7/18/2012

स्मृती -२

भाग -१ पासून पुढे


मध्यरात्रीच्या सुमारास अभयला कसलीशी चाहूल लागली आणि तो एकदम जागा झाला. पंखा नेहमीच्या तालात गरगरत होता. त्याचा ठरलेला आवाज येत होता. खोलीतली हवा थोडी गार झाली होती. त्यानं मान वळवून खिडकीकडे पाहिलं. खिडकीतनं मंदसं चांदणं आत येत होतंअचानकच त्याला खोलीत कुणीतरी भलतंच असल्याची जाणीव झाली आणि त्याच्या मणक्यातनं थंड शिरशिरी गेली. त्यानं दचकूनच त्या आकृतीकडे पाहिलं तर तो अभयच होता. पण त्याच्या पलंगावर गुडघे छातीशी धरून हनुवटी त्यावर टेकवून एकटक जमिनीकडे पाहत असल्यासारखा. अभयची नजर भिंतीवरच्या घड्याळाकडे गेली. रात्रीचे सव्वातीन होत होते. का कुणास ठाऊक पण त्याला सेकंदकाटा हलत नसल्यासारखं वाटलं. तो झटकन उठून बसला. पण त्याच्या हालचालीनंही अमरची तंद्री भंगली नाही.
"अमर!" त्यानं हाक मारली आणि रात्रीच्या शांततेत त्याचा तोच दचकला. पण अमर हलला नाही.
अभयच्या छातीत थोडंसं धडधडायला लागलं. पण तो उठला आणि हळूहळू अमरजवळ गेला आणि अमरच्या शेजारी बसला. अमरची काहीही हालचाल नव्हती. डोळे तंद्री लागल्यागत जमिनीवर रोखलेले होते. बाहेरच्या रातकीड्यांच्या आवाजाखेरीज पसरलेल्या शांततेत अभयला स्वतःचा श्वासोच्छवास आणि धडधडणारी छातीदेखील स्पष्टपणे ऐकू येत होती. पण अमरच्या श्वासांचा मात्र बिलकुल आवाज येत नव्हता. दोन क्षण वाट पाहून अभयनं अमरच्या खांद्यावर हात ठेवला आणि एकदम झटका लागल्यागत अमरनं मान उचलली आणि पाय झटकून सरळ केले. त्याच्या त्या हालचालीनं अभयला हृदयविकाराचा झटकाच यायचा बाकी होता.
"अमर!" अभयच्या तोंडून अस्फुट असा आवाज फुटला.
"हां." अमर अभयकडे बघून बोलला. त्याच्या चेहर्‍यावर जणू काही झालंच नाही असे भाव होते. "तुला काय झालं? इथे माझ्या पलंगावर काय करतोयस?" अमरनं उलट सवाल केला.
अभय त्याच्याकडे दोन मिनिटं पाहतच राहिला आणि मग त्याला झालेला घटनाक्रम सांगितला.
"अरे काही नाही. उद्या एक प्रेस रिलीज लिहून द्यायचा विचार करत होतो. त्यातला मजकूर एकदम सुचला त्याची मनातल्या मनात उजळणी करत बसलेलो." अमर म्हणाला खरा पण अभयला विचित्रच वाटत होतं. अमर घरी बसल्यापासून रात्री अपरात्री दोनतीनदा अभयची झोपमोड झाली पण प्रत्येक वेळी अमर त्याला जागा असल्याची जाणीव झाली होती. एकदा तो पाणी पिऊन आलो म्हणाला. एकदा बाथरूमला जाऊन आल्याचं म्हणाला तर एकदा त्यानं झोपून राहिल्याचं नाटक केलं. आज मात्र हे नवंच. अभय मनाशीच विचार करत अमरच्या पलंगावरून उठला आणि स्वतःच्या पलंगाकडे गेला. त्यानं मधेच नजर फिरवून अमरकडे पाहिलं त्यानं मगाशी पाहत असलेल्या जागीच एकदा कटाक्ष टाकला आणि तो आडवा झाला. अभय स्वतःच्या पलंगावर बसला आणि त्यानंही त्याच जागेकडे पाहिलं. तिथे काहीच नव्हतं. पुन्हा असं झालं तर आधी दिवा लावायचा ही खूणगाठ मनाशी बांधून अभय आडवा झाला.


