3/24/2018

अप्राप्य -१


माझा हात थोडा थरथरतच होता. मी घराची बेल दाबली. सगळं रक्त सळसळत डोक्याकडे जात असल्याचा भास होत होता. कपाळ, गळा आणि कानाच्या पाळ्या लालेलाल झाल्या असल्याचं जाणवत होतं. हातपाय थंड पडले असावेत. कुणी दरवाजा उघडेपर्यंतचे काही क्षणसुद्धा थांबून कासवाच्या गतीनं पुढे सरकल्यासारखं वाटत होतं. सळसळत वर येणारं ते सगळं रक्त कानाचे पडदे फाडून बाहेर पडेल असं वाटू लागलं होतं. कुठून झक मारली आणि बंड्याचं ऐकून इथे आलो असं वाटायला लागलं. मूड खराब असताना त्याच्याशी बोलून मी लहानपणापासून कित्येकदा खड्ड्यात गेलो होतो, तरी हा धडा मी का शिकलो नाही, हे एक उलगडलेलं कोडं आहे.
पण ती वेळ हे विचार करण्याची नव्हती. किंवा तितका वेळही नव्हता. बंड्या पीपहोलवर हात ठेवून उभा होता. जवळपास तीस सेकंद झाली असतील, किंवा नसतीलही, माझा संदर्भ सुटला होता. अतिताणानं मला हार्ट ऍटॅकच येतो का काय असं वाटेपर्यंत लॅचचा आवाज आला. आता सगळं रक्त कानांपाशी गोळा झालं होतं. हात गोठल्यागत वाटत होतं. आत्ता हात-पाय दगा देतात की काय असं वाटेपर्यंत दरवाजा उघडला.
डोळ्यांनी दगा दिला. हेतिचंघर होतं? बंड्यानं हे काय करवलं माझ्या हातून असा विचार करतानाच बंड्या माझी चलबिचल पाहून घरात शिरला आणि तिच्या तोंडावर हात ठेवून तिला आत ढकललं. मी तसाच येड्यासारखा दारात उभा. बंड्यानं पुढे होऊन माझाही हात धरून मला आत ओढलं आणि मी भानावर येऊन दरवाजा लावून घेतला.
माझी नजर तिच्या भांबावलेल्या नजरेवरून हटत नव्हती पण काहीतरी भीतीची जाणीव झाली आणि मी थोडा सावरलो.
गो चेक होम.” बंड्या जमेल तसं इंग्रजी फाडत म्हणाला.
मी भरभर प्रत्येक खोली आणि संडास-बाथरूम पाहून आलो आणि बंड्याला थम्स अप दिला.
बंड्यानं खिशातून दोरी काढली आणि मला इशारा केला. मी तिला खुर्चीला बांधलं, जमेल तितक्या हळूवारपणे. मनगटावर दोरी आवळताना तिच्या अंगावरचा स्टोल मी तिच्या मनगट आणि दोरीमध्ये ओढला.
बंड्यानं मिळतील त्या छोट्या मौल्यवान वस्तू गोळा केल्या, मोबाईल, आयपॉड, एमपीथ्री, चांदीच्या वाटणाऱ्या वस्तू, कपाटाच्या लॉकरमध्ये पडलेले -१० हजार रूपये गोळा करून तो हॉलमध्ये घेऊन आला. त्याने पिशवी आणली होती पण वस्तू जास्त झाल्या होत्या. मी पुरता बिनकामी आहे हा निर्णय त्यानं मनाशी घेतलाच होता, त्यामुळे मला एका शब्दानंही बोलता तो इकडे तिकडे पाहत होता. मी डोळ्याच्या कोपऱ्यातून तिच्याकडे पाहत होतो. तिच्या डोळ्यांतल्या भीतीची मला बेरीज लागत नव्हती. काहीतरी चुकत होतं. तिला वस्तूंचं काही पडलेलं नव्हतं. तेव्हढ्यात बंड्याची नजर तिच्याकडे गेली. तो तिच्याकडे झेपावला. मला काही समजायच्या आत त्यानं तिच्या अंगावरचा स्टोल ओढला. तो काय करणार ह्या भीतीनं मला काही सुचेना. पण त्याने फक्त स्टोलच काढला. त्यात वस्तू गुंडाळल्या आणि गाठोडं करून माझ्याकडे विजयी मुद्रेनं पाहिलं. पिशवी माझ्या हातात दिली आणि मला चलायची खूण केली. आम्ही बाहेर पडलो. गच्चीत गेलो. तिथे काढून ठेवलेले पिझ्झा डिलीव्हरीचे कपडे परत चढवले, अंगातले कपडेही गाठोड्यांमध्ये कोंबले. दोन्ही नग बिल्डींगच्या मागच्या बाजूच्या चाळीच्या उकीरड्यावर फेकले. तिथल्या चिखलामुळे वस्तूंचं नुकसान होण्याची शक्यता कमी होती. घड्याळात वेळ बघितली, बरोब्बर १५ मिनिटं. चटाचट जिने उतरून बिल्डींगच्या समोरच्या गेटमधून साळसूदपणे बाहेर पडलो.
