्यातनं सोडवावं वगैरे त्याला काही वाटायचं नाही. पण त्या रात्री त्याचा काहीतरी वेगळा मूड होता. मला म्हणाला आज खूप पैसे मिळालेत. आज हॉटेलवर जाऊया. मला आश्चर्य वाटलं. एरव्ही त्याच्या झोपडीशिवाय त्याच्याकडे झोपायला जागा नव्हती. घरी पाठवून उरलेले पैसे माझ्यावर उडवायला जीवावर यायचं त्याच्या. पण त्यानं पैसे दिले आणि मला काही फार प्रश्न विचारावेसे वाटले नाहीत.
आम्ही हॉटेल रॉयल पॅलेसवर पोचलो तेव्हा रात्रीचे बारा वाजत आले असावेत. त्यानं रिसेप्शनला बोलणी केली आणि रूम मिळवली. तिथे माझ्यासारख्या इतरही बर्‍याच तरूणी होत्या, त्यामुळे मला फार अवघडल्यासारखं वाटलं नाही. आम्ही रूम नंबर १०२ मध्ये गेलो. गरजेपुरत्या गोष्टी असलेली सामान्य रूम होती. एक विचित्र वास सर्वत्र भरलेला होता. मी इतक्या सार्‍या गलिच्छ ठिकाणी राहिलेली आहे की त्या वासाचं फार वेगळं काही वाटलं नाही. मी तिथल्या बेडवर जाऊन बसले. अनुप म्हणाला पटकन जाऊन विड्या घेऊन येतो आणि मला एकदम झोप आल्यागत झालं. मी तिथेच आडवी झाले.
बस. त्या रात्रीचं तितकंच आठवतं मला. जाग आली तेव्हा समोर भैरप्पा होता आणि माझे कपडे अस्ताव्यस्त. अंग आणि डोकं प्रचंड दुखत होतं. मला अनोळखी माणूस समोर दिसल्यावर जे वाटेल तेच मी केलं. ओरडले. अर्थात दिवसही चढला होता. पोलिसांनी हटकून पकडलं असतं मला बाहेर पडल्यावर. त्यामुळे सोयीचं अन सोपं जे होतं ते केलं. भैरप्पा भीतीदायक वाटत नव्हता, त्याच्याकडून पैसे घेऊनही बाहेर पडता आलं असतं. पण कशाला घोळात जा.
पण मला वाटलं होतं तितकं सरळ सोपं नव्हतं काहीच. माझा दलाल मुश्ताक कसा कुणास ठाऊक पण तिथे पोचला आणि मला घेऊन चटकन गायब झाला. लोक भैरप्पाला मारत होते आणि नंतर पोलिस आले. प्रकरण उगाच वाढलं. मला अजिबात पोलिसांत जायची इच्छा नव्हती. झालं ते झालं. मला काही झालं नव्हतं. पण अनुपलाच आयडिया सुचली. अरे हो. पण अनुपचं काय झालं हे मी तुम्हाला सांगितलंच नाही ना.
अनुपच्या म्हणण्यानुसार अनुप खाली उतरला आणि विडीच्या दुकानापर्यंत गेला तर त्याचा मित्र त्याला भेटला. अनुप हॉटेलवर आलाय ह्याचा सुगावा लागल्यावर त्या मित्रानं ह्याला मारलं आणि पैसे काढून घेऊन पळून गेला. अनुप तसाच विव्हळत बेशुद्ध झाला रस्त्याच्या कडेला. आता, तिथल्या भागात बरेच बेवडे रस्त्याच्या कडेला पडलेले असतात, त्यामुळे कुणालाच संशय येत नाही. अनुपला जाग आली थेट दुसर्‍या दिवशी. पण गर्दी अन पोलिस बघून तो सटकला.
तर त्याची आयडिया अशी होती की पोलिसात गेले तर ह्या धंद्यातून बाहेर पडायचा चान्स आहे. मी मगाशी म्हणाले होते की त्याला ह्या सर्वाचं काही पडलेलं नव्हतं, पण त्याला स्वतःला काही करायचं नव्हतं. पाहुण्याच्या काठीनं साप मेला तर त्याला हवंच होतं. असो. मला तो आवडायचा आणि आयडिया वाईट नव्हती. त्याच्या ओळखीतल्या एका बलात्कारित बाईला एका एनजीओ नं म्हणे मदत केली होती. शिलाई मशीन घेऊन दिलं होतं अन झोपडीचं दोन महिन्यांचं भाडं. ह्याची आयडिया होती की त्यांना गाठायचं आणि पैशांची सोय करायची.
