3/06/2011

उगाच काहीही -१

गेले काही दिवस फारच दणकट, भरभक्कम वगैरे लिहितोय असा काहीतरी माझा स्वतःचाच गैरसमज झाला. त्यामुळे वैचारिक थकवा आल्याचा एक आभास निर्माण झाला. त्यामुळे एरव्हीही वेळेवर चालण्यास नकार देणारी आळशी बुद्धी आज सरळ डोक्यावर चादर ओढून झोपून राहिली. कारणमीमांसा करण्यासाठी खोलात जाऊन विचार करायचा प्रयत्न केला तर हिवाळा असूनपण एकदम खूप उकडायला लागलं. मग लक्षात आलं की फार खोलात जाता जाता पार बेसमेंटमध्ये पोचलोय हॉटेलच्या. (हा केविलवाणा विनोद पाणचटपणाचा रजनीकांतावा 'घात' होता हे मलासुद्धा ठाऊक आहे, त्यामुळे स्वतःला 'आवरा' ची आवर्तनं करण्यापासून आवरा.) आता मी कंसामध्ये जोशात येऊन 'रेझ्ड टू रजनीकांत' असं लिहिणार होतो, मग चटकन जीभच चावली. धेडगुजरी माध्यमात शिकल्याचे परिणाम असे पदोपदी दिसतात. मग थोडा डोक्यावर जोर दिला. आठवीपासून गणित आणि शास्त्र 'वाघिणीच्या दुधात' मिसळून प्यायला सुरूवात केलेली, त्यामुळे 'राज पिछले जनम का' स्टाईल मी एक एक वर्ष मागे मागे जात होतो. मग एकदम 'सत्तावीस म्हणजे तीनाचा कितवा घात?' असले अवसानघातकी प्रश्न आठवायला लागले. 'घातांकां'नी माझ्या शालेय जीवनात किती आतंक माजवला होता ते फारसं सांगत नाही, पण त्याकाळात आलेल्या सनी देओलच्या 'घातक' नावाच्या सिनेमाचं नाव माझ्या मित्राने 'घातंक' असं वाचल्याचं स्मरतं. ज्यावरून घातांकांच्या त्याच्या आयुष्यावरील प्रभावाची एक पुसटशी कल्पना येऊ शकते.
'घातांक' वगैरे एकदम घातपाती नावं लेवून माझ्या बालआयुष्याच्या 'वर्ग-घनमुळावर' उठलेल्या गणितानं अनेकदा सुवर्णगुणोत्तराचेही प्रत्यय दिले, पण एकंदरच गणिताचं गणित मला कधीच सुटलेलं नाही. एका वर्षी पार 'पर्थ' च्या खेळपट्टीवर विक्रम राठोडला मॅकग्रासमोर उभा करावा तशी स्थिती, तर एखादेवर्षी एकदम वानखेडेच्या खेळपट्टीवर वॉर्नला पार जतीन परांजपेसुद्धा स्टेडियमबाहेर भिरकावत होता तद्वत स्थिती. गणितासारख्या निश्चित गोष्टीमध्ये मी दाखवत असलेल्या अनिश्चित प्रावीण्याचं मला नेहमीच नवल वाटत आलेलं आहे. असं अनिश्चित प्रावीण्य मी बर्‍याच गोष्टींमध्ये दाखवत आलेलो आहे उदा.विमानात तीन-चार तास सलग एका जागी मला बसवत नाही, उठून उभा तरी राहतो, किंवा बसण्याच्या स्थितीत बदल तरी करतो. पण ह्यावेळेसच्या भारतवारीत मी एका खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये सलग साडेपाचतास बसण्याची स्थितीही न बदलता यशस्वीरित्या प्रवास करण्याचा भीमपराक्रम गाजवला. तसं बघायला गेलं तर 'अनिश्चितता हीच एकमेव निश्चितता आहे' वगैरे तत्वज्ञानं मी अक्षरशः जगतो. (असं एकतरी वाक्य लिहिलं की पोस्ट 'पूर्ण' झाल्यागत वाटतं.)
अनिश्चितता आपल्या दैनंदिन आयुष्याचा किती अविभाज्य भाग बनलेली आहे ह्याचा प्रत्यय आपल्याला अक्षयी येत राहतो. मागचं वाक्य कसलं भारी जमलं मला. तर अनिश्चितता इतकी वाढलीय की माझ्या एका मित्राचा चक्क रक्तगट दोन वेगवेगळ्या चाचण्यांमध्ये वेगवेगळा आला. पहिल्या चाचणीला 'बी पॉझिटिव्ह' आणि दुसर्‍या चाचणीला 'ए पॉझिटिव्ह'. मी पाणचट विनोद केला, "अरे पहिल्यांदा ते म्हणाले 'बी पॉझिटिव्ह', पुढच्या वेळेस पोहोचेपर्यंत तू आयुष्याबाबत पॉझिटिव्ह झाला होतास, त्यामुळे त्यांनी तुला 'ए पॉझिटिव्ह' असं संबोधित केलं." तिसरा एक मित्र माझ्या डोक्यात घालण्यासाठी काही मिळतं का ह्यासाठी आजूबाजूला चाचपू लागला, पण ह्याचं समाधान नाही, "पण मग पुढच्या वेळेस 'ओ पॉझिटिव्ह' आला तर?" मी एक छद्मी हास्य केलं. वानखेडेची खेळपट्टी होती आणि वॉर्न जतीन परांजपेला बॉल टाकत होता. "पुढच्या वेळेपर्यंतही जर तू पॉझिटिव्ह राहिलास तर त्यांना तुझ्याबद्दल आदर निर्माण होईल आणि ते तुला 'ओ पॉझिटिव्ह' म्हणून संबोधित करतील." तिसर्‍याला अजूनही काही मिळालं नव्हतं.
असो. विषयावरून भरकटलो. तर आपण कुठे होतो? हां. मी खोलात जाऊन विचार करायचा प्रयत्न केला. 'प्रयत्न केला' हे महत्वाचं आहे. कारण विचार माझ्याच्यानं फारसा झाला नाही. एव्हढंच लक्षात आलं की आपण 'विनोदी' लिहायला हवं. आता विनोदी 'लिहायला हवं' हे जरा आगाऊ नाही वाटत? 'लिहायला हवं' म्हणून लिहायला तो काय इंजिनियरिंगचा 'आऊट ऑफ सिलॅबस' पेपर आहे की 'गोध्रा जळितकांडावर जस्टिस बॅनर्जीनं लिहिलेला रिपोर्ट' आहे? अर्थातच हे सुज्ञ प्रश्न मला 'विनोदी' लिहिण्याचा विचार आल्यानंतर पडले. आणि माझा चेहरा पडला. विनोदी लिहायचंय म्हणून विनोदी लिहिता आलं असतं तर किती बरं झालं असतं! असा एक स्वार्थी विचार एक क्षण मनाला चाटून गेला. तरीही पडलेला चेहरा उचलून परत लावला आणि लिहायला बसलो. पण आज पर्थची खेळपट्टी आहे आणि मॅकग्रा बॉलिंग टाकतोय!

