9/06/2015

बंड - पूर्वार्ध

"जनरल मकसूद आपल्यासोबत आहेत." हसननं फार मोठा गौप्यस्फोट केल्याच्या आविर्भावात सांगितलं.
तो बहुतेक तितकाच मोठा बॉम्बगोळा असावा, कारण सगळेजण त्याच्याकडे अवाक् होऊन पाहू लागले.
"जनरल मकसूद?" कर्नल स्टेफाननं नीट ऐकू आल्याच्या खातरजमा करण्यासाठी पुन्हा एकदा विचारलं. 
"होय." हसन तितक्याच ठामपणे म्हणाला.
"कसं शक्य आहे? आणि तुला कोण म्हणालं?" मेजर मुसाचा अजूनही विश्वास नव्हता. त्याचे दोन्ही हात एकमेकांमध्ये घट्ट गुंफलेले होते. नर्व्हस झाला की सहसा तो आखडून जायचा.
"त्यांची मुलगी माझ्या बहिणीच्या वर्गात होती. त्या दोघींच्या गुप्त भेटी होत असतात. काल ती सांगत होती." हसन नीरगाठ उकलावी तसं सांगू लागला.
"काय सांगत होती नक्की?" मेजर रमज़ान अस्वस्थ झाला होता.
"सांगतो." हसन रॅंकमध्ये इतर सर्वांमध्ये जरी खालचा असला तरी त्याचा प्रत्यक्ष युद्धातला अनुभव आणि त्याचं मोठ्या घराण्यातलं असणं हे त्याचे गुण ह्या गटासाठी फार महत्वाचे होते.
"सैन्याच्या उच्च अधिकार्‍यांमध्ये एका बंडाळीच्या शक्यतेची चर्चा सुरू आहे म्हणे आणि तिचे वडील म्हणजे जनरल मकसूद बंडाळीबद्दल चांगलं बोलत होते. म्हणजे त्यांच्या मते बंडाळी होणं गरजेचं आहे आणि झालीच तर त्यांची पूर्ण सहमती आणि पाठिंबा असेल असं म्हणत होते." हसननं सांगून पूर्ण केलं आणि आपण काहीतरी फार मोठं काम केल्यासारखा चेहरा केला.
"बास? एव्हढंच?" मुसा, रमज़ान आणि स्टेफान जवळपास एकत्रच म्हणाले.
"म्हणजे? अजून काय हवं?" हसन आश्चर्याने म्हणाला, "जनरल मकसूदसारखा सैन्यातला उच्च अधिकारी बंडाळीला समर्थन देईल म्हणतो."
"पण म्हणजे आपल्याला समर्थन देईल असं नाही." मुसा त्याला मध्येच तोडत म्हणाला. "ह्या सगळ्या कुटुंबासमोर बोलायच्या गोष्टी असतात. आपला पुरोगामी, मवाळ चेहरा दाखवायला."
"प्रत्यक्षात आपण पकडले गेलो, तर फायरिंग स्क्वॉडसमोर आपल्याला फेकताना दोनदाही विचार करणार नाही तो." स्टेफान मुसाचं वाक्य पूर्ण करत म्हणाला.
"असं कसं रे. इतका विरोधाभास?"
"हसन, तू युद्धभूमीवर लढलायस. आम्ही मिलिटरी उच्चालयातली राजकारणं रोज बघतो. आणि आपल्याकडे तर काय, सत्ताही मिलिटरीच्याच हातात. फार विषारी समीकरण आहे हे." रमज़ान समजावणीच्या सुरात म्हणाला.
-----

"ह्म्म!" किरणच्या एव्हढ्याच प्रतिक्रियेनंतर सगळे त्याच्याकडे पाहू लागले. त्याच्या पुढच्या शब्दांकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं. "हे इंटरेस्टिंग वाटतंय खरं. पण आपल्याकडे मिलिटरी नॉलेज अजून जास्त असलेला एखादा मनुष्य हवा. नाहीतर मग विश्वासार्हता थोडी कमी पडेल. मग ह्या कथेतलं प्रत्येक कॅरॅक्टर वेगवेगळं डेव्हलप करून एक पटकथा आकार घेऊ शकते."
