तुम्ही ‘मेकिंग
अ मर्डरर’ पाहिलंय? नाही पाहिलं असलंत तरी हरकत नाही. माझी गोष्ट फार नाही, पण थोडीशी
त्या वळणाने जाते. स्टीव्हन एव्हरी, अमेरिकेमध्ये एका गावातला एक सामान्य माणूस, ज्याच्या
नावावर दोन चार घरफोड्या आहेत, तो बलात्काराच्या आरोपाखाली पकडला जातो आणि अठरा वर्षें
जेलमध्ये काढतो. प्रत्यक्षात त्याने गुन्हा केलेलाच नसतो. पण एकदा पूर्वग्रहातून त्याला
पकडल्यानंतर आपला निर्णय खरा ठेवण्यासाठी संपूर्ण पोलिस प्रशासन त्याला गुन्हेगार सिद्ध
करण्यासाठी जंग जंग पछाडतं आणि शेवटी अठरा वर्षांनी त्याची डीएनए पुराव्यामुळे त्याची
सुटका होते.
माझ्या कथेमधला
स्टीव्हन एव्हरी आहे भैरप्पा. एक सामान्य कानडी मनुष्य. मुंबईत चरितार्थासाठी आलेला.
छोट्याशा टपरीवर काम करायचा. पहाटे उठून चहा आणि बटाटा वड्यांची तयारी सुरू करायची.
मग पार दुपारी दीड-दोनपर्यंत चहा, वडा तळून झाले की अर्धा तासाचा ब्रेक. त्यामध्ये
तो थोडंसं पोटात ढकलून आडवं पडायचा. मग पुन्हा रात्री दहापर्यंत तेच. हाच दिनक्रम आठवड्याचे
सातही दिवस. महिन्यातून एक दिवस रविवारची सुट्टी. तेव्हढंच टपरीवर सगळ्यांनाच आराम.
आता शनिवार रात्री अंग मोडून काम केल्यावर हा दुसरं काय करणार? टाकायचा दोन चार देशीचे
क्वार्टर आणि पडायचा कुठेतरी रस्त्याच्या कडेला.
त्या विलक्षण
दिवशीसुद्धा त्यानं हेच केलं. रात्री ११.३० च्या आसपास भैरप्पा मोकळा झाला. गाडी आवरून
टाकली. काम करणारा एक मणिपूरचा पोर्या होता तो त्याच्या गाववाल्यांसोबत त्यांच्या
अड्ड्यावर निघून गेला. टपरीचा मालक चक्कर टाकून गल्ल्याचा हिशोब करून गेला. मालक कसला,
गुंडच तो. सगळी मेहनत भैरप्पाचीच, पण पोलिस सेट करणे, सार्वजनिक जागेवर कब्जा, इत्यादी
‘धंदेवाईक’ गोष्टी तो बघत असल्यानं तो मालक.
भैरप्पानं विडी
शिलगावली आणि तो अंधेरी स्टेशनपासून थोड्याच दूर असलेल्या नेहमीच्या ठरलेल्या झोपडपट्टीकडे
निघाला. एकमेकांना चिकटून असलेली घरं सराईतप्रमाणे ओलांडत तो ठरलेल्या घराजवळ आला आणि
त्यानं दार वाजवलं. त्या छोट्याशा झोपडीचा दरवाजा उघडल्याबरोबर देशीचा उग्र भपकारा
आला आणि भैरप्पाचा जीव सुखावला.
दुसर्या दिवशी
सकाळी भैरप्पा उठला तो थेट रॉयल पॅलेस हॉटेलच्या खोली क्रमांक १०२ मध्ये. विवस्त्र
अवस्थेत. तो स्वतः बेडवर होता आणि बेडशेजारी जमिनीवर एक बाई पडलेली होती. भैरप्पा घाबरला.
