7/31/2016

टाकाऊ

आज  मुन्शी प्रेमचंदांची जयंती आहे असं गुगलवर डूडल बघून लक्षात आलं. असे दिवस आहेत सध्या; महत्वाच्या गोष्टी गुगलचं डूडल बघून लक्षात येतात, जवळच्या लोकांचे वाढदिवस फेसबुकच्या रिमाईंडर्सवरून आठवतात आणि सण व्हॉट्सॲप शुभेच्छा पाहून ध्यानात येतात. सांप्रत ललित लेखांच्या नियमाप्रमाणे लेखामधलं एक मॅन्डेटरी तत्वज्ञानात्मक वाक्य लिहून झालं.
तर आपण कुठे होतो, मुन्शी प्रेमचंद. कट्टर मराठी वगैरे असलो आणि हिंदी दडपशाही लॉबीला प्रचंड विरोध असला, तरी हिंदीचा द्वेष कणाचा नाही. असलंच तर प्रेम आहे. आराध्यदैवत सावरकरही एकीकडे भाषाशुद्धी करताना हिंदीला राष्ट्रभाषा करण्याच्या बाजूने होते. त्यामागचा विचार कुणाला कळला नाही आणि हिंदी मातृभाषा असलेल्यांना हा स्वतःच्या भाषेचा विजय वगैरे वाटला आणि मग त्यातनं इतर भाषिकांना दुखावण्यापलीकडे काहीही साधलं नाही. काही दुखावलेल्यांनी पराकोटीच्या द्वेषनिर्मितीतून स्वतःच्या प्रांतिक पोळ्या भाजल्या, त्यातले काही फार यशस्वी झाले (तामिळनाडूतले पेरियार) तर काही थोडेफार (आपले ठाकरे). अर्थात त्यांनी केलेली सगळीच राजकारणं टाकाऊ होती असं नाही, पण द्वेषमूलक गोष्टींमधून सर्जन (मराठीतलं बरं का) सहसा घडत नाही. पण ते सर्व असो. मी हळूहळू ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इन्टरेस्ट’ च्या दिशेनं जायच्या आधी थांबतो.
तर मी हिंदीचा प्रचंड चाहता असल्याचं म्हटलंच आहे. आणि ह्या हवेतल्या गप्पा नाहीत, पुरावा आहे. मी हिंदी राष्ट्रभाषा सभेच्या चार परीक्षा विशेष योग्यता श्रेणीत पास केल्या आहेत. चौथी तर मी हिंदी अभ्यासक्रमातला विषय म्हणून सोडून दिल्यानंतर स्वतंत्रपणे अभ्यास करून दिली होती. सांप्रतच्या ललित लेख नियमाप्रमाणे स्वतःची लाल करून बेसलाईन एस्टॅब्लिश करून झाली. आता पुढे.
तर ह्या हिंदीप्रेमाला अधून मधून उमाळे येत राहायचे, त्याप्रमाणे एकदा गोदान आणि कर्मभूमी ह्या दोन कलाकृतींवर नजर पडली. मुन्शी प्रेमचंद हे नाव खूप ऐकून होतो आणि त्यांची कफन वाचलेली होती, पण पुढे काही वाचलं नव्हतं. त्याकाळात नुकताच नोकरीनिमित्त एकटा राहू लागलो होतो आणि ह्या कादंबर्‍यांनी झपाटून टाकलं. गोदानमधलं कारूण्य आणि कर्मभूमीमधला आशावाद मनाला भिडला. मुन्शी प्रेमचंदांची पार्श्वभूमी शोधून वाचली, त्यांच्या आयुष्याबद्दल वाचलं. त्यांच्यातल्या लेखकाला मनोमन हजारो सलाम केले. पुन्हा काही धागे सुटले, काही कड्या निखळल्या, काही नवे लेखक, काही नव्या भाषा समोर येत गेल्या पण प्रेमचंदांची वाक्यरचना, त्यांनी उभी केलेली सामान्यांतली खणखणीत पात्रं, समाजाच्या गरीब स्तरापासून उच्चवर्गीय कुटुंबांपर्यंतचं त्यांचं रेखाटन आणि त्याप्रमाणे बदललेली भाषा, भाषेतले संदर्भ कधी डोक्यातून गेले नाहीत.