-----


संतोषला दरदरून घाम फुटला होता. तो भराभरा पावलं टाकत चालला होता. दर दोन पावलांनंतर भीतीपूर्ण नजरेनं मागे वळून पाहत तो निघाला होता. रस्त्याला रहदारी अजिबातच नव्हती. शहराचा मुख्य रस्ता नसला तरी बर्‍यापैकी रहदारीचा तो रस्ता होता. पण रात्रीच्या एक वाजता तिथे फारसं कुणी नसणं तसं आश्चर्यकारक नव्हतं. संतोषचं घर जवळ येत होतं तसतसा त्याच्या पावलांना वेग येत चालला होता आणि सर्वांगाला अधिकाधिक कंप सुटत चालला होता. समाप्तीरेषा जवळ आली की माणूस मनानंच आधी पार होतो आणि त्यामुळे थोडीशी बेपर्वाई होण्याची शक्यता असते, तसंच झालं आणि तो दगडाला ठेचकाळून पडला. गुडघा फुटला असावा आणि हनुवटीलाही मार बसल्याचं त्याच्या लक्षात आलं पण तो तसाच धडपडत उठला. घाबरूनच मागे नजर टाकून उभा राहिला आणि एकदम धाडकन कोसळला. त्याला काय झालं तेच कळेना. त्यानं पुन्हा उठायचा प्रयत्न केला आणि त्याचं सर्वांग भीतीनं थंड पडलं. त्याला त्याचे पायच हलवता येत नव्हते. तो जीवाच्या आकांतानं पाय हलवायचा प्रयत्न करत होता पण त्याचे दोन्ही पाय लुळे पडले होते. आजूबाजूच्या सर्व इमारतींमध्ये लोक शांतपणे झोपले असतील असा विचार त्याच्या मनाला चाटून गेला आणि एकदम त्याला मदतीसाठी ओरडायची बुद्धी सुचली. पण. पण त्याच्या घशातून आवाजच फुटेना. रस्त्यावरचे स्ट्रीटलाईट्स एकाएकी मंद झाल्यासारखं त्याला जाणवलं. वाराही अचानक पडला. रस्त्याचा स्पर्श लुळ्या पडलेल्या पायांमुळे त्याला जाणवतच नव्हता. अधांतरी तरंगत असल्यासारखं, कुठल्यातरी वेगळ्या मितीत असल्यासारखी एक विचित्र जाणीव त्याला झाली आणि हळूहळू अंधारत जाणार्‍या वातावरणात त्याला कसलीशी अस्पष्ट चाहूल लागली. त्याचा भीतीनं थरकाप उडाला. थरथरतच त्यानं मान वळवून पाहिलं आणि...
त्यानं डोळे उघडले. तो त्याच्या बिछान्यात होता. वर पंखा जोराजोरात फिरत होता आणि तो घामानं चिंब भिजला होता. हृदयाचे ठोके इतक्या जोराजोरात पडत होते, की भिंतीवरल्या भल्याथोरल्या घड्याळाची टिकटिकही त्यापुढे कमी वाटत होती. दहा मैल धावून आल्यासारखा श्वास लागला होता. त्यानं मान वळवून बाजूला पाहिलं तर त्याची बायको शांतपणे झोपलेली होती. त्यानं सुटकेचा निश्वास टाकला आणि तो पलंगावरच उठून बसला. त्याच्यासमोर एक भलाथोरला आरसा होता. त्यानं घामानं भिजलेला बनियान काढून टाकला आणि सहजच त्याची नजर आरशाकडे गेली. आणि..
--

