12/19/2010

नामर्द -२

भाग -१ पासून पुढे

"तुमी येवडी आठवन ठिऊन येतासा! लय छान वाटतं." गगनची आई मनापासून सांगत होती. "न्हाईतर छोट्या लोकांकडे पाणी प्यायला पण येत न्हाईत लोक."

अभयच्या चेहर्‍यावर वेदना उमटली. त्यानं गगनकडे पाहिलं आणि म्हणाला, "काकू, आता तसलं काही राहिलं नाहीये हो. गगन आणि मी एकत्रच काम करतो, एकत्रच जेवतो. कधी वेगळेपणा वाटत नाही. तुम्ही असं काही बोलू नका हो. एकदम अवघडल्यासारखं होतं!" अभय गगनच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.

त्या फक्त हसल्या. मग त्यांनी गगनच्या धाकट्या बहिणीला बोलावलं आणि अभयच्या पाया पडायला सांगितलं.

"राहू दे राहू दे! बारावीला ना तू? तालुक्याच्या कॉलेजात जातेस ना? दादा सांगत असतो कायम तुझ्याबद्दल!"

तिनं मान डोलावली.

"खूप अभ्यास कर. त्याची स्वप्न पूर्ण कर. तुला मोठ्ठी अधिकारी झालेलं पाहायचंय त्याला. त्यासाठीच तिकडे शहरात राब राब राबतोय तो!" तिच्या डोक्यावर हात ठेवत तो म्हणाला आणि त्यानं स्मित केलं.

त्यांचा सगळ्यांचा निरोप घेऊन तो महारवाड्यातून बाहेर पडून घराकडे निघाला.

अचानक त्याला दूरून छोट्या जमावाचा गोंधळ ऐकू आला, पण तो घराच्या विरूद्ध दिशेनं होता. तिकडे दुर्लक्ष करून तो घराकडे पोचला. तर घराचे सगळे दिवे चालू आणि दरवाजा सताड उघडा. त्याला शंका आली म्हणून तो स्मृतीला हाका मारत घरात शिरला. त्यानं अख्खं घर पालथं घातलं, पण घरात कुणीच नव्हतं. तो एकदम धास्तावला आणि धावतपळतच घराबाहेर पडला. त्याच्या डोक्यात तर्‍हेतर्‍हेचे विचार येत होते. काय करावं ते कळत नव्हतं. आणि अचानक समोरून त्याला गगन येताना दिसला.

"काय झालं साहेब? मी तुमच्याचकडे येत होतो, तुमचा रूमाल राहिला होता घरी."

"अरे माझ्या घरचे सगळे गायब आहेत. घर सताड उघडं आहे." अभय पूर्ण भांबावला होता.

"अरेच्चा!" गगनलाही अर्थबोध होईना. "असं करा, तुम्ही इथे बघा, मी इथून जातो. दहा मिनिटं बघू कुणाच्या घरी गेलेत का? नाहीतर मग सरपंचांकडे जाऊ."

आणि दहाच मिनिटांत गगन ओरडत आला.

"साहेब, साहेब.." त्याला धाप लागली होती.

"काय झालं?"

"साहेब, चावडीसमोर... देवीच्या देवळाच्या पुढ्यात..."

"काय?"

"चला तुम्ही लगेच!" आणि ते दोघे धावत निघाले.

----------

देवळासमोरचं दृश्य पाहून अभय हबकूनच गेला. ५०-१०० लोकांचा जमाव बसला होता. पुढ्यात एक शेकोटी होती. आणि शेकोटीसमोर एका खांबाला स्मृतीला बांधलेलं होतं. तिच्या तोंडात कापडाचा बोळा घातला होता. शेजारी विजयी मुद्रेनं मांत्रिक उभा होता आणि एका बाजूला त्याचं सगळं कुटुंब खाली माना घालून उभं होतं.

अभयला काहीच कळेना. त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. हे सगळं खरंच घडत होतं?

तो खांद्यावर गगनच्या झालेल्या स्पर्शानं भानावर आला.

"ए..." तो जोरात ओरडला आणि धावतच जमावातून रस्ता काढत शेकोटीकडे जायला लागला.

सगळे लोक स्तिमित होऊन त्याच्याकडे बघत होते. तो स्मृतीजवळ पोचला आणि पहिल्यांदा तिच्या तोंडातला बोळा त्यानं काढून टाकला. तिला एकदम ढास लागली. तो तिचे हात सोडवू लागला एव्हढ्यात त्याला मांत्रिकानं मागे ढकललं.

"दूर राहा." मांत्रिक दरडावून म्हणाला.

"काय चाललंय काय इथे? मला माझ्या बायकोपासून दूर राहायला सांगणारा तू कोण?"

"ही तुझी बायको राहिलेली नाही, ही चेटकीण आहे."

"काय?" त्याला धक्क्यांमागून धक्के बसत होते. समोर त्याची हतबल बायको त्याला दिसत होती.

"विचार तुझ्याच आईला. तिनंच सगळ्यांसमोर मान्य केलंय, की हिच्यामुळेच तू चेटूक झाल्यागत वागायला लागला आहेस."

अभयनं विस्मयानं वळून आईकडे पाहिलं. ती मान खाली घालून उभी होती. त्याच्या भावानं मान वर केली आणि स्वतःच्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून पुन्हा मान खाली घातली. अभय आतून पूर्णतः ढासळून गेला होता.

"ही चेटकीण असल्यामुळेच देवाचा कोप होऊन ही वांझ राहिली." मांत्रिक म्हणाला.

"ए...तोंड बंद ठेव तुझं!" अभयच्या अंगात काहीतरी संचारलं आणि त्यानं मांत्रिकाला धक्का दिला. मांत्रिक दोन फूट मागे पडला.

'चेटूक, चेटूक' म्हणून लोक कुजबुजायला लागले आणि एक एक करून उठायला लागले. अभयनं मागे नजर टाकली. गगन कुठेही दिसत नव्हता.

लोक अभयवर चाल करून येणार असं वर्तमान होतं. अभयनं आजूबाजूला नजर फिरवली आणि शेकोटीतलंच एक जळतं लाकूड एका बाजूला धरून उचललं. आणि तयारीत उभा राहिला.

"कुणी पुढे आलं आणि माझ्या बायकोला हात जरी लावायचा प्रयत्न केला, तर माझ्याशी गाठ आहे." अभय पूर्णपणे स्मृतीला कव्हर करून उभा होता.स्मृतीच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.

मांत्रिक उठला आणि पुढे झाला. अभयनं सर्वप्रथम त्याला जोरकस फटका दिला, त्याबरोबर तो मागे कोसळला आणि बेशुद्ध पडला. बाकीचे लोक एकदम घाबरले आणि अभयचा तो आवेश पाहून त्यांची पुढे यायची हिंमत होईना. सगळे थोडे मागे सरले. अभय आईकडे वळला.

"आई.. ही तुला चेटकीण वाटते?"

आई काहीच बोलली नाही.

"ही मुलगी, जिनं तुझं मन राखण्यासाठी माझं वंध्यत्व स्वतःवर घेतलं, ती तुला चेटकीण वाटते?"

आईला एकदम धक्का बसला आणि तिनं वर पाहिलं. भाऊ-वहिनीसुद्धा चकित होऊन पाहायला लागले.

"काय बोलतोयस तू?"

"होय आई. मी नामर्द आहे! तुझा मुलगा. ती वांझोटी नाहीये. तिचे उपकार आहेत तुझ्यावर की ती तुझ्या नामर्द मुलाला सांभाळून घेतेय. हवंतर कुठल्याही डॉक्टराकडून तपासणी करून घे आमची."

त्याच्या आईचा विश्वास बसेना.

"आणि हीच चेटकीण तुझा मुलगा सहा महिने अंथरूणाला खिळून होता, तेव्हा घर एकहाती सांभाळत होती आणि तुझ्या मुलाची शुश्रुषाही करत होती. तीन वर्षांत तू तिला इतकंच ओळखलंस आई? ह्या बाहेरच्या लोकांच्या सांगण्यावरून तुला तिचे हाल करताना काहीच वाटलं नाही?" आईची मान परत खाली गेली.

