11/13/2011

लिमिटेड माणुसकी

आमच्या ऑफिसमध्ये इतर ऑफिसेसमध्ये असतात तसाच एक पोस्ट विभाग आहे. आलेली पत्रं आणि जाणारी पत्रं ह्यांचं काम बघणारा विभाग. त्यामध्ये कुणाकुणाची आलेली पत्र ऑफिसभर फिरून पोचवण्याचं काम करणारा एक मनुष्य आहे. रोज सकाळी मी ऑफिसात पोचल्यानंतर २०-२५ मिनिटांनंतर तो मी बसतो त्या मजल्यावर कुणाकुणाची पत्र, लिफाफे पोचवायला येतो. मी माझ्या मजल्याच्या अगदी दरवाजातच दरवाजाकडे तोंड करून बसतो आणि त्यात मला अटेन्शन डेफिसिट डिसॉर्डर असण्याचा संभव असल्यामुळे हलकीशीही हालचाल झाली की माझं लक्ष विचलित होतं, त्यामुळे येणार्‍या जाणार्‍या प्रत्येक व्यक्तिकडे माझं लक्ष जातंच. आणि सहसा इथली सगळीच लोक सकाळी दिसणार्‍या अगदी अनोळखी माणसालाही ग्रीट करतात, तद्वतच गेली तीन वर्षं तो मला रोज सकाळी ग्रीट करतो आणि मी त्याला. गेल्या तीन वर्षांच्या ओळखीनंतर फायनली दोनेक महिन्यांपूर्वी तो माझ्याशी बोलायला थांबला. पण त्याला येतं फक्त इटालियन. अगदी गेल्या वर्षीपर्यंत मला तोडकंमोडकंही इटालियन बोलता येत नसे, पण आता थोडंफार बोलू शकतो त्यामुळे आमचा थोडाफार अर्थपूर्ण संवाद झाला. त्यावरून मला एक आश्चर्यकारक गोष्ट कळली, की इतर काहीकाही अगदी शिकल्या-सवरलेल्या इटालियन माणसांनाही भारतीय माणसांच्या इथे असण्याचा जो एक सल आहे, तो ह्या अल्पशिक्षित आणि ऑफिसातील खालच्या स्तरावर काम करणार्‍या माणसाला मात्र अजिबात नाही.
मी इथे केवळ अजून सहा महिनेच असेन, हे ऐकल्यावर त्याला जेन्युईनली वाईट वाटल्याचं मला जाणवलं. आधी त्याला वाटलेलं की मी इथेच नोकरी करतो. आणि अशी चुकीची समजूत असूनही त्याला भारतीय लोक इथे असण्याचं वाईट न वाटणं मला स्पर्शून गेलं.
त्यानंतर इथे एक विचित्र घटना घडली. लिबियन युद्धामुळे बरेच निर्वासित समुद्र पार करून इटलीत शिरले. ते मुख्यत्वे लिबियात काम करणारे परदेशी कामगार. म्हणजे एकतर आफ्रिकन्स किंवा पाकिस्तानी/बांग्लादेशी (ज्यांच्या देशांनी त्यांना परत नेण्याची कुठलीही सोय केली नाही). तर रेडक्रॉसनं त्या सगळ्यांना मिलानमध्ये आणलं आणि चक्क आम्ही ज्या फोर-स्टार रेसिडन्समध्ये राहतो, तिथेच त्यांची राहण्याची सोय केली. आमचा रेसिडन्स लॉसमध्ये चालला होता आणि रेडक्रॉसकडून मिळाणारा भरघोस पैसा हा हमखास कमाईचा मार्ग, हे इंगित आम्हाला नंतर कळलं. पण संपूर्ण गोर्‍या माणसांच्या लोकॅलिटीमध्ये आफ्रिकन आणि बांग्लादेशी/पाकिस्तानी मजूरांना आणून टाकल्यानं थोडंसं विचित्र वातावरण निर्माण झालं. त्यात भर म्हणजे रेडक्रॉस त्यांना देत असलेल्या सोयी - फुकट जेवण, कपडे, सायकली, मोबाईल फोन्स, इंटरनेट. सामान्य टॅक्सपेयिंग इटालियन माणसास राग न येता तरच नवल. आम्हाला भेटणारा प्रत्येक इटालियन ह्या गोष्टीबद्दल प्रचंड राग व्यक्त करतो. आणि गंमत म्हणजे आम्हालाही त्या निर्वासितांचा हेवा वाटतो. कदाचित मत्सर हा शब्द योग्य असेल. तद्दन मूर्खपणा आहे तसं वाटणं म्हणजे, मनाविरूद्ध देशाबाहेर, घराबाहेर राहणं ह्याबद्दल कुणाचा हेवा वाटण्यात काही अर्थ आहे का? पण वाटतो. त्याची कारणं अनेक आहेत.
