4/25/2016

सुटका -उत्तरार्ध

----
भैरप्पानं सगळं आयुष्य उलटं पालटं करून ठेवलंय माझं. पोटी मुलगा व्हावा म्हणून देवांना नवस सांगून सांगून थकले होते. नवर्‍यानं पहिली झालेली मुलगी नरड्याला नख लावून डोळ्यांदेखत संपवली. आठ दिवस अन्नपाणी घेतलं नव्हतं मी. दुसर्‍या वेळेस मी इतकी घाबरले होते, की गर्भावर परिणाम होतो का काय असं वाटलं होतं. पण झाला मुलगा नशीबानं. भैरप्पा. मी गपचूप जाऊन ऑप्रेशन करून घेतलं होतं गावातल्या सुईणीच्या मदतीनं. परत हे सगळं नको.
मी यल्लम्मा. हो ती देवी असते तेच नाव. नवर्‍यानं अन त्याच्या घरच्यांनी ठेवलेलं. माझ्या घरात सर्वांत जास्त शिकलेली मीच होते. सातवी पास. पण सगळ्यात अनाडी नवरा माझ्याच कपाळी. भैरप्पा झाल्यावर तीन वर्षांत लगेच वैधव्य. सावरलं पुढे सगळं. पण छोट्या गावातल्या विधवेची दुःख तिची तिलाच कळतात. पुन्हा ज्याला सगळं समजतं, त्याला त्रास जास्त. कधी कधी शिकलेच नसते तर बरं झालं असतं असं वाटतं. पण असो.
भैरप्पा तसा निरूपद्रवी पण बापावर गेलेला. ना धड शिकला ना कशात त्याला गती. पण पोटचा गोळा माझ्या. मायेला ह्या सर्व गोष्टींचा अडथळा नसतो. पण जगात चलनी नाणीच चालतात. भैरप्पाचं लग्न फार उशिरानं लागलं. भैरप्पा दारू प्यायचा पण त्याच्या कधी तक्रारी माझ्यापर्यंत आल्या नव्हत्या. पण मला ठाऊक होतं. भैरप्पाची घुसमट होत होती. वय वाढत होतं. मित्रांची लग्न लागत होती. घरात अठरा विश्वे दारिद्र्य. माणसानं मन रमवावं तरी कुठे. त्यामुळे मी तो रात्री कुठल्या गुत्त्यावर जातो. काय करतो ह्याबद्दल कधी चौकशी केली नाही. तो घरी येत होता. मी केलेलं जेवत होता आणि मला त्रास देत नव्हता तोवर ठीक होतं.
पण हळूहळू तो चिडचिडा होऊ लागला. एक दिवस रात्री फार उशीरा आला आणि माझ्यावर पहिल्यांदाच त्यानं हात उगारला. शिवीगाळी करत झोपला. सकाळी उठून एक शब्दही न बोलता बाहेर पडला. त्या रात्रीनंतर त्यानं माझ्याशी बोलणं जवळजवळ टाकलंच. माझ्या नजरेला नजरही देत नसे तो. त्या रात्री तो नक्की काय करून आला ते मला कधीच कळलं नाही. कळून घ्यायचंही नव्हतं. मला फक्त माझ्या पोराची काळजी होती. पण नशीबानं ही लक्ष्मी त्याला मिळाली आणि माझी सुटका झाली.
पण भैरप्पालाही पहिली मुलगीच झाली. खरं सांगायचं तर मला मुलगी किंवा मुलगानं तसा फार फरक पडत नव्हता. पण मुलगी झाली तर तिचं काय होणार, ह्याचीच मला काळजी. माझं जे झालं, त्यानंतर मला अजून एका मुलीचं आयुष्य वाया जाताना पाहायचं नव्हतं. पुन्हा भैरप्पासारखा नाकर्ता बाप काय दिवे लावणार हे मला चांगलंच दिसत होतं.
