"भरत! अरे भरत.. उठ ना रे भरत!" आईच्या हुंदक्यांनी भरलेला टाहो मला कुठूनसा अस्पष्ट ऐकू येत होता. कुठूनतरी दूरून यावा तसा. हळूहळू जाणीव गडद होऊ लागली आणि आवाज जवळून येऊ लागला. डोळ्यासमोर तसा अंधारच होता. डोळे बंद असल्यागत वाटत नव्हते पण तरीही अंधारच अंधार. पण जसजसा आवाज जवळ येऊ लागला तसतसा अंधार कमी होऊ लागला. अंधुक, अस्पष्ट असं एक छत दिसू लागलं आणि आईच्या हुंदक्यांसोबत इतरही अनेक आवाज येऊ लागले. खोलीत बराच गारठा जाणवत होता आणि आपण आडवे पडून आहोत ही जाणीव झाली. आईचा रडवेला चेहरा आणि तिच्या खांद्यांवर हात ठेवून उभे असलेले बाबा दिसले आणि एकदमच उठून बसलो. पण ते तरीही माझ्याकडे पाहत नव्हतेच. तसेच उभे होते दोघेजण. मी झोपलो होतो त्याच जागेकडे बघत. मग मीही वळून तिथे पाहिलं. आणि दोन क्षण पाहतच राहिलो.
माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. मी पुनःपुन्हा डोळे चोळून पाहत राहिलो. मीच झोपून होतो. निश्चेष्ट, निपचित. मी मेलो की काय? ह्या जाणीवेनं माझं सर्वांग शहारलं. होय शहारलं. बहुतेक मेल्यावर जाणिवा नष्ट होत नसाव्यात. 'म्हणजे ते आत्मा-बित्मा फंडे सगळे खरे होते म्हणायचे!' हा माझ्या मनात आलेला पहिला विचार. आता नाही म्हणायला फक्त मनच राहिलं होतं. पण मोठा बांका प्रसंग होता. आई-बाबा माझ्या प्रेताला हलवून जागं करायचा निष्फळ प्रयत्न करत होते. दोनेक मिनिटांनी पोलिस, नर्स वगैरे मंडळींनी त्यांना दूर केलं. मला प्रचंड धक्का बसलेला होता. मी स्तब्ध होऊन ते दृश्य पाहत होतो. मग हळूहळू जाणिवा पुन्हा गडद होऊ लागल्या. आणि मी एकदम धडपडून उभा राहिलो. स्वतःच्या प्रेताला हात लावायचा प्रयत्न केला पण जमेना. मुळात स्वतःचं प्रेत ह्याच गोष्टीचं मोठं कुतूहल वाटत होतं. मग 'घोस्ट', 'माँ' असे सगळे सिनेमे आठवू लागले आणि कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न करू लागलो. पण बहुतेक ते सगळं खोटं असावं कारण प्रयत्न करूनही कशालाही स्पर्श करू शकलो नाही. मग माझे पाय पाहिले तर सुलटेच होते पण जमिनीपासून थोडेसे वर होते. मेल्यानंतर मी धर्मराज युधिष्ठिर झालो होतो. नाही! चुकीचा संदर्भ. युधिष्ठिराचा रथ जमिनीपासून वर होता, तो स्वतः नव्हे. असो. मग मी त्या थंड खोलीतून बाहेर आलो. तर एका बाकड्यावर बाबांच्या खांद्यावर मान टाकून आई बसलेली होती आणि दोघांच्याही नजरा शून्यात होत्या. मला फार वाईट वाटलं. मी त्यांच्याशेजारी जाऊन बसलो आणि त्यांच्याशी बोलण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागलो. ना मी पॅट्रिक स्वेझीसारखा इच्छाशक्ती वापरून वस्तू हलवूही शकत नव्हतो की मतकरी म्हणतात त्यागत लोकांच्या भावनांवर नियंत्रणही मिळवू शकत नव्हतो. काहीच करता येत नसल्यानं मलाच त्रास होऊ लागला आणि मी उठून पुन्हा त्या खोलीत गेलो.
मी स्वतःच्याच प्रेताची शहानिशा करत होतो. नक्की काय झालं ते आठवण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या चेहर्याला काही जखमा दिसत नव्हत्या, पण मला ते पांढरं कापड काही काढता येईना. पोट आणि पायांच्या बाजूला रक्ताचे डाग पडल्याचे दिसत होते. बहुतेक त्यानंतर थोड्याच वेळात शवविच्छेदन सुरू होणार होतं. तोपर्यंत तिथेच थांबणं भाग होतं आणि स्वतःच्याच डोळ्यांनी.. नाही स्वतःच्याच नजरेनं स्वतःचंच शवविच्छेदन बघण्याचा मोठा विचित्र प्रसंग माझ्यावर ओढवला होता. कॉरोनरची वाट पाहेपर्यंत मी नक्की काय झालं ते आठवण्याचा प्रयत्न करू लागलो.
