7/28/2010

कविता/गीतांचे स्वैर (!) अनुवाद - एक ब्लॉगर्स खो-खो

आज मी जो प्रकार करतोय, तो मी ह्यापूर्वी कधीच केलेला नाही. कविता किंवा गीतांचा अनुवाद. पण साक्षात यॉनिंग डॉगनं खो दिल्यावर माझ्याकडे काही पर्यायच नव्हता. तरीसुद्धा, हपिसातल्या कार्यबाहुल्यामुळे माझं बाहुलं झालं होतं, ज्या कारणे मी तीन दिवस उशीर करण्याची गुस्ताख़ी केलीच. असो. तर ब्लॉगर्स खो-खो च्या नियमाप्रमाणे मी दोन (हा अत्याचार आहे हे आधीच मान्य करून) मराठीशिवाय दुसर्‍या भाषांतल्या गाण्यांचे स्वैर(!) अनुवाद केलेत. ते जर गोड मानून घेण्याइतपतही नसतील, तर भाषांतरित विडंबनं म्हणून मानून घ्या आणि जर तितपतही नसतील, तर मी विटंबना केलीय असं समजून चार शिव्या (मनातल्या मनात) हासडून सोडून द्या!

आणि हो आपापल्या जबाबदारीवर वाचा.

१. मूळ गाणं - आजा तू बैठ जा सायकल पे

मूळ गायक/लेखक - अल्ताफ राजा (होय मी ह्याचा फॅन आहे)

सिनेमा (होय हे गाण सिनेमात होतं) - परदेसी (जास्त खोलात शिरू नये)

अथ -


आजा तू बैठ जा सायकल पे,

आजा तू बैठ जा सायकल पे ।।ध्रु॥

अंजानी है ये डगर, अंजाने रास्ते,

लाया हूं मैं दिलकी सायकल तेरे वास्ते,

जरा आंख मिला, नजरोंसे पिला,

मेरे प्यार का दे तू कुछ तो सिला,

आजा तू बैठ जा सायकल पे ।।ध्रु॥


लाख बचना चाहा फिरभी दिलबर जानी,

मेरी जवानी से टकरा गयी तेरी शोख़ जवानी,

इस सायकल में ब्रेक नहीं हैं, ओ पगली दीवानी,

यूंही करती रहना तू नादानी पे नादानी,

रोजाना आते जाते, तू दोस्ती के नाते,

आजा तू बैठ जा सायकल पे ॥ध्रु॥


देख के तुझको ना जाने क्यूं सायकल के पहिये फडके,

अरमानों के छर्रे इसकी चेन में आके धडके,

तुझको आवाज़ें देती हैं प्रेम नगर की सडकें,

ये टेढे मेढे रास्ते, चलूं मैं हसतें हसतें,

आजा तू बैठ जा सायकल पे ॥ध्रु॥


अपने आगे चलने वाले पीछे मैने छोडे,

तेरी खातिर मैने जाने कितने सिग्नल तोडे,

चौराहे के बीच सिपाहॉ खडा रहा मुंह मोडे,

काश तू मेरे इस दिल की सायकल से रिश्ता जोडे,

तू परियों की रानी, तू मेरी जिंदगानी,

आजा तू बैठ जा सायकल पे ॥ध्रु॥

टीप : कृपया अल्ताफ राजाच्या गाण्याला चाल लावण्याचा निष्फळ प्रयत्न करू नका, यमक वगैरे शोधू नका. त्याच्या गाण्यांना गेय अशी चाल फक्त तोच लावू जाणे.

स्वैर (!) अनुवाद -

ये ना बसायला सायकलवर

ये ना बसायला सायकलवर॥ध्रु॥

अनोळखी वळणं, अनोळखी रस्त्यांसाठी

आणलीय हृदयाची सायकल, तुझ्याचसाठी

जराशी नेत्रपल्लवी, नजरेची ती एक खुमारी;

एव्हढंच माझ्या प्रेमाच्या परताव्याखातर।

ये ना बसायला सायकलवर ॥ध्रु॥


कितीही करशील प्रयत्न तू टाळायचे,

होणारच आपले मिलन जे आहे व्हायचे,

ह्या सायकलीला ब्रेकच नाहीत गं वेडाबाई,

अशीच करत राहा तू गं आपली मनमानी,

नेहमीच्याच ठरलेल्या त्या रस्त्यावर

ये ना बसायला सायकलवर ॥ध्रु॥


बघून तुला का सायकलची चाकं फडफडू लागतात,

इच्छांचे धागे हिच्या साखळीत गुरफटू लागतात,

प्रेमनगराचे मार्ग तुजला हाकारू लागतात,

मी चाललोय ह्या अवघड वाटेवर, तुझ्याचखातर

ये ना बसायला सायकलवर॥ध्रु॥


पुढच्यांना गं मी केव्हाच माझ्या मागे टाकलंय,

ह्या सगळ्यांत न जाणे किती सिग्नल तोडलेत,

चौकात तोंड फिरवून उभारलाय पहा हवालदार,

तू माझ्या सायकलीशी नातं कधी जोडणार,

तू अप्सराच जणू, आयुष्य ओवाळलं तुझ्यावर,

ये ना बसायला सायकलवर॥ध्रु॥

इति.


२. मूळ गाणं - Careless Whisper

मूळ गायक/लेखक - George Michael

अथ -


I Feel So Unsure
As i take your hand
And lead you to the dance floor
As the music dies
Something in your eyes
Calls to mind a silver screen
And all its sad goodbyes

I'm never gonna dance again
Guilty feet have got no rhythm
Though it's easy to pretend
I know you're not a fool
I should have known better than to cheat a friend
And waste a chance that i've been given
So i'm never gonna dance again
The way i danced with you

Time can never mend
The careless whisper of a good friend
To the heart and mind
Ignorance is kind
There's no comfort in the truth
Pain is all you'll find

Tonight the music seems so loud
I wish that we could lose this crowd
Maybe it's better this way
We'd hurt each other with the things we want to say
We could have been so good together
We could have lived this dance forever
But now who's gonna dance with me
Please stay

Now that you've gone
Now that you've gone
Now that you've gone
Was what i did so wrong
So wrong that you had to leave me alone


स्वैर (!) अनुवाद -

मला इतकं विचित्र वाटतंय,

तुझा हात हातात घेऊन नृत्यमंचाकडे जाताना,

जसजसं संगीत शांत होतंय,

तुझ्या डोळ्यातले काही भाव,

मला चंदेरी दुनिया आणि तिथल्या ताटातूटींची आठवण करून देतात


मी पुन्हा कधीच नाचणार नाही,

कारण अपराधी पायांना ताल सापडत नाही,

तसं भासवणं सोपं आहे,

पण तू दूधखुळी नाहीस हे ही मी जाणून आहे,

मैत्रीत फसवाफसवी चालत नाही हे मला आधीच कळायला हवं होतं,

ही मिळालेली संधी घालवण्याआधीच,

त्यामुळेच मी कधीच नाचणार नाही,

जसा मी तुझ्याबरोबर नाचलो


काळाच्या मलमाने,

चांगल्या मित्रांच्या बेफिकिर वक्तव्यांनी झालेल्या जखमा भरून येत नाहीत,

अश्या वेळी अज्ञानात सुख असतं,

कारण सत्यामध्ये फक्त वेदनाच


आज हे संगीत कानांना खटकतंय,

तुला ह्या गर्दीपासून दूर घेऊन जावंसं वाटतंय,

पण कदाचित

आपण इथेच एकमेकांना दुखवून आपली मनं मोकळी करून घेऊ,

तेच बरं होईल,


आपण एकत्र असतो तर किती छान झालं असतं..

आपण हे नृत्यच कायम जगलो असतो,

पण आता माझ्याबरोबर कोण नाचणार, थांब ना!


आता तू गेलीच आहेस,

तर मला विचारायचंय, की मी जे केलं ते इतकं वाईट होतं का,

की ज्यामुळे तू मला असा एकटा टाकून गेलीस!

इति.

तळटीप - कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असल्यास क्षमस्व. माझा पहिलाच गुन्हा असल्याने माफ करा.

माझा खो भाग्यश्रीताई आणि मीनलला. (हे करायचा मला अधिकार आहे की नाही हे ठाऊक नसूनही आपला एक {नेहमीप्रमाणे} आगाऊपणा.)

7/25/2010

इट जस्ट कुड हॅव बीन हिज मास्टरपीस

आज खरं तर मी ब्लॉगविश्वातल्या वास्तव्यामुळे माझ्या भाषेवर पडलेल्या प्रभावावर आणि होणार्‍या दूरगामी परिणामांवर साधक बाधक चर्चा करणार होतो. पण झालं असं की अचानकच रस्त्यावर चालता चालता क्वेंटिन टॅरँटिनो दिसला.म्हणजे मी असा रस्त्यानं चाललो होतो. तेव्हा रस्त्यावरच्या एका कॅफेच्या समोरच मांडलेल्या एका टेबलाशेजारच्या खुर्चीत बसून तो कॉफी भुरकत होता. मी हर्षोल्हासाने ओरडलो, "आयला, टॅरँटिनो!"

त्याची नजर एकदम माझ्याकडे गेली, "गप्प तुझ्या...ओरडतो कसला, देईन एक थोतरीत ठेऊन." हो. हे चक्क टॅरँटिनो म्हणाला. विश्वास नाही बसत ना! माझा पण नाही बसला. पण मग त्यानं मला त्याच्यासमोर बसायची खूण केली आणि म्हणाला, "टेकवा बूड." मग खुर्चीत बसता बसता माझा विश्वासही बसला.

मी काही बोलायच्या आत तो म्हणाला, "हे बघ, इथे मला अजून कुणी ओळखलं नाही, तू कसं काय ओळखलंस? आणि हो आता ओळखलंयस ते ठीक, बोंबलून बभ्रा करू नकोस."

माझा बोलण्यासाठी उघडलेला आ तसाच वासलेला राहिला.

"अरे हो, तू संभ्रमात पडला असशील नाही का! अरे मी शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवायचा विचार करतोय. त्याच्या रिसर्चसाठी मी मराठी शिकतोय!" तो डोळे मिचकावत म्हणाला. मी स्वतःला चिमटा काढणार, एव्हढ्यात त्याने अस्खलित इटालियनमध्ये आतल्या वेटरला ऑर्डर दिली, "उन कफ्फे!"

"अरे काही बोलशील की नाही. यू आर माय गेस्ट." त्याच्या शेवटच्या वाक्यात अमेरिकन ऍक्सेंट आली आणि माझा उठत असलेला विश्वास पुन्हा बसला.

"नाही, मी एकदम ऑस्ट्रक आहे यू सी."

"तिच्यायला, आम्ही लोक जितकं इंग्लिश बोलत नसू, तितकं तुम्ही मराठीत घोळून वापरता की रे!" तो.

"तुम्ही, पुणे सातार्‍याकडच्या कुणाकडून शिकलेले दिसता मराठी!"

"हू नोज, बीसाईड्स व्हॉट्स डिफरन्स डज इट मेक, ऍज लाँग ऍज आय कॅन कम्युनिकेट. धत्, तू मधेच इंग्लिश शब्द वापरून माझं बेअरिंग घालवलंस."

मी एक दीर्घ श्वास घेतला. "पण तुम्ही.."

"एक मिनिट भावा, तू म्हण..ते तुम्ही वगैरे जाम जड होतं!"

"कोल्हापूर..हंड्रेड पर्सेंट!"

"च्यायला, तू अजून तिथेच अडकलायस काय? विचारतो मी उद्या माझ्या ट्यूटरला."

"बरं मी काय म्हणतो, तू खरंच शिवाजी महाराजांवर सिनेमा बनवणार आहेस?"

"मग काय झक मारायला मराठी शिकतोय मी?" तो थोडा खवळला.

"नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला." एव्हढ्यात माझी एस्प्रेसो आली. "म्हणजे, माझा विश्वास बसत नाहीय अजून, बाकी काही नाही."

"का? विश्वास न बसायला काय झालं? मी हिटलरसारख्या राक्षसावर सिनेमा बनवू शकतो, तर शिवाजी महाराजांसारख्या महान नेत्यावर नाही बनवू शकत?"

"पण 'इन्ग्लोरियस बास्टर्डस' हिटलरवर कुठे होता?"

"पण हा सुद्धा शिवाजी महाराजांचा बॅकड्रॉप घेऊनच बनवणार आहे मी! मी कधीच बायोपिक बनवत नाही. त्या काळाच्या बॅकड्रॉपवर एक फिक्शनल स्टोरी बनवणार!"

"झकास!" मी कॉफीचा कप तोंडाला लावला.

"पण मला एक कळत नाही, मेक्सिकन स्टँडऑफचा कन्सेप्ट मी तलवारी घेऊन कसा एग्झिक्यूट करू!"

मी एका कडू घोटाबरोबर कॉफी संपवली. "मेक्सिकन स्टँडऑफ? शिवाजी महाराजांच्या काळात?"

"यप्प."

"बघ बाबा. एक आयडिया आहे तशी! आदिलशाह, निजामशाह आणि औरंगजेबाचे सरदार किंवा स्वतः तेच एकमेकांवर तलवारी रोखून उभे आहेत, असं काहीसं दाखवता येईल."

तो विचारात गढल्यागत वाटला. "पण एग्झिक्यूट कसा होईल?"

"ह्म्म. म्हणजे बघ, एकजण बाजूच्याचा डावा हात तोडेल, तो त्याच्या बाजूच्याचा, असं करत सगळ्यांचे एकएक हात तुटतील."

"मग, तलवारी तश्याच राहतील ना बे!"

"नागपूरकर आहे वाटतं!"

"तुझ्यायला, उद्या विचारून सांगतो म्हटलं ना तुला!"

"सॉरी! हां तलवारी राहतील ते खरं, मग असं करू ना डाव्या हाता ऐवजी डायरेक्ट मुंडकंच उडवू देत एकामेकांचं!"

"गुड आयडिया! पण एक मिनिट, मुंडकं उडवल्यावर तो पुढच्याचं कसं उडवेल!"

"स्प्लिट सेकंड्स मध्ये रे! आणि तसेही आमच्यात बिना मुंडक्याचे सरदार लढतात ह्याचे पुरावे आहेत!"

"ओके! एक मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलास तू! बिना मेक्सिकन स्टँडऑफ, मला सिनेमा परिपूर्ण वाटतच नाही!"