अश्विन आणि राजेशनं माना डोलावल्या. पण नरेंद्र त्याच्याच विचारांमध्ये होता.
"नरेंद्र?" आपल्या बोलण्याकडे त्याचं लक्ष नसावं असं समजून किरणनं त्याला भानावर आणायचा प्रयत्न केला.
"हां. कळलं मला तुला काय म्हणायचंय ते. पण मला असं वाटतं की मिलिटरी ॲस्पेक्ट फारसा सखोल नसला तरी फार फरक पडणार नाही. आजूबाजूची परिस्थिती, सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक ती दर्शवणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्यामध्ये आपल्याला अश्विन आणि त्याचा मित्र डिसूझाची जास्त मदत होईल कारण ते दोघेही सिरियात राहून आलेले आहेत."
"पण आपण सिरिया रेफरन्स का घेतोय?" किरण
"कारण आपल्याकडे फर्स्ट हँड माहितीचा सोर्स आहे."
"पण असली पटकथा कशाला लिहायची ज्याचा आपल्याशी दूरान्वयानेही संबंध नाही?" राजेश
"अरे ही फक्त पहिली स्टेप आहे. पटकथेमध्ये अजून लेअर्स आहेत. ही पटकथा लिहीणार्‍यांची कथा हाच चित्रपटाचा मूळ गाभा असेल."
"म्हणजे?" बाकी तिघेही गोंधळून गेले.
"म्हणजे, 'मिलिटरी कू" ह्या विषयावर पटकथा लिहिणार्‍या दोन पटकथालेखकांच्या मनस्थितीवर आणि खाजगी आयुष्यावर त्या प्रोसेसचा कसा परिणाम होत जातो, असं काहीसं माझ्या डोक्यात आहे." नरेंद्र एक एक शब्द जपून म्हणाला.
बाकी तिघेही एकमेकांकडे पाहू लागले.
"मला ठाऊक आहे तुमच्या मते हा वेडगळपणा वाटतोय ते, पण आपण चर्चा करू, जर वेडेपणा वाटला तर नवा काहीतरी विचार करू. मग तर झालं?" नरेंद्र म्हणाला.
बाकीच्यांनी तात्पुरत्या माना डोलवल्या.
-----
"आपण आधी सगळ्या पात्रांची यादी करूया का?" अश्विनने प्रस्ताव मांडला. तो लगेच मान्य झाला.
"हसन, रमज़ान, मुसा, स्टेफान आणि मकसूद." राजेशनं जंत्री केली.
"हसनची बहिण आणि मकसूदची मुलगी?" किरणचा प्रश्न.
"माझ्या मते त्यांचा विचार नंतर करावा, कारण जेव्हढी कमी मध्यवर्ती पात्रं घेऊ, तितकी ती जास्त चांगली रेखाटता येतील." अश्विन म्हणाला.
"मान्य. मग ह्यातली कमी जास्त वाईट कोणती?" किरण म्हणाला.
"एक मिनिट किरण." नरेंद्र मध्येच म्हणाला. "काय म्हणालास तू?"
"कमी जास्त वाईट."
"इंटरेस्टिंग पॉईंट ऑफ व्ह्यू." नरेंद्र विचार करत म्हणाला. "ही पात्रं निर्माण करणारी माणसं आपोआपच स्वतःचे अनुभव, निरीक्षणं आणि दृष्टीकोन पात्रांमध्ये उतरवत असतात. जर आपण ही पात्रं तुझ्या हातून निर्माण केली, तर तू ती कमी-जास्त वाईट बनवशील, अश्विन त्यांना कमी-जास्त चांगलं बनवेल, मी काहीतरी अजून वेगळं करेन."
