वेटिंग फॉर गोदो बद्दल मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं होतं तेव्हा 'टॉम ऑल्टर' त्यातली लकीची भूमिका मराठी आवृत्तीत करणार अशी काहीशी बातमी होती. तेव्हा नाटकाबद्दल चार-दोन ओळी पेपरात वाचल्या आणि त्यातलं अवाक्षरही कळलं नव्हतं. मग नाटकाबद्दल मी तसा विसरून गेलो. पण ते नाव, विचित्र नाव मी कधीच विसरलो नाही. मग पुन्हा एके दिवशी कुठेतरी ह्याच नाटकाचा उल्लेख वाचला. तेव्हा हाताशी विकिपीडिया होता. लगोलग विकिमातेला प्रणाम केला. आणि मला धक्का बसला. हे नाटक ऍब्झर्डिस्ट असल्याचं लिहिलं होतं. माझी गाडी नेहमीच ऍब्झर्डिझमपाशी येऊन थांबते. मग प्लॉट वाचायला गेलो, पण थांबलो. म्हटलं आधी नाटक वाचूया.
मग लेखक सॅम्युएल बेकेटच्या मूळ फ्रेंच पण इंग्रजी अनुवादित नाटकाचा शोध सुरू झाला. 'प्रोजेक्ट गुटेनबर्ग' नावाचा एक स्तुत्य उपक्रम आहे, खूप जुनी अनेक पुस्तकं, ज्यांचे कॉपीराईट्स एक्स्पायर झालेत, त्यांची इ-बुक्स बनवून फुकटात डाऊनलोड करायला दिली जातात. तिथेच मला २०व्या शतकात लिहिलेलं हे नाटक मिळालं. अवघं ४० पानांचं नाटक. मी म्हटलं, 'वाह, चटदिशी वाचून होईल. मग जेव्हा ती चाळीस पानं समोर धरली, तेव्हा भ्रमनिरास झाला.
कारण, नाटक ह्या प्रकाराशी इतका जवळून संबंध शाळा सुटल्यावर पहिल्यांदाच आला होता. अर्थात शाळेतही, एकदाच स्नेहसंमेलनाला केलं होतं म्हणा. पण नाटकाचं वाचन, तेही काही दशकं जुनं, प्रगल्भ नाटक. मी तीन-चार ओळींतच पानं खाली ठेवून दिली.
मग ६-७ महिने उलटले. एका शुक्रवारी संध्याकाळी मला कुठेतरी जायचं होतं. मी ठराविक वेळ होण्याची वाट पाहत होतो आणि अश्या कंटाळवाण्या प्रतिक्षेच्या क्षणीच योगायोगानं मला 'वेटिंग फॉर गोदो' ची आठवण झाली. माझा पराभव करणारं एक छोटंसं नाटक. मी निर्धाराने ते पुन्हा हातात घेतलं आणि कष्टानं पहिल्या १०-१२ ओळी वाचल्या. आणि ह्यावेळी मात्र जमलं होतं. मी हळूहळू नाटकात शिरू लागलो. व्लादिमीर आणि एस्त्रागॉनच्या जगात पोचलो होतो. ती संध्याकाळ, तो निर्मनुष्य रस्ता, ते पानगळ झालेलं झाड, तो एस्त्रागॉन बसतो तो कट्टा, ते एस्त्रागॉनचे बूट, विसरभोळा एस्त्रागॉन आणि ठाम, तत्वज्ञानी व्लादिमीर. नाटकाची टॅगलाईनच सांगते, 'ए ट्रॅजिकॉमेडी इन टू ऍक्ट्स'. कदाचित हे नावातच दिल्यामुळे असेल, पण वाचताना खरंच प्रत्येक ओळीला कारूण्याची एक अदृश्य झालर जाणवत राहते. व्लादिमीर आणि एस्त्रागॉनची बरेचदा असंबद्ध आणि विस्मृतीने ल्यालेली संभाषणं विनोदाची निर्मिती तर करतात, पण त्यांचं शेवटचं, 'नथिंग टू बी डन.' त्यांची असहायता पुढे आणतं. आणि मग, "व्हाय कान्ट वी गो?" , "वी आर वेटिंग फॉर गोदो!" "आह.." हे प्रत्येक संवादाचं धृवपद ठरतं.
