4/04/2010

पाऊस

खरं म्हणजे महिनाभरापूर्वी जेव्हा मी 'गाभ्रीचा पाऊस' पाहिला, तेव्हाच मी लिहिणार होतो, पण असो. आज टीव्हीवर 'समर २००७' हा पडलेला पण एक चांगला प्रामाणिक प्रयत्न असलेला सिनेमा पाहताना मला 'गाभ्रीचा पाऊस'ची प्रकर्षाने आठवण झाली. 'समर २००७' सुद्धा विदर्भातल्या शेतकर्‍यांच्या हलाखीच्या परिस्थितीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. शहरातल्या लोकांची ह्या समस्येकडे पाहण्याची मानसिकता दाखवतो. अतिशय अंगावर येणारे असे काही प्रसंग आहेत ह्या सिनेमात. पण आपल्या कचकड्याच्या दुःखांमध्ये रमणार्‍या प्रेक्षकांनी अपेक्षेप्रमाणेच ह्या सिनेमाकडे पाठ फिरवली. त्या दिग्दर्शकाने व्यावसायिक सिनेमाचं भान ठेवूनही एक विचारप्रवृत्त करणारा, अंगावर येणारा असा सिनेमा बनवल्याबद्दल त्याचं कौतुकच वाटलं मला.
पण 'गाभ्रीचा पाऊस' हे एक वेगळंच प्रकरण आहे. गावात एक शेतकरी आत्महत्या करतो, आणि त्याच्या मित्राच्या बायकोला आपलाही नवरा असं काही करेल ही भीती वाटायला लागते. मग ती त्याची प्रत्येक कृती संशयाने बघायला लागते. चोवीस तास त्याच्यावर पाळत ठेवायला लागते. तो घराबाहेर पडला की मुलाला त्याच्याबरोबर धाडते. त्याला आवडेल असं सगळं करायचा आपल्या ऐपतीबाहेर प्रयत्न करू लागते. "गडद विनोदा"ची-कधीकधी अंगावर शहारे आणणार्‍या विनोदाची- झालर देऊन सिनेमा पुढे सरकत राहतो. आपणही कळत नकळत शेतकर्‍याच्या एकतर्फी लढाईचा भाग होत जातो. शेतकर्‍यांची हतबलता, दुसर्‍याच्या मृत्यूत आपला फायदा शोधणारी माणसं, नोकरशाहीरूपी अदृश्य शत्रू, त्यातही काही जणांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आशावाद, शत्रू बनलेली नियती आणि आधी बिलकुलच न पडलेला आणि नंतर धोधो कोसळून नकोसा झालेला सगळ्यात मोठा खलनायक-पाऊस.
सिनेमात सुरुवातीला शेतकर्‍याचा मुलगा पावसाला 'गाभ्रीचा पाऊस' म्हणतो, तेव्हा शेतकरी त्याला दामटतो, 'गाभीचा' ही विदर्भाकडची शिवी आहे. पण नंतर स्वतः शेतकर्‍यालाच पाऊस 'गाभ्रीचा' वाटू लागतो. पिकाचं दोनदा नुकसान झाल्यावर जेव्हा एक दुसरा शेतकरी पहिल्याला म्हणतो, की आकडा टाकून वीज घे, तेव्हा त्या हत्बल परिस्थितीतही तो शेतकरी म्हणून जातो 'पण हा गुन्हा आहे'. इथे शहरात सगळं सुखासुखी असूनही आपण ड्रायव्हिंग लायसन्स पासून, ट्रॅफिक सिग्नल पर्यंत सगळीकडे 'गुन्हे' करत असतो आणि आपण त्यांना गुन्हेही मानत नाही आणि तो सगळा संसार उसवण्याच्या मार्गावरचा शेतकरीही जेव्हा आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत असल्याचे दाखवतो, तेव्हा कुठेतरी खोल एक वेदना उमटते.
आपण शहरात पाऊस पडला की काय विचार करतो. माझ्यासारखे अरसिक 'आज बाहेर जायचे वांधे' म्हणणार, काही थोडे जास्त रसिक गरम चहा आणि गरमागरम भजी खात खिडकीत बसून पाऊस बघत गप्पागोष्टी करणार, काही त्याहून थोडे जास्त रसिक गाणी ऐकणार, त्याहून थोडे जास्त गाणी म्हणणार, त्याहून जास्त असतील तर त्यांना भन्नाट कल्पना अशाच वेळी सुचतात आणि अगदीच रोमॅटीक लोक पावसात भिजणार. पण आपण इतके करंटे की पाऊस ही आपल्यासारख्या देशाला किती महत्वाची गोष्ट आहे ह्याचा विचारही आपल्या कोणाच्या मनात येत नाही. पाऊस पडण्या न पडण्यावर कित्येक लोकांचं आजचं जेवण अवलंबून आहे ह्याचा विचारही आपल्याला शिवत नाही. पण महत्वाचं हे की आपलंही आजचं नसेल, पण उद्याचं जेवण ह्याच पावसावर अवलंबून आहे हे आपल्याला कळत नाही. बातम्या संपल्या की हवामान वृत्ताला आपण वाहिनी बदलतो, पण त्या वृत्तावर कुणाची आजची शांत झोप अवलंबून असेल असं आपल्याला वाटतं का?
आजकाल मी पाऊस पडून कुठे बाहेर पडण्याचा बेत रद्द झाला तरी चिडचिड करत नाही. हवामान वृत्त आवर्जून बघतो. आणि हो, आता 'गुन्हे' न करण्याचं ठरवलंय.

7 comments:

 1. विद्याधर, 'समर २००७' खरंच सुंदर चित्रपट होता. पण अर्थातच तो अपेक्षेप्रमाणेच पडला.. 'गाभ्रीचा पाउस' बघायचाय. कधी बघणं होईल गॉड नोज.. टोरंट आहे का कोणाकडे?

  ReplyDelete
 2. हेरंब,
  खरंच असे चित्रपट बघतो तेव्हा 'माय नेम' सारख्या चित्रपटांचा खूप राग येतो....असो...
  गाभ्रीचा पाऊस मस्ट वॉच आहे..मला एका मित्राकडून मिळाला...बघतो कुठून सोय होते का ते?

  ReplyDelete
 3. समर २००७ youtube वर आहे का? मी अजून गाभ्रीचा पाऊस ही पाहिला नाहीये. हे असे अनेक सिनेमे निसटूनच जातात. जेव्हां तिथे येतो तेव्हां तिथेही नसतातच.... तुमच्याकडे लिंक असल्यास प्लीज द्याल का? धन्यवाद.

  ReplyDelete
 4. ब्लॉगवर स्वागत ताई,
  समर २००७ ची हि एक ऑनलाईन लिंक आहे...क्वालिटी तेव्हढी चांगली नाहीये..पण ठीक..
  http://bollysaga.com/player.php?desi_movie_id=310 ...आणि हो गाभ्रीचा पाऊस जेव्हाही मिळेल बघाच नक्की....
  प्रतिक्रियेबद्दल आभार!

  ReplyDelete
 5. गाभ्रीचा पाऊस विचार करायला लावणारा चित्रपट आहे...मला आवडला तो...

  ReplyDelete
 6. खरंच गाभ्रीचा पाऊस अगदी आतून हलवून टाकतो...
  धन्यवाद सागर!

  ReplyDelete
 7. संकेत आपटे7:14 PM

  @हेरंब,

  टॉरंट कशाला? www.apalimarathi.com या साईटवर जा. अनेक गोष्टी मिळतील.

  ReplyDelete