(पुढचे भाग येऊ नयेत अशी मनोमन इच्छा आहे. पण तरी आलेच तर अनुक्रमांकांची सोय आत्ताच करून ठेवतोय.)

28 comments:

 1. चूक झाली माफी असावी

  ReplyDelete
 2. >> 'गोध्रा जळितकांडावर जस्टिस बॅनर्जीनं लिहिलेला रिपोर्ट' आहे?

  ओब्रायनपेक्षा लांबचा षटकार !!!

  ReplyDelete
 3. Anonymous8:25 PM

  बाबा सुटलायेस अक्षरश: ...
  जाम मजा आली वाचताना... तू आणि हेरंबने काय छळ मांडलाय रे शब्दांचा :)

  फार उपमा खाल्ला या पोस्टमधे :) ... काही विनोद तर खरोखर्री लय पांचट होते, म्हणून आवडले ;)

  ए, बी, ओ पॉजिटिव्ह .. :)

  ReplyDelete
 4. आयला षटकार मारुन आम्हाला आउट केलस, उगाच काहीही ;)

  ReplyDelete
 5. विभि...रुममध्ये युसुफ़ पठाणचा फ़ोटो आहे का रे ??? कसला सुटला आहेस. :D

  ReplyDelete
 6. सुपर..
  'लिहायला हवं' म्हणून लिहायला तो काय इंजिनियरिंगचा 'आऊट ऑफ सिलॅबस' पेपर आहे की 'गोध्रा जळितकांडावर जस्टिस बॅनर्जीनं लिहिलेला रिपोर्ट' आहे?