"आणि तू अमोल, अबोलीसाठी म्हणून गप्प उभा आहेस. पण लक्षात ठेव, हीच वेळ उद्या अबोलीवर येईल, तेव्हा कुणाकडे कुठल्या अधिकारानं पाहशील?" अमोलचीही मान खाली गेली.

"आणि वहिनी? जाऊ दे! तुमचाही काय दोष? तुम्हा सगळ्यांनाच अंधश्रद्धेचा रोग झालाय." तो जोरात ओरडून म्हणाला.

जमावाकडे पाहून म्हणाला. "कुणालातरी त्रास देऊन त्या क्रियेचा असुरी आनंद घ्यायचा रोग आहे हा. माणसं नाही आहात, जनावरं झाला आहात तुम्ही सगळे!"

जमाव गप्प होता.

"अरे तुमच्या घरातल्या बायकांवरसुद्धा अशी वेळ येईल उद्या. ह्या असल्या पाखंडी बाबांच्या नादी लागून आपल्या आयुष्याची वाटोळी कशाला करताय? गावात शाळा आहे ती ओस पडलीय आणि तुम्ही लोक चेटकिणीला मारायच्या कार्यक्रमांना गर्द्या करताय?" त्याच्या आवाजात दुःख ओतप्रोत भरलेलं होतं. जमाव कधीही उठून येईल ही भीती होती.

"चूक आमच्या पिढीची सुद्धा आहे." तो स्वतःशीच बोलल्यागत म्हणाला, पण एव्हढी स्मशानशांतता होती, की सगळ्यांना ऐकू येत असेल, "आम्ही शहरात गेलो आणि तिकडचेच झालो. तिथे जे शिकलो, ते इथे गावात रूजवण्यात आम्ही कमी पडलो. आमच्याबरोबरच गावाचा विकास घडवण्यात कमी पडलो. कदाचित गावाबद्दलच्या आमच्या कर्तव्यातच कमी पडलो."

आणि एकदम वर बघून तो जोरात म्हणाला, "पण ह्या सगळ्याचा अर्थ हा नाही, की कुठलंही अमानुष कृत्य देवाच्या नावाखाली केलं जावं! ह्या बुवाबाबांच्या शब्दांवर निरपराध व्यक्तिंचे बळी दिले जावेत! मी माझ्या बायकोला ह्या सगळ्याची बळी ठरू देणार नाही." असं म्हणून त्यानं ते पेटतं लाकूड वर धरलं.

एव्हढ्यात पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजू लागला. जमाव गप्पच होता. गगन तालुक्याहून पोलिसांना घेऊन आला होता. अभयनं जळतं लाकूड खाली फेकलं. आणि पटकन वळून स्मृतीला सोडवलं. स्मृती झाल्या प्रकारानं पूर्ण उन्मळून गेली होती. तिला चक्कर येऊन ती बेशुद्ध झाली.

----------

स्मृतीला हळूहळू शुद्ध आली. तिनं डोळे उघडले, तर सकाळ झाली होती आणि समोर चिंताग्रस्त चेहरा करून अभय बसला होता. तिनं सभोवताली पाहिलं तर ती त्यांच्या शहरातल्या घरी होती.

"इथे?" ती अस्फुट म्हणाली.

तू उठू नकोस बरं, सांगतो सगळं मी.

"पोलिस आले आणि त्यांनी गुरूजी, मुसळेबाई आणि आईला अटक केली."

"काय?"

"हो. आईला त्यांनी समज देऊन सोडून दिलं, कारण गुरूजी आणि मुसळेबाईंचा ट्रॅक रेकॉर्ड निघालाय तालुक्याचा पोलिसांकडे! त्यांचे सगळे कारनामे काल गावासमोरच सांगितले. आई आणि गावकरी दोघांचेही डोळे उघडलेत."

"पण मग आपण इथे?"

"मला तिथे गुदमरल्यासारखं व्हायला लागलं. आईला तुझी माफी मागायची होती. पण मी म्हटलं पुन्हा कधीतरी!"

"तू पण ना! इतकं का करायचं?"

"हे तू बोलतेयस? तुझे किती हाल झालेत ह्या सगळ्यांत! आणि तुला काही झालं असतं म्हणजे?"

"हो मीच बोलतेय. हाल माझेच झालेत ना? मग मी माफ केलं तर तुला काय?"

"बरं बाई माफ कर मला. मला नाही तुझ्याशी भांडता येत."

"आणि मला तुझ्याशी भांडावंसं वाटत नाही!"

(समाप्त)

ही कथा ह्यापूर्वी मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१० मध्ये प्रकाशित झाली होती.

12/16/2010

नामर्द -१

स्मृती वारंवार अभयच्या चेहर्‍याकडे वळून पाहत होती. रिक्षा मधेच गचके खात होती, पण अभयची लागलेली तंद्री भंग होत नव्हती. स्मृतीला अभयची खूप काळजी वाटत होती. त्याला काय वाटत असेल? त्यानं किती मनाला लावून घेतलं असेल? ह्याचा अदमास घ्यायचा ती प्रयत्न करत होती. डॉक्टरांकडून निघाल्या क्षणापासून अभय तिच्याशी एक शब्द बोलला नव्हता. तो गप्पच होता अजून. घरी गेल्यावर बोलू ह्या विचारानं स्मृती सारखी स्वतःला समजावत होती.

"अभय अरे बोल ना रे काहीतरी!" स्मृतीला शांतता सहन होत नव्हती. पण अभय घरी आल्यापासून सोफ्यावर एकटक कुठेतरी नजर लावून बसला होता.

"अभय..." तिनं त्याचा खांदा हलवला.

"हं.." अभय भानावर आला, "काय झालं गं?"

"अरे मला काय विचारतोयस? असा गप्प नकोस रे बसू!" तिच्या नजरेत काळजी होती.

"हं.." अभयनं एक सुस्कारा सोडला.

"अरे डॉक्टर म्हणालेत ना आपण इन व्हिट्रो करू किंवा दुसरा काहीतरी इलाज होईलच ना रे! वंध्यत्वावर हल्ली खूप उपाय आहेत."

"हं..ते ही आहेच म्हणा!" अभय थोडासा सावरत म्हणाला. "पण थोडंसं वाईट वाटलं गं!" तिनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्यानं तिचा हात हातात घेतला आणि एकदम त्याच्या चेहर्‍यावर त्याचं नेहमीचं स्मित आलं.

"काय झालं रे?" तिनं आनंदून विचारलं.

"आपण मारे तीन वर्षं फॅमिली प्लॅनिंग करत होतो. आणि मॅच आधीपासूनच फिक्स्ड होती!" तो तिला डोळा मारत म्हणाला. मग दोघेही खळखळून हसले. तिच्या मनावरचं एक ओझं कमी झालं.

"आपण लवकरात लवकर पुढचा इलाज सुरू करू." ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली.

"आणि नाहीच जमलं तर मूल दत्तक घेऊ, चालेल तुला?" त्याच्या ह्या उद्गारांनी एकदम चकित होऊन तिनं त्याच्याकडे पाहिलं.

"ऐसे ना मुझे तुम देखो...सीने से लगा लूंगा"

"धत्, उठा आता जेवायला चला!"

----------

"हो आई येऊ ना आम्ही नक्की! अच्छा!" स्मृतीनं फोन ठेवला.

"काय गं? बिनधास्त आपलं येऊ की आम्ही. सुट्टी कोण देणार आहे मला?"

"दोन दिवसही नाही देणार का रे तुला सुट्टी! आई एव्हढ्या आग्रहानं बोलावताहेत. गुरूवारी निघू आणि रविवारी परत येऊ."

"आवरा. तुझं प्लॅनिंग पूर्ण झाल्यावर तू मला सांगतेयस! अगं विचारत जा ना आधी. बिनधास्त कमिट करून टाकते."

"हे बरं आहे. आई तुझी, आग्रह तिचा आणि बोल तू मला लावतोयस."

"बरं बरं. लगेच ट्रॅक नको बदलूस."

"मी ट्रॅक बदलला नाहीये. तूच मला उगाच बोलतोयस."

"तू ट्रॅक बदलला नाहीस? नातेवाईकांवर पोचली नाहीस?"

"माफ कर रे बाबा मला. मला नाही तुझ्याशी भांडता येत." ती त्रासून म्हणाली.