त्याची आयडिया सफलही झाली. मला एक नवंकोरं शिलाई मशीन मिळालं आणि ५ हजार रूपये नगद. अनुपनं शिलाई मशीन विकून मला अडीच हजार मिळवून दिले. आणि आम्ही दोघे सटकलो. केसशी काही घेणं देणं नव्हतंच मला. पण मुंबई सोडणं भाग होतं. आता अनुपचं कामही सुटणार होतं आणि ७-८ हजारात असं किती दिवस आम्ही जगणार होतो. मूर्खपणा केलाच होता, तर तो आता पूर्ण निभावणं भाग होतं.
अनुपचा एक चुलता यूपीत कुठेतरी राहायचा. त्याच्याकडे जाऊन थांबलो काही दिवस. कामाची काही सोय होईना. अनुप काहीतरी फडतूस कामं करून चार पैसे आणत होता. पण असं जास्त दिवस जमणं अवघड होतं. मग त्याच्या चुलतभावाच्या धंद्यात सामील होणं किंवा मग पुन्हा मी पूर्वीचा धंदा सुरू करणं, हे दोनच पर्याय होते. आम्ही त्याच्या चुलतभावाचा धंदा निवडला.
तो टायर दुरूस्तीचं दुकान चालवायचा अन येणार्‍या जाणार्‍या वयस्क लोकांना फसवून हजारोंचा चुना लावणे हे त्याचं मूळ उत्पन्नाचं साधन. मी प्रवाशांचा विश्वास मिळवण्यासाठी उपयुक्त होते. मी आणि अनुप बाईकवरून गाडीला समांतर जायचो आणि अनुप गाडीचालकाला टायरमध्ये हवा कमी आहे असं सांगायचा. लोक सहसा जोडप्यांवर संशय घेत नाहीत. मग एकदा ते टायर दुरूस्तीला गेले की त्यांना लुटणं हे सराईत काम होतं. पोलिसांना हप्ता न देता हे काम जमणारं नव्हतं, पण ते सर्व अनुपचा चुलतभाऊच बघायचा. आम्हाला पर कस्टमर कमिशन होतं. ह्या टायरवाल्यांची मोठी टोळी होती, त्यामुळे आम्हाला एकाच ठिकाणी फार वेळ राहता यायचं नाही, ते सेफसुद्धा नव्हतं.
मग वेगवेगळे हायवे करत करत आम्ही बरीच गावं, शहरं, राज्यं फिरलो. कधी चोर्‍यामार्‍यासुद्धा केल्या. पण मुख्य धंदा फसवणूकच. ह्या धंद्याची किक वेगळीच पण. कायम धोका पत्करणं, यशस्वीपणे लोकांना फसवणं. पण कुठेतरी मन निबर होत जातं. आतली माणुसकी मरत जाते. मग कशाचंच काही वाटत नाही. अनुपनं एकदा एका माणसाला चुकून मारूनच टाकलं. पण मला काहीच वाटलं नाही. आत्ताही फार काही वाटत नाहीये. चूक आहे का बरोबर ते ही कळत नाही. एका धंद्यातून सुटका करून घ्यायला कुठून कुठे आले.
ओव्हरकॉन्फिडन्समध्ये आम्ही परत महाराष्ट्रात आलो. शेवटी एका रिटायर्ड पोलिसवाल्याला टायरवरून गंडवताना अडकलो. त्यानं प्रकरण लावूनच धरलं आणि मी धरले गेले. बारा वर्षं. बारा वर्षांनी मी थांबले. पोलिसांनी कसा कुणास ठाऊक माझा संबंध त्या बलात्कार प्रकरणाशी लावला. मला वाटलं होतं की त्याला सोडून दिलं असेल मी गायब झाले म्हणून.