त्यांच्या एक झाड, कट्टा आणि रस्त्याच्या जगात पोझ्झो आणि लकी प्रवेशतात. पोझ्झो हा एक निर्दयी जमिनदार आहे आणि लकी त्याचा गुलाम. तो लकीकडून अशी अशी कामं करून घेतो, जी पोझ्झोची अमानुषता दर्शवतात. पण मजा म्हणजे, लकीही ती कामं अगदी मन लावून करत असतो. पोझ्झो त्याला, 'पिग', 'हॉग' म्हणून संबोधतो. एका प्रसंगी तर त्याला लकी म्हटल्यावर तो 'ओ' देत नाही, पण 'पिग' म्हटल्यावर लगेच 'ओ' देतो. पोझ्झोच्या म्हणण्यानुसार, त्याला आता लकी नकोय, कारण तो म्हातारा झालाय, त्यासाठीच तो त्याला विकायला निघालाय. पण लकीला त्याला सोडून जायचं नाहीये, म्हणून तो अधिक जास्त आज्ञाधारकपणा दाखवतोय, जेणेकरून पोझ्झो त्याला विकणार नाही. पोझ्झोचं एकंदर आगाऊ आणि दांभिक वागणं, तो व्लादिमीर आणि एस्त्रागॉनशी वागताना मात्र दाखवत नाही. ते दोघे त्याचे वेळ घालवण्याचे साथी असल्याने तो त्यांना समान वागणूक देतोय, असे तो म्हणत राहतो. व्लादिमीर आणि एस्त्रागॉनची लकीबद्दलची सुरूवातीची अनुकंपा, नंतर लकीच्याच विचित्र वागण्यानं कमी होते. मग लकी आणि पोझ्झो निघून जातात. थोड्या वेळाने गोदोचा संदेश घेऊन एक मुलगा येतो आणि गोदो आज येणार नाही, उद्या नक्की येईल असे सांगून जातो. संध्याकाळ संपते, रात्र सुरू होते. पहिला अंक पडतो.
एव्हढे वाचून मी बाहेर गेलो, पण मला त्याच दिवशी पूर्ण वाचायचं होतं. पण मग परत यायला उशीर झाल्यामुळे मी शनिवारी पुन्हा नाटक उचललं.
तीच जागा, पण ह्यावेळी झाडाला पालवी फुटलेय. पुन्हा व्लादिमीर आणि एस्त्रागॉन उगवतात. पुन्हा ते दोघे दिवसभर काय केलं ह्याच्या चर्चा करतात. पुन्हा गाडी विविध असंबद्ध आणि विसराळूपणाच्या संवांदावरून फिरत, "नथिंग टू बी डन." आणि "वी आर वेटिंग फॉर गोदो." वर येऊन थांबते. आश्चर्य म्हणजे, पुन्हा लकी आणि पोझ्झो येतात. ह्यावेळी, पोझ्झो आंधळा झालाय. लकी अजून म्हातारा झालाय. एस्त्रागॉन त्या दोघांनाही ओळखत नाही, पण व्लादिमीर ओळखतो. ह्यावेळी, रंगमंचावर सगळीच पात्र कोलमडतात आणि मग मदत आणि मानवजात सारख्या गहन विषयांवर अतिशय सामान्य भाषेमध्ये अर्थपूर्ण चर्चा होते. लकी आणि पोझ्झो पुन्हा निघून जातात आणि पुन्हा व्लादिमीर आणि एस्त्रागॉन वाट पाहत राहतात. शेवटाकडे पुन्हा एक मुलगा येतो, ह्यावेळी हा दुसरा मुलगा असतो. तो पुन्हा गोदोचा तोच संदेश देतो, की गोदो आज नाही येणार उद्या येईल आणि निघून जातो.
व्लादिमीर आणि एस्त्रागॉन रात्र पडल्यामुळे, 'आता आपण जाऊया.' म्हणतात आणि पहिल्या अंकाप्रमाणेच जागचे न हलता बसून राहतात.