"आणि मला तुझ्याशी भांडावंसं वाटत नाही." तो मिश्किल हसत म्हणाला. "काहीतरी झोलझाल करून सुट्टी मिळवेन मी!"

----------

अभय डोळे चोळत उठला. एकदम अंधार पडला होता.

'च्यायला दुपारी तासभरासाठी म्हणून झोपलो, तर आता संध्याकाळ होत आलीय.' तो आळस देत स्वतःशीच बोलत होता. "ह्या गावच्या मस्त हवेल झोपही मस्त लागते. पण हिनं उठवायचं नाही का मला!'

"स्मृती.." तिला हाक मारतच तो खोलीबाहेर आला. "स्मृती???"

"अरे ती आईसोबत कुठेतरी गेलीय बाहेर!" त्याची वहिनी म्हणाली.

"बरं बरं..पण इतक्या संध्याकाळी म्हणजे कमालच झाली!"

अभ्यास करत बसलेल्या पुतणीच्या टपलीत मारून तो बाहेर व्हरांड्यात जाऊन बसला.

"नाष्टा बनवून ठेवलाय रे. ये खायला, चहा टाकते मी. हे पण येतील एव्हढ्यातच." वहिनी म्हणाली.

"नको वहिनी, ही आली की मग जेवेनच सरळ."

"काय रे जोरू का गुलाम!"

एव्हढ्यात त्याला आई आणि स्मृती येताना दिसल्या. स्मृती एकदम थकून गेल्यासारखी वाटत होती.

"काय गं आई? कुठे घेऊन गेली होतीस हिला?" तो तिचा हात पकडत म्हणाला. तिचं अंग तापलं होतं.

"अरे कुठे नाही... देवळात" आई म्हणाली. पण त्या दोघींची झालेली नजरानजर त्याच्या नजरेतून सुटली नाही.

"तुला ताप भरलाय स्मृती!" चल आत आधी आणि तो तिला घेऊन आत गेला.

"परवा परत जायचंय आपल्याला आणि ताप कसला गं घेऊन आलीस?" तिच्या डोक्यावर तो पट्ट्या ठेवत होता.

"असंच रे..दमणूक झाली." ती त्याच्या नजरेला नजर न देता म्हणाली. त्याला काहीतरी विचित्र वाटलं.

----------

दोन महिने उलटले होते अभय आणि स्मृतीला गावाहून येऊन. अभयचा इलाज चालू होता. पण कदाचित इन व्हिट्रो - आयसीएसआय करावं लागणार होतं. अजून महिन्याभरात काही ना काहीतरी मार्ग निघेलच असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. स्मृती खुष होती कारण अभयनं सगळंच खूप सहज स्वीकारलं होतं.

आणि एक दिवस स्मृती अभयला परत म्हणाली.

"अभय, आईंनी बोलावलंय रे!"

त्यानं तिरक्या नजरेनं तिच्याकडे पाहिलं. "गेल्या वेळेस काय केलं होतंस तिथे लक्षात आहे ना? इथे परत आल्यावरही आठवडाभर आजारी होतीस. अशक्तपणा जाईस्तो महिना उलटला. आणि आता पुन्हा?"

"अरे एकदा आजारी पडले म्हणजे काय नेहमीच पडणार आहे का? आणि ह्यापूर्वीही कित्येकदा गेलोय ना आपण गावाला?"

"बरं माफ कर. मला नाही तुझ्याशी भांडता येत."

"आणि मला तुझ्याशी भांडावंसं वाटत नाही." तिनं हसून टीव्ही चालू केला.

----------

"स्मृती, तू नक्की आमच्याबरोबर येत नाहीयेस? असं शेवटच्या क्षणी काय गं!" अभयचा स्वर दुखावलेला होता.

"नाही रे. मला आईंबरोबर खूप सार्‍या गप्पा मारायच्यात. तू, भाऊजी, वहिनी आणि अबोली जाऊन या ना!"

"पण मग उद्या जाऊ ना आम्ही!"

"असं कसं रे, एव्हढी तयारी करताहेत वहिनी कालपासून."

"मग मी कशाला जाऊ, त्यांना जाऊ देत ना! तिकडे स्पेशली तुझ्यासाठी जायचं होतं. ते ठिकाण काय मी लहानपणापासून हजारदा पाहिलंय."

"असं कसं रे. त्यांना किती वाईट वाटेल. आपण जाऊ ना पुन्हा!"

"अगं पण उशीर होईल गं बये यायला!"

"अरे आहेत ना आई माझ्यासोबत!"

तो चेहरा पाडून गेला, तेव्हा स्मृतीलाच खूप वाईट वाटलं. त्याच्याशी ती कधीच खोटं बोलली नव्हती. तिला खूप अपराधी वाटत होतं.

----------

अभय रिक्षातून उतरला आणि पायवाटेवरून झपझप घराकडे निघाला. घराचा दरवाजा उघडा बघून त्याला शंका आली. आणि एकदम घरातून धूराचा वास येत होता. अचानक घरातून कुणीतरी मंत्रोच्चारण करत असल्याचा आवाज येऊ लागला. तो पटकन आवाजाच्या दिशेनं निघाला. आवाज स्वयंपाकघरातून येत होता. तो आत शिरला आणि आतलं दृश्य पाहून हादरलाच.

एक मांत्रिक एक हवन पेटवून बसला होता. त्याचे पांढरे कपडे, लांब वाढलेले काळे केस, दाढी-मिशा आणि कपाळाचं मोठ्ठं गंध ह्यांबरोबरच असलेल्या दाट भुवयांमुळे तो अजूनच भयावह दिसत होता. शेजारीच त्यांच्या ओळखीतल्या मुसळेबाई होत्या. आणि तो मांत्रिक स्मृतीवर काहीबाही उधळत होता. स्मृतीशेजारी बसून त्याची आई भक्तिभावानं हे सगळं बघत होती. अभयच्या आण्याची कुणालाच कल्पना आली नाही. अभय थिजूनच गेला होता. हे सगळं त्याच्या घरात चालू होतं ह्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. एव्हढ्यात त्या मांत्रिकानं स्मृतीला प्यायला काहीतरी दिलं. आणि अभय भानावर आला.

"थांब स्मृती!" तो जोरानंच म्हणाला.

सगळेच दचकून त्याला पहायला लागले. मुसळेबाई घाबरल्या, आई बावरली, स्मृतीला खूपच वाईट वाटत होतं. मांत्रिक त्याचे लालभडक डोळे रोखून त्याच्याकडे पाहत होता.

"स्मृती हे तू प्यायचं नाहीस!" तो पुढे होऊन तिच्या हातून ते भांडं काढून घेत म्हणाला.

"अरे अभय.."

त्याची आई काही बोलायला सुरूवात करणार इतक्यात मांत्रिक म्हणाला. "का नाही प्यायचं? तिला गरज आहे. तिचं औषध आहे ते."

"तिचं औषध? काय झालंय तिला?" तो अविश्वासानं स्मृतीकडे पाहत म्हणाला.

"ती वांझ आहे!" मुसळेबाई धीर एकवटून म्हणाल्या.

"मुसळेबाई!" अभय कडाडला, "तोंड सांभाळा आपलं! पाहुण्या आहात पाहुण्यांसारखं वागा." तशी मुसळेबाईंची बोलती बंद झाली.

"काय चुकीचं बोलल्या त्या?" आता चक्क अभयची आई म्हणाली.

"आई.." अभयच्या स्वरात दुःख ओतप्रोत भरलं होतं. "तू पण? तुला माहित तरी आहे..."

त्यानं वाक्य पूर्ण करायच्या आधीच स्मृतीनं त्याचा हात धरला. त्यानं स्मृतीकडे पाहिलं. ती त्याला डोळ्यानंच विनवत होती. त्याच्या डोळ्यांत अश्रू आले. मग त्याचं लक्ष मांत्रिकाकडे गेलं आणि अश्रूंची जागा संतापानं घेतली.

"आई, हे सगळं थोतांड बंद कर!" तो मांत्रिकाकडे बोट दाखवत म्हणाला.

"मुला, तू अजाण आहेस म्हणून माफ करतोय तुला. पण तुझ्या बायकोचा इलाज अजून बाकी आहे." मांत्रिक म्हणाला.