-----
माझं लग्न झालं तेव्हाच मला ठाऊक होतं की माझं पुढे काय होणार. लग्न झाल्यावर वर्षाभरातच मला मुलगी झाली. आधीच सावळी अन अंगानं जाड असल्यानं माझं लग्न उशीरानं झालं. त्यात माझ्या गावापासून भलतंच दूर. तोडकं कानडी बोलणारी मी मोडकं मराठी बोलणार्‍या कानडी घरात गेले. नवरा चांगला होता. पण त्याच्याकडे पैसे म्हणून नव्हते. महत्वाकांक्षा शून्य. आला दिवस गेला म्हणजे आनंद मानून झोपायचा. लग्नाचं पहिलं वर्ष सगळं गोड लागतं पण मग खर्‍या समस्या समोर येतात. सगळ्या हौसेमौजेला पैसा लागतो आणि मूल सांभाळायचं म्हणजे अजूनच जास्त. त्यात मला झाली मुलगी, भैरवी. सासू टोमणे मारायला लागली आणि माहेरच्यांनी तर केव्हाच मी गेल्याचा सुस्कारा सोडलेला होता. त्यात माझ्या पैशाच्या भुणभुणीला कंटाळून नवरा मुंबईला निघाला त्याच्या गावातल्याच एका तिथे गेलेल्या मित्राकडे. एक मात्र होतं नवर्‍याचा पोरीवर भारी जीव होता. पण करतो काय.
अरेच्चा! मी माझं नाव अजून सांगितलंच नाही का. लक्ष्मी. भैरप्पाची बायको. ह्या गोष्टीत माझी बाजू मी सांगण्याचं तसं काही कारण नाही. पण दूरान्वयानं का होईना, माझा घडलेल्या घटनेच्या आधी आणि नंतर बराच संबंध आला. नंतर आला तो रिपोर्टर अद्वैतमुळे.
भैरप्पा मुंबईला गेला आणि इथे माझी घुसमट सुरू झाली. सासूनं बोलणं जवळपास टाकलं होतं. भैरप्पा पाठवत होता त्या पैशात जेमतेम आमचं चालत होतं. तेव्हा माझ्या गावचा शिवा आमच्या गावात केमिस्टकडे माल पोचवायला आला आणि अचानकच भेटला. शिवा विधुर होता आणि माझ्या शाळेत माझ्या वर्गात शिकलेला. धंदा जोरात होता आणि पैसा खर्चायला कोणी. कुठेतरी आमची मनं जुळत गेली. भैरप्पा असाही नव्हताच. वर्षातून एकदा यायचा. अन एका वर्षी त्याच्या ऐवजी तो जेलमध्ये गेल्याची बातमी आली.
शिवाला मुलगी नको होती. मला जिवावरच आलं होतं. पण मला त्या घुसमटीचा कंटाळा आला होता. शिवानं महिन्याचा खर्च भैरप्पाच्या आईकडे पाठवायचं वचन दिलं आणि मी त्याच्यासोबत निघून गेले. जगण्यासाठीच्या संघर्षाचा कंटाळा आला होता. अपराधी भावना फार वेळ टिकत नाही. काळासोबत सगळंच बोथट होत जातं.
तर मी तशी सुखात होते. नवा संसार होता. मुलगा झाला. सगळं व्यवस्थित होतं. बहुतेक शिवा अजूनही महिन्याचा खर्च पाठवत असावा. तेव्हाच हा रिपोर्टर आला. बारा वर्षांच्या माझ्या सुखी संसारात मिठाचा खडा टाकायला.

मी त्याला काय सांगायचं ठरवलं होतं. भैरप्पा मला मारहाण करायचा. आईला पण मारायचा. पोटच्या पोरीलाही बरं नाही बघायचा. मी फक्त स्वतःची सुटका करून घेतली. माझं काय चुकलं? मला अपेश नको होतं. तो जाऊन सांगेल लोकांना की ह्या कैदाशिणीनं तो जेलात गेल्यावर लगेच संसार टाकून पळ काढला. मी अशीही कुठे सुखी होते. मग खरं सांगितलं काय, खोटं सांगितलं काय.

