7/19/2012

स्मृती -३(अंतिम)

भाग -१ आणि भाग -२ पासून पुढे


अमर दिवसेंदिवस खंगत चालला होता. जेमतेम दहा दिवस तो घरी होता पण पाच वर्षांनी वय वाढल्यासारख्या त्याच्या हातांवर सुरकुत्या आल्या होत्या. चेहरा ओढला गेला होता. कानाजवळचे केस पिकले होते. डोळे खोल जाऊ लागले होते. अभयनं डॉक्टरांनाही घरी बोलावलं होतं. पण डॉक्टरांनी स्ट्रेस कमी झाल्याशिवाय काही होणार नाही असं स्पष्टच सांगितलं होतं. अमरच्या तंद्र्‍या वाढत होत्या. स्किझोफ्रेनियाची शक्यता डॉक्टरांनी नाकारली नव्हती. पण किमान स्ट्रेस कमी व्हायची महिनाभर तरी वाट बघावी असं डॉक्टरांचं मत होतं. अभय आतून पार हादरला होता. अमरला स्किझोफ्रेनिया असता, तर रात्री-अपरात्री होणारे प्रसंग जस्टिफाईड होते पण म्हणजे त्याच्या सख्ख्या भावाला एक मोठा मनोविकार असल्याचं सिद्ध होत होतं. पण जर अमरला मनोविकार नसेल तर मग ते रात्रीचे प्रसंग म्हणजे काय? दोन्ही उत्तरं अभयसाठी भलीमोठी प्रश्नचिह्नंच होती.
त्याच दिवशी महत्प्रयासानं अभयला पुस्तक वाचताना झोप लागली. ती कृष्णपक्षाच्या चतुर्दशीची रात्र होती. चंद्र जवळपास विझल्यातच जमा होता. नेहमीसारखीच स्मशानशांतता सर्वत्र पसरलेली होती. फक्त रातकिड्यांचा आवाज आणि मधेच एखाद्या सापाची सळसळ. आणि नेहमीसारखीच काहीतरी आंतरिक जाणीव होऊन अभयला जाग आली. त्यानं डोळे उघडले आणि अमर त्याच्या बाजूलाच बसून थेट त्याच्या चेहर्‍याकडेच जेमतेम एक फूटाच्या अंतरावरून पाहत होता. त्याचं हृदय जवळपास थांबलंच. डोळे रोखलेले, स्तब्ध. पापण्याही मिटत नसाव्यात असं त्या एकाच थिजलेल्या क्षणात अभयला वाटलं आणि तो एकदम धडपडत उठला. त्याबरोबर छातीवर राहून गेलेलं झोपतानाचं पुस्तक खाली पडलं आणि त्या आवाजानं अभय अजूनच दचकला. त्याची छाती जोराजोरात धडधडू लागली. अमर तसाच स्तब्ध त्याच्याकडे रोखून पाहत होता. त्याक्षणी अभयला त्यादिवशीच्या नजरेचा भास झाला नाही. पण ही नजरही अनोळखी आणि तशीच रूक्ष होती. त्यानं कसंबसं धैर्य गोळा केलं आणि विचारलं.
"अमर. काय झालं? इथे काय करतोयस?" त्याला दिवा चालू करायचंही भान राहिलं नव्हतं.
"का केलंस तू असं?" अमर वेगळ्याच आवाजात रूक्षपणे म्हणाला.
"काय?" अभयच्या घशाला कोरड पडली होती. आवाज जेमतेम फुटत होता.
"का वेगळं केलंस मला तिच्यापासून?"
"काय बोलतोयस तू?"
"तुला माहितीय मी काय बोलतोय ते. तिला कसायांच्या हातात देऊन तू मला फसवून इथे घेऊन आलास."
"मी कुणाला फसवलं नाही. आणि कुणालाही कसायांच्या हातात दिलं नाही."
"मग मला का तोडलंस तिच्यापासून?"
"आणि आपल्या आईकडे कोण बघणार होतं मग? आणि आपले बाबा? सगळे कष्ट त्यांनी अन मीच उठवायचे होते का? आणि तुलाही पटलं होतंच की."
"मी मूर्ख होतो. माझ्यात दम नव्हता. मीच तिला वार्‍यावर सोडलं." अमरचा आवाज थोडा बदलला. सौम्य झाला. त्याच्या आवाजाला सूक्ष्म कंप सुटला.
अभयमध्ये एकदमच थोडा जोर आला आणि त्याला दिवा लावण्याचं सुचलं.
दिवा लावल्याबरोबर अमर जागच्याजागी कोसळला.

-----

त्यातले काही कागद एका मॅटर्निटी होमच्या जुन्या हॅन्डमेड रिपोर्ट्सचे झेरॉक्स होते. काहींमध्ये व्हिजिटेशनच्या भरलेल्या फॉर्म्सचे झेरॉक होते. काहींवर काही डॉक्टरांचे पत्ते होते. आणि काही एका मेंटल हॉस्पिटलच्या व्हिजिटेशनचे फॉर्म्स आणि त्याच मेंटल हॉस्पिटलच्या काही रिपोर्ट्सचे झेरॉक्स. त्या दोघांनी त्या कागदांवरून एक नजर फिरवली आणि ते एका बाजूला करून ठेवले.
आता समोरच्या चळतीत थोडेसेच कागद उरले. तेव्हाच खिडकीच्या मोडक्या तावदानांमधून एक वार्‍याची झुळूक आत आली आणि मेणबत्तीची ज्योत फडफडली. तेव्हढ्याशा हालचालीनंसुद्धा खोलीत एकदम छायानृत्य झाल्यागत झालं आणि ते दोघे दचकले. त्याच झुळूकीमुळे जमिनीवर उरलेली पानं थोडीशी पसरली. मेणबत्ती पूर्ववत झाली आणि त्यांनी ती पानं सारखी केली.
"आत्ता मेणबत्ती हललेली तेव्हा तुला तिथे काही दिसलं का?" एकानं दुसर्‍याला खोलीच्या एका विवक्षित कोपर्‍यातल्या जमिनीकडे बोट दाखवत म्हटलं.
दुसर्‍यानं एकदा त्याच्याकडे दोन क्षण पाहिलं मग त्या जागेकडे एकदा पाहिलं आणि मग नकारात्मक मान डोलावली. मग त्यानं सगळ्यात वरचं पान उचलून मेणबत्तीजवळ धरलं.
अभय विमनस्कपणे खिडकीतून पाहेर पाहत उभा होता. त्या इमारतीचं बांधकाम जुनं असल्यानं चार मजलेसुद्धा फार उंच होते. तेव्हढी उंची पाहूनसुद्धा त्याला गरगरायला होत होतं. मोसम सुरू व्हायच्या आधीचा अवेळी पावसाचा शिडकावा झाला होता. त्यामुळे चहूकडे मृद्गंधाचा घमघमाट सुटला होता. पण त्याचे सगळी इंद्रियं भरकटली होती. त्याची तंद्री लागू लागली होती. इंद्रियांवरचा ताबा इच्छा नसतानाही सुटतो की काय असं अचानक वाटू लागलं. एखाद्याची जबरदस्तीनं समाधी लागावी तसं काहीसं. आणि एकदम जोरात दाराची बेल वाजली. तो दचकून भानावर आला. दोन क्षण तो नक्की काय झालं त्याचा अदमास बांधत राहिला. तेव्हा बेल परत वाजली. तो पाय ओढतच दरवाजाकडे गेला. त्याला सर्वांगातलं त्राण गेल्यासारखं वाटत होतं. जणू काही वेळासाठी त्याच्या शरीरातले प्राण कुणीतरी बाहेर काढले असल्यासारखं. त्यानं दरवाजा उघडला.
"मी इन्स्पेक्टर वाघ." समोरच्या गणवेषधारी अधिकार्‍यानं आयकार्ड दाखवत म्हटलं. "तुमच्या भावासंदर्भात काही विचारायचं होतं."
का कुणास ठाऊक पण त्याला आश्चर्य वाटलं नाही. त्यानं त्यांना आत घेतलं आणि हॉलमध्ये सोफ्यावर बसवून पाणी आणायला स्वयंपाकघरात गेला.

