कधी कधी काय होतं, मी असाच बसलेलो असतो. लॅपटॉपच्या पडद्याकडे एकटक बघत. समोर लिहिण्यासाठीची खिडकी उघडलेली. बाजूला घराची खिडकी उघडलेली. घराच्या खिडकीतून पलिकडच्या रस्त्यावरून जाणार्या तुरळक गाड्यांचा तुरळक आवाज येतोय. मधेच माझी बेचैन नजर टीव्हीच्या रिमोटकडे जातेय. 'नाही हां. आपल्याला लिहायचंय!' असं स्वतःलाच दटावून मी पुन्हा पडद्याकडे लक्ष केंद्रित करतोय. बोटं हलवून तयारीत ठेवलीयत, न जाणो कधी वीज पडेल. समोर ठेवलेल्या अर्धवट संपलेल्या कांदे-बटाट्याच्या थैल्यांकडे नजर जाते. मग अशीच भिरभिरत राहते. एक रिकामटेकडा जीव, विचार करून करून कसला आणि किती करणार?
मग माझ्या डोक्यात दुपारी माझं एका सहकार्याबरोबर झालेलं संभाषण येतं. तो आपला मला म्हणालेला असतो, "आज नको, उद्या ये सिनेमा घ्यायला! आज त्या दुसर्याकडे जेवायला जायचंय!" मला आत्ता हे संभाषण आठवल्यावर एकदम वाटायला लागतं, "एक सिनेमा द्यायला एव्हढी नाटकं. काहीतरी असणार, ज्यासाठी मला टाळतोय. काहीतरी पार्टी बिर्टी असेल घरी आणि मला बोलवायचं नसेल. नाहीतर मग त्याचा तो मित्र आहे ना, त्यानं ह्याला सांगितलं असेल मला द्यायचं नाही, परवा त्या मेलबाजीवरून त्याच्याबरोबर मचमच झाली होती ना, त्याचं उट्टं काढायला मित्राचा वापर करत असेल!"
ह्याला म्हणतात कॉन्स्पिरसी थिअरी. आज नेमकं हेरंबनेदेखील कॉन्स्पिरसी थिअरीबद्दलच लिहिलंय. बरेचदा रिकाम्या डोक्याचे प्रताप. पोस्ट लिहायचं कन्स्ट्रक्टिव्ह काम करायचं सोडून डोकं इथे जबरा वेगात पळतं. इतका वेळ सुस्तावलेला मेंदू इथे कसा चपळ होऊन जातो. आता आमच्यासारखी पामरंसुद्धा असले विचार करू शकतात, तर महान मेंदूंचे विचार किती उच्च दर्जाचे असतील.
हल्लीच एक जबरा थिअरी वाचनात आली. "औरंगजेबानं संभाजीराजांना मारण्याचा मुस्लिम धर्माशी काही संबंध नव्हता. औरंगजेबानं संभाजीराजांना मुस्लिम धर्म न स्वीकारल्याबद्दल मारलं असतं, तर शिरच्छेद केला असता. पण त्यानं संभाजीराजांना एका ब्राह्मण मंत्र्याच्या सांगण्यावरून मनुःस्मृतीच्या आधारावर हालहाल करून मारलं!"
