काल ट्रामच्या स्टॉपवर ट्रामची वाट पाहत उभा होतो. अचानक शेजारी कुणीतरी इंग्रजीत बोलल्यासारखं वाटलं. मी एकदम चमकून पाहिलं. एका आफ्रिकन(काळा) माणसाशी कुणीतरी बोलत होतं. मी थोडं वाकून पाहिलं, तर एक भारतीय उपखंडातलासा वाटणारा माणूस होता. तो चेहर्यावरून त्रासलेला वाटत होता. मला वाटलं, च्यायला दारूबिरू पिऊन आत्ता भरदुपारी धिंगाणे घालणार की काय! पण त्यांचं बोलणं वेगळ्याच विषयावर चालू असल्याचं माझ्या लगेच लक्षात आलं.
"आय कॅन स्पीक इंग्लिश!" आफ्रिकन.
"गुड! आफ्टर ए लॉन्ग टाईम आय फाऊंड समवन स्पीकिंग इंग्लिश!" आशियाई.
मला त्याचे उच्चार पंजाब किंवा पाकिस्तान बाजूचे वाटत होते. चेहरेपट्टीवरून तो त्याच बाजूचा दिसत होता. पण मी मुद्दामच तिकडे लक्ष नसल्याचं दर्शवत उभा होतो. त्याची नजर माझ्यावर पडू नये किंवा पडलीच तर मी इंग्लिश समजणारा वाटू नये ह्याची काळजी घेत मी संभाषणाकडे लक्ष देत होतो (ऑफकोर्स मी इटालियन वाटणार नव्हतो, पण बांग्लादेशी वाटलो असतो तरी चाललं असतं! )
"आय कॅन स्पीक फ्रेंच, बीकॉज आय वॉज इन फ्रान्स बिफोर, बट नॉट सो गुड इंग्लिश!" आफ्रिकन सांगत होता.
"नाईस, बट यू स्पीक गुड इंग्लिश!" आशियाई.
"रिअली? धीस इज व्हॉट आय रीड." आफ्रिकनानं एक पुस्तक काढून त्याला दाखवलं. ते बहुधा इंग्लिश शिकायचं पुस्तक होतं.
"ओह. गुड!" त्यानं एकदम अधिकारी नजरेनं पुस्तक न्याहाळलं. त्याला बर्याच दिवसांनी किंमत मिळाल्यासारखं वाटत होतं.
"आय ऍम रीडिंग धीस, एक्ससीस नंबर फोर!" आफ्रिकन.
"ए..क्स..र..सा..ई..ज" आशियाई.
"एक्ससीस." आफ्रिकन.
"नो नो नो..धीस इज नॉट फ्रेंच..धीस इज इंग्लिश यू रीडिंग..ए क्स र सा ई ज" आशियाई.
"एग्झरसाईज" आफ्रिकन. मी असतो तर इथे त्याची पाठ थोपटली असती. पण...
"एक्सरसाईज" आशियाई. त्यानं त्याला उच्चार शिकवण्याचा चंगच बांधला होता. मलाच आता ऑड वाटायला लागलं होतं. तीन-चार वेळा हेच झाल्यावर शेवटी..
"एक्सरसाईज" आफ्रिकन.
"शाब्बास." मी मनातल्या मनात. "गुड" आशियाई त्याला म्हणाला. मी त्रस्त होऊन इंडिकेटर कडे बघितलं. ट्रामला यायला अजून ३ मिनिटं शिल्लक होती. मला ह्या दोघांच्या पकाऊगिरीचा खरं म्हणजे कंटाळा आला होता, पण इंग्रजीत बोलत असल्याने विशेष लक्ष न देताही मला कळत होतं.
"यू नो, इंग्लिश इज अ नाईस लँग्वेज." आशियाई.
"ह्म्म.." आफ्रिकन.
"बट आय डोन्ट लाईक धीस फ#ग लँग्वेज हियर." आशियाई एकदम फ्रस्ट्रेट झाला होता.
आफ्रिकन हसायला लागला. "व्हाय यू डोन्ट लाईक इटालियन."
"आय डोन्ट नो, आय जस्ट हेट. व्हेन दे से ब्वोनज्योर्नो.. आय फील लाईक रनिंग अवे. आय डोन्ट लाईक धीस लँग्वेज, आय डोन्ट लाईक धीस कंट्री. आय जस्ट वॉन्ट टू रन अवे फ्रॉम हियर." आशियाई. आताशा माझे कान चांगलेच टवकारले गेले होते.
"व्हाय? यू डोन्ट हॅव पेपर्स?" आफ्रिकन.
"येस आय हॅव. आय हॅव माय सोज्योर्नो (इथलं टेम्पररी रेसिडन्ट परमिट). बट दे स्टिल चेक यू एव्हरीव्हेअर. दे गिव्ह यू परमिट ऍन्ड दे चेक यू इन द स्ट्रीट्स. दे थ्रो यू." त्याचा आवाज कापरा झाला होता.
".." आफ्रिकन फक्त बघत होता.
"आय मीन हाऊ कॅन यू थ्रो समवन हू डझन्ट नो द लँग्वेज, हू डझन्ट हॅव मनी, हू डझन्ट हॅव वर्क, हू डझन्ट हॅव हाऊस, ऑन द स्ट्रीट्स.. हाऊ कॅन यू थ्रो देम ऑन द स्ट्रीट्स." त्याच्या आवाजात कडवटपणा आणि हतबलता पुरेपूर भरलेली होती.
"आय डोन्ट वॉन्ट टू स्टे हियर. बट आय ऍम हेल्पलेस. आय कान्ट गो एनीव्हेअर. आय ऍम स्टक हिअर. आय वॉन्ट टू रन अवे. बट आय कान्ट!"
तो बोलत होता, तेव्हढ्यात ट्राम स्टॉपजवळ आली.
तेव्हढ्यात आशियाई आफ्रिकनाला म्हणाला, "यू आर गेटिंग ऑन धीस?" तर आफ्रिकन म्हणाला "नो".
मी चटकन ट्रामेत चढलो आणि खिडकीत बसलो. ट्राम सुटली आणि मी पहिल्यांदाच त्या आशियाईचा चेहरा नीट पाहिला. (इतका वेळ पाहत नव्हतो, कारण तो भारतीय/पाकिस्तानी समजून बोलायला येईल ही भीती.) त्रासलेला आणि थकलेला होता तो. ट्राम पुढे निघाली, पण त्याचा त्रस्त चेहरा डोळ्यांसमोरून जात नव्हता.
ह्यापुढे जेव्हापण निर्वासित, बेकायदा स्थलांतर, मानवी तस्करी ह्याबद्दल वाचेन किंवा बातम्या पाहिन, नेहमी हाच चेहरा डोळ्यांसमोर येत राहिल.