निवडणुकांची धामधूम सुरू होती. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीची प्रचाराची शेवटची फेरी होती बहुतेक. कोण उमेदवार होते ते मात्र मला महत्प्रयासानंही आठवत नव्हतं. मी संध्याकाळचा ऑफिसातनं घरी यायला निघालो होतो. रस्त्यावर मोठ्यामोठ्यानं प्रचाराची गाणी आणि घोषणा वाजवत एक छोटा टेम्पो पक्षचिन्हाच्या सजावटीनं नटून निघाला होता. त्या आवाजात इतर काहीही ऐकू येणं जवळपास अशक्यच होतं. आणि बहुतेक त्यामुळेच. बरोबर. त्यामुळेच मला हॉर्न ऐकू आला नसावा. एक जोराचा धक्का जाणवला आणि त्यानंतर थेट शवागारात गारीगार वातावरणात जाग आली. नक्की कशानं उडवलं असेल मला? चूक माझीच असावी बहुतेक, न बघता रस्ता क्रॉस करत होतो. पण सिग्नल माझा होता. पण मग त्या टेम्पोच्या हव्या तेव्हढ्या आवाजाची चूक नाही का? मरो तिच्यायला. खेळ तर माझा खलास झालाच होता. ऍनालिसिस करून काय मिळणार होतं. मी पुन्हा 'घोस्ट-घोस्ट' खेळू लागलो. पण ते खोटंच आहे ह्याची खात्री पटली.
पुढल्या दोन-तीन दिवसांत माझ्या घरी चक्क काही रिपोर्टर्स उगवले. मला उडवणारा कुणी लक्ष्मीपुत्र होता हे एव्हाना सगळीभर फिरून माझ्या लक्षात आलं होतं आणि मी त्याला बघूनही आलो होतो. अठरा-एकोणीस वर्षांचा मुलगा होता. मिसरूडही फुटलेलं नव्हतं त्याला. पण एक गोष्ट आहे. मेल्यानंतर मी एकदमच शांत झालो होतो. त्या मुलाचा मला राग आला, पण आदळआपट करावीशी बिलकुलच वाटली नाही. करूही शकणार नव्हतो म्हणा. पण वाटलंही नाही हे विशेष.
मी फक्त सगळं पाहू शकत होतो. त्यामुळे त्रागा करण्यात काहीच अर्थ नव्हता. पण मला एक कळत नव्हतं. की मी नक्की थांबलो कशानं होतो? मला मुक्ति किंवा मोक्ष ज्याला म्हणतात, तो मिळाला का नव्हता? पण त्यादिवशी घरी रिपोर्टर्स आले तेव्हा मात्र मी एकदम उडालोच. त्यातल्या एकानं माझ्या वडलांना 'तुम्ही दलित आहात ना?' असा थेट प्रश्न विचारला. माझे वडीलही त्या प्रश्नानं उडालेच. ह्या प्रश्नाचा नक्की काय संबंध होता हे तेव्हा आमच्या लक्षात आलं नाही, पण दुसर्या दिवशी पेपरची हेडलाईन पाहून मी गारच झालो. 'उद्योगपतीच्या मुलाच्या आलिशान गाडीखाली चिरडून दलित तरूणाचा मृत्यू!'
आता मी दलित आहे, ह्याचा माझ्या गाडीखाली येण्याशी काय संबंध? पण नंतर ज्या घटना घडल्या त्यावरून मला त्या बातमीमागची मेख लक्षात येऊ लागली. आमचा एरिया दलितबहुल होता. ज्यादिवशी बातमी छापून आली. म्हणजे तिसर्या दिवशी आमच्या एरियातला दलित नेता आमच्या घरी आला आणि त्याच्यासोबत दोन-चार फडतूस पत्रकार. त्यातला एक लोकल केबलन्यूजवाला कॅमेरा घेऊन. मला त्या नेत्याचं नाव तेव्हाही आठवत नव्हतं, पण एरियाभर बाराही महिने वेगवेगळ्या सणांसाठी आणि विविध नेत्यांच्या वाढदिवसांच्या शुभेच्छांसाठी लागलेल्या होर्डिंग्जमुळे मला त्याचा चेहरा लक्षात होता. बाबांना त्याला घरातही घ्यायची इच्छा नव्हती कारण आईची तब्येत फारच खालावलेली होती. पण तो आणि त्याचे कार्यकर्ते परवानगी वगैरे घेण्याच्या मूडमध्ये नव्हते. तो बाबांशी चार सहानुभूतीचे शब्द बोलल्यासारखं करून कॅमेर्याकडे वळला.
"आमच्या भागातल्या गरीब दलित तरूणाचा बळी ह्या लक्ष्मीपुत्रांच्या बेदरकार गाडी चालवण्यामुळे गेलाय. एकुलता एक मुलगा गमावलेल्या ह्या दलित कुटुंबासाठी आम्ही न्याय मिळवूनच राहू." तो तावातावानं बोलत होता आणि मी आणि बाबा तोंडाचा आ वासून उभे होतो.
