भाग -१ आणि
भाग -२ वरून पुढे
"रेखा, वर्तकसाहेबांकडे किती वाजता जायचं ठरलंय आपलं?" नरेंद्र शर्टाची बटणं लावत म्हणाला.
"दुपारी दीड वाजता!" ती गॅसचा नॉब बंद करत म्हणाली.
"ऑल द बेस्ट!" तो हसून म्हणाला आणि डोळ्यांवर गॉगल चढवून दरवाजाकडे गेला.
"तुलापण." ती हलकंच हसून म्हणाली.
तो दरवाजातून वळून हसला पण गॉगलमुळे त्याच्या डोळ्यांतले भाव दिसले नाहीत. त्याचे डोळे सगळंच सांगतात असं तिचं मत होतं.
-----
जशी पोलीसांची गाडी सायरन वाजवत धारावीच्या झोपडपट्टीत शिरली तशी एखाद्या मुंग्या लागलेल्या पदार्थावर फुंकर मारली की मुंग्याची जी हालचाल होते तशी माणसांची अस्ताव्यस्त हालचाल सुरू झाली. कातड्याच्या व्यवसायामुळे दरवळत असलेला उग्र दर्प सर्वत्र जाणवत होता.
"ह्या वासाच्या मास्कमागे अमली पदारर्थांचा साठा आणि वाहतूक करणं सोपं होतं." रमेश सहजच म्हणाला.
"इन्स्पेक्टर तुम्हाला माहित नसेल पण माझंही सुरूवातीचं पोस्टिंग मुंबईतच होतं." राजे म्हणाले.
रमेशनं चमकून पाहिलं, "पण मग.."
"मुंबईत टिकण्यासाठी भूक पाहिजे इन्स्पेक्टर आणि वरच्यांचं पोट भरलेलं ठेवता आलं पाहिजे." राजे विषादानं खिडकीतून बाहेर पाहत म्हणाले.
"किंवा नशीब." रमेशला राजेंच्या बोलण्यातली वेदना एकदम टोचली.
राजेंनी रमेशकडे पाहिलं आणि हलकंसं स्मित केलं.
शिंदे शिताफीनं बोळांमधून गाडी काढत होते. पण एका जागी मात्र गाडी अजून पुढे जाणं अशक्य होतं, तिथे रमेश, एसीपी राजे आणि शिंदे उतरले. रमेशनं शिंदेंना खूण केली आणि ते एका विवक्षित गल्लीत चटकन शिरले.
"त्याचं सो कॉल्ड गॅरेज ह्याच गल्लीत गेल्यावर आहे." रमेश शिंदे गेले त्या गल्लीकडे खूण करत राजेंना म्हणाला.
"मग आपण नाही जायचंय का तिथे?"
"गरज नाहीय, ते पहिलंच घर म्हणजे गॅरेज आहे, गाड्या गल्लीत शिरूच शकत नाहीत."
"ह्म्म." राजे चटकन तिकडे गेले, तोवर त्या घराचा समोरचा दरवाजा उघडला आणि आतून एक राकट दिसणारा पंचविशीचा काळाकभिन्न तरूण बाहेर आला. केस तेल लावून व्यवस्थित बसवलेले होते आणि कपडेही व्यवस्थित होते. राजेंनी त्याच्यावरून चटकन एक नजर फिरवली. चेहर्यावरचे उर्मट भाव आणि व्यवस्थित पेहराव ह्यांची सांगड बसत नव्हती.
"हा गगन महाडिक. बबनचा धाकटा भाऊ. दादाच्या गैरहजेरीत हाच धंदा चालवतो." रमेशनं माहिती दिली. एव्हढ्यात शिंदे घराच्या समोरच्या दरवाजातून बाहेर आले.
"बबनची बायको नाहीये घरात साहेब. कुठेतरी गेलेली दिसतेय."
"साहेब, बिना वॉरंटचे कसं काय तलाशी घेताय?" गगन थोडासा चिडून म्हणाला.
"तुझं कायद्याचं ज्ञान धंदा चालवायला वापरतोस तेव्हढं ठीक आहे. मी बिना वॉरंटचा तुला आत पण टाकू शकतो आणि तुझे सगळे अवयव बाहेरपण काढू शकतो." रमेश दरडावून म्हणाला. राजेंनी चमकून त्याच्याकडे पाहिलं.
"काय साहेब, गरीबांवर दादागिरी करा. तिथे मोठे खुनी जेल तोडून पळाले."
"त्यांच्याबरोबरच तुझा भाऊपण पळालाय हे तर माहितीच असेल तुला." राजे म्हणाले.
"मग मी काय करू शकतो त्यात? इथे तर तो आला नाही. आला तर तुम्हाला कळवेन मी."
"हा शहाणपणा तुझ्या गिर्हाईकांसाठी राखून ठेव." गगनच्या उद्धटपणामुळे राजेंचा पारा चढला होता.
"जा साहेब, मी कायपण केलेलं नाही आणि तुमची कायपण मदत करू शकत नाही. म्हात्रेसाहेबांना विचारा हवंतर." गगन छद्मी हसत म्हणाला.
रमेशनं राजेंच्या खांद्यावर हात ठेवला आणि काही न बोलता वळला. राजे अनिच्छेनंच वळले. शिंदेंनी गाडी सुरू केली.
"तुम्ही वॉरंट वगैरे घेऊन का नाही निघालात. आणि हे म्हात्रेसाहेब म्हणजे.." राजे थोडे वैतागले होते.
"होय. तेच म्हात्रेसाहेब, आमदार म्हात्रे. तुम्ही असाल तेव्हाचा झोपडपट्टी दादा. ह्याच्याविरूद्ध कसलंही वॉरंट मिळवणं म्हणजे इथल्या पोलीस स्टेशनच्या थ्रू जाणं आणि म्हात्रे असताना ते अशक्य आहे. हा अन ह्याचा भाऊ म्हात्रेचे महत्वाचे इलेक्शन डोनर्स आहेत." रमेश मोबाईलशी खेळत म्हणाला.
"पण म्हणजे काय? आपण पुढे काय करायचं? आपण बबनला ऍलर्ट तर नाही केलं?"