नाटक फक्त संध्याकाळींंचंच वर्णन करतं. व्लादिमीर आणि एस्त्रागॉनच्या संवादांवरून जाणवतं, की ते दोघे रात्र आणि दिवस वेगवेगळे असतात, पण संध्याकाळी मात्र ते वाट बघायला ह्या विवक्षित ठिकाणी येतात. गोदो कोण आहे, हे त्यांच्या संवादांवरून पुसटसंच जाणवतं. प्रत्यक्षात दोघेही गोदोला नीट ओळखत नाहीत. एस्त्रागॉन तर विसरभोळा आहे, पण व्लादिमीरही 'गोदो आपल्याला कसलीतरी प्रार्थना शिकवणार आहे' असं काहीसं सांगतो. एस्त्रागॉन रोज कुणाकडून तरी मार खाऊन येतो.व्लादिमीर रोज त्याला सांगतो, की मी आहे म्हणून तू आहेस, मी नसतो तर तुझं काय झालं असतं. दोघे अनेकदा एकमेकांवर चिडतात, पण मग एकमेकांना मिठी मारतात आणि एकमेकांना सावरतात.
लकी आणि पोझ्झो ही जोडी मालक आणि गुलामाची जोडी आहे. पोझ्झो लकीकडून वाट्टेल ते करवतो. लकीच्या गळ्यात एक दॉरी बांधलेली आहे, जिचं एक टोक पकडून पोझ्झो चालतो(ह्या दोरीचा परिणामकारक वापर स्टेजचं माप घेऊन दृश्य परिणामासाठी सुद्धा केलाय). पोझ्झोच्या हातात एक चाबूक सुद्धा आहे, जो फटकावून तो वेळोवेळी लकीचं लक्ष वेधून घेतो. लकी खूप सारं सामान घेऊन फिरतो. तो दमलाय, तो उभ्याउभ्याच पेंगतो आणि मग पोझ्झोच्या शिव्या खातो. पोझ्झो त्याला गायला, नाचायला तर सांगतोच, पण करमणुकीसाठी 'विचार करायला' पण सांगतो. व्लादिमीर आणि एस्त्रागॉन, पोझ्झोची साथ दिल्याच्या मोबदल्यात करमणूक म्हणून लकीला विचार करायला लावतात. लकीचं प्रकट विचार करणं हा नाटकाचा एक हायपॉईंट आहे. तो प्रसंग, लकीचं काम करणार्या नटाची परीक्षा पाहणाराच असेल. पोझ्झो जेव्हा दुसर्या अंकात येतो तेव्हा तो आपण 'ब्लाईंड ऍज फॉर्च्युन' झाल्याचं सांगतो. ह्यावरून लेखक नशीब आणि धन ह्या दोन्हीवर श्लेष तर साधतोच पण पोझ्झो नक्की कशाचं प्रतिनिधित्व करतोय हे ही सांगतो.
अंकांच्या शेवटी येणारी मुलं हा अजून एक विचित्र भाग आहे. दोन्ही वेळेला मुलं आपल्या दुसर्या भावाविषयी बोलतात. दोन्ही वेळेस ही मुलं आपल्या भावाबरोबर गोदोसाठी काम करत असल्याचं सांगतात, पण कधीही ती दोन्ही मुलं भाऊ असल्याचं स्पष्ट होत नाही. व्लादिमीर दोन्ही वेळी चौकशी करतो, पण ती मुलं आपण व्लादिमीरला पहिल्यांदाच भेटत असल्याचं सांगतात.
नाटकाच्या संपूर्ण संवादांमध्ये सांकेतिकता पुरेपूर भरलीय. व्लादिमीर आणि एस्त्रागॉन एकमेकांशी जे काही बोलतात, त्यावरून त्या दोघांची शोकांतिका सामोरी येत राहते. ते दोघे, जीजस बरोबर सुळावर गेलेल्या दोन चोरांबद्दल बोलतात. त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या गॉस्पेल्समध्ये असलेल्या वेगवेगळ्या दृष्टिकोनाबद्दल बोलतात. इथे मला 'राशोमान'ची बीजं जाणवतात. नंतर ते एस्त्रागॉनच्या कवी असण्याबद्दल बोलतात, तेव्हा तो कवी होणं मला परवडणारं नसल्याचं बोलतो. इथे मला 'प्यासा'ची बीजं दिसतात. लकी आणि पोझ्झो कोसळलेले असताना, आणि आंधळा पोझ्झो मदतीची याचना करत असताना व्लादिमीर आणि एस्त्रागॉन जे बोलतात, ते असंच समजावायला एखाद्या तत्ववेत्त्याला पुस्तक लिहावं लागेल, पण नाटकातला तो सहज आणि सुंंदर संवाद ५ मिनिटांत खूप मोठं तत्वज्ञान समजावून जातो. व्लादिमीर आणि एस्त्रागॉनची पात्र ही न उलगडणारी कोडी आहेत. ते नक्की काय आहेत, ह्यावर अनेक दिग्गजांचे मतभेद आहेत. कुणाला ते घट्ट मित्र वाटतात, तर कुणाला समलिंगी जोडपं. पण मला ती पात्र ह्याहीपेक्षा वेगळी वाटतात. मला ती पात्र जगात दोन व्यक्तिंमध्ये असू शकणार्या सगळ्या नात्यांचं प्रतिनिधित्व करणारी वाटतात.