"मी तुझ्याशी बोलतोय का?"

"अभय! आदरानं बोल गुरूजींशी, गेल्या वेळेसही त्यांनी प्रयत्न केले, पण गुण येईना म्हणून ह्यावेळेस मोठं हवन ठेवलं. त्यांच्या हाताने गुण येत नाही असं झालं नाही आजवर."

"अच्छा, तर गेल्या वेळेस ह्या कर्मांची फळं भोगली होती स्मृतीनं महिनाभर! चल पाखंड्या उचल आपलं चंबूगबाळं आणि निघ इथून!"

"अरे गुरूजींशी नीट बोल. त्यांना पूर्ण करू दे इलाज. स्मृती बरोबरच म्हणत होती, तू नसतानाच हे सगळं व्हायला हवं होतं." आई बोलतच होती. "गुरूजी माफ करा माझ्या मुलाला. गेली दहा वर्षं शहरात राहून बिथरलाय थोडा!"

"आई!" अभय रागानं नुसता थरथरत होता, "काय झालंय काय तुला? काय बोलतेयस तू? बाबा गेल्यापासून तुझं देवदेवस्की वाढलं होतं, ते मला दिसत होतं. पण ह्या थराला गेलंय ठाऊक नव्हतं. हे सगळं ह्या मुसळेबाईंच्या संगतीमुळे झालंय." अभयनं रागानं मुसळेबाईंकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. "आणि काय इलाज करणार आहे हा! जग कुठच्या कुठे गेलंय आणि तुम्ही ह्याच्या इलाजाकडे काय डोळे लावून बसलाय. आणि करायचाच असेल काही इलाज तर तो माझ्यावर..." स्मृतीनं त्याचा हात घट्ट धरून ओढला. त्यानं तिच्याकडे पाहिलं. त्याला भरून आलं होतं. तो तिच्याकडे ज्या नजरेनं पाहत होता, ते वर्णन करणं अशक्य आहे. अभयनं स्वतःवर ताबा मिळवायचा प्रयत्न केला.

"बरं झालं मला करमेना म्हणून त्यांना अर्ध्यातच सोडून मी परत आलो." बोलून तो मांत्रिकाकडे वळला, "आता निघतोयस बर्‍या बोलानं की धक्के मारून बाहेर काढू तुला सामानासकट!"

मांत्रिकानं एक जळजळीत कटाक्ष त्याच्याकडे आणि त्याच्या आईकडे टाकला आणि तो त्याची पिशवी उचलून निघाला. अभयची आई त्याच्यामागे, त्याची माफी मागत दारापर्यंत गेली. अभयनं मुसळेबाईंकडे पाहिलं. त्या थिजून स्तब्ध उभ्या होत्या, त्या एकदम भानावर आल्या आणि चटकन बाहेर गेल्या.

अभयनं स्मृतीकडे पाहिलं आणि तिला मिठीत घेतलं. आता तिचा आणि त्याचा दोघांचाही बांध फुटला.

----------

अभय आणि स्मृती त्यांच्या खोलीत बसले होते.

"तू आईला बोलली का नाहीस?"

"काय बोलायचं?"

"हेच की दोष माझ्यात आहे. मी नामर्द आहे!"

"बस! काहीबाही बोलू नकोस."

"कळलं आता मला किती वेदना झाल्या असतील, जेव्हा तुझा काहीच दोष नसताना ते लोक तुला वांझोटी म्हणत होते."

"अरे त्यांना काय कळे. अशिक्षित आहेत त्या!"

"अशिक्षित आहेत म्हणून अमानुष व्हायचं? गेल्या वेळेस तुझी काय अवस्था झाली होती ते आईलाही ठाऊक आहे. तरीही तिनं असं करावं?"

"अरे आजी व्हायचंय त्यांना!"

"आहे की ती अबोलीची आजी!"

"अरे नातू हवाय त्यांना!"

अभयनं कपाळाला हात मारला. "आत्ता लक्षात येतंय माझ्या! स्मृती, हे प्रकरण हाताबाहेर जाणार असं दिसतंय मला. आपण उद्याच्या उद्या पहाटेच इथून निघायचं. आय होप, तुझा चांगुलपणाचा आणि सोशिकपणाचा ताप आता उतरला असेल."

"अरे मी विचार केला इलाज होईस्तो त्या जे बोलतील तसं करावं, एकदा आपला इलाज पूर्ण झाला आणि मी गरोदर राहिले की त्यांनाही समाधान!"

"पण हे असले अमानुष प्रकार बघूनही तू गप्प राहिलीस?"

"कशाला दुखवायचं रे त्यांना!"

"हो हो आणि मला दुखवलेलं चालतं ना?" तो तिच्याजवळ गेला आणि तिचा चेहरा हातात घेत म्हणाला, "एव्हढा चांगुलपणा बरा नाही गं!" तिनं फक्त मान डोलावली.

"बरं ऐक आता. शहरात आमच्या फॅक्टरीत माझ्या अंडर एक सुपरवायझर आहे गगन म्हणून, ह्याच गावचा. त्यानं बोलावलं होतं. त्याच्या घरी जाऊन येतो. तू आराम कर, सामान आवर काही हवंतर आणि अमोल-वहिनी आल्याशिवाय खोलीतून बाहेर पडू नकोस. मी लवकरात लवकर यायचा प्रयत्न करतो."

क्रमशः

ही कथा ह्यापूर्वी मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१० मध्ये प्रकाशित झाली होती.

12/12/2010

निवड - पुन्हा

मागे एकदा निवड ह्या विषयावरच पोस्ट लिहिली होती, त्यामुळे वरती एक पुन्हा टाकलंय (नंतर अजून एखादी टाकली तर 'पुन्हा एकदा', त्यापुढे 'पुन्हा पुन्हा एकदा' आणि मग 'अजून पुन्हा पुन्हा एकदा'... असो फार पाणचटपणा झाला आणि नेमका विषय थोडा गंभीर आहे, त्यामुळे आवरतो).

तर निवड, म्हणजे एखादा मार्ग निवडणे हे कितपत आपल्या हातात असतं, किंवा ती निवड करायला कुठले घटक कारणीभूत ठरतात, ह्याची "अ क्लॉकवर्क ऑरेंज" ह्या सिनेमाच्या अनुषंगानं गेल्या वेळेस मी थोडी चर्चा करायचा बाळबोध प्रयत्न केला होता, आणि ह्यावेळेस बेसिकली चांगलं आणि वाईट हे नक्की कसं ठरू शकतं, ह्याशी थोडीशी निगडीत चर्चा 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई' ह्या कमर्शियलकडे झुकणार्‍या परंतु जाणते-अजाणतेपणी एक विचित्र गडद थीम दर्शवणार्‍या सिनेमाच्या अनुषंगानं करायचा अजून एक बाळबोधसा प्रयत्न.

मी 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई' चांगला आहे असं सगळ्यांनी सांगूनही बघायचं टाळत असण्याचं एकमेव कारण म्हणजे मी सहसा कुठल्याही 'गँगस्टर'चं आणि बहुतेकदा 'दाऊद'चं उदात्तीकरण (जाणते-अजाणतेपणी) करणारे सिनेमे (मीडिऑकर असतील तर) सहसा टाळतो. कारण मीडिऑकर असल्यानं त्यातनं सिनेमॅटिक अनुभवही मिळत नाही आणि फुकट गँगस्टरांची पब्लिसिटी होते हे पाहून मला त्रास होतो. अर्थात पब्लिसिटी फुकट नसते, त्यांचेच पैसे लागलेले असतात सिनेमात म्हणा. तर 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई'चं असंच काहीसं असावं असं माझ्यावर इम्प्रेशन होतं. त्यामुळे मी फारसा उत्सुक नव्हतो, पण विमानात झोप येत नव्हती आणि त्यात रणदीप हूडा असल्याचं दिसलं (जे मला माहीत नव्हतं) त्यामुळे मी बघण्याचा निर्णय घेतला.

