5/02/2013

सफ़रकी ज़िंदग़ी

आयुष्यात पहिल्यांदा घराबाहेर राहण्यासाठी नोकरीतल्या कामासाठीच पडलो. तोपर्यंत सुरक्षित वातावरणात आई-वडिलांच्या छत्रछायेखालीच सर्व काही. शाळा, कॉलेज इतकंच काय नोकरीसुद्धा फार दूर नाही. पण मग ती संधी मिळाली आणि एकदमच मी उघड्यावर पडलो.
एकंदर भारतीयच नव्हे तर सर्वच समाजांची एक मानसिकता असते, ती म्हणजे सर्वस्वी वेगळ्या संस्कृतीत आलं की एकत्र गट करून राहण्याची, एक प्रकारे स्वतःभोवती एक संरक्षक कवच तयार करून घ्यायची. स्वतःच्या संस्कृतीचं संरक्षक कवच, किंवा आपल्यासारख्याच माणसांचं संरक्षक कवच. ते नैसर्गिक आहे, त्यात काही चूक/बरोबर नाही. पण सांगायचा मुद्दा हा की माणूस आपली सोय पाहतो, कम्फर्ट झोन पाहतो. सहसा माणसाला अनोळखी वातावरणात फार वेळ राहायला आवडत नाही. माणूस अवघडून जातो. आणि ते अवघडलेपण अनावर झाल्यावर तो तिथून काढता पाय घेतो. अनोळखी प्रदेशामध्ये, अनोळखी देशामध्ये, अनोळखी संस्कृतीमध्ये हेच होतं आणि म्हणूनच माणसं कदाचित आपल्यासारख्या सवयी असलेले, आपल्या संस्कृतीतले असे गट बनवून राहतात, एकमेकांना धरून राहतात. मग, चायना टाऊन, इंडिया टाऊन असे प्रकार उदयास येतात.
हे सगळं सांगण्याचं कारण असं की, मीदेखील ह्या नियमाला अपवाद नव्हतो. आयुष्यात पहिल्यांदा घरापासून दूर, वेगळ्याच देशात, सर्वस्वी वेगळ्या संस्कृतीमध्ये पोचल्यावर मी अवघडून गेलो आणि आमच्याच कंपनीच्या इतर माणसांच्या आधारानं राहू लागलो. काही काळानं तेच कुटुंब बनून जातं अन तसंच झालं. पण ह्यामध्ये भीती ही असते की आपण ज्यांच्या आधारानं राहतो आहोत, ते ही अशाच विचारानं एकत्र राहत असतील तर मग आपण ज्या नव्या संस्कृतीमध्ये आलो आहोत, तिची तोंडओळखही होणं मुश्किल होऊन बसतं. अन मला ही गोष्ट लक्षात यायला बराच काळ जावा लागला. नोकरीनिमित्तानं अनेक माणसं भेटली आणि वेगवेगळ्या माणसांमधली वेगवेगळी वैशिष्ट्य पाहताना माझ्या हे लक्षात येत गेलं की आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायचा प्रयत्न न करून खूप काही गमावतोय. आणि इथेच माझ्यात थोडा बदल व्हायला सुरूवात झाली. मी ओळखीची वर्तुळं सोडून अनोळखी जागी फिरू लागलो. अनोळखी प्रदेश, अनोळखी खाद्यपदार्थ, अनोळखी रस्ते, अनोळखी कला, अनोळखी बाजार, अनोळखी माणसं मला बरंच काही शिकवूही लागली अन बराच आनंदही देऊ लागली. पण एक खरं की हे अनुभव घ्यायला एकटं असणं गरजेचं असतं कारण सोबत कुणीही असलं तरी नकळतच आपण एक सुरक्षा कवच बनवून घेतो, दुसर्‍या व्यक्तीशी अजाणतेपणी जोडलं गेल्यानं अनुभव सीमित होऊ लागतात. पण त्यामध्ये धोकाही असतोच, चुकीची माणसं, चुकीच्या जागी अन चुकीच्या वेळी भेटली तर मग मदतीला कुणीही नसण्याचा धोका. पण जगात प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी धोके हे पत्करावेच लागतात. ओळखीची वर्तुळं सोडणं म्हणजे कायमची सोडून आपल्या मुळांपासून विलग होणं नव्हे, पण घरटं सोडून कधी कधी भरारीही मारावी लागते, तरच पुन्हा घरट्यात परतण्याची मजा येईल.
मुळात माझं राहणं म्हणजे आता विंचवाचं बिर्‍हाड. पाठीवर घेऊन फिरायचं सगळंच. त्याचे फायदेही तितकेच अन तोटेही तितकेच. आणि त्यात हे अनोळखी जग पाहणं म्हणजे अनेकानेक अनोळखी माणसं भेटणं आलं. कधी भाषाही न समजता आपणहून मदत करणारी छोट्या दुकानाची मालकीण, तर कधी मुलाला फोन लावून त्याच्यामार्फत इंग्रजी भाषांतर करून मदत करणारा टॅक्सी ड्रायव्हर, कधी भारतीय बंधू म्हणून ग्लासभर पाणी आणि मेट्रोचं तिकीट बळेच हातात कोंबणारा सरळसाधा भारतीय आयटी इंजिनियर तर कधी सगळी ट्रामची तिकीटं विकणारी दुकानं बंद असतील म्हणून आपल्याकडचं एक तिकीट मला देऊ करणारी अनोळखी व्यक्ती. एक ना अनेक व्यक्ती, त्यांची वैशिष्ट्य त्यांचं वागणं, त्यांची एखादी कृती किंवा एखादं वाक्य कायमचं मनात घर करून जातं.