"तुला म्हणायचं काय आहे?" किरण आपले हात एकमेकांमध्ये गुंफत म्हणाला. "माझा दृष्टीकोन चांगला नाहीये का पात्रांकडे पाहायचा?"
"नाही, नाही. उलट तुझ्यामुळे मला आपल्या उर्वरित दोन मध्यवर्ती पात्रांकडे पाहायची कल्पना मिळाली."
"पटकथालेखकांची?"
"होय. सध्या आपण त्यांना अ आणि ब म्हणूया." 
"पण त्यांचा विचार आधी करून काय होणार?" राजेशनं शंका काढली.
"होणार असं की, पटकथेतली मध्यवर्ती पात्रं ही त्या दोघांच्या अनुभवांतून, निरीक्षणांतून, आर्थिक-सामाजिक-राजकीय जडणघडणीतून निर्माण होणार आहेत, त्यामुळे ती पात्रं सहज उभी करण्यासाठी अ आणि ब नीट उभे केले की झालं!" अश्विनने मध्येच उत्तर देऊन टाकलं.
नरेंद्रनं विजयी मुद्रेनं अश्विनकडे पाहिलं. "ग्रेट. हळूहळू आपण सर्वजण एका पानावर येतोय तर."
-----
"अ चा सैन्याशी काहीतरी संबंध असायला हवा." व्हाईटबोर्डवरती वर्तुळ काढून त्यात मधोमध 'अ' लिहित राजेश म्हणाला. "तसा 'ब' चा असला तरी चालेल."
"दोघांपैकी एकजण तरी कट्टर विचारसरणीचा असायला हवा. नाहीतर मग सैन्याचं बंड आणि ते ही इस्लामिक देशांमध्ये असा विषयच येणार नाही." किरणनं आपला मुद्दा मांडला.
"मला पटत नाही. कट्टरतावाद आणि हा विषय ह्यांचा बादरायण संबंध जोडतो आहोत आपण. उलट मला तर वाटतं, एखादा कम्युनिस्ट विचारसरणीचा मनुष्यच असले विचार करू शकतो." राजेश म्हणाला.
"आपण भरकटतोय, एकमेकांच्या विचारसरणीवर अप्रत्यक्ष टीका करण्यापेक्षा आपण अ आणि ब ला विचारसरणी बहाल करूयात का?" नरेंद्र म्हणाला.
"अरे पण तेच होणार ना, आपली विचारसरणी आपण बनवत असलेल्या पात्रांमध्ये प्रतिबिंबित होणारच ना."
"होऊ देत, पण पात्रं प्रेडिक्टेबल नकोत. कुणीही कायम कट्टरतावादी किंवा कायम कम्युनिस्ट नसतो. एकेका क्षणीच्या व्यक्त होण्यानं माणसांना लेबलं लागतात आणि मग माणसांच्या वागण्याप्रमाणे लेबलं नाहीत तर लेबलांप्रमाणे माणसं वागू लागतात." नरेंद्रनं त्याची मांडणी केली.
"हम्म" अश्विननं सुस्कारा सोडला. "मग काय ठरतंय. एक बेसलाईन विचारसरणी दिलीच पाहिजे की नाही?"
"माझ्या मते नको. मग त्यांची डेव्हलपमेंट त्याच नजरेतून होत राहील."
"नरेंद्र, आपण पटकथा लिहितोय. कादंबरी नाही. कुठेतरी बंधनं घालून घेणं भाग आहे."
"ठीक आहे. बेसिक लेव्हलवर एक एक दिशा निश्चित करू मग त्या आधारे त्यांची पार्श्वभूमी वगैरे ठरवू."
"अ एक आनंदी, आशावादी आणि आयुष्यात खूप काही करण्याची महत्वाकांक्षा असलेला असू शकतो आणि ब थोडा वास्तववादी, आयुष्यात बरंच काही पाहिलेला आणि थोडासा निराशावादी असू शकतो." राजेशनं बोर्डवर लिहायला सुरूवात केली.