"अजिबात नाही. उलट आपण अतिशय सरधोपट रस्ता वापरलाय. बबनच्या घरी जाण्याचा." रमेश शांतपणे म्हणाला.
"म्हणजे?"
"बबनला एव्हढी कल्पना नक्कीच असणार की आपण त्याच्या घरी सर्वप्रथम जाऊ. म्हणूनच त्यानं बायकोला गायब करून संदिग्ध वातावरणनिर्मिती करून ठेवलीय. आपण बायकोला शोधत बसणार, भावावर पाळत ठेवणार आणि रस्ता चुकणार, हेच त्याला हवंय."
"म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की आता आपण हेच करून त्याला गाफील करायचं?" राजे विचारात पडून म्हणाले.
"यस. शिंदे तुम्ही त्याला मिळेल अशा जागी आपला मायक्रोफोन लावून आलात ना?" रमेशनं विचारलं. शिंदेंनी मान डोलावली. "त्यांना गाफील गाठणं हाच उपाय आहे." रमेश स्वतःशीच बोलल्यागत म्हणाला.
"पण जर हे दोघे भाऊ पार्टनर्स आहेत तर तुम्ही गेल्या वेळेस फक्त बबनलाच कसं पकडलंत?" राजेंनी विचारलं.
"गेल्यावेळी मी बबनवर पूर्ण माहिती गोळा केली होती. सगळ्या खबर्यांकडून बबनबद्दल सगळी माहिती येत होती पण बबनपर्यंत प्रत्यक्ष काहीच पोचत नव्हतं. फार चलाखीनं चोरीच्या गाड्यांमधून ड्रग्जचा धंदा चालवतात हे भाऊ. चोरीच्या गाड्यांची गॅरेजमध्ये दुरूस्ती आणि कायापालट करायचा, खोट्या नेमप्लेट्स लावायच्या आणि काळ्याबाजारात विक्री किंवा ड्रग्जच्या वाहतुकीसाठी वापर करायचा. मग मी तब्बल सहा महिने ह्या झोपडपट्टीत फिल्डिंग लावली आणि बबनच्या शेजारच्या गॅरेजवाल्याला चोरीच्या गाड्यांसाठी पकडलं. तोही चोरच पण बबनइतका पोचलेला नव्हे. त्याला पकडल्यावर आम्ही इथला वावर कमी करून टाकला आणि हे दोघे गाफील झाले. मग एक दिवस मोठ्या डीलची टीप घेऊन गगननं माणूस पाठवला. आणि त्याचा माग काढून आम्ही बबनला गाठला आणि बबनवर पाळत ठेवून डील होताना रंगेहाथों पकडलं. पण दुर्दैवानं त्यांच्या गाड्या चोरीच्या नव्हत्या, म्हणून फक्त बबनच गजाआड झाला आणि गगनपर्यंत आम्ही काहीच पोचवू शकलो नाही."
"पण मग आता कोऑर्डिनेशन कसं साधताहेत हे भाऊ?"
"मीपण तोच विचार करतोय." रमेश विचारात पडला आणि एकदम म्हणाला, "हे सगळं बबन जेलमध्ये असतानाच ठरलेलं असणार. जेलमधून पळण्याचा प्लॅन ठरल्यावरच. सर, तुम्हाला जेलमधल्या सगळ्या कम्युनिकेशनचा ऍक्सेस मिळेल ना? त्यावरून आपल्याला बराच काही अंदाज येऊ शकतो."
राजेंचा चेहरा आधी उजळला आणि मग पडला. रमेशच्या नजरेतून ते सुटलं नाही.
"काय झालं सर?"
"मला काही परमिशन्स रन कराव्या लागतील." राजे सारवासारव करत होते हे रमेशच्या लक्षात आलं.
"सर, एक गोष्ट विचारू?" रमेशनं राजेंचा अंदाज घेत विचारलं.
"विचारा."
"आपण फक्त बबन महाडिकचाच का विचार करतोय? एक केंद्रीय मंत्र्यांचा खुनी, एक कुख्यात चिटफंड घोटाळेबाज आणि एक नक्षलवादी असे तीन हायप्रोफाईल कैदी पळालेले असताना आपण फक्त बबन महाडिकचा का विचार करतोय?"
"कारण मला तेव्हढंच सांगितलं गेलंय. बाकी तिघांचा तपास वेगळं पथक करतंय." राजे म्हणाले.
"कोण?"
"ते कुणालाच माहित नाहीय."
"पण हे इंटररिलेटेड आहे, एकत्र तपास का केला जात नाहीय?"
"तो तुमचा आमचा प्रश्न नाही."
"पण मग जेलमधली कम्युनिकेशन्स?"
"मी परमिशन्स मिळवायचा प्रयत्न करतो, पण माझ्या मते त्याशिवायच आपल्याला पुढे जावं लागेल." राजे शून्यात बघत म्हणाले.
रमेश विचारात पडला. त्याला हे सगळंच विचित्र वाटत होतं.
-----
"बोला मालक." नरेंद्र गॉगल टेबलावर काढून ठेवत म्हणाला.
"हा फोटो आणि हे नाव."
हॉटेलचा मालक आणि नरेंद्र मालकाच्या प्रायव्हेट केबिनमध्ये बसून बोलत होते.
"प्रणव क्षीरसागर." नरेंद्रनं नाव वाचलं. "२५ लाख द्यायला तयार झाला आहात एव्हढं काय बिघडवलंय ह्यानं तुमचं?"
"ब्लॅकमेल करतोय मला तो."
"कशावरून?"
"तुम्हाला काय करायचंय?"
"हा माणूस खरंच मरण्यालायक आहे का? हे मला पटल्याखेरीज मी ही सुपारी घेणार नाही."
"काहीही काय? सुपारी किलर आहात का शहेनशहा आहात."
"तो तुमचा प्रश्न नाही. हे काम मी करावं असं वाटत असेल तर मला पूर्ण माहिती असणं भाग आहे. नाहीतर दुसरा माणूस शोधा."
"पण मग नंतर तुम्ही मला ब्लॅकमेल करू लागलात तर? तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा?"
"तुमच्याकडे पर्याय आहे?" नरेंद्र त्याच्या नजरेला नजर देत म्हणाला. गांजलेला मालक नवा सुपारी किलर शोधण्याच्या फंदात पडणार नाही ह्याची नरेंद्रला पूर्ण कल्पना होती.