आणि मला तिच्या डोळ्यातल्या भीतीची बेरीज लागली. तिला वाटत होतं की आम्ही तिच्यासोबत काहीकमी-जास्त करू. माझ्या अंगावर काटा उभा राहिला. स्वतःबद्दल इतकी शिसारी मला कधी जन्मात आली नसेल. काय केलं आपण? काय किंमत केली गेली आपली.
---
त्या रात्री मला उशीर झाला होता. बाबांना त्यांच्या ऑफिसातूनही यायला उशीर झाला होता. स्टेशनपासून रिक्षाही मिळत नव्हती. मी चालतच येऊ लागले होते. घरी जाताना एक १०० मीटरचा रस्ता एकदम चिंचोळा आहे आणि तिथे स्ट्रीटलाईट्सही अगदीच मिणमिणल्यासारखे असतात. स्त्रीचा सिक्स्थ सेन्स जास्त असतो म्हणतात तसं मला काहीतरी विचित्र जाणवत होतं पण नक्की काय ते कळत नव्हतं. तो रस्ता जवळपास पार झाल्यावर मला कुणीतरी आपला पाठलाग करतंय असं वाटलं. मी झपाझप पावलं टाकत चौकात पोचले. तिथे बऱ्यापैकी वर्दळ होती. मला हायसं वाटलं. मी घराच्या दिशेनं वळले आणि मागे पाहता जवळपास धावतच गेटमधून आत शिरले. त्याचा शर्ट चौकातून दुसऱ्या दिशेला वळून जाताना मी पाहिला आणि सुटकेचा निश्वास टाकला. पण जेव्हा केव्हाही मला उशीर व्हायचा तेव्हा तेच व्हायचं. बाबा न्यायला आले तर काळजी नसायची पण बाबा नसायचे तेव्हा हा प्रॉब्लेम.
घरामध्ये दरोडा पडल्याला आता जवळपास दोन वर्षं होत आली होती. पण तरी मला अनोळखी जागी अनोळखी लोकांमध्ये भीतीच वाटत असे. त्यात हा नक्की त्या बाजूच्या झोपडपट्टीमध्ये राहणारा असणार. आमच्याच ऑफिसातला ऑफिस बॉय असावा, पण त्याचा चेहरा बघायची हिंमत होत नाही अजून. बाबांना सांगावं का? की उगाच तमाशा व्हायचा. पुन्हा बाबा दिवसभर घरी नसतात, आई एकटी. झोपडपट्टीतल्या लोकांनी काही केलं म्हणजे?
आपणच जाब विचारावा का? की नकोच ते? तो काही करत तर नाही. आणि असं किती वेळा आपण एकटे चालत येतो? फार तर महिन्यातून दोनदा.