तारीख  २६ मे, मंगळवार
हल्ली फारच विचित्र वाटू लागलंय. रात्री-अपरात्री अजूनही जाग येते. अमरच्या शेवटच्या दिवसांमध्ये अमरमुळे यायची तशीच. फरक एव्हढाच की अमर नाही. भर उन्हाळ्यातही रात्री जाग येते तेव्हा खोली थंड वाटते. एकदम अंगातलं त्राण गेल्यासारखं वाटतं. सोसाट्याचा वारा सुटल्यासारखा आवाज येत राहतो पण बाहेर पाहावं तर झाडं एखाद्या स्थिरचित्रातल्यासारखी स्तब्ध असतात. अमरची प्रचंड आठवण येत राहते. आता तर त्याच्याच पलंगावर झोपायला सुरूवात केलीय
कथेचे तुकडे सुचताहेत पण कथा अजूनही प्रचंड असंबद्ध वाटते. कधी साखळी लागेल कळत नाही. ह्या एकटेपणातून कधी बाहेर पडू शकेन का ही शंकाच आहे.


ते पानही त्यांनी काळजीपूर्वक मेणबत्तीखालच्या आधीच्या पानाखाली ठेवलं आणि चळतीतलं पुढचं पान उचलून वाचू लागले.


-----


अभयला अमरची लक्षणं ठीक दिसत नव्हती. अमर तासंतास हरवल्यासारखा खिडकीतून बाहेर एकटक बघत बसलेला असे आणि हटकल्यावर काहीतरी अर्थहीन उत्तरं देत असे. तो हरवल्यासारखा बसल्याचं त्याला मान्यच नसे. वेळेचं गणित चुकल्यासारखं भलत्या वेळी भलती कामं करायला सुरूवात करत असे आणि मग लक्षात आल्यावर सारवासारव करून बाजूला होत असे. एकदा सकाळी सहा ते दहा अशाच तंद्रीत बसल्यावर दहाला उठून दात घासून सकाळी आठच्या बातम्या पाहायला म्हणून बसला. अभय हे सगळं पाहत होता.
ती घटना घडल्याला आठ दिवस होत होते. अमरनं शूट केलेला व्हिडिओ लीक झाल्यामुळे मुलीची ओळख बाहेर पडली होती आणि घटनेच्या दुसर्‍याच दिवशी भरदिवसा तिच्या घरून तिचं अपहरण झालं होतं. त्या दिवसापासून अमरनं जवळपास हाय खाल्ली होती. अजूनही तिचा पत्ता लागला नव्हता. अमरला त्याच्या मालकांनी घरी थांबायला सांगितलं होतं. एक तर त्याचा पत्ता कुणाकडे नव्हता आणि अशा दुर्गम ठिकाणी शहराबाहेर राहत असल्यानं कुणी पत्ता शोधत येण्याच्याही शक्यता कमी होत्या, त्यामुळे तो घरीच राहणं सर्वांसाठी सोयीचं होतं. पण अमरच्या मनावर विपरित परिणाम होत चालला होता.
अभय विचारात पडला होता की खरोखरच अमरनं ही घटना मनाला लावून घेतलीय की घटनेच्या दुसर्‍याच दिवशी आलेल्या दुसर्‍या बातमीमुळे तो असा वागतोय.