"त्याचं असं झालं.." मालकानं सांगायला सुरूवात केली.
-----
बरोब्बर तीन वाजत आले होते. नरेंद्र त्या गेटसमोर जाऊन उभा राहिला. सिक्युरिटी कॅमेराजचं सर्किट चेकिंग आणि मेंटेनन्स चालू होता. इंदूरमधल्या सर्वांत मोठ्या वकीली फर्मचं ऑफिस होतं ते. 'वर्तक आणि शर्मा असोसिएट्स' बरेच छोटेमोठे वकिल आणि भरपूर क्लायंट्सची ये-जा सुरू होती. नरेंद्र त्यांच्यासारखाच काळा कोट घालून होता. वेगळेपण दर्शवणारा गॉगल काढून त्यानं खिशात टाकला आणि गेटमधून आत शिरून गर्दीत मिसळून तो मुख्यदरवाजातून आत शिरला. खिशातून एक ऍक्सेस कार्ड काढून ते पंच करून तो खाली मान घालूनच आत शिरला. सिक्युरिटी कॅमेराजचं काम सुरू असल्यानं सगळेच सिक्युरिटीवाले अस्ताव्यस्त फिरत होते. तो शांतपणे जिन्यानं चढून पहिल्या मजल्यावर गेला लंचटाईम सुरू असल्यानं तिथली टेबलं रिकामी होती. तो एका टेबलामागे लपला आणि त्या टेबलावरूनच दुसर्या टेबलावर फोन फिरवला. दोन-तीन रिंग्ज झाल्यावर समोरच्या काचेच्या दरवाजासमोरचा गार्ड फोन उचलायला आला आणि नरेंद्र कुणाच्याही नजरेस न पडता ऍक्सेस कार्ड पंच करून राखीव क्षेत्रात शिरला. तिथे फर्मच्या दोन मालकांची ऑफिसेस एकमेकाला लागून होती. लंच टाईम असल्यानं सेक्रेटरी जागेवर नव्हती. ह्यावेळेस फक्त शर्मासाहेबच केबिनमध्ये असतात. केबिनचा दरवाजा उघडून तो आत शिरला आणि त्यानं दरवाजा आतून बंद केला. शर्मासाहेबांनी वर पाहिलं आणि ते काही बोलण्याच्या आतच नरेंद्रनं कोटाच्या खिशातून बंदूक काढली आणि सलग चार गोळ्या झाडल्या. शर्मासाहेब जागच्याजागी गतप्राण झाले. गोळ्यांच्या आवाजानं गार्ड धावत आला आणि दरवाजा ठोकू लागला. दरवाजा तोडेस्तोवर नरेंद्रकडे तीन-चार मिनिटं होती. शर्मासाहेबांच्या आणि वर्तकसाहेबांच्या केबिनच्यामधोमध एक तिजोरी होती ज्यावर बोटांच्या ठशानंच उघडायची सोय होती. १०० पैकी ९९ वेळा माणसं तिजोरी उघडल्यावर स्कॅनरवरचा ठसा पुसत नाहीत. त्याप्रमाणे नरेंद्रनं खिशातून छोटं प्लास्टिक काढून तो ठसा घेतला आणि तो ठसा वापरून ती तिजोरी उघडली. त्यातली सगळी कागदपत्र घेऊन फोल्ड करून पँटमध्ये अडकवली आणि चटकन टेबलामागे गेला. खिडकीला ग्रिल्स होते, पण एअरकंडिशनरला नव्हते. लाथेनं त्यानं एअरकंडिशनर बाहेर ढकलला आणि त्या फटीतून तो बाहेर डोकावला. समोर कंपाऊंड वॉल होती ज्याच्या पलिकडे एक नाला होता. एसी पडल्याचा आवाज आल्याबरोबर कंपाऊंड वॉलवरून एक दोरी त्याच्यासमोर आली आणि त्यानं ती दोरी धरल्याबरोबर रेखानं कंपाऊंड वॉलवरून पलिकडे उडी मारली. त्याबरोबर नरेंद्रही ओढला गेला आणि गार्ड दरवाजा उघडून आत आला.
जेव्हा खून करून नामानिराळं राहायचं असतं तेव्हा सगळ्यांत उत्तम मार्ग म्हणजे दुसर्या कुणावर तरी खुनाचा आळ आणणं आणि तो जर रोज भांडणारा असंतुष्ट पार्टनर असेल तर अजूनच उत्तम. नरेंद्र आणि रेखानं गेला महिनाभर ह्या सगळ्याची तयारी केली होती. वर्तकसाहेबांचा वीक पॉईंट होता एस्कॉर्ट्स आणि अशाच एका सर्व्हिसच्या थ्रू रेखा त्यांना भेटली. गोड बोलून दोन तीन भेटींमध्ये ऑफिस आणि तिजोरीबद्दलची जुजबी माहिती मिळवली आणि सिक्युरिटी सिस्टमची माहिती पाळत ठेवून पूर्ण केली. ऑफिसात सुट्टीवर गेलेल्या माणसाचं ऍक्सेस कार्ड चोरलं आणि तीन भेटी होऊनही वाट पाहायला लावून शेवटी खुनाच्या दिवशी दुपारी वर्तकसाहेबांना हॉटेलात रूम बुक करायला सांगून बोलावलं.