काही दिवसांपूर्वीच मी नेहमीप्रमाणे फारसं काहीही ठाऊक नसताना दूरवरच्या ठिकाणी जाण्यासाठी बस स्टॉपवर उभा होतो. नेहमीप्रमाणेच अनोळखी माणसानं बस नंबर, बस मार्ग आणि बसच्या वेळेपासून पुरती मदत केली. परतीच्या वेळेस शेजारच्या सीटवर बसलेल्या माणसाशी झालेलं संभाषण मात्र रोचक होतं. देश, इथलं जगणं, तिथलं जगणं इतक्या सगळ्या गप्पा झाल्यावर तो 'आपल्यासारखं, आपण' असं बोलण्याइतपत मोकळा होत गेला. शेवटी माझा स्टॉप आला तेव्हा तो एकदम म्हणाला, "आपकी मंज़िल आ गई भाई. सफ़रकी ज़िंदग़ी थी, सफरके साथ ही खत्म हो जायेगी!" मला पटकन काय बोलायचं ते सुचेना. मी हात मिळवला आणि "थँक यू भाई!" म्हणून विचित्र भावना सोबत घेऊन बाहेर पडलो.
मी हळूहळू चालत होतो पण त्याचे शब्द तसेच डोक्यात रूंजी घालत होते. 'सफ़रकी ज़िंदग़ी'; खरंच आपलं आयुष्य असंच तर आहे. ह्या वळणावर ही व्यक्ती तर त्या वळणावर अजून कुणी. एकदम तात्विक पातळीवर विचार केला तरी आयुष्याच्या प्रवासात अशीच तर माणसं वळणावळणावर भेटतात, विलग होतात, हरवून जातात. चक्र सुरू राहतं अन मग पुन्हा नवा मुसाफ़िर भेटतो.
आपण नाती इतकी धरून का ठेवतो त्याचं कारण त्या क्षणी मला कळलं. त्या फक्त ३०-४० मिनिटांच्या संवादानंतर त्याला अन मला दोघांनाही पुन्हा अनोळखी होऊन गर्दीत हरवून जाणं एव्हढं विचित्र का वाटावं? कुठेतरी त्या अनोळखी गर्दीमध्ये आपल्यासारखं कुणीतरी भेटणं म्हणजे गर्दीत हरवून गेलेल्या स्वतःलाच स्वतः सापडण्यासारखं वाटत असेल. आपली नाती म्हणजे तरी काय असतं, आपलंच एक प्रतिबिंब असतं, आपली एक ओळख असते. ती आपल्याला कुठेतरी आपल्या मुळांकडे घेऊन जाते. कुठल्याही कारणाने कम्फर्ट झोनच्या बाहेर पडल्यावर परतीचे रस्तेच मिळत नसतात तेव्हा सापडलेलं कुणीतरी आपल्यासारखं हे आपल्याला आपलीच हरवलेली ओळख परत मिळवून देतं आणि आपण आश्वस्त होतो. पण तोच धागा परत तुटताना अस्वस्थ होतो. मग नात्यांची किंमत कळू लागते.
पण ह्या 'सफ़रकी ज़िंदग़ी'नंच मला खूप सारी अशीही नाती दिली जी माझी मुळांशी असलेली नाळ कायम ठेवतात. ही नाती आहेत हा दिलासासुद्धा बरेचदा 'सफ़र' सुहाना करतात. रात्री अकरा वाजता, मी तिच्या देशात येणार म्हणून अख्ख्या कुटुंबासाकट तब्येतीचीही तमा न बाळगता मला फक्त भेटायला म्हणून एअरपोर्टवर आलेली तन्वीताई, त्याच रात्री मला फार वेळ एअरपोर्टवर वाट पाहावी लागेल म्हणून घरी घेऊन जाऊन मला चहा अन खायला देणारी ताई. एव्हढा उशीर झालेला असूनही गप्पा मारणारी अन गमतीजमती करणारी तिची लाघट पोरं, पुन्हा रात्री दीड वाजता मला योग्य ठिकाणी नेऊन सोडणारा तिचा नवरा अमितदादा. ही सगळी नाती सफ़रमध्येच बनली, किंबहुना 'सफ़र' हेच कारण ह्या नात्यांचं. मग सफ़रची भीती का बाळगा.
एव्हढं विचारचक्र फिरल्यावर माझ्या लक्षात आलं की हा सततचा प्रवास जितकं घेतो तितकंच भरभरून देतोही. तो Homeostatic आहे. कधीतरी आयुष्यात आपलं जहाजही नांगर टाकेल. प्रवासात खंड पडेल, तेव्हा प्रवासानं दिलेलं सगळं काहीच कामाला येईल. 'सफ़रकी ज़िंदग़ी' ज़िंदग़ीका सफर सुहाना कर देगी.