-----


लेले गाडी ड्राईव्ह करत घराकडे परतत होते. रात्रीचे अकरा वाजत होते. त्यांच्यासाठी तर ही जवळपास ऑफिसला दांडी होते. कारण एरव्ही ते पहाटे पाच- सहाला घरी परतत असत. पण त्यादिवशी ते थोडेसे विचित्र मनःस्थितीत होते. आलेलं एक मोठं संकट जवळपास टळल्यात जमा होतं. पुन्हा त्यांनी दुसरी नोकरीही शोधून ठेवली होती. पण अमरच्या मृत्यूनं परिस्थिती बिघडून गेली होती. म्हणूनच ते अमरच्या घराकडे निघाले होते. थोड्याच वेळात ते शहराबाहेर इन्स्टिट्यूटकडे जाणार्‍या रस्त्याला लागले आणि गाडीचा स्पीड त्यांनी स्वतःच्याही नकळत वाढवला.एरव्ही पूर्ण खंबीर असणारा अमर ह्यावेळेस इतका कसा काय कोलमडला, ह्याचं लेलेंना राहून राहून आश्चर्य वाटत होतं. स्वतः संपादक असूनही लेलेंनी अमरला पूर्ण मोकळीक दिलेली होती. पण प्रत्येक वेळेस स्वतःच्या मतांवर ठाम असणार्‍या अमरनं ह्या टीकेनंतर मात्र हाय खाल्ली होती आणि सुट्टी घेऊन घरी थांबला होता. त्याच्या भावाकडून तो थोडाफार ठीक असल्याच्या अधूनमधून फोनखेरीज त्याची खबरबात घ्यायलाही त्यांना वेळ झाला नव्हता. आणि आज थेट त्यानं खिडकीतून उडी टाकून जीव दिल्याचीच खबर आली होती. लेले ह्याच विचारांमध्ये गाडी हाकत होते. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं पण अचानकच त्यांना रस्त्याच्या बाजूनं एक मनुष्य चालत जाताना दिसला आणि त्यांना तो अमरच असल्याचा भास झाला.
गाडी थोडी पुढे गेल्यावर त्यांना झालेल्या भासाची जाणीव झाली आणि ते नखशिखान्त थरारले. त्यांनी मागे वळून पाहिलं. तो माणूस तसाच चालत पुढे चालला होता. पाठमोरा तो अमरसारखाच दिसत होता. आणि एकदम जोरात हॉर्नचा आवाज ऐकू आल्यामुळे त्यांनी दचकून पुढे पाहिलं तर समोर हेडलाईट्स अप ठेवून एक जीपसदृश गाडी जोरात येत होती. अप हेडलाईट्समुळे लेलेंचे डोळे दीपले आणि नुकत्याच झालेल्या थरारक भासानं त्यांच्या संवेदना थोड्याशा बधीरच होत्या. त्यांचं नियंत्रण सुटतं की काय असं वाटेपर्यंत त्यांनी कसाबसा स्वतःवर ताबा मिळवला आणि घाईगडबडीतच गाडी रस्त्यावरून बाजूला केली आणि झाडांच्या  एकदम जवळ नेऊन हळू केली. जीप सुसाट वेगात निघून गेली. कोण होतं ते पाहायचा त्यांनी असफल प्रयत्न केला. आणि मग गाडी थांबवली. त्यांची छाती नेहमीपेक्षा थोडी जास्त धडधडत होती. त्यांनी एकदोन खोल श्वास घेतले. आजूबाजूला पाहिलं. रस्त्यावर स्ट्रीटलाईट्सचा मंद प्रकाश पसरलेला होता. अमावास्येच्या जंगलभर पसरलेल्या अंधारामध्ये त्या मंद प्रकाशाचाच आधार होता. अमरच्या मृत्यूच्या बातमीमुळे म्हणा किंवा अमरच्या झालेल्या भासामुळे किंवा जवळून गेलेल्या मरणामुळे त्यांना सगळं एकदम मलूल वाटू लागलं होतं. गाडीतून उतरून ते रस्त्यावर आले आणि मागे वळून पाहू लागले. रस्ता सरळसोट शहराकडे जात होता. ते जंगलाच्या बरेच आत आले होते. शहर खूपच दूर राहिलं होतं. पण.. पण तो चालणारा मनुष्य कुठेतरी गायब झाला होता. सरळ समतल पातळीतल्या रस्त्यावर तो अजूनही दिसत राहायला हवा होता. पण तो नव्हता. जीपमधून लिफ्ट घेतली होती का त्यानं? पण जीप थांबल्याचं तर लेलेंना जाणवलं नव्हतं. मग गेला कुठे तो? की नुसताच भास होता? मग दोनदा कसा दिसला? लेलेंचं डोकं भणाणून गेलं. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. इन्स्टिट्यूटची इमारत बहुतेक थोड्या अंतरावरच होती. मग तिथून छोटा रस्ता पकडून अमरचं घर. पण पोलिसांची गाडी, ऍम्ब्युलन्स कशाचीच चाहूल नव्हती. तो रस्ता एखाद्या वेगळ्याच जगाचा तुकडा असल्यागत भारावलेलं वातावरण झालं होतं. लेलेंनी मोबाईल काढून पाहिला तर तो अनलॉकच होईना. त्यांचे हात थोडेसे थरथरत होते, त्यामुळे तो त्यांच्या हातून पडला. आणि क्षणभरासाठी रातकिडेसुद्धा शांत झाले आणि तो एक क्षण एकदम जडावून गेला. पुन्हा रातकिड्यांचा आवाज सुरू झाला आणि लेले भानावर आले. मोबाईल तसाच टाकून ते गाडीकडे धावले आणि गाडी सुरू करून वळवली. दुसर्‍या दिवशी सकाळी यायचं ठरवून ते शहराकडे परत फिरले.
गाडी वेगानं जात असतानाच त्यांना रस्त्याच्या उलट्या बाजून दूरून एक मनुष्य चालत येताना दिसला. ह्यावेळेस लेले सावध होते. तो मनुष्य जवळ येताच त्यांनी गाडी हळू केली आणि हेडलाईट अप केले. त्या माणसाचा चेहरा त्या प्रकाशात उजळून निघाला.
--
तारीख २२ मे, शुक्रवार