नोकरी सुरू होऊन वर्ष होत आलं, पण तो दिवस आणि ती पंधरा मिनिटं अजूनही अंगावर काटा आणतात. काहीच आणि कुठेच सुरक्षित नाही असं वाटणं म्हणजे काय ते पुढचे कित्येक दिवस मी आणि आई-बाबा अनुभवत होतो. माझा एक चुलतभाऊ काही महिने आमच्यासोबत राहायला आला होता. त्या सगळ्याला तसा काही अर्थ नव्हता, पण सगळ्यांना वाटत होतं आपण काहीतरी करावं, सगळेच एकमेकांची आणि मनाची समजूत घालत होते.
त्या घटनेनं माझ्या मनात एक दहशत कायमची बसली, पण खरं सांगायचं तर त्या घटनेनं मी पूर्ण बदलून गेले. ते दोन दरोडेखोर जेव्हा माझ्याकडे रोखून पाहत होते, तेव्हा मी थिजून त्यांच्या डोळ्यांत पाहत होते. जणू तिथे ती खुनशी भावना कोणत्या क्षणी निर्माण होते ते पाहत. सगळ्या संवेदना डोळ्यांत गोळा झाल्या होत्या. तोवरचं सगळं आयुष्य, शिक्षण, सुरक्षित बालपण, प्रेमळ कुटुंब, मित्र-मैत्रिणिंचा गोतावळा, संपत आलेलं शिक्षण, त्यानंतर वाट पाहत असलेलं अजून सुरक्षित प्रौढपण सगळं सगळं एका क्षणात संपणार ह्या विचारानं मेंदू सुन्न झाला होता. मी काय काय चुकलेय, मित्रमैत्रिणिंबरोबर वेळ घालवण्याच्या नादात आई-बाबांना पुरेसा वेळ दिला नाही का, आई सांगत होती ते ऐकून इंजिनियरिंगऐवजी कॉमर्स घेतलं असतं तर गेल्याच वर्षी शिक्षण संपून नोकरीला लागले असते आणि आज घरी नसते, असे अनेक चित्रविचित्र विचार डोक्यात फिरायला लागले. आज सगळं संपेल असं वाटत असतानाच तो एक दरोडेखोर माझ्या दिशेनं सरकला आणि आणि काळजात चर्र झालं होतं, पण त्यानं फक्त माझा स्टोल चोरला आणि सामान गोळा करून ते दोघे पळून गेले. काही कळायच्या आत मी परत सुरक्षित होते. मला काही झालं नव्हतं, मी भानावर यायला दोन मिनिटं लागली आणि मी धावत खाली गेले. पण ते दरोडेखोर कधीच सापडले नाहीत. माझ्या मनावर चरा उमटला तो कायमचाच.
पण त्या घटनेनंतर मी जास्त मेहनत करायचा निश्चय केला. चांगले मार्क आणून चांगली नोकरी मिळवली आणि नव्या निर्धारानं आयुष्य एंजॉय करू लागले. घटनेनंतर आई-बाबांनी घर बदलायचा विचार सुरू केला होता. पण नवं घर घेण्याचं बजेटही नव्हतं आणि घराचं आणि माझ्या शिक्षणाचं कर्ज अजूनही फेडणं सुरू होतं. मग बिल्डिंगची सिक्युरिटी वाढलेली पाहून आम्ही मनाचं समाधान करून घेतलं. बाबांना घर बदलायला मी माझ्या पगारावर मदत करीन असं मी ठरवलं होतं.
पण काळ पुढे सरकतो तसे व्रणही धूसर होता आणि आपली एखाद्या घटनेबद्दलची भावनाही बोथट होत जाते. सुरक्षिततेच्या त्या बुडबुड्यात आम्ही सगळेच परत मश्गूल होऊन गेलो. मी नोकरीत रमू लागले. आणि आता ह्या पाठलागानं सगळं परत स्पष्ट आठवू लागलं. ती असुरक्षिततेची भावना परत आली, एका क्षणात होत्याचं नव्हतं होऊ शकतं ही आठवणही परत घट्ट झाली.