कधीमधी दारू पीत असला, तरी होता पापभीरू. गावाकडे लग्नाची बायको, म्हातारी आई आणि पोटची
पोरगी. हे आपण काय करून बसलो, असा विचार करतानाच भैरप्पाचं लक्ष त्या बाईच्या डोक्याकडे
असलेल्या रक्ताच्या छोट्याशा धारेकडे गेलं आणि तो हबकलाच. त्याला आदल्या रात्रीचं काही
म्हणजे काही आठवत नव्हतं. धडपडत उठत त्यानं कपडे घातले आणि तो जवळ जाऊन ती जिती आहे
का मेली ते पाहायला लागला आणि एकदम तिनं हालचाल केली. ती बेशुद्ध असावी असा विचार करून
भैरप्पा माणुसकीच्या नात्यानं आजूबाजूला पाणी सापडतं का बघू लागला. तोवर ती बाई – चंद्री
– उठून बसली आणि तिनं आवाज केला.
पुढे माणसं
गोळा झाली, पोलिस आले आणि भैरप्पा बलात्काराच्या आरोपाखाली आत गेला.
हे सगळं मी
तुम्हाला का सांगतोय. तर मी अद्वैत. अद्वैत फुरसुंगीकर. रिपोर्टर म्हणवतो स्वतःला.
क्राईम बीटला आहे. छोट्यामोठ्या गुन्हेगारांना ब्लॅकमेल करून पैसे कमवायचे हा सगळ्यात
मोठा उत्पन्नाचा मार्ग. बाकी मात्र पत्रकार पेशाबद्दल प्रचंड अभिमान वगैरे बाळगतो.
कधीतरी प्रेस क्लबमध्ये आपला सत्कार व्हावा अशी इच्छा बाळगून असतो. दिवसाची रात्र आणि
रात्रीचा दिवस. सर्व काही एकच आपलं. नाही नाही, मी ‘नाईटक्रॉलर’ वगैरे सारखा सायको
नाही. सामान्य पत्रकार. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन शिकल्यावर फार हुशार नसलेल्यांनी
करायचं काम करू लागलो. लागेबांधे नाहीत, ओळखी नाहीत आणि फार ब्राईट नाही, त्यामुळे
क्राईम बीट मिळाली. दुसरा ऑप्शन पेज थ्री होता. तेव्हा फार धडाडीच्या पत्रकारितेचं
भूत सवार होतं म्हणून ते सोडून हे करू लागलो. अर्थात पेज थ्री मिळालेला सहकारीही रडतच
असतो. जाऊ दे त्याचं रडगाणं तुम्हाला कुठे सांगत बसू, ती वेगळी कथा होईल.
तर मी क्राईम
बीट असल्यामुळे पोलिस स्टेशनं हा बातम्या मिळवायचा महत्वाचा अड्डा.
तुम्ही कधी
पोलिस स्टेशनला गेला आहात? म्हणजे कुणावर वेळ येऊ नयेच उगाच, पण सहज गंमत म्हणून? बरोबर
आहे, गंमत म्हणून पोलिस स्टेशनला कोण जाईल. पासपोर्टवर सह्या घेण्यापुरता मध्यमवर्गाचा
आणि पोलिस स्टेशनचा संबंध. तिथे पण पोलिस असा हिसका दाखवतात की खरा गुन्हा घडला असेल
तर काय चालत असेल, असाच बहुतांश मध्यमवर्गीयांचा ग्रह असतो. तो बरोबर देखील आहे म्हणा.
पण पोलिस असणं म्हणजे काय, हे पाहायचं असेल तर बसा एकदा पोलिस स्टेशनात सकाळपासून संध्याकाळपर्यंत.
रात्रीपर्यंत म्हणणार होतो, पण ते जरा जास्त होईल.
एका भाजीवाल्याने
दुसर्याची गाडी उधळली, किंवा १०० रूपये चोरले, इथपासून ते, मोबाईल हरवला, पाकीट हरवलं,
रिक्षाने धडक दिली, छेडछाड, विनयभंग असे काय वाट्टेल ते गुन्हे नोंदवायला लोक येतात.