खुनाचा आळ दुसर्यावर घालतानाही सरळ सरळ फ्रेम केल्यासारखं दिसेल असं करण्यात अर्थ नसतो. पुरावेही अगदी सटल असायला हवेत. त्याप्रमाणे खुनाच्या दोन दिवस आधी लेजर बीम मारून दोन सिक्युरिटी कॅमेरे नरेंद्रनं निकामी केले. सिक्युरिटी कॅमेरांमध्ये गडबड होतेय हे समजून वर्तकसाहेबांनी सिक्युरिटी कॅमेरांच्या मेंटेनन्सची ऑर्डर दिली. मग बरोब्बर ठरल्याप्रमाणे सगळं घडलं आणि पोलिसांनी वर्तकसाहेबांना अटक केली कारण तिजोरी शर्मासाहेबांच्या ठशानं उघडली ह्याचा अर्थ कुणीतरी विश्वासाचं केबिनमध्ये गेलं असावं असा पोलिसांचा अंदाज कारण नरेंद्रनं ग्लोव्हज घातल्यामुळे इतर कसलेही ठसे कुठेही नव्हते. आणि सिक्युरिटी कॅमेरे मेंटेनन्स करायची ऑर्डर वर्तकसाहेबांची आणि वर्तकसाहेबांनी हॉटेलमध्ये रूम बुक केली असली तरी खोट्या नावानं केली होती आणि ऐनवेळी रेखानं फोन करून त्यांना एस्कॉर्ट कंपनीच्या रेग्युलर मीटपॉईंटवर बोलावल्यामुळे त्यांच्याजवळ प्रवासात असल्यामुळे ऍलिबी नव्हती. मीटिंग पॉईंट ऑफिसजवळच होता आणि पोलिस चौकशीत रोझी नावाच्या ज्या एस्कॉर्टबद्दल वर्तकसाहेब बोलत होते, तशी कुणी एस्कॉर्ट रजिस्टर्डच नसल्याचं एस्कॉर्ट कंपनीनं सांगितलं.
क्रमशः
7/19/2011
7/11/2011
मृत्युदाता -२
भाग -१ वरून पुढे
"इन्स्पेक्टर रमेश कुठे बसतात?" एक उंचसा, मध्यम बांध्याचा सावळा इसम विचारत होता.
हवालदार शिंदे त्याला घेऊन रमेशच्या टेबलाकडे गेले.
"नमस्कार, मी एसीपी बिपिन राजे."
"ओह्ह.. सर!" रमेशनं सॅल्यूट केला. शिंदेंनीही गडबडून सॅल्यूट केला.
"रिलॅक्स." राजे हसत म्हणाले.
"शिंदे, हे एसीपी राजे. सीबीआयकडून आलेत. एका केससाठी त्यांना आपली मदत हवीय."
"पर्टिक्युलरली तुमची!" राजे नजर रोखून म्हणाले.
"एनीटाईम सर. बसा ना! शिंदे, चहा सांगा साहेबांसाठी." रमेश खुर्चीकडे बोट दाखवत म्हणाला.
शिंदे गेल्यावर राजेंनी हातातली फाईल रमेशसमोर ठेवली.
"मला कमिशनर साहेबांनी थोडं ब्रीफिंग दिलं होतं." असं म्हणत रमेशनं फाईल उघडली आणि पहिल्या पानावरच्या फोटोवर त्याची नजर स्थिरावली.
"ह्याला ट्रॅकडाऊन करण्यात मला तुमची मदत हवीय." राजे म्हणाले.
"सर" नजर वर करत रमेश म्हणाला, "टेल मी द होल स्टोरी."
राजेंनी एक नर्व्हस हास्य केलं. "गेल्या आठवड्यात येरवडा सेंट्रल जेलमधून मनुष्यबळ विकास मंत्र्यांचा खुनी पळाला ही बातमी तर जगभर झालीय आता. तर त्याच्यासोबत जे तीन अजून कैदी पळालेत त्यातला एक हा आहे."
"ते मीही ऐकलं, पण चौघांपैकी सुरूवात ह्याच्यापासून का? हा मला पडलेला प्रश्न आहे." रमेश शांतपणे म्हणाला.
"हे बघा इन्स्पेक्टर, ते जाणून घ्यायची तुम्हाला खरंच काही आवश्यकता नाही. ह्याला पकडण्यासाठी मला तुमची मदत हवीय, कारण तुम्हीच ह्यापूर्वी ह्याला पकडलेलं होतं." राजे थोडे वैतागल्यागत वाटले.
रमेश त्यांच्याकडे निरखून पाहत होता. "असो. थोडी पार्श्वभूमी कळली असती तर त्याच्या मूव्हमेंट्सची भाकितं करणं सोपं झालं असतं एव्हढंच. पण राहू दे. आपण काहीच माहित नाही असं समजून सुरूवात करू."
राजेंनी फक्त एक नर्व्हस हास्य केलं.
रमेशला हे प्रेशर ओळखीचं होतं, फक्त ग्रेड वेगळी होती एव्हढंच. शिंदे चहा घेऊन आले. ते चहा ठेवून जात असता रमेशनं त्यांना खूण केली आणि ते तिथेच बसले. राजेंच्या कपाळावर पडलेली सूक्ष्म आठी रमेशच्या नजरेतून सुटली नाही.
"हा तपास शिंदेशिवाय अपुराच राहिल सर." रमेश म्हणाला.
राजेंनी फक्त हसून मान डोलावली.
"बबन महाडिक ऊर्फ मेकॅनिकला शोधण्याची पहिली जागा म्हणजे त्याच्या धंद्याची जागा. सर्वप्रथम आपल्याला त्याच्या भागात, अर्थात धारावीला जायला हवं."
रमेशनं निघण्याची तयारी सुरू करताच राजे म्हणाले, "पण काही प्लॅन वगैरे?"
"रिलॅक्स सर, तो तिथे आपल्याला अजिबात सापडणार नाही." राजेंच्या चेहर्यावरचं प्रश्नचिह्न पाहून तो पुढे म्हणाला, "तो आत्ता नक्कीच शहरात नसेल, तुम्ही आठवडाभरानंतरची गोष्ट करताय, तो धोक्याच्या वेळेस महिनोन्महिने धंद्याकडे फिरकत नाही. पण काहीतरी धागा नक्कीच हाती लागेल. चार-दोन माणसं उलटीपालटी करावी लागतील."
"पण वर्दीतच चलणार तिथे?" राजेंनी विचारलं.
"काही ठिकाणी वर्दीची वट चालते तर काही ठिकाणी जिगरीची, पण काही ठिकाणी दोन्ही लागतं, ही त्यातलीच एक जागा." रमेश हसत म्हणाला आणि उठून उभा राहिला.
-----
तो रेस्टॉरंटच्या एका कोपर्यात कॉफी पित बसला होता. पण त्याचं लक्ष कॉफीकडे कमी आणि दरवाज्याजवळच्या टेबलावर बसलेल्या सुटाबुटातल्या माणसाकडे जास्त होतं. नुकताच गल्ला चेक करायला आलेला मालक एकटक त्याच्याकडे पाहत होता. तिशीचा, मध्यम बांध्याचा, डोळ्यांवर काळा गॉगल चढवलेला तो कुठेतरी पाहिल्यासारखा वाटत होता.
सुटातल्या माणसाची प्रत्येक हालचाल तो टिपत होता आणि त्याची प्रत्येक हालचाल मालक.
"नाव काय तुमचं?" मालक त्याच्या टेबलावर बसत म्हणाला.
"अं.." त्याची तंद्री एकदम भंग पावली.
"नाव नाव.." मालक तोंडभर स्मित करत म्हणाला.
"नरेंद्र." तो शांत नजरेनं मालकाच्या डोळ्यांत डोळे घालत म्हणाला.
"तो चष्मा काढता का जरा. तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय." मालक हसत म्हणाला.
"माझे डोळे आलेत."
"आय कॅन टेक अ रिस्क."
तो लगेच उठून उभा राहिला, "तुमच्याकडे गिर्हाईकांना प्रायव्हसी द्यायची पद्धत नाही का?" तो जोरातच बोलला जेणेकरून आजूबाजूच्यांचं लक्ष वेधलं जाईल.
मालक त्याला हाताला धरून बसवत म्हणाला, "सॉरी सॉरी. एक काम होतं तुमच्याकडं."
"पण मला तुमच्याशी कसलंही काम नाही. हे घ्या तुमच्या कॉफीचे पैसे." तो टेबलावर पन्नासची नोट फेकत उठला.
"साहेब, कॉफीचे पासष्ट होतात." मालक बोलला.
"हं हं ठीक आहे." त्यानं वीसची एक नोट काढून टेबलावर फेकली. "बाकीचे टीप म्हणून ठेवा."
"हाहा.. ओके ओके.. बाय द वे, त्या साहेबांना सांगू का की तुम्हाला भेटायचंय म्हणून त्यांना. तोवर बसा इथे." मालक त्या सुटातल्याकडे निर्देश करून म्हणाला.
नरेंद्रनं गॉगलमागूनच एक तिखट कटाक्ष टाकला आणि मुकाट्यानं खाली बसला.
"तुम्ही केव्हापासून त्यांच्यावर नजर ठेवून आहात ते मी पाहतोय." मालक डोळे मिचकावत म्हणाला.
त्यानं मनातल्या मनात कपाळावर हात मारला.
"तुम्ही पीआय आहात?"
"पीआय?"
"प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर."
"ओह्ह.. नाही नाही.. मी.." हीच वेळ होती ही ब्याद घालवायची. "मी कॉन्ट्रॅक्ट किलर आहे." तो शांतपणे म्हणाला आणि मालकाच्या चेहर्यावरचे भाव निरखू लागला.
मालक दोन क्षण विचारात पडला आणि म्हणाला, "परफेक्ट. मला वाटलंच होतं. तुमच्या कॉफी पिण्याच्या स्टाईलवरून आणि गॉगलवरून आणि.. मोज्यामधल्या छोट्या गनवरून."
त्यानं एकदम पँट सारखी केली. फासे उलटे पडले होते.
"माझं तुमच्याकडे तसलंच एक काम आहे." मालक डोळा मारत म्हणाला.
तेव्हढ्यात तो सुटातला माणूस उठून जाऊ लागला.
"माफ करा मला जावं लागेल." तो उठू लागला.
"ते साहेब आमचे रेग्युलर कस्टमर आहेत. त्यांचा मोबाईल नंबरही ठेवतो आम्ही." मालक.
त्यानं एक हात कपाळावर ठेऊन मान खाली केली आणि मोबाईलवरून काही मेसेज पाठवला. दरवाज्याजवळच्या दुसर्या टेबलावर बसलेली ती उठली आणि सुटातल्यापाठोपाठ बाहेर पडली.
"बोला. काय हवंय तुम्हाला." त्रासलेल्या स्वरात तो बोलला.
"ह्याचा मृतदेह." मालक मोबाईलवर एक फोटो दाखवत म्हणाला.
".." त्याला काय बोलावं तेच सुचेना.
"मग काय? करणार की.."
"हा घ्या फोन. लावताय की मी लावून देऊ? बंदूक मात्र बिना ओळखीची कुठेही चालते एव्हढं लक्षात असू द्या."
"सॉरी सॉरी. पण माझं हे काम खरंच अर्जंट आहे हो."
"हे काय टॅक्स रिटर्न किंवा म्युच्युअल फंड गुंतवणूक वाटली तुम्हाला?" तो पुरता वैतागला होता.
"मी कामासाठी माणूस कसा शोधायचा तेच बघत होतो गेले काही दिवस. तुम्ही अनायासेच हाती लागलात. मग करणार ना माझं काम. मी २५ लाख द्यायला तयार आहे."
त्याचे डोळेच विस्फारले गेले. क्षणभर काय बोलावं तेच त्याला सुचेना. मग सावरला आणि म्हणाला, "मी असं अनोळखी माणसांकडून कामं घेत नाही. तुमचा नंबर देऊन ठेवा मी उद्यापर्यंत तुम्हाला फोन करीन. हो की नाही ते तेव्हा पाहू."
मालकानं त्याच्याकडे कार्ड सरकवलं. ते घेऊन तो लगेच उठला आणि बाहेर पडला.
"आज फारच फालतूपणा झाला. नवशिक्यासारखा वागलास तू." ती चरफडत होती.
"इट हॅपन्स. ती जागाच तशी होती. सगळीच गिर्हाईकं मला उच्च्भ्रू गुन्हेगार वाटत होती. अन त्यातून, आपली पैशाची अडचण दूर व्हायचा मार्ग सापडलाय मला."
"डोन्ट टेल मी. तू कॉन्ट्रॅक्ट किलींग करणार आहेस?" तिचे डोळे विस्फारले होते.
"मी गंभीरपणे विचार करतोय. जर ज्याला मारायचंय तो मरण्याच्याच लायक असेल आणि हे काम करण्याचे आपल्याला पैसे मिळणार असतील तर काय हरकत आहे?"
"तुला वेड लागलंय? कुणी मरण्याच्या लायक आहे की नाही हे ठरवणारा तू कोण?"
"माझ्या निवडीवर आणि निर्णयक्षमतेवर कधीच कुणी विश्वास दाखवला नाही अन मी आयुष्यातून उठलो. आता जर माझ्या निवडीवर माणसांची आयुष्य संपणार असतील तर तो काव्यात्म न्याय ठरेल. बीसाईड्स, मी नाही मारलं तर कुणी दुसरा मारेलच की."
"ही सैतानी मनोवृत्ती आहे. मी ह्यात तुझ्यासोबत नाही."
"ठीक मग आपल्या पुढच्या सगळ्या कार्यक्रमासाठी पैसे कुठून आणायचे ते सांग."
तिच्याकडे बोलण्यासारखं काहीच नव्हतं. तो तिच्याशेजारी जाऊन बसला.
"विश्वास ठेव माझ्यावर. मी काही चुकीचं करणार नाहीये." ती अजून तशीच बसली होती. "माझ्यावर आजवर कुणीच विश्वास ठेवला नाही. तू पहिलीच. एकदा विश्वास ठेवलास आणि आपण इथवर आलोय. अजून एकदा फक्त."
तिनं त्याच्याकडे पाहून स्मितहास्य केलं.
तो पण हसला आणि उठून उभा राहिला. "वर्तकसाहेबांचं रूटीन पूर्ण रेकॉर्ड झालं की नाही?"
तिनं मानेनंच होकार दिला.
"सूट बाकी मस्त होता त्यांचा. कुठून शिवतात काही कल्पना आली का?" तो डोळे मिचकावत म्हणाला.

7/05/2011
मृत्युदाता -१
"मला माफ कर आई. खरंच असं काही व्हावं अशी इच्छा नव्हती आई.. तू अन बाबांनी जी स्वप्न पाहिली होतीत ती पूर्ण करावीशी नेहमीच वाटत होती पण.. नाही जमलं आई!" त्याचा बांध फुटेल अशी आता त्याला भीती वाटू लागली.
"असं का बोलतोस? अजूनही सगळं ठीक होईल रे.. तू परत ये रे आता... तुला पाहायचंय एकदा.." आजूबाजूच्या एव्हढ्या गदारोळातही आईचा सद्गदित स्वर फोनवरूनही त्याला स्पष्ट जाणवला.
"आता फार उशीर झालाय आई... मला जावं लागेल.एक लक्षात ठेव नेहमी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आई."
"ते सांगायची गरज आहे का?" आई आता रडतच होती.
"बाबांना दे पटकन."
"अरे पण चाललायच कुठे?"
"बाबांना दे.." त्याचा आवाज थोडासा रूक्ष झाला.
"विकू.."
"बाबा.. मला माफ करा.. मी तुमच्यासाठी काही करू शकलो नाही. पण.. पण माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे बाबा."
"अरे काय बोलतोयस तू? असं का बोलतोयस? निर्वाणीचं असल्यागत." आणि एकदम त्यांच्या उरात धडकीच भरली.
"टाटा बाबा!" त्यानं चटकन फोन कट केला.
बाबांनी कॉलर-आयडी चेक केला पण तिथे ब्लॉक्ड नंबर म्हणून दाखवत होतं.
डोळ्यांवरचा गॉगल उतरवून त्यानं डोळे पुसले. आजूबाजूला एक नजर फिरवली. भर उन्हाळ्यातल्या रणरणत्या दुपारीसुद्धा लोकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. मराठवाड्यात राजकारण पिकतं म्हणतात ते खरं असल्याचं त्याला जाणवलं. त्यानं गॉगल परत चढवला आणि एका कोपर्यात बिसलेरीच्या पाण्याचे मोठे कंटेनर्स ठेवलेले होते, तिथे तो गेला. उन्हाळ्यामुळे तिथे बरीच लगबग होती. मोबाईलवर काहीतरी चाळे करताकरता बुटाच्या मागच्या भागानं एका विवक्षित ठिकाणी त्यानं उकरायला सुरूवात केली. तीन-चार इंच खणल्याबरोबर त्याच्या पायाला काहीतरी जाणवलं. तो थांबला. मोबाईलवर त्यानं एक नंबर टाईप केला आणि दोन मिनिटं तो नंबरकडे फक्त बघत राहिला. डोळ्यांच्या कडा पुन्हा पाणावत होत्या. त्यानं वर पाहिलं.
माननीय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री उत्तमराव बेळे-पाटील भाषणाला सुरूवात करत होते. आणि त्यांच्यासमोरचा अथांग जनसमुदाय आता बराचसा शांत आणि सुनियोजित झाला होता. भाषण सुरू झाल्यामुळे पाण्याच्या कंटेनर्सची आवक-जावक थंड पडली होती. काळ्या सफारी सुटातले सुरक्षारक्षक वॉकीटॉकी घेऊन मैदानाच्या चौफेर नजर फिरवत फिरत होते आणि फक्त प्रशिक्षित नजरेला दिसतील असे बिन-सफारीसुटातले साध्या वेशातले खाजगी सुरक्षारक्षक माणसांच्या गटांमध्ये मिसळून नजर ठेवून होते. मैदानांच्या प्रवेशद्वारांशी कसून तपासणी करणारे पोलीस आणि मेटल डिटेक्टर्स होते. सफारी सुटांच्या कमरेची पिस्तुलं शर्टावर आलेल्या फुगवट्यामुळे कमीअधिक प्रमाणात दिसत होती मात्र बिन-सफारीसुटवाल्यांचे शोल्डर होल्स्टर त्यांच्या ढगळ शर्टांमुळे दिसत नसले तरी प्रशिक्षित नजरेला त्यांच्यातल्या एकदोघांच्या खांद्यावर शर्टाखाली दिसणार्या काळ्या पट्ट्यावरून लक्षात येत होते. व्यासपीठावर मंत्रीमहोदयांसोबत गावच्या सरपंचापासून ते राज्याच्या पालकमंत्र्यापर्यंत सगळे छोटेमोठे पक्षपदाधिकारी बसलेले होते. आणि मंत्रीमहोदयांच्या पोडियमच्यामागे दोन महागातले सफारी सूट कमरेच्या पिस्तुलावर हात ठेवूनच उभे होते. आणि ह्या सर्वांखेरीज प्रचंड जनसमुदायाला रोखून धरणारे पोलीस हवालदार, व्यासपीठाच्या दोन्ही बाजूस उभे असणारे दोन सब-इन्स्पेक्टर्स आणि व्यासपीठामागे गाडीत बसलेला एसपी आणि एक इन्स्पेक्टर. छोटं गाव असल्यामुळे व्यवस्थित सिक्युरिटी कॅमेरे लावण्याची तसदी घेण्यात आलेली नव्हती पण रेकॉर्डसाठी म्हणून कॅमेरांचा देखावा केलेला होता. त्याचं लाईव्ह फूटेज एसपीच्या गाडीत होतं, पण ह्या कॅमेरांच्या रेंजमध्ये अनेक रिकाम्या जागा (ब्लाईंड स्पॉट्स) होत्या. आणि त्यातल्याच एका जागी आत्ता तो उभा होता.
त्यानं पुन्हा मोबाईलकडं पाहिलं आणि एकदाच 'कॉल' बटण दाबलं आणि फोन कानाला लावला. रिंग बराच वेळ वाजत होती. त्याचा जीव खालीवर होत होता. शेवटी फोन उचलला गेला आणि पलिकडून तो आवाज आला.
"हॅलो"
".." त्याच्या तोंडून शब्दच फुटेना. ते सगळे दिवस त्याच्या नजरेसमोरून सर्रकन गेले.
"हॅलो"
".." तो अजूनही निःशब्दच होता. तिचा आवाज तो कित्येक दिवसांनी ऐकत होता. ते सगळं जणू कालपरवाच घडल्यासारखं त्याला वाटलं.
"कोण बोलतंय?" तिनं निर्वाणीचं विचारलं.
"वसू.." त्याच्या तोंडून शब्द फुटले.
".." आता निःशब्द व्हायची पाळी तिची होती.
"मी बोलतोय."
"हं." काही सुचलं नाही की तिचा ट्रेडमार्क हुंकार.
"कशी आहेस?"
".."
"मला ठाऊक आहे हे.. तुला फोन करणं, चूक आहे.. पण.. एकदाच.. शेवटचं."
"हं... शेवटचं" ती हलकंसं विषादपूर्ण हसली.
"हाहा.." त्यालाही तेच आठवलं. "पण ह्यावेळेस खरंच शेवटचं.. म्हणजे एकदम शेवटचं शेवटचं."
"नेहमीप्रमाणे आपण कारणाशिवाय लांबड लावतोय."
"अरे हो." तिचा बोलणं तोडण्याचा प्रयत्न त्याला जाणवला. "तुला काही सांगायला फोन केला." आणि एकदम आपण काय बोलणार आहोत हे आठवून त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. तिच्याशी बोलताना त्याला कसलंच भान राहिलं नव्हतं.
"काय?"
त्यानं घसा खाकरला. "वसू.. मला माफ कर गं!"
"कशासाठी?"
"सगळ्याचसाठी. जे जे काही झालं, त्या सगळ्यासाठी. माझ्यामुळे जी लोकं दुखावली गेली त्यासाठी आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे, तू दुखावली गेलीस त्याच्यासाठी!"
"अरे पण.."
"बोलू दे मला. मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही असं फार वाटतं कधी कधी. पण खरं तर कुणाचसाठी काहीच करू शकलो नाही मी. अगदी स्वतःसाठीही. आज फक्त तुझ्याकडे माफी मागायला मी फोन केला आणि तुझा आवाज शेवटचाच कानात साठवायला."
"विवेक.." तिनं काही बोलण्याआधी फोन कट झाला होता.
त्यानं सिमकार्ड बाहेर काढलं. खिशातून लायटर काढला आणि सिमकार्ड पेटवलं. ते जवळपास पूर्ण जळल्यावर त्यानं जमिनिवर फेकलं आणि त्याचा चुराडा केला. मोबाईलची बॅटरी त्यानं आपल्या सफारीच्या खिशात टाकली आणि खिशातून दुसरं एक सिमकार्ड काढून मोबाईलमध्ये भरलं. जमिनीतल्या खड्ड्यातून पिशवी काढून त्यानं त्यातलं सामान खिशात टाकलं आणि सिमकार्डचा चुराडा आणि ती पिशवी असं दोन्ही त्या खड्ड्यात टाकून वरची माती पुन्हा सारखी केली. घड्याळ्याच्या पट्ट्यावरच्या पिनेनं मोबाईलची बॉडी उघडली आणि आतमध्ये आधीच तयार करून ठेवलेल्या दोन वायर्स शॉर्ट केल्या. मोबाईल परत सारखा केला आणि मैदानाच्या दुसर्या बाजूकडे चालू लागला. भाषण अर्ध्यावर आलं होतं. मैदानाच्या दुसर्या बाजूस खाजगी सुरक्षारक्षकांची कंट्रोल रूम होती. तिथे दोन साध्या वेषातले हवालदारही तैनात होते.
जिथे प्रचंड मोठी अन गुंतागुंतीची सुरक्षा व्यवस्था असते तिथे फक्त योग्य पेहराव आणि देहबोली असेल तर सहज काम बनतं. तस्मातच तो सफारी सूट आणि गॉगल घालून कंट्रोलरूमकडे गेला आणि हवालदारांकडे ढुंकूनही न बघता सरळ आत गेला. सरकारी सुरक्षेला कमी लेखणं ही खाजगी सुरक्षारक्षकाची पहिली खूण. त्यामुळे हवालदारांनी साहजिकच त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा हवापाण्याच्या गप्पांमध्ये मग्न झाले. तो आत शिरून थेट मुख्य बोर्डकडे गेला आणि आपला मोबाईल तिथल्या टेबलावर सहजच ठेवत म्हणाला,
"सगळ्या वॉकीटॉकीचे सिग्नल्स नीट येताहेत ना हे पाहायला साहेबांच्या पीएंनी सांगितलंय."
"हो चेक करतो." मुख्य कंट्रोलर संशयानंच त्याची ओळख करायचा प्रयत्न करू लागला.
"तुम्ही..?"
"बरं झालं की फक्त साहेबांना मेसेज पाठवा." त्याचा प्रश्न पूर्ण व्हायच्या आतच त्याच्या पाठीवर थाप मारून आपला मोबाईल तिथेच ठेवून तो बाहेर पडला.
कंट्रोलरला त्याचा राहिलेला मोबाईल दिसला, त्यानं तो उचलला आणि काही माहिती मिळतेय का म्हणून चालू करायचा प्रयत्न केला, पण तो चालू होत नव्हता. त्यानं तो तिथेच कोपर्यात सरकवून ठेवला.
"कोण होता काय माहित? कुठले साहेब ते पण बोलला नाही." कानाला ब्ल्यूटूथ कम रेडिओ रिसिव्हर कम ट्रान्समिटर लावत कंट्रोलरची वाक्य ऐकत तो कंट्रोलरूमच्या तंबूबाहेर पडला आणि हवालदारांकडे पुन्हा दुर्लक्ष करत तो पुढे चालू लागला. त्यानं खिशातून एक सिगरेट काढली अन ती काढताना त्याच्या खिशातून काहीतरी पडलं. तो आत्ता ब्लाईंड स्पॉटमध्ये नव्हता. तो जिथे उभा होता तिथे आजूबाजूला ३०-४० माणसं होती अन तो मैदानाचा व्यासपीठापासून दूरचा कोपरा होता. त्यानं सिगरेट शिलगावली आणि एक झुरका मारून खाली फेकली. पायानं न विझवता, पायानं थोडीशी सारखी केली आणि तो माणसांमधून मैदानाच्या दुसर्या कोपर्याकडे वाट काढत चालू लागला. ब्ल्यूटूथवर त्याला कंट्रोलरूममधले संवाद ऐकू येत होते. त्यानं घड्याळाकडे नजर टाकली. दुपारचा एक वाजत आला होता. लोकांच्या पोटात कावळे कोकलण्याची सुरूवात झाली होती. हवालदार, सफारीसूट आणि बिन-सफारीसूट सगळेच वैतागले होते. मंत्रीमहोदयही भाषण आटोपतं घेण्याच्या मूडमध्ये होते. तो मैदानाच्या मध्याला पोचला आणि तिथून तिरक्या रेषेत कमीतकमी सुरक्षारक्षक मधे लागतील अशा बेतानं आत्मविश्वासानं व्यासपीठाच्या उजव्या बाजूकडे चालू लागला. त्याच बाजूला मंत्रीमहोदय भाषण देत होते. सिगरेट जसजशी जळत होती, ती वातीच्या जवळ जात होती आणि तो व्यासपीठाच्या जवळ. तो माणसांच्या तिसर्या रांगेजवळ पोचला. आता त्याच्यापुढे दोन रांगा, मग दोन हवालदार, त्यापुढे बॅरिकेड मग पाच फूट मोकळी जागा आणि मग एक सब-इन्स्पेक्टर आणि त्याच्याजवळ जिना. त्यानं परत एकदा घड्याळाकडे पाहिलं. मंत्रीमहोदयांचं भाषण संपत आलं होतं.
'सिगरेट आधीच विझली तर नसेल? कुणी विझवली तर नसेल? कुणाच्या लक्षात तर आलं नसेल?' त्याच्या डोक्यात प्रश्नांचं जंजाळ उभं राहिलं. तो 'प्लॅन बी' काय असेल ह्याचा विचार करू लागला. एव्हढ्यात ते झालं. मैदानाच्या दुसर्या कोपर्यात एकदम गलका झाला. माणसांमध्ये गोंधळ उडाला. लवंगी फटाक्यांच्या छोट्याशा माळेनं आपलं काम केलं होतं. ब्ल्यूटूथवरून त्याला कंट्रोलरूममधला गोंधळ ऐकू येत होता. अर्धे सफारीसूट घटनास्थळी धावले होते आणि ब्लाईंड स्पॉट नसल्यानं पोलिसांनाही एसपीच्या जीपमधून ऑर्डर्स सुटल्या होत्या. समोरचा सब-इन्स्पेक्टर वॉकीटॉकीला लागला होता. आणि दोन्ही हवालदार कोपर्यातल्या गर्दीच्या दिशेनं पाहत होते. त्यानं ब्ल्यूटूथ कम रेडिओ रिसिव्हर कम ट्रान्समिटरचं बटण दाबल्याबरोबर तिकडे कंट्रोलरूममध्ये मोबाईल ब्लास्ट झाला. मंत्रीमहोदयांनी भाषण थांबवलं आणि त्यांना त्यांच्यामागचे सफारीसूट दोन्हीबाजूंनी कव्हर करून जिना उतरू लागले एव्हढ्यात तो पुढे झेपावला. हवालदारांची नजर चुकवून बॅरिकेड ओलांडून तो सब-इन्स्पेक्टरच्या बाजूनं पुढे सरकला. कुणाला काही कळायच्या आत तो जिन्यावरून उतरलेल्या मंत्री अन त्यांच्या दोन सुरक्षारक्षकांसमोर उभा होता. त्यानं खिशातून ९मिमिची बंदूक काढली आणि पापणी लवायच्या आत दोन्ही सफारीसुटांच्या हातांवर एक एक गोळी घातली. लाथेनं त्या दोघांना बाजूला सारून त्यानं मंत्रीमहोदयांच्या छातीत तीन गोळ्या घातल्या. मंत्र्यांचं धूड जिन्यावर कोसळलं. त्यानं पटकन पुढे होऊन त्यांच्या मानेवर हात ठेवून ते मेल्याची खात्री केली आणि लगेच ती बंदूक स्वतःच्या डोक्याला लावून ट्रिगर ओढला.
गोळी झाडली गेली, पण हवेत आणि सब-इन्स्पेक्टरच्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे तो मंत्रीमहोदयांच्या मृतदेहावर कोसळला. सब-इन्स्पेक्टरनं त्याचे दोन्ही हात मागे दाबून धरले आणि उरल्यासुरल्या सगळ्या सुरक्षारक्षकांचा त्याला घेराव पडला. बीडमधल्या प्रचारसभेत सत्ताधारी पक्षाचा ताकदवान मंत्री प्राणघातक हल्ल्यात मृत्युमुखी पडला होता. पण विवेकचं काम अर्धवटच झालं होतं.

Subscribe to:
Posts (Atom)