----
मी तिचा पाठलाग करत होतो, पण कारण तसं काही नव्हतं. मला माहित होतं की तिला त्या छोट्या रस्त्यानं एकटं जायला लागेल. मी अंतर ठेवून चालत होतो. मी तिच्या प्रोटेक्शनसाठी तिच्या मागे यायचो. तसं ती मला ओळखत नव्हती, त्यामुळे ती मलाच घाबरत होती, हे नंतर मला लक्षात आलं, पण खरंच मला डोक्यातही नाही की माझ्यामुळे तिला भीती वाटत असेल. ती माझ्याच ऑफिसात होती. किंवा मी तिच्या ऑफिसात होतो असं म्हणणं योग्य होईल. तिला मी पहिल्यांदा ऑफिसात पाहिलं आणि थोडा घाबरून गेलो होतो. तिनं मला ओळखलं तर? चोराच्या मनात चांदणं म्हणतात तसं काहीतरी.
तसं मी बंड्याच्या नादाला लागून तो मूर्खपणा केल्यानंतर तिनं मला बरेचदा पाहिलं होतं रस्त्यावर किंवा चौकात, किंवा नसेलही पाहिलं, तिच्या लक्षात येण्यासारखं माझ्यात काही नाही आणि आम्हा चाळवाल्यांकडे लक्ष जाण्याचं काही कारणही नाही. अगदी शेजारी शेजारी असूनही दोन भरपूर वेगळी जगं आहेत दोन्ही. नाही म्हणायला आमच्याइथल्या बऱ्याच बायका बिल्डिंगींमध्ये कामाला जातात. आणि आमच्याकडची पोरं कधी बिल्डिंगींमधल्या सायकलींच्या चैनी चोर, कधी सायकलीच चोर, किंवा मग गाड्यांचे रेडियो वगैरे चोरणे असले उद्योग करत असत, पण हल्ली बरीच पोरं शिकू वगैरे लागल्याने प्रमाण कमी झालंय असं म्हणायला हरकत नाही. आता चाळीही हळूहळू एसारए मध्ये डेव्हलप होऊ लागल्यानं लोक जरा शहाणे झालेत. पण आम्ही तसे मधली पिढी पडलो. लहानपण सायकलींच्या चैनी चोरण्यात आणि दगडं मारण्यात गेलं आणि कॉलेजात जायला लागल्यावर पोरींवर लाईनी मारण्याचे उद्योग करत दोन वर्षं नापास झालो. मग इकडचे तिकडचे फडतूस जॉब करत राहिलो, कुठे कुरियर बॉय, कुठे गॅरेजमध्ये, कधी आईसोबत पोह्यांची गाडी लावायचा प्रयत्न करून झाला. पण मन उनाडक्या करण्यातच रमत होतं.
एकदा नाक्यावर संध्याकाळी टोळक्यासोबत बसलो होतो. येणाऱ्या जाणाऱ्या पोरींवर ऐकू जाईल जाईल अशा आवाजात शेरेबाजी सुरू होती. बाकीच्यांबद्दल माहित नाही, पण आमच्या टोळक्यात वाह्यात पोरं होती, पण कुणी कधी त्यापुढे जाणारं नव्हतं. टवाळक्या, शेरेबाजी हेसुद्धा चूकच पण कुणी कधी कुणाच्या जवळ जाणं शक्य नव्हतं. माझा तर कॉलेज सुटल्यापासून पोरी ह्या विषयातला रस संपल्यात जमा होता. कॉलेजात गेलो म्हणजे आपण पोरी फिरवायच्या ह्या विश्वासानं कॉलेज जॉईन केलं. फार काही भारदस्त नसलेल्या व्यक्तिमत्वामुळे फार काही प्रगतीही केली नाही. एक मुलगी होती जिच्याबाबत कदाचित पुढे गेलो असतो, पण मग अभ्यास करून पासही व्हावं लागतं हे लक्षात यायला उशीर झाला. मग शिक्षणातलाही रस संपला. पण ते असो, त्यादिवशी काही वेगळं घडलं. त्यादिवशी संध्याकाळी, मी पहिल्यांदातिलापाहिलं. पोरं काहीतरी बोलत होती, पण माझं लक्ष नव्हतं. साधीशीच होती ती. मी तिला आधी कधी पाहिल्याचं आठवत नव्हतं. हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस घालून ती गेटमधून बाहेर आली. आमच्या टोळक्याकडे तिचं लक्ष नव्हतं, ती तिच्याच नादात स्वतःची बट कानामागे सारत वळली आणि रिक्षाला हात करू लागली. दोन-तीन रिक्षावाले नाही म्हणाल्यावर तिसरा तयार झाला आणि ती बसून निघून गेली. इनमीन दहा मिनिटांचा प्रसंग होता, पण तिच्यात काहीतरी वेगळं होतं. काही नसेलही, पण कधीकधी एखादी गोष्ट एकदम क्लिक होते तसं झालं होतं.
