भाग -१ वरून पुढे
"इन्स्पेक्टर रमेश कुठे बसतात?" एक उंचसा, मध्यम बांध्याचा सावळा इसम विचारत होता.
हवालदार शिंदे त्याला घेऊन रमेशच्या टेबलाकडे गेले.
"नमस्कार, मी एसीपी बिपिन राजे."
"ओह्ह.. सर!" रमेशनं सॅल्यूट केला. शिंदेंनीही गडबडून सॅल्यूट केला.
"रिलॅक्स." राजे हसत म्हणाले.
"शिंदे, हे एसीपी राजे. सीबीआयकडून आलेत. एका केससाठी त्यांना आपली मदत हवीय."
"पर्टिक्युलरली तुमची!" राजे नजर रोखून म्हणाले.
"एनीटाईम सर. बसा ना! शिंदे, चहा सांगा साहेबांसाठी." रमेश खुर्चीकडे बोट दाखवत म्हणाला.
शिंदे गेल्यावर राजेंनी हातातली फाईल रमेशसमोर ठेवली.
"मला कमिशनर साहेबांनी थोडं ब्रीफिंग दिलं होतं." असं म्हणत रमेशनं फाईल उघडली आणि पहिल्या पानावरच्या फोटोवर त्याची नजर स्थिरावली.
"ह्याला ट्रॅकडाऊन करण्यात मला तुमची मदत हवीय." राजे म्हणाले.
"सर" नजर वर करत रमेश म्हणाला, "टेल मी द होल स्टोरी."
राजेंनी एक नर्व्हस हास्य केलं. "गेल्या आठवड्यात येरवडा सेंट्रल जेलमधून मनुष्यबळ विकास मंत्र्यांचा खुनी पळाला ही बातमी तर जगभर झालीय आता. तर त्याच्यासोबत जे तीन अजून कैदी पळालेत त्यातला एक हा आहे."
"ते मीही ऐकलं, पण चौघांपैकी सुरूवात ह्याच्यापासून का? हा मला पडलेला प्रश्न आहे." रमेश शांतपणे म्हणाला.
"हे बघा इन्स्पेक्टर, ते जाणून घ्यायची तुम्हाला खरंच काही आवश्यकता नाही. ह्याला पकडण्यासाठी मला तुमची मदत हवीय, कारण तुम्हीच ह्यापूर्वी ह्याला पकडलेलं होतं." राजे थोडे वैतागल्यागत वाटले.
रमेश त्यांच्याकडे निरखून पाहत होता. "असो. थोडी पार्श्वभूमी कळली असती तर त्याच्या मूव्हमेंट्सची भाकितं करणं सोपं झालं असतं एव्हढंच. पण राहू दे. आपण काहीच माहित नाही असं समजून सुरूवात करू."
राजेंनी फक्त एक नर्व्हस हास्य केलं.
रमेशला हे प्रेशर ओळखीचं होतं, फक्त ग्रेड वेगळी होती एव्हढंच. शिंदे चहा घेऊन आले. ते चहा ठेवून जात असता रमेशनं त्यांना खूण केली आणि ते तिथेच बसले. राजेंच्या कपाळावर पडलेली सूक्ष्म आठी रमेशच्या नजरेतून सुटली नाही.
"हा तपास शिंदेशिवाय अपुराच राहिल सर." रमेश म्हणाला.
राजेंनी फक्त हसून मान डोलावली.
"बबन महाडिक ऊर्फ मेकॅनिकला शोधण्याची पहिली जागा म्हणजे त्याच्या धंद्याची जागा. सर्वप्रथम आपल्याला त्याच्या भागात, अर्थात धारावीला जायला हवं."
रमेशनं निघण्याची तयारी सुरू करताच राजे म्हणाले, "पण काही प्लॅन वगैरे?"
"रिलॅक्स सर, तो तिथे आपल्याला अजिबात सापडणार नाही." राजेंच्या चेहर्यावरचं प्रश्नचिह्न पाहून तो पुढे म्हणाला, "तो आत्ता नक्कीच शहरात नसेल, तुम्ही आठवडाभरानंतरची गोष्ट करताय, तो धोक्याच्या वेळेस महिनोन्महिने धंद्याकडे फिरकत नाही. पण काहीतरी धागा नक्कीच हाती लागेल. चार-दोन माणसं उलटीपालटी करावी लागतील."
"पण वर्दीतच चलणार तिथे?" राजेंनी विचारलं.