लकी आणि पोझ्झो ही दोन पात्रं अनुक्रमे शोषित आणि शोषकाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांचे संवाद हे आजही ह्या दोन वर्गांचं प्रतिनिधित्व करतात. शोषित शोषकांचंच लांगुलचालन करत राहतो आणि शोषक शोषत राहतो. पुन्हा, शोषक शोषिताचे विचारही करमणुकीसाठी ऐकतो. इतकी भेदक वक्तव्य नाटकात विनोदी स्थितीमध्ये होतात. ह्या नाटकाची खासियतच अशी आहे, की विनोद हा त्या पात्रांच्या स्थितीमुळे येतो. ती पात्र हसत नाहीयेत, ती आनंदी नाहीयेत. सगळीच पात्र दुःखी आहेत. पण त्यांचं दुःख आपल्यासाठी 'तमाशा' बनलंय.
व्लादिमीर आणि एस्त्रागॉन एकमेकांबरोबर रोज त्याच ठिकाणी येतात आणि रोज, हीच जागा आहे की नाही ह्यावर वाद घालतात. आपण मूळचे ह्या भागातले नसल्याने आपल्याला कल्पना नाही असं सांगत राहतात. जरी नाटकात सलगचे दोन दिवस असल्याचं लिहिलेलं असलं, तरी ते दोन दिवस सलगचे आहेत का? आणि असे किती दिवस आधी आणि किती दिवस नंतर ते वाट पाहणार आहेत? आणि ते दोघे कधी वेगळे तरी होतात का? कारण शेवटीही आपण जाऊया म्हणून ते जागचे हलत नाहीत. असे कित्येक प्रश्न आपल्याला पडत राहतात. त्यांच्या संवादांमधून त्यांच्या वाट पाहण्याचा कालावधीचा एक पुसटसा अंदाजही येतो. लकी आणि पोझ्झोचं त्यांच्या आयुष्याच्या 'रस्त्या'वरचं त्यांना अचानक भेटणं, आणि त्यांचं 'नथिंग' हे काहीतरी असल्यागत 'नथिंग' टू बी डन म्हणणं, ह्यातून लेखकाची जबरदस्त प्रतिभा दिसत राहते.
गोदो हे असं पात्र आहे जे कधी येतंच नाही. पण त्याची चर्चा बरेचदा होते. त्याच्या कामाच्या स्वरूपाबद्दलही बोलणं होतं. त्याचे दोन दूतही येऊन जातात. काही नाट्यसमीक्षकांच्या म्हणण्यानुसार 'गोदो' जो कसलीतरी प्रार्थना शिकवणार असतो, तो म्हणजे देव किंवा प्रेषित आहे आणि ती दोन मुलं, म्हणजे दूत किम्वा एंजल्स सारखे. पण एक नक्की, की गोदो, दिदि आणि गोगो (व्लादिमीर आणि एस्त्रागॉन एकमेकांना असे बोलावतात) ची वाट पाहण्यातून मुक्तता करू शकतो. त्यांना मोक्ष मिळवून देऊ शकतो.
एकंदरित, मोक्षप्राप्तीसाठी किंवा उद्धारासाठी कायम कुणा 'गॉड'(God) किंवा 'गोदो'(Godot) ची वाट पाहत राहणार्या मर्त्य मानवाची एक रुपककथा असं हे नाटक आपल्यावर गारूड करून जातं हे नक्की. जेव्हढ्या वेळा हे नाटक वाचावं तेव्हढ्या वेळा नवं काहीतरी मिळत जाईल. आता फक्त एकदा, ह्या नाटकाचा प्रयोग बघायचाय. कुठल्याही भाषेत असला, तरी काय फरक पडणार आहे. व्लादिमीर, एस्त्रागॉन, पोझ्झो आणि लकी तर इथे माझ्या डोक्यात बसलेत.