पण मग घरात तंगी असल्याने स्वतःचे टवाळक्यांचे पैसे स्वतःच मिळवायच्या नादात बंड्यासोबत तो महामूर्खपणा केला आणि ते नेमकंतिचं घर निघालं. तिची ती नजर अजूनही विसरलो नाही मी. आधी तिच्या नजरेतली भीती आणि मग किळस. कदाचित मला तसं वाटलं असेल, पण नसेल कशावरून. आणि का नाही. आम्ही होतोच तसे, गटारीतले कीडे. अंगावरून झुरळ झटकावं तसं लोकांनी झटकून टाकायचीच आमची लायकी. पुढचे काही दिवस झोप लागली नाही मला. तळमळत पडून राहायचो. तिचे ते डोळे नजरेसमोर यायचे. बंड्याकडून मी एक पैही घेतली नाही. फक्त तिचा स्टोल माझ्याकडे ठेवून घेतला मी. मला कायम आठवण राहावी माझ्या लायकीची म्हणून.
मग हळूहळू भानावर येऊ लागलो. तिच्या नजरेत इज्जत मिळवायची असा काहीतरी वेडा विचार मनात आला. ती मला कधी आयुष्यात भेटणार काय, पाहणारही नाही, हे मला पक्कं माहित होतं पण तरी, जर कधी ती भेटलीच, तर आपण असे फडतूस नसावं अशी एक इच्छा मनात तयार झाली. मी पोरांची संगत सोडली. वडलांच्या हाता पाया पडलो आणि त्यांच्या पुण्याईवर ही ऑफिसबॉयची नोकरी मिळाली. वडील तिथेच गार्डनर होते कित्येक वर्षं. डिस्टन्सनी बीकॉमची तयारी सुरू केलीसेकंड इयरमध्ये कॉलेज सोडून दिलं होतंत्यामुळे दोन परीक्षा पास करायच्या होत्या. त्यामुळे किमान घरचे निश्चिंत झाले. माझा सल कधी संपणार नव्हता. मी केलेलं पाप माझ्यासोबतच जाणार होतं बहुतेक. पण आयुष्यात काहीतरी करावं, तिच्या नजरेतली ती किळस पुन्हा कधी दिसू नये ही इच्छा जबरदस्त होती.
आणि दैवाची करामत अशी की तिची पहिली नोकरी माझ्याच कंपनीत. मी कॉन्ट्रॅक्टवर होतो आणि ती पर्मनन्ट, त्यामुळे खरं माझी कंपनी म्हणणं चूकच, पण आम्ही एकाच ऑफिसात होतो ह्याचा मला थोडा आनंदही वाटत होता आणि शरमही. पण दुसरी नोकरी मिळणं जवळपास अशक्यच होतं. तसंही ती मला ओळखत नव्हतीच. जे काही होतं ते माझ्या डोक्यात. मग एक दिवस नेहमीच्या वेळेनुसार मी रात्री साडेदहाला स्टेशनला उतरलो आणि स्टेशनबाहेर पडलो तर तिला घराच्या दिशेनं निघालेलं पाहिलं. माझ्याच ट्रेनने आली असावी ती. मी माझ्या नादातच चालत राहिलो आणि मग त्या छोट्या रस्त्यापाशी आल्यावर मी थबकलो. एखाद्या एकट्या मुलीला भीती वाटावी असाच तो रस्ता होता. म्हणून मग मी तिच्यावर लक्ष देऊन बरंच अंतर ठेवून चालत राहिलो.