अमरला जाऊन पाच दिवस झालेत. माणसं भेटायला येणं जवळपास बंद झालंय. सगळ्या क्रियाकर्मांपासून ते कागदपत्रं, डेथ सर्टिफिकेट सगळ्यामध्ये अमरच्या संपादकसाहेबांची फार मदत झाली हे खरं. त्यांनी बाकी काही केलं असेलही. व्हिडिओ त्यांनी लीक केला म्हणतात. चूक की बरोबर, नैतिक की अनैतिक तो भाग अलाहिदा. पण मला त्यांची फार मदत झाली. आणि तरीही मला त्यांच्यावरून असं पात्र आणि असा घटनाक्रम सुचावा हे आश्चर्यच. आपण खोलवर कुठेतरी प्रत्येक गोष्टीला नैतिक तराजूत तोलत असतो, आपल्याही नकळत. तसंच असावं हे. हरकत नाही. आत्ता तरी खोडत नाही. काहीतरी वळणं देऊ कथेला.


-----


रात्री कधीतरी नेहमीसारखीच अभयला जाग आली. पण त्याला नेहमीपेक्षा विचित्र काहीतरी जाणवलं. त्यानं झर्रकन मान एका बाजूला करून पाहिलं आणि त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. अमर खिडकीच्या गजाला टेकून खिडकीकडे पाठ करून उभा होता. त्याच विवक्षित जागी जमिनीवरच्या एका कोपर्‍यात पाहत. कृष्णपक्षाच्या एकादशीची क्षीण चंद्रकोर त्याच्यामागे खिडकीतून डोकावत होती आणि हलक्या चांदण्याच्या पार्श्वभूमीमुळे त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता. अभयनं थोडंसं चाचरतच जास्त हालचाल न करता शेजारी असलेलं दिव्याचं बटण अमरवरची नजर न हटवता दाबलं.
दिवा लागला आणि अमरनं झटक्यात नजर उंचावून अभयकडे पाहिलं. अभय जागच्याजागी थिजला. ती नजर. ती नजर अमरची नव्हती. अभयनं फार पूर्वी ती कुठेतरी पाहिली होती. अभयच्या अंगावर सरसरून काटा आला. पण अमरची ती नजर क्षणभरच टिकली. तो काहीच झालं नाही अशा आविर्भावात खिडकीपासून दूर झाला.
"तहान लागली रे मला." म्हणत तो बेडरूममधून बाहेर पडून स्वयंपाकघराच्या दिशेनं गेला.
अभय अजूनही थिजलेलाच होता. 'क्षणभर काय झालं होतं? तो भास होता की अजून काही? ती नजर. नेमकी आत्ताच का? त्या बातमीनंतर का? की ती बातमी ऐकल्यामुळेच आपल्या डोक्यात पार्श्वभूमीवर ते विचार सुरू आहेत?' नको नको म्हणताना त्याला ती नजर आधी जेव्हा पाहिली होती तो प्रसंग स्पष्ट आठवू लागला.
व्हिलचेअरवर बसलेल्या तिचे तपकिरी डोळे फक्त काम करत होते त्याक्षणी. टेम्पररी पॅरॅलिसिसच्या इंजेक्शननं डोळे बधीर होत नव्हते. त्यानं डॉक्टरच्या सहायकाला पैसे दिले आणि जायला वळण्याआधी त्यानं एकदा अपराधी नजरेनं तिच्याकडे पाहिलं. तेव्हा तिची नजर त्याच्यावरच रोखलेली होती. तीच नजर. असहाय, हतबल पण द्वेषानं काठोकाठ भरलेली. की तो भासच होता फक्त? अपराधी मनानं स्वतःशीच चालवलेले खेळ.
अमर परत खोलीत आला.
"तू कशाला उठलायेस रे दादा?" म्हणत तो स्वतःच्या पलंगाकडे गेला.
स्वतःची काळजी करावी की अमरची ह्याच संभ्रमात अभयनं दिवा मालवला आणि घडलेलं सगळं विसरायचा प्रयत्न करत तो झोपायचा प्रयत्न करू लागला.