"पण तू एग्झॅक्टली काय दाखवणार आहेस! म्हणजे, इन्ग्लोरियस बास्टर्डस मध्ये कसं पूर्ण फिक्शनल स्टोरी होती. त्या टाईप का?"

"नाही, म्हणजे एव्हढी पण विअर्डली फिक्शनल नसेल! इतिहास बदलणारी वगैरे तर बिलकुल नसेल."

"दॅट्स बेटर, आमच्या इथे इतिहास बदलणारं काहीच चालत नाही. तुझ्या स्टोरीत तसं काही असल्याची कुणाला भनक जरी लागली असती ना. सिनेमावर बॅन लागला असता. चार दोन बसा जळल्या असत्या. आणि तुला मदत करणार्‍या इंडियन लोकांच्या घरावर दगडफेक झाली असती."

"कैच्याकै!"

"तू गुगल बझवरही येतोस का अधूनमधून?"

"तुला विषय फालतू भरकटवायची वाईट खोड आहे!"

"सॉरी अगेन! अरे खरंच असं होतं आमच्यात. शिवाजी महाराज हे आमचं सर्वोच्च दैवत आहेत आणि त्याचा अपमान आम्ही सहन करून घेत नाही!"

"अरे पण अपमानास्पद काहीच दाखवणार नाही उगाच. आणि समजा मी काही ऑब्जेक्शनेबल दाखवलंच तरी त्याची शिक्षा मला रिसर्चला मदत करणार्‍यांना का?"

"त्याचं उत्तर नाही. कुणालातरी मारायचं ते असं. बाकी ते एका विशिष्ट उच्च म्हणवल्या जाणार्‍या जातीचे असतील तर बेस्टच. मग तर चौकात फोडतील त्यांना. एनीवे, तू स्टोरी काय घेतोयस एग्झॅक्टली!"

"कसं आहे, एक मावळा आणि एक मुघल शिपाई दोघेजण जंगला हरवलेत."

"म्हणजे चॅप्टर वन."

"येस. द लॉस्ट सेपॉय! ते दोघे वेगवेगळे हरवलेत. आणि मग ते कसे मार्गक्रमणा करतात. जंगली श्वापदांपासून वाचतात आणि थोड्या वेळाने एकमेकांसमोर येतात. मुघल सैनिक भाला टाकून दयेची भीक मागायला लागतो. मावळाही मोठ्या मनाने माफ करतो आणि दोघे एकत्र रात्रीसाठी आसरा शोधायला लागतात. एन्ड ऑफ चॅप्टर वन!"

"ब्रिलियंट."

"थँक्स. मग दुसरा चॅप्टर. द स्पाय! शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी एक हेर शोधून काढलाय, ज्यामुळे पुढे होणार्‍या मोठ्या घातपाताची खबर लागलीय! त्याला दरबारात राजांसमोर हजर केलं गेलंय! शिवाजी महाराज तिथे त्याच्याशी एकदम सहानूभूतीपूर्वक बोलतात. त्याची पार्श्वभूमी, कुठल्या परिस्थितीमुळे त्यानं हे केलं, हे सगळं त्यांच्या महान ग्रेस(कवी नव्हे) ने विचारतात आणि मोठ्या मनाने त्याला माफही करतात, तेही आता ते सांगतील ती माहिती शत्रूपर्यंत पोहोचवायच्या बोलीवर."

"ऑसम."

"चॅप्टर थ्री. मचाण. ते दोन हरवलेले सैनिक मचाणावर बसलेत. त्यांनी रात्रीसाठी मचाणाचा आश्रय घेतलाय. मावळ्याजवळ असलेली थोडीशी दारू आणि मुघल शिपायाजवळ असलेला हुक्का आपापसात शेअर करत ते दोघे चर्चा करताहेत."

"यार, हा तुझा फेव्हरेट टेवल सिक्वेन्स येतोय. तू नेहमी वापरतोस. रिझर्व्हॉयर डॉग्समध्ये स्टार्टिंगचा "टिप, वेटर आणि लाईक अ व्हर्जिन", पल्प फिक्शनमध्ये तर मुबलक होते आणि इन्ग्लोरियसमध्ये "बेसमेंट बार"चा सीन."

"तू साला माझे पिक्चर सही स्टडी करतो हां. तुझ्याशी ही चर्चा करून मी चुकलो नाहीये."

"थँक्स!" मी एकदम लाजलो.

"तर ते दोघे बोलत बसलेत. हळूहळू नशेचा अंमल चढायला लागलाय. त्यांची चर्चा लावणी, तमाशा इथपासून सुरू होऊन ती पार घोडेस्वारीचे फाईन पॉईंट्स इथवर येते. मग एकदम त्यांची गाडी, शिकारीवर पोहोचते. तेव्हा दोघे जण आपले एक एक पराक्रम सांगायला लागतात. इथे आपण त्या दोघांच्या स्टोरीजचं पिक्चरायजेशन त्यांच्या नजरेतून करायचं! मग अचानक खर्‍याखुर्‍या वाघाची डरकाळी ऐकू येते. आता मावळा म्हणतो आपण एक खेळ खेळूया!"

"क्लास ऍक्ट! इथेच चॅप्टर फिनिश?

"नाही, मावळा म्हणतो, 'हे बघ आपण खाली उतरायचं आणि एक सरळ रेषेत चालायचं, ज्याला जास्त नशा झालाय, तो खालीच थांबणार आणि वाघाची शिकार करून दाखवणार!' मुघल सैनिक म्हणतो ठीक! ते दोघेजण खाली उतरतात आणि मावळा एक दगड आणून रेष ओढतो. ऍपॅरन्टली मावळा जास्त झिंगलेला दिसतोय. कारण रेष वाकडी येते. मुघल सैनिक थोडासा गालातच हसतो आणि म्हणतो,' हट, ही बघ सरळ रेष' आणि एक दोरी काढून जमिनीवर ठेवतो. मावळा म्हणतो 'ठीक!' चॅप्टर फिनिश!"

"आता?"

"चॅप्टर फोर. द रिटालियेशन! शिवाजी महाराज आपल्या सल्लागार मंडळाबरोबर बसून मसलत करताहेत. फितुरीबद्दल घ्यायची नवी भूमिका आणि फितुरीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी सगळ्या सैनिकांपासून सगळ्याच रयतेच्या बर्‍या-वाईट परिस्थितीबद्दल एक साधक बाधक चर्चा होते. डिटेल्स आपण काही बखरी पाहून डायलॉग रायटरबरोबर वर्क आऊट करू. मग ते पुढे आत्ताच्या सिच्युएशनची चर्चा करतात. ह्या पकडल्या गेलेल्या फितुराकडून कश्या प्रकारे शत्रूला चुकीची माहिती पुरवायची, जेणेकरून महाराज आहेत ह्या मिषाने त्यांनी एका मोर्च्यावर गाफिल समजून हल्ला करावा आणि मग चहूबाजूनी दडून बसलेल्या मावळ्यांनी त्यांच्या पूर्ण तुकडीला कसं नेस्तनाबूत करायचं ह्याची पूर्ण नकाशासकट चर्चा होते. प्लॅन बनतो. मग महाराज जुलुमाने धर्मांतरित झालेल्यांना पुन्हा धर्मात घेण्याची व्यवस्था करण्याचे आदेश देतात आणि निघतात. त्यांच्या करारी चेहर्‍यावरच फेडिंग स्क्रीन! चॅप्टर फिनिश!"

"बेस्ट! हे मला पल्प फिक्शन आणि इन्ग्लोरिअसमध्ये जसा एक सामाजिक टच वाटतो त्या स्टाईल दिसतंय, मस्तच! बाय द वे, इन्ग्लोरिअसमधला किंग काँगचा पंच जबराट होता!"

"थँक्स. चॅप्टर फाईव्ह. द गेम. मावळा हळूहळू शांतपणे दोरीच्या कडेकडेने बरोब्बर सरळ रेषेत चालतो आणि विजयी मुद्रेने मुघल सैनिकाकडे पाहतो. तो चिंतेत पडतो. आता तो दोरीच्या दिशेने थोडासा भेलकांडत जायला लागतो एव्हढ्यात मागून आवाज येतो. "लाहौल विला कुवत, तूने शराब पी रख्खी है!"

दोघेही बिचकून कोण बोललं म्हणून पाहतात तर दुसरा एक मुघल सैनिक विस्कटलेल्या कपड्यांनीशी उभा असतो.

"अरे सय्यद तू. तू भी खो गया था क्या?" मावळ्याचा हात आपसूकच कंबरेच्या खंजीराकडे जातो.

तो आधीचा सैनिक म्हणतो, "अरे कुछ नही डर मत, ये कुछ नहीं करेगा!"

"क्यूं नही जरूर करूंगा. तू इस काफिर के साथ बैठके शराब पी रहा है, और मैं कुछ नहीं करूंगा?"

"अबे तू कौनसा पाक़ साफ़ है? तू भी तो उस कोठे पे जाता है, तो शराब में धुत होके गिरता है! दूसरे दिन सडक से उठाना पडता है तुझे!"

"तो उसमें क्या, उस कोठे पे तो सभी लोग जाते हैं!" आता हे कोण बोलिले बोला, म्हणून सगळ्यांनी वळून पाहिलं तर दोन कलाकारासारखे दिसणारे लोक उभे होते.

"आपकी तारीफ?" एक मुघल शिपाई विचारतो.

"मैं आदिलशाह के दरबार से हूं और ये जनाब निजामशाह के दरबार से, हम दोनो मुशायरे के लिये मुघल सल्तनत में आये थे! हमें धोखे से मारने की कोशिश की गयी और हम दोनो जान बचाके जंगल में आ गये।"

"तो हम से डर नहीं लगता?"

"नहीं, तुम दोनो तो इतने हत्यारबंद नही हो और वैसे भी, तुम भी फंसे हुए लगते हो।"

"तो क्या हुआ, सल्तनत के दुश्मन हमारे दुश्मन!"

"मेक्सिकन स्टँडऑफ!!!!!!!!!!" मी अशक्य उत्साहात ओरडलो. आजूबाजूच्या टेबलवरचे, रस्त्याने चालणारे लोकही माझ्याकडे पाहू लागले. क्वेंटिनही ओशाळला. मग मीही ओशाळलो.

"सॉरी, पुढे?"

"मग काय, मावळा सिच्युएशन बघतो आणि चटकन झाडावर चढतो. मनात म्हणतो, 'नशीब मी नशा चढल्याचं नुसतं नाटक करत होतो.' खाली हे पब्लिक एकमेकांची मुंडकी उडवतं. त्या शायर लोकांकडेही खंजीर असतात. थोड्या वेळाने वाघ येतो आणि शांतपणे जेवायला लागतो. वरती मावळा घोरत असतो."

"ऑसम! आता चॅप्टर सिक्स?"

"यप्प. अजून एक एक कॉफी मागवतो थांब." मग तो "दुए कफ्फे!" म्हणाला आणि पुढे,

"चॅप्टर सिक्स. द फेल्ड ऍम्बुश! मुघल सरदार दिलावर खां च्या तंबूत चर्चा चाललीय. त्यांना त्यांच्या नवा हेर भिकाजी सुळे उर्फ बिलावल शाह कडून महाराजांच्या एका छुप्या मोहिमेची खबर लागलीय. ते डिस्कस करताहेत की महाराज असलेल्या ह्या छोट्याश्या मोर्चावर कसं फुल थ्रॉटल आक्रमण करून त्यांना नेस्तनाबूत करायचं."

"वॉर सिक्वेन्सेस येणार वाटतं शेवटी."

"येस्स, नेव्हर ट्राईड दॅट बिफोर, प्रत्येक सिनेमात नवं काहीतरी यू सी. ते पण गोरिल्ला वॉरफेयर मजा येणार फुल. हां तर पुढे, दिलावर आपल्या पब्लिकला सांगतो, "आणि इथेच तो 'पहाड का चुव्वा सिवाजी खत्म.'"

"एक मिनिट एक मिनिट. हे चालायचं नाही. शिवाजी महाराजांनी शिवी देऊ शकत नाही."

"अरे पण शत्रू काय पोवाडे गाणार त्यांचे? त्यांच्या कारवायांमुळे मुघल किती फ्रस्ट्रेट झाले होते, ते रिफ्लेक्ट नको व्हायला? अरे आम्ही तर सिनेमात निगर वगैरे शब्द पण वापरतो रेसिस्ट कॅरॅक्टर दाखवण्यासाठी. इट्स क्वाईट ऑब्व्हियस!"

"अरे राजा, तिथे ऑब्व्हियस असेल रे! आमच्यात नाही चालणार. संभाजी ब्रिगेड म्हणेल की महाराजांचा अपमान झालाय. थिएटर्सवर दगडफेक होईल. तुझा तो शिक्षक, त्याच्या घरावर हल्ला होईल. माझी जात तर मला सॉफ्ट टार्गेट बनवते."

"अरे पण शिवाजी महाराज जाती पातीच्या पलिकडे होते."

"होते. आता नाहीयेत. त्यांना एका जातीनं हायजॅक केलंय. बाकीच्या जाती फक्त त्यांचे अपमानच करतात. आणि परदेशी लोकांनी तर बोलायचंच नाही बरं का? रिसर्च वगैरे करायचाच नाही. ज्या आम्हाला मान्य गोष्टी आहेत त्याच सत्य! जे सोयीचं तोच इतिहास!"

"राहिलं तर मग."

"अरे असं कसं, काढून टाक ना तो डायलॉग."

"असा कसा काढू. इट इस नेसेसरी. मी असा सिनेमा नाही बनवू शकत, स्क्रिप्ट कॉम्प्रोमाईज करून. तुला माहितीय, माझी प्रत्येक फ्रेम बोलते."

"अरे पण.." एव्हढ्यात माझा सेलफोन वाजायला लागला. मी खिशात शोधायला लागलो. मला मिळेना. आणि मला एकदम जाग आली. अलार्म वाजत होता. सकाळचे ६ वाजले होते. आकाशवाणीची शेवटची सभा संपली होती.

मी मनाशीच म्हटलं, "इट जस्ट कुड हॅव बीन हिज मास्टरपीस!"

7/22/2010

अपूर्णांक

"मदर डाईड टूडे ऑर मे बी यस्टरडे!"