मला गोदानबद्दलही फार लिहायचं नाही आणि कर्मभूमीबद्दलही नाही कारण आत्ता पहिली गोष्ट म्हणजे तशी मनस्थिती नाही आणि खरं सांगायचं तर वाचून इतके दिवस झालेत की काही संदर्भ पुसट आहेत आणि काही जेव्हा वाचलं, तेव्हा आलेले पडताळे आज तितकेच खरे ठरतील ह्याची शाश्वती नाही. असा विचार करता लक्षात येतं की कुठलीही कलाकृती अशीच असते, ती कितीही शाश्वत असली, तरी तिच्या अनुभूतीचे संदर्भ सतत बदलत राहतात, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक व्यक्तीसाठी, अगदी खुद्द कलाकारासाठी सुद्धा.
Ratatouille मधला Anton Ego नामक समीक्षक म्हणूनच जेव्हा म्हणतो की “But the bitter truth we critics must face, is that in the grand scheme of things, the average piece of junk is probably more meaningful than our criticism designating it so. “ तेव्हा त्याची त्या म्हणण्यामागची भूमिका लक्षात येते. अनेक लोकांना Ratatouille च्या लेखकाचा हे वाक्य लिहिण्यामागचा संदर्भही वेगवेगळा लागला आहेच. अगदी माझा लाडका (माझा काय, जवळपास जगातल्या अनेक सिनेरसिकांचा रेफरन्स स्टॅंडर्ड बनलेला समीक्षक) Roger Ebert ह्यानेदेखील त्यावर भाष्य केलंय. “I would suggest that the average piece of junk is not meaningful at all, apart from the way it conditions the minds of its beholders to accept more pieces of junk.
हा जो संदर्भ आहे, ही जी भूमिका आहे, तीच मुळात Anton Ego चं वाक्य खरी करणारी आहे. जेव्हा एबर्ट किंवा तत्सम व्यक्ती कुठल्याही गोष्टीला piece of junk म्हणू शकतात, तेव्हा हे विसरतात की तो त्यांना लागलेला संदर्भ आहे, तो त्यांना आलेला पडताळा आहे. तो सार्वत्रिक नाही आणि वैश्विक, शाश्वत तर नाहीच नाही. लोकांनी काय पाहणं योग्य किंवा अयोग्य, हे ठरवणं हे समीक्षकाचं काम मुळात आहे का, काम सोडा, जबाबदारी आहे का? ह्या प्रश्नाचं उत्तर प्रथम स्वतः समीक्षकानंच शोधावं.
प्रत्येकाला आलेला पडताळा, अनुभव आपल्याजागी योग्यच. “कट्यार..” च्या सुरांनी हेलावून जाणारे जसे आहेत, तसेच त्यातल्या आलापांना किंचाळणं म्हणणारेही आहेत. ह्यातले योग्य-अयोग्य कोण ठरवणार? कला कुणाला सुखवायला मुळात निर्मिली जाते का? जात असली तरी ती प्रत्येकाला सुखवायला निर्मिली जाते का? (मुळात कला ही वेदनेतून निर्माण होते असं माझं मत असल्याचं मी मागे कधीतरी खरडल्याचं स्मरतंय, पण मी म्हणजे कुणी महाभाग नाही) मग प्रत्येकानं एकाच दृष्टीनं बघावं हा अट्टाहास का? सहसा समीक्षक हे कलेचे भोक्ते असतात आणि संवेदनशील असतात. समाजात वावरताना बहुविधतेचा पुरस्कार करणारे आणि त्यातूनच निर्माण होणार्‍या कलेच्या वेगवेगळ्या आविष्कारांची जाण असणारे, पण जेव्हा कलेबद्दलच्या मतांबद्दल गोष्ट येते तेव्हा कमालीचा बचावात्मक पावित्रा घेतला जातो. हे मानवी वर्तन आहे, त्यात वावगं काहीच नाही. आपल्याला चांगलं वाटतं त्याला लोकांनी चांगलं म्हणावं असा आवेश नसला तरी आपल्याला वाईट वाटतं ते टाकाऊच आहे हा (गैर) समज मात्र तिथे आहेच. अर्थात हे माझं मत झालं.