"काहीही काय विचारतात इन्स्पेक्टर. माझ्या भावाला मी स्वतःच्या हातानं अग्नि दिलाय." त्याचं डोकं सहसा तापत नसे.
"शांत व्हा. मी फक्त माझं काम करतोय." इन्स्पेक्टर शांत स्वरात म्हणाले.
"तुमचं काम? माझ्या मेलेल्या भावानं खून केलेत का म्हणून तुम्ही मला विचारताय आणि शांत राहायला सांगताय? तुमचं काम आहे खुन्यांना पकडणं. मेलेल्यांच्या नातेवाईकांना मनस्ताप देणं नव्हे." तो तावातावानं बोलत होता.
"शांत व्हा. मी तुमच्या भावानं खून केलेत म्हणत नाहीये."
"मग?"
इन्स्पेक्टरनं दोन मिनिटांचा पॉज घेतला. "हे बघा. त्या मुलीची बारा दिवसांनंतर डेड बॉडी मिळाली. संशयित माणसं ही मुळात छेड काढणार्‍यांचे मित्र अथवा नातेवाईकच होते."
"होते म्हणजे?"
"जोसेफ स्टीफन, भगवान महिंद्रकर आणि सुब्बाराव हे तिघेजण त्या व्हिडिओत नव्हते पण त्याच गॅंगमध्ये होते. आणि त्या तिघांचेही मृतदेह संशयास्पद अवस्थेत मिळालेत."
"काय?" तो जवळपास ओरडलाच.
"होय. जोसेफवर चमत्कारिकरित्या वीजेची तार पडली. सहा फूटी भगवान पावसाचं पाण्यानं झालेल्या चार फूटांच्या डबक्यात बुडून मेलेला रस्त्याच्या कडेला सापडला. आणि सुब्बाराव त्याच्या टॅक्सीत हृदयक्रिया थांबल्यानं जागच्या जागीच गेला."
"हृदयक्रिया थांबण्यात संशयास्पद काय आहे?"
"वीजेच्या तारेवर जोसेफच्याच बोटांचे ठसे होते आणि चार फूटाच्या डबक्यात भगवान बुडून मेला आणि सुब्बाराव त्यांचा खास सवंगडी होता, एव्हढं कारण पुरेसं आहे." वाघ स्वरात बदल न होऊ देता बोलत होते.
"म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय?"
"संपादक लेलेंना ओळखत असालच तुम्ही?"
"हो. त्यांचं काय झालं?"
"तुमचा भाऊ गेला त्या रात्री इन्स्टिट्यूटकडून शहराकडे परत जायच्या रस्त्यावर त्यांची गाडी भररस्त्यात हेडलाईट्स चालू ठेवून उभी राहिलेली सापडली. आणि ते स्टिअरिंगव्हीलवर हृदयक्रिया थांबून मेलेले आढळले."
"काय सांगताय हे सगळं?"
"चॅनेलचा क्रियेटिव्ह हेड म्हणजे लेलेंचा बॉस संतोष दरेकर मध्यरात्री स्वतःच्या बेडमध्ये हृदयक्रिया थांबून मेला. आणि चॅनेलचा मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह ज्यानं कदाचित ती टेप लीक होण्यामध्ये हातभार लावला होता, तो चॅनेलच्याच ऑफिसात कॉन्फरन्स रूममध्ये हृदयाचा झटका येऊन मेलेला आढळला. त्या कॉन्फरन्स रूमसमोर पाच एम्प्लॉई बसलेले होते. पण एकालाही त्या काचेचा भिंतीतूनही काही वावगं दिसलं नाही. एकाचं लक्ष गेलं तेव्हा तो दाराशी घामाघूम होऊन पडलेला होता."
"पण हे सगळं मला का सांगताय तुम्ही?" अभय हे सगळं सहन न होऊन म्हणाला.
"ह्या प्रत्येक मृत्युच्या वेळी तुम्ही कुठे होतात आणि त्याचा कुणी साक्षीदार आहे का हे मला विचारायचं होतं." वाघ एकेका शब्दावर जोर देत म्हणाले.
"काय? म्हणजे माझ्यावर तुमचा संशय आहे? त्या मुलीच्या नातेवाईकांवर का नाही तुमचा संशय?"
"आमची संशयितांची यादी फार मोठी आहे. त्यात सगळेचजण आहेत. तुम्हीही सहकार्य केलंत तर बरं होईल." वाघांच्या आवाजात थोडी जरब आली.
अभयकडे दुसरा पर्याय तरी काय होता? फार वाईट दिवस होते हे खरं होतं.
--
तारीख ३० मे, शनिवार

आज स्वतःचंच काल्पनिक पात्र लिहायचा प्रयत्न केला. आयुष्यात पहिल्यांदाच बहुतेक. बाकी सगळी पात्र काल्पनिक नावानं असली तरी अमरचं पात्र तसंच आणि त्याचं जसं तेच माझंही. अमरला श्रद्धांजली म्हणून कथा लिहायला घेतली आणि भलतीच वेगळी भय/सूडकथा होत चालली आहे. खरंच असं काही होत असतं तर? मृतात्म्यांनाही बदला घेता आला असता तर? तर त्या मुलीनं नक्कीच तिच्यावरच्या अन्यायाचा बदला घेतला असता. ओह माय गॉड. आणि 'तिनं'सुद्धा? बापरे. कुठून डोक्यात परत हा विचार आला. तिच्या मनोरूग्णालयातल्या मृत्युच्या बातमीनंतर अमर तर पार सैरभैर होऊन गेला होता. बहुतेक ती बातमी ती टेप लीक होऊन मुलगी किडनॅप झाल्यादिवशीच आली होती. साहजिक आहे म्हणा. अमरचा जीव होता तिच्यावर.

ते पान व्यवस्थित क्रमानं ठेऊन त्या दोघांनी पुढचं पान उचलललं.

तारीख २७ २८ मे, गुरूवार
काल मी काही लिहिलं होतं का ते कळायला मार्ग नाहीये. सुट्या पानांवर लिहिण्याचा हा एक तोटा, की एखादं गायब झालं तरी कळत नाही. २७ हा दिवसच आयुष्यातनं हरवला की काय? अमरला जे होत होतं तेच मलाही होतंय की काय असं वाटू लागलंय. काल २६ तारीख होती असं मला इतका वेळ वाटत होतं. तारीख-वारांचं गणितच चुकलंय की खरोखरच अख्खा दिवस मी हरवलो होतो. आई आणि अमरला जर होऊ शकतं तर मलाही होऊ शकतंच की. पण कसं शक्य आहे? अगदी गळून गेल्यासारखं वाटतंय हे मात्र खरं. शरीरातलं सगळं त्राण गेल्यासारखं. जणू काही वेळासाठी शरीरातले प्राण कुणीतरी बाहेर काढले असल्यासारखं.
काही सुचत नाहीये लिहायला. राहून राहून अमर आणि 'तिचा'च विचार येतोय डोक्यात. अमरचं इतकं प्रेम होतं तिच्यावर की त्यानं माझ्याही नकळत तिच्यावर सगळा रिसर्च करून ठेवला होता. त्यादिवशी गर्भपाताच्या हॉस्पिटलबाहेर तिला सोडून मी निघालो आणि पीसीओवरून तिच्या घरी फोन निनावी फोन करून तिची खबर देऊन मी जो अमरला घेऊन इथे परत आलो, त्यानंतर मी कधीही मागे वळूनसुद्धा पाहिलं नाही. बाबांचा उद्ध्वस्त झालेला संसार मीच करत राहिलो. पण अमरनं त्या मॅटर्निटी होमपासून ते त्या डॉक्टरांचा शोध घेऊन ते थेट तिच्या मनोरूग्णालयाचाही पत्ता लावला होता आणि तो तिला भेटायला जात होता हे मला तो गेल्यावर त्याच्या बॅगेत सापडलेल्या कागदपत्रांवरून कळलं. काय होऊन बसलं हे सगळं? आईही गेली ती अशीच तिच्या मनाच्याच कुठल्यातरी कोपर्‍यात हरवून. बाबा व्यापानं आणि दुःखांनी गांजून, खंगून गेले. आणि धाकटा भाऊ प्रेम आणि अपराधी भावनेमध्ये. जर ते कागद मला सापडले नसते तर मी पण तिच्या मृतात्म्याची भीती घेऊन बसलो असतो. पण जर आधीच सापडले असते तर कदाचित अमरवर अशी वेळ आली नसती.
जाऊ दे. जर तरमुळे काय फरक पडतो?