लक्ष्मीसुद्धा त्रासदायकच होती. क्षुल्लक कारणांवरून भांडणं उकरून काढायची. तिचंही बरोबर होतं. लग्नानंतर हौसमौज नाही मग तगमग होणं साहजिक. पण आपलं लग्न कशा परिस्थितीत झालं ह्याची अक्कल असायलाच हवी ना. मीसुद्धा आयुष्यभर त्रासच भोगला, आता हिला पण मीच समजून कशाला घ्यायचं. मग मी तिला मुलगी झाल्यावरून बोल लावायला सुरूवात केली. काहीतरी कारण हवं ना उलटून त्रास द्यायला. पण ती त्याचंच भांडवल करत बसायची.
ह्या त्रासाला वैतागून भैरप्पा पुन्हा त्याच्या जुन्या मित्रांच्या संगतीला लागला. मला चित्र काही फार छान दिसत नव्हतं. पण खरं सांगायचं तर मी कंटाळले होते. थकून गेले होते सगळं सांभाळत. अशात एका रात्री भैरप्पा पुन्हा उशीरा आला आणि अगदी त्या रात्रीसारखाच. पण ह्या वेळेस तो शांत होता. एका शब्दानं काहीही बोलत नव्हता. डोळे तारवटलेले होते. काहीतरी भयानक पाहिल्यासारखे, किंवा केल्यासारखे. त्यानं त्या रात्रीप्रमाणेच सर्व केलं असतं पण आपल्या घरात लहान मूल आहे ह्या जाणिवेनं तो गप्प पडून राहिला. आणि दुसर्‍या दिवशी पहाटे सगळं आवरून मुंबईला नोकरीसाठी जातो म्हणून निघून गेला.
वर्षातून एकदा चोरासारखा यायचा. दिवस-दोन दिवस लपून छपून राहायचा आणि परत जायचा. एक दिवस त्याच्या बलात्काराच्या आरोपात जेलमध्ये जायची बातमी आली आणि ही सटवी लगेच त्या शिवाचा हात धरून पळून गेली. त्यांचे चाळे काय मला आधीच दिसत नव्हते का? पण मी गप्पच होते. कारण तेव्हढं एकच मी करू शकत होते. आपलंच नाणं खोटं. आपलाच जन्म शाप. त्यात ही पोर माझ्या गळ्यात मारून गेली. काय तर म्हणे तो शिवा पैसे पाठवेल. कसले पाठवणार होता तो. त्यानं कधीच पाठवले नाहीत पैसे.
पण भैरप्पाची पोर होती मोठी गोड. भैरप्पासारखी नव्हती. थोडी आजीवर गेली होती. फुकट प्राथमिक शिक्षणासाठी मी तिला घातलं. भराभरा मोठी होत होती. तेव्हाच अचानक तो रिपोर्टर माझा माग काढत आला. भैरप्पाला सोडवायचंय म्हणाला. भैरप्पानी काही केलं नाहीय म्हणाला. आत्ता? बारा वर्षांनंतर? काही अर्थ आहे का सगळ्याला?
पण शेवटी तो माझ्या पोटचा गोळा. सुटत असेल तर चांगलंच. मी सगळं व्यवस्थित अन छान छान सांगितलं त्या रिपोर्टरला. कशाला त्याच्या व्यसनांबद्दल बोलायचं. त्या सगळ्याचा काय संबंध. काय करणार आहे तो रिपोर्टर कोण जाणे!
----
मी भैरप्पाच्या गावी गेलो. त्याच्या आईशी बोललो. त्याच्या आईकडून सुनेचा पत्ता मिळवला. भैरप्पाच्या पूर्वीच्या बायकोकडे गेलो. पण सगळ्यांत गंमत अशी की भैरप्पांच्या गाववाल्यांवर विश्वास ठेवावा तर भैरप्पाची आई आणि बायको, दोघीही खोटं बोलतायत. भैरप्पा आईशी फारसा चांगला कधीच वागला नाही आणि बायकोशी वाईट कधीच वागला नाही. पण दोघीही उलट बोलत होत्या. भैरप्पाच्या केससाठी ह्या सर्वांचा थेट उपयोग नाही पण टीआरपी चांगला आहे. भैरप्पाच्या आईचा इंटरव्ह्यू परफेक्ट आहे. गाववाल्यांची वाक्य एडिट करून छापावी लागली.