हे वाचलं आणि मी थेट जागेवरून उठून स्वच्छतागृहात गेलो आणि पोटभर हसलो. बाहेर आल्यावरही माझं हसू आवरत नव्हतं. न जाणे मी किती वेळ आठवून आठवून हसत होतो. माझ्या डोळ्यासमोर रामाच्या देवळात सोवळं घालून मनुःस्मृती वाचणारा औरंगजेब(प्रभाकर पणशीकर) आला. तो म्हणे कुराणाच्या प्रती स्वतःच्या हाताने लिहून विकायचा. माझ्या डोक्यात लगेच कॉन्स्पिरसी थिअरी आली. 'कदाचित, तो मनुःस्मृतीचाच फारसी अनुवाद 'कुराण' म्हणून खपवत असेल.' एकदा कॉन्स्पिरसी थिअरी डोक्यात यायला लागल्या ना की धरबंद राहत नाही. 'ऍक्च्युअली औरंगजेबच ब्राह्मण असेल. तो कदाचित जानवंपण घालत असेल.' लहान असताना मुंडण झालेला, कानात भिकबाळी घातलेला औरंगजेब डोळ्यासमोर उभा राहिलासुद्धा माझ्या! औरंगजेब (प्रभाकरपंत पुन्हा) महाराजांच्या आग्र्याहून सुटकेची बातमी ऐकून 'धिक् माम्' म्हणतोय. आणि द्वारपालाची सावली अंगावर पडली म्हणून 'शिव शिव' म्हणत स्नान करतोय, जेवणाच्या ताटाभोवती चित्रावत्या घालून 'वदनि कवळ घेता' म्हणतोय असं कैच्याकै माझ्या डोळ्यापुढे यायला लागलं.
संभाजीराजांबद्दलच्या उपरोल्लिखित वाक्यानं जो औरंगजेबाच्या ग्लोरिफिकेशनचा परिणाम साधलाय त्याला तोडच नाही, पण आमचा आपला औरंगजेबाला व्हिलन बनवायचा केविलवाणा प्रयत्न - 'पंडित औरंगजेबशास्त्री आगरकर!' झाला एकदाचा औरंगजेब व्हिलन. आता पुढे काय काय सुचतं बघू.
तर पंडित औरंगजेबशास्त्रींनी जेव्हा उत्तरेत राज्य केलं होतं, तेव्हा त्यांना चहाची चटक लागली. सारखे चहा प्यायचे. पण ते चहाला चहा नाही, 'कावा' म्हणायचे. उत्तरेत काही ठिकाणी चहाला अजूनी कावा म्हणतात. त्यामुळे काय झालं, की पं.औ.शास्त्रींचा 'कावा' त्यांच्यासारख्या बर्याच ब्राह्मण घरांमध्ये प्यायला जाऊ लागला. मग तर 'कावा' ही ब्राह्मण घरांची खासियत बनली. मग काय झालं, इतर कुणी बनवला, तर त्याला ती सर यायची नाही, असं लोकांच्या मनावर ब्राह्मणांनी बिंबवलं. त्यामुळे काय झालं, 'ब्राह्मणी कावा' एकदम फेमस झाला. जो तो 'ब्राह्मणी काव्या'चा उदोउदो करू लागला. मग सगळे ब्राह्मणांना 'कावेबाज' म्हणायला लागले. वर्षं उलटत गेली तसा 'बामनी कावा' असा अपभ्रंश झाला. (कदाचित 'बहामनी' नावाचे जे राजे होते, ते पण मुळात ब्राह्मणच असावे)
अशा प्रकारे, ब्राह्मणांनी कावा करून 'कावा' फेमस करून टाकला. मग अनेक वर्षांनी 'सुखविंदर सिंग' ह्या पंजाबी गायकानं (हादेखील प्रत्यक्षात ब्राह्मणच असणार) 'कावा कावा कावा' ह्या गाण्यातून कावा पुन्हा फेमस केला. आता संभाजी ब्रिगेड आणि कंपनीनं 'बामनी कावा' 'बामनी कावा' असा बवाल सुरू केलाय. मला तर डाऊट येतोय, की अनेक वर्षांनी पुन्हा 'बामनी काव्या'ला मुख्य प्रवाहात आणण्याचाच हा कावा आहे. हे संभाजी ब्रिगेडवालेच मुळात ब्राह्मण असावेत, त्यामुळे तेच 'बामनी काव्या'ची एव्हढी प्रसिद्धी करताहेत.
मला तर आता काळजी वाटतेय, की हे लोक 'बामनी कावा अमृततुल्य' नावाचं चहाचं दुकान काढतील आणि पुन्हा एकदा 'बामनी कावा' सफल होईल.