पहिलं म्हणजे बालिश कारण, त्यातले पाकिस्तानी/बांग्लादेशी कुठल्याही ऍन्गलनी घरापासून दूर आहेत म्हणून दुःखी असल्यासारखं वाटत नाही. आमच्यातल्या अनेकांचा (इन्क्ल्युडिंग मी) असा कयास आहे की ते खरे लिबियन वॉर रेफ्युजीज नाहीच आहेत, ते असेच कुठल्यातरी बोटीत बसून (जसे नॉर्मली युरोपात घुसतात) तसे आलेत आणि लिबियन वॉरच्या नावाखाली मजा मारताहेत आणि इथेच सेटल होतील.
दुसरं  म्हणजे अजून बालिश, त्यांना फुकटात इटालियनही शिकवतात आणि कदाचित इथे सेटल व्हायला मदतही करतील, आणि आम्हाला साधं वर्किंग व्हिजा एक्स्टेन्शन मिळवायचं म्हणजे मारामारी. हे म्हणजे अधिकृतरित्या प्रयत्न केले तर त्रास आणि असं बोटीत बसून आलं की मजा. (बोटीत बसून येणं ही मजा नाही हे अर्थातच अधिक विचार केल्यावर आणि त्यामागची केविलवाणी अपरिहार्यता जाणवल्यावर कळतं).
तिसरं म्हणजे बालिशाहूनही बालिश, ह्या लोकांमुळे आजूबाजूचे गोरे कधीकधी आम्हालाही निर्वासित समजतात. आता कुणी म्हणेल त्यात काय? पण इट हर्ट्स. वंशवादाचं आणि वर्गवादाचं माईल्ड स्वरूप आहे हे. आम्ही इंजिनियर आहोत, नोकरी करतो बाकायदा आणि यू इक्वेट अस विथ दीज पीपल? गोर्‍या वंशवादाच्या दाट सावलीखाली चाललेली भुर्‍या वंशवादाची आणि वर्गवादाची घुसमट. ऑसम.
चौथं आणि थोडंफार प्रॅक्टिकल कारण म्हणजे, ह्या लोकांपैकी बर्‍याच लोकांना इंग्लिशची मारामारी आणि एव्हढ्या मोठ्या हजार खोल्यांच्या हॉटेलात ते सुरूवातीला बावरून गेले होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या खोल्याही लक्षात राहत नसत. मग रात्री अपरात्री फिरून आल्यानंतर ते चुकीच्या खोल्यांच्या बेल्स दाबत. बरं इथे पीप-होल्स नसल्यामुळे कळत नाही कोण ते. मग गोंधळ, गैरसमज. त्यात काळ्या लोकांबद्दल आपल्या मनात असलेली अनामिक भीती, जणू ती जनावरंच आहेत. अर्थात, त्यांनी काही कमी उपद्रव केले असं नाही. उगाच लोकांच्या घरांच्या बेल्स मारून नेलकटर आहे का? चाकू आहे का? असले धंदे करणेही चालू होते (अर्थात ह्यामध्ये पाक/बांगला आघाडीवर होते कारण त्यांना आपली भाषा येते). दिवसरात्र कॉरिडॉर्समध्ये फेर्‍या मार, मोठमोठ्याने गप्पा आणि हास्यविनोद. पण अर्थातच ते अशिक्षित कामगार लोक, त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता? ते काय बॉरबॉन किंवा स्कॉच पीत ब्रिज खेळत बसणारेत? असो. पण ज्यांच्या बायका आणि पोरं दिवसभर घरी एकटी असायची त्यांना ह्या लोकांचा प्रचंड वीट आला होता. ते आजही ह्या लोकांना शिव्या घालतात. त्यांच्याजागी ते बरोबर असणार, ह्यात वादच नाही. पण मला माझा स्टँड नक्की काय आहे हे आजही माहित नाही.
आता कुणी विचारेल, फोर स्टार हॉटेलमध्ये ह्या लोकांना कसंकाय ठेवू दिलं? तर पैसा हे एक कारण आधीच सांगितलं आणि दुसरं म्हणजे, जसे आमच्या कंपनीतले लोक हॉटेलात राहतात, तसेच आमच्या हॉटेलचं पोलिसांशीही कॉन्ट्रॅक्ट आहे. आमच्या हॉटेलात पोलिसही बरेच राहतात. त्यामुळे ह्या लोकांवर आपसूकच जरब आणि कंट्रोल राहतो. पुन्हा रेडक्रॉसचे लोक असतातच.