-----

रात्रीच्या प्रकारानंतर अमर जवळपास दहा तास बेशुद्धच होता. अभयनं पहाटेच डॉक्टरांना बोलावलं. त्यांनी ग्लुकोज चढवलं आणि औषधं लिहून दिली. प्रचंड अशक्तपणा आणि अपरिमित स्ट्रेस हे कारण सांगितलं. अभयला काही सुचेनासं झालं होतं. अमरला दुपारी साडेबारा-एकच्या आसपास थोडी शुद्ध आली. अभयनं त्याला भाताची पेज करून दिली आणि फळांचे ज्यूस दिले. त्यानंतर अमरला थोडी हुशारी आली.
दुपारभर तो पलांगावर पडून आढ्याकडे पाहत होता. संध्याकाळच्या वेळी घरातलं सामान भरण्यासाठी म्हणून अभय बाहेर पडला आणि इन्स्टिट्यूट बिल्डिंगमधल्या दुकानात गेला. तो साधारण रात्री आठला घरी परत आला. स्वयंपाकघरात सामान ठेवून तो अमरकडे पाहायला बेडरूममध्ये गेला आणि एकदम थबकला.
अमर खिडकीमध्ये पाठमोरा उभा होता. स्तब्ध, एकागे, तंद्री लागल्यासारखा. त्याच्यात दुपारच्या अशक्तपणाचा मागमूसही नव्हता. मागे न वळताच तो एकदम म्हणाला, "ऑफिसातून फोन आला होता. त्या किडनॅप झालेल्या मुलीचा मृतदेह मिळालाय आज." त्याच्या आवाजामध्ये कुठेही अशक्तपणाचा, शक्तिपाताचा लवलेशही नव्हता.
अभय काहीच बोलला नाही.
"झालं तुझं समाधान? माझ्याहातनं अजून एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं."
"अजून एका?" अभय अभावितपणे म्हणून गेला.
अमर एकदम गर्रकन वळला. त्याचे डोळे लाल झाले होते. संताप ओतप्रोत भरलेला रागीट, संतप्त चेहरा पाहून अभयला काही सुचेना. तो धारदार आवाजात म्हणाला, "विसरलास ते सगळं. तिचा गर्भपात जबरदस्तीनं करवला होतास तूच. आणि तिला माझ्यापासून तोडलं होतंस."
"तेच तुझ्या आणि तिच्या भल्याचं होतं. सतराव्या वर्षी काय आई-बाप बनणार होतात?" अभयनं उसनं अवसान आणत म्हटलं.
"टेम्पररी पॅरॅलिसिसचं औषध आणि कोवळ्या वयातल्या गर्भपाताचा तिच्या मेंदूवर परिणाम झाला आणि तिनं गेली १२ वर्षं वेड्यांच्या रूग्णालयात काढली तुझ्यामुळे." अमरचा आवाज चढतच चालला होता. बाहेरच्या शांततेत कदाचित अख्ख्या वस्तीलाही ऐकू जात असावा.
"पण.. पण हे सगळं तुला कसं माहित. हे फक्त तिला किंवा मला माहित असायला हवं." अभय बोलला आणि आपल्या बोलण्याचा अर्थ लागून त्याच्या अंगावर काटा आला.
अमरच्या चेहर्‍यावरची रेषही हलली नाही. आणि मग त्याच्या चेहर्‍यावरचा संताप एकदम गेला. चेहरा निवळला. आणि तो सौम्य आवाजात म्हणाला, "ही काय कोपर्‍यात बसलीय ना ती. तिनंच तर मला सांगितलं."
अभय थंडच पडला आणि अमरच्या त्याच नेहमीच्या जागेकडे पाहू लागला. तिथे काहीच नव्हतं.
"मी अजून पापं माथ्यावर घेऊन नाही जगू शकत दादा." असं म्हणून अमर वळला आणि खिडकीतून बाहेर बघत खिडकीवर रेलून उभा राहिला. दोन क्षण असेच स्तब्धतेत गेले. अभय सगळी ताकद गोळा करून अमरकडे चालू लागला आणि तो अमरपर्यंत पोचणार एव्हढ्यात अमर पुढे वाकला आणि खिडकीतून पलिकडे कोसळला. कोणीतरी मागून धक्का दिल्यासारखा. अभयनं जिवाच्या आकांतानं पुढे उडी मारली पण सगळं फोल होतं. खाली अमरचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तेव्हढा त्याला दिसला.

-----

त्या दोघांच्या समोर आता शेवटची तीन पानं शिल्लक राहिली होती.

मोसमाआधीचा अवेळी पाऊस सुरू होता. पण हा अवेळी पाऊसही फार विचित्र होता. मुसळधार आणि संततधार. संध्याकाळी सहा वाजताच सर्वत्र अंधारून आलं होतं. माणसं पटापट घराकडे निघाली होती. रस्त्यावरची गर्दी ओसरू लागली होती. सगळीकडे पाण्याचं साम्राज्य होतं. गटाराचं पाणी, चिखलाचं पाणी, पावसाचं पाणी सगळं एकच. आकाशातनं कुणीतरी पृथ्वीचे फोटो काढावे तद्वत होणारा विजांचा चमचमाट आणि पाठोपाठ धडकी भरवणारा ढगांचा गडगडाट.
भगवान महिंद्रकर त्याच्या चाळीचा पुढारी कम गुंड. तो अशा वेळेमध्ये रस्त्यावर उतरला नसता तरच नवल...

भगवान महिंद्रकरच्या कथेचा शेवट आधीच्या पानावर वाचल्यामुळे दोघांनीही उर्वरित भाग वाचला नाही आणि ते थेट डायरी उल्लेखावर गेले.

तारीख २९ मे, शुक्रवार

अमर जाताना वेड्यासारखं काहीतरी बोलला नसता तर किती बरं झालं असतं. मलाही तिचे भास होऊ लागलेत. ह्याला काही अर्थ नाही. हे सगळे अपराधी मनाचे खेळ आहेत. पण मी काय चूक केलं होतं? माझं वय फक्त वीस होतं. आणि माझ्यावर अख्ख्या कुटुंबाची जवाबदारी पडली होती. अमर शिकून नोकरीला लागेपर्यंत मी कारकूनी केली. त्यानंतर कुठे मनासारखं निवांत लेखकाचं आयुष्य लाभलं. असलं काहीतरी होईल ह्याची मला तरी कुठे कल्पना होती. पण तरी हे असले भास का व्हावेत मग? जर खरोखरच मृतात्मे असतील तर मग मला अमर का दिसत नाही कधी? त्याला कुणीतरी धक्का मारला होता असं वारंवार का वाटतं?

पुढच्या पानावर कथेचा मजकूर नव्हता. फक्त डायरी नोंद होती. पण हस्ताक्षर बदललेलं वाटत होतं.

तारीख ३१ मे, रविवार

मी आज कबूल करतो की मीच माझा धाकटा भाऊ अमरला खिडकीतून खाली धक्का दिला होता. अमरच्या आयुष्यात मीच विष कालवलं होतं. त्यामुळे त्याची मनस्थिती पूर्णपणे ढासळून गेली होती. त्याच्या जगण्यात काही अर्थ नव्हता. म्हणून मीच त्याला संपवलं. तो सतरा वर्षांचा असताना तो शिकायला जिथे होता. तिथे त्याच्यापासून त्याच्या मैत्रिणीला दिवस गेले. तेव्हा अमरला त्या सगळ्यातून सोडवायला म्हणून मीच त्या मुलीचा-स्मृतीचा-जबरदस्तीनं तिच्या मनाविरूद्ध गर्भपात करवला. आणि त्यामुळे तिच्या डोक्यावर जो परिणाम झाला तो कायमचाच. तिनं बारा वर्षं मनोरूग्णालयात अत्यंत भयावह अवस्थेत काढली आणि शेवटी एक दिवस तिनं आत्महत्या केली. त्या मृत्यूचीही जवाबदारी मी स्वीकारतो. ही सगळी पापं घेऊन आता एकट्यानंच जगण्यात अर्थ उरला नाही म्हणून मी ही आत्महत्या करतेय.


-अभय.


त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. आणि त्यातल्या एकाला अचानकच काहीतरी विचित्र वाटलं आणि त्यानं परत मेणबत्तीजवळ तो कागद नेऊन नीट वाचलं. आणि परत साथीदाराकडे पाहिलं.
"हो. 'करतेय' असंच लिहिलंय." दुसरा त्याला काय म्हणायचंय ते ओळखत म्हणाला.

(१)

त्यांनी घाईगडबडीनं उरलेलं शेवटचं पान उचललं.

त्यावर फक्त मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं.

