3/27/2011

माणुसकी

तो निर्विकार चेहर्‍यानं गाडी चालवत होता. त्याच्या शेजारच्या सीटवर दोन लहान मुलं खिडकीला टेकून डोळे विस्फारून बाहेरचं दृश्य पाहत होती. मागच्या सीटवर त्या मुलांची आई होती. गाडीची गती सामान्यच होती. प्राप्त परिस्थितीही जास्त वेगास अनुकूल नव्हती अन रस्त्यांची स्थितीही. तो हेच काम गेले कित्येक दिवस करत होता. त्यामुळे त्याच्या चर्येवर किंवा मनोवस्थेवर फारसा परिणाम होत नव्हता. थंडपणे त्यानं गाडी एका ठिकाणी उभी केली आणि गाडीचं इंजिन बंद केलं. एकदम स्मशानशांतता पसरल्यासारखी वाटली. त्यानं एकवार मुलांकडे अन मग मागे बसलेल्या त्यांच्या आईकडे पाहिलं. तिघंही कुठेतरी हरवलेली होती. त्याला थोडं अवघडल्यासारखं वाटलं. तो थोडासा खाकरला. मुलांची आई एकदम भानावर आली आणि डोळ्यांतलं पाणी टिपत तिनं त्याच्याकडे पाहून मान हलवली. तो चटकन गाडीचा दरवाजा उघडून बाहेर उतरला आणि मुलांच्या बाजूला आला. आधी त्यानं आईचा दरवाजा उघडला आणि ती उतरल्यावर मग मुलांचा दरवाजा. पण आईला आधी उतरवण्याचा त्याचा उद्देश सफल झाला नाही. मुलं वार्‍यासारखी वेगात समोर अथांग पसरलेल्या सिमेंट-विटा-मातीच्या ढिगार्‍याकडे धावली आणि आई फक्त हताशपणे पाहत राहिली. तो दरवाजाही न लावता ते विचित्र दृश्य पाहत उभा राहिला.
रोज थोड्याफार फरकानं अशीच दृश्यं पाहूनही रोज ह्याच क्षणी त्याच्या अंगावर सरसरून काटा येत असे. नजर जाईल तिथवर पसरलेला तो ढिगारा. धरणी अन समुद्राच्या रौद्र रूपाने उद्भवलेल्या दुहेरी नैसर्गिक संकटानंतर उरलेले मानवी संस्कृतीचे अवशेष. त्याखाली न जाणे किती संसार गाडले गेले असतील, किती स्वप्नं मातीत पुरली गेली असतील, किती महत्वाकांक्षा क्षणात जमीनदोस्त झाल्या असतील आणि किती मायेला आसुसलेले जीव थेट धरणीमातेच्या कुशीत विसावले असतील. कशाचाच थांग लागू न शकणार्‍या त्या ढिगार्‍याच्या भयंकर पोकळीमध्ये आपल्या संसारांचे, नात्यांचे किंवा स्वप्नांचे अवशेष शोधणारे ते व्याकुळ जीव रोजच्या रोज पाहताना त्याच्या गणवेषाच्या इस्त्रीआतला माणूस रोज चुरगळला जायचा. दूर दूर नजर फिरवल्यावर फक्त शोधकाम करणारे किंवा आपल्याच भूतकाळामध्ये वर्तमानाशी लढण्यासाठी एक आधार शोधणारी माणसं. पण क्षणात तो भानावरही यायचा. आजही आला. त्यानं स्वतःला सावरलं. दरवाजा बंद केला. गणवेषाचा शर्ट ठीकठाक केला. टोपी नीट केली आणि अदबीनं पुढे झाला. थोड्या अंतरावरून त्या भागातल्या शोधकार्याच्या ऑफिसातून एका कार्यकर्त्याला आणायला गेला.
एव्हढं होईस्तोवर मुलांनी त्यांचं घर एकेकाळी ज्या जागी उभं होतं ती जागा शोधून काढली होती. आणि एक परदेशी पत्रकारांचा गटही कॅमेरांसकट तिथे पोचून सगळं शूट करत होता. "इथे माझी बेडरूम होती. आणि इथे वरती माझं अभ्यासाचं टेबल." मुलगा सांगत होता. एव्हढ्यात मुलगी थोड्या अंतरावरून धावत धावत हातात एक वाळूनं भरलेली स्कूलबॅग घेऊन आली. "मी ह्यामध्ये काहीबाही भरून बाबांसोबत समुद्रावर जायचे." 'समुद्र' ऐकूनच तो क्षणभर दचकला. ती मुलगी अजूनही ती बॅग निरखून पाहत होती आणि मुलगा ढिगारा उपसत होता. आईला कदाचित अश्रूंमुळे सगळं धूसर दिसत असावं, पण तिला समोर तो ढिगारा दिसत नसावा. तिला तिथे अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत उभं असलेलं तिचं छोटंसं विश्वच दिसत असावं. एव्हढ्यात तो घेऊन आलेल्या शोधकार्यकर्त्यानं तिला त्या विश्वातून बाहेर आणलं. "तुमच्या नवर्‍याची अजूनही काही माहिती नाही." असं तो कार्यकर्ता तिला पाहताच थेट बोलला. तो इतका वेळ शून्य नजरेनं सगळं पाहत होता. हा संवाद ऐकून तो थोडा संभ्रमात पडला, हा कार्यकर्ता हिला कसा ओळखतो. "हे बघ काय?" मुलगी आईला काहीतरी दाखवत होती. तिला एक मोडलेली फोटो फ्रेम मिळाली होती. त्यामध्ये त्या कुटुंबाचा त्यांच्या कुटुंबप्रमुखासोबतचा फोटो होता. त्या माऊलीनं ती फ्रेम फेकून दिली आणि त्या फोटोवरून एकदा प्रेमानं हात फिरवला. इतका वेळ कडांपर्यंत येऊन थांबलेले अश्रू एकदाचे गालांवरून ओघळले. आत्तापर्यंतची प्रत्येक गोष्ट शूट करणारे कॅमेरामन आता तिच्याकडे कॅमेरा रोखून उभे राहिले. एक स्त्री पत्रकार तिच्याजवळ गेली आणि तिला काहीतरी विचारू लागली. पण तिला इंग्रजी येत नव्हतं मग ती पत्रकार इथे तिथे पाहू लागली. हा प्रसंग पाहत असलेला तो दुभाष्या म्हणून पुढे झाला.
"हा फोटोतला तुमचा नवरा का?"- पत्रकार.
"हो." ती डोळे पुसत म्हणाली. गरज नसतानाही त्यानं भाषांतरित करून सांगितलं.
"तुमची अन तुमच्या नवर्‍याची ताटातूट कशी झाली?"- पत्रकार.
"ते इथल्या आपत्कालीन यंत्रणांचे समन्वयक होते. संकट उद्भवल्यावर इथल्या सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर पडण्याचे मार्ग दाखवण्याची जवाबदारी त्यांची होती. त्यामुळे सगळे नागरिक सुखरूप मार्गस्थ होईस्तो ते बाहेर पडू शकत नव्हते. आम्हाला तिघांना त्यांनी पुढे पाठवलं." भाषांतरित करायचं आहे हे विसरून तो तिच्याकडे पाहतच राहिला.
हजारो लोकांचं सर्वकाही हरवलेल्या त्या ढिगार्‍यांमध्ये अचानकच त्याला माणुसकी सापडली होती.