"म्हणजे एक लहान मूल आणि एक प्रौढ. मानसिकदृष्ट्या. भावनिकदृष्ट्या." नरेंद्रनं निष्कर्ष काढला.
"हम्म. म्हणू शकतो तसं." किरणनं दुजोरा दिला. "आता ते असे का झाले असतील?"
"ब हा सैनिकी पार्श्वभूमीचा असू शकतो. एखाद्या लढाईचा किंवा तत्सम अनुभव आल्यानंतर माणूस वास्तववादी आणि निराशावादी एकत्रच होऊ शकतो." अश्विन म्हणाला.
"तो एकतर कारगिलमध्ये लढलेला असेल किंवा मग सीआरपीएफ मध्ये वगैरे असेल आणि नक्षलवाद्यांशी लढला असेल." राजेशनं मत मांडलं.
"सीआरपीएफ ठीक आहे. कारगिल फार क्लिशे वाटू शकतं. आणि आपल्याकडे नक्षलवाद्यांशी लढणारे फारसे हायलाईट होत नाहीत." नरेंद्रनं आपलं वजन टाकलं.
"ठीक. मग तो वयाच्या पस्तिशीजवळ असेल, नाहीतर मग ते अनुभव पुरेसे मॅच्युअर्ड वाटणार नाहीत." किरण
"आणि अ?" अश्विन.
"आधी ब. संपवूया का? गोंधळ होत राहील नाहीतर." किरणनं त्याला मधेच तोडलं.
"नाही. जसं जुळत जाईल तसं जाऊ दे. नाहीतर मग पात्रांमधली डिपेन्डन्सी निर्माण होणार नाही. थोडी कृत्रिम वाटतील पात्रं." नरेंद्र. "अ आणि ब ला जोडणारा धागा काय असू शकतो?"
"सिनेमाचं प्रेम?" राजेश
"नाही. ते फार सोयीचं आहे. त्या नात्यात थोडा तणावही हवा. नाहीतर मग पटकथेमुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यांमध्ये उलथापालथ होणारच नाही." नरेंद्र
"ह्म्म. मग बालपणीचे मित्र? किंवा कॉलेजातले मित्र?" किरण
"नको."
"कन्सल्टंट?" अश्विननं एकदम वेगळाच स्पिन दिला.
"म्हणजे?" नरेंद्रला उत्सुकता जाणवू लागली.
"म्हणजे, अ एक पटकथा लेखक आहे, ज्याला परदेशात ही कथा पाठवायची आहे, पण ऑथेन्टिसिटीसाठी त्याला सल्लागार हवाय आणि तो म्हणजे ब. ब ला मनापासून फार रस नाहीये, पण मिळणारे पैसे महत्वाचे आहेत." अश्विननं एकाच दमात सांगून टाकलं.
नरेंद्रनं मुद्दाम आपलं मत व्यक्त केलं नाही, नाहीतर मग सगळं त्याच्या मनाप्रमाणे होतं अशी तक्रार लोकांच्या मनात निर्माण व्हायची त्याला भीती होती.
किरण आणि राजेशनं एकमेकांकडे पाहिलं आणि मग नरेंद्रकडे पाहिलं. खोलीभर एक शांतता भरून राहिली. अश्विननं राजेशकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. राजेशनं मान डोलावली आणि मग किरणनंही सहमती दर्शवली. नरेंद्रनं सुटकेचा निश्वास टाकला.
"बेस्ट. आपल्याकडे एक बेसलाईन तयार झालीये. आता ह्यांच्यामध्ये रंगणारे सीन्स ठरवले पाहिजेत." नरेंद्र पुढे म्हणाला.