तशी ती काही नेहमी उशीरा यायची नाही. आणि एकदोनदा तिचे वडील तिला स्टेशनला न्यायला आलेले मी पाहिले होते. जेव्हा असायची तेव्हा मी अंतर ठेवून चालायचो. माझ्या मनाला तेव्हढंच काहीतरी चांगलं करत असल्याचं समाधान. चौकात आल्यावर ती उजवीकडे वळून झपकन निघून जायची आणि मी डावीकडे वळून घरी जायचो.
एक दिवस मात्र मला तिचं चालणं थोडं स्लो वाटलं. मीही स्पीड कमी केला. ती चौकात पोचली आणि वळली, मग मी माझ्या नॉर्मल स्पीडनं पुढे आलो. चौकात पोचलो आणि डावीकडे वळणार एव्हढ्यात तिचा आवाज आला.
एक्सक्यूज मी!”
मी जागच्या जागी थबकलो.
मी ऑफिसच्या कॅंटीनमध्ये सकाळी बाकी बॉईजबरोबर नाश्ता-चहाला जायचो तेव्हाच तिचा ग्रुपही यायचा. तिचं हसणं-खिदळणं आणि तिचा किंचित किनरा आवाज खूपदा कानावर पडला होता. कदाचित मुद्दामही मी तिचा ग्रुप बसत असे त्याजवळच्या टेबलावर बसत असेन, तिचा आवाज कानावर पडावा म्हणून.
पण त्यारात्री तिच्या आवाजात राग होता. चीड होती. मला किंचित किळसही जाणवली. माझी वळायची हिंमत होत नव्हती. हाता-पायांना दरदरून घाम फुटला होता. मी सगळा जीव गोळा करून वळलो.
ती समोर उभी होती. चौकातल्या हॅलोजननं तिचा चेहरा उजळून निघाला होता. तिच्या चेहऱ्यावर भीती होती, थोडीशी थरथरत असल्यासारखं मला जाणवलं. कदाचित माझ्याही चेहऱ्यावर तिला भीती दिसली असावी. ती थोडी सावरली.
तुम्ही नेहमी माझा पाठलाग का करता?” तिनं हिंमत करून शब्द उच्चारले.
त्याक्षणाला माझ्या मठ्ठ डोक्यात प्रकाश पडला, की आपण जे तिला प्रोटेक्शन देतो, ते तिला काय वाटतं. माझ्या तोंडून शब्दही फुटेनात.
मला आवडत नाही हे असं वागणं. तुम्ही माझ्याच ऑफिसात आहात ना? शोभतं का हे असं वागणं? कंप्लेंट करू का मी?” ती घडाघडा बोलतच राहिली. मला पुढचं काही ऐकू आलं नाही. रडू कोसळेल असं वाटत होतं.
जे मनातून पुसण्यासाठी झटत होतो, तेच घडलं होतं आणि अशा पद्धतीनं. तिनं कदाचित पहिल्यांदाच मला नीट पाहिलं असेल आणि ते असं. मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं.
सॉरी मॅडम..” एव्हढेच शब्द फुटले माझ्या तोंडून.
----
मी त्याला हटकल्यापासून तो परत दिसला नाही मला रात्री. ऑफिसातही नजर चोरून राहायचा. आम्ही नाश्त्याला जायचो त्यावेळी फिरकायचा नाही. एका अर्थी चांगलंच झालं होतं. मला स्वतःचाच अभिमान वाटत होता. आत्मविश्वास आला होता. आपण स्टॉकरला हटकू शकलो. सगळी शक्ती गोळा करू शकलो आणि तो ही घाबरला. आपण तीन महिने ज्या टेन्शनमध्ये होतो, ते एका क्षणाच्या साहसानं सुटून गेलं ही भावनाच इतकी सुखावणारी होती.