माझा प्रिय भाऊ अमर
ह्याच्या स्मृतीस अर्पण

दिनांक २२ मे, शुक्रवार


कागदांची चळत संपली होती आणि ते दोघे स्तब्धपणे एकमेकांकडे पाहत होते. अचानक पुन्हा एक वार्‍याचा झोत आला. आणि मेणबत्तीची ज्योत फडफडून विझली. ते दोघे दचकले. खोलीतला गारवाही अचानक वाढल्यासारखं झालं. घाईगडबडीनं चाचपडत त्यांनी काडेपेटी उचलली आणि मेणबत्ती परत पेटवली. वारा थोडा शांत झाला पण वातावरण एकदम भारल्यासारखं झालं.
दोन क्षणाची स्तब्धता गेल्यावर त्यातला एकजण दुसर्‍याला म्हणाला, "पण त्या कथेचं काय झालं ते कळलंच नाही ना!"
दुसर्‍यानं काही उत्तर द्यायच्या आतच एका स्त्रीचा आवाज आला, "ते दोघे येतच असतील एव्हढ्यात. त्यांनाच विचारून घ्या."

त्या दोघांनी दचकून आवाजाच्या दिशेला पाहिलं. खोलीच्या कोपर्‍यात जमिनीवर ती बसली होती. मेणबत्तीच्या मंद प्रकाशात तिचे तपकिरी चमकते डोळे तेव्हढे नीट दिसत होते.

-समाप्त-

(१)इथेच कथा थांबवण्याचा एक विचार केला होता. त्यातनं मला हवी तितकी संशयाची जागा कथेत राहिली असती. पण कदाचित कथेचा काहीच अर्थ वाचकांना न लागण्याची शक्यता वाटली. चुकीचंही असेल मला वाटलेलं. म्हणून मग मी पुढचा भाग कथेत टाकला. कदाचित गरज नव्हती. पण असो.

7/18/2012

स्मृती -२

भाग -१ पासून पुढे


मध्यरात्रीच्या सुमारास अभयला कसलीशी चाहूल लागली आणि तो एकदम जागा झाला. पंखा नेहमीच्या तालात गरगरत होता. त्याचा ठरलेला आवाज येत होता. खोलीतली हवा थोडी गार झाली होती. त्यानं मान वळवून खिडकीकडे पाहिलं. खिडकीतनं मंदसं चांदणं आत येत होतंअचानकच त्याला खोलीत कुणीतरी भलतंच असल्याची जाणीव झाली आणि त्याच्या मणक्यातनं थंड शिरशिरी गेली. त्यानं दचकूनच त्या आकृतीकडे पाहिलं तर तो अभयच होता. पण त्याच्या पलंगावर गुडघे छातीशी धरून हनुवटी त्यावर टेकवून एकटक जमिनीकडे पाहत असल्यासारखा. अभयची नजर भिंतीवरच्या घड्याळाकडे गेली. रात्रीचे सव्वातीन होत होते. का कुणास ठाऊक पण त्याला सेकंदकाटा हलत नसल्यासारखं वाटलं. तो झटकन उठून बसला. पण त्याच्या हालचालीनंही अमरची तंद्री भंगली नाही.
"अमर!" त्यानं हाक मारली आणि रात्रीच्या शांततेत त्याचा तोच दचकला. पण अमर हलला नाही.
अभयच्या छातीत थोडंसं धडधडायला लागलं. पण तो उठला आणि हळूहळू अमरजवळ गेला आणि अमरच्या शेजारी बसला. अमरची काहीही हालचाल नव्हती. डोळे तंद्री लागल्यागत जमिनीवर रोखलेले होते. बाहेरच्या रातकीड्यांच्या आवाजाखेरीज पसरलेल्या शांततेत अभयला स्वतःचा श्वासोच्छवास आणि धडधडणारी छातीदेखील स्पष्टपणे ऐकू येत होती. पण अमरच्या श्वासांचा मात्र बिलकुल आवाज येत नव्हता. दोन क्षण वाट पाहून अभयनं अमरच्या खांद्यावर हात ठेवला आणि एकदम झटका लागल्यागत अमरनं मान उचलली आणि पाय झटकून सरळ केले. त्याच्या त्या हालचालीनं अभयला हृदयविकाराचा झटकाच यायचा बाकी होता.
"अमर!" अभयच्या तोंडून अस्फुट असा आवाज फुटला.
"हां." अमर अभयकडे बघून बोलला. त्याच्या चेहर्‍यावर जणू काही झालंच नाही असे भाव होते. "तुला काय झालं? इथे माझ्या पलंगावर काय करतोयस?" अमरनं उलट सवाल केला.
अभय त्याच्याकडे दोन मिनिटं पाहतच राहिला आणि मग त्याला झालेला घटनाक्रम सांगितला.
"अरे काही नाही. उद्या एक प्रेस रिलीज लिहून द्यायचा विचार करत होतो. त्यातला मजकूर एकदम सुचला त्याची मनातल्या मनात उजळणी करत बसलेलो." अमर म्हणाला खरा पण अभयला विचित्रच वाटत होतं. अमर घरी बसल्यापासून रात्री अपरात्री दोनतीनदा अभयची झोपमोड झाली पण प्रत्येक वेळी अमर त्याला जागा असल्याची जाणीव झाली होती. एकदा तो पाणी पिऊन आलो म्हणाला. एकदा बाथरूमला जाऊन आल्याचं म्हणाला तर एकदा त्यानं झोपून राहिल्याचं नाटक केलं. आज मात्र हे नवंच. अभय मनाशीच विचार करत अमरच्या पलंगावरून उठला आणि स्वतःच्या पलंगाकडे गेला. त्यानं मधेच नजर फिरवून अमरकडे पाहिलं त्यानं मगाशी पाहत असलेल्या जागीच एकदा कटाक्ष टाकला आणि तो आडवा झाला. अभय स्वतःच्या पलंगावर बसला आणि त्यानंही त्याच जागेकडे पाहिलं. तिथे काहीच नव्हतं. पुन्हा असं झालं तर आधी दिवा लावायचा ही खूणगाठ मनाशी बांधून अभय आडवा झाला.


-----


संतोषला दरदरून घाम फुटला होता. तो भराभरा पावलं टाकत चालला होता. दर दोन पावलांनंतर भीतीपूर्ण नजरेनं मागे वळून पाहत तो निघाला होता. रस्त्याला रहदारी अजिबातच नव्हती. शहराचा मुख्य रस्ता नसला तरी बर्‍यापैकी रहदारीचा तो रस्ता होता. पण रात्रीच्या एक वाजता तिथे फारसं कुणी नसणं तसं आश्चर्यकारक नव्हतं. संतोषचं घर जवळ येत होतं तसतसा त्याच्या पावलांना वेग येत चालला होता आणि सर्वांगाला अधिकाधिक कंप सुटत चालला होता. समाप्तीरेषा जवळ आली की माणूस मनानंच आधी पार होतो आणि त्यामुळे थोडीशी बेपर्वाई होण्याची शक्यता असते, तसंच झालं आणि तो दगडाला ठेचकाळून पडला. गुडघा फुटला असावा आणि हनुवटीलाही मार बसल्याचं त्याच्या लक्षात आलं पण तो तसाच धडपडत उठला. घाबरूनच मागे नजर टाकून उभा राहिला आणि एकदम धाडकन कोसळला. त्याला काय झालं तेच कळेना. त्यानं पुन्हा उठायचा प्रयत्न केला आणि त्याचं सर्वांग भीतीनं थंड पडलं. त्याला त्याचे पायच हलवता येत नव्हते. तो जीवाच्या आकांतानं पाय हलवायचा प्रयत्न करत होता पण त्याचे दोन्ही पाय लुळे पडले होते. आजूबाजूच्या सर्व इमारतींमध्ये लोक शांतपणे झोपले असतील असा विचार त्याच्या मनाला चाटून गेला आणि एकदम त्याला मदतीसाठी ओरडायची बुद्धी सुचली. पण. पण त्याच्या घशातून आवाजच फुटेना. रस्त्यावरचे स्ट्रीटलाईट्स एकाएकी मंद झाल्यासारखं त्याला जाणवलं. वाराही अचानक पडला. रस्त्याचा स्पर्श लुळ्या पडलेल्या पायांमुळे त्याला जाणवतच नव्हता. अधांतरी तरंगत असल्यासारखं, कुठल्यातरी वेगळ्या मितीत असल्यासारखी एक विचित्र जाणीव त्याला झाली आणि हळूहळू अंधारत जाणार्‍या वातावरणात त्याला कसलीशी अस्पष्ट चाहूल लागली. त्याचा भीतीनं थरकाप उडाला. थरथरतच त्यानं मान वळवून पाहिलं आणि...
त्यानं डोळे उघडले. तो त्याच्या बिछान्यात होता. वर पंखा जोराजोरात फिरत होता आणि तो घामानं चिंब भिजला होता. हृदयाचे ठोके इतक्या जोराजोरात पडत होते, की भिंतीवरल्या भल्याथोरल्या घड्याळाची टिकटिकही त्यापुढे कमी वाटत होती. दहा मैल धावून आल्यासारखा श्वास लागला होता. त्यानं मान वळवून बाजूला पाहिलं तर त्याची बायको शांतपणे झोपलेली होती. त्यानं सुटकेचा निश्वास टाकला आणि तो पलंगावरच उठून बसला. त्याच्यासमोर एक भलाथोरला आरसा होता. त्यानं घामानं भिजलेला बनियान काढून टाकला आणि सहजच त्याची नजर आरशाकडे गेली. आणि..
--