पण भैरप्पाच्या गौडबंगालानं मला चांगलंच घेरलं होतं. मी त्याला जेलमध्ये भेटून आलो. तो शांत वाटला. त्याची नजर विलक्षण होती. लालसर डोळे, रोखून बघणारे. तो गरीब वाटत नव्हता. एक वेगळीच वेदना होती डोळ्यांत. पण त्यानं जे घडलं होतं ते सगळं मान्य केलं होतं. तो धुमसत नव्हता, चिडला नव्हता, अन्यायग्रस्त नव्हता. सुटकेची आशा होती थोडी ती फक्त त्याच्या बोलण्यात.
पुढे काय? हा त्याच्यासाठीचा सगळ्यांत मोठा प्रश्न होता. माणसाला अस्थिरता किंवा अनिश्चितता नको असते. मग ती चांगली का असेना. जेलमध्ये सगळं ठरलेलं होतं. बाहेर जाऊन करणार काय? बायको पळाल्याचं त्याला ठाऊक होतं. मुलगी अन आई गेल्या बारा वर्षांत त्याला भेटले नाहीत. त्यांचा ठावठिकाणा काय. कसं कुठे केव्हा. कशाचाच पत्ता नाही. सुटलो तर काय ह्या प्रश्नानं भेदरला होता तो. विचित्र परिस्थिती होती. मला वाटलं होतं सुटकेच्या शक्यतेनं तो खूष होईल पण इथे भलतंच.
मला ते सगळं महत्वाचं नव्हतं. त्याचे खटला संपेपर्यंतचे रोजचे इंटरव्ह्यू, त्याचा दिनक्रम हे सगळं हवं होतं. मला खूप प्रसिद्धी मिळत होती. पैसे मिळत होते. नव्या जॉब ऑफर्स होत्या. मी पण प्रचंड मेहनत करत होतो. त्याच्या गावाकडे व्हिजिट्स, चंद्रीचा इंटरव्ह्यू आणि भैरप्पाचे रोजचे अपडेट्स सगळं एकटाच मॅनेज करत होतो. तो अनुपसुद्धा तीच तीच स्टोरी परत परत सांगत होता. माझ्या करियरचा हायपॉईंट होता.
फ्क्त एकच गोष्ट सलत होती. भैरप्पाचे गाववाले, भैरप्पाच्या ग्रुपबद्दल जास्त बोलत नव्हते. फक्त एकानं सांगितलं की भैरप्पाच्या ग्रुपमधले दोघेजण संशयास्पदरित्या मेले होते आणि बाकीचे एक एक करून परागंदा झाले होते. दुसरा मेला तेव्हाच भैरप्पाही मुंबईला गेला होता. पण ह्या सगळ्याचा भैरप्पाच्या बलात्कार खटल्याशी थेट काहीच संबंध नव्हता. मी पोलिसांशीही बोललो होतो. त्या दोन्ही आत्महत्यांच्याच केसेस होत्या. त्यात खून असेल अशी कुणालाच शंका नव्हती. पण ते नक्की होतं काय, हे मला भैरप्पाही नीट सांगत नव्हता. तो फक्त नीट आठवत नाही एकच टेप लावून बसला होता.
पण असंही आता बाकी विचार करायला वेळ नव्हता. वकील आणि एनजीओ वाल्यांच्या प्रयत्नांनी आणि चंद्रीबाईच्या गुन्ह्यांमुळे बाईच्या कॅरॅक्टरवरच शंका उभी राहिली अन कोर्टानं सबळ पुराव्यांअभावी भैरप्पाला मुक्त केलं. पण भैरप्पा गावी जायला तयार होईना. तो म्हणू लागला की आई अन मुलीलाच इथे बोलावणार एकदा बंदोबस्त झाला की. एनजीओ वाले त्याला सर्वतोपरी मदत करणारच होते. पण मला हे वागणं खटकत होतं. केसतर झोकात निघाली होती पण मला काहीतरी खात होतं.
मी पोलिसांनी केलं ते सर्व परत केलं होतं. हॉटेलच्या तेव्हाच्या मॅनेजरशी बोलून आलो होतो. त्यानं भैरप्पाला पाहिल्याचं मान्य केलं होतं, पण इतके लोक येत जात असतात आणि सगळेच दारूडे, गांजेकस, छोटेमोठे गुन्हेगार असतात, त्यामुळे कोण काय करतोय किंवा किती शुद्धीवर आहे हे कुणी बघत नाही. त्या खोलीत नक्की काय झालं आणि चंद्रीचं डोकं जमिनीवर कुणी आणि का आपटलं हे समजतच नव्हतं.
