Showing posts with label संस्कृती. Show all posts
Showing posts with label संस्कृती. Show all posts

2/20/2011

आरसा

मी जिथे काम करतो तिथे विविध देशांमधल्या विविध यंत्र बनवणार्‍या कंपन्यांची माणसं येत असतात. अन त्यातल्या बहुतेक कंपन्या अन त्यांची माणसं गेली कित्येक वर्षं आमच्या कंपनीत येताहेत. त्यामुळे त्यांना आमच्या मुंबई ऑफिसातून येणार्‍या इंजिनियर्सबद्दल माहिती असते. त्यामुळे इटालियन कंपनीच्या ऑफिसात भारतीय माणूस चर्चेसाठी बसलेला पाहून कुणालाही सहसा आश्चर्य वाटत नाही, किंबहुना आम्ही भारतीय आहोत हे त्यांना आधीपासूनच ठाऊक असतं (हे आधीच स्पष्ट करण्याचं कारण पुढे कळेल). तशातच मध्यंतरी एका जुन्याच इटालियनच कंपनीची माणसं चर्चेसाठी आली होती. नेहमीप्रमाणे दुपारी जेवायला मी त्यांच्याचबरोबर गेलो. माझा सहकारी इटालियनच असल्याने सगळे त्यांच्या भाषेत सुरू होते. माझ्यासमोर त्यांच्यातला एक मनुष्य बसला होता. तो माझ्याशी बोलू लागला. त्यानं पहिल्याच प्रश्नावर माझी दांडी उडवली अन बर्‍यापैकी पुढे वैचारिक असं आमचं संभाषण झालं. ते असं -
(मी संवाद मराठीमध्ये अनुवादित केला आहे)

तो- माफ कर पण मला एक सांगा, तू नक्की कुठला आहेस? (मला पहिला यॉर्कर, माझा घास घशातच अडकला)
मी- (त्याच्या चेहर्‍यावरचे भाव निरखत) भारत.
तो- ओह, भारत! (हे वाक्य एखाद्या मुंबईतल्या अमेरिकन कॉन्सुलेटच्या फेर्‍या मारून थकलेल्या व्हिजाकांक्षी तरूणानं 'ओह, अमेरिका!' म्हणावं, त्या थाटात तो म्हणाला, जे अर्थातच खोटं असल्याचं मला ठाऊक होतं.)
मी- (मला का कुणास ठाऊक असं वाटलं की त्याला मी भारतीय आहे हे ठाऊक आहे अन तो शहर विचारत होता म्हणून लगेच म्हटलं) मुंबई!
तो- (मगाचच्याच थाटात) ओह, मुंबई!
मी- (त्याच्या चेहर्‍यावरचे भाव निरखत फक्त केविलवाणा हसलो)
तो- मग तुला मिलानचं ट्रॅफिक आणि मुंबईचं ट्रॅफिक ह्यांच्यात काय चांगलं वाटतं? (मला दुसरा यॉर्कर! काय संबंध ह्या प्रश्नाचा?)
मी- (पूर्ण गोंधळल्याचे भाव चेहर्‍यावर) मिलान! (तो मिलानचा नसून ऑस्ट्रियन बॉर्डरवरच्या एका छोट्या अन अजून सुबक शहरातला असल्याचं मला ठाऊक होतं)
तो- (आता तो गोंधळला) हे आश्चर्य आहे! तू पहिला माणूस भेटलास मिलानच्या ट्रॅफिकला चांगलं म्हणणारा! (बहुतेक त्याला आजवर युरोपबाहेरचा कुणी भेटलाच नाही)
मी- तू मुंबईला आला नाहीयेस बहुतेक अजून. मुंबईचं ट्रॅफिक म्हणजे सावळागोंधळ असतो.
तो- ओह, मला फिरण्याची फारशी आवड नाही. मी फक्त इटलीच्या उत्तरेकडेच फिरतो, तेही जास्त करून फार उत्तरेकडचा युरोप, स्कॅन्डेनेव्हिया वगैरे. मला फारसं आवडत नाही अजून कुठे जायला.
मी- (मनातल्या मनात - चूलकोंबडा आहेस म्हण ना! अन बाहेर) ओह, छान! चांगलं आहे.
तो- इटली अन उत्तरेकडच्या देशांचा फरक लगेच कळतो रे!
मी- माझ्या चेहर्‍यावरचं प्रश्नचिन्ह त्यालाही दिसलं.
तो- म्हणजे स्वच्छता, शिस्त, टापटीप.
मी- ह्म्म!(माझ्यासाठी आधीच मिलानदेखील, स्वच्छ अन टापटीप आहे. अर्थात इतर युरोपच्या मानानं इटली गलिच्छ म्हणता येईल. पण एका इटालियन माणसानंच इटलीची अशी अब्रू काढावी हे माझ्यासाठी नवल होतं.)
तो- अरे हायवेवरून जाताना कळत माहितीय. तू हायवेला कुठल्यातरी रेस्टॉरंटमध्ये थांब अन तिथल्या स्वच्छतागृहामध्ये जा!(मी कान देऊन तो पुढे काय बोलतो ते ऐकत होतो अन मनातल्या मनात ह्या सुट्टीमध्ये फूडमॉलमध्ये एशियाड थांबली असतानाच्या आठवणी जागवत होतो) तुला माहितीय ऑस्ट्रियामध्ये लहान मुलांसाठी सेपरेट स्वच्छतागृह असतात?
मी- अच्छा!(मधेच ह्याच्या गाडीनं हायवेवर टर्न घेतला. अन मुलांसाठी स्वच्छतागृह तर मी मिलानमधल्या मॉलमध्ये पण पाहिल्याचं मला स्मरत होतं (बहुतेक मुंबईतल्यापण).)
तो- हां, तर ऑस्ट्रियातली हायवे रेस्टॉरंट्सची स्वच्छतागृह बघ अन इटलीतली बघ, फरक लगेच कळतो.
मी- एक सहमतीचं हास्य.
तो- अरे इटलीतली इतकी गलिच्छ असतात की जावंसं वाटत नाही, अन ऑस्ट्रियातली अशी असतात की तू ऍक्च्युअली त्यांना लिव्हिंग रूम समजून तिथेच राहू शकतोस.
मी- आयला हो? (इथे इंग्रजीतलं 'रियली?' असं होतं. अन मी मनात म्हटलं की बरंय बाबा हा भारतात नाही आला.)
तो- माझ्या मते सार्वजनिक स्वच्छतागृह हा स्थानिक संस्कृतीचा अन समाजाच्या मानसिकतेचा आरसा असतो.
मी- खरं आहे! (स्वामीजींनी एक जबरदस्त 'पते की बात' फायनली केली होती. त्याचं वाक्य मला पुरेपूर पटलं होतं.)

माझ्या शेवटच्या 'खरं आहे!' मधली सत्यता त्यालाही जाणवली अन तो खुष झाला. आणि मग स्वच्छतागृह पुराण थांबवून कामाची थोडी चर्चा करू लागला. मीही केव्हापासून तो 'भारतात हे कसं असतं?', असं काहीतरी विचारेल ह्या दहशतीखाली जेवत होतो, ते आता मोकळेपणाने जेवू लागलो.