ऑफिसात प्रोबेशन संपून पर्मनन्ट झाले होते. पगारही वाढला होता. मित्रमैत्रिणी झाले होते. आई-बाबा अधूनमधून लग्नाचा विषय काढत होते. मला लग्न करायचं नव्हतं इतक्यात पण तो विषय निघाला की मन खूष व्हायचं.
ऑफिसातला सिनियर अविनाश माझ्याकडे जास्त लक्ष द्यायचा. दिसायला छान होता. माझ्यापेक्षा दोन वर्षं मोठा होता. मुख्य म्हणजे आमच्या मॅनेजरना चांगला ओळखायचा. त्यांच्यासोबत जेवायला वगैरे जायचा, त्यामुळेच एकदा-दोनदा आमच्यासोबत चहाला आला होता. तशीच ओळख झाली. हळूहळू ओळखीचं रूपांतर थोडं जास्तीमध्ये झालं. त्याचं अटेन्शन हवंहवंसं वाटायचं. आयुष्याचा नवा चॅप्टर सुरू होतोय असं वाटत होतं. सगळ्या कडू घटना मागे सोडून नवं, हलकंफुलकं, सुरक्षित आयुष्य मिळणार ह्या भावनेनं अंगावर मोरपिस फिरायचं.
अविनाश आणि मी खूप वेळ एकत्र घालवू लागलो. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर आम्ही ट्रेननी माझ्या घराजवळ यायचो. मग स्टेशनबाहेरच्या सीसीडीत बसायचो. मग तो चालत माझ्या घराशेजारच्या चौकापर्यंत यायचा आणि तिथे आम्ही गप्पा मारत उभे राहायचो. हळू आवाजात एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून कुणी पाहत तर नाही ना हा विचार करत चोरून बोलण्याची गंमत वेगळीच होती. आम्ही मुद्दाम चौकातून डावीकडे वळून तिथे उभे राहायचो जेणेकरून आमच्या बिल्डिंगमधलं कुणी आम्हाला पाहणार नाही.
पण आता घरी सांगावं असं मनात येऊ लागलं होतं. नाहीतरी घरचे लग्नाचं अधूनमधून बोलतच होते. पुन्हा अविनाश अगदी योग्य जोडीदार होता. त्याच्या घरचेही व्यवस्थित होते. हे सगळं मी एका रात्री अविनाशशी बोलायचं ठरवलं.
अविनाश बरेच दिवस मागे लागला होता म्हणून मी एक वन-पीस ड्रेस घेतला होता. लालसर गुलाबी रंगाचा होता. सहसा मला तो घालायचं थोडं ऑकवर्डच वाटायचं, त्यामुळे मी तो घातला नव्हता, पण त्यादिवशी तो घातला. उगाच दिवसभर सगळ्या नजरा आपल्यावरच आहेत असं वाटत होतं. आईलापण आश्चर्य वाटलं होतं मी तो ड्रेस घातला म्हणून. तिनं कानामागे काजळ लावलं त्यादिवशी लहान मुलासारखं. आम्ही दोघे नेहमीप्रमाणे बोलत बोलत चौकात आलो. अविनाशची नजर आज माझ्यावरून हटतच नव्हती. मलाही थोडं बेचैन वाटत होतं. त्याच्या मनासारखं केलं तर तो खूष होता म्हणून मीही खूष होण्याचा प्रयत्न करत होते. आमचं इकडचं तिकडचं काही बोलणं सुरू होतं. तो रविवारी कुठला सिनेमा पाहायचा, कुठे मॉलला जायचं, ऑफिसच्या ग्रुपबरोबर मॉन्सून ट्रेक करायचा वगैरे गोष्टींबद्दल बोलत होता. मी गप्प होते आणि त्याची नजर पाहत होते. साडेदहाच्या आसपास त्या चौकातली वर्दळ अगदीच कमी होत असे. हॅलोजनपासून डावीकडे चाळी सुरू होईपर्यंत थोडंसं अंधारलेलंच असे. एक क्षण असा आला की रस्त्यावर दोनेक कुत्री सोडून कुणीच नव्हतं. आणि अविनाशनं एकदमच मला कंबरेत धरून त्याच्या दिशेनं ओढलं आणि माझ्या ओठांवर ओठ टेकवले.