-----


चळतीच्या चौथ्या पानावर नुसत्याच रेघोट्या होत्या. कुणाचे बिन नावाचे फोन नंबर लिहिलेले होते. एक दोन परदेशी नाण्यांचे पेन्सिल शेडिंगनं उमटवलेले ठसे होते. त्या दोघांमधल्या एकानं ते पान बाजूला भिरकावलं आणि पुढचं पान मेणबत्तीजवळ ओढलं.तारीख २५ मे, शनिवार

आजचा अख्खा दिवस कसा गेला ते लक्षातही आलं नाही. पहाटे पाचला जाग आली. तोंड धुवून मी चहा उकळायला ठेवला आणि पुस्तक वाचत बसलो. पण वाचताना इतकी तंद्री लागली की भानावर आलो तेव्हा चहा जळून घरभर जळका वास पसरला होता. पण आश्चर्य म्हणजे मी पुस्तकात काय आणि किती वाचलं ते ही मला आठवेना. अमरचं व्हायचं तसंच झालं असेल का? ब्लॅकआऊट सारखं? स्किझोफ्रेनिया? आमच्या फॅमिलीत हिस्ट्री आहे स्किझोफ्रेनियाची. अमरलाही तेच असेल का? आणि मलाही? छे छे! बेडरूममध्ये अमरच्या पलंगावर बसून वाचन बंद केलं पाहिजे.
छ्या ह्या सगळ्या नादामध्ये आज काहीही लिहिणं झालं नाही. फक्त ही एव्हढी डायरी नोंद.


२४ आणि २६ तारखेच्या पानांमध्ये चळतीतलं पाचवं पान टाकून त्यांनी सहावं पान समोर ओढलं.