भैरप्पाचं संशयास्पद वागणं मला कुठेतरी खटकत होतं. किंवा कदाचित डोक्यात एकदा शिरलेल्या कीड्यामुळे असेल. किंवा त्याच्या आई अन बायकोच्या उलट सुलट जबानीमुळे किंवा गावकर्‍यांनी रंगवलेल्या वेगळ्याच चित्रामुळे, किंवा त्याच्या दोन मित्रांच्या गूढ मृत्युंमुळे किंवा मग फक्त हा खटला अपेक्षेपेक्षा चटाचट संपून भैरप्पा मुक्त झाल्यामुळे मला आलेल्या जबाबदारीच्या जाणिवेमुळे. नक्की काय ते कळत नाही. भैरप्पाच्या दोषी असण्यावर जरी शेकडो प्रश्नचिह्नं असली, तरी त्याचं निर्दोष असणं तितकंच सरळही नाही. किंवा कदाचित मग त्या एका तपशीलामुळे मी गोंधळलो असेन.
तसा फार महत्वाचा तपशीलही नाही तो. मी जेव्हा चंद्रीच्या सोबत त्या वेळेस काम करणार्‍या इतर बायकांना शोधत त्यांच्याशी बोलत फिरत होतो, तेव्हा एक दोघींनी भैरप्पाला कदाचित बघितलं असेल असं सांगितलं होतं. म्हणजे, कदाचित तो त्यांचा एक कस्टमर असण्याची शक्यता वर्तवली होती. आणि महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्याजणींसाठी रोजच्या कामातच इतके बलात्कार लिहिलेले असतात की कुणी अमुक एकानं काही केलं असं वेगळं लक्षात ठेवणं कठीण. त्यात मी १२ वर्षांपूर्वीची गोष्ट सांगत होतो.
अर्थात ह्यातनं काही सिद्ध होत नाही, पण भैरप्पानं असंच काही इतरजणींसोबतही केल्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. पण वेश्यांवर बलात्कार हा कन्सेप्ट मुळात त्या स्वतःच मानत नाहीत, तर समाजाचं अन पोलिसांचं सोडूनच द्या. आधीच म्हणालो ना, पोलिसांना फार बाकीची कामं असतात, सुओ मोटो केस सोडवण्याइतका त्यांना कशातच इंटरेस्ट नसतो. त्यांचं निबर होणं, हे ऑक्युपेशनल हॅझार्ड असतं. पण ते असो.
मुद्दा हा की, माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकतच होती. जरी चंद्रीच्या म्हणण्यानुसार तिला अनुप तिथे घेऊन गेला होता, तरी ती अनुपला वाचवण्यासाठी पुढचं खोटं बोलत नव्हती कशावरून? कशावरून अनुप तिचा दलाल नव्हता? कशावरून सगळं अनुपनंच केलं नसेल? सगळीच प्रश्नचिह्नं. 
सगळा वेडेपणा होता का माझा. एकदा त्याला सोडवण्यासाठी चक्रं फिरवू लागलो आणि मग तो सुटल्यावर उलट दिशेनं विचार. जेलमधल्या त्याच्या सोबतच्या लोकांनीही भैरप्पानं दारू प्यायल्यावर अन त्यासोबत गांजा ओढल्यावर काहीच लक्षात राहत नाही अशी कबुली दिल्याचं मला सांगितलं. आणि असं त्या घटने आधीही झाल्याचं त्यानं सांगितलं होतं. पण मी विचारल्यावर आजही भैरप्पा नकार देतो. त्याचे सहकैदी खोटं कशाला बोलतील? आणि मुख्य म्हणजे भैरप्पा खोटं का बोलतोय किंवा त्यांच्याशी खोटं का बोलला? की तुरूंगात इमेज बनवायला काही उलट सुलट क्लेम्स केले गेले. ते ही शक्य असतं.