बर्‍याच केसेसप्रमाणे रणदीप हूडाच्या बाबतही लोकांचे माझ्याशी तीव्र मतभेद असू शकतात. पण पोलिसाच्या भूमिकेमध्ये रणदीप हूडाईतका अक्षय कुमार सोडल्यास सांप्रतच्या कलावंतांमध्ये कुणीही शोभत नाही, हे माझं ठाम मत आहे. असो. तर हूडानं ह्यामध्ये पोलिसाची भूमिका केलीय. सिनेमाची सुरूवात एका विचित्र वळणावर होते. १९९३ सालच्या मुंबई बॉम्ब ब्लास्ट्स नंतर डीसीपी ऍग्नेल विल्सन (रणदीप हूडा) आत्महत्येचा प्रयत्न करतो. आणि त्याचं कारण त्याला कमिश्नर विचारतो तेव्हा तो मुंबईच्या आजच्या अवस्थेला स्वतः कारणीभूत असल्याचं सांगत काही वर्षांपूर्वी घडलेला घटनाक्रम सांगायला सुरूवात करतो आणि त्यातून सुलतान मिर्ज़ा (अजय देवगण) हा हाय-प्रोफाईल स्मगलर (हाजी मस्तानशी साम्य दर्शवणारं पात्र) आणि शोएब खान (इमरान हाश्मी) हा कुठल्याही मार्गाने पैसा आणि अनिर्बंध ताकद आणि सत्ता मिळवायची स्वप्न असलेला बेदरकार आणि उलट्या काळजाचा तरूण (दाऊदशी साधर्म्य दाखवणारं पात्र) ह्यांची गोष्ट आपल्यासमोर उलगडत जाते.

सुलतान मिर्ज़ाचा रंकापासून राजापर्यंतचा प्रवास, मग त्याला प्रसिद्धीची आवड असणं, छानछोकीची आवड असणं, तरी कायम गरीबांची (एस्पेशली डोंगरी भागातल्या) मदत करून तिथल्या भागातलं प्रतिसरकार सारखं बनणं हे सगळं थोड्याशा फिल्मी पद्धतीनं दाखवलं गेलंय. सुलतान हा गोदीमध्ये लहानाचा मोठा झालेला एक तस्कर. सोनं आणि परदेशी घड्याळं (ज्यांवर पूर्वीच्याकाळी बरीच कस्टम ड्यूटी पडायची) ह्यांची तस्करी करून सर्वांत मोठा बनलेला असतो. सुलतानचा शब्द मुंबईच्या गुन्हेगारी जगतात शेवटचा समजला जातो, कारण त्यानं सर्व गुन्हेगारांना भाग वाटून देऊन आपापसांत भांडण्यापासून अडवलंय. मुंबईतले रस्ते आणि सामान्य माणसं सुरक्षित आहेत, कारण त्याचे स्वतःचे धंद्याबाबतचे काही नियम आहेत. जसे ड्रग्ज आणि दारूची तस्करी न करणे, सुपार्‍या घेऊन खून न करणे इत्यादी. पण बाकी बेकायदेशीर कामं करण्यास त्याची ना नाही. सुलतानची निवड धार्मिक प्रभावांखाली ठरल्यासारखं जाणवतं. त्याच्या योग्य अयोग्याच्या कल्पना धार्मिक बाबींवर मूलतः अवलंबून आहेत आणि बाकीच्या पोटापाण्यावर त्या त्या वेळच्या सोयीनुसार. पण इथे ही थीम येते, की प्रसिद्धी माध्यमं आपल्या सवंगपणानं सुलतानला हिरो बनवून टाकतात आणि मोठी स्वप्नं असलेला प्रत्येक बेकार तरूण सुलतानला आपला आदर्श समजू लागतो. इथेच त्याकाळी एसीपी असलेला ऍग्नेल विल्सनची विचारसरणी पहिल्यांदाच आपल्यासमोर येते.

ऍग्नेल सरकारी नोकर आहे, आणि त्याचा सरकार ह्या व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. भले सरकारी कारभारामध्ये काहीजणांवर अन्याय होत असेल, तरीही मी त्या व्यवस्थेसाठी काम करतो आणि तीच सर्वोत्तम मार्ग असून तिच्याविरुद्ध उठणारी प्रत्येक गोष्ट अयोग्य असल्याचा दुर्दम्य विश्वास ऍग्नेलमध्ये आहे. आणि तो आपल्या मानलेल्या कर्तव्यपूर्तीपुढे स्वतःच्या जीवाचाही विचार करत नाही. त्याची निवड मूलतः सामाजिक आणि शैक्षणिक प्रभावाखाली ठरते आणि तो आपल्या निवडीबाबत पूर्णपणे ठाम आहे. त्यामुळे साहजिकच सरकारी महसूल बुडवून तस्करी करून मग गरीबांची थोडी मदत करून मसीहा बनलेल्या सुलतानबद्दल ऍग्नेलला केवळ तिरस्कार वाटतो. आणि त्याचं समाजासमोर ग्लोरिफिकेशन होत असलेलं पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तो सुलतानची पाळंमुळं खणून काढायचा निर्णय घेतो. सुलतानची गर्लफ्रेंड असलेली सिनेनटी रेहानावर दबाव आणून तिच्याकडून काही पुरावे मिळवायचा प्रयत्न करताना रेहाना आणि सुलतान बनाव रचून त्याला लाच घेताना मीडियासमोर आणून त्याचा पाया हलवतात. ह्या घटनेमुळे तर पोलिसातही सुलतानचे प्रशंसक वाढलेले पाहून ऍग्नेल दुखावतो, पण तो सुलतान ह्या फिनॉमेनाला संपवायचे मार्ग शोधत राहतो. तो वेळोवेळी सुलतानसकट त्याच्या जवळच्या लोकांनाही त्यांच्या सो कॉल्ड समाजसेवेतला फोलपणा समजावत राहतो पण पालथ्या घड्यावर पाणी पडत राहतं. सुलतानच्या करिष्म्यानं अनेक राजकीय पक्षदेखील प्रभावित असतात. आणि अशातच मग सुलतानसमोर शोएब येतो. शोएबमधलं वेड पाहून सुलतान त्याला आपल्या पंखाखाली घेतो आणि शोएबची प्रगती होऊ लागते. पण शोएबची निवड फारच सरळसोट असते. त्याला नीतीमत्ता नावाचा प्रकारच माहित नसतो. फक्त पैसा आणि अनिर्बंध सत्ता एव्हढ्या दोनच लक्ष्यांकडे त्याची दौड सुरू असते. त्यामध्ये चांगलं-वाईट वगैरे वर्गीकरण करण्याची त्याला गरज नसते. त्याला एक दिवस सुलतानसारखं बनायचं असतं आणि त्यासाठी कुठल्याही थराला जायला त्याची ना नाही.

ऍग्नेल सर्व पाहून डोळे मिटून बसतो कारण त्याला शोएबच्या रस्त्यांमध्ये सुलतानच्या मूलभूत नियमांशी फारकत दिसते. विष विषाला मारतं तद्वतच तो शोएबच्या उन्नतीचा वापर सुलतानच्या अस्तासाठी करायचं ठरवतो आणि शोएबला अजाणतेपणीच आयतं मोकळं रान मिळतं. मग एक दिवस सुलतानला स्वतःच्या प्रभावाला राजमान्यता मिळवावीशी वाटते आणि तो राजकीय पक्षात प्रवेश करण्यासाठी दिल्लीला जायचं ठरवतो. आणि काही दिवसांसाठी तो शोएबच्या हाती सत्ता देतो आणि इथेच ऍग्नेलचा प्लॅन यशस्वी होण्याची बीजं दिसू लागतात. शोएब पैशांसाठी कुठलंही बरंवाईट काम करू शकतो आणि तो ते करूही लागतो. अल्पावधीतच शोएब गुन्हेगारी जगतामध्ये खूप पुढे निघून जातो. पण सुलतानचा पूर्ण व्यवसायच सुलतानच्या अनुपस्थितीत पालटून जातो. आपल्या राजकारण प्रवेशाची व्यवस्था लावून सुलतान परततो तेव्हा घडलेल्या घटनांनी तो हादरून जातो. शोएबला अपमानित करून तो टोळीबाहेर काढतो. पण आपल्या नियमांमुळे सुलताननं पूर्वीपासूनच अनेक छुपे शत्रू निर्माण करून ठेवलेले असतात. त्यातलाच एक शोएबला हाताशी धरून सुलतानचा काटा काढायचा प्लॅन करतो.