"ओ बाबा, त्याला सांगा हो आपण गरीब वगैरे नाही म्हणून. आणि धाकटा परदेशात आहे तो परत येईलच की आज रात्रीपर्यंत."
मी बाबांना सांगत होतो पण मला ठाऊक होतं की त्यांना काहीही ऐकू येणार नाही. आणि एकदम मला रिअलाईज झालं की मला अजून मुक्ति का मिळत नाही. माझे अंत्यसंस्कार धाकट्या भावासाठी थांबलेले होते.
त्याच्या दुसर्या दिवशी आमच्या लोकल नेत्याची धडाकेनाज वक्तव्य थोडीफार गाजली आणि एकच गहजब उडाला. गोंधळ असा झाला होता की ज्या लक्ष्मीपुत्रानं मला उडवलं होतं, तो ह्यांच्या पक्षाचा मुख्य धनदाता होता. त्यामुळे लगेच त्यांची जात ही आमच्याहूनही खालची असल्याचा शोध सगळ्यांना लागला होता. पण त्यादिवशी गंमत घडली ती दुसरीच.
माझं प्रेत जाळल्यावर पिंडाला शिवायला कावळ्यांना अडवायचा मी प्रयत्न करत होतो. मला खटल्याचा निकाल लागेपर्यंत वाट पाहायची होती. पण कावळेच ते, माझं कशाला ऐकतील. त्यांनी पोटभर खाऊन घेतलं. मी टेन्शनमध्ये आलो पण तसं काहीच झालं नाही. मला यमदूतही दिसले नाहीत की एकदम सुंदर जागा वगैरेही दिसली नाही. असं जाणवत होतं की आपले सगळेच कन्सेप्ट्स चुकले आहेत.
त्यानंतर आचारसंहिता लागू झाली आणि कोर्टात खटला सुरू झाला. आमचा लोकल नेता गायब झाला तो झालाच. पण कोर्टानं लगेच लक्ष्मीपुत्राला जामीन दिला आणि आमचं कुटुंब चेहरे पाडून कोर्टातून बाहेर पडलं. पुढल्या तारखेला बराच वेळ होता. भाऊ थोड्या दिवसांनी परत परदेशी गेला अन आई-बाबा माझ्या आठवणी कुरवाळत दिवस कंठू लागले. माझा राग हळूहळू परत वाढू लागला होता. माझ्या आई-बाबांचं दुःख मला त्रास देत होतं. दैवानं फारच विचित्र आघात केला होता आमच्यावर.
कोर्टाच्या पुढच्या तारखेला आमच्या लोकल नेत्याच्या पार्टीचा एक प्रमुख नेता लक्ष्मीपुत्राच्या कुटुंबासोबत कोर्टात आला आणि कोर्टाबाहेर तावातावाने बोलू लागला. "श्री. अमुकतमुक ह्यांच्या मुलाचा खटला, ते केवळ दलित असल्यानेच अतिरंजित केला गेला आहे. हजारो अपघाताच्या घटनांपैकीच हा एक." मला आता कंटाळा येऊ लागला होता. मला आता डेस्परेटली मुक्ती हवी होती. पाहिलेले सगळे सिनेमे आणि वाचलेली सगळी पुस्तकं आठवून मुक्तीचे सगळे मार्ग मी चोखाळू लागलो.
पण मग अचानकच एक दिवस आमचा लोकल नेता परत आमच्या घरी उगवला. मधल्या काळात त्यानं पार्टी बदलली होती. तो आता आधीच्याच पार्टीतून फुटून निघालेल्या दुसर्या एका पार्टीत गेला होता. तो पुन्हा एकदा 'गरीब दलितांची' बाजू घेण्यासाठी आमच्याकडे आला होता.
त्याच दिवशी संध्याकाळी मुक्तीसाठी देवळाच्या प्रदक्षिणा घालताना मला सुमी दिसली. हो सुमी. म्हणजे मी तसा तिला आधी ओळखत नसे. पण मेल्यानंतर माझ्याकडे बघणारी पहिलीच व्यक्ती ती होती. तिशीची गोड मुलगी. तिच्या वडलांनी तिनं बाहेरच्या जातीतल्या तरूणाशी लग्न जमवल्यामुळे झोपेतच उशीनं नाक दाबून तिचा खून केला होता. तिचा प्रियकर गाव सोडून पळून गेला होता. आणि तीपण मुक्ती शोधत हिंडत होती. तिला भेटलो आणि एकदम मस्त वाटलं.
मी मुक्तीची डेट थोडी पुढे ढकलायचा निर्णय घेतलाय. प्रत्यक्ष जिवंत माणसंच मेल्यासारखं जिणं जगताहेत तर मी निदान मेल्यावर तरी जगून बघावं म्हणतो.
-समाप्त-