एसटी तिच्या वेगाने चालली होती. खिडकीतल्या सीटवर बसून त्याची तंद्री लागली होती. तो बाहेर पाहत होताही आणि नव्हताही. एक्स्प्रेसवेच्या दिशेनंचा हा प्रवास नेहमीचाच. ओळखीचा रस्ता, ओळखीचं ट्रॅफिक, ओळखीचे धक्के आणि खड्डे आणि त्यामुळे तयार झालेल्या मसल मेमरीमुळे एक समाधीवस्था गाठल्यागत तो बसला होता. उजवीकडून पुण्याकडून मुंबईकडे येणारा वाहनांचा लोंढा होता. त्यातही विविध रंगाच्या, विविध ढंगाच्या बसेस, गाड्या. तो स्वतःशीच विचार करत होता,
‘किती लोक,
किती वेगवेगळी कारणं ह्या प्रवासाची. लोंढेच्या लोंढे. कुणीतरी आपल्या बसकडे बघूनही
हाच विचार करत असेल का? अगदी नेमका हाच? ह्याच क्षणी? तंतोतंत सारखा विचार? शक्य आहे
का? दोन वेगवेगळ्या जाणिवा.. एकाच क्षणी तंतोतंत एकच भावना? शक्य आहे?’
आणि त्याच
क्षणाला त्याला काहीतरी दिसल्यासारखं वाटलं? रस्त्याच्या पलिकडे एका गाडीत. ती गाडीही
त्याला ओळखीची वाटली. नक्की काय पाहिलं ह्याची पूर्ण जाणीव व्हायला त्याला क्षण दोन
क्षण लागले. पण एकदम डोक्यात लख्ख प्रकाश पडल्यावर तो खडबडून भानावर आला. बसमधून डोकं
बाहेर काढून मागे गेलेल्या गाड्यांच्या गर्दीकडे धडपडून पाहू लागला. त्याच्या धडपडीनं
शेजारच्याचंही जडत्व भंगलं. त्याच्या बाजूच्यालाही लक्षात येईना नक्की काय झालं ते.
ती गाडी काही
परत दिसेना. ५ १० मिनिटे निष्फळ प्रयत्न झाल्यावर तो भांबावून आणि थकून स्वतःच्या जागेवर
स्तब्ध बसला. त्याक्षणी नक्की काय घडलं हे तो परत परत स्वतःच्या डोक्यात घोळवत होता.
एसटी विश्रांतीसाठी थांबली आणि तो हळूहळू गाडीतून उतरला. स्वच्छताग़ृहात शिरला आणि तोंडावर
पाणी मारण्यासाठी बेसिनजवळ गेला. मागे माणसांची गर्दी झाली पण तो तोंडावर पाणी मारतच
होता. ७ – ८ हबकारे मारल्यावर त्याला थोडं शांत वाटलं. मागची गर्दी त्याला मनातल्या
मनात आणि काही दबक्या आवाजात शिव्या देत शेजारच्या बेसिनवर सरकत होती. त्यानं वर पाहिलं
आणि त्याचं लक्ष आरश्याकडे गेलं. तो जागच्या जागीच थिजला. त्याचा त्याच्या डोळ्यांवर
विश्वासच बसत नव्हता. आज नक्की काय सुरू आहे, ह्या विचारानं तो थरारून गेला होता. की
शेवटी त्याच्या डोक्यावर परिणाम व्हायला सुरूवात झाली होती?
----
“बट व्हाय
डू यू थिंक यू हॅव अ प्रॉब्लेम?” डॉक्टर त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाले.
“काहीतरी
ठीक नाहीये डॉक्टर. मला कळत नाहीये नक्की काय सुरू आहे पण खरंच, माझी स्वप्न खूपच स्पष्ट
होत चालली आहेत. आणि मोठी होत चाललीयत. म्हणजे, झोपेतली स्वप्नं, आयