भाग -१ वरून पुढे
त्यारात्री मी घरी पोचले तर माझा चेहरा बघून आई घाबरली पण काही बोलली नाही. मी काही न बोलता माझ्या खोलीत गेले आणि ढसाढसा रडत राहिले कितीतरी वेळ. काय झालं होतं ते मला कळलं नव्हतं. मला पटलं नव्हतं आणि मला अविनाशकडून अशी अपेक्षा नव्हती. की मला स्वतःचीच लाज वाटत होती, त्याच्यासाठी तसे कपडे घातले, म्हणून त्यानं तसं केलं का? पण मी स्वतःला का दोष द्यावा अशा विचारांमध्येच कधीतरी दमून झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नीट आवरलं. आईला काहीतरी पटेल न पटेलशी मैत्रिणीच्या नावाने थाप मारली आणि ऑफिससाठी बाहेर पडले.
ऑफिसमध्ये अविनाशशी कसं डील करायचं ह्याचा विचार करत. चौकात आले आणि कालचा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. तो पिझ्झा वाला देवदूतासारखा कसा आला. आणि एकदम मला स्ट्राईक झालं. तो बहुतेक तोच होता. आमचा ऑफिसबॉय, माझा पाठलाग करणारा. काय त्याच्या डोक्यात होतं? डोक्याचा विचार करकरून भुगा झाला होता. मुलीचं आयुष्य म्हणजे किती त्रास हाच विचार डोक्यात घोळवत मी ट्रेन पकडली.
त्यादिवशी एकटीच चहा प्यायला गेले, सगळे ऑफिसला यायच्या आतच. तेव्हा तो ऑफिसबॉय एका कोपऱ्यात एकटाच नाश्ता करत बसला होता. त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. मी मनाशी विचार केला आणि चटकन जाऊन त्याच्यासमोर बसले.
तो एकदम दचकला.
“मॅडम. सॉरी. मी नाही तुमच्या मागे येत आता. माझी कंप्लेंट नका करू प्लीज…” तो काहीतरी जुळवाजुळव करू लागला शब्दांची.
“त्याबद्दल नाही बोलायचं मला. काल तुम्ही काय करत होतात?” माझ्या प्रश्नानं तो थोडा गांगरला.
“नाही म्हणजे… पत्ता मिळत नव्हता. रस्त्यावर कुणीच दुसरं नव्हतं आणि ते अर्धा तास झाला की फुकट द्यायला लागतो, मग दुकानवाले आमचाच पगार कापतात.”
“पण आम्ही काय करत होतो ते दिसलं असेल ना तुम्हाला. मुद्दाम माझ्यावर नजर ठेवून होतात काय?”
त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. “मॅडम देवाशप्पथ सांगतो तसं काही नाही. तुम्ही त्या साहेबांना ढकलत होतात असं वाटलं मला म्हणून मी मधे पडलो. खरंच. सॉरी मॅडम. नाही ह्यापुढे मधे पडणार. तेव्हापण मी तुमचा पाठलाग करत नव्हतो मी फक्त तुम्हाला त्या अंधाऱ्या रस्त्यावर कंपनी वाटावी म्हणून तसा चालायचो, तुम्ही मला ओळखत नाही म्हणून लांबून चालायचो, तुमचा गैरसमज होईल हा विचारच केला नव्हता. परत सॉरी मॅडम, खरंच मनात काही नाही तसं.”
तो गयावया करत होता, पण कुठेतरी तो बोलत होता ते मला पटत होतं. त्यानं खरंच काही केलं नव्हतं तसं बघायला गेलं तर. मी घराकडे जायला वळले की तो एक क्षणभरही चौकात थांबून माझ्या दिशेनं बघत नसे, त्याच्या रस्त्यानं निघून जायचा. विचार केला तसा, त्याच्या दृष्टीनं तर त्याच्या बोलण्यातही तथ्य होतं. कालही तो मधे पडला नसता तर पुढे काय झालं असतं काय ठाऊक? तसं काही झालंही नसतं, मुख्य रस्ता होता. पण तरी मला जे काही झालं ते पटलं होतं का? आवडलं होतं का?
“ओके. काही प्रॉब्लेम नाही. मी तुमची काही कम्प्लेंट केलेली नाही. करणारही नाही.”
“थॅंकयू मॅडम” त्याचा चेहरा खूपच शांत झाला.
मलाही बरंच शांत वाटलं. मनावर फारच मळभ आलं होतं. सगळेच पुरूष कदाचित नसावेतही वाईट. आपल्याबरोबर सगळंच उलटं नसेलही होत. त्या घटनेचा धक्का अजून मनावरून पुसला गेलाही नसेल कदाचित.
पण आता अविनाशचं काय करायचं? मी तर माझ्या मर्जीनेच गेले होते त्याच्यासोबत. पुन्हा तो मॅनेजरचा मित्र आहे खास. तो म्हणेल मीच केलं काहीतरी. माझ्यावर कोण विश्वास ठेवेल. एच आर वाले म्हणतात, पण मी पडले नवी, कुणी थोडं जरी लीक केलं तरी बदनामी माझीच होईल. त्यापेक्षा काही न बोललेलं बरं. असाही तो माझ्या टीममध्ये नाही, सगळी इंटरऍक्शन बंद. होईल थोडं ऑकवर्ड, पण हळूहळू बाहेर पडू आपण. थोड्या महिन्यांनी नोकरीच बदलू.
----
तिचा माझ्याबद्दलचा ग्रह हळूहळू बदलायला लागला. मी बराच शांत झालो होतो. अभ्यासही व्यवस्थित चालू होता. दोन नोकऱ्यांमुळे कमाईही मस्त सुरू होती. तिचं ऑफिसच्या ग्रुपशी फारसं पटत नव्हतं असा माझा अंदाज. पूर्वी तो ही तिच्या ग्रुपमध्ये अधे मधे असायचा. तो अजूनही त्या ग्रुपमध्येच
होता. तिचाच वेगळा छोटा ग्रुप झाला होता. ते ही कधीकधी असायचे सकाळचे.
त्यामुळे असेल कदाचित, ती माझ्यासोबत चहाला येऊन बसायची.दोन शब्द बोलायची. माझं काय सुरू आहे विचारायची. मी डिस्टन्स बीकॉम करतोय ऐकून माझ्याबद्दल चांगलंही बोलली. अजून काय हवं होतं मला. बस. तिच्या मनात इज्जत निर्माण होत होती आपली. कदाचित तिची त्यादिवशीची नजर मी विसरू शकेन कधीतरी.
एक दिवस मी रात्री नेहमीसारखा स्कूटरवरून कुठेतरी डिलीव्हरीला गेलो होतो. परत येताना स्टेशनजवळून येत होतो, तेव्हा ती दिसली. झपझप पावलं टाकत चालली होती. माझी इच्छा झाली होती तिला सोडू का विचारायची. पण ते किती चुकीचं दिसेल हे नशीबानं माझ्या मठ्ठ डोक्यात लगेच आलं. मी अगदी तिच्यासमोरून जावं लागू नये म्हणून एका पानटपरीपाशी थांबलो. दोन हॉल्स घेतल्या आणि परत स्कूटर स्टार्ट केली. ती मेन रोडच्या तुरळक गर्दीत दिसेनाशी झाली होती. मी स्पीडमध्ये पुढे निघालो आणि अचानकच माझ्या नावानं तिनं हाक मारली असं मला वाटलं. माझा आधी विश्वास बसला नाही, भास असावा असं वाटलं, पण थांबलो आणि मागे पाहिलं. तर ती भरभर चालत माझ्या दिशेनं येत होती. मला काही कळायच्या आत ती माझ्या मागे बसली.
"बरे दिसलात. मला घरी सोडता का?"
मला काय सुरू आहे हे कळत नव्हतं आणि तेव्हढ्यात तो त्यादिवशीचा पोरगा मला दिसला. बहुतेक तो तिची समजूत काढायला मागे आला असावा. मी क्षणभर भांबावलो असेन.
"चला ना लवकर." ती थोडीशी चिडून म्हणाली.
मी आज्ञाधारकपणे ऍक्सलरेटर मारला आणि निघालो. जसा चौकात पोचून मी उजवीकडे वळवणार, तिनं मला थांबवलं. ती चौकातच उतरली आणि मला थॅंक्यू म्हणून गेली. मी जे काय घडलं ते सगळं डोक्यात परत प्ले करत दुकानाच्या दिशेनं निघालो.
----
आमचं काहीतरी बिनसलंय हे माझ्या मॅनेजरच्या लक्षात आलं होतं. पण त्याने कुणाची बाजू घेतल्याचं दाखवलं नाही. मात्र
त्यानंतरही अविनाश आमच्यात चहा प्यायला आला की मी त्यांच्यात जात नसे. हे सगळ्यांच्याच लक्षात आलं होतं मात्र एक दोन मैत्रिणी सोडल्या तर कुणी काही विचारलं नाही. एकीनं मला हॅरॅसमेंटची कम्प्लेंट कर सरळ असंही सांगितलं. पण उगाच त्याचं करियर बरबाद करण्यात काही पॉईंट नाही हे मला माझा राग ओसरल्यावर लक्षात आलं होतं. मला आता टीम बदलावी लागेल असं वाटत होतं.
हळूहळू मी सकाळच्या चहाला वेगळी माझ्या दोन जॉईनिंगवेळी झालेल्या मैत्रिणींबरोबर जाऊ लागले. मग कधी त्यांना वेळ नसेल तर एकटीच जायचे. टीममधले बरेच जण जणू माझीच चूक आहे असे वागत होते. एक दिवस तर मी सरळ त्या ऑफिसबॉयच्या टेबलवर जाऊन बसले चहाला. तो बिचारा कित्येक दिवस एकटाच बसायचा. त्यानं मला त्याची बाजू सांगितल्यापासून तर मला त्याची भयंकर कीव आली होती. त्याची नजरही खूप साधी वाटते. खूप रिस्पेक्ट करतो तो
माझा. का कुणास ठाऊक? नाहीतर अविनाश. जाऊ दे.
मी ही थोडी चौकशी केली त्याची उगाच. तो डिस्टंस बीकॉम करतोय हे ऐकून आश्चर्यच वाटलं मला. मी म्हटलं अभ्यास कधी करता दोन दोन नोकऱ्या करता तर. तर फक्त हसला. किती स्ट्रगल असतो लोकांच्या आयुष्यात, नाहीतर आपण, सगळं सरळसोट मिळत जातं. अविनाश तरीही माझ्याशी बोलायचा प्रयत्न करत होता. मी ऑफिसमध्ये त्याला खूप अव्हॉईड केलं. मैत्रिणींतर्फे मेसेज पाठवले. त्याचे व्हॉट्सऍप, एसएमएस सगळ्याला इग्नोर केलं. त्याचा नंबर ब्लॉक केला तरी तो प्रयत्न करतच राहिला. मग एक दिवस तर त्यानं हद्द केली. संध्याकाळी माझ्याच वेळेला निघाला आणि माझ्या ट्रेनने आला. स्टेशनपाशी मला गाठून बोलायचा प्रयत्न करत होता. तेव्हढ्यात नशीबानं मला आमचा ऑफिसबॉय दिसला. मी चक्क त्याच्या स्कूटरवर त्याच्या मागे जाऊन बसले आणि त्याला चल म्हणाले. मला नंतर स्वतःचंच आश्चर्य वाटलं. अविनाशच्या रागामुळे की त्याच्याबद्दल आता मला वाटणाऱ्या विश्वासामुळे मी पटकन त्याच्या मागे बसले? अर्थात तोही आश्चर्यचकित झाला असला तरी अविनाशला बघितल्यावर त्याच्याही डोक्यात प्रकाश पडलाच. आय होप त्याचा माझ्याबद्दल काही गैरसमज नाही झाला.
----
काहीही असलं तरी एक गोष्ट पक्की होती, तिच्या मनातली माझ्याबद्दलची भीती गेली होती. त्यादिवशी तिच्या डोळ्यांत जे पाहिलं होतं, ते जन्मभर पुसलं जाणार नाही पण किमान आपण प्रयत्न करतोय,
काहीतरी चांगलं करतोय ही भावनाच खूप सुखावणारी होती. माझ्यासोबत ती चहा प्यायची म्हणून माझ्यासोबतची पोरं मला चिडवायची. पण मला ठाऊक होतं. ती माझ्यासोबत चहा पिते हा तिचा चांगुलपणा होता, माझ्यासारख्या प्यूनसोबत तिच्यासारखं कुणीच कधी धड बोलतही नाही कामापलीकडे. ती माझ्यासाठी मॉलमधल्या खिडकीतून दिसणाऱ्या महागड्या वस्तूसारखी होती. फार सुंदर आणि आवडणारी, पण आपल्या औकातच्या बाहेर आहे हे कायम जाणवून देणारी. तिच्यासोबत अधूनमधून बोलायला मिळायचं, तिचं हसणं पाहायला मिळायचं, हेच खूप होतं.
काही दिवसांनी माझी शिफ्ट परत बदलली. पहाटेच्या
शिफ्टमधून माणसं कमी करत होते कॉन्ट्रॅक्टवाली, मग थोडा जुगाड लावून मी दिवसाची शिफ्ट मिळवून घेतली. अजून थोडे दिवस तरी मला त्या नोकरीची तेव्हा गरज होती. पुन्हा तिची रात्रीची वेळ माझ्या वेळेबरोबर जुळू लागली. एक दिवस तिनं मला स्टेशनमधून बाहेर येताना पाहिलं. मी तिला नेहमीच पहायचो, पण त्यादिवशी मी कसल्यातरी विचारात चाललो होतो आणि तिची नजर आधी माझ्याकडे गेली. तिनं मला हाक मारली आणि माझ्याकडे
आली.
"मला कंपनी द्याल का?" तिनं हसतच विचारलं. माझ्याकडे बोलण्यासारखं काहीच नव्हतं.
त्यानंतर तिला उशीर झाला तर ती कंपनीतच मला गाठायची.
गंमतीची गोष्ट ही होती की ती उच्चशिक्षित, हुशार स्वतंत्र मुलगी आणि मी अर्धवट शिकलेला, कसाबसा जगत असलेला कलंक माणूस, एव्हढा आमच्यात फरक असून आम्हाला बोलायला विषय नाही असं कधीच व्हायचं नाही. तिला क्रिकेट, राजकारण, ऑफिसातली गॉसिप्स, सिनेमा, गाणी ह्या सगळ्या मला गती असलेल्या गोष्टींत गती होती. फक्त एव्हढाच फरक की मला ह्यापलीकडे कशातच गती नव्हती. चुकून ती काहीतरी वेगळं बोलून जायची आणि मला एकदम गोंधळल्यासारखं व्हायचं. मग हलकेच हसून ती विषय बदलायची. पण ती माझ्याशी इतकं का बोलायची हे कोडं मला कधीच उलगडलं नाही.
एक दिवस माझा रिझल्ट आला आणि मी ऑफिशियली बीकॉम झालो. मी ऑफिसात फक्त सोबतच्या पोरांना पेढे वाटले. तिला द्यायला गेलो नाही कारण मग सगळ्यांसमोर शो कशाला. आणि त्या संध्याकाळी नेमकी ती लवकर गेली. माझ्याकडे तिचा फोन नंबरही नव्हता आणि तो कधी असावा हेही मला योग्य वाटलं नव्हतं. अचानक ऑफिसमधला आमच्या रूममधला एक्स्टेंशन खणखणला.
कुणीतरी उचलला आणि माझ्या नावानं बोंब ठोकली. मी काय झालं विचारत आत गेलो.
"कुणीतरी मॅडमची काहीतरी पेपरं राहिलीत टेबलवर ती घेऊन लॉकरला ठेवायला सांगताहेत. तुझ्याशीच बोलायचं म्हणताहेत. तुला त्यांचं टेबल माहितीय म्हणे." असं म्हणून माझ्या हातात फोन देऊन तो बाहेर गेला.
"हॅलो!"
"आज रिझल्ट होता ना? मला सांगितलं नाहीत काय झालं ते?" पलीकडून तिचा आवाज आला. मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता.
"पण तुम्हाला कसं..."
"तुम्हीच एकदा बोलता बोलता तारीख सांगितली होतीत. म्हणाला होतात की ह्या तारखेला सगळं बदलून जाईल म्हणून." ती हसत होती हे मला तिच्या आवाजावरून कळत होतं.
"ओह. हो. झालो मी पास. फर्स्ट क्लास." मी शब्द जुळवत बोललो.
"ग्रेट. मी बाहेरच आहे ऑफिसच्या. या बाहेर. लेट्स सेलिब्रेट."
मला काही कळेना. मी लगेच बाहेर पडलो.
"पण तुम्ही तर.."
"हो. ट्रेनमध्ये चढले आणि मला आठवलं. मग लगेच उतरून परतीची ट्रेन पकडून आले आणि तुम्हाला फोन केला."
"पण फोन का केलात?"
"फार चांगली बातमी नसती तर तुम्हाला ऑकवर्ड व्हायला नको म्हणून. आणि न विचारता थेट इथे आले ते मला फुल कॉन्फिडन्स होता तुम्ही क्रॅक केली असणार एग्झाम म्हणून." ती खिदळत म्हणाली.
तिच्या त्या चेहऱ्याकडे पाहून न हसणं अशक्य होतं.
तिच्यासोबत एका केक शॉपमध्ये गेलो. मग घरी गेलो. स्टेशनपासून चालत जाताना ती म्हणाली.
"मला सांगणार नव्हतात का?"
"उगाच सगळ्यांसमोर काय पेढे वगैरे घेऊन यायचं. तुम्हाला अवघडायला नको."
"नाही नाही. मला अजिबात एम्बॅरॅस होत नाही. तुमच्यासोबत तर नाहीच नाही. यू आर वन गुड फ्रेंड आय हॅव."
तो माझ्या आयुष्यातला सगळ्यांत छान दिवस होता.
----
अविनाशचा एपिसोड झाल्यापासून बऱ्याच लोकांचं माझ्याशी वागणं बदललं होतं. माझ्या दोन-तीन मैत्रिणी सोडल्या तर अविनाशच्या मित्रांनी मला जवळपास वाळीत टाकल्यासारखंच होतं, त्यात आमचे मॅनेजरही माझ्याशी फारसे बोलणं बंद झाले होते. मी कम्प्लेंट करणार नव्हतेच, पण एकदोन
मुलींनीही मला 'त्यात काय झालं एव्हढं' टाईप सल्ले दिले. त्यांना काय सांगणार की
'त्यात काय झालं' चा प्रश्न नव्हता, प्रश्न माझ्या इच्छेचा होता. मी ठीक होते, उलट खूप जास्त स्ट्रॉंग वाटत होतं मला. माझ्यासोबत घडणारी प्रत्येक वाईट घटना आता मी पॉझिटिव्हली घेत होते. ह्या सगळ्या काळात एक वेगळीच गोष्ट झाली पण. माझी त्या आमच्या इथे राहणाऱ्या ऑफिस बॉयशी मैत्री झाली. मलाही विश्वास बसला नाही. मी क्षुल्लक काहीतरी बोलावं म्हणून पहिल्यांदा त्याला कंपनी द्यायला चहासाठी बसले, मग अविनाशला टाळायला त्याच्याकडून लिफ्ट घेतली आणि मग परत दिसला तो कॅंटीनमध्ये. काहीच झालं नाही असा नेहमीप्रमाणे बसला होता. ओळखीचं स्माईल देऊन कुठलीही एक्स्पेक्टेशन न ठेवता तो शांतपणे चहा पीत होता. इतका कसा सरळ असू शकतो हा? आणि मी घाबरत होते की मी काही चुकीचे सिग्नल तर नाही दिले त्याला. मग मी त्याच्याशी खरीखुरी बोलले, त्याच्याबद्दल माहिती घेण्यासाठी बोलले. त्याच्या डोक्यात काय चालतं हे जाणून घ्यायचं होतं मला, ऍंड इट वॉज वर्थ इट.
तो ते सगळं नव्हता जे अविनाश होता, सोफिस्टिकेटेड, उच्चशिक्षित, श्रीमंत, बोलायला स्मार्ट, वेल ड्रेस्ड आणि उथळ. त्याचे आणि माझे बोलण्याचे विषय फार कॉमन नव्हते, पण ज्याबद्दल तो बोलायचा ते इतकं मनापासून आणि खरं होतं की ऐकायला छान वाटायचं. दुसऱ्याला काय हवं ह्याचा तो नेहमी विचार करायचा. ऑफिसातले इतर बॉईजही त्याला लीडरप्रमाणे वागवायचे. तो वेगळा होता हे त्याच्याशी बोलायला लागल्यापासून समजलं मला. मग एक दिवस मी रात्री त्याला स्टेशनवर पाहिलं आणि त्याच्यासोबत चालत घरी जाऊ लागले. त्याच्यासोबत सेफ वाटायचं. तो अंतर राखून राहायचा. ऑफिसातही कधी सलगी दाखवायचा नाही. अलूफ आहे असं वाटायचं पण मी बोलायला गेले की त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेले जाणवायचे.
ऑफिसात ऍज एक्सपेक्टेड गॉसिप सुरू झालेलं होतं. त्यामुळे तो अजूनच ओळख दाखवायचा नाही, पण मीच हट्टाने त्याच्यासोबत बसायचे. मला काही फरक पडत नव्हता. मला माहित होतं आमच्यात काय आहे ते. लोकांना काय फरक पडत
होता. कोण त्याला खरंच ओळखत होतं? तो बीकॉम पास
झाला त्यादिवशी मी त्याला बाहेर घेऊन गेले. इट फेल्ट स गुड. तो आता त्या
नोकरीतून बाहेर पडणार होता. खराखुरा नीट जॉब करू शकणार
होता. त्याला काहीतरी करायचं होतं पुढे जाऊन. दॅट्स व्हाय आय लाईक्ड हिम सो मच.
----
मी नोकरी सोडली त्यादिवशी ती हट्टानं मला घेऊन एका कॅफेमध्ये गेली. आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या.माझी नवी एका सीएकडे लागलेली अकाऊंटंटची नोकरी, मग पुढचे प्लॅन्स ह्याबद्दल ती विचारत होती. मी आयसीडब्ल्यूए करण्याचा विचार करतोय हे ऐकल्यावर तिच्या नजरेत जे मी पाहिलं, तिथेच माझ्या
आयुष्याचं एक उद्दिष्ट सफल झाल्याचं मला जाणवलं. आम्ही किती वेळ तिथे बसलो ते आठवत नाही
पण बराच उशीर झाला होता. बाहेर पडल्यावर मी ओला
कॅब बुक केली आणि तिला बसवलं.
"आणि तू नाही येणार?"
"येईन ना ट्रेननं. बरं कॅश देऊ नका,
माझ्या ऍपमधून कट होतील."
"प्लीज. ते अहोजाहो थांबव रे आणि चल ना माझ्यासोबतच काय फरक पडतो."
मी नाही म्हणू शकलो नाही आणि बसलो.
कॅब चौकात पोचली आणि तिनं कॅबवाल्याला थांबवलं.
"इथेच? घरपर्यंत घेईल की तो."
"नाही." म्हणत ती कॅबमधून उतरली सुद्धा. मीसुद्धा उतरलो.
कॅब गेली आणि मी तिच्याकडे पाहिलं.
“बाय”, म्हणून मी वळणार एव्हढ्यात तिनं माझा हात धरला.
“तुला कळत नाही की कळून घ्यायचं नाही.” ती थोडीशी चिडली होती.
“काय?”
“पुन्हा तेच. ठीक आहे मीच बोलते. तू मला आवडतोस. तुझ्यासोबत असलं की मी
खूष असते.”
जे व्हायला नको होतं तेच झालं होतं. हे सगळं माझ्या मूर्खपणामुळे झालं
होतं. मी माझं अंतर ठेवलं नाही. ती दुःखी होती त्यावेळी मी तिच्याबरोबर होतो. बस, त्यामुळे
ती माझ्याकडे आकर्षित झाली असेल. नाहीतर मी तिच्या अजिबात लायक नव्हतो.
“काही बोलणार आहेस का? की मी एव्हढी मूर्ख आणि फालतू मुलगी आहे की तू..”
तिचा गळा दाटला होता.
“नाही.” तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधी मी म्हणालो. “स्वतःबद्दल असं
बोलू नका, प्लीज. तुम्हाला माहित नाही तुम्ही काय आहात ते. ते म्हणतात ना, डोन्ट लेट
दोज पीपल इन युअर टीम जज यू.”
“काय बोलतोयस तू?”
“ऑफिसातली ती लोक तुमच्याशी नीट वागत नाहीत, म्हणून तुम्ही वाईट वाटून
घेऊ नका अजिबात. त्यांना कल्पना नाही कसलीच. तुम्ही काय आहात ते मला माहितीय. माझं
अख्खं आयुष्य तुमच्यामुळे बदललंय.” मी कदाचित जास्त बोलत होतो.
“मला काहीच कळत नाहीये तू काय बोलतोयस ते. मी काय म्हणतेय ते कळतंय का
तुला. तू मला आवडतोस. तुला मी आवडते का?” ती एक पाऊल पुढे आली. मी प्रतिक्षिप्त क्रियेनं
एक पाऊल मागे सरकलो.
“हे चुकीचं आहे.”
“काय?” ती चिडली होती आता.
“मी… मी तुमच्या लायक नाही अजिबात. तुम्ही कुठे माझ्यासारख्याच्या नादाला
लागता. मी कितीही काही केलं तरी तुमच्या लेव्हलला नाही येऊ शकत. प्लीज. हे सगळे विचार
काढून टाका. ते तुम्हीच मला सांगत होतात ना, तुमचे मित्र परदेशात वगैरे गेलेत ते, उच्चशिक्षणासाठी
वगैरे, तसं काहीतरी करा. हे काय सामान्य माणसांमध्ये सामान्य आयुष्य शोधताहात.”
मला ठाऊक होतं मी तिच्याशी अजून बोलू शकत नव्हतो. मी लगेच वळलो आणि काळजावर
दगड ठेवून तिची अवस्था न बघता निघून गेलो.
----
त्यानं असं का केलं ते मला ठाऊक होतं. तो असं का वागला ते ही बरोब्बर
कळत होतं. दुर्दैवानं त्याचं जे वागणं, त्याच्या मनाचा जो कोपरा मला आवडला होता, त्यामुळेच
तो माझ्यापासून दूर गेला होता. मी काही बोलू शकत नव्हते.
मी त्याला नुकतीच चांगली ओळखू लागले तेव्हा एक दिवस बाबांना पोलिसांचा
फोन आला. आमच्या घरी दरोडा पडला त्याबद्दल. एक दरोडेखोर पकडला गेला होता आणि त्यानं
जबानी देताना बऱ्याच जुन्या गुन्ह्यांची कबुली दिली होती, त्यात एक आमचाही होता. मुद्देमाल
काहीच सापडणार नव्हता, तरी एकदा पोलिसांनी स्टेशनला बोलावलं होतं.
मी गेले तेव्हा पोलिसांनी मला काही फोटो दाखवले. मी त्यांना सांगितलं
की ते दरोडेखोर कानटोप्या घालून आले होते. तरी एकदा चेक करा म्हणून त्यांनी सांगितलं.