हे "द स्ट्रेंजर" किंवा "द आऊटसायडर" ह्या नावानं प्रसिद्ध असलेलं, मूळ फ्रेंच "L’Étranger " आल्बेर काम्यू(Albert Camus) ह्या लेखकाच्या पुस्तकाचं पहिलंच वाक्य आहे. मी ह्या पुस्तकाबद्दल पहिल्यांदा पेपरात वाचलं आणि प्रेमात पडलो होतो. पुस्तक मिळवलं, पण ५-१० पानांपुढे कधी जाऊ शकलो नाही. उत्कंठावर्धक पुस्तक आहे तसं, पण मलाच भीती वाटते. कसली ते सांगतो पुढे.

मला सहसा कुठलेही 'इझम्स' फार आवडतात. कारण माझ्या मते जगात काहीच नियमित नाहीये. जगातली कुठलीही गोष्ट प्रमाणबद्ध नसते, माणसाला प्रत्येक गोष्टीला प्रमाणात अडकवायची हौस आहे. तुम्ही मला सांगा, किती जणांना 'अमुक एका' नंबराचे बूट किंवा चप्पल व्यवस्थित बसतात. किती जणांचा कमरेचा पट्टा एकाच भोकात व्यवस्थित बसतो. किती जणांच्या मनात एका वेळी प्युअरली एकच भावना असते(रादर कुणी हे डिफाईन करू शकतं का?). मला तरी ह्यातलं काहीच नाही जमत बुवा. माणसं उगाच प्रत्येक गोष्टीला प्रमाणात बांधतात. ऍक्चुअली गणिताला सुद्धा हे कळतं, 'पाय' चं पूर्ण उत्तर नाही, किरणोत्सर्गी पदार्थाला हाफ लाईफ असतं, ते तुम्ही मोजून बघा, कधीच उत्तर मिळणार नाही. अनादि, अनंत. तसेच हे सगळे इझम्स आहेत. विचारांना, भावनांना विविध स्थितींमध्ये पकडायचे प्रयत्न. ही स्थिर छायाचित्रं आहेत. चलत चित्र नाहीत. एका मोठ्या फिल्मचे तुकडे पाडले, आणि प्रत्येकाने एक एक पकडला. कुणी म्हणालं हा निहिलिझम, कुणी म्हणालं, हा एग्झिस्टंशियलिझम, कुणी म्हणालं डिटर्मिनिझम. हत्ती आणि पाच आंधळ्यांच्या गोष्टीसारखं, प्रत्येकाला हत्ती वेगळाच भासतो.

असाच एक इझम ह्या पुस्तकात वर्णन केलाय, "ऍब्झर्डिझम". एक कमालीचा विचित्र, सांगायला अतिशय साधासरळ पण कळायला तितकाच गुंतागुंतीचा प्रकार. "कुठल्याही गोष्टीविषयी पराकोटीचा त्रयस्थ भाव, म्हणजे ऍब्झर्डिझम." ही मला समजलेली व्याख्या आहे. सुरुवातीचं वाक्य परत वाचा. आता थोडा बोध व्हायला लागेल.

"Mother died today. Or maybe yesterday, I don't know. I had a telegram from the home: 'Mother passed away. Funeral tomorrow. Yours sincerely.' That doesn't mean anything. It may have been yesterday"

मध्यवर्ती पात्राची आई वारलीय. त्याला एक तार आलीय त्यावरून त्याला कळलंय. त्याला आठवत नाहीये असं नाही, पण तो नक्की नाहीय. पण वाक्यातला कोरडेपणा जाणवल्यावाचून राहत नाही. एक वेगळाच त्रयस्थपणा त्याच्या पुढच्या कृत्यांवरूनपण जाणवायला लागतो. तो तिच्या वृद्धाश्रमात जातो. तिथे तिच्या कॉफिनशेजारी त्याला रात्रभर बसावं लागतं. तिथले लोक त्याचं सांत्वन करताना अपेक्षा करत असतात की तोही रडेल, पण त्याला हेच कळत नाही की त्याला रडू का येत नाही. त्याला कॉफी घेणार का विचारतात तेव्हाही त्याला आपली आवडती कॉफी आठवते. एकंदर, कुठेही त्याला आई जाण्याचा धक्का बसल्याचं जाणवत नाही. तो अगदी नॉर्मल असतो. तिथल्या एकंदर स्थितीचंही वर्णन तो इतका त्रयस्थपणे करतो की बस. तिथल्या गार्डशी तो हवापाण्याच्या गप्पाही करतो. वाचताना एका वेगळ्याच विश्वात पोचल्यासारखं वाटायला लागलं.

मी ऍब्झर्ड आहे का? हा प्रश्न छळायला लागला. आणि मी पुस्तक खाली ठेवलं. असं दोन-तीनदा झालं.

मला माझ्या सगळ्या जवळच्यांबद्दल खूप ओढ वाटते. कायम सगळ्यांशी संपर्कात राहावंसं वाटतं. पण, कधी काही विपरित घडलं तर मी कसा रिऍक्ट करेन? छ्या काहीतरी विचित्र प्रश्न. पण असं घडलं होतं. माझा एक जवळचा मित्र वारला. मी क्षणभर सुन्न झालो होतो. मला कळतच नव्हतं. मग मी भानावर आलो. मी ऑफिसात होतो. थोडा वेळ बातमी देणार्‍या मित्राशी बोललो. मला दुःख झालं होतं. पण मी दिवसभर कामात बुडालो. मग संध्याकाळी घरी आल्यावर पुन्हा त्या विचारांनी ताबा घेतला. असा ऊनपाऊस खूप चालला मनाचा. त्याच्या आईवडिलांना भेटायला गेलो होतो, तेव्हा गळा दाटून आला होता. पण पुन्हा नॉर्मल झालो. माझे आजोबा वारले तेव्हा इम्पॅक्ट मोठा होता, पण मी फार लवकर सावरलो होतो. अजूनी कधी कधी खूप आठवण येते. अगदी हुंदकाही दाटून येतो, पण मी मेजरली नॉर्मल असतो. की तसं वाटतं फक्त, आतल्याआत तुटत तर नसतो मी? ह्या सगळ्याचा अर्थ काय होतो?

मी जमेल तेव्हा, जमेल तेव्हढे इझम्स वाचतो, मी कुठल्या कॅटेगरीत येतो ह्याचा विचार करत करत. मग अचानक अपूर्णांकांचा विचार आला. माझ्यात कदाचित ऍब्झर्डिझम जास्त असेल, पण बरेच इतरही इझम्स असतीलच. मी थोडासा एस्थेटिसिस्ट असेन पण थोडासा युटिलिटेरियन पण असेन. थोडासा निहिलिस्ट असेन पण थोडा एग्झिस्टेन्शियलिस्टही असेन. थोडक्यात मी अपूर्णांकच आहे. जगातले सगळेच जण कदाचित अपूर्णांक असतील. सहसा अपूर्णांकांनाच पूर्णांक बनवायची हौस असते. कारण पूर्णांक बनले, तरच अपूर्णांकांना त्यांची ओळख मिळेल. म्हणून कुणीतरी आल्बेर काम्यू उठून "ऍब्झर्डिस्ट' नॉव्हेल लिहितो(तो स्वतःला ऍब्झर्डिस्ट समजायचा नाही) आणि कुणीतरी 'विद्याधर भिसे' उठून ब्लॉग लिहितो.

टीप - वरती जे सगळे इझम्स मी लिहिलेत, ते सगळे मला कळलेत अशातला भाग नाही, पण मी वाचलंय थोडं थोडं. उगाच स्वतःची थोडी लाल करावी म्हणून इथे खरडले.

ता.क. - पण काहीही म्हणा, मला ऍब्झर्डिझमबद्दल फार उत्सुकता वाटते. बाकी आता टेन्शन गेलंय. फार जास्त फलसफे दिले की देणार्‍याचं टेन्शन जातं. द स्ट्रेंजर आता मात्र वाचणारच. फार झालं!

7/18/2010

पुणं आणि मी

पुणं. नाव घेतलं की एकदम भरीव काहीतरी म्हटल्यासारखं वाटतं. दोन अक्षरांचा शब्द, पण त्यात जो भरीवपणा मला जाणवतो तो, तिथल्या माझ्या जन्मामुळे की माझ्या आजोळामुळे की त्या स्थानाच्या एकूणच महात्म्यामुळे हे मला कळत नाही.

पुणं प्रसिद्ध झालं, ते पेशव्यांमुळे. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान पेशव्यांनी पुण्याला राजधानीचा दर्जा प्राप्त करून दिला. पुण्याची सांस्कृतिक जडणघडण व्हायला हे एक महत्वाचं कारण होतं. पुण्यात ज्ञानदानाचीही जुनीच परंपरा आहे. म्हणूनच पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतात. पुण्यात अनेक मोठे वाडे आहेत. पर्वती, सिंहगड ह्यांनी पुण्याची शान वाढवलीय. च्यायला, मी काय विकिपीडिया एंट्री लिहितोय का! येतो नॉर्मलला.

पुणं म्हटलं, की पुणं तिथं काय उणं हे वाक्य मला पहिलं आठवत नाही! कारण, पुणं माझं आजोळ आहे (हे मी मगाशीच म्हणालो). त्यामुळे असली बाष्कळ वाक्य मला आवडत नाहीत उगाच; निबंधांमध्ये लिहायला वगैरे ठीक आहे. पुण्याची स्पेशालिटी म्हणजे पु.ल. म्हणतात त्याच्यागत 'जाज्वल्य अभिमान', मग तो कुठल्याही गोष्टीचा असो. मला आमच्या आजोबांच्या सदाशिव पेठेमध्ये एकेकाळी असलेल्या एका वाड्यातल्या (भाड्याच्या) दोन खोल्यांचा बरोबर खाली असलेल्या नवरत्न भेळेचा 'जाज्वल्य अभिमान' आहे. का नसावा, आमची मर्जी. अहो लोकांना त्यांच्या वाडीच्या कॉर्नरला असलेल्या उघड्या गटाराचाही जाज्वल्य अभिमान असतो. तसा टेक्निकली मी पुण्याचा नाही. पण माझा जन्म आणि लहानपणच्या प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीतले काही दिवस पुण्यातलेच. त्यामुळे जन्मल्या जन्मल्या जे पाणी लागलंय पुण्याचं ते उतरत नाही. आयुष्य मुंबईत गेलं, त्यामुळे कुठल्याही स्थानाबद्दल प्रेम दाखवण्यासाठी त्या स्थानाला शिव्या घालण्याचा गुणही आपोआप बाणवला. त्यामुळे सहसा कोणी पुण्याला 'एक भिकार' म्हटलं, तर मी 'दहा भिकार' म्हणून मोकळा होतो. कदाचित मुंबईकरांचा 'इफ यू कान्ट बी फेमस, बी इन्फेमस' हा फंडा असावा. कारण, मी नेहमी पाहतो. मुंबई विरुद्ध दुसरं शहर असल्या विवादांमध्ये सहसा मुंबईकर पडत नाहीत. आणि पडलेच तर ते मुंबई कशी भिकार आहे हेच वर्णन करून समोरच्याच्या आर्ग्युमेंट मधली हवा काढून घेतात. असो, विषयांतर होतंय.

तर पुणेकरांना कशाचा ना कशाचा जाज्वल्य अभिमान असतो. आता ही बाब अगदी हल्लीची पिढीही इमानेइतबारे पाळतेय, हे मला माझ्या ह्यावेळच्या पुणे ट्रीपमध्ये दिसलं, आणि भरून आलं. 'दुर्गा कॅफे' बद्दल मी ह्यापूर्वीच उल्लेख केलाय, त्याशिवाय जर्मन बेकरी पासून स्वाद अमृततुल्य पर्यंत 'जाज्वल्य अभिमान' देखील चक्क युवापिढीला असलेले पाहिले. वैशाली, रुपाली आणि वाडेश्वर ह्या हॉटेलात जाणारे कधीही 'आपलं नेहमीचं' हॉटेल सोडून दुसर्‍या हॉटेलात पाय ठेवत नाहीत. पुणं बदललं नाहीय हे जाणवलं.

पुन्हा पुण्याची दुसरी खासीयत म्हणजे वादविवादाची विलक्षण हातोटी. हा गुण माझ्यातही आहे, पण ती पुण्याची देणगी आहे हे मला पु.लं.नी सांगितल्यावर कळलं. उदाहरण देतो, मी आणि माझा माझ्याच वयाचा भाचा दोघेजण गप्पा मारत होतो. तो फुटबॉलचा फॅन आहे. खरं सांगायचं म्हणजे त्याला जेन्युईनली फुटबॉलमधलं बरंच कळतं. आमचं ज्ञान म्हणजे इथून तिथून ऐकलेलं. पण जेव्हा तो म्हणाला की मी चेल्सीचा फॅन आहे, झालं मी लगेच चेल्सीचा विरोधक झालो. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली, की मी आपण अजूनही इंग्रजांचे मानसिक गुलाम कसे आहोत, ज्यामुळे आपण आंग्ल फुटबॉल टीम्सना सपोर्ट करतो, देशी खेळांची आपल्याला पर्वाच नाही, हॉकीला वाली नाही इथपर पोहोचलो. मग मला स्वतःलाच जाणवलं आणि मी आवरलं. माझा भाचा शॉकमध्ये किती वेळ होता माहित नाही. पण अर्थात तो पुणेकर असल्याने त्यालाही चेल्सीचा 'जाज्वल्य अभिमान' आहे, तो माझ्यासारख्या अर्धपुणेकरामुळे सोडायचा नाही. बाकी, मी स्वतः आर्सेनल ह्या दुसर्‍या आंग्ल फुटबॉल टीमचा पार्टटाईम समर्थक(इथे 'जा.अ.' अभिप्रेत आहे) आहे, पण वादाच्यावेळी वाद, तेव्हा असले आत्मघातकी मुद्दे पुढे आणायचे नसतात. एरव्हीही मी क्रिकेटपेक्षा फुटबॉल कसं चांगलं आहे आणि रग्बीपेक्षा कबड्डीत कसा जास्त कस लागतो वगैरे फुटकळ वाद घालतो, पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी.