तारीख  २६ मे, मंगळवार
हल्ली फारच विचित्र वाटू लागलंय. रात्री-अपरात्री अजूनही जाग येते. अमरच्या शेवटच्या दिवसांमध्ये अमरमुळे यायची तशीच. फरक एव्हढाच की अमर नाही. भर उन्हाळ्यातही रात्री जाग येते तेव्हा खोली थंड वाटते. एकदम अंगातलं त्राण गेल्यासारखं वाटतं. सोसाट्याचा वारा सुटल्यासारखा आवाज येत राहतो पण बाहेर पाहावं तर झाडं एखाद्या स्थिरचित्रातल्यासारखी स्तब्ध असतात. अमरची प्रचंड आठवण येत राहते. आता तर त्याच्याच पलंगावर झोपायला सुरूवात केलीय
कथेचे तुकडे सुचताहेत पण कथा अजूनही प्रचंड असंबद्ध वाटते. कधी साखळी लागेल कळत नाही. ह्या एकटेपणातून कधी बाहेर पडू शकेन का ही शंकाच आहे.


ते पानही त्यांनी काळजीपूर्वक मेणबत्तीखालच्या आधीच्या पानाखाली ठेवलं आणि चळतीतलं पुढचं पान उचलून वाचू लागले.


-----


अभयला अमरची लक्षणं ठीक दिसत नव्हती. अमर तासंतास हरवल्यासारखा खिडकीतून बाहेर एकटक बघत बसलेला असे आणि हटकल्यावर काहीतरी अर्थहीन उत्तरं देत असे. तो हरवल्यासारखा बसल्याचं त्याला मान्यच नसे. वेळेचं गणित चुकल्यासारखं भलत्या वेळी भलती कामं करायला सुरूवात करत असे आणि मग लक्षात आल्यावर सारवासारव करून बाजूला होत असे. एकदा सकाळी सहा ते दहा अशाच तंद्रीत बसल्यावर दहाला उठून दात घासून सकाळी आठच्या बातम्या पाहायला म्हणून बसला. अभय हे सगळं पाहत होता.
ती घटना घडल्याला आठ दिवस होत होते. अमरनं शूट केलेला व्हिडिओ लीक झाल्यामुळे मुलीची ओळख बाहेर पडली होती आणि घटनेच्या दुसर्‍याच दिवशी भरदिवसा तिच्या घरून तिचं अपहरण झालं होतं. त्या दिवसापासून अमरनं जवळपास हाय खाल्ली होती. अजूनही तिचा पत्ता लागला नव्हता. अमरला त्याच्या मालकांनी घरी थांबायला सांगितलं होतं. एक तर त्याचा पत्ता कुणाकडे नव्हता आणि अशा दुर्गम ठिकाणी शहराबाहेर राहत असल्यानं कुणी पत्ता शोधत येण्याच्याही शक्यता कमी होत्या, त्यामुळे तो घरीच राहणं सर्वांसाठी सोयीचं होतं. पण अमरच्या मनावर विपरित परिणाम होत चालला होता.
अभय विचारात पडला होता की खरोखरच अमरनं ही घटना मनाला लावून घेतलीय की घटनेच्या दुसर्‍याच दिवशी आलेल्या दुसर्‍या बातमीमुळे तो असा वागतोय.


-----


लेले गाडी ड्राईव्ह करत घराकडे परतत होते. रात्रीचे अकरा वाजत होते. त्यांच्यासाठी तर ही जवळपास ऑफिसला दांडी होते. कारण एरव्ही ते पहाटे पाच- सहाला घरी परतत असत. पण त्यादिवशी ते थोडेसे विचित्र मनःस्थितीत होते. आलेलं एक मोठं संकट जवळपास टळल्यात जमा होतं. पुन्हा त्यांनी दुसरी नोकरीही शोधून ठेवली होती. पण अमरच्या मृत्यूनं परिस्थिती बिघडून गेली होती. म्हणूनच ते अमरच्या घराकडे निघाले होते. थोड्याच वेळात ते शहराबाहेर इन्स्टिट्यूटकडे जाणार्‍या रस्त्याला लागले आणि गाडीचा स्पीड त्यांनी स्वतःच्याही नकळत वाढवला.एरव्ही पूर्ण खंबीर असणारा अमर ह्यावेळेस इतका कसा काय कोलमडला, ह्याचं लेलेंना राहून राहून आश्चर्य वाटत होतं. स्वतः संपादक असूनही लेलेंनी अमरला पूर्ण मोकळीक दिलेली होती. पण प्रत्येक वेळेस स्वतःच्या मतांवर ठाम असणार्‍या अमरनं ह्या टीकेनंतर मात्र हाय खाल्ली होती आणि सुट्टी घेऊन घरी थांबला होता. त्याच्या भावाकडून तो थोडाफार ठीक असल्याच्या अधूनमधून फोनखेरीज त्याची खबरबात घ्यायलाही त्यांना वेळ झाला नव्हता. आणि आज थेट त्यानं खिडकीतून उडी टाकून जीव दिल्याचीच खबर आली होती. लेले ह्याच विचारांमध्ये गाडी हाकत होते. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं पण अचानकच त्यांना रस्त्याच्या बाजूनं एक मनुष्य चालत जाताना दिसला आणि त्यांना तो अमरच असल्याचा भास झाला.
गाडी थोडी पुढे गेल्यावर त्यांना झालेल्या भासाची जाणीव झाली आणि ते नखशिखान्त थरारले. त्यांनी मागे वळून पाहिलं. तो माणूस तसाच चालत पुढे चालला होता. पाठमोरा तो अमरसारखाच दिसत होता. आणि एकदम जोरात हॉर्नचा आवाज ऐकू आल्यामुळे त्यांनी दचकून पुढे पाहिलं तर समोर हेडलाईट्स अप ठेवून एक जीपसदृश गाडी जोरात येत होती. अप हेडलाईट्समुळे लेलेंचे डोळे दीपले आणि नुकत्याच झालेल्या थरारक भासानं त्यांच्या संवेदना थोड्याशा बधीरच होत्या. त्यांचं नियंत्रण सुटतं की काय असं वाटेपर्यंत त्यांनी कसाबसा स्वतःवर ताबा मिळवला आणि घाईगडबडीतच गाडी रस्त्यावरून बाजूला केली आणि झाडांच्या  एकदम जवळ नेऊन हळू केली. जीप सुसाट वेगात निघून गेली. कोण होतं ते पाहायचा त्यांनी असफल प्रयत्न केला. आणि मग गाडी थांबवली. त्यांची छाती नेहमीपेक्षा थोडी जास्त धडधडत होती. त्यांनी एकदोन खोल श्वास घेतले. आजूबाजूला पाहिलं. रस्त्यावर स्ट्रीटलाईट्सचा मंद प्रकाश पसरलेला होता. अमावास्येच्या जंगलभर पसरलेल्या अंधारामध्ये त्या मंद प्रकाशाचाच आधार होता. अमरच्या मृत्यूच्या बातमीमुळे म्हणा किंवा अमरच्या झालेल्या भासामुळे किंवा जवळून गेलेल्या मरणामुळे त्यांना सगळं एकदम मलूल वाटू लागलं होतं. गाडीतून उतरून ते रस्त्यावर आले आणि मागे वळून पाहू लागले. रस्ता सरळसोट शहराकडे जात होता. ते जंगलाच्या बरेच आत आले होते. शहर खूपच दूर राहिलं होतं. पण.. पण तो चालणारा मनुष्य कुठेतरी गायब झाला होता. सरळ समतल पातळीतल्या रस्त्यावर तो अजूनही दिसत राहायला हवा होता. पण तो नव्हता. जीपमधून लिफ्ट घेतली होती का त्यानं? पण जीप थांबल्याचं तर लेलेंना जाणवलं नव्हतं. मग गेला कुठे तो? की नुसताच भास होता? मग दोनदा कसा दिसला? लेलेंचं डोकं भणाणून गेलं. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. इन्स्टिट्यूटची इमारत बहुतेक थोड्या अंतरावरच होती. मग तिथून छोटा रस्ता पकडून अमरचं घर. पण पोलिसांची गाडी, ऍम्ब्युलन्स कशाचीच चाहूल नव्हती. तो रस्ता एखाद्या वेगळ्याच जगाचा तुकडा असल्यागत भारावलेलं वातावरण झालं होतं. लेलेंनी मोबाईल काढून पाहिला तर तो अनलॉकच होईना. त्यांचे हात थोडेसे थरथरत होते, त्यामुळे तो त्यांच्या हातून पडला. आणि क्षणभरासाठी रातकिडेसुद्धा शांत झाले आणि तो एक क्षण एकदम जडावून गेला. पुन्हा रातकिड्यांचा आवाज सुरू झाला आणि लेले भानावर आले. मोबाईल तसाच टाकून ते गाडीकडे धावले आणि गाडी सुरू करून वळवली. दुसर्‍या दिवशी सकाळी यायचं ठरवून ते शहराकडे परत फिरले.
गाडी वेगानं जात असतानाच त्यांना रस्त्याच्या उलट्या बाजून दूरून एक मनुष्य चालत येताना दिसला. ह्यावेळेस लेले सावध होते. तो मनुष्य जवळ येताच त्यांनी गाडी हळू केली आणि हेडलाईट अप केले. त्या माणसाचा चेहरा त्या प्रकाशात उजळून निघाला.
--
तारीख २२ मे, शुक्रवार