गुन्हा नोंदवणं, म्हणजे फाईल उघडणं. ती बंदही करावी लागते. पाकीट हरवलं, किंवा चोरीला
गेलं, ह्याची फाईल उघडणं कितपत मानवेल मला सांगा? पुन्हा भाजीवाल्यांची भांडणं अवलीच.
थेट पोलिसात येतात अन रात्री एकाच देशी गुत्त्यावर बसून सहा जण एका १० बाय १० च्या
खोलीत झोपतात. विनयभंग किंवा छेडछाडही बरेचदा सूड उगवण्यातून असते. कित्येक लोक फक्त
वस्तू हरवल्याचा रिपोर्ट करायला येतात, कारण त्यांना ऑफिसात प्रूफ द्यावं लागतं वस्तू
खरंच चोरीला गेलीय म्हणून. ह्या केसेस पोलिसांना आवडतात कारण करायचं काहीच नसतं. आणि
हे सगळे तण बरं का, मोठे गुन्हे, खून, दरोडे, बलात्कार हे होतच असतात आणि विविध पार्ट्या
(गुन्ह्याशी संबंधित) आपल्या ओळखी वापरून कामकाजासाठी तपासावर दबाव टाकत असतात. पुन्हा
पोलिसांनीच येता जाता छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये पैसे घेण्याची संस्कृती निर्माण करून
ठेवलीय, मग अशा वेळेस हे नको तसे घेतलेले उपकार अंगाशी येतात. पण महत्वाचं ते सर्व
नाही.
मी रात्री अपरात्री
जाऊन पोलिस स्टेशनला बसतो आणि हे सर्व पाहत राहतो. एखादा मजेदार गुन्हा नोंदवायचा,
अन मग हवालदाराला किंवा गुन्हा नोंदवणार्यालाच चार पैसे देऊन डिटेल्स मिळवायचे. एखादी
सुटलेली केस घ्यायची अन छापायची. रंगतदार गुन्हा निवडणंसुद्धा कर्मकठीण. मुळात आमचा
पेपर फडतूस. त्याच्या मुख्य बातम्या कुणी वाचत नाही, क्राईम बीट कोण वाचेल. पण माझा
अंदाज चुकलाच.
मी भैरप्पाची
न्यूज गंमत म्हणूनच दिली होती. पण प्रकरणाने चांगलीच हवा पकडली. १२ वर्षांच्या खटल्यानंतर
भैरप्पाच्या बलात्काराच्या खटल्यात नवं वळण आलं होतं. मुळात मुंबईसारख्या ठिकाणी जिथे
असंख्य बकाल वस्त्या आहेत, तिथे अनेक असे गुन्हे होतात जे मेनस्ट्रीम मीडियामध्ये येत
सुद्धा नाहीत. मीडियामध्ये फक्त विकतं तेच दाखवलं जातं. निर्भया प्रकरण झालं नसतं,
तर छापल्या गेलेल्यातल्या अर्ध्यासुद्धा बलात्काराच्या बातम्या पेपरांमध्ये आल्या नसत्या.
असो. तर मुद्दा तो नाही.