सत्य हेच आहे की जगात ठाम असे नियम निसर्गातच कशाला लागू नाहीत, आहेत ते ठोकताळे. जास्तीत जास्त अचूकतेने बसणारे आराखडे. मानवी समाजातही तेच आहे. मराठीत ‘समाजमान्य’ हा सुंदर शब्द आहे. जास्तीत जास्त समाजाला मान्य असणारं असं काही. वेड लागलं म्हणतो आपण, ते का? कारण तो/ती इतर जास्तीत जास्त समाजाला मान्य पद्धतीने विचार करणं बंद करते किंवा वागणं बंद करते. मानसिक रूग्ण म्हणजे तरी काय? ॲबनॉर्मल. त्या व्यक्तीला ‘आपल्याला वेड लागलं’ हे मान्य असतं का? आपण आजारी पडतो म्हणजे काय? नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं घडतं. जन्म चांगला आणि मृत्यू वाईट असं आपण का म्हणतो? कुणाला नक्की माहित आहे का की जन्माआधी आणि मृत्यूनंतर काय घडतं ते? पण समाजमान्य आहे म्हणून आपल्याला आनंद आणि दुःख होतंच राहतं. हेच ते कंडिशनिंग, ज्याला Anarchist विरोध करतात आणि मग आपला विरोध सर्वांनीच समजून घ्यावा असं कंडिशनिंग करायचा प्रयत्न अजाणतेपणी करतात. आणि समीक्षक हेच कलेबाबतही जाणते-अजाणतेपणी करतात. वैविध्याचा धडाडीनं पुरस्कार करताना कलाकृतीबद्दलच्या मतांमधलं वैविध्य दडपायचा प्रयत्न होतो. चूक कुणीच नाही आणि बरोबरही कुणीच नाही. पिवळी पुस्तकं आणि रेल्वेत मिळणारी हिंदी नॉव्हेल्स हा साहित्यप्रकार होऊ शकतो का? किंवा कुणीतरी काढलेले लग्नाचे व्हिडिओ हा टाईमपास आणि बडजात्याचे लग्नाचे व्हिडिओ हा सिनेमा का? ह्या प्रश्नांना माझ्याकडे उत्तर नाही. कुठल्या गोष्टीकडे कुणी कलाकृती म्हणून बघावं अन टाकाऊ म्हणून बघावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि काय टाकाऊ आहे हे लोकांना समजवण्याची जबाबदारी कुणीही घेण्यात काहीच अर्थ नाही, जेव्हा आपण लोकांवर स्वतंत्रपणे विचार करण्याची जबाबदारी आपल्या पसंतीच्या कलाकृतीबद्दल करण्यासाठी टाकतो, तेव्हा तीच जबाबदारी आपल्याला टाकाऊ वाटणार्‍या गोष्टीबाबत आपलीही असते हे विसरून चालत नाही.
पुढे Ebertच Pierre Rissient च्या वाक्याचा उल्लेख करतो “It is not enough to like a film. One must like it for the right reasons." तो कुठेही हे वाक्य पूर्ण योग्य-अयोग्य आहे असं म्हणत नाही, पण तो त्या वाक्याशी सहमत आहे. मी Ebert च्या सर्व मतांना दुजोरा देत नाहीच, पण ह्या वाक्यात श्लेष आहे. “Right Reasons” प्रत्येकाची वेगळी असू शकतात आणि ती दुसर्‍याला Right वाटावीच असा अट्टाहास करण्यात काहीच हशील नाही आणि Film च्या जागी कुठलीही इतर कलाकृती असली तरी माझं हे मत असंच राहतं. कलेपेक्षा कुणी मोठा नाही वगैरे वाक्य फेकण्याची ही योग्य जागा आहे खरंतर, पण मी आवरतोय स्वतःला.
जेव्हा आपला मार्ग हाच योग्य मार्ग वाटू लागतो तेव्हा माणसाची वाढ खुंटते, पण जेव्हा दुसर्‍याचा मार्ग अयोग्य मार्ग वाटू लागतो तेव्हा बुडबुडा बनायची सुरूवात होते. कालांतराने काय होतं हे सुज्ञांस सांगणे न लगे.
मुन्शी प्रेमचंद, हिंदी आणि स्वस्तुतीवरून फिरत मी समीक्षणावर कधी आलो हे कळलं नाही पण काहीतरी लेखन झालं एव्हढं निश्चित, ते पण सांप्रत ललितलेखनातले बरेचसे ‘समाजमान्य’ नियम पाळत. आता कुणी टाकाऊ म्हणण्याची भीती नाही! ः)