तर ही सगळी पार्श्वभूमी अशासाठी की परवा माझ्या ऑफिसातल्या पोस्टवाल्या मित्राशी पुन्हा भेट झाली. ह्यावेळेस कॉफी मशीनवर. मी आणि माझा एक मित्र त्याच्याशी बोलत होतो. गप्पा भारतीय सिनेमावरून तुम्ही कुठे राहतावर आल्या. मग जागेचं नाव सांगताच तो म्हणाला की मी तिथे काही वर्षं कामाला होतो. हे बोलल्यावर माझ्या मित्रानं सध्याच्या ह्या काळ्या लोकांच्या फुकट राहण्या/जेवण्याबद्द्ल त्याच्या भावना त्याला बोलून दाखवल्या, मी त्याचा चेहरा निरखत होतो. आणि तो बोलला, "ते बिचारे निर्वासित आहेत रे. काय करणार आपण? परवाच मी एका निर्वासिताबद्दल बातमी पाहिली. कचर्‍याच्या डब्यात पडलेली बाटली उचलून त्यातला उरलेला ज्यूस पित होता."
त्या माणसाला प्रत्यक्ष स्थिती काय आहे ह्याची जास्त कल्पना नसावी. कारण इथल्या निर्वासितांची तशी चैनच चालू आहे. पण तरीही त्याच्याइतकीच, किंबहुना त्याच्याहूनही कमी माहिती असलेले वेल-टू-डू सुशिक्षित इटालियन लोकही त्या लोकांना ऍट स्लाईटेस्ट प्रोव्होकेशन शिव्या घालायला कमी करणार नाहीत. पण एक अल्पशिक्षित, अल्प पगारावर काम करणारा सामान्य इटालियन मनुष्य ह्या घटनेकडे कुठलाही चष्मा न घालता, निव्वळ माणुसकीनं पाहताना बघून मला एकदमच हलायला झालं.
तो ज्या नजरेनं आम्हाला बघतो, त्याच नजरेनं त्या निर्वासितांकडे पाहतो आणि त्याच नजरेनं इतरही कुठल्या अगदी श्रीमंत इटालियन माणसाकडेही पाहतो. कुठे शिकला असेल तो हे? जे आमच्या ऑफिसात काम करणारे काही गोरे इंजिनियर्सही नाही शिकू शकले? जे आम्हीसुद्धा वर्षानुवर्षं शिकूनही आणि गोर्‍यांचे जुलूम सहन करूनही नाही शिकू शकलो? आमची माणुसकी लिमिटेडच का राहिली?