एव्हाना ऍग्नेलला आपल्या हातून घडलेल्या प्रमादाची कल्पना आलेली असते. पण आता शोएब हाताबाहेर गेलेला असतो. आणि सुलतानला संपवून तो गुन्हेगारी जगताचा सम्राट बनतोच आणि मुंबईला कायमचं गुन्ह्यांच्या छायेखाली आणतो. आणि एक दिवस ह्याचीच परिणती १९९३ ब्लास्ट्समध्ये झाल्याचं ऍग्नेल शेवटाकडे सूचित करतो. त्यामुळेच सुलतान आणि शोएबमधल्या एकाची निवड करण्यात स्वतःची चूक झाल्याचं मान्य करत तो अपराधी भावनेनं आत्महत्येचा प्रयत्न करतो.

शेवटी तो सांगतो की दोन चुकीच्या गोष्टींमधली एकाची निवड करणं अवघड असतं. आणि त्यातच त्याची चूक झाल्याचं सांगतो. पण खरंच तसं असतं का? ऍग्नेल तत्वनिष्ठ आणि स्वच्छ चारित्र्याचा पोलिस असतो. पण सुलतान त्याला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकवतो. ऍग्नेलच्या जवळ असणारे अनेकजण सुलतानचे चाहते असतात ज्यामुळे वेळोवेळी ऍग्नेल तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत असतो. कदाचित ह्याच कारणांमुळे फक्त सुलतानला संपवणं हेच त्याचं लक्ष्य बनून जातं आणि त्यात शोएब कामास येऊ शकतो हे पाहून तो परिणामांची पर्वा न करतो 'फ्रँकेनस्टाईन मॉन्स्टर' बनवतो (आपल्या निर्मात्यालाच संपवणारा) असं एकंदर जाणवतं. अर्थात प्रत्यक्षात दिग्दर्शकाला इतका ऊहापोह करायचा असावा असं मला वाटत नाही. मीच कदाचित झोप न झाल्याने सिनेमाचा फार खोलात विचार केला.

सिनेमा पूर्णतया कमर्शियल होता हे त्यामध्ये जोडलेली चांगल्या गाण्यांची ठिगळं आणि बिनकामाच्या हिरॉईन्सवरून कळतं. पण तरीही जाणते-अजाणतेपणी सिनेमा मानवी स्वभावाच्या काही पैलूंवर प्रकाश टाकतोच. अजय देवगण भूमिका जगतो. पण त्याचा रोल बराचसा फिल्मी झालाय. इमरान हाश्मीऐवजी एखादा अजून चांगला नट घेता आला असता. तरीदेखील काही अपवादात्मक प्रसंगांमध्ये इमरानही छाप सोडतो. रणदीप हूडाचं नाव सुरूवातीला स्पेशल ऍपिअरन्स म्हणून येतं बहुतेक, पण त्याचा रोल बर्‍यापैकी मोठा आहे. आणि मला तरी त्याचा अभिनय इमरानपेक्षाही चांगला वाटला. काही प्रसंगांमध्ये तो अजयसमोरही घट्ट पाय रोवून उभा राहतो. त्यातून त्याची पर्सनालिटी त्याच्या व्यक्तिरेखेला शोभते.

एकंदर चांगल्या संवादांबरोबरच चांगली कथा असल्यानं (पटकथा थोडी लेटडाऊन करते) सिनेमा मनोरंजन तरी चांगलं करतो. मी वरती जेव्हढं निवड वगैरेंवरून पकवलं त्या सगळ्याचा विचारही न करतादेखील एकदा आरामात बघता येईल.

12/08/2010

चान्स पे डान्स

कुठेतरी वाचलं होतं, की यशस्वी माणूस तो असतो, जो कुठलीही स्थिती स्वतःला अनुकूल बनवून घेऊ शकतो. आणि गेल्या काही दिवसांत मला ह्याचा बरेचदा प्रत्यय येत होता, पण नजीकच्या काळात दोन प्रसंगांमध्ये मात्र प्रकर्षानं ह्या सत्याची जाणीव झाली.

'मुन्नी' नं बदनाम होताना झंडू बाम लावला तेव्हा झंडू बामवाले गपचूप बसून मजा बघत राहिले. मग एकदा मुन्नी पुरेशी बदनाम झाल्यावर कॉपीराईटची धमकी देऊन मलाईका अरोराला फुकटात ब्रँड ऍम्बॅसेडर (भूषण अग्रदूत) म्हणून करारबद्ध करून घेतलं. ही बातमी ऐकून खरंतर माझा झंडू बामबद्दलचा आदर द्विगुणितच झाला होता. पण आज एक अजून जबरा बातमी ऐकायला मिळाली आणि बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे झंडू बामबद्दलच्या आदराच्या रेषेशेजारी एक अजून मोठी रेषा ओढली गेली, बर्नी एक्लस्टनबद्दल.

बर्नी एक्लस्टन, हा ८० वर्षांचा गृहस्थ, फॉर्म्युला वन, अर्थात एफ-वन, ह्या जगातल्या सर्वांत महागड्या कार रेसिंग खेळांच्या कंपनीचा अध्यक्ष आणि सीईओ. तो गेल्या आठवड्यात आपल्या ऑफिसबाहेर पडून आपल्या गाडीत बसत असताना त्याच्यावर काही भामट्यांनी हल्ला केला आणि एक-दोन गुद्दे लगावून त्याच्या हातावरचं 'हुब्लो' ह्या लग्झरी घड्याळ कंपनीचं १७००० अमेरिकन डॉलर्स किंमतीचं (सुमारे ७ लाख भारतीय रुपये) मनगटी घड्याळ हिसकावून पळून गेले. लगावलेल्या गुद्द्यांमुळे बर्नीचा एक डोळा काळा-निळा झाला आणि चेहर्‍यावर एखाद दोन छोट्या जखमाही आहेत. एकतर बर्नीचं वय ८०, त्यात असा मार बसलेला, आणि अशा स्थितीत त्याच्या बायकोनं त्याचा फोटो तिच्या कॅमेरात काढला. दोन दिवसांनंतर बर्नी हुब्लो कंपनीच्या सीईओ वगैरे लोकांबरोबर सहज बोलत होता, की तुमच्या घड्याळापायी मला मार पडला वगैरे. तेव्हा अचानक बर्नीला 'फ्लॅश ऑफ जिनियस' झाला. तो म्हणाला, "माझ्या बायकोच्या मोबाईलमध्ये माझा फोटो आहे. तो घ्या आणि त्याला हाय डेफिनेशन वगैरे बनवा आणि हवंतर तुमच्या जाहिरातीसाठी वापरा." झालं, 'हुब्लो' वाल्यांनी पडत्या फळाची आज्ञा घेत त्याचा फोटो घेतला आणि "'बघा, हुब्लो' घड्याळांसाठी लोक काय काय करतात?" अशा काहीशा अर्थाची एक टॅगलाईन बनवून जाहिरात बनवली आणि हल्ल्याच्या घटनेला आठवडा होण्याच्या आतच ती मासिकांमध्ये देखील झळकली.

ह्या 'हुब्लो' च्या सीईओची सीएनएन वाला मुलाखत घेत होता, तेव्हा 'हुब्लो' च्या सीईओनं काही पथप्रदर्शक वक्तव्यं केली. जसे, "आता आपण नव्या शतकात जगत आहोत, जिथे लग्झरी ही एक जीवनपद्धती आहे. लग्झरी ही आता केवळ चैन नसून गरज बनतेय." माझे डोळे खडाखड उघडत असतानाच, सीएनएन वाल्यानं प्रश्न केला, की अशा प्रकारे हल्ल्याला ग्लॅमराईज करणं योग्य आहे का? तेव्हा 'हुब्लो'चा सीईओ म्हणाला, "हिंसा ही निंदनीयच आहे आणि आम्ही आमच्या जाहिरातीतून हिंसेला कुठेही ग्लॅमराईज करत नाही आहोत. आज हिंसा किती वाढलीय वगैरे वगैरे." आणि प्रश्नाला साफ बगल देऊन त्यानं माझा त्याच्याबद्दलचा आदर अजून वाढवला.