-----
नरेंद्रनं चहाचा कप उचलून धुवून ठेवला आणि परत टेबलापाशी येऊन बसला. सायली दुरूनच त्याचा आविर्भाव पाहत होती. तिनं स्वतःशीच एक सुस्कारा सोडला आणि परत भाजी चिरण्यामध्ये मग्न झाली. नरेंद्रनं तिच्याकडे पाहिलं तेव्हा ती भाजी चिरण्यात मग्न होती. तिच्या चेहर्‍याचा रंग उडालेला होता. लग्नापूर्वी उत्फुल्ल आणि आनंदी असणारी सायली उदास कधी झाली आणि विझून कधी गेली हे त्याला कधी जाणवलंच नाही असं नाही, पण त्यानं तिकडे दुर्लक्ष केलं होतं हे नक्की.
तिनं संसार चालवायचा आणि त्यानं त्याचं आवडतं काम, लेखन करायचं असा एक अलिखित करार होता त्यांच्यात, पण तशी कधी वेळ येणार नाही असा त्याचा एक ठाम विश्वास होता. सुरूवातीला त्यानं मालिकांसाठी लेखन करून चार पैसेही आणले होते, पण मग तेच तेच रटाळ पाणी घालणं त्याच्याच्यानं होईना. सायलीच्या मते, सिरीयलचे रेटिंग पडल्यामुळे निर्मात्यांनी त्याला काढून टाकलं होतं, पण त्याला ते आजही मान्य नव्हतं. कसंही असलं तरी एकंदरित तो अयशस्वी होता.
कॉलेजात असताना संपूर्ण साम्यवादी मित्रगटामध्ये, एकमेव भांडवलवादी असलेला तो, भांडवलशाहीची शिक्षा भोगत होता आणि त्याचे सर्व साम्यवादी मित्र, शिक्षणानंतर नोकरीस लागून भांडवलशाहीतला आनंद भोगत होते. ह्या विरोधाभासावर त्यानं जेव्हाही विनोद केला होता, तेव्हा तेव्हा सायली हसली होती. पण सुरूवातीचीच काही वर्षं. नंतर तिनं त्याच्याशी बोलणंही जवळपास बंदच केलेलं होतं. त्याला लेखनातून पैसा हवा होता, कुटुंबासाठी सुखसोयी हव्या होत्या, पण प्रत्यक्षात अनुभव विचित्रच आला होता. त्याचा स्वतःच्या लेखनावर पूर्ण विश्वास होता, पण कुठेतरी काहीतरी अडत होतं. काय, ते त्याला कळत नव्हतं. सायलीची नोकरी हा त्या गुदमरलेल्या संसारातला एक्झॉस्ट फॅन होता आणि त्या बळावरच ते दोघे दिवस ढकलत होते.
त्याक्षणीदेखील त्याला तिच्या चेहर्‍याकडे पाहताना त्या घुसमटीची धग जाणवली आणि त्याचं काळीज हललं. 'जर ह्या पटकथेचा प्रयोगही फसला, तर मात्र काहीतरी नोकरी करावीच लागेल.' त्यानं मनाशी विचार केला. 'मी तिला गमावू नाही शकत. की मी आधीच तिला गमावलंय?' नेहमीप्रमाणे प्रश्न-प्रतिप्रश्नांच्या आवर्तात तो शिरू लागला आणि त्यानं सारे विचार झटकले. घड्याळात पाहिलं आणि समोर पडलेले सगळे कागद गोळा केले.
"मला उशीर होईल गं परत यायला. अन्न फ्रीजमध्ये ठेवून दे." पायात चपला अडकवत बाहेर पडत तो म्हणाला. तिची प्रतिक्रिया बघण्याची त्याची इच्छा नव्हती की हिंमत हे त्यालाही ठाऊक नव्हतं.
----
क्रमशः

1 comment:

  1. भारीच !
    Homeland च्या धर्तीवर असेल का पुढचा भाग !! :D
    लवकर टाक रे !

    ReplyDelete