'शिंडलर्स  लिस्ट' पाहिल्यानंतर मी ओस्कार शिंडलरबद्दल वाचत होतो. त्यामध्ये शिंडलरनं नक्की हे सगळं का केलं? आपला जीव आणि आपली सारी संपत्ती पणाला लावून त्यानं एव्हढ्या ज्यूंचे प्राण नक्की का वाचवले? अचानकच एक संधीसाधू कारखानदार इतका मानवतावादी कसा झाला? ह्याची उत्तरं शोधताना शिंडलरला एका मुलाखतकारानं विचारलं. तेव्हा शिंडलरचं उत्तर अतिशय साधं होतं, "मी त्या सगळ्यांना ओळखत होतो. आणि जेव्हा तुम्ही कुणाला ओळखता तेव्हा तुम्ही त्याच्याशी एका किमान सभ्यतेच्या पातळीनं वागता."
बस? इतकंसं कारण? त्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याइतकं?
तो म्हणतो मी ओळखतो, म्हणजे काय ते त्याचे मित्र किंवा कौटुंबिक मित्र नसतात. ती त्याच्यासारखीच चालती बोलती माणसं असतात, ज्यांना तो रोज बघतो.
अर्थातच अनेक कंगोरे असतील शिंडलरच्या मनात. कितीतरी मोठी द्वंद्व उद्भवली असतील. अगदी सगळं संपल्यावरही, मी गाडी विकली असती तर अजून दहा जीव वाचले असते हे म्हणून शोक करणार्‍या शिंडलरच्या मनाचा ठाव कुठल्याही भाषेतल्या कुठल्याही शब्दांनी घेण निव्वळ अशक्य आहे. पण त्याचे साधे शब्द एक साधी भावना दाखवतात. माणुसकीची भावना. एक माणूस दुसर्‍या माणसाशी कसा वागतो बस. 

इतकं साधं आहे सगळं. पण तसं वागणं महा कर्मकठीण. माणसांतली माणुसकी बाहेर यायला बरेचदा त्याच्यातल्या माणसावरच हल्ला होणं गरजेचं ठरतं. जसं, 'डिस्ट्रिक्ट ९' सिनेमातला विकस जसजसा माणसापासून परग्रहवासीय जीवांमध्ये ट्रान्स्फॉर्म होत जातो, तसतसं त्याच्यातलं माणूसपण, त्याच्यातली माणुसकी वाढत जाते.
थोडक्यात, माणसाचा जन्म घेऊन माणूस बनणंच जगातली सर्वांत कठीण गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही.

24 comments:

  1. खरंय विद्याधर. माणुसकी जपणं ही काही सोपी गोष्ट नव्हे...आणि ती प्रत्येकवेळी जपणं हे तर कर्मकठीणच.

    Thanks Vidya! मी लक्षात ठेवेन हा धडा

    ReplyDelete
  2. Anonymous8:22 PM

    हम्म... विद्याधर खरं तर बाबा तू खूप दिवसाने परतलायेस असं वाटतय... म्हणजे मध्यंतरी तू विचार करत नसावास असे नव्हे पण ते इथे व्यक्त होत नसावेत इतकेच!! दुसरं ही पोस्ट या ब्लॉगची आहे, भिंतीची आहे आणि भिंतीसाठीची आहे, म्हणून मला जास्त आपली वाटली असावी!!

    ’माणूसकी’ खूप मोठा शब्द पण तो लिमिटेड असतो हे ही सत्यच... किंवा परिस्थितीमूळे आपण तसे बनतो/ वागतो/ विचार करतो रे!! राम जाणे, पण मग ही साधीसुधी माणसं कसं त्यांचं स्वत्त्व राखतात नाही का!!

    शिंडलर्स लिस्टबद्दल कालच बोलले नं तूला, मनातलं ऑस्करचं स्थान , बेनने व्यक्त केलेली ती असहाय लगबग आणि एकूणातच प्रत्येक फ्रेम मनात किती रेंगाळेल सांगता येत नाही किंवा कदाचित कधीच मनातून जाणार नाही....

    पोस्ट किंवा विचार आवडले... नॉउ आय कॅन से, बाबा इस बॅक!!

    ReplyDelete
  3. लाकडामध्ये सुप्तपणे अग्नीचे प्रचंड तेज वसत असते पण जोपर्यंत लाकडाला चेतविले जात नाही तोपर्यंत लाकूड त्याचा उपयोग करत नाही. याचप्रमाणे व्यक्तीच्या अंगी शौर्यगुण असतात पण दुसऱ्याकडून जोपर्यंत त्याला डिवचले जात नाही तोपर्यंत ते गुण प्रदर्शित होत नाहीत -भगवान श्रीकृष्ण !
    हे अगदी तुमच्या -(माणसांतली माणुसकी बाहेर यायला बरेचदा त्याच्यातल्या माणसावरच हल्ला होणं गरजेचं ठरतं.)यासारखं वाटतंय नाही? खूप छान लेख आहे !