माझं भैरप्पाच्या दोषी असण्याबद्दलचं ऑब्सेशन वाढतच गेलो. मी भैरप्पाच्या राहत्या जागेवर पाळत ठेवू लागलो. एकदा रात्री तो नसताना त्याच्या खोलीत शिरून छुपा मायक्रोफोन बसवून आलो. पण तो आक्षेपार्ह वागतही नव्हता आणि बोलतही नव्हता. तो फक्त नव्यानं मिळालेल्या कन्स्ट्रक्शनच्या कामावर जात होता. दारूपासून दूर राहत होता आणि रात्री फोनवर आईशी अन मुलीशी जुजबी बोलत होता.
अन एक दिवस त्याचा एक मित्र रात्री त्याच्यासोबत राहायला आला.
त्या रात्री मी जे काही ऐकलं त्यानंतर माझ्या सगळ्या थिअरीज, सगळे प्रश्न आणि सगळी उत्तरं, उलट सुलट झाली आणि नवेच प्रश्न आणि नैतिक संदेह उभे राहिले. मी त्या धक्क्यातून अजून सावरलो नाहीये.
मी त्याच्या खाजगी आयुष्यात नक्की का नाक खुपसलं हे मला समजत नव्हतं. मी कदाचित एका अपराधी माणसाला सोडवलं तर नाही ना हा प्रश्न मला कुणाच्या खाजगी आयुष्यात नाक खुपसायचा अधिकार देतो का? मुळात मी हे सगळं आधीच विचार करून करायला नको होतं का? पण पुन्हा, ह्या प्रश्नांना उत्तरं नाहीत आणि कुठल्या तरी एग्झिस्टेन्शियल कादंबरी किंवा सिनेमामध्ये मुख्य पात्रांच्या विचारशृंखलेमध्ये शोधण्याइतकंच ह्या प्रश्नांचं मूल्य. प्रत्यक्ष आयुष्यातले निर्णय इतके गुंतागुंतीचे नसतात. मी एकतर पूर्ण पुढे जाऊन प्रश्नाचं उत्तर शोधतो, किंवा झालं गेलं विसरून नव्या घटनेमागे धावतो.
----
माझी सुटका झाल्यापासून माझ्यावर पडलेली ही प्रसिद्धी मला नको आहे. मला शांत जगायचं आहे बस. मग ते तुरूंगात असो वा बाहेर. मला बाहेर यायचीही फार इच्छा नव्हती. आई कष्ट करून का होईना मुलीची काळजी घेत होती. मी माझ्या मित्रांकरवी थोडे थोडे पैसे पाठवत होतो. मला खरं सांगायचं तर कुढून कुढून जगण्याचा कंटाळा आला होता. 
दारू प्यायली आणि गांजा घेतला की मी काय करतो हे मलाही कळत नाही. असं गावाकडे बरेचदा झालं होतं. म्हणूनच मी कटाक्षानं ह्या सगळ्यापासून दूर राहत असे. पण त्या रात्री मित्राच्या जबरदस्तीनं मी दारू ढोसल्यावर एक दोन कश घेतले आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं. मी काही माझ्या आयुष्यात खूष होतो अशातला भाग नाही. पण म्हणायची पद्धत म्हणून.
आता तुम्हाला सगळं खरं सांगतो. आयुष्यभर छातीवर घेऊन वावरलो आहे असं एक गुपित. गुपित कसलं. एव्हाना तुम्हाला कळलंच असेल काय ते. मी काय आहे ते, अन माझे 'मित्र' म्हणजे कोण ते. माझं असं असणं मी कधीच मान्य करू शकलो नाही. कधी करणारही नाही कदाचित. पण त्यामुळे किती आयुष्यांची नासाडी झाली ते मला मोजत बसायचं नाही. नैतिक आणि समाजमान्य ह्या प्रश्नांभोवती हेलकावे खाण्यातच मी आयुष्य काढणार ह्याची मला पूर्ण कल्पना होती. पण जगणं कुणाला चुकलंय. गावाकडे जे मी गांजा घेतल्यावर केलं त्यानंतर मला असंच वाटतं. माझ्या मित्रांनीही कधी स्वतःबद्दल ते मान्य केलं नाही आणि त्यांनी आत्महत्या केल्या. मी ते कधी करू शकलो नाही आणि संसारात रमायचा प्रयत्न केला पण ते ही धड जमलं नाही. पण ह्या सगळ्याचा अर्थ हा नाही की मी त्या बाईला काहीच त्रास दिला नसेल. मी तिचा छळ केला ही असेल. तिला मारहाण केलीही असेल. पण मला खरंच काही आठवत नाही.