त्यापुढे सीएनएन वाल्यानं विचारलं की तुम्ही बर्नी एक्लस्टनला रिप्लेसमेंट घड्याळ दिलंत का? तेव्हा त्यानं दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक होतं. तो म्हणाला की, "आम्ही बर्नीला भेटायला त्याच्या घरी गेलो होतो, तेव्हा आम्ही रिकाम्या हातांनी तर जाऊ शकत नव्हतो. त्यामुळे आम्ही एक छोटीशी भेट म्हणून एक घड्याळ घेऊन गेलोच होतो."

आता ह्यावर सीएनएन वाला जे म्हणाला तेच मी म्हणेन, "कधी आम्हालाही भेटायला या!"

12/05/2010

दूधखुळा

तुम्ही अझरूद्दीन दुर्दैवीरित्या धावबाद झाला म्हणून घरातच चीडचीड केलीत. भारत दक्षिण आफ्रिकेकडून वाईट पद्धतीनं हरल्यामुळे तुमचा अख्खा दिवस वाईट गेला. आणि दक्षिण आफ्रिकेची शेवटची विकेट पडायची वाट पाहत, लाईट गेलेत म्हणून तुम्ही रेडिओवर कानात प्राण आणून कॉमेंट्री ऐकताय आणि विकेटच पडत नाहीये म्हणून तुम्ही रडकुंडीला आलायत शेवटी ज्या क्षणी तुमच्या डोळ्यांतून अश्रू गालांवर ओघळतात, त्या क्षणीच एकदाचा पॉल ऍडम्स आऊट होतो आणि तुम्ही आनंदानं ओरडून आईनं तासाभरापूर्वी वाढून ठेवलेलं ताट एकदाचं समोर ओढता. आणि...

आणि ५-६ महिन्यांनी पेपरांमध्ये बातम्या येतात, अझरूद्दीन आणि दक्षिण आफ्रिकन कप्तानानं जवळपास प्रत्येक मॅच फिक्स केलेली होती.

तुमची प्रत्येक आरोळी, तुमचं हास्य, तुमचं दुःख, तुमची निराशा, तुमचा आवेग, तुमचं दुःख, तुमचे अश्रू, तुमची प्रत्येक भावना काय किंमतीची राहिली? ही भावना माझ्या चांगल्याच ओळखीची आहे. विश्वासघात झाल्याची, पण त्याहून जास्त बोचतं ते हे सत्य की तुम्हाला मूर्ख बनवलं गेलं. जगात सर्वांत वाईट दोन भावना असतात, एक म्हणजे तुमच्याशिवायसुद्धा तुमच्या भोवतालच्या प्रत्येक माणसाचं सगळं काही व्यवस्थित चालू शकतं ही आणि दुसरी म्हणजे तुमच्या नकळत तुमचा वापर करून घेतला गेल्याचं लक्षात येणं ही. पण सर्वांत वाईट सत्य हे आहे, की ह्या दोन्ही गोष्टी समजायला लागल्यापासून ते मरेपर्यंत वारंवार तुमच्याबरोबर होत राहतात, पण तरीदेखील त्यामुळे तुम्हाला लागणारी बोच कमी होत नाही. तुम्ही तितकाच त्रागा करून घेता किंवा मनातल्या मनात कुढत राहता.

ओके. आता आपण तुम्ही ऐवजी मी म्हणूया. कारण माझ्याबरोबर हे सगळं असंच्या असं झालेलं आहे. आणि कुठल्याही सामान्य भावनिक 'इमोशनल फूल' भारतीय माणसाप्रमाणे मी अनेकदा वापरला गेलोय. अगदी शाळकरी वयापासून ते 'सुजाण' मतदाता बनेपर्यंत, प्रत्येक पावलावर मी भावनेच्या भरात अनेक गोष्टी केल्यात आणि नंतर सत्य समजल्यावर मनातल्या मनात स्वतःला कोसलंय.

भारतीय क्रिकेट संघासाठी जीव टाकण्याच्या वेडापासून सुरूवात झाली ती पार राज ठाकरेंच्या 'माझी घुसमट होतेय' ला मनातून समर्थन देण्यापर्यंत मी भावनिक मूर्खपणा खूप केलाय. मी जरी मनातून भाजपबरोबरच होतो तरी राज ठाकरेंवर 'अन्याय' होतोय ही भावना माझ्यावर योग्य पद्धतीनं 'रोपित' झाली होती. पण सुदैवानं राहुल गांधीला केलेल्या शून्य विरोधापासून ते अशोक चव्हाणांच्या समर्थनापर्यंत अनेक गोष्टी माझ्या दुर्दैवानं संशयी आणि अतिचिकित्सक असलेल्या राजकीय मेंदूच्या लक्षात येत गेल्या आणि तीच भावना निर्माण होत गेली.

अटलबिहारींचं सरकार एका मतानं कोसळलेलं लाईव्ह टीव्हीवर पाहून अश्रू ढाळणारा मी आणि नंतर तेरा महिन्यांसाठी आणि त्यानंतर पूर्ण वेळासाठी सरकार विश्वासमत जिंकल्यावर आनंदित झालेला मी, अटलबिहारींचा वारस म्हणवणार्‍या प्रमोद महाजनांचे उंची लाईफस्टाईल आणि विविध भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले हात पाहून आणि सेंटॉर घोटाळ्यापासून ते शवपेट्या आणि बंगारू लक्ष्मणचे प्रताप पाहून मनातल्या मनात काय भोगत होतो ते मलाच ठाऊक आहे.

नीरा राडियाच्या टेप्स ऐकून आपलं सरकार आणि आपले मंत्री कुठल्या पद्धतीनं बनवले जातात हे उघडं सत्य पहिल्यांदाच प्रत्यक्ष नागडं झालं. आपल्याला बातम्या देणारी मंडळीच बातम्या बनवण्याच्या खेळामधले हीन दर्जाचे दलाल आहेत हीदेखील ऐकीव माहिती खरी असल्याचं समोर आलं. आणि माहित असलेल्याच गोष्टींवर शिक्कामोर्तब होतानाही एक कळ मात्र अजाणतेपणीच उठली. का? कशासाठी? सगळंच तर ठाऊक होतं. पण कदाचित मीच दूधखुळा ज्याला कुठेतरी माहित असलेलं सगळं अतिरंजित असेल अशी एक भाबडी आशा होती आणि कदाचित त्या आशेचाही गळा घोटला गेल्यावर मात्र वेदना अनावर झाली आणि कळ उठली.

लहानपणापासून संघाची शिस्त आणि राजकारण ह्यांचा मिलाफ म्हणून भाजपाकडे मी एका वेगळ्या नजरेनं पाहायचो. मी कधी संघाच्या शाखेत गेलो नाही, पण संघाची विचारसरणी मला बर्‍यापैकी ठाऊक आहे ती माझ्या संघचालक वडिलांमुळे. पण जेव्हा भाजपामध्ये चाललेली चिखलफेक पाहिली आणि अगदी आमच्या भागातले नगरसेवकापासून ते आमदारकीसाठीचे उमेदवार कसे पैसे देऊन उमेदवारी मिळवताहेत, हे माझ्या वडिलांच्याच तोंडून ऐकलं तेव्हा माझी झालेली चीडचीड मला अजून आठवते. पण त्याहून जास्त त्रास ह्या गोष्टीचा विचार करून झाला, की वर्षांनुवर्षं संघाची विचारसरणी अक्षरशः जगणार्‍या माझ्या बाबांसारख्या अनेकानेकांना ह्या सर्व गोष्टींचा किती त्रास होत असेल. आणि दुसर्‍या दिवशी सकाळीही उठून जेव्हा बाबा नेहमीप्रमाणे शाखेत निघाले तेव्हा मला काहीच समजेनासं झालं. ही माणसं कदाचित ह्या भावनेवर मात करायला शिकली आहेत.

एखादेवेळेस मी ही त्या वयाचा होईपर्यंत असाच होईन असंच मला वाटायचं. पण कदाचित तसं होणार नाही. कारण वारंवार फसवलं गेल्यानंतर माणसं एकतर सहन करायला शिकतात किंवा प्रत्येक गोष्टीवर संशय घेऊ लागतात. मी दुसर्‍या प्रकारात मोडणारा झालोय.

