12/04/2022

पुनश्च हरिओम

गाडी चालवत असताना एखादं गाणं अचानक कानावर पडतं. कधी कधी मला असं बरं वाटतं, की एक साधारण १५ - २० वर्षं जुनी गाणी लागणारं स्टेशन लावून गाडी चालवावी, कुठलंही यादॄच्छिक गाणं कानावर पडावं, आपलं काहीही नियंत्रण नसताना. एखादं आवडतं, एखादं माहितही नसतं, एखादं कंटाळा आणतं, एखादं असंही गाणं कधी होतं असा विचार येऊन हसू आणतं तर एखादं आठवणींच्या जगात घेऊन जातं. पण सगळ्यात विचित्र भावना होते ती एखाद्या अशा गाण्याने, जे आपण आत्ताच्या क्षणी ऐकताना वेगळाच अर्थ घेऊन येतं, जो आपल्याला १५ - २० वर्षांपूर्वी एकतर कळला नव्हता किंवा वयाच्या, आयुष्याच्या त्या टप्प्यावर साजेसा अर्थ लागला होता, आज सर्वस्वी वेगळा अर्थ लागतो. त्या शब्दांतली गंमत एकदम चमकून जाते, स्वतःशीच आणि स्वतःचंच हसू येतं. शब्दांची ताकद ही ते ऐकणाऱ्या-वाचणाऱ्याच्या मनात किती आणि कागदावर किती हा प्रश्न पडतो आणि लेखक किंवा शब्दरचनाकाराचा आणि वाचक किंवा आस्वादकाच्या परस्परावलंबनाची नवीच बाजू समोर येते.

मग स्वतःच कित्येक वर्षांपूर्वी लिहिलेले लेख, कथा डोक्यात फिरायला लागतात. मी आत्ता जो विचार करतोय आणि मला जो विचार फार वैचारिक किंवा भारी वाटतोय, तो विचार कदाचित वैश्विक आहे. जगातल्या प्रत्येक लेखक, कलाकार किंवा कसलंही काम करणाऱ्या किंवा केलेल्या माणसानं केलेला. जसं मी काहीतरी असामान्य करून दाखवेन हा जगातल्या प्रत्येक माणसानं केलेला एक अतिसामान्य विचार आहे, तद्वतच आपल्याला काहीतरी फार मोठं गुपित उकललंय असं वाटतं तेव्हा ते निश्चितच ह्याआधी कुणीतरी सोडवलं असणार हे निश्चित. मानवी विचार आणि त्याचे विविध आविष्कार हे आपल्याला वाटतात तेवढे अद्वितीय नसतात असं माझं ठाम मत आहे. हजारो वर्षांपासून, विविध संस्कृतींमधून, भाषांमधून, कलाकृतींमधून मला नाही वाटत की काही नवं उरलं असेल. विचारांचं प्रकटीकरण बदलत असेल, पण मूळ विचार, मूळ कल्पना, त्यामागचं तत्व, त्यामागचा तर्क.. सगळं तेच असावं. जसं ऊर्जा आपण म्हणतो, ती निर्माणही करता येत नाही आणि नष्टही होत नाही, आहे तीच वेगवेगळी रूपं घेऊन समोर येते. विचार ही ऊर्जाच नाही का? असो. ह्या विषयावर कुणाचंही एकमत होणं शक्य नाही आणि ते व्हावं अशी अपेक्षाही नाही. मुद्दा हा की एकच गोष्ट स्थल, काल आणि पात्र बदलली की पूर्णपणे वेगळी वाटू शकते, पण म्हणून ती वेगळी ठरते का?

हा सगळा रतीब घालण्याचं कारण की, पुन्हा लेखणी उचलावीशी वाटतेय पण पूर्वी ज्या सहजतेनं विचार उतरायचे ती सहजता वाटत नाही, प्रत्येक शब्दाला पन्नासवेळा पारखावंसं वाटतं, जोखावंसं वाटतं. प्रत्येक विचाराचं मूल्यमापन करावंसं वाटतं. आयुष्याचा बदललेला टप्पा, बदललेलं स्थल आणि बदललेले आपण स्वतः, मग तोच विचार जो कदाचित १२ वर्षांपूर्वी आला होता, तो पूर्णपणे वेगळा न वाटेल तर नवलच.

तर आता परत लिहिणं होईल, कदाचित मला ते वेगळं वाटेल, पण नसेल. कदाचित वाचकांनाही वेगळं वाटेल, पण नसेल किंवा असेलही. फक्त ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित झाल्याशी मतलब.


No comments:

Post a Comment