मी जे आहे ते मान्य करण्यापेक्षा मी बलात्कारी म्हणून जेलमध्ये बरा होतो. आता सुटका झाली, करू काय ते कळत नाही. तो रिपोर्टर अद्वैत सारखा मागावर होता, चित्रविचित्र प्रश्न विचारायचा, कधीतरी रात्री अपरात्री घराबाहेर उभा असायचा. त्याला वाटायचं मला कळत नाही, पण मला कळत होतं. आणि एक दिवस माझा एक मित्र घरी आला रात्री, गावाहून मला भेटायला. त्या रिपोर्टरनं माझ्या घरी मायक्रोफोन ठेवला हे मला माहित नव्हतं. पण त्या मायक्रोफोनमुळे त्याला सगळं कळलं. मला दुसर्‍या दिवशी सकाळी तो भेटायला आल्यावर कळलं. 
तो स्वतः अंतर्बाह्य हलून गेला होता. त्याला विश्वासच बसत नव्हता. मी ही गोंधळलेलोच होतो. माझं सगळं आयुष्यच चव्हाट्यावर येत होतं. तो जरी म्हणाला की कुणाला काही सांगणार नाही, तरी त्याच्या टोकदार प्रश्नांची मी किती वेळा उत्तरं देणार होतो? हे सगळं कुठे थांबणार होतं? माझं मलाही कळत नव्हतं. माझी ह्या सगळ्यातून कशी अन केव्हा सुटका होणार ह्या एकमेव प्रश्नानं मी हैराण झालो होतो.
----
माझ्या वडलांबद्दल मला कधीच फारशी माहिती नव्हती. जेव्हापासून आठवतं, तेव्हापासून आजीच माझं जग होती. आई कुठे गेली, बाबा कुठे गेले हे प्रश्न मी विचारले तरी फारशी उत्तरं कधीच मिळाली नाहीत. पण जशी जशी मोठी होऊ लागले तेव्हा गावातल्या इतरांच्या बोलण्यातून अर्धवट, तुटक माहिती कळत होती. आजीला विचारलं तर आजी ओरडेल ह्या भीतीनं मी कधी फार चौकशी केली नाही, पण वडील जेलमध्ये आहेत आणि आई दुसर्‍या गावी वेगळ्या कुटुंबात राहते, एव्हढंच कळलं होतं.
आणि अचानकच मी आठवीत असताना माझे वडील जेलबाहेर आले अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली. आणि मग ते रिपोर्टर काका घरी आले. त्यांनी माझे वडील लवकरच घरी येतील असं सांगितलं. पण मग वडील कधीच घरी आले नाहीत. काही दिवस ते रात्री फोन करायचे अन बोलायचे. पण मग एक दिवस एकदम ते मेल्याचीच बातमी आली. मला कुणी फार काही बोललं नाही, पण कदाचित त्यांनी आत्महत्या केली असं ते शेजारचे बोलत होते. आत्महत्या म्हणजे नक्की काय ठाऊक नाही पण काहीतरी वाईट असावं. आजी फार बोल लावत होती त्यांना.
त्यानंतर रिपोर्टरकाका परत घरी आले आणि आजीशी काही महत्वाचं बराच वेळ बोलून गेले. मी आता मुंबईला एका मुलींच्या शाळेत होस्टेलला राहते. रिपोर्टर काका भेटायला येतात दर रविवारी. बहुतेक त्यांनीच मला इथे आणलं असावं आजीला सांगून. दोन महिन्यांमध्ये एकदा आजी पण भेटायला येऊन जाते. तसं सगळं छान चालू आहे. पण आजीचं वाईट वाटतं. तिला माझी खूप आठवण येत असेल ना. मलाच इतकी येते तर!
--- समाप्त---

4 comments:

  1. अप्रतिम कथा!

    ReplyDelete
  2. Changlee zalee ahe goshta, I didn't imagine what would have been wrong with Bhairappa.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद भाऊ! Long time.. :)

      Delete