क्रमशः
उत्तरार्ध

4/09/2016

डिफायन्स (Defiance) - समूह आणि नेत्याच्या जडणघडणीचा आलेख

आपण कित्येकदा स्वतःच्या इच्छेने किंवा इच्छेविरूद्ध एखाद्या समूहाचा भाग बनतो. मुळात सामाजिक प्राणी हे विशेषण मिरवणारा कुठलाही प्राणी तसे करतो, पण माणसाच्या बाबतीत त्या क्रियेमागे भावनिक, मानसिक, आर्थिक, राजकीय किंवा निव्वळ भीती असे अनेक कंगोरे असू शकतात. मानवी समूह हे मानवी इतिहासामधल्या प्रत्येक मोठ्या उलाढालीमागचं एक महत्वाचं कारण आहे. आजही ‘मानवी समूहाचं मानसशास्त्र’ ह्या विषयावर शेकड्यानं ग्रंथ पडूनही त्यामागचं गूढ उकललेलं नाही. एअरपोर्टवर विमानाला उशीर झाल्याने रात्रभर अडकलेले प्रवासी किंवा ट्रॅफिक जॅममध्ये मध्यरात्री हायवेवर अडकलेले लोक, किंवा मुसळधार पावसामुळे भरदिवसा शहराच्या एखाद्या भागात अडकून पडलेले लोक. किती वेगवेगळी कारणं आणि किती वेगवेगळे व्यवहार, वेगवेगळ्या पद्धतीचे मनोव्यापार. पण माणूस हा फार हुशार प्राणी आहे. एखादी गोष्ट पूर्ण आकलन होत नसेल तरीही तो त्याचं ढोबळमानाने एक चित्र बनवतोच. Framework किंवा रचनात्मक मांडणी म्हणूया. शेकडो विविध प्रसंगांच्या अभ्यासातून एक ढोबळ मांडणी समजून घेणं आणि पुन्हा ती तशीच कायम किंवा अधिकतर वेळेस घडते हे सिद्ध करणं. समूहाच्या अभ्यासातून ब्रूस टकमन (Bruce Tuckman) मानसशास्त्रज्ञानं समूह विकासाचे टप्पे मांडले. “Forming – Storming – Norming – Performing” हे ते चार टप्पे. म्हणजेच, पहिल्यांदा समूह बनतो – संघटन, मग त्यामध्ये घर्षण निर्माण होतं, विविध स्वभाव, व्यक्तिमत्त्व आणि विचारांमुळे – घर्षण, मग हळूहळू समूहाचे स्वतःचे नियम आणि मूल्यव्यवस्था तयार होते – नियमन आणि मग तो समूह त्याच्या सर्वोच्च कार्यक्षमतेपर्यंत पोचतो – संचलन.
एव्हढं पुराण लावण्याचं कारण असं की, Defiance नामक एका सिनेमामुळे कॉलेजात शिकलेलं हे सर्व पुन्हा अधोरेखित झालं आणि सिनेमा ह्या माध्यमाची अचाट क्षमता पुन्हा नव्याने माझ्या समोर आली. Defiance हा सिनेमा मुळात नाझी, ज्यू, दुसरं महायुद्ध ह्या अत्यंत संवेदनशील आणि तितक्याच वापरून गुळगुळीत झालेल्या विषयावरचा सिनेमा आहे. ह्या विषयामागची वेदना एव्हढी तीक्ष्ण आहे की पुन्हा पुन्हा त्याच त्याच घटना पाहूनही त्यामागची भयाणता जाणवत राहते, ती बोथट होत नाही. पण तरीही निरनिराळे कंगोरेसुद्धा अनेक सिनेमांनी तपासलेत आणि त्यात यशस्वीसुद्धा झालेत. Defiance काही फार नावाजला गेला नाही. त्याच्या कथेच्या ऐतिहासिक सत्यतेबद्दलदेखील प्रवाद आहेत, पण तरीही Defiance मला आवडला तो त्याच्या रचनेमुळे आणि त्यामागच्या सत्यकथेमुळे.