पुण्याची महत्वाची खासीयत म्हणजे तिरकस बोलणे. आणि हे तिरकस म्हणजे बुद्दिबळातल्या उंटाहूनही तिरकस. अगदी समोरचा लाजेने पाणीपाणी होईस्तो. पुन्हा शब्दनिवड इतकी अचूक की किमान शब्दांत कमाल अपमान. म्हणजे आता बघा, एखादा पुणेकर कुणाच्या घरी गेला आणि समोरच्याने चहा-पाणी वगैरे केलं, की ह्यांची एक कॉमेंट, "तुमच्यात कुणाला डायबिटीस आहे वाटतं." आता काही गरज ह्या वाक्याची! सगळं यथास्थित झालंय, तरी. हा गुण त्या पवित्र पुणेरी पाण्यातून माझ्यातही उतरलाय, हे मला कधीकधी जाणवतं. एकदा आम्ही कॉलेजातले मित्र बर्‍याच दिवसांनी भेटत होतो, सगळॅ नोकर्‍या करत होते. भेटलो आणि पाहिलं तर एका मित्रानं केस बरेच वाढवले होते. प्रतिक्षिप्त क्रियेगत माझ्या मुखकमलातून शब्द बाहेर पडले, "चला रे आपण वीस रुपये कॉन्ट्रिब्यूट करू!" बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं आणि त्या पाण्याच्या ताकदीची खात्री पटली.

तुसडेपणामध्येसुद्धा पुणेरी लोकांचा हात धरणं अशक्य. त्यात पण पुणेरी दुकानदार असेल तर दुधात साखर. समोरच्याचा पाणउतारा करायचाय, तर पुणेकर दुकानदार हवा. ह्यांच्या दुकानात सर्वांत दुर्लक्ष करण्याजोगी वस्तू म्हणजे गिर्‍हाईक हे पु.लं. नी सांगून ठेवलंय.

"ओ भाऊ, जरा शर्टपीस दाखवता का?"एक गिर्‍हाईक.

दुकानदार वरपासून खालपर्यंत न्याहाळेल गिर्‍हाईकाला आणि म्हणेल, "तुमचं बजेट काय आहे सांगा, फार महाग आणि फार स्वस्त माल आम्ही ठेवत नाही."

आता मला सांगा, एखादी वस्तू आमच्याकडे नाही, हे सांगायला अभिमान कोणाला वाटेल, पण पुणेकर दुकानदारांना नक्की वाटतो.

अहो अगदी आजही जगप्रसिद्ध मिसळवाल्यांकडे जा, जर दुकानात मिसळ असेल, तर ते तुम्हाला उपकार केल्यागत वाढतील आणि नसेल तर विजयी मुद्रेने, "आजचा माल संपला आता उद्या" हे सांगतील.

'आमची कोठेही शाखा नाही' ही पुणेकरांच्या जाज्वल्य अभिमानाची आणखी एक ओळख. भैये तर अगदी केळ्यांच्या गाड्यासुद्धा शाखा असल्यागत प्रत्येक कोपर्‍यावर लावतात. आणि सहकाराने धंदा करतात. पण पुणेकरांना शाखा असण्यापेक्षा नसण्याचाच अभिमान जास्त. अगदी आजच्या तरूण पिढीचा हॅपनिंग स्पॉट 'दुर्गा कॅफे'वरही मी 'आमची कोठेही शाखा नाही' हे वाक्य वाचलं आणि मला गहिवरून आलं. पुण्याच्या पाण्याचा महिमा पटला.

पुण्यातल्या दुचाक्या हे एक अजब प्रकरण आहे. आपला सिग्नल हिरवा झाला की नाही, ह्यापेक्षा अलिकडच्यांचा सिग्नल पिवळा झाला का, हे पाहून गाडी चालवणारे बहुधा फक्त पुण्यातच सापडतील. सिग्नलला झेब्रा क्रॉसिंग ही टेम्पररी पार्किंग असल्याच्या थाटात फक्त पुणेकरच उभे राहू शकतात. मला तर कधी भीती वाटते, की झेब्रा क्रॉसिंगवर चालल्याबद्दल एखाद्या पादचार्‍यालाच फाईन पडेल. सिग्नलला ट्रॅफिक कंट्रोल करण्याऐवजी, सिग्नलपुढे एका झाडामागे लपून उभे फक्त पुण्याचे ट्रॅफिक पोलिसच राहू शकतात(अर्थात हल्ली हा रोग मुंबईतही वेगाने पसरतोय). आणि दिवसांत किती जास्त गिर्‍हाईकं नाकारली त्यावरच पुण्याचे रिक्षावाले आपली कमाई मोजत असावेत. सगळ्यात स्पेशल म्हणजे दुचाकीस्वार. बाकी, दुचाकीला 'गाडी' म्हणण्याचं औद्धत्य फक्त पुणेकरच करू जाणोत. रस्ता हा आपल्या तीर्थरुपाचा असल्यागत कुठेही न पाहता चालवणे आणि मोटो जीपी मधल्यागत तिरकी करून 'गाडी' वळवणे हे फक्त पुणेकरच करू जाणोत. मजकडे अजूनही लायसन्स नसल्याने आणि मी मुंबईच्या वाहतुकीत लहानाचा मोठा झाल्याने मी ह्या बाबतीत अजून पुणेकर नाही, हा उर्वरित अर्धा भाग असावा.

बाकी एक गोष्ट मात्र मी मान्य करतो की कितीही तिरकस आणि कितीही तुसडे असले, तरी एक पुणेकर दुसर्‍या पुणेकराबद्दल आकस ठेवत नाहीत. भले ते नियमांचा मान राखणार नाहीत पण पुणेकरांचा मान राखतात. मी माझ्या भाच्याच्या 'गाडी'वर मागे बसलो होतो. तो पुणेरी बेफिकीरीने गाडी चालवत होता. एका वळणाला समोरून दुसरा पुणेरी 'गाडी'स्वार आला. आणि अपेक्षेप्रमाणेच दोघेही एकमेकांना ठोकता ठोकता राहिले. मी काळजीत पडलो, म्हटलं झालं आता. भांडण होणार. पण फक्त एक छोटीशी नेत्रपल्लवी झाली आणि दोघंही आपापल्या मार्गाने निघाले. दोघांपैकी एक जरी पुणेकर नसता तरी भांडण संभवत होतं. मला वाटतं, आधी 'गाडी' घालण्यावरूनच त्यांना एकमेकांच्या पुणेकर असण्याची खात्री पटली असावी. कारण, एवढ्या उद्दामपणे चुकीच्या बाजूने गाडी फक्त पुणेकरच दामटवू शकतो. पुणेकरांची आपापसातली आपुलकी पाहून मला आनंद वाटला.

पुणेरी तिरकसपणा आणि पुणेरी दुचाकी ह्यांच्यावरचा एक छान विनोद नुकताच वाचनात आला(बाकी पुणेकरांच्या नावावर जेव्हढ्या दंतकथा आणि जेव्हढे विनोद खपतात तेव्हढे अमेरिकन रेडनेक्स आणि सरदारजींवरही निघत नसतील. पण ह्या गोष्टीचाही कुणाला जाज्वल्य अभिमान असू शकतो. उदाहरणार्थ, पुण्याच्या IPL टीमची खिल्ली पुणेकरांनीच जास्त उडवली. असो.) -

एकदा कर्वे रस्त्यावरून एक दुचाकीस्वार वायुवेगाने गाडी चालवत जात असतो. तेव्हा पदपथावरून चालणारे एक पेन्शनर जोरात ओरडतात,

"ओ कर्वे, कुठे निघालात?"

तो तरूण एकदम गाडी थांबवतो आणि म्हणतो, "मी कर्वे नाही."

"मग तीर्थरूपांचा रस्ता असल्यागत गाडी कशाला दामटताय?"

7/14/2010

साखळी

ही कथा मला का सुचली ते ठाऊक नाही. पण अचानक लिहावंसं वाटलं आणि लिहिता लिहिता पूर्ण झाली. मी कधी ड्राफ्ट्स ठेवायचे नाहीत असा एक पण केलेला आहे, त्यामुळे जशी आहे तशीच पब्लिश करतोय. काहीही न कळण्याचीही शक्यता आहे. एक प्रयत्नच आहे, तेव्हा चुका असतीलच. चांगलं-वाईट आवर्जून सांगा मात्र!

आणि हो, ह्यातल्या कुठल्याही पात्राचा किंवा घटनेचा, जीवित किंवा मृत व्यक्तिशी वा प्रत्यक्ष घडलेल्या कोणत्याही घटनेशी कसलाही संबंध नाही. संपूर्ण कथा काल्पनिक आहे.

त्यानं डोळे उघडले. पण डोळ्यासमोर मिट्ट काळोख. चारी दिशांना भयाण शांतता. क्षणभर त्याला कळतच नव्हतं, आपण कुठे आहोत. एकदम त्याच्या डोळ्यांसमोर सगळा घटनाक्रम आला.

----------

पवन, कॉलेजचा सुपर कूल ड्यूड. सगळ्या पोरांचा आदर्श. कॉलेजच्या सगळ्या पोरी पवनच्या मागे आणि पवन मात्र सगळीकडेच पुढे पुढे. कॉलेजचा सगळ्यात लोकप्रिय मुलगा पवन, कॉलेजचा कल्चरल सेक्रेटरी पवन, कॉलेजच्या सगळ्या एक्स्ट्रा-करिक्युलर ऍक्टिव्हिटिजमध्ये पुढे पवन. बस पवन, पवन, पवन. कॉलेज कॅम्पसच्या गेटपासून वर्गातल्या बेंचपर्यंत पोहोचताना पवन किमान २०-२५ लोकांना हात करत असेल. शैक्षणिक कारकीर्दही दैदिप्यमान नसली तरी वाखाणण्याजोगी होतीच. स्पोर्ट्समध्येही आवडीने भाग घेणारा. अगदी कॉलेज स्टाफच्याही जीवनाचा अविभाज्य भाग बनला होता पवन. त्या दिवशी शेवटच्या सेमिस्टरचा निकाल होता. पवनच्या डोळ्यांत अश्रू होते. आयुष्यातलं एक पर्व संपलं होतं. आता बाहेरच्या जगात पाऊल ठेवायचं होतं. नव्या जोमाने, नव्या ईर्ष्येने. प्रिन्सिपलनीही डोळ्यांत अश्रूंसहच त्याला निरोप दिला. त्याच्या उज्ज्वल भविष्याची कामना करत.

----------

इन्स्पेक्टर वाळिंबेंच्या पट्ट्याचा सर्र सर्र असा आवाज, फटक्याच्या आवाजाने थांबत होता आणि कैद्याच्या किंकाळीने भैरवी होत होती. असं जवळपास गेल्या अर्ध्या तासापासून चालू होतं. वाळिंबेंचा कंट्रोल सुटला होता. ते दात-ओठ खात त्या कैद्याला तुडवत होते. अचानक कैद्याच्या किंकाळ्या बंद झाल्या. त्यांना काहीतरी चुकल्यासारखं जाणवलं. ते थांबले. कैदी बेशुद्ध पडला होता. त्यांनी हवालदाराला बोलावलं आणि आपण बाहेर गेले. पट्टा टेबलावर टाकला आणि सुस्कारा टाकत खुर्चीत बसले. रात्रीचे दहा वाजत होते. तालुक्याचं ठिकाण असूनही स्मशानशांतता होती. 'कसला तालुका न् कसलं काय, गाव आहे सालं गाव!' मनाशी म्हणत वाळिंबे टेबलावरचा ग्लास उचलून घटाघट त्यातलं पाणी प्यायले. ड्यूटीवरचे बाकी दोन हवालदार पेंगत होते. वाळिंबेंनी टेबलावरच्या लिफाफ्यातला कागद संध्याकाळपासून १५व्यांदा काढून वाचला.

----------

शिर्के पोलिस स्टेशनात तावातावानं भांडत होते.

"अरे मुंबईसारख्या शहरात तुम्ही लोक पासपोर्टची कामं का लवकर करत नाही. मुलाला अशी संधी परत मिळायची नाही."

"हे बघा साहेब, सरकारी कामांची एक पद्धत असते."

इतका वेळ हुज्जत घालून थकलेल्या शिर्केंनी खिशातून ५००ची नोट काढली. त्यांचा मुलगा पोलिस स्टेशनातला टीव्ही बघत होता.

"जोगदंड, ते रजिस्टर आणा पाहू!" दात पसरून हसत सब-इन्स्पेक्टरसाहेबांनी ऑर्डर सोडली.

टीव्हीवर मोनिका बेदीच्या खोट्या पासपोर्ट केसची बातमी चालू होती.

----------

शिर्केंचा मुलगा नुकताच परदेशातून परतून त्याच्या नव्या कंपनीच्या साईटवर रुजू झाला होता. एव्हढ्यातच त्याला त्याच्या आईच्या अपघाती मृत्यूची बातमी समजली. तो धावतपळत घरी पोचला. शिर्केंची बायको मेट्रो बांधकामादरम्यान क्रेन कोसळून झालेल्या अपघातात दगावली होती.

"बाबा, आपण केस करूया. हे लोक काहीही सांगतायत. असा अपघात फक्त निष्काळजीपणामुळेच होऊ शकतो. तांत्रिकदृष्ट्या ते म्हणतायत ते होऊच शकत नाही. मी सांगतो ना बाबा. मी साईटवर क्रेनची खूप कामं बघतो." तो पोटतिडीकीनं सांगत होता. शिर्के नुसतेच शून्य नजरेनं त्याच्याकडे पाहत होते.

----------

वाळिंबेंनी तो लिफाफा खिशात टाकला, पट्टा बांधला आणि पिस्तुल घेऊन ते पोलिस स्टेशनबाहेर पडले. त्यांनी जीप स्वतःच सुरू केली. दोन हवालदार अजून पेंगत होते आणि तिसरा आत लॉकपच्या बाहेर खुर्चीवर झोपला होता.

वाळिंबेंचं मन आता थोडंसं थार्‍यावर येत होतं. त्यांचा निर्णय एकदाचा झाला होता. हळूहळू त्यांचं डोकं पूर्ण शांत झालं. त्या छोट्याश्या तालुक्यात एव्हाना सगळे निद्राधीन झाले होते. वाळिंबे गाडी चालवत हायवेपर्यंत येऊन पोचले. त्यांनी एक टर्न घेतला आणि आता ते हायवेवरून सुसाट निघाले. थोड्याच वेळात दुतर्फा जंगलं सुरू झाली होती. एका विवक्षित ठिकाणी वाळिंबेंनी गाडी हळू केली आणि त्यांनी गाडी झाडीमध्ये घातली.