सुब्बाराव त्याच्या तंद्रीत टॅक्सी चालवत होता. रात्रीचे साडेअकरा होत होते. दिवसाचा कारभार उरकला होता. शेवटचं भाडं त्यानं सोडलं होतं. त्याला आता घरचे वेध लागले होते. रस्त्यांवर बर्‍यापैकी सामसूम होऊ लागली होती. मुख्य रस्त्यावरून तो गल्ल्यांच्या जाळ्यात शिरला. उपनगरातल्या त्याच्या घराकडे तो नेहमीच्या सवयीनं नेहमीच्याच रस्त्यानं नेहमीच्याच वेगात जाऊ लागला. आणि एकदमच त्याच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला.
-----
शशिकिरण मार्केटिंग टीमचा एक भाग होता. दुपारी बारा वाजता सगळे जेवायला गेल्यावर तो एकटाच कॉन्फरन्स रूममध्ये पेपरवेटशी खेळत बसला होता. कॉन्फरन्स रूमचे दरवाजे काचेचे होते. त्यातनं समोर बसलेला सेक्रेटरियल स्टाफ दिसत होता. शशिकिरण पेपरवेट कॉन्फरन्सटेबलच्या गुळगुळीत पृष्ठभागावरून पुढेमागे सरपटवत बसला होता. खेळताखेळता त्याचा फोन वाजू लागला म्हणून त्यानं पेपरवेट सोडून दिला आणि फोन उचलून त्यावर बोलायला लागला
फोनवरून बोलून त्यानं फोन ठेवला आणि पाहतो तर पेपरवेट आपणहूनच एका बाजूनं दुसर्‍या बाजूला सरपटत होता. न थांबता. त्यानं पुनःपुन्हा स्वतःचे डोळे चोळले. पण पेपरवेट तसाच एखाद्या घड्याळाच्या लंबकासारखा पुढेमागे होत होता. त्याला आपण स्वप्न पाहतोय की काय असं वाटू लागलं. त्यानं स्वतःला चिमटा काढला, तरी तेच. आता त्याला धडकी भरली. तो धडपडत जागेवरून उठला आणि काचेकडे कुणालातरी बोलवायला गेला. पण... पण काचेपलिकडे कुणीच नव्हतं. अख्खं ऑफिस रिकामं होतं. सगळा स्टाफ एकत्र कसा गायब होईल? त्याला दरदरून घाम फुटला. हृदयाचे ठोके वाढले. त्यानं कॉन्फरन्स रूमचा दरवाजा ओढून उघडायचा प्रयत्न केला. पण दरवाजा उघडतच नव्हता. त्यानं मागे वळून पाहिलं. पेपरवेट अजून पुढेमागे होत होता. त्याच्या घशाला कोरड पडली होती. त्यानं ओरडायचा प्रयत्न केला पण त्याच्या घशातून आवाजच फुटत नव्हता. दरवाजा ओढून ओढून त्याच्या खांद्याला रग लागली आणि खांद्यातून कळ येऊ लागली. मग त्याच्या छातीत अचानक कळ आली आणि तो दरवाजातच कोसळला.
--
तारीख २३ मे, शनिवार


हे असलं काहीतरी सुचतंय आज. ह्याच पद्धतीचं अजून काही, पण अधिक तपशीलात लिहायला जमलं, काल लिहिलं होतं तसं, तर कथेला काहीतरी आकार येईल. नाहीतर अवघड आहे. काही म्हणा अमर गेल्यानं आयुष्यात जी पोकळी निर्माण झालीय, ती लेखनानं भरून निघणं अशक्यच आहे. पण निदान हे लिहिण्याच्या निमित्तानं काहीतरी वेगळे विचार तरी मनात येतात. नाहीतर तेच ते. अमरच्या आठवणी आणि शेवटच्या दिवसांतले त्याचे हाल.

सातव्या आणि आठव्या पानावर कॉम्प्युटर प्रिंटेड मजकूर होता. पण तो फार जुना असल्यानं उडून गेला होता. निरखून निरखून वाचताना मेणबत्तीच्या प्रकाशात त्यांना फक्त दोन-तीन शब्दांचा अंदाज आला. ते कसल्यातरी प्रेस रिलीजचे मसुदे होते.

क्रमशः

4 comments:

 1. वाचतेय...खूप प्रश्र्न पडलेत....कथा रंगतेय...एखादा चित्रपट बघतोय असं वाटतंय...फास्ट एडीट...

  ReplyDelete
 2. >> समाप्तीरेषा जवळ आली की माणूस मनानंच आधी पार होतो

  सुंदर वाक्य...

  ReplyDelete
 3. Katha superb zhali aahe pun dates match kartana confuse zhalo......23 may shanivar ani 25 May pun shanivar.....22 May la shukravar hota tar 25 May la Shanivar kasa.....

  ReplyDelete
 4. actually dates cha gondhal asla tari pan pratek gosht khup khup dur asun pan kuthetari jam strong connection mule je thrill vadhlay na te mast aahe

  ReplyDelete