सध्याच्या बेलारूसमध्ये असलेलं आणि त्याकाळी पोलंडमध्ये असलेल्या श्तानकियेविच (Stankiewicze) ह्या छोट्याशा गावातल्या बिएल्श्की (Bielski) बंधूंची ही सत्यकथा. नाझींनी पोलंड व्यापल्यावर ते पूर्व सीमेकडे म्हणजेच रशियाकडे निघाले आणि जाताना सर्व ज्यूंचं शिरकाण करत. स्थानिक ज्यू नसलेल्या पोलिसांना किंवा नागरिकांना आमिष दाखवून किंवा जीवाची भीती दाखवून ज्यूंचे ठावठिकाणे शोधून त्यांना संपवत नाझी पुढे निघाले होते. श्तानकियेविचमधल्या पोलिसांनी बिएल्श्की बंधूंच्या घराबद्दल माहिती दिली आणि नाझींनी तिथे रक्ताची होळी केली. दोन थोरले भाऊ दुसर्या शहरात (तुव्हिया आणि झुस) आणि दोन धाकटे घरी (अझाएल आणि आरोन). त्यातला झुस घरी असतो आणि अझाएलसोबत नेमका त्या वेळी जंगलात गेलेला. धाकटा आरोन कपाटातल्या फळीखाली लपून बसतो. तीन भाऊ पळून जंगलात जातात आणि झालेल्या घटनेची बातमी ऐकून थोरला तुव्हियादेखील त्यांना शोधत त्यांना येऊन मिळतो. चार बिएल्श्की बंधूंच्या संघर्षाची कहाणी इथून सुरू होते.
स्वतःच्या जेवणाची सोय करताना दमछाक होत असताना नाझींच्या भीतीनं नालिबोकी जंगलामध्ये पळून आलेली अनेक ज्यू कुटंबं त्यांना भेटू लागतात. तंदुरूस्त आणि निर्णयक्षम बिएल्श्की बंधू आपोआपच त्यांचं नेतृत्व स्वीकारत जातात. इतरांबद्दल सहानुभूती असणारे आणि त्यासाठी प्रसंगी स्वतःचा विचार न करणारे तुव्हिया आणि अझाएल आणि सहानुभूती असूनही स्वतःचा आधी विचार करणारा झुस ह्यांच्यातले वैचारिक मतभेद हळू हळू समोर येऊ लागतात. थोरला असल्याने तुव्हिया अधिकारवाणीनं वागणारा पण बंडखोर वृत्तीचा झुस स्वतःला कुठेही कमी न लेखणारा. तुव्हिया एक असं कृत्य करतो ज्यामुळे त्याला स्वतःबद्दल आणि स्वतःच्या नैतिकतेबद्दल शंका येऊ लागते. खाणारी तोंडं वाढत असतात, त्यातच किरकिरणारी तोंडंसुद्धा. आपण घाबरून लपत राहण्यापेक्षा लढावं असं झुसचं म्हणणं, तर आपण माणसांप्रमाणे जगून नाझींचा बदला घ्यावा असा तुव्हियाचा विचार. एका सशस्त्र हल्ल्यामध्ये काही मित्र गमावल्यावर तुव्हियाचा विचार पूर्ण पक्का होतो पण झुस अजूनही सशस्त्र लढ्यावर ठाम असतो. स्त्री आणि लहान मुलं असलेल्या समूहाला तुव्हियाचा मार्ग जास्त प्रशस्त वाटत असतो. अशातच तुव्हिया आणि झुसला रशियन क्रांतिकारक गट भेटतो. हे गट सोव्हिएत रेड आर्मीचेच विस्तारित गट असतात आणि ते नाझीविरोधी सशस्त्र कारवाया करून त्यांना मागे पाठवण्याच्या प्रयत्नात असतात. तुव्हिया आणि झुसचा समूह आजूबाजूच्या शेतकर्यांकडून सामान आणूनच जगत असतो, पण बरेच शेतकरी नकार देत असतात, काहीजण तर पोलिसांनाही कळवत असतात. शेतकर्यांच्या नकाराचं एक कारण म्हणजे रशियन गटही त्यांच्याकडून सामान घेत असतो. अशात तुव्हिया आणि झुस रशियन गटाशी समझोता करतात. तुम्ही कोण असा प्रश्न रशियन प्रमुखानं विचारल्यावर हे दोघे “बिएल्श्की ऑत्रिआद” (बिएल्श्की क्रांतिकारी गट) असं उत्तर देतात. त्यावर “ज्यू लढत नाहीत, ते फक्त धंदा करतात, चर्चा करतात, अभिजनवादी असतात.” असं रशियन प्रमुखानं म्हटल्यावर, “आम्ही लढणारे ज्यू आहोत.” असं उत्तर ते देतात. रशियन प्रमुखाला त्यांचं कौतुक वाटतं आणि तो त्यांना थोडं सामान मिळवण्याची परवानगी देतो. त्यानंतर तुव्हियाच्या बचावाच्या पावित्र्याला कंटाळून झुस रशियन गटाला योद्धा म्हणून सामिल व्हायला निघून जातो.