    ReplyDelete
  4. मस्त पोस्ट, विद्याधर. खर्‍या - खोट्या बातम्यांचा भडिमार, इतरांची मतं, पूर्वग्रह, अनोळखी समाजाविषयीची भीती ... हजार कारणं असतात आपली माणुसकी ‘लिमिटेड’ करून टाकणारी. अश्या वेळी स्वच्छ मनाने, दुसर्‍याचा माणूस म्हणून विचार करणारं कुणी भेटलं, म्हणजे समजतो मानुसकीचा अर्थ.
    शिंडलरची केस तर अजूनच गुंतागुंतीची ... या माणसाने फक्त थर्ड राईश आणि युद्धाच्या काळात आपल्याकडे काम करणार्‍या ज्यू लोकांसाठी एवढं केलं ... त्यापूर्वीचं आणि युद्ध संपल्यावरचंही त्याचं वागणं बघून कुणाचा विश्वासही बसणार नाही त्याने आपल्या ज्यूंसाठी काही केलं होतं यावर. तेवढाच काळ त्याच्यातला माणूस जागा झाला होता असं म्हणायचं आपण :)

    ReplyDelete
  5. Anonymous1:29 AM

    विद्याधर,

    आज बर्याच दिवसांनी ब्लाँग पहातो आहे. अप्रतिम लेख! "गोर्‍या वंशवादाच्या दाट सावलीखाली चाललेली भुर्‍या वंशवादाची आणि वर्गवादाची घुसमट. ऑसम." प्रचंड आवडले!

    ReplyDelete
  6. खरंय यार....!!

    ते म्हणतात नं Common sense is not common तसचं काहीसं...

    ReplyDelete
  7. @श्रीराज,
    अरे मला नको, त्या सगळ्या साध्या माणसांना थँक्स म्हण, जी आपल्या वागण्यातनंच काही न बोलता हा धडा देत असतात! :)

    ReplyDelete
  8. @तन्वीताई,
    मलाही छान वाटलं बर्‍याच दिवसांनी थोडंसं व्यक्त होऊन. पण ब्रेक घेण्याचीही मजा वेगळी होती. पण त्या माझ्या मित्रानं, शिंडलरनं आणि डिस्ट्रिक्ट ९ नं ब्रेक संपवायला भाग पाडलंच! :D
    बाकी तू म्हणतेस ते खरंच. आपली माणुसकी लिमिटेड करायला बरेच फॅक्टर्स कारणीभूत ठरतात! ते कसं मॅनेज करायचं ते प्रत्येक माणसावर शेवटी!

    ReplyDelete
  9. @गीतांजलीजी,
    तुम्ही दिलेला संदर्भ एकदम चपखल बसतो. खरं आहे, गुणांचा कस विपरित परिस्थिती उद्भवल्याशिवाय लागत नाही, तद्वतच माणुसकीचा कस, माणूसपणावर हल्ला झाल्याशिवाय लागत नाही.

    ReplyDelete
  10. @गौरी,
    खरंच जसं अंधरातनं चालताना एक छोटासा मिणमिणता दिवासुद्धा आजूबाजूचा बराच भाग उजळून टाकतो आणि चालणार्‍याला मदत होते, तशीच ही माणसं असतात. आपल्याला स्वतःकडेसुद्धा नव्यानं बघायला शिकवतात, आणि काहीही वेगळं न करता!
    आणि शिंडलरचं म्हणायचं तर, तो युद्ध सुरू होण्यापूर्वी एक फेल्युअरच होता, आणि श्टेर्न आणि युद्ध नसते, तर त्याचा तो धंदाही चालणं अवघडच होतं. त्याप्रमाणेच युद्ध संपल्यावर त्याचे सगळे धंदे फसले आणि तो आणि त्याचं लग्न, दोघेही त्याच्या लाईफस्टाईलचे बळी ठरले. अंतिम काळात विविध ज्यू संस्थांच्या वेल्फेअरवर त्यानं दिवस काढले.
    पुण्याई अशी कामी आली म्हणायची!

    ReplyDelete
  11. @निरंजन,
    बरेचदा दुसर्‍याचं कुसळ पाहताना स्वतःचं मुसळही सलू लागतं ते असं. :)

    ReplyDelete
  12. @सुहास,
    क्या खूब कही! :)

    ReplyDelete
  13. शेवटच्या दहा शब्दांत लेखाचे सार आले आहे. माकडे माकडांसारखी जगतात. साप सापासारखा जगतो. हत्ती हत्तीसारखा आणि चिमणी चिमणीसारखी.
    पण माणूस...?
    'थोडक्यात, माणसाचा जन्म घेऊन माणूस बनणंच जगातली सर्वांत कठीण गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही.'