"काही ठिकाणी वर्दीची वट चालते तर काही ठिकाणी जिगरीची, पण काही ठिकाणी दोन्ही लागतं, ही त्यातलीच एक जागा." रमेश हसत म्हणाला आणि उठून उभा राहिला.
-----
तो रेस्टॉरंटच्या एका कोपर्यात कॉफी पित बसला होता. पण त्याचं लक्ष कॉफीकडे कमी आणि दरवाज्याजवळच्या टेबलावर बसलेल्या सुटाबुटातल्या माणसाकडे जास्त होतं. नुकताच गल्ला चेक करायला आलेला मालक एकटक त्याच्याकडे पाहत होता. तिशीचा, मध्यम बांध्याचा, डोळ्यांवर काळा गॉगल चढवलेला तो कुठेतरी पाहिल्यासारखा वाटत होता.
सुटातल्या माणसाची प्रत्येक हालचाल तो टिपत होता आणि त्याची प्रत्येक हालचाल मालक.
"नाव काय तुमचं?" मालक त्याच्या टेबलावर बसत म्हणाला.
"अं.." त्याची तंद्री एकदम भंग पावली.
"नाव नाव.." मालक तोंडभर स्मित करत म्हणाला.
"नरेंद्र." तो शांत नजरेनं मालकाच्या डोळ्यांत डोळे घालत म्हणाला.
"तो चष्मा काढता का जरा. तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय." मालक हसत म्हणाला.
"माझे डोळे आलेत."
"आय कॅन टेक अ रिस्क."
तो लगेच उठून उभा राहिला, "तुमच्याकडे गिर्हाईकांना प्रायव्हसी द्यायची पद्धत नाही का?" तो जोरातच बोलला जेणेकरून आजूबाजूच्यांचं लक्ष वेधलं जाईल.
मालक त्याला हाताला धरून बसवत म्हणाला, "सॉरी सॉरी. एक काम होतं तुमच्याकडं."
"पण मला तुमच्याशी कसलंही काम नाही. हे घ्या तुमच्या कॉफीचे पैसे." तो टेबलावर पन्नासची नोट फेकत उठला.
"साहेब, कॉफीचे पासष्ट होतात." मालक बोलला.
"हं हं ठीक आहे." त्यानं वीसची एक नोट काढून टेबलावर फेकली. "बाकीचे टीप म्हणून ठेवा."
"हाहा.. ओके ओके.. बाय द वे, त्या साहेबांना सांगू का की तुम्हाला भेटायचंय म्हणून त्यांना. तोवर बसा इथे." मालक त्या सुटातल्याकडे निर्देश करून म्हणाला.
नरेंद्रनं गॉगलमागूनच एक तिखट कटाक्ष टाकला आणि मुकाट्यानं खाली बसला.
"तुम्ही केव्हापासून त्यांच्यावर नजर ठेवून आहात ते मी पाहतोय." मालक डोळे मिचकावत म्हणाला.
त्यानं मनातल्या मनात कपाळावर हात मारला.
"तुम्ही पीआय आहात?"
"पीआय?"
"प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर."
"ओह्ह.. नाही नाही.. मी.." हीच वेळ होती ही ब्याद घालवायची. "मी कॉन्ट्रॅक्ट किलर आहे." तो शांतपणे म्हणाला आणि मालकाच्या चेहर्यावरचे भाव निरखू लागला.
मालक दोन क्षण विचारात पडला आणि म्हणाला, "परफेक्ट. मला वाटलंच होतं. तुमच्या कॉफी पिण्याच्या स्टाईलवरून आणि गॉगलवरून आणि.. मोज्यामधल्या छोट्या गनवरून."
त्यानं एकदम पँट सारखी केली. फासे उलटे पडले होते.
"माझं तुमच्याकडे तसलंच एक काम आहे." मालक डोळा मारत म्हणाला.
तेव्हढ्यात तो सुटातला माणूस उठून जाऊ लागला.
"माफ करा मला जावं लागेल." तो उठू लागला.
"ते साहेब आमचे रेग्युलर कस्टमर आहेत. त्यांचा मोबाईल नंबरही ठेवतो आम्ही." मालक.
त्यानं एक हात कपाळावर ठेऊन मान खाली केली आणि मोबाईलवरून काही मेसेज पाठवला. दरवाज्याजवळच्या दुसर्या टेबलावर बसलेली ती उठली आणि सुटातल्यापाठोपाठ बाहेर पडली.