टीप - जपानच्या भूकंपानंतर चाललेल्या शोध आणि मदतकार्यामध्ये समोर आलेली एक सत्यघटना पाहून ही कथा लिहावीशी वाटली.

21 comments:

 1. ........................:(

  ReplyDelete
 2. CNN, BBC, youtube ह्यावर वेगवेगळी क्लिपिंग बघताना अगदी कळतंय की लाखो अश्या हृदयदावक घटना घडलेल्या असतील....

  शिल्लक राहिलेल्या माणसांचच कठीण आहे....ह्या भयानक घटनेबरोबर उर्वरित आयुष्य काढणे भाग आहे...दुर्दैव. दुसरे काय?

  तुझी कथा त्या हलत्या चित्रांमधील दुर्दैव शब्दांत पकडण्यात यशस्वी झालेली आहे.

  ReplyDelete
 3. माझा एक डॉक्टर मित्र पण सध्या तिथेच आहे. अविरत काम चालू आहे त्याच. खुप वाईट वाटत रे. देव त्यांना ह्या संकटातून बाहेर पडण्यास शक्ती देवो.

  ReplyDelete
 4. :(

  देव त्यांना ह्या संकटातून बाहेर पडण्यास शक्ती देवो. +

  ReplyDelete
 5. देव त्यांना शक्ती देवो....

  ReplyDelete
 6. Anonymous4:07 AM

  >>>> CNN, BBC, youtube ह्यावर वेगवेगळी क्लिपिंग बघताना अगदी कळतंय की लाखो अश्या हृदयदावक घटना घडलेल्या असतील....

  शिल्लक राहिलेल्या माणसांचच कठीण आहे....ह्या भयानक घटनेबरोबर उर्वरित आयुष्य काढणे भाग आहे...दुर्दैव. दुसरे काय?

  तुझी कथा त्या हलत्या चित्रांमधील दुर्दैव शब्दांत पकडण्यात यशस्वी झालेली आहे. ..... अनघासारखेच विचार रे

  :(

  ReplyDelete
 7. :(:( तुम्ही शब्दात उत्तम मांडलंय सगळं!

  ReplyDelete
 8. हेरंब, अपर्णा, माऊताई,
  भावना पोचल्या... ती बातमी पाहून माझीही रिऍक्शन हीच होती! :(

  ReplyDelete
 9. अनघाताई,
  मी आता फारसा पाहत नाही त्या बातम्या... आधीच सगळीकडे डिप्रेसिंग गोष्टी दिसतात.. पण तरी काल हे नजरेस पडलंच अन मग राहावलं नाही! :(

  ReplyDelete
 10. सुहास,
  तुझ्या डॉक्टर मित्राला माझा सलाम सांग आणि शुभेच्छा दे! असेच आशेचे किरण नवी उमेद देतात! :)

  ReplyDelete
 11. सचिन, सारिका,
  हीच प्रार्थना!

  ReplyDelete
 12. तन्वीताई,
  :( शब्दांचे बुडबुडे काढण्यापलिकडे काय करतो आपण असं वाटतं कधीकधी :(

  ReplyDelete
 13. विनायकजी,
  तन्वीताईला म्हटलं तसंच.. बरेचदा फक्त प्रार्थना करणंच हाती असतं! :(

  ReplyDelete
 14. इंद्रधनू,
  भावना पोचल्या! :-/

  ReplyDelete
 15. सामान्य माणूस फक्त प्रार्थना करणार,विषय फारच चागला माडला ,

  ReplyDelete
 16. संवेदनशील लिहिले आहेस... भावले...

  ReplyDelete