त्या फोटोंमध्ये एक फोटो त्याचा होता. मी त्याच्या फोटोपाशी थबकले. हवालदार म्हणाले,
“बरोबर, हाच त्याचा साथीदार होता असं म्हणत होता तो.”
मी एकदम त्यांना थांबवलं. “तुमच्याकडे हे फोटो कुठून आले?”
“बाकीचे रेकॉर्ड्समधले आहेत, हा बंड्याच्य फेसबुक अकाऊंटवरून घेतला आहे.”
“तुम्ही ह्यालापण पकडलंय का?” माझ्या डोक्यात सगळं चित्र तरळायला लागलं
होतं.
त्या दोघांमधला, घाबरलेला, बावरलेला, माझे हात बांधताना मला काचू नये
म्हणून सांभाळणारा तोच होता. त्यादिवसानंतर मला जेव्हाही दिसला, भेटला तेव्हा माझ्यापासून
अंतर ठेवून माझी काळजी घ्यायचा प्रयत्न करणाराही तोच होता.
“नाही. अजून नाही. आता घेऊन येऊ चौकशीसाठी.”
“का पण? अजून कुठला गुन्हा आहे का त्याच्या नावावर?”
“नाही, पण तुम्ही ओळख केलीत ना त्याची?”
“मी ओळख नाही केली सर. मी त्याला पर्सनली ओळखते. खूप चांगलं ओळखते. हा
तो नव्हता.”
“नक्की कसं सांगू शकता तुम्ही? त्यांनी तर कानटोप्या घातल्या होत्या असं
तुम्ही म्हणाला होतात.”
“हो, पण शरीरयष्टी अजिबात मॅच होत नाही. मी ह्याला जवळपास रोज भेटते,
हा माझ्याच ऑफिसात काम करतो.”
“हो पण मॅडम, चौकशी तर करूच शकतो. बंड्या सांगतोय त्याचं नाव.”
“बंड्या काहीही सांगेल, तुम्ही कुणाचं आयुष्य बरबाद करणार का त्याच्या
सांगण्यावरून?” माझा आवाज चढला. बाबाही थोडे गोंधळले.
मग बराच वेळ मी त्याच्याबद्दल सांगत राहिले आणि शेवटी पोलिस अडूनच राहिल्यावर
मी बाबांना आमची केस मागे घ्यायला लावली. नुकसान तर होऊन गेलं होतं. मी त्याच्या नुकत्याच
सुरू झालेल्या आयुष्याचं नुकसान करणार नव्हते. आणि मला तो खरंच किती आवडू लागला होता
ते लक्षात आलं होतं.
आणि त्याच गोष्टीमुळे तो मला नाही म्हणाला होता. ती एक चूक तो आयुष्यभर
मनात वागवत राहणार. त्यानंतर त्यानं माझं मन किती सांभाळलं हे त्याला कसं कळत नव्हतं.
मी तरी त्याला काय सांगू की मला सर्व माहितीय आणि मीच त्याला वाचवलंय? काय रिऍक्ट करेल
तो. ह्याच विचारात मी रात्र काढली आणि पहाटे खूप लवकर दारावरची बेल वाजली.
आईनं दार उघडलं आणि मला बोलावलं. एक छोटंसं पार्सल कुणीतरी ठेवून गेलं
होतं. त्यावर माझं नाव होतं. ते नक्कीच त्याच्याकडून होतं. मी ते पार्सल खोलीत नेलं
आणि उत्सुकतेनं पटापट उघडलं. आत माझा स्टोल होता. तोच जो त्यादिवशी ते घेऊन गेले होते.
आणि एक छोटा कागद,
“आय ऍम सॉरी. मी खरंच तुमच्या लायक नाही.”
मी धावतपळत खाली गेले पण तो कुठेच नव्हता. मी त्याला फोन केला पण तो अनरिचेबल
होता. तो त्यानंतर कधीच रिचेबल झाला नाही.