----------

पवनला हे सगळं अनपेक्षित होतं. एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी म्हणजे आपण आणि आपलं आयुष्य ह्या त्याच्या संकल्पनेला आज छेद गेला होता. अर्थात फक्त कमनशिबामुळेच ही वेळ त्याच्यावर आली होती. त्यानं भल्या पहाटे साईटवर काहीतरी हालचाल पाहिली आणि जवळ जाऊन पाहिलं तर चक्क मृतदेह ट्रान्सफॉर्मरच्या खाली टाकण्यात येत होता. ड्यूटी इंजिनियर म्हणून त्याचीही सही लागणार होती, तो अपघात आहे हे कन्फर्म करण्यासाठी. पोलीस आधीच मॅनेज झाले होते. त्यानं ऐनवेळी भोवळ आल्याचं नाटक केल्यानं त्याला हॉस्पिटलला आणलं होतं. त्यानं सकाळीच पंच केल्यानं कंपनीला त्याची सुट्टी दाखवता येत नव्हती. सही त्याचीच लागणार होती.

पवन आढ्याकडे बघत होता. आज त्याला आईचं तेरावं आठवत होतं.

तो वडलांशी हुज्जत घालत होता.

"पण बाबा का तुम्हाला केस नाही करायची? का तुम्ही असे भेकडासारखे बसून आहात? तुमचं आईवर प्रेम नव्हतं? तिला न्याय नको मिळायला? असं गप्प बसून काय होणार बाबा? बोला काहीतरी."

त्यांच्या शून्य नजरेत अश्रू तरळले.

"आजपासून २२ वर्षांपूर्वी जेव्हा मी म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये होतो. तेव्हा एका फॅक्टरीच्या सांडपाण्यामुळे पाणी दूषित होऊन हजारो जणांना विषबाधा झाली होती आणि शंभरएक लोक मेले होते."

"मग? त्याचा आज काय संबंध?" त्याने रेस्टलेस होत विचारलं.

"फॅक्टरीतून बाहेर पडणार्‍या पाण्यामुळे हे प्रदूषण होत नसल्याच्या रिपोर्टवर तेव्हा मीच साईन केली होती."

पवन धक्का पचवू शकत नव्हता.

"तेव्हा मी तुझ्या आणि तुझ्या आईच्या सुरक्षिततेसाठी सही केली होती. आज कदाचित त्या क्रेनच्या रिपोर्टवर सही करणार्‍याचीही काही मजबूरी असेल. केस करून काहीही होणार नाही. तुझं उर्वरित आयुष्य मात्र कोर्टाच्या चकरा मारण्यात जाईल."

त्याच्या हॉस्पिटलच्या खोलीबाहेर डॉक्टरांचा आवाज ऐकू यायला लागला. त्याचा निर्णय झाला होता.

----------

वाळिंबे एका झोपडीत शिरले. एका कोपर्‍यात पवन अंगाची जुडी करून बसला होता. कंदिलाचा उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडल्याबरोबर तो घाबरला.

"श्श. शांत हो."

वाळिंबे त्याच्या शेजारी जाऊन बसले.

"तुला अभय देण्याचं मान्य केलंय ना आमदार साहेबांनी त्या कंपनीवाल्यांपासून."

त्यानं हताशपणे मान डोलावली.

"तुला कोर्टातून म्हणूनच उचलून आणलं आम्ही, नाहीतर तुझा कोर्टात गेम करायचा प्लॅन होता कंपनीवाल्यांचा. अरे येड्या तुझ्या साक्षीनं करोडो रुपयांचं नुकसान नसतं का झालं!"

त्याला काहीच समजत नव्हतं.

वाळिंबेंनी एक दीर्घ श्वास घेतला. खिशातून तो लिफाफा काढला आणि त्याला वाचायला दिला.

"बिळातल्या उंदराला संपवा आणि कारखान्यावर नेऊन गरम पाणी ओता. लाल घूस मेली म्हणून सांगणे." पवननं प्रश्नार्थक नजरेनं वर पाहिलं. वाळिंबेंनी बंदूक त्याच्यावरच रोखली होती.

----------

इन्स्पेक्टर वाळिंबेंचं नाव पेपरात छापून आलं होतं. त्यांनी तालुक्याच्या ठिकाणापासून थोड्या दूर असलेल्या बंद कारखान्यावर झालेला नक्षली हल्ला परतवला होता. नक्षल्यांनी बरंच धातूचं सामान चोरलं होतं, पण चकमकीत एक महत्वाचा नक्षली नेता ठार झाला होता. पण चकमकीतच कारखान्याला भीषण आग लागली होती. त्यांना आमदारसाहेबांनी खास बंगल्यावर बोलावलं होतं. आमदार साहेब खूष होते. मुंबईतल्या मेट्रो अपघातामध्ये कंपनीला द्यावी लागलेली भरपाई आमदारसाहेबांनी चतुराईने गावाकडच्या बंद कारखान्याच्या इन्शुरन्समधून मिळवून दिली होती. त्यांना त्यांचा 'कट' मिळाला होता. पुन्हा मोठा नक्षली नेता ठार झाल्याचंही सांगता येत होतं. दिवस झक्क होता अगदी. वाळिंबेंना पदकाचं वचन देऊन त्यांनी निरोप दिला.

----------

हळूहळू पूर्वेकडे फटफटायला लागलं होतं. इतका वेळ असलेला मिट्ट काळोख आता सुसह्य झाला होता.

'ही मालबोट थोड्याच वेळात चेन्नईला पोहोचेल. मग पुन्हा नवी सुरूवात. पुन्हा सर्व तेच. काही गरज आहे का ह्या सर्वांची?' पवनचं विचारचक्र फिरत होतं. त्याला तो संवाद पुन्हा आठवत होता.

त्या रात्री त्यानं पत्र वाचून वर पाहिलं आणि वाळिंबेसाहेबांनी गोळी चालवली. त्यानं घाबरून मागे पाहिलं. एक गावकरी मरून पडला होता.

"हा आमदाराचा इन्फॉर्मर आणि गाववाल्यांचा शत्रू होता." वाळिंबे शांतपणे म्हणाले.

"पण तुम्ही?"

" हे बघ. प्लॅन काय आहे, तो मी तुला समजावण्यात अर्थ नाही. तू फक्त एव्हढंच समज, की तू मेलायस."

तो एका वेगळ्याच नजरेने त्यांच्याकडे पाहत होता. त्यांना राहावलं नाही.

"जसा तू एक मोहरा आहेस, तसाच मीही एक मोहरा आहे. एक प्यादं. ह्या मोठ्यांच्या बुद्धिबळातलं. आपल्या अस्तित्वाला किंमत नाही. आपण ह्या लोकांसाठी आपलं उभं आयुष्यही उद्ध्वस्त झालं तरीही गप्प राहायचं. हाच नियम आहे. मीही तोच नियम आजवर पाळत होतो. डोळे मिटून. पण तू जे केलंस. ते पाहून मी आतल्याआत हललो. मला स्वतःचीच शरम आली. तुला न्यायालयातून आणल्यावर मी जरा आनंदलो होतो आणि मग ही ऑर्डर आल्यावर मी पिसाटलो. सगळा राग एका कैद्यावर काढला. मग थोडा शांत झालो आणि निर्णय घेतला. आज मी एक चांगलं काम करणार.

पण एक लक्षात ठेव. मी तुला फक्त जीवन देऊ शकतो, न्याय नाही. आता पुढे तूच ठरव, तुला न्याय हवाय की जीवन."

उगवतीच्या सूर्याकडे पाहत पवन पुटपुटत होता.

"तुला न्याय हवाय की जीवन...तुला न्याय हवाय की जीवन..." हेच शब्द त्याच्या वडलांच्या त्याला उद्देशून लिहिलेल्या स्युसाईड नोटमध्ये होते.

क्षणार्धात समुद्रात किंचितशी खळबळ झाली. एका जागचं पाणी डचमळलं आणि पुन्हा शांत झालं. त्यानं निवड केली होती.

-समाप्त-

7/11/2010

हिंदी, उर्दू, हिंदुस्थानी आणि बरंच काही

परवाच अमिताभचा (जुना) दीवार बघत होतो (तोच तो, 'मेरे पास मां है' वाला). अमिताभचे डायलॉग्ज कसले एक से एक.

"तुम लोग मुझे ढूंढ रहे हो, और मैं तुम्हारा यहां इंतज़ार कर रहा हूं।"

"यह ताला मैं तुम्हारी जेब से चाभी निकालके खोलूंगा पीटर।"

"मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता।"

"अगले हफ्ते एक और कूली पैसे देने से इन्कार करनेवाला है।"

"दोस्तोंके नाम भी हुआ करते हैं।"

"क्या तुम सोचते हो की यह काम तुम अकेले कर सकते हो?" "मैं जानता हूं की यह काम मैं अकेले कर सकता हूं।"

असले एक से एक डायलॉग्ज, प्रत्यक्षात वाचताना पानीकम वाटतात. त्यावरच एकदा सलीमचा किंवा जावेदचा इंटरव्ह्यू झाला होता(आठवत नाही नक्की कुणाचा). तो म्हणाला होता, की आम्ही लिहिले तेव्हा हे पंचलाईन म्हणून नव्हते लिहिले. अमिताभने त्यांना पंचलाईनमध्ये रुपांतरित केलं. मग मी विचार करत होतो, की अमिताभची ह्या भाषेवर किती चांगली पकड आहे. मग मी पुढे विचार केला, कुठली भाषा? हिंदी की उर्दू? की दोन्ही. अमिताभ काय म्हणत असेल ह्या भाषेला. सिनेमाची भाषा सर्टिफिकेटवर हिंदी म्हणून येते, पण इंतज़ार, इन्कार हे शब्द हिंदी प्युरिस्ट्स मान्य करणार नाहीत. मग? मग मी थोडासा काळामध्ये मागे गेलो.

माझ्या डोक्यात हिंदू-मुसलमान आणि भारत-पाकिस्तान ह्या गुंतागुंतीच्या संबंधांचा खूप मोठा कीडा आहे. मला ह्या संबंधांमधल्या दोन्ही बाजूंबद्दल माहित करायची जाम हौस. ह्या हौसेखातरच मी काही महिन्यांपूर्वी ऑर्कुटवर 'इंडिया ऍन्ड पाकिस्तान' नामक एका कम्युनिटीचा भाग झालो. असल्या कम्युनिटी सहसा द्वेषपूर्ण असतात, म्हणूनच पहिल्यांदा काही टॉपिक्स पाहिले आणि कचरा थोडा कमी आहे पाहून मी मेंबर झालो. एकंदरच तिथे मध्यममार्गी लोकांचा वावर अधिक होता, पण तरीही 'तिकडचे' लोक आपल्या मूळ स्वभावाला सहसा जागतच होते. 'आपली' माणसं सहसा मॉडरेट स्टॅन्ड घ्यायची, मग हे लोक थयथयाट सुरू करायचे. अर्थात, त्यांच्यातही मध्यममार्गी होते; सामोपचाराने बोलणारे, पण अर्थात त्यांची संख्या नगण्य होती. विषय काहीही असू दे, कला, क्रीडा, राजकारण सगळीकडे 'आम्ही, आम्ही आणि फक्त आम्ही', 'तुम्ही सगळं आमच्याकडून घेता किंवा घेतलंय' अश्या आषयाची विधानं करण्यात हे लोक स्पेशालिस्ट. सगळ्यात अल्टिमेट विधान म्हणजे, 'तुमच्याकडे चांगले गायक नाहीत, कॉमेडीयन नाहीत, म्हणून तुमच्या रिऍलिटी शोजमध्ये आमची माणसं बोलावता." आणि माझं पर्सनल फेव्हरेट म्हणजे, "१९६५, १९७१ आणि कारगिल" तिन्ही युद्ध पाकिस्ताननंच जिंकली, भारतानं फक्त प्रोपॅगॅन्डा केला. मला एकंदर जाम मजा यायची. मग एकदा माझा जिव्हाळ्याचा विषय आला. सिनेमा. मग तिथे एका मुलीनं म्हटलं की, तुम्ही तुमच्या सिनेमांमध्ये, 'तुमची हिंदी' वापरायचं सोडून 'आमची उर्दू' वापरता. हे ऐकून मी चाट पडलो. 'ह्यांची' उर्दू? उर्दू आमची नाही? पण मी गप्प बसलो. शांतपणे मी तिला विकिपीडियाची लिंक दिली, ज्यात 'हिंदी आणि उर्दू ह्या दोन भाषा नसून एकच भाषा आहेत, फक्त राजकीय आणि धार्मिक कारणांमुळे वेगवेगळा शब्दसंग्रह वापरून दोन भाषा असल्याचा आभास निर्माण केला जातो' असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. इव्हन मलेशिया सारख्या देशातही हिंदी/उर्दू ह्या भाषेला हिंदुस्थानी/हिंदुस्तानी ह्या एका नावानेच ऑफिशियली रेकग्नाईज केलेलं आहे. मुळात ह्या आजच्या हिंदी/उर्दू म्हणजे अवधी, लखनवी आणि खडी बोली ह्या तीन भाषांचं मिश्रण आहेत. त्यामध्ये एकात संस्कृतचा तडका दिलाय आणि दुसर्‍यात फारसीची फोडणी. ह्या विषयावर आजवर केलेल्या वाचनातून माझ्या अल्पमतीला एव्हढंच कळलंय. काही चूकही असेल. जाणवलं, तर कृपया सांगा.