हे नमुन्यादाखलचे काही प्रसंगसुद्धा नेतृत्वगुण, समूहाचं मानसशास्त्र, समूहातला अंतर्गत संघर्ष, त्यांची स्वतःची मूल्यव्यवस्था बनण्याची प्रक्रिया ह्याबद्दल प्रचंड मोठं भाष्य करतात. झुस गेल्यानंतरदेखील तुव्हियाच्या नेतृत्वाला आव्हानं मिळतात. तुव्हियाचा स्वतःवरचा डळमळीत झालेला विश्वास आणि पसरलेली साथ ह्यामध्ये तुव्हियाच्या हातनं दोरी सुटून समूहामध्ये अराजक माजणार असं वाटतानाच तुव्हियानं घेतलेला निर्णय आणि त्याच्या कृतीमुळे उमटणारे चांगले वाईट पडसाद, जगण्याचा सुरू असलेला अविरत संघर्ष आणि समूहातल्या इतरांचे स्वार्थ, वृत्ती अशा विविध खाचाखळगांतून ह्या गटासोबत आपलाही प्रवास सुरू राहतो.
बिएल्श्की बंधू युद्धानंतरही त्यांची कथा सांगायला बरीच वर्षं जिवंत राहिले. त्यांच्या गटातली काही माणसंही. पण त्यांच्या कथांवर बरेच वाद-प्रवाद अस्तित्वात आहेत. बिएल्श्की बंधूंच्या शौर्यावर कुणालाच शंका नाही पण त्यांनी केलेली काही कृत्य वेगवेगळ्या नैतिक निकषांवर खरी राहतीलच असं नाही. युद्धस्थितीमध्ये शेकडो माणसांना घेऊन इकडून तिकडे जीव वाचवत फिरणार्‍या मंडळींना किती नैतिक कसोट्या लावायच्या हा ही एक प्रश्नच आहे. पण अर्थात ती माणसं होती, देव नव्हेत हे ही विसरून चालत नाही.
सिनेमा त्याने मान्य केलेल्या कथावस्तूला प्रामाणिक राहून व्यक्तिमत्व घडवत जातो. डॅनियल क्रेग (तुव्हिया) आणि लिएव्ह श्रायबर (झुस) ह्यांच्यातला छुपा संघर्ष, पण तरीही भावाभावांमधलं प्रेम आणि विश्वास वेगवेगळ्या प्रसंगांमधून व्यवस्थित व्यक्त होत जातो. ऐतिहासिक मूल्य विवादित असतं तरीही सिनेमामधलं समूहाचं मानसशास्त्र आणि समूहाच्या व्यवहारांमागच्या उलाढाली सिनेमा वेगळ्या पातळीवर घेऊन जातात. चित्रीकरण आणि संकलन वगैरे बाबींमध्ये सिनेमा अर्थातच उजवा आहे. कथा एक धागा पकडून निश्चित केल्यामुळे प्रसंगी सरधोपट होते, पण तरीही मूळ कथेतलं नाट्यच इतकं मोठं आहे की कुठेही सिनेमा कंटाळवाणा होत नाही. बेलारूसचं निसर्गसौंदर्य बेलारूसशी जोडून असलेल्या लिथुआनियामधून व्यवस्थित पुढे येतं. जंगलाचं अथांग अस्तित्व आणि अवाढव्य झाडांच्या आश्रयाला आलेली तुटपुंजी माणुसकी विरोधाभासी चित्र सुंदर उभं करत जाते.