अमरला जाऊन पाच दिवस झालेत. माणसं भेटायला येणं जवळपास बंद झालंय. सगळ्या क्रियाकर्मांपासून ते कागदपत्रं, डेथ सर्टिफिकेट सगळ्यामध्ये अमरच्या संपादकसाहेबांची फार मदत झाली हे खरं. त्यांनी बाकी काही केलं असेलही. व्हिडिओ त्यांनी लीक केला म्हणतात. चूक की बरोबर, नैतिक की अनैतिक तो भाग अलाहिदा. पण मला त्यांची फार मदत झाली. आणि तरीही मला त्यांच्यावरून असं पात्र आणि असा घटनाक्रम सुचावा हे आश्चर्यच. आपण खोलवर कुठेतरी प्रत्येक गोष्टीला नैतिक तराजूत तोलत असतो, आपल्याही नकळत. तसंच असावं हे. हरकत नाही. आत्ता तरी खोडत नाही. काहीतरी वळणं देऊ कथेला.


-----


रात्री कधीतरी नेहमीसारखीच अभयला जाग आली. पण त्याला नेहमीपेक्षा विचित्र काहीतरी जाणवलं. त्यानं झर्रकन मान एका बाजूला करून पाहिलं आणि त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. अमर खिडकीच्या गजाला टेकून खिडकीकडे पाठ करून उभा होता. त्याच विवक्षित जागी जमिनीवरच्या एका कोपर्‍यात पाहत. कृष्णपक्षाच्या एकादशीची क्षीण चंद्रकोर त्याच्यामागे खिडकीतून डोकावत होती आणि हलक्या चांदण्याच्या पार्श्वभूमीमुळे त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता. अभयनं थोडंसं चाचरतच जास्त हालचाल न करता शेजारी असलेलं दिव्याचं बटण अमरवरची नजर न हटवता दाबलं.
दिवा लागला आणि अमरनं झटक्यात नजर उंचावून अभयकडे पाहिलं. अभय जागच्याजागी थिजला. ती नजर. ती नजर अमरची नव्हती. अभयनं फार पूर्वी ती कुठेतरी पाहिली होती. अभयच्या अंगावर सरसरून काटा आला. पण अमरची ती नजर क्षणभरच टिकली. तो काहीच झालं नाही अशा आविर्भावात खिडकीपासून दूर झाला.
"तहान लागली रे मला." म्हणत तो बेडरूममधून बाहेर पडून स्वयंपाकघराच्या दिशेनं गेला.
अभय अजूनही थिजलेलाच होता. 'क्षणभर काय झालं होतं? तो भास होता की अजून काही? ती नजर. नेमकी आत्ताच का? त्या बातमीनंतर का? की ती बातमी ऐकल्यामुळेच आपल्या डोक्यात पार्श्वभूमीवर ते विचार सुरू आहेत?' नको नको म्हणताना त्याला ती नजर आधी जेव्हा पाहिली होती तो प्रसंग स्पष्ट आठवू लागला.
व्हिलचेअरवर बसलेल्या तिचे तपकिरी डोळे फक्त काम करत होते त्याक्षणी. टेम्पररी पॅरॅलिसिसच्या इंजेक्शननं डोळे बधीर होत नव्हते. त्यानं डॉक्टरच्या सहायकाला पैसे दिले आणि जायला वळण्याआधी त्यानं एकदा अपराधी नजरेनं तिच्याकडे पाहिलं. तेव्हा तिची नजर त्याच्यावरच रोखलेली होती. तीच नजर. असहाय, हतबल पण द्वेषानं काठोकाठ भरलेली. की तो भासच होता फक्त? अपराधी मनानं स्वतःशीच चालवलेले खेळ.
अमर परत खोलीत आला.
"तू कशाला उठलायेस रे दादा?" म्हणत तो स्वतःच्या पलंगाकडे गेला.
स्वतःची काळजी करावी की अमरची ह्याच संभ्रमात अभयनं दिवा मालवला आणि घडलेलं सगळं विसरायचा प्रयत्न करत तो झोपायचा प्रयत्न करू लागला.


-----


चळतीच्या चौथ्या पानावर नुसत्याच रेघोट्या होत्या. कुणाचे बिन नावाचे फोन नंबर लिहिलेले होते. एक दोन परदेशी नाण्यांचे पेन्सिल शेडिंगनं उमटवलेले ठसे होते. त्या दोघांमधल्या एकानं ते पान बाजूला भिरकावलं आणि पुढचं पान मेणबत्तीजवळ ओढलं.



तारीख २५ मे, शनिवार

आजचा अख्खा दिवस कसा गेला ते लक्षातही आलं नाही. पहाटे पाचला जाग आली. तोंड धुवून मी चहा उकळायला ठेवला आणि पुस्तक वाचत बसलो. पण वाचताना इतकी तंद्री लागली की भानावर आलो तेव्हा चहा जळून घरभर जळका वास पसरला होता. पण आश्चर्य म्हणजे मी पुस्तकात काय आणि किती वाचलं ते ही मला आठवेना. अमरचं व्हायचं तसंच झालं असेल का? ब्लॅकआऊट सारखं? स्किझोफ्रेनिया? आमच्या फॅमिलीत हिस्ट्री आहे स्किझोफ्रेनियाची. अमरलाही तेच असेल का? आणि मलाही? छे छे! बेडरूममध्ये अमरच्या पलंगावर बसून वाचन बंद केलं पाहिजे.
छ्या ह्या सगळ्या नादामध्ये आज काहीही लिहिणं झालं नाही. फक्त ही एव्हढी डायरी नोंद.


२४ आणि २६ तारखेच्या पानांमध्ये चळतीतलं पाचवं पान टाकून त्यांनी सहावं पान समोर ओढलं.


सुब्बाराव त्याच्या तंद्रीत टॅक्सी चालवत होता. रात्रीचे साडेअकरा होत होते. दिवसाचा कारभार उरकला होता. शेवटचं भाडं त्यानं सोडलं होतं. त्याला आता घरचे वेध लागले होते. रस्त्यांवर बर्‍यापैकी सामसूम होऊ लागली होती. मुख्य रस्त्यावरून तो गल्ल्यांच्या जाळ्यात शिरला. उपनगरातल्या त्याच्या घराकडे तो नेहमीच्या सवयीनं नेहमीच्याच रस्त्यानं नेहमीच्याच वेगात जाऊ लागला. आणि एकदमच त्याच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला.
-----
शशिकिरण मार्केटिंग टीमचा एक भाग होता. दुपारी बारा वाजता सगळे जेवायला गेल्यावर तो एकटाच कॉन्फरन्स रूममध्ये पेपरवेटशी खेळत बसला होता. कॉन्फरन्स रूमचे दरवाजे काचेचे होते. त्यातनं समोर बसलेला सेक्रेटरियल स्टाफ दिसत होता. शशिकिरण पेपरवेट कॉन्फरन्सटेबलच्या गुळगुळीत पृष्ठभागावरून पुढेमागे सरपटवत बसला होता. खेळताखेळता त्याचा फोन वाजू लागला म्हणून त्यानं पेपरवेट सोडून दिला आणि फोन उचलून त्यावर बोलायला लागला
फोनवरून बोलून त्यानं फोन ठेवला आणि पाहतो तर पेपरवेट आपणहूनच एका बाजूनं दुसर्‍या बाजूला सरपटत होता. न थांबता. त्यानं पुनःपुन्हा स्वतःचे डोळे चोळले. पण पेपरवेट तसाच एखाद्या घड्याळाच्या लंबकासारखा पुढेमागे होत होता. त्याला आपण स्वप्न पाहतोय की काय असं वाटू लागलं. त्यानं स्वतःला चिमटा काढला, तरी तेच. आता त्याला धडकी भरली. तो धडपडत जागेवरून उठला आणि काचेकडे कुणालातरी बोलवायला गेला. पण... पण काचेपलिकडे कुणीच नव्हतं. अख्खं ऑफिस रिकामं होतं. सगळा स्टाफ एकत्र कसा गायब होईल? त्याला दरदरून घाम फुटला. हृदयाचे ठोके वाढले. त्यानं कॉन्फरन्स रूमचा दरवाजा ओढून उघडायचा प्रयत्न केला. पण दरवाजा उघडतच नव्हता. त्यानं मागे वळून पाहिलं. पेपरवेट अजून पुढेमागे होत होता. त्याच्या घशाला कोरड पडली होती. त्यानं ओरडायचा प्रयत्न केला पण त्याच्या घशातून आवाजच फुटत नव्हता. दरवाजा ओढून ओढून त्याच्या खांद्याला रग लागली आणि खांद्यातून कळ येऊ लागली. मग त्याच्या छातीत अचानक कळ आली आणि तो दरवाजातच कोसळला.
--
तारीख २३ मे, शनिवार