तर ह्या मुद्द्यावर ती बया भडकली. मला म्हणाली, 'अगर मैं कसरत के साथ उर्दू का इस्तेमाल करूंगी, तो तुम्हें इस तो क्या अगले जनम में भी समझ नहीं आयेगा'. मी म्हटलं बये, 'तू जनम हा जो शब्द वापरतेयस तो संस्कृत शब्दावरून आलेला आहे, बाकी तू फारसीत फाडाफाड केलीस, तर ती मला समजणार नाहीच. पण ती चीटिंग होईल.' पुढे मी तिकडे गेलो नाही. कारण ती फारच कट्टरतावादी पोरगी आहे, हे तिच्या बाकी थ्रेडवरच्या प्रश्नोत्तरांवरून मला जाणवलं. पण हा कीडा डोक्यात राहिला. उर्दू की हिंदी, आपले सिनेमे नक्की कोणत्या भाषेत असतात. मी क्लिअर होतो, की ही हिंदुस्थानीच आहे, ना हिंदी धड ना उर्दू. मग मी प्रत्येक डायलॉग लक्षपूर्वक ऐकू लागलो. "हमारे वतनपरस्त नौजवानों ने अपना कर्तव्य पूरा करनें में कोई कसर नहीं छोडी।" ह्यात 'कर्तव्य' हा संस्कृत शब्द आहे, पण वतनपरस्त, कसर हे फारसी उद्भव शब्द आहेत. म्हणजे हा हायपोथेसिस की आपली भाषा एकच आहे, बर्‍याच अंशी खरा आहे. वेगवेगळ्या लिपीत लिहिली, म्हणून भाषा बदलत नाही. पुन्हा एक गोष्ट जाणवेलच, की सुरुवातीच्या काळात गीतकार, कथाकार आणि संवादलेखक हे सहसा मुस्लिम असायचे, त्यामुळे फारसीउद्भव शब्दांची रेलचेल असायची. त्यातून उर्दू(फारसी शब्दसंग्रहयुक्त हिदुस्थानी) ही स्वातंत्र्यापूर्वीपासूनच मुशायरे वगैरेंमुळे अगदी हिंदूंमध्ये सुद्धा भाषासौंदर्यामुळे लोकप्रिय होती. म्हणूनच गुरूदत्तही उर्दूचा पंखा होता(प्यासातल्या गाण्यांमधले कित्येक शब्द मला कळत नाहीत) आणि राजकुमार(अभिनेता) कधीही उर्दूतच बोलायचा. पण मग फाळणीमुळे कटुता वाढली. पाकिस्तानने उर्दूला स्वतःची राष्ट्रभाषा म्हणून भारतात बदनाम केलं. लिपीमुळे एका भाषेचे दोन तुकडे पाडले गेले. पण तरीही हिंदी सिनेमात उर्दू त्याच स्थानी राहिली. पुढेपुढे हिंदी शब्दांची जागा इंग्रजी शब्दांनी घेतली, तरी उर्दूची जागा अटळ राहिली. त्यामुळेच ती बया माझ्याशी भांडायला बसली. असो. तर मुद्दा हा की आपल्या हिंदी सिनेमांमुळे पब्लिकचं उर्दू सुधारलं.

मी शाळेत होतो, तेव्हा पाचवी आम्हाला पहिल्यांदा हिंदी आलं. मला फार आवडली ती भाषा. त्यामुळे मी 'राष्ट्रभाषा सभे'च्या चार परीक्षा दिल्या. आठवीत हिंदी सोडून संस्कृत(स्कोरिंग होतं) घेऊनही, मी आठवीतही राष्ट्रभाषा सभेची परीक्षा दिली. हिंदीच्या वर्गातल्या मित्राकडून उधारीवर पुस्तक आणून दिली. मग पुढच्या वर्षी मात्र ते पुस्तक उधारीवर आणणं जीवावर आलं, म्हणून परीक्षा दिली नाही. तर मुद्दा हा, की मला हिंदीची आवड होतीच, त्यामुळे कठीण गेली नाही. पण बर्‍याच पब्लिकची गोची व्हायची. उदाहरण सांगतो, एका मित्रानं, परीक्षेमध्ये 'चमन' ह्या शब्दाला समानार्थी म्हणून 'टकलू' असं लिहिलं होतं. दुसरी एक मुलगी एकदा बाईना म्हणाली, 'कल मैं मां-बाबा के साथ बहार गयी थी।" मग बाई आपल्या तिला १५ मिनिटं बहार आणि बाहर मधला फरक समजावत होत्या. मी काही फार शहाणा नव्हतो. मीही लोचे करायचो, पण आपलं ठेवावं झाकून, दुसर्‍याचं पहावं वाकून. (त्यातला माझा एक 'नहीं सोडूंगा' वाला किस्सा मी पूर्वी कबूल केलाय, नाही असं नाही.)

तर मुद्दा पुन्हा तोच. चमन आणि बहार हे दोन्ही शब्द उर्दू आहेत असं उर्दू प्युरिस्टही म्हणतील. मग ते आमच्या हिंदीच्या पुस्तकात कसे? उत्तर सोपं आहे. ते हिंदीचं नाही, हिंदुस्थानीचं पुस्तक आहे. पुस्तकाला नाव चुकीचं आहे. असो. ह्यात बरेच वाद-उपवाद आहेत. माझ्यासारख्या सामान्य, वरवरच्या अभ्यासकाला जे कळलं, ते इथे लिहिलं.

जाता जाता, हिंदी सिनेमाने जनतेवर किती प्रभाव टाकला, ह्याची काही उदाहरणं. यश चोप्राप्रभृतींच्या पंजाबी(हिंदी ह्या नावाखाली खपवलेल्या) सिनेमांमुळे, इथे मिलानमध्ये माझे काही पंजाबी पाकिस्तानी मित्र आहेत; त्यांचं आपापसातलं बोलणंही मला ७० टक्के कळतं(टक्केवारी कशी काढली ते प्लीज विचारू नका).

दुसरं, मी ७-८वीत होतो. माझ्या बाकावर माझ्या शेजारी बसणार्‍या मुलाचं इतिहासाचं पुस्तक बाकावर ठेवलेलं होतं(मी माझं पुस्तक घरीच विसरलो होतो). त्यानं पुस्तकातल्या विविध मोठ्या माणसांच्या चित्रांना मुकुट, टोप्या आणि स्त्रियांना दाढी-मिशा वगैरे बरंच चित्रकाम केलं होतं. त्यातून बर्‍याच आकृत्यांखाली कल्पक मेसेजेसही होते. असाच एका पगडीवाल्या(टिळकांसारखी पगडी, नाव नेमकं आत्ता आथवत नाहीये) माणसाला सरदारजीसारख्या दाढीमिशा काढलेल्या होत्या. त्याचा एक डोळा काळा करून टाकला होता आणि खाली मेसेज लिहिला होता, "पंजाबी कूडा आंख मारे।" माझा क्षणभर माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना. मी त्याच्याकडून कन्फर्म केलं, की तू हे नक्की काय लिहिलंयस.

तो म्हणाला, "पंजाबी कूडा आंख मारे।"

मी म्हटलं "म्हणजे(मला कळलं होतं काय घोळ झालाय ते, पण मला त्याच्याकडून वदवून घ्यायचं होतं)?"

तो म्हणाला, "कूडा म्हणजे पंजाबीत मुलगा."

मी गप्प बसलो. त्यानं कुडी म्हणजे मुलगी ह्यावरून कूडा म्हणजे मुलगा असा शोध लावला होता(हा "दिलवाले दुल्हनिया.." इफेक्ट होता). पण तो हे विसरला (आणि माझ्या पक्कं लक्षात होतं) कूडा म्हणजे कचरा. तसं बघायला गेलं तर मलासुद्धा हे सगळं कळायची काही गरज नव्हती. पण तीच गाणी पुन्हा पुन्हा ऐकून माझं पंजाबी सुधारलं होतंच.

7/08/2010

सावरकर आणि आपण

लालभडक ते नेत्र चमकती, हस्त स्फुरती धीर मना।

श्री दामोदर सिद्ध जाहला जायालागी खलशमना॥

कांता वदली, कांता जाता देशहिताला करावया।

पतिराया घ्या निरोप जावे त्वरित कीर्तीला वरावया॥

लहानपणी १३-१४व्या वर्षी कधीतरी वाचलेल्या ह्या सावरकरांच्या ओळी न जाणे कश्या माझ्या स्मृतिपटलावर अगदी कोरल्या गेल्यात. तेव्हा काय वाचत होतो, तेही आठवत नाही. पण अगदी कोवळ्या वयात(वयाच्या चौदाव्या वर्षी) सावरकरांनी दामोदर चाफेकरांवर रचलेल्या पोवाड्याच्या ह्या ओळी जश्याच्या तश्या तोंडपाठ आहेत. आजही कुठे लालभडक हा शब्द वाचला, की ह्याच ओळी ओठांवर येतात. इतक्या लहान वयातही सावरकरांची देशभक्ती आणि काव्याची समज थक्क करून सोडते. ह्या ओळी जोवर लक्षात आहेत तोवर 'मला किती चांगलं सुचतं' हा माज़ कधी चढण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

आज पुन्हा ह्या ओळी ओठांवर येण्याचं कारण म्हणजे आज ८ जुलै. सावरकरांच्या जगप्रसिद्ध उडीला आज १०० वर्षे पूर्ण झाली. ८ जुलै, १९१० ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मार्से ह्या फ्रेंच बंदरात जहाज असताना, शौचालयाच्या छोट्याश्या खिडकीतून उडी मारली. अनेक दिवसांच्या कुपोषणाने आणि वाईट वागणुकीने खंगलेल्या सावरकरांनी तश्यातच फ्रेंच किनारा गाठला आणि आंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत अभय मिळवायचा प्रयत्न केला. पण ब्रिटीश पोलिसांनी फ्रेंच पोलिसांना लाच देऊन गोर्‍यांच्या एकतेचं दर्शन घडवलं. त्यानंतर हा खटला गाजला. ह्यात फ्रेंच सरकारची नाचक्की झाल्यामुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात हा खटला सावरकरांच्या बाजूने लावून धरला. जगभरच्या लोकशाहीवाद्यांनी रान उठवलं, पण साम्राज्यशाहीचाच विजय झाला आणि ब्रिटीशांनी सावरकरांना अजून त्रास द्यायला सुरूवात केली. ही सगळी माहिती आणि ह्याहूनही जास्त माहिती आज तुम्हाला अनेक ब्लॉग्जवर किंवा काही मराठी/इंग्रजी/हिंदी वृत्तपत्रांमध्ये वाचायला मिळेल. मला आज खूप बरं वाटतंय हे जाणून की खरंच सावरकरांबद्दलची जागरुकता थोड्याफार प्रमाणात का होईना वाढतेय. माझ्या नजरेतूनच मी गेली दहा वर्षं तरी नियमित वृत्तपत्रं वाचतोय. पण आज नेटच्या युगाने सावरकरांबद्दलची जागरूकता वाढवायला मदत केलीय हे मात्र खरं. ट्विटरवर, ब्लॉग्जवर, फेसबुकवर थोड्या संख्येने का होईना तरूणाई सावरकरांना मानवंदना देतेय, त्यांचे ऋण मानतेय हे ही नसे थोडके. savarkar.org च्या माध्यमातून काही जणांनी एक अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू केलाय, हे त्याचंच एक उदाहरण. ह्या सगळ्याचाच परिणाम म्हणजे वृत्तपत्रे आणि प्रसिद्ध वेब पोर्टल्सनी त्यांच्यावरच्या अनेक उत्तम लेखांची घेतलेली दखल.

सावरकर अंदमानच्या जेलमध्ये असताना, त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी बॅरीनं त्यांना मुद्दामहूनच फाशीच्या तख्ताच्या शेजारची खोली दिली. त्यामुळे फाशीच्या वेळचे भयाण आवाज कायम सावरकरांच्या कानावर पडावेत आणि त्यांची जगण्याची इच्छा संपावी. त्यांची ही युक्ती कामीही आली. सावरकरांना जगण्याचा वीट आला. त्यांना वाटलं, काय अर्थ आहे ह्या खितपत जगण्याला. ना मी मायभूमीच्या कामी येऊ शकत ना कुटुंबाच्या. म्हणून त्यांनी मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मृत्यूला बोलावण्यासाठी देखिल एक पद म्हटले. पण मग अचानक त्यांना उपरती झाली. त्यांनी स्वतःला सावरले. मुळात कणखर असलेलं त्यांचं मन ह्या प्रसंगानं अधिकच कणखर झालं. त्यांनी तुरूंगातल्या कैद्यांसाठी काही करायचं ठरवलं. त्या माध्यमातूनच देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. मग त्याही कोठडीत त्यांनी स्फूर्तिगीतं लिहिली. मृत्यूच्या नावालाही घाबरणारे आपण त्यास्थितीत काय करू शकलो असतो. अर्थात त्या स्थितीत पोचण्यासाठी त्यांनी जे केलं होतं, ते करण्याचीही आपली औकात नाही. पण त्याही परिस्थितीत ते घाबरून मृत्यूला कवटाळत नव्हते. 'ये मृत्यो, ये' म्हणत होते. निरुद्देश आयुष्याचा अंत शोधत होते. पण ते त्या मनःस्थितीतूनही बाहेर आले. मृत्युंजय ठरले. कदाचित मृत्यूनेच त्यांची समजूत काढली असेल. कारण शेवटीही मृत्यू त्यांच्याच आदेशाने त्यांना घेऊन गेला.

आज जेव्हा स्वातंत्र्याच्या ६० हूनही जास्त वर्षांनंतर नरबळी, हुंडाबळी, जातीय खुनाखुनी, कलियुग का अंत, बाबा, बुवा ह्यांचा सुळसुळाट दिसतो, तो पाहून आज सावरकर असते तर असं वाटल्यावाचून राहत नाही. त्यांचा संदेश होता, धर्म विज्ञाननिष्ठ हवा. आपण धर्म कि विज्ञान ह्या विषयावर वाद घालतो. त्यांचा संदेश होता जातीव्यवस्था नष्ट करा. आपण जातींचे दाखले मिळवण्यासाठी पैसे चारतो, जातीबाहेर लग्न केलेल्या जोडप्यांना मारतो. त्यांचा संदेश होता धर्म ही राजकीय नसून सामाजिक ओळख आहे आणि त्याला त्याच पातळीवर ठेवायला हवं. आपण धर्माचंच राजकारण करतो. त्यांनी सांगितलं होतं, ज्याची पुण्यभू हा अखंड हिंदुस्थान तोच हिंदु मग त्यात धर्म, जात काही आड येत नाही, पण आपण मक्का, काशी, जेरुसलेम आणि व्हॅटिकनमध्ये पुण्यभू शोधत राहतो. त्यांनी सांगितलं होतं भारतमाता हीच माता आणि तीच सर्वस्व. आपण तिचं नग्न चित्र काढणार्‍याला देशात थांबवण्यासाठी त्याच्यापुढे नाक रगडतो.