डॅनियल क्रेग हा माझा आवडता अभिनेता आहेच आणि इथेही तो निराश करत नाही. तुव्हियाच्या घालमेलीपासून ते नेता म्हणून लागणारा कणखरपणा प्रसंगी ओढूनताणून आणतानाच्या विविध मनोवस्था तो उत्तम पकडतो. लिएव्ह श्रायबर झुसची आक्रमक व्यक्तिरेखा उत्तम अभिनय आणि त्याच्या दणकट व्यक्तिमत्वाच्या जोरावर निभावून नेतो. अझाएलच्या भूमिकेतला जेमी बेलही छाप सोडतो. मार्क फ्युएरश्टाईन (‘Royal Pains’ मधला डॉक्टर हॅन्क), इशाक मालबिन ह्या व्यक्तिरेखेच्या बाबत कमाल करतो. ही काल्पनिक व्यक्तिरेखा असावी, एका ज्यूईश विचारवंताची. त्याच्या एन्ट्रीपासूनच त्याचं विचारवंत असणं आणि कामकरी नसणं ह्याचा एक बॅकड्रॉप प्रत्येक प्रसंगाला येतो आणि बरेचदा हलकी विनोदनिर्मितीही होत राहते.
एकंदरित डिफायन्समुळे माझी समूहाच्या चलनवलनाबद्दलच्या विविध सिद्धांतांची उजळणी झाली आणि मजा आली. एक माहित नसलेली कथा कळली. एका थोडंफार वाचलेल्या देशाबद्दल (बेलारूस) पुन्हा एकदा वाचण्याचा योग आला. सिनेमा म्हणून डिफायन्स अगदी मास्टरपीस नसला तरीही तो माझ्या मते बराच वरचा आहे तो प्रसंगांच्या जडणघडणीमुळे. डॅनियल क्रेगच्या जीव तोडून केलेल्या अभिनयासाठी आणि मानवी समूह कसे घडत जातात ह्याचं जिवंत चित्रिकरण केवळ अप्रतिम प्रसंगांच्या माध्यमातून केलेलं पाहण्यासाठी नक्की पहावा असा सिनेमा.
सिनेमाचं यश बरेचदा ह्यातच मानलं जातं की तो किती प्रश्न उभे करतो. डिफायन्स ह्या ही बाबतीत मागे पडत नाही. तुव्हियाचे नैतिकतेचे आडाखे आणि मापदंड हे त्याला सोयीस्कर असे आहेत का? समूहाची मूल्य आणि नेत्याची मूल्य कायम एकसमानच असावीत का? की समूह हा नेत्याच्या मूल्यांवरूनच स्वतःची मूल्य घडवतो? नक्की नैतिक आणि अनैतिकतेची व्याख्या काय? बिएल्श्की कुटुंबाला नाझींच्या हवाली करणार्या पोलिसांनी स्वतःच्या कुटुंबाचा आधी विचार करणं नैतिक की अनैतिक? किंवा बिएलश्की बंधूंना गुपचूप मदत करणार्या गावकर्याची मूल्यं जरी उच्च असली तरी त्यानं नसत्या फंदात पडून जीव धोक्यात घालू नये म्हणून आदळआपट करणारी त्याची बायको चूक कशी? तुव्हिया आणि झुस दोघांचीही विचारपद्धत किंवा नेतृत्व करण्याची पद्धत बरेचदा उत्तरांपेक्षा प्रश्नच जास्त उभे करते पण तरीही त्या परिस्थितीमध्ये कितीही शंकास्पद वाटली तरी प्रभावी होती हे पुराव्यांनीशी सिद्ध होतंच. त्यामुळे जेव्हा पुस्तकी व्याख्यांकडे पाहून विचारवंत आणि बुद्धिवादी योग्य-अयोग्य आणि नैतिक-अनैतिकांचे शाब्दिक कीस पाडत बसतात, तेव्हा कृती करणारे चूक की बरोबर हे परिस्थितीनुसारच ठरत असतं. सिनेमातही जंगलात बसून बुद्धिवादी आणि विचारवंत जेव्हा चर्चा करतात तेव्हा त्यातला फोलपणा त्यांनाही कसा जाणवत जातो ह्याचा एक उत्तम प्रसंग आहे. थोडक्यात, कुठलीही व्याख्या ही संपूर्ण नसून परिस्थितीनुसार घडत जाते हे समाजातील बुद्धिवादी आणि विचारवंतांनीही समजून घ्यावं का अशा अर्थाचे प्रश्न सिनेमा थेट उभे जरी करत नसला तरी त्यातल्या प्रसंगांनी डोक्यात तरी निश्चितच उभे राहतात.