सगळं इतक्या क्षणार्धात घडलं की मला एकदम सैरभैर झाल्यासारखं झालं. मला एकदम भीती, चीड, शिसारी सगळंच जाणवलं आणि माझ्या बेचैनीचं कारण समजलं. मी त्याला मागे ढकललं आणि त्याच्या पकडीतून सुटायचा प्रयत्न करू लागले. पण त्याची पकड सैल होत नव्हती. माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हते.
तेव्हढ्यात एक स्कूटर वेगानं आमच्या जवळ येऊन थांबली.
हा पत्ता सांगता काय?” पिझ्झा डिलीव्हरी बॉयनं एक रिसीट आमच्या दिशेनं फडकावली.
अविनाशनं झटकन मला सोडलं आणि मी तोंड फिरवून पळतच घरी गेले.
----
तिनंमला त्या रात्री हटकलं आणि मला माझा दुसरा मूर्खपणा लक्षात आला. मला स्वतःची फार कीव वाटली. मी इतका फडतूस होतो की मला चूक-बरोबरही कळत नव्हतं. उगाच नाही मी ऑफिसबॉयचं काम करत होतो.
दुसऱ्या दिवशी माझी ऑफिसला जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. मी दोन दिवस घरीच थांबलो पण कंत्राटी कामगारांना जास्त सुट्या घेता येत नाहीत. मला भीती होती की तिनं ऑफिसात कंप्लेंट केली तर नोकरी तर जाईलच पण अब्रूही जाईल. खरं तसं बघायला गेलं तर अब्रू होती कुठे माझी. तरी भीती वाटली खरी. पण पर्याय नव्हता. गेलो ऑफिसला. चहाच्या वेळी चहाला जायचो नाही, ती कुठे दिसली तर रस्ता बदलायचो. मग साहेबाला रिक्वेस्ट करून शिफ्ट बदलून पहाटेची शिफ्ट करून घेतली. मग दुपारी लवकर घरी यायचो.
अजून आयुष्यापासून हार मानली नव्हतीसेकंड इयर एक्सटर्नल पास झालो होतो. आता बीकॉमची फायनल इयरची परीक्षा जवळ आली होती. संध्याकाळची वेळ मोकळी होती, त्याच्यात पिझ्झा डिलीव्हरीचं काम करायला लागलो होतो. फक्त ह्यावेळेस वेगळं पिझ्झाचं दुकान होतं.
काही दिवसांनी ती आणि तिचा लव्हर चौकात येऊन आमच्या चाळीच्या साईडला येऊन उभे राहायला लागले. बराच वेळ तिथे गुलुगुलु बोलत उभे राहायचे. ती जशी होती, त्याचा अर्थ तो ही चांगलाच असेल. घराच्या एव्हढे जवळ उभे राहायचे म्हणजे घरच्यांनाही माहीत असेल कदाचित. आपल्याला काय करायचं म्हणून मी आपला माझं काम करत फिरायचो. फक्त जमेल तेव्हा नजर टाकायचो, उगाच चाळीतल्या कुणी पोरानं काही वेडंवाकडं करायला नको.
मग दिवस ते दोघे वेगळ्याच मूडमध्ये दिसले. तिनं एकदम झगरमगर ड्रेस घातला होता. जनरली ती असे कपडे घालायची नाही. पण खूपच वेगळी दिसत होती ती. मी पण दोन मिनिट स्कूटर दूर थांबवून पाहत होतो. काहीतरी वेगळं वाटत होतं त्यादिवशी. आणि अचानक त्यानं तिला जवळ ओढून किस केला. मी एकदम शॉक झालो. ती असताना असं काही होईल असं मला वाटलं नव्हतं. पण मग ती त्याला दूर ढकलायला लागली आणि तो अजूनच घट्ट पकडायला लागला. मला त्यात पडायचं नव्हतं, मी ऑलरेडी बदनाम होतो. पण नाही राहवलं, मारला ऍक्सलरेटर दणकन.


क्रमशः

No comments:

Post a Comment