मणिशंकर अय्यर नामक क्षूद्र कीडा जेव्हा सावरकरांची वचनं अंदमानच्या जेलच्या भिंतींवरून काढतो, तेव्हा त्याला हे कळत नसतं की तो ती वचनं फक्त भिंतींवरून काढतोय. काळाच्या छातीवर सावरकरांनी स्वतःच्या रक्तानं कोरलेली आणि हजारो देशभक्तांच्या हृदयांवर सावरकरांच्या त्यागाने कोरली गेलेली वचनं तो कशी काढणार. भारतमातेच्या नीलसिंधुजलधौतचरणतलांवर उमटलेले तिच्या परमभक्त सुपुत्राच्या मस्तकाचे ठसे पैश्याला चटावलेले तिचे आजचे सारे पुत्र काय मिटवणार. तस्मातच, अनेक भारत सरकारांनी कितीही अनास्था दाखवली आणि मार्सेमध्ये सावरकर स्मारक नाही बनू दिलं, तरीही देशावर प्रेम करणार्‍या प्रत्येकाच्या अंतरात्म्यात जाणते-अजाणतेपणे एक सावरकर स्मारक आहेच, ते बनवण्यासाठी कुणा सरकाराची परवानगीही नकोय आणि ना हरकत प्रमाणपत्रही नकोय.

7/04/2010

फुटबॉल शुटबॉल हाय रब्बा!

२००२
"छ्या राव जर्मनी जिंकायला हवं होतं. " - मी.
"धत्, रोनाल्डो वेड्या रोनाल्डो. कसला खेळतो तो बघितलंस? ब्राझील इस पर्फेक्ट ऍज अ विनर." - मित्र.
२००६
"यार ह्या झिदानला काय गरज होती हेडबट मारायची? तो मातेराझ्झी बोलला असेल काहीपण; ह्याला अक्कल नव्हती का?" - मित्र.
"अरे झिदान फुटबॉलचा देव आहे, कळलं? त्याला कळत नसेल का तो काय करतोय ते? मातेराझ्झीनं खोडीच तशी काढली असेल." - मी.
२०१०
"यार अर्जेंटिना आणि ब्राझील पाहिजे होते रे." - मित्र.
"'तो' गोल डिस्क्वालिफाय झाला नसता ना, तर इंग्लंडने इक्वलाईझ केलं असतं आणि मग जर्मनी कदाचित बाहेर गेलं असतं." - दुसरा मित्र.
"'हट्. जर्मनी...जर्मनी...जर्मनी..." - मी.
हे असले संवाद दर चार वर्षांनी होतात. पण ही मी माझीच गोष्ट करत नाहीये. ही प्रातिनिधिक गोष्ट आहे. आपल्या देशात असे अनेक 'नियतकालिक फुटबॉल वेडे' आहेत. ह्यांच्या फुटबॉल वेडाला वर्ल्ड कप, ऑलिम्पिक किंवा चॅम्पियन्स लीगच्या फायन स्टेजेसच्या वेळी बहर येतो. अश्या वेळी ही जनता आपल्या गल्लीतलीच फुटबॉल टीम खेळायला गेल्यागत तावातावाने चर्चा करते. अगदी आपल्या घरचा कोणी खेळाडू असल्यागत मॅचचं टेन्शन घेते.
"अरे त्याचा टॅकल केव्हढा व्हायोलंट होता आणि नुसती फ्री किक?"
"धत्, अरे बॉल फर्स्ट होता, फ्री किक पण मिळायला नको होती."
"अरे(फुल व्हॉल्युम)..पेनल्टी, पेनल्टी!! काय हे पेनल्टी नाही दिली?"
"अबे पेनल्टी कसली, डाईव्ह केलं साल्यानं. मी तर म्हणतो कार्ड द्यायला हवं होतं डायव्हिंगसाठी."
सहसा दोन 'नियतकालिक वेडे' एकत्र मॅच पाहतात, तेव्हा त्यांनी एकमेकांच्या विरुद्ध टीमला सपोर्ट करणं मॅन्डेटरी असतं. नाहीतर मजा येत नाही. तश्याही ह्यांच्या निष्ठा लवचिक असतात. कारण उगाच कम्प्लीट निष्ठा ठेवली आणि टीम पहिल्याच फेरीत गारद झाली तर उरलेल्या स्पर्धाभर काय करायचं ही पंचाईत. मग अश्या वेळी "माझा पहिला प्रेफरन्स तसा फ्रान्सला आहे, पण काय आहे, मी अंडरडॉग्जना नेहमी सपोर्ट करतो, त्यामुळे घाना पुढे गेली तरी मला आनंडच होईल." असा बॅकप प्लॅन तयार असतो. पण स्पेशालिटी ही की कुणालाही सपोर्ट असला तरी तो दिल से असतो एकदम. म्हणजे पूर्ण भावनिक होऊन.
उदा. "अबे काय गरज होती साल्याला, असा फिअर्स टॅकल करायची. आता कार्ड मिळालं ना. पूर्ण सेकंड हाफ सब्ड्यू होऊन खेळावं लागेल. आणि हा असा घाबरून खेळेल तर गोल कोण करणार. त्यापेक्षा आता कोचनं ह्याला सब्स्टिट्यूट केलं पाहिजे. म्हणजे निदान रेडचं तरी टेन्शन जाईल."
"छ्या, साल्याला स्ट्रेट शूट नाही करता आला. गोलीनं उडीपण चुकीच्या डायरेक्शन मध्ये मारली होती, आणि ह्या मूर्खाने बॉल क्रॉसबारवर मारला."
आता ह्या वाक्यांमधला भावनिक कोशन्ट वाचून लक्षात येणार नाही. त्यामुळे ही वाक्य कश्याच्या तालावर वाचावी ह्यासाठी पुढची उदाहरणं
(२००७ ची २०-२० वर्ल्डकप फायनल)"अरे यार, ह्या हरभजनला बॉलिंग का देतोय धोनी, मिसबाह तुडवतोय. अजून एक ओव्हर दिली तर रिक्वायर्ड रनरेट ६ च्यापण खाली येईल."
"आईला. पहिल्याच बॉलला सिक्स. ह्या जोगिंदर शर्माला सरळ बॉल टाकता येत नाही का? संपलं आता."
तर इतक्या इमोशनली पाहणारे हे फुटबॉल वेडे जरी कुठल्याही टीमला प्रेफरन्स देत असले, तरी प्रत्येक मॅचमध्ये एका टीमला ह्यांचा अगदी भावनिक सपोर्ट असतो.
"अरे, आज काही झालं तरी उरुग्वे हरलं पाहिजे रे. होंडुरास तर आरामात हरेल. उरुग्वे डेंजर आहे पॅराग्वेसाठी."
आता मागच्या वाक्यातल्या तीनपैकी दोन जरी देश प्रत्यक्षात जगाच्या पाठीवर कुठे आहेत, हे ह्या वाक्य सांगणार्‍याला ठाऊक असेल, तर मी काहीही हरायला तयार आहे. पण वर्ल्ड कपच्या वेळी हे विश्वची माझे घर हा प्रत्यय सगळ्यांनाच येत असेल. कित्येकांना तर नावं पण उच्चारता येत नाहीत, पण आम्ही फुटबॉल वेडे. उरुग्वे ला उराग्वे, पॅराग्वे ला पेरुग्वे, स्लोव्हाकिया आणि स्लोव्हेनिया मधला गोंधळ. पण ह्या सगळ्याचा काय फरक पडतो. एकाने तर मला उरुग्वे हा युरोपियन देश आहे का म्हणून विचारलं होतं. पण उरुग्वे हा दोनवेळा वर्ल्डकप जिंकलेला देश आहे हे मात्र ह्या लोकांना ठाऊक असतं.
बाकी स्टॅटिस्टिक्सची चटक आपल्या देशातल्या लोकांना जन्मजातच. कदाचित म्हणूनच आपल्याला क्रिकेट खूप आवडतं. त्यात स्टॅटिस्टिक्सची रेलचेल असते. फुटबॉल हा असा खेळ आहे ज्यात स्टॅटिस्टिक्स फक्त ऍनॅलिसिस साठी उपयोगी पडतात, त्यावरून रिझल्ट्स प्रेडिक्ट करता येत नाहीत. पण ह्या सगळ्याने आपल्या लोकांचा जोश कुठे कमी होतो.
"तुला माहितीय, १९७६ साली इंग्लंड-जर्मनी मॅचमध्ये असाच सिमिलर गोल नाकारला गेला होता जर्मनीला. बदला घेतला त्यांनी यावेळी. स्वीट रिव्हेंज."
"तुला सांगतो. अर्जेंटिना गेल्या वीस वर्षांत क्वार्टरफायनलच्या पुढे नाही जाऊ शकली."
ही आणि असली निरुपद्रवी माहिती आपल्या लोकांकडे खूप असते. मला वाटतं, लोक ह्याचा अभ्यास करतात. कदाचित ब्राझीलच्या पोरांबरोबर आपल्या पोरांची फुटबॉल क्विझ ठेवली, तर आपली पोरं ब्राझीलच्या पोरांना चारीमुंड्या चीत करतील. बाकी मैदानावर काय गत आहे ती कुणाला सांगायची गरज नाही. (हाच प्रकार मी कुठल्याही मोठ्या क्रीडास्पर्धेवेळी पाहिलाय. ऑलिम्पिक्सच्या वेळी मी लोकांना फेन्सिंग आणि वॉटर राफ्टिंग बद्दलही चर्चा करताना ऐकलंय.)
वर्ल्ड कप संपला, की रुटिन सुरू होतं. अधून मधून फ्रेंडली असतात, त्याबद्दल कुणाला सोयरसुतक नसतं. वर्ल्ड कपला जर्मनीचा हार्ड कोअर फॅन असणारा 'जर्मनीचा ग्रीसकडून फ्रेंडलीमध्ये मोठा पराभव' ही बातमी 'सानिया विम्बल्डनच्या पहिल्याच फेरीत गारद' वाचवी तेव्हढ्याच उत्सुकतेने वाचतो. आता चर्चा कशावर करणार? त्याचं उत्तर मिळतं. चॅम्पियन्स लीग जवळ येत असते. युरोपातल्या बेस्ट क्लबांची सर्वोच्च स्पर्धा.
जी गत देशांची, तीच गत क्लब्सच्या बाबतीत. "मी हार्डकोअर मॅन्चेस्टर युनायटेड फॅन आहे." हे वाक्य एखादा पोरगा असा फेकतो, जणू तो ओल्ड ट्रॅफर्डवरच लहानाचा मोठा झालाय. "अरे तुला ठाऊके, ह्या वर्षी, मायकल एसियनला कुणीच जास्त ऑफर नाही केलं. एड्रियन मुटू ह्या वर्षी ड्रग्समध्ये अडकलाय वाटतं. कोलो आणि याया टूरे ला जबरा मिळतंय ट्रान्स्फर अमाऊंट. काका रेआलला चालला मिलानला डिच करून." मी कधी कधी कौतुकाने अश्या पब्लिककडे बघतो. कारण हा बहर तात्पुरता असतो. ही हार्डकोअर फॅनशिप कुठल्या मोठ्या स्पर्धेच्या(सहसा चॅम्पियन्स लीग) बाद फेरीपासून सुरू होते(कोण कोण क्वालिफाय झालंय त्यावरून) आणि फायनल(ही रात्री जागून बघणं हा प्रेस्टिज इश्यू असतो) संपल्यावर दुसर्‍या दिवशीच्या गरमागरम चर्चेनंतर संपते.
मग ही स्पर्धा संपते आणि वर्ल्ड कपनंतर दोन वर्षांनी येणार्‍या 'युरो' स्पर्धेचे वारे वाहू लागतात. मग ग्रीस, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया, जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड, पोर्तुगाल, स्पेन पुन्हा चर्चेत येतात.
एखादी स्पर्धा संपली, की हे लोक थोड्या वेळासाठी उदास होतात. आता कुणाला सपोर्ट करणार? कुणाला चीअर करणार? कशावर चर्चा करणार? कुणाची फॅनशिप घेणार.
मग मी विचार करतो. कदाचित हे सगळं एव्हढ्यासाठी, की आपली टीम नाही इथे. जगातला सर्वांत लोकप्रिय खेळ आणि त्याच्या उत्सवात आपली टीम नाही? हाच सल असावा ज्यामुळे ह्या उत्सवाचा भाग बनण्यासाठी मग टीम्स दत्तक घेतल्या जातात. मनाला दिलासा मिळत असावा. मीही त्यातलाच. मग कधी कधी मी उगाच 'क्रिकेटची सर नाही फुटबॉलला' म्हणून शहाणपणा करतो. आणि मग धोनी, युवराजच्या मग्रुरीचे आणि पार्टीबाजीचे किस्से ऐकून सगळ्याचीच किळस यायला लागते. पुन्हा मी टीव्ही लावतो आणि 'जर्मनी..जर्मनी...जर्मनी... म्हणून ओरडायला लागतो, झिदान हा कसा फुटबॉलचा देव आहे ह्यावर वाद घालायला लागतो. ह्यावेळच्या युरोमध्ये स्पेनचं पानिपत होणार आणि चॅम्पियन्स लीगमध्ये आर्सेनल जिंकणार अश्या वल्गना करू लागतो. तरी कोपर्‍यात एक जाणीव कायम असते, आपली एकपण टीम नाही यार. आपला एकपण प्लेअर नाही यार.
मग कदाचित माझ्यासारख्याच लोकांमुळे हे शक्य झालं असावं. दुर्दम्य आशावादाचं मूर्त स्वरूप.

अर्थात, मी वर्णन केलेल्या 'नियतकालिक वेड्यां'व्यातिरिक्त खरे फुटबॉलप्रेमीही असतीलच. त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे. फुटबॉलच का, मला कुठल्याही खेळावर मनापासून प्रेम करणार्‍या प्रत्येकाबद्दल आदर आहे.
ही नोंद लिहिण्याची कल्पना ओंकारनं परवा बोलताना दिली. त्यामुळे त्याचे धन्यवाद, कारण मला काहीच सुचत नव्हतं.