  लोळालोळी

  आणि सलग ट्रेन मध्ये बसणं हे नांदेड-मुंबई वेळचं असावं.. नाही का? ;)

  ReplyDelete
 7. लेख पुण्यात मिळणाऱ्या पायजम्यानइतकाच दणकट आणि इनोदी ....... :)

  ReplyDelete
 8. >> विनोदी लिहायचंय म्हणून विनोदी लिहिता आलं असतं तर किती बरं झालं असतं! >>

  खरं... किती बरे झाले असते..

  ReplyDelete
 9. साष्टांग नमस्कार प्रभु :)

  ReplyDelete
 10. Anonymous5:45 AM

  >>> आणि सलग ट्रेन मध्ये बसणं हे नांदेड-मुंबई वेळचं असावं.. नाही का? ;)

  होय रे आनंदा ... सही जबाब (बाबाच्या आधिच देतेय मी उत्तर )

  हेरंबला घाबरवायला ’पेब’ असे म्हणायचे आणि बाबाला घाबरवायला त्याला तपोवनचे तिकीट द्यायचे ;)

  ReplyDelete
 11. व्वा बाबा! क्या बात है? सुपर्ब! डोक्यावर चादर ओढून असं लिहित असाल तर मग काय बघायलाच नको! मस्त लोळालोळी+१+१+१...

  ReplyDelete
 12. सागरा,
  मीबी माफी मागतो! :)

  ReplyDelete
 13. हेरंब,
  :D :D

  ReplyDelete
 14. तन्वीताई,
  हेहेहे! शब्दांचा छळ करण्यासाठीच जन्म आपुला! :P
  >>फार उपमा खाल्ला या पोस्टमधे
  तरी मला फारसा जमत नाही.. रवा भाजला जात नाही नीट! :D

  ReplyDelete
 15. योगेश,
  काल पठाणची खेळी पाहिलेली... त्यामुळे.. :D

  ReplyDelete
 16. आनंद,
  होय तोच तो प्रवास!! स्वदेस स्टाईल एकदम.. फक्त कुल्हडमधलं पाणी विकायला पोरगा आला नाही ;)

  ReplyDelete
 17. इंद्रधनू,
  हाहाहा.. पुण्यातले पायजमे! ;)
  धन्यवाद!

  ReplyDelete
 18. माऊताई,
  :)

  ReplyDelete
 19. मयूर,
  हो ना रे.. पण नाही जमत म्हणून पु.लं. , अत्रेंसारखे दिग्गज आपल्याला लाभले! :)
  धन्यवाद रे भावा!

  ReplyDelete
 20. विशालदादा,
  अरे कसचं कसचं! :)

  ReplyDelete
 21. तन्वीताई,
  हेहेहे... मी नाही हो घाबरत... फक्त तिकिट सेकंड एसीच्या वरचं कुठलंही द्या म्हणजे झालं ;)

  ReplyDelete
 22. विनायकजी,
  खूप खूप आभार...आता चादर लवकर कवकर काढून टाकायला हवी! :)

  ReplyDelete
 23. बीएओ... ;)

  अबे ओ! अक्षरश: सुटला आहेस तू... :)

  स्वदेस स्टाईल प्रवास मी दरवेळी करतेच. मजा येते. उठलं की सुटलं... अमूकच हवं यात अडकून पडलं की घोळच घोळ. :D अशीही मी देशस्थ, त्यामुळे... ;)

  ReplyDelete
 24. श्रीताई,
  हेहेहे... नुसता सुटलो नव्हतो.. हाताबाहेर गेलो होतो :D
  आणि देशस्थी घोळाचा अंदाज स्वानुभवावरूनच आहे ;)

  ReplyDelete
 25. Anonymous10:55 PM

  आणि हे जतीन परांजपेच दणदणीत शतक...बाबा, धमाल एकदम...!!! :)

  ReplyDelete
 26. देवेन,
  :D धन्यवाद रे!

  ReplyDelete