हे असलं काहीतरी सुचतंय आज. ह्याच पद्धतीचं अजून काही, पण अधिक तपशीलात लिहायला जमलं, काल लिहिलं होतं तसं, तर कथेला काहीतरी आकार येईल. नाहीतर अवघड आहे. काही म्हणा अमर गेल्यानं आयुष्यात जी पोकळी निर्माण झालीय, ती लेखनानं भरून निघणं अशक्यच आहे. पण निदान हे लिहिण्याच्या निमित्तानं काहीतरी वेगळे विचार तरी मनात येतात. नाहीतर तेच ते. अमरच्या आठवणी आणि शेवटच्या दिवसांतले त्याचे हाल.

सातव्या आणि आठव्या पानावर कॉम्प्युटर प्रिंटेड मजकूर होता. पण तो फार जुना असल्यानं उडून गेला होता. निरखून निरखून वाचताना मेणबत्तीच्या प्रकाशात त्यांना फक्त दोन-तीन शब्दांचा अंदाज आला. ते कसल्यातरी प्रेस रिलीजचे मसुदे होते.

क्रमशः

7/17/2012

स्मृती -१

किर्र अंधाराचं साम्राज्य पसरलेलं होतं. घनदाट जंगलाला अमावास्येच्या रात्रीनं पुरतं अंधारात बुडवून टाकलेलं होतं. मधूनच होणारी रातकिड्यांची किर्र सोडली किंवा मधूनच सरपटत जाणार्‍या सापाची सळसळ अथवा भक्ष्याच्या शोधार्थ निघालेल्या श्वापदांच्या चाहूलीखेरीज बाकी कसला आवाजही नव्हता. वातावरणात डिसेंबरचा गारठाही अंधाराच्या बरोबरीनं होता. तेव्हढ्यात त्या दोघांच्या पावलांमुळे चिरडल्या जाणार्‍या काटक्यांच्या आवाजानं एकदम ती गारठलेली शांतता भंग पावल्यासारखी झाली. ते दोघे लगबगीनं चालत होते. तेव्हढ्यात त्यातल्या एकाच्या हातातली पेटती काडी त्याच्या बोटापर्यंत जळली आणि त्याला चटका बसल्याबरोबर त्यानं अस्फुटसं कण्हून ती काडी खाली फेकली. त्या थोड्याशा चटक्याची ऊब त्याला हवीहवीशी वाटली.
"संपल्या आपल्याकडच्या काड्या." चहूबाजूंना पसरलेल्या अंधाराच्या समुद्रातच डोळे ताणून अंदाजानंच आपल्या साथीदाराकडे पाहत तो म्हणाला.
"हरकत नाही, बहुतेक फार वेळ चालावं लागणार नाही." साथीदार ते दोघे ज्या काट्याकुट्यांनी भरलेल्या रस्त्यावरून चालत होतेत्याचा अदमास घेत म्हणाला.
"चहूबाजूंना सर्वकाही गिळून टाकलेला अंधार आहे. तुला कसला आशावाद सुचतोय?"
तेव्हा एकदमच घनदाट झाडी कमी झाली. थोड्याशा उघडीपीनं अगदी अस्पष्टसं थोडंफार दिसू लागलं. आणि त्या दोघांच्या चेहर्‍यावर एकदमच थोडीशी समाधानाची रेषा उमटली.
झाडी नसलेला भाग बराच विस्तीर्ण वाटत होता आणि त्याच्या मधोमध एक चारमजली पडकी इमारत उभी होती. आणि त्या इमारतीच्या दोन बाजूला दोन घरं किंवा इमारती कधीकाळी उभे असाव्यात असं सांगणार्‍या काही खुणा शिल्लक होत्या. त्या पूर्ण वस्तीला चारीबाजूंनी कुंपण असल्याचे अवशेषही दिसत होते.
 
'चंद्रकोर' नाव लिहिलेल्या त्या इमारतीत ते दोघेजण धडपडतच शिरले. थंडी बोचरी आणि असह्य होत होती. ते मुटकुळं करून बसण्यासाठी जागा शोधत असावेत, पण सगळे मजले सताड उघडेच. वारा आणि गारठा एकीकडून दुसरीकडे जावा इतकं नैसर्गिक वातानुकूल झालं होतं. चौथ्या मजल्यावर पोचल्यावर मात्र थोडीशी ऊब वाटू लागली. आश्चर्य म्हणजे चौथ्या मजल्यावरचं घर बर्‍यापैकी स्थितीत होतं. एका दरवाजा असलेल्या खोलीचा दरवाजा त्यांनी प्रयत्न करून उघडला आणि एकदम आतमध्ये पडलेला पालापाचोळा खळबळला. त्या खोलीच्या खिडक्या मोडलेल्या होत्या, त्यामुळे गारठा अन अधेमधे सुटणारा वारा होताच, पण खोलीच्या एका कोपर्‍यात ते मुटकुळं करून बसू शकत होते. त्यातला एकजण दुसर्‍याचा हात धरून त्याला समोरच दिसणार्‍या स्वयंपाकाच्या ओट्याकडे ओढू लागला. ते दोघे अंदाजानं तिथे गेले आणि चाचपडल्यावर त्यांच्या हाताला चक्क मेणबत्ती आणि काडेपेटी लागली. ते दोघे मेणबत्ती पेटवून त्या खोलीत घेऊन आले आणि कोपर्‍यात मेणबत्ती ठेवून एकमेकांना बिलगून बसले. खोलीत असलेल्या खाटा मोडून गेलेल्या होत्या आणि पाचोळ्यासोबत काही कागद इतस्ततः विखुरलेले होते. एकानं वेळ घालवण्यासाठी म्हणून ते सगळे अस्ताव्यस्त पसरलेले कागद एकत्र केले आणि मेणबत्तीजवळ घेऊन आला. दोघेहीजण त्या कागदाच्या चळतीकडे उत्सुकतेनं पाहू लागले.