7/01/2010

पाऊस - सिनेमातला

पाऊस म्हटलं की आम्हा शहरी लोकांच्या डोळ्यांपुढे चिखलाने, मातट पाण्याने भरलेल्या खड्ड्यांनी भरलेले रस्ते येतात. पच्च्कन पाणी उडवून जाणारी वाहनं, विजारी, साड्या घोट्यांच्या वर करून उशीर होऊ नये म्हणून घाईगडबडीत चालत जाणारी माणसं, पुढे आपल्या स्वतःला होणारा उशीर आणि मग आजार असलं काय काय येतं. पण हेच एखाद्याच्या डोळ्यांपुढे तुरळकच राहिलेली पण हिरवीगार झाडं, चहूबाजूला जाणवणारा निसर्गाचा तजेला, पावसातल्या पाण्यात थबक-थबक पाणी उडवत जाणारी, आपले रेनकोट, गंबूटांची पर्वा न करता आनंदाने जाणारी लहान मुलं, 'कावळा' झालेल्या छत्र्या, 'ती' भिजू नये, म्हणून आपली एक बाही भिजवत छत्री सांभाळत तरीही 'ति'च्याकडे पाहता पाहता पुढचा रस्ता पाहण्याचा प्रयत्न करणारा 'तो' आणि भिजल्या ओढणीला एका मुठीने गच्च आवळून धरत थंडीने कुडकुडत डोळ्यांच्या कोपर्‍यातून 'त्या'चं छत्री धरणारं रूप डोळ्यांत साठवत खाली पाहत चालणारी 'ती' असलं काही काही येतं. तर एखाद्या गावाकडच्याला सर्वांत प्रथम आठवण होते ती मातीच्या सुगंधाची. ह्या सुगंधाला स्वर्गीय म्हणता येत नाही, कारण तो एकमेव असा सुगंध आहे जो ह्या जगाशी, मातीमार्फत जोडलेला आहे. काहींना पावसाने संसार उद्ध्वस्त व्हायची भीती, तर काहींचा संसार पावसावर अवलंबून. एखाद्याला "घन घन माला, नभी दाटल्या" आठवतं, तर एखाद्याला "नभ मेघांनी आक्रमिले". एखादा "प्यार हुआ, इक़्ररार हुआ है.." गुणगुणायला लागेल, तर एखाद्याच्या डोळ्यांपुढे "टिप टिप बरसा पानी, पानी ने आग लगायी"चं पिक्चरायझेशन येईल.

तर अशी प्रत्येकाची निरनिराळी तर्‍हा. प्रत्येकाची दुसर्‍यापेक्षा अगदी वेगळी आणि म्हणूनच कदाचित अकल्पनीय (अनइमॅजिनेबल). मला कसं वाटतं, हे दुसर्‍याला कसं कळणार. पण हे कळण्याचंसुद्धा एक शक्तिशाली माध्यम आहे. सिनेमा.

सिनेमात आजवर अगणित गोष्टी, संकल्पना हाताळल्या गेल्या. पण माझ्या मते पाऊस ही वैश्विक स्तरावर सर्वाधिक हाताळली गेलेली गोष्ट असावी. अगदी पाश्चात्य देशांपासून अतिपूर्वेकडच्या देशांतल्या सिनेमातही पाऊस निरनिराळ्या रूपाने येत राहिलाय. कधी पाऊस हे कारण, कधी नुसतीच पार्श्वभूमी, कधी मानसिक आंदोलनं दाखवणारा संकेत, कधी नुसताच एखाद्या पात्राचा साथी (सुखातला, दुःखातला, आनंदातला, उदासीतला) तर कधी चक्क अख्खा सिनेमा व्यापून राहणारं एक पात्र. निरनिराळ्या पद्धतीने पावसाचं अस्तित्व बघायला मिळतं सिनेमात. आणि त्यातनंच कित्येकांचे दृष्टिकोन आपल्याला सहज बघायला, अनुभवायला मिळतात; जे एरव्ही सहजासहजी शक्य नसतं.

मी अनुभवलेल्या सिनेमांतला सर्वांत जुना पाऊस म्हणजे 'राशोमान'चा पाऊस. अकिरा कुरोसावा ह्या मातब्बर दिग्दर्शकाची उभ्या जगाला ओळख करून देणारा एक प्रचंड क्लिष्ट पण काही क्षणी तितकाच सोपा वाटणारा आणि एका तरल शेवटावर संपणारा सिनेमा. एका पावसाळी दिवशी, एका निर्जन, पडीक अशा 'राशोमान' नावाच्या घरात घडणारी एक विलक्षण कथा. प्रचंड पाऊस सिनेमाची सुरूवात करून देतो आणि शेवटाला जेव्हा तो थांबतो, तेव्हा काही जीवांच्या मनावरचं मळभ दूर करून. ह्या सिनेमात पाऊस जास्त वेळ दिसत नाही, पण तो सिनेमात केवळ एक मूक साक्षीदार म्हणून राहतो आणि तरीही त्याचा ठसा मात्र उमटतो.

सत्यजित राय ह्यांच्या 'पाथेर पांचाली' मध्ये अपूच्या बहिणीचा बळी घेणारा पाऊसही लक्षात राहतो. राज कपूर, प्रेमनाथचा 'बरसात' टिपिकल हिंदी सिनेमाच्या धाटणीचा असूनही शेवटाकडे सुन्न करून जातो. इथे पाऊस एक कारण बनून राहतो, आणि शेवटी मात्र उदास बरसत राहतो, आपल्या मनावर मळभ आणत. हेच नाव लेवून एकदा बॉबी देओल आणि एकदा अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेले सिनेमेही येऊन गेले, पण त्यात पाऊस हा "समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता"(असा मी असामी) मधल्या हिंदमातेसारखा कोनाड्यात ठेवलेल्या केरसुणीसारखा अंग चोरून उभा राहिलेला दिसतो.

मग एक एक करून डोळ्यासमोर यायला लागतात ती हिंदी सिनेमातली पावसाला साक्ष ठेवून चित्रीत केलेली गाणी. अगदी, "प्यार हुआ इकरार हुआ है" सारख्या एका छत्रीतल्या जोडप्याला अजरामर करणारं गाणं असो, की मुमताजची ग्लॅमर कोशन्ट आणणारी भिजभिजीत गाणी असोत, किंवा "तेरा जाना, दिलके अरमानों का मिट जाना" सारखं गाणं असो. मला वाटतं, राज कपूरनं पावसाला जेव्हढं एक्सप्लॉईट केलं, तेव्हढं कुणीही केलं नसेल. "बरसात" असो, की "श्री ४२०", किंवा "अनाडी", दोन प्रेमिकांना स्वप्नगीतात घेऊन जाणारा पाऊस थोड्या वेळाने नायिकेला एकटेपणाची बोच लावतो, पावसाचा वेगवेगळ्या स्वरूपात वापर करावा तर राज कपूरने.

गाण्यांच्या विषयावरून न भटकता पुढे जाताना, पावसाचा शृंगारिक उपयोग सुरू होतो. सुभाष घई, इंद्रकुमार पासून यश चोप्रा, करण जोहरपर्यंत सगळ्यांनी पावसाला शृंगारिक बेड्यांमध्ये असं जखडून टाकलंय, की यांच्या सिनेमांवर पोसल्या जाणार्‍या हल्लीच्या पिढीला पाऊस म्हणजे तंग साडी घालून पावसात भिजणारी हीरॉईन आणि पांढरे बिना बनियानचे शर्ट घालून भिजत भिजत हीरॉईनच्या वरताण अंगप्रदर्शन करत दोन्ही हात पसरून हीरॉईनला बोलावणारा हिरोच नजरेसमोर येत असावेत अशी रास्त शंका मला यायला लागते. माझ्या ह्या शंकांना खतपाणी लोकांचे हनिमूनच्या वेळी काढलेले फोटो पाहून घातलं जातं (हे मी माझ्या मर्जीने पाहत नाही, 'मी आणि माझ्या शत्रूपक्षा' प्रमाणे मला हे जबरदस्तीनेही दाखवले जातात किंवा ऑर्कुटवर टाकले जातात). ह्या फोटोंमध्ये लोक अगदी तश्याच (यश चोपडी पावसाच्या गाण्यातल्या) पोझेस देत फोटो काढतात(अर्थात पाऊस नसतो कारण एक म्हणजे पावसात कॅमेरा खराब होऊ शकतो आणि दुसरं म्हणजे खरंच पावसात जर फोटो काढले तर ते दाखवायची पंचाईत). मग ह्याच मांदियाळीत "टिप टिप बरसा पानी", "छत्री ना खोल बरसात में" असली गाणी पावसाला आयटम गर्ल बनवून सोडतात.

असो, तर एकंदर पावसाला टाईपकास्ट करण्याचं पाप जरी ह्या काही दिग्दर्शकांनी केलेलं असलं तरी त्याला निरनिराळे रोल्स देणार्‍या दिग्दर्शकांचीही कमी नाही.

'लगान'मधला न येऊन अख्ख्या सिनेमाला कारण देणारा आणि शेवटी सेलिब्रेशनला येणारा पाऊस आशुतोष गोवारीकरने मस्त वापरलाय. 'चमेली' मधला पाऊस हिरोच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर उलथापालथ घडवून आणतो, पण ' त्या' एका रात्री मात्र तो फक्त एक साक्षीदार बनून राहतो. 'रेनकोट' मधला पाऊस, हिरो-हीरॉईनच्या आयुष्यातल्या त्या निर्णायक दिवसाच्या प्रत्येक उलथापालथीचा साक्षीदार बनतो आणि शेवटाला रितुपर्नोच्या शैलीत बिनसंगीताच्या एका मधूर गाण्याच्या साथीने संथ बरसत राहून एक हूरहूर लावून जातो. 'नटरंग' मधला मृगाचा पाऊस गुणाला एक तात्पुरता धक्का देतो, पण निर्धारही देतो. 'गाभ्रीचा पाऊस' मधला "गाभ्रीचा" ह्या शिवीचा धनी पाऊस चक्क खलनायकाची भूमिका निभावतो.

आपल्या सिनेमाव्यतिरिक्त मी पाहिलेल्या काही थोड्या जागतिक सिनेमांमध्येसुद्धा पाऊस हा एक महत्वाचा भाग दिसतो. फक्त बर्‍याचश्या जागतिक सिनेमांमध्ये पावसाबरोबरच हिमवर्षावही तेव्हढीच ताकदीची भूमिका निभावतो. सहसा माझ्या थोडक्याच इंग्रजी सिनेमांच्या ओळखीप्रमाणे पाऊस हा रहस्यकथांचा प्राण असतो. बहुतांश रहस्यपटांमध्ये किंवा थरारपटांमध्ये गूढता वाढवण्यासाठी पावसाचा परिणामकारक वापर दिसतो. खून झाल्यानंतर प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी जेव्हा खुनी किंवा आळ येऊ शकणारा/शकणारी घराबाहेर पडतात तेव्हा हमखास पाऊस किंवा वादळ असतंच, अगदी तसंच ते त्यांच्या भ्रष्ट बॉलीवूड कॉप्यांमध्येही प्रतिबिंबित होतं. 'आयडेंटिटी' मध्ये पावसाचा मस्त वापर केला गेलाय, थरार वाढवण्यासाठी. पण हॉलीवूडचा ग्रेटेस्ट म्युझिकल ऑफ ऑल टाईम 'सिंगिंग इन द रेन' मात्र पावसाचा वेगळा छान वापर करतो. मग युरोपाकडे आपली गाडी आली, की तिथेदेखील सहसा पाऊस थरारपटांपलीकडे दिसत नाही, पण हिमवर्षाव मात्र बरीच पात्र निभावतो. नाताळ आणि त्याच्याशी संबंधित कुठल्याही गोष्टीत हिमवर्षाव येतोच. आनंद दाखवायला कित्येक ठिकाणी, पण त्यात बागडणारी मुलं पाहून उदास होणारी एकलकोंडी पात्रही पैशाला पासरी मिळतील. 'मेरी ख्रिसमस'('जॉय नोएल')मध्ये युद्धभूमीवर नाताळच्या दिवशी पडणारं पांढरंशुभ्र हिम वेगळाच अर्थ सांगतं आणि शेवटी ट्रेनने चाललेले जर्मन सोल्जर्स जेव्हा मंद आवाजात हिमाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच शिकलेली स्कॉटीश ख्रिसमस कॅरोल्स गात जातात, तेव्हा अंगावर काटा उभा राहतो. किएस्लोव्स्कीच्या डेकालॉगमध्ये पहिल्याच गोष्टीत हिमवर्षाव हा निसर्गाचं प्रतिनिधित्व करतो आणि एका वेगळ्याच अपरिहार्यतेकडे बोट दाखवतो. डेकालॉगच्याच तिसर्‍या भागात 'त्या' विचित्र रात्रीमध्ये मूक साक्षीदाराचं काम करतो. पुढे येताना अतिपूर्वेकडच्या सिनेमांमध्ये पाऊस आणि हिमवर्षाव दोन्ही महत्वाच्या भूमिका करतात. 'ओल्डबॉय' मधला सुरूवातीचा पाऊस केवळ निमित्तमात्र वाटतो, पण एक छोटंसं कारण बनून जातो. 'सिम्पथी फॉर लेडी व्हेन्जिअन्स' मधलं शेवटी पडणारं हिम एका नव्या पांढर्‍यास्वच्छ आयुष्याचा संकेत देतं. 'ख्रिसमस इन ऑगस्ट'मधला पाऊस हिरोच्या आयुष्यात वेगवेगळ्या वेळी एक मूक साक्षीदार बनून येतो, किएस्लोव्स्कीच्या डेकालॉगमधल्या बिन नावाच्या पात्रासारखा!

असा हा सिनेमातला पाऊस, मी अनुभवलेला. ह्याहूनही पलिकडे अथांग सिनेसागरात कित्येकांना कित्येक वेगवेगळ्या प्रकारे पाऊस दिसला असेल. वेगवेगळ्या भिंगातून, वेगवेगळ्या कोनांतून आणि वेगवेगळ्या दृष्टीकोनांतून. प्रत्येक नव्या अनुभवानंतर जाणवतं, की अजून अथांग अनुभवायचंय. पण एक मात्र खरं, खर्‍याखुर्‍या सरींनी जितकं शिकवलं नसेल त्याहून जास्त केवळ पावसांच्या चित्रसरींत भिजण्यातनं शिकायला मिळालंय.
हा लेख 'ऋतू हिरवा' ह्या पावसाळी विशेषांकात यापूर्वी प्रकाशित झालेला आहे.
टीप : मूळ लेखात मी एका बरसात सिनेमात अक्षय कुमार आहे असं लिहिण्याची चूक केली होती. प्रत्यक्षात दोन्ही नव्या बरसात सिनेमांमध्ये बॉबी देओल आहे. पण लेख पूर्वप्रकाशित असल्याकारणाने त्यात वर दुरूस्ती केलेली नाही.