    तुझी निरीक्षणशक्ती इथेही दिसून येते. :)

    ReplyDelete
  14. आपण ज्या परिस्थितीत जगतो, त्याच परिस्थितीतल्या माणसांना आपण पटकन समजून घेऊ शकतो ... त्यांच्यावर आलेले संकट आपल्यावरही येऊ शकत अशी कुठेतरी सुप्त जाणीव असते बहुधा!

    ReplyDelete
  15. अप्रतिम लेख. शिंडलर्स लिस्ट, डिस्ट्रिक्ट-९ ची उदाहरणं अगदी चपखल गुंफली आहेस.

    ReplyDelete
  16. @अनघाताई,
    :) खरं आहे की नाही..

    ReplyDelete
  17. @सविताताई,
    होय. हा मुद्दा पटतो मला!

    ReplyDelete
  18. @हेरंब,
    दोन्ही सिनेमातल्या अंडरलाईंग थीम्समुळेच ते वेगळे ठरतात ना! :)

    ReplyDelete
  19. Anonymous4:46 AM

    बाबा ,अप्रतिम लेख यार ....
    खरच माणसाचा जन्म घेऊन माणूस बनणंच जगातली सर्वांत कठीण गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही..... +१

    ReplyDelete
  20. अप्रतिम लेख..

    ReplyDelete
  21. विभी, लेख छान आहे. ऑस्कर च म्हणण (मी लिस्ट आणि डिस्ट्रिक्ट पाहिलेला नाही, वाचलेलं नाही) आणि कोणताही चष्मा परिधान न करता सामन्य लेवेल वर मांडलेले पोस्टवाल्या मित्राचे विचार उत्तम जुळले!
    लेख मनातल्या वादळांना साद घालणारा! आभारी...

    ReplyDelete
  22. मस्त पोस्ट...जाम आवडली :-)

    ReplyDelete
  23. Anonymous9:47 PM

    mast! :)

    ReplyDelete
  24. लेख सुंदर..पण हि असली माणुसकी बाणवणं मला कदाचित जमणारच नाही हे माहित असल्यामुळे कि काय कदाचित तो माझ्या मनाला भावला नाही.. असो..व्यक्ती तितक्या प्रकृती (आणि तितकी मतं) हे व्हायचंच! इथे भारतात राहत असताना सुद्धा मला अशा लोकांचा रागच येतो. मनापासून आणि प्रचंड! आम्ही (यात माझे सगळेच कुटुंबीय आले) नोकरी व्यवसाय करून लीगली सर्व पद्धतीचे कर (उत्पन्नाच्या काही टक्के) भरत असताना,त्याच पैशांवर अशा निर्वासितांना (३०० स्क्वेअर फुटाची वगैरे वगैरे) घरं दिली जाण्याची घोषणा होते, झोपडपट्ट्या मधून राहणा-या लोकांकडे कलर टीव्ही,बारमाही चोवीस तास पाणी,वीज,बाईक्स ,बरं हे सगळं वापरून गलिच्छपणा तसाच! करदात्यांच्या पैशातून मिळणा-या सबसिडीच्या जोरावर, हे फुकटे एल पी जी वापरणार,पेट्रोल,डीझेल वरच्या गाड्या उडवणार!! आणि आपण नियमानुसार गोष्टी करायला जातो तर शेकड्यांनी सर्विस कर, ही फी,ते चार्जेस.. म्हणजे ऐपत असणा-या लोकांना साधी सहानुभूती पण नाही आणि या असल्या लोकांना लिमिटेड माणुसकीच्या वगैरे वगैरे दृष्टीकोनातून पहायचं!! जमेल असं नाही वाटत... (विद्याधर, हि टीका आपल्या लेखावर नसून विनाकारण सहानुभूती दाखवणा-या प्रवृत्तीवर आहे. राग नसावा!!) बाकी ब-याचश्या प्रतिक्रियांशी अंशतः सहमत!

    ReplyDelete