-----


अमर खिडकीबाहेर शून्यात पाहत बसला होता.
"वडाकडे एकटक नजर लावून कशाला बसला आहेस बे?" अभयच्या आवाजानं अमर एकदम भानावर आला. त्यानं एकदा अभयकडे पाहिलं आणि बसला होता, तिथेच पलंगावर आडवा पडून त्यानं आढ्याकडे नजर लावली.
"अरे बस कर रे तुझा दीडशहाणेपणा!" अभय वैतागून खोलीच्या दुसर्‍या टोकाच्या स्वतःच्या पलंगावर बसत म्हणाला, "तुला खिडकीची जागा असला बायलेपणा करायला दिलेली नाही."
"पुरूषीपणा करायला ह्या खिडक्यांमधून झाडांशिवाय काही दिसतं का?" अमर म्हणाला.
"त्या समोरच्या घराच्या खिडकीचा पडदा वार्‍याने थोडा हलल्यावर.." अभय डोळा मारत म्हणाला.
अमर आढ्याकडे एकटक पाहत होता.
अभयनं एक क्षण त्याच्या उत्तराची वाट पाहिली आणि म्हणाला, "अजून किती दिवस असं निवणं करून बसायचं आहे?"
अमरचा चेहरा तसाच ओढलेला होता. पाचच दिवसांत तो प्रचंड खंगून गेला होता. अभयला त्याची ही स्थिती पाहवत नव्हती. अमरनं तरीही उत्तर दिलं नाही. अभय उठून अमरच्या पलंगाजवळ गेला आणि त्याच्याकडे पाहू लागला. अमरची नजर स्थिर होती. अभय त्याच्या शेजारी बसला.
"मला आतून काहीतरी होतंय रे. भीती, लाज, अपराधीपणा काहीतरी. खूप खोलवर." अभयचं त्याच्याकडे पाहणं सहन न होऊन शेवटी अमर बोलला. त्याचा स्वरही खोल गेलेला होता.
"पण तू काही चूक केलेलं नाहीस. काय मूर्खासारखं मनाला लाऊन घेतोयस?" अभय त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.
"चूक कसं नाही."
"अरे, तिथे भर चौकात दिवसाउजेडी मुलीला छेडणार्‍यांचा शूटिंग जर तू केलं नसतंस तर ते लोक पकडले गेले असते का? आणि एव्हढ्या जमावासमोर तू एकटा काय करणार होतास? लोक काहीही बोलतात रे. तू का मनाला लाऊन घेतोस?"
"मी त्याबद्दल बोलत नाहीये अभय."
"मग कशाबद्दल.." आणि एकदम लक्षात येऊन अभय म्हणाला, "ह्म्म. पण त्याबाबतीत आपण काही करू शकत नव्हतो. व्हायचं होतं ते झालं होतं."
"जे झालं त्यात आपली चूक होती." अमर पुटपुटल्यासारखं म्हणाला.
अभय तिथून उठला आणि खिडकीत जाऊन उभा राहिला. चौथ्या मजल्याच्या त्यांच्या खिडकीतून समोरच्या झाडांच्या गर्दीवरून त्यांना दूरपर्यंत क्षितिज दिसत असे. रात्रीचे नऊ-साडेनऊ होत आले असावेत. अष्टमीच्या चंद्राची कोर त्याला दिसत होती आणि त्या आखीव रेखीव कोरीभोवतालची चांदण्यांची नक्षी काळ्या कॅनव्हासवर कुणी लहान मुलानं चमकी सांडून टाकावी तशी दिसत होती. शेजारच्या घरांच्या आणि इमारतीच्या मध्ये असणार्‍या मोकळ्या जागेत लहान पोरं खेळत होती. बाजूच्या बंगल्यातल्या म्हातार्‍या आजोबांनी अंगणात खुर्ची टाकली होती आणि ते नेहमीप्रमाणेच खेळणार्‍या पोरांवर नजर ठेवून होते. सगळ्या वसाहतीभोवती असलेल्या कुंपणाला वॉचमन हळूहळू चालत एक फेरी मारत होता. उत्तरेकडे नजर फिरवून त्यानं रिसर्च इन्स्टिट्यूटच्या इमारतीकडे एक नजर टाकली. इन्स्टिट्यूटपासून भलाथोरला रस्ता जंगलाला कापत दूर शहराला जाऊन मिळत होता. वसाहत आणि इन्स्टिट्यूटना जोडणारा एक निमुळतासा जेमतेम एक गाडी जाईल एव्हढा सुबक डांबरी रस्ता दाट जंगलातनं नागमोडी वळणं घेत जात असे. त्याकडे त्याचं लक्ष गेलं आणि एकदम त्याला रोज त्यावरून चालत जाणार्‍या बाबांची आठवण आली. इन्स्टिट्यूटही बंद पडली होती आणि बाबाही राहिले नव्हते. राहिलं होतं फक्त घर आणि धाकटा अमर. तो थोड्याशा खिन्न मनानंच स्वतःच्या पलंगाकडे गेला. बेडरूमच्या दरवाजाजवळचं बटण दाबून त्यानं लाईट बंद केला. आणि पलंगावर पडून तो झोपायचा प्रयत्न करू लागला.


-----


पहिलं पान त्या दोघांनी वाचायला सुरूवात केली.

जोसेफ स्टीफन आपल्याच धुंदीत दारूच्या अंमलाखाली थोडासा भेलकांडत आपल्या घराकडे निघाला होता. गुत्त्यापासून घराकडचा त्याचा रोजचा रस्ता इतक्या सवयीचा होता की तो झोपेतसुद्धा न चुकता घरू पोचला असता, तर दारूची नशा काहीच नव्हती त्यापुढे. अकराच्या सुमारास झोपडपट्टीत असेल तेच दृश्य होतं. जवळपास सगळीजण झोपड्यांची दारं बंद करून बसलेले होते. कुठल्या झोपडीत टीव्ही चालू होते, कुठल्या झोपडीत पोरं रडत होती. कुठल्या झोपडीत जोसेफसारखा एखादा गुत्त्यातून जोसेफआधी निघून पोचला होता आणि त्याचं हक्काचं नित्यकर्म बजावत होता किंवा दुसरं हक्काचं नित्यकर्म म्हणजे बायकोला मारत होता. जोसेफ मात्र त्याच्याच तंद्रीत पुढे चालला होता. तेव्हढ्यात त्याला त्याच्या अंगावरून गार वारा गेल्याची जाणीव झाली.
जोसेफची नशा थोडीशी उतरली आणि तो एकदम आजूबाजूला पाहू लागला. काही अंतरावर पुढे एक गर्दुल्ला दोन झोपड्यांच्या मधल्या जागेत डोळे मिटून अस्ताव्यस्त पडला होता आणि मागच्या वळणापर्यंत दोन लूथ भरलेली कुत्री वगळता बाकी कुणीही त्याला दिसलं नाहीइल्लिगल स्ट्रीटलाईटच्या प्रकाशात डोळे चोळून चोळून त्यानं पुन्हा पाहिलं पण काहीच नव्हतं. तो अर्धवट उरलेल्या नशेचा आनंद घेत पुन्हा पुढे जाऊ लागला आणि ठेच लागून जमिनीला साष्टांग नमस्कार घालता झाला. आता त्याची नशा पुरती उतरली आणि एकदम त्याच्या लक्षात आलं की तो गर्दुल्ल्यावर अडखळून पडला होता कारण गर्दुल्लाही त्याच्या तारेतच जोसेफला शिव्या हासडू लागला
धड नशाही एन्जॉय करता येत नाही म्हणून नशीबाला शिव्या घालत जोसेफ त्याच्या झोपडीसाठी एका छोट्या बोळात सवयीन वळला आणि पुन्हा एकदा त्याच्या अंगावरून गार वारा गेल्याची त्याला जाणीव झाली. ह्यावेळेस वारा मागून पुढे गेला होता. आणि ह्यावेळेस तो पूर्ण शुद्धीत होता त्यामुळे एकदम सावध झाला. पण त्याला  अजून काही कळायच्या आतच वीज बोर्डाच्या टॉवरवरून खेचलेली शेजारच्या झोपडीवरची तार झोपडीवरच्या पत्र्याला लावलेल्या हूकमधून निसटली ती थेट जोसेफच्या हातावर. झोपडपट्टीचा तो भाग एकदम स्टेडियमचा हेडलाईट लागावा तसा उजळलाआणि एक करपलेला वास आसमंतात भरून गेला.
--
तारीख २४ मेरविवार

अमरला जाऊन जवळपास आठवडा होत आलाअजूनही विश्वास बसत नाही की तो गेलायतो गेल्यावर जो माणसांचा एक लोंढा भेटायला येऊन गेला त्यानंतर एकदम एकाकीपण भरून आलंय. अमरनं जोडलेली माणसं. आणि मी हा असा एकटा. एकलकोंडा लेखक. समोरच्या काकू जेवायला आणून देतात कधीकधी तेव्हढाच माणसांशी संबंध उरलाय. काहीबाही सुचतंय ते खरडणं मात्र चालूच ठेवतोय. कदाचित कधीतरी काहीतरी संदर्भ लागेल आणि एकच सुसंबद्ध कथा तयार होईल.

पान वाचून झालं आणि दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. ते पान बाजूला ठेवून त्यांनी त्या पानावर उडू नये म्हणून काडेपेटी आणि दुसरी न पेटवलेली मेणबत्ती ठेवली आणि पुढचं पान उचलून मेणबत्तीच्या प्रकाशात धरून वाचू लागले.

क्रमशः

(टीप - मागच्या वेळप्रमाणे वाढता वाढता वाढे होणार नाही आणि दोन-तीन दिवसांतच दोन-तीन भागांमध्ये कथा पूर्ण लिहून प्रकाशित होईल ह्याची खात्री देतो. धन्यवाद!)