दोनेक महिन्यांपूर्वी विकिलीक्सच्या कार्यामुळे मी आनंदित झालो होतो आणि ते करत असलेल्या कार्यामध्ये मला क्रांतीची बीजं दिसत होती. मी अतिशय प्रभावित होऊन एक कौतुक करणारी आणि शुभेच्छा देणारी पोस्टही लिहिली होती. पण त्यानंतर घडत गेलेल्या घटनांनी मी द्विधा मनःस्थितीत पडलोय. अमेरिकेची काही गुपितं उघड करून विकिलीक्सनं अमेरिकेची जगहसाई तर व्यवस्थित केली. पंण...

पण थोडा नीट विचार केला तर काय दिसतं. व्हिडिओगेम्सप्रमाणे नागरिकांना हसत हसत मारणारे अमेरिकन सैनिक, हे काय जगाला ठाऊक नसलेलं सत्य होतं? अबू-ग़रेब च्या आठवणी विस्मृतीच्या गर्तेत गेल्या होत्या एव्हढंच, नाहीतर अमेरिकन कारनामे येन केन प्रकारेण लोकांसमोर येतच होते. त्यामुळे अमेरिकेचा बुरखा फाटला हे जरी सत्य आणि स्तुत्य असलं तरी त्यामुळे अमेरिकेला प्रत्यक्षात काहीच फरक पडला नाही. 'आमच्या युद्धनीती जगासमोर येतील आणि शत्रू प्रबळ होईल' अशी कोल्हेकुई अमेरिकेनं केली हे जरी सत्य असलं, तरी प्रत्यक्षात तसलं काहीच घडलंय असं कुठे वाचण्यात आलं नाही, कारण विकिलीक्स डॉक्युमेंट्स संपादित करून प्रकाशित करतंय. विकिलीक्सला मिळणार्‍या फुटलेल्या कागदपत्रांची 'संख्या', 'प्रमाण' आणि 'सातत्य' संशयाचं वलय निर्माण करतं. कारण एव्हढे महिने उलटूनही अमेरिकेला एकही गळका नळ बंद करता आलेला नाही हे अविश्वसनीय वाटतं (किंवा जरी त्यांनी जगहसाईच्या भीतीनं गुप्तपणे काही नळ बंद केले असले, तरीदेखील गळती एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर चालूच रहावी हे अविश्वसनीय वाटतं). आणि ज्युलिअन असाँजवर अद्यापही 'एस्पिओनेज ऍक्ट' लावण्यात अमेरिकन सरकार दिरंगाई का करतंय हा अनुत्तरित प्रश्न आहे. आणि ह्याच क्षणी थोडंसं सिंहावलोकन करता एक गंमतीशीर गोष्ट लक्षात आली. पहिली मोठी गळती प्रकाशित केल्या केल्या असाँजवर बलात्काराची केस टाकली गेली आणि चोवीस तासांत मागे घेतली गेली. ह्यावर माझ्यासकट सर्व भावनिक माणसांनी अमेरिकन बाळबोधपणाची खिल्ली उडवली. पण कदाचित तेच अमेरिकेला हवं होतं? अमेरिकेसारखी पाताळयंत्री शक्ति इतकी सरळसोट चूक करेल? पण कदाचित त्यांना आपल्या दूधखुळेपणावर प्रगाढ विश्वास असावा. आणि अजून एक म्हणजे (कदाचित सैतानी विधान वाटेल पण) असाँज अजून जिवंत किंवा पूर्णपणे धडधाकट कसा? त्याच्यावर अजून एकही हल्ला झाला नाही?

मी स्वतःचा माझे मुद्दे फिरवतोय का? असं मला वाटू लागलंय म्हणून थोडीशी ताजी निरीक्षणं अशी की नुकत्याच प्रकाशित 'डिप्लोमॅटिक केबल्स' चा परिणाम नीट अभ्यासल्यास पुढचे मुद्दे समोर येतात.

१. उत्तर कोरिया आणि चीनच्या संबंधांत संशय निर्माण होऊ शकतो.

२. इराण आणि मध्यपूर्वेच्या देशांच्या संबंधांत असुरक्षितता निर्माण होऊ शकते, जी इराणच्या वाईटासाठी आणि इस्रायलच्या पथ्यावर पडणारी आहे.

हे दोन्ही मुद्दे सरळसरळ अमेरिकेच्याच पथ्यावर पडणारे दिसतात. आता उत्तर कोरिया, चीन आणि इराण काही चांगली सरकारं आहेत अशातला भाग नाही, पण अमेरिकेच्या केबल्स रिलीज करून आम्ही अमेरिकेचा बुरखा फाडतोय असा जो आविर्भाव एकंदर आहे तो दिशाभूल करणारा आहे. अर्थात त्याच केबल्समधील काही ह्या अमेरिकन मित्रराष्ट्रांच्या नेत्यांची खिल्ली उडवणार्‍या देखील आहेत, पण अर्थात जर सगळाच बनाव असला तर असल्या गोष्टींची पूर्वकल्पना देता येऊ शकते आणि केली गेलेली विधानं ही उघड गुपितंच आहेत.

संशयी मन ह्या सगळ्यांचा असा निष्कर्ष काढतंय की अमेरिका विकिलीक्सला वापरतंय, स्वतःला दोन चापट्या मारून जगाची दिशाभूल करत शत्रूंना धोबीपछाड घालायचा प्रयत्न करतंय. पण कदाचित उलटही असेल, की रशिया किंवा चीन अमेरिकेला धोबीपछाड घालण्यासाठी स्वतःला चापट्या मारतंय. पण दोन्ही केसेसमध्ये दोन गोष्टी अनुत्तरित राहतात, एक म्हणजे एव्हढी कांडं करण्यासाठी लागणारा भरमसाठ पैसा विकिलीक्सकडे येतो कुठून आणि दुसरा म्हणजे आपण कुणावर विश्वास ठेवायचा? कारण दोन्ही केसेसमध्ये आपण मॅनिप्युलेटच केले जातोय. अर्थात लगेच विकिलीक्सवरचा माझा विश्वास उठलाय अशातला भाग नाही. पण जोवर खरंच अमेरिकेला किंवा कुठल्याही अनैतिक शक्तिला प्रत्यक्ष नुकसान पोचवणारं असं काही विकिलीक्स समोर आणत नाही तोवर संशयाला जागा राहतेच.

मग मात्र प्रचंड वैचारिक मंथन होतं आणि शेवटी मी निष्कर्ष काढतो की दूधखुळा राहण्यातच सोय आहे. विश्वासघात झाल्याचं कळेपर्यंत तरी आपण आनंदी असतो. आणि झाल्यावरदेखील काळासोबत आपण पुन्हा पूर्वीसारखेच दूधखुळे बनू शकतो. फुकाचं वैचारिक मंथन काय कामाचं राव!

12/02/2010

कधी कधी वाटतं...

(टीप - सदर कविता स्वतःच्या जवाबदारीवर वाचावी. आधी ही कविता आहे का हेच नक्की नाहीय, तरीही.)

कधी कधी वाटतं...

आरशात पाहताना प्रतिबिंब दिसावं...आणि ते ओळखता यावं...

कधी कधी वाटतं...

आरशातल्या प्रतिबिंबाशी नजर मिळवावी...आणि कुणाचीच नजर झुकू नये...

कधी कधी वाटतं...

गुलाब कुस्करला जाताना...बोटही रक्तबंबाळ व्हावं...

कधी कधी वाटतं...

वाट फुटत राहावी ...निवडावी लागू नये...

कधी कधी वाटतं...

पावलं पडत राहावीत...अन् वाट कधी संपू नये...

कधी कधी वाटतं...

चुकीच्या वाटेवर चालतानासुद्धा...धीर मात्र खचू नये...

कधी कधी वाटतं...

मागे वळून पाहताना...नजर अनोळखी वाटावी...

कधी कधी वाटतं...

श्वासांचं गणित मांडताना...एखादा हातचा निसटून जावा...

कधी कधी वाटतं...

एकदातरी उडता यावं...अन् क्षितिजापुढचं पैलतीर दिसावं...

कधी कधी वाटतं...

एकदातरी...स्वतःला डोळेभरून पाहता यावं...