"बोला. काय हवंय तुम्हाला." त्रासलेल्या स्वरात तो बोलला.
"ह्याचा मृतदेह." मालक मोबाईलवर एक फोटो दाखवत म्हणाला.
".." त्याला काय बोलावं तेच सुचेना.
"मग काय? करणार की.."
"हा घ्या फोन. लावताय की मी लावून देऊ? बंदूक मात्र बिना ओळखीची कुठेही चालते एव्हढं लक्षात असू द्या."
"सॉरी सॉरी. पण माझं हे काम खरंच अर्जंट आहे हो."
"हे काय टॅक्स रिटर्न किंवा म्युच्युअल फंड गुंतवणूक वाटली तुम्हाला?" तो पुरता वैतागला होता.
"मी कामासाठी माणूस कसा शोधायचा तेच बघत होतो गेले काही दिवस. तुम्ही अनायासेच हाती लागलात. मग करणार ना माझं काम. मी २५ लाख द्यायला तयार आहे."
त्याचे डोळेच विस्फारले गेले. क्षणभर काय बोलावं तेच त्याला सुचेना. मग सावरला आणि म्हणाला, "मी असं अनोळखी माणसांकडून कामं घेत नाही. तुमचा नंबर देऊन ठेवा मी उद्यापर्यंत तुम्हाला फोन करीन. हो की नाही ते तेव्हा पाहू."
मालकानं त्याच्याकडे कार्ड सरकवलं. ते घेऊन तो लगेच उठला आणि बाहेर पडला.
"आज फारच फालतूपणा झाला. नवशिक्यासारखा वागलास तू." ती चरफडत होती.
"इट हॅपन्स. ती जागाच तशी होती. सगळीच गिर्हाईकं मला उच्च्भ्रू गुन्हेगार वाटत होती. अन त्यातून, आपली पैशाची अडचण दूर व्हायचा मार्ग सापडलाय मला."
"डोन्ट टेल मी. तू कॉन्ट्रॅक्ट किलींग करणार आहेस?" तिचे डोळे विस्फारले होते.
"मी गंभीरपणे विचार करतोय. जर ज्याला मारायचंय तो मरण्याच्याच लायक असेल आणि हे काम करण्याचे आपल्याला पैसे मिळणार असतील तर काय हरकत आहे?"
"तुला वेड लागलंय? कुणी मरण्याच्या लायक आहे की नाही हे ठरवणारा तू कोण?"
"माझ्या निवडीवर आणि निर्णयक्षमतेवर कधीच कुणी विश्वास दाखवला नाही अन मी आयुष्यातून उठलो. आता जर माझ्या निवडीवर माणसांची आयुष्य संपणार असतील तर तो काव्यात्म न्याय ठरेल. बीसाईड्स, मी नाही मारलं तर कुणी दुसरा मारेलच की."
"ही सैतानी मनोवृत्ती आहे. मी ह्यात तुझ्यासोबत नाही."
"ठीक मग आपल्या पुढच्या सगळ्या कार्यक्रमासाठी पैसे कुठून आणायचे ते सांग."
तिच्याकडे बोलण्यासारखं काहीच नव्हतं. तो तिच्याशेजारी जाऊन बसला.
"विश्वास ठेव माझ्यावर. मी काही चुकीचं करणार नाहीये." ती अजून तशीच बसली होती. "माझ्यावर आजवर कुणीच विश्वास ठेवला नाही. तू पहिलीच. एकदा विश्वास ठेवलास आणि आपण इथवर आलोय. अजून एकदा फक्त."
तिनं त्याच्याकडे पाहून स्मितहास्य केलं.
तो पण हसला आणि उठून उभा राहिला. "वर्तकसाहेबांचं रूटीन पूर्ण रेकॉर्ड झालं की नाही?"
तिनं मानेनंच होकार दिला.
"सूट बाकी मस्त होता त्यांचा. कुठून शिवतात काही कल्पना आली का?" तो डोळे मिचकावत म्हणाला.
क्रमशः
बाबा! मस्तच! चांगला सूर सापडलाय! आमची उत्सुकताही ताणली जातेय.अर्थात क्रमश:ची वाट बघतोय! :)
ReplyDeleteबाबा, अजून अजून इंटरेस्टिंग होतोय हा प्रकार.. पुढचा भाग येउदे लवकर !
ReplyDeleteयेऊ दे नं पुढचा... वाट पाहतेय!
ReplyDelete