मला एका हवालदारानं
चहा पिता पिता भैरप्पाची केस सांगितली. पस्तिशीचा भैरप्पा आत गेला आणि पन्नाशीला आला
होता. पोलिसांनी त्याला हॉटेलातनं उचलला होता पण तो तिथे कसा पोचला हे त्याला कधीच
सांगता नाही आलं. बाई तिथून पळाली ती थेट दोन दिवसांनी उगवली होती. पोलिसांनी फक्त
बघ्यांच्या सांगण्यावरून भैरप्पाला आत टाकलं आणि गरीबाचा जामिन कोण देणार, त्यामुळे
तो पुढची चक्र फिरेपर्यंत आतच राहिला. बलात्कार झाल्याचं फॉरेन्सिकमध्ये ७०% मान्य
होत होतं, पण दोन दिवस गेल्यामुळे कोण हे स्पष्ट होत नव्हतं. भैरप्पाला स्थितीजन्य
पुराव्यांवरून अन बाईच्या जबानीवरून कोंडलं गेलं. पुढच्या केसेस लढायला पैसे नाहीत,
अन गावाकडच्यांनी नुसते आरोप ऐकूनच पाठ फिरवलेली. अशा स्थितीत भैरप्पा आतच सडला. केसचा
निकाल कधी लागलाच नाही. नुसत्या तारखा पडत राहिल्या. एक दिवस बाई गायब झाली अन मग तर
काय. भैरप्पाचा स्वतःचाच सुटकेतला इंटरेस्ट संपला.
अचानकच एक दिवस
चंद्री पोलिसांच्या तावडीत सापडली. कुठल्याशा हायवेवर लिफ्ट मागून लुटणार्या टोळक्यासोबत.
अन संबंधित इन्स्पेक्टरने सिस्टममध्ये सहज शोध घेतल्यावर त्याला ही केस सापडली. त्यानं
इथल्या ऑफिसरला कळवलं आणि इन्स्पेक्टरने हवालदाराला.
इथेच कथेमध्ये
माझा प्रवेश होतो.
मी म्हटलं ना
माझा अंदाज चुकला. आमचा पेपर लोक क्राईम बीटसाठीच वाचतात ह्याचा साक्षात्कार मला झाला,
जेव्हा माझ्या पाच ओळींच्या बातमीसाठी मला ५ थोड्या मोठ्या पेपरांच्या क्राईम बीटवाल्यांचे
फोन आले. मी सहसा बातमीमध्ये फार ओळखदर्शक माहिती देत नसे, त्यामुळे माझी किंमत थोडी
वाढली होती. अर्थात, हे सगळे क्राईम बीट पत्रकार होते, पोलिसांकडून यथासांग माहिती
काढण्यास त्यांना फार वेळ लागला नसता. दोन चार नोटा जास्त गेल्या असत्या एव्हढंच. त्यामुळे
मी चान्स घेतला आणि माझ्या नावासकट बातमी छापण्याचा आग्रह धरला. मला तेव्हढेच चार दोन
चॅनेल्सवर इंटरव्ह्यू द्यायला मिळाले.
पण भैरप्पाचं
काय? केस अजून सुरूच होती. मी चंगच बांधला होता आता भैरप्पाला सोडवायचा. एक प्रसिद्धीलोलुप
वकीलही फुकटात केस लढवायला तयार झाला. पण तरी केसचा खर्च हा होतोच. कोर्टाच्या फीया,
शेकडो कागदपत्रं. कोर्ट ही संकल्पना सामान्य माणसासाठी अजिबातच नाहीये हे प्रत्येक
पावलागणिक कळत जातं. अर्थात मला हे सगळं करायला अजिबात वेळ नव्हता. मला फक्त लोकांचा
केसमधला इंटरेस्ट टिकवून ठेवायचा होता आणि भैरप्पाला ॲक्सेस मिळवायचा होता. मी एक एनजीओ
गाठला. पुरूषांच्या प्रॉब्लेम्ससाठी काम करणारे आणि अर्थात काळ्याचा पांढरा करणारे.
मी त्यांना केस पटवून दिली आणि त्यातल्या प्रसिद्धीचा ॲन्गल नीट समजावून दिला. पैशाचा
प्रश्न सुटला. मी आता एकमार्गी भैरप्पावर कॉन्सन्ट्रेट करायला मोकळा झालो.
-----
माझं खरं नाव
काय हे मला कधीच कळलं नाही. लहानपणापासून ‘चंद्री’ एव्हढंच ऐकत आले. ते चंद्रभागा आहे
की चंद्रिका, की अजून काही, ते बहुतेक मला कधीच कळणार नाही. माझा जन्म नेमका कुठे झाला
हे ही मला ठाऊक नाही, कारण तो कुठे आणि कसा झाला हे माहित असणारं कुणीच मी मोठी होताना
माझ्या जवळ नव्हतं. मी बहुतेक चोरलेलं बाळ होते. कुठून कुठे अन कशी आले, पण शेवटी धंदा
करणार्यांमध्येच लहानाची मोठी झाले. तेव्हढा एकच धंदा ठाऊक होता. त्यातच पडले.
मला कल्पना
आहे की तुम्हाला फक्त त्या रात्री नक्की काय घडलं, त्यातच रस आहे, पण मागचं पुढचं समजल्याशिवाय
जे घडलं ते कसं अन का घडलं ते कळायचं नाही तुम्हा लोकांना.
तर मी धंदेवाली.
मध्यमवर्गीयांना अस्वस्थ करणारा शब्द आहे हा. पण पब्लिकमध्ये. प्रायव्हेटमध्ये हल्ली
अस्वस्थ करणारं काहीच उरलेलं नाहीये. हे मी तत्व का काय ते नाही सांगत, अनुभव आहे,
त्याप्रमाणे सांगतेय. असो. तर माझं काम ठरलेलं. संध्याकाळ झाली की एक एरिया. मग जसजशी
रात्र होत जाईल, तसतसं मेन रोड्सच्या दिशेनं सरकत जाणं. दिवसभर श्रमाचं काम करून आलेले
कष्टकरी हे मेन कष्टमर. अतिशय अवघड जमात. पैसे द्यायची फार किचकिच. त्यामुळे आधीच पैसे
घ्यायचे. त्यात ते कष्टकरी, हाणामारी, शक्तीचे प्रयोग, कशाचा भरवसा नाही. पण फार सुंदर
नसल्यामुळे हीच एक कॅटेगरी. पण ते सर्व महत्वाचं नाही.
महत्वाचं हे,
की त्या रात्रीसुद्धा मी अशीच स्टेशनरोडजवळ फेर्या मारत होते. तेव्हा अनुप आला. नाही
नाही. अनुप म्हणजे माझा दलाल नव्हे. असल्या स्टोर्यांमध्ये नेहमी एक दलालाचं कॅरेक्टर
असतं. आमचाही होता, पण तो अनुप नाही. अनुप म्हणजे माझा लव्हर म्हणता येईल.
मितभाषी. भैय्या.
दादरला भाजी मार्केटमध्ये हमालीचं काम करतो. यूपी नाहीतर बिहार कुठलातरी आहे. मला आवडायचा
तो खूप. सगळ्यांत साधा होता. अर्थात धंदेवालीकडे यायचा म्हणजे तितकाही साधा नव्हता,
पण त्रास द्यायचा नाही फार. आणि मुख्य म्हणजे मला ह्यातनं सोडवावं वगैरे त्याला काही
वाटायचं नाही. पण त्या रात्री त्याचा काहीतरी वेगळा मूड होता. मला म्हणाला आज खूप पैसे
मिळालेत. आज हॉटेलवर जाऊया. मला आश्चर्य वाटलं. एरव्ही त्याच्या झोपडीशिवाय त्याच्याकडे
झोपायला जागा नव्हती. घरी पाठवून उरलेले पैसे माझ्यावर उडवायला जीवावर यायचं त्याच्या.
पण त्यानं पैसे दिले आणि मला काही फार प्रश्न विचारावेसे वाटले नाहीत.
आम्ही हॉटेल
रॉयल पॅलेसवर पोचलो तेव्हा रात्रीचे बारा वाजत आले असावेत. त्यानं रिसेप्शनला बोलणी
केली आणि रूम मिळवली. तिथे माझ्यासारख्या इतरही बर्याच तरूणी होत्या, त्यामुळे मला
फार अवघडल्यासारखं वाटलं नाही. आम्ही रूम नंबर १०२ मध्ये गेलो. गरजेपुरत्या गोष्टी
असलेली सामान्य रूम होती. एक विचित्र वास सर्वत्र भरलेला होता. मी इतक्या सार्या गलिच्छ
ठिकाणी राहिलेली आहे की त्या वासाचं फार वेगळं काही वाटलं नाही. मी तिथल्या बेडवर जाऊन
बसले. अनुप म्हणाला पटकन जाऊन विड्या घेऊन येतो आणि मला एकदम झोप आल्यागत झालं. मी
तिथेच आडवी झाले.
बस. त्या रात्रीचं
तितकंच आठवतं मला. जाग आली तेव्हा समोर भैरप्पा होता आणि माझे कपडे अस्ताव्यस्त. अंग
आणि डोकं प्रचंड दुखत होतं. मला अनोळखी माणूस समोर दिसल्यावर जे वाटेल तेच मी केलं.
ओरडले. अर्थात दिवसही चढला होता. पोलिसांनी हटकून पकडलं असतं मला बाहेर पडल्यावर. त्यामुळे
सोयीचं अन सोपं जे होतं ते केलं. भैरप्पा भीतीदायक वाटत नव्हता, त्याच्याकडून पैसे
घेऊनही बाहेर पडता आलं असतं. पण कशाला घोळात जा.
पण मला वाटलं
होतं तितकं सरळ सोपं नव्हतं काहीच. माझा दलाल मुश्ताक कसा कुणास ठाऊक पण तिथे पोचला
आणि मला घेऊन चटकन गायब झाला. लोक भैरप्पाला मारत होते आणि नंतर पोलिस आले. प्रकरण
उगाच वाढलं. मला अजिबात पोलिसांत जायची इच्छा नव्हती. झालं ते झालं. मला काही झालं
नव्हतं. पण अनुपलाच आयडिया सुचली. अरे हो. पण अनुपचं काय झालं हे मी तुम्हाला सांगितलंच
नाही ना.
अनुपच्या म्हणण्यानुसार
अनुप खाली उतरला आणि विडीच्या दुकानापर्यंत गेला तर त्याचा मित्र त्याला भेटला. अनुप
हॉटेलवर आलाय ह्याचा सुगावा लागल्यावर त्या मित्रानं ह्याला मारलं आणि पैसे काढून घेऊन
पळून गेला. अनुप तसाच विव्हळत बेशुद्ध झाला रस्त्याच्या कडेला. आता, तिथल्या भागात
बरेच बेवडे रस्त्याच्या कडेला पडलेले असतात, त्यामुळे कुणालाच संशय येत नाही. अनुपला
जाग आली थेट दुसर्या दिवशी. पण गर्दी अन पोलिस बघून तो सटकला.
तर त्याची आयडिया
अशी होती की पोलिसात गेले तर ह्या धंद्यातून बाहेर पडायचा चान्स आहे. मी मगाशी म्हणाले
होते की त्याला ह्या सर्वाचं काही पडलेलं नव्हतं, पण त्याला स्वतःला काही करायचं नव्हतं.
पाहुण्याच्या काठीनं साप मेला तर त्याला हवंच होतं. असो. मला तो आवडायचा आणि आयडिया
वाईट नव्हती. त्याच्या ओळखीतल्या एका बलात्कारित बाईला एका एनजीओ नं म्हणे मदत केली
होती. शिलाई मशीन घेऊन दिलं होतं अन झोपडीचं दोन महिन्यांचं भाडं. ह्याची आयडिया होती
की त्यांना गाठायचं आणि पैशांची सोय करायची.
त्याची आयडिया
सफलही झाली. मला एक नवंकोरं शिलाई मशीन मिळालं आणि ५ हजार रूपये नगद. अनुपनं शिलाई
मशीन विकून मला अडीच हजार मिळवून दिले. आणि आम्ही दोघे सटकलो. केसशी काही घेणं देणं
नव्हतंच मला. पण मुंबई सोडणं भाग होतं. आता अनुपचं कामही सुटणार होतं आणि ७-८ हजारात
असं किती दिवस आम्ही जगणार होतो. मूर्खपणा केलाच होता, तर तो आता पूर्ण निभावणं भाग
होतं.
अनुपचा एक चुलता
यूपीत कुठेतरी राहायचा. त्याच्याकडे जाऊन थांबलो काही दिवस. कामाची काही सोय होईना.
अनुप काहीतरी फडतूस कामं करून चार पैसे आणत होता. पण असं जास्त दिवस जमणं अवघड होतं.
मग त्याच्या चुलतभावाच्या धंद्यात सामील होणं किंवा मग पुन्हा मी पूर्वीचा धंदा सुरू
करणं, हे दोनच पर्याय होते. आम्ही त्याच्या चुलतभावाचा धंदा निवडला.
तो टायर दुरूस्तीचं
दुकान चालवायचा अन येणार्या जाणार्या वयस्क लोकांना फसवून हजारोंचा चुना लावणे हे
त्याचं मूळ उत्पन्नाचं साधन. मी प्रवाशांचा विश्वास मिळवण्यासाठी उपयुक्त होते. मी
आणि अनुप बाईकवरून गाडीला समांतर जायचो आणि अनुप गाडीचालकाला टायरमध्ये हवा कमी आहे
असं सांगायचा. लोक सहसा जोडप्यांवर संशय घेत नाहीत. मग एकदा ते टायर दुरूस्तीला गेले
की त्यांना लुटणं हे सराईत काम होतं. पोलिसांना हप्ता न देता हे काम जमणारं नव्हतं,
पण ते सर्व अनुपचा चुलतभाऊच बघायचा. आम्हाला पर कस्टमर कमिशन होतं. ह्या टायरवाल्यांची
मोठी टोळी होती, त्यामुळे आम्हाला एकाच ठिकाणी फार वेळ राहता यायचं नाही, ते सेफसुद्धा
नव्हतं.
मग वेगवेगळे
हायवे करत करत आम्ही बरीच गावं, शहरं, राज्यं फिरलो. कधी चोर्यामार्यासुद्धा केल्या.
पण मुख्य धंदा फसवणूकच. ह्या धंद्याची किक वेगळीच पण. कायम धोका पत्करणं, यशस्वीपणे
लोकांना फसवणं. पण कुठेतरी मन निबर होत जातं. आतली माणुसकी मरत जाते. मग कशाचंच काही
वाटत नाही. अनुपनं एकदा एका माणसाला चुकून मारूनच टाकलं. पण मला काहीच वाटलं नाही.
आत्ताही फार काही वाटत नाहीये. चूक आहे का बरोबर ते ही कळत नाही. एका धंद्यातून सुटका
करून घ्यायला कुठून कुठे आले.
ओव्हरकॉन्फिडन्समध्ये
आम्ही परत महाराष्ट्रात आलो. शेवटी एका रिटायर्ड पोलिसवाल्याला टायरवरून गंडवताना अडकलो.
त्यानं प्रकरण लावूनच धरलं आणि मी धरले गेले. बारा वर्षं. बारा वर्षांनी मी थांबले.
पोलिसांनी कसा कुणास ठाऊक माझा संबंध त्या बलात्कार प्रकरणाशी लावला. मला वाटलं होतं
की त्याला सोडून दिलं असेल मी गायब झाले म्हणून.
-----
माझं लग्न झालं
तेव्हाच मला ठाऊक होतं की माझं पुढे काय होणार. लग्न झाल्यावर वर्षाभरातच मला मुलगी
झाली. आधीच सावळी अन अंगानं जाड असल्यानं माझं लग्न उशीरानं झालं. त्यात माझ्या गावापासून
भलतंच दूर. तोडकं कानडी बोलणारी मी मोडकं मराठी बोलणार्या कानडी घरात गेले. नवरा चांगला
होता. पण त्याच्याकडे पैसे म्हणून नव्हते. महत्वाकांक्षा शून्य. आला दिवस गेला म्हणजे
आनंद मानून झोपायचा. लग्नाचं पहिलं वर्ष सगळं गोड लागतं पण मग खर्या समस्या समोर येतात.
सगळ्या हौसेमौजेला पैसा लागतो आणि मूल सांभाळायचं म्हणजे अजूनच जास्त. त्यात मला झाली
मुलगी, भैरवी. सासू टोमणे मारायला लागली आणि माहेरच्यांनी तर केव्हाच मी गेल्याचा सुस्कारा
सोडलेला होता. त्यात माझ्या पैशाच्या भुणभुणीला कंटाळून नवरा मुंबईला निघाला त्याच्या
गावातल्याच एका तिथे गेलेल्या मित्राकडे. एक मात्र होतं नवर्याचा पोरीवर भारी जीव
होता. पण करतो काय.
अरेच्चा! मी
माझं नाव अजून सांगितलंच नाही का. लक्ष्मी. भैरप्पाची बायको. ह्या गोष्टीत माझी बाजू
मी सांगण्याचं तसं काही कारण नाही. पण दूरान्वयानं का होईना, माझा घडलेल्या घटनेच्या
आधी आणि नंतर बराच संबंध आला. नंतर आला तो रिपोर्टर अद्वैतमुळे.
भैरप्पा मुंबईला
गेला आणि इथे माझी घुसमट सुरू झाली. सासूनं बोलणं जवळपास टाकलं होतं. भैरप्पा पाठवत
होता त्या पैशात जेमतेम आमचं चालत होतं. तेव्हा माझ्या गावचा शिवा आमच्या गावात केमिस्टकडे
माल पोचवायला आला आणि अचानकच भेटला. शिवा विधुर होता आणि माझ्या शाळेत माझ्या वर्गात
शिकलेला. धंदा जोरात होता आणि पैसा खर्चायला कोणी. कुठेतरी आमची मनं जुळत गेली. भैरप्पा
असाही नव्हताच. वर्षातून एकदा यायचा. अन एका वर्षी त्याच्या ऐवजी तो जेलमध्ये गेल्याची
बातमी आली.
शिवाला मुलगी
नको होती. मला जिवावरच आलं होतं. पण मला त्या घुसमटीचा कंटाळा आला होता. शिवानं महिन्याचा
खर्च भैरप्पाच्या आईकडे पाठवायचं वचन दिलं आणि मी त्याच्यासोबत निघून गेले. जगण्यासाठीच्या
संघर्षाचा कंटाळा आला होता. अपराधी भावना फार वेळ टिकत नाही. काळासोबत सगळंच बोथट होत
जातं.
तर मी तशी सुखात
होते. नवा संसार होता. मुलगा झाला. सगळं व्यवस्थित होतं. बहुतेक शिवा अजूनही महिन्याचा
खर्च पाठवत असावा. तेव्हाच हा रिपोर्टर आला. बारा वर्षांच्या माझ्या सुखी संसारात मिठाचा
खडा टाकायला.
मी त्याला काय
सांगायचं ठरवलं होतं. भैरप्पा मला मारहाण करायचा. आईला पण मारायचा. पोटच्या पोरीलाही
बरं नाही बघायचा. मी फक्त स्वतःची सुटका करून घेतली. माझं काय चुकलं? मला अपेश नको
होतं. तो जाऊन सांगेल लोकांना की ह्या कैदाशिणीनं तो जेलात गेल्यावर लगेच संसार टाकून
पळ काढला. मी अशीही कुठे सुखी होते. मग खरं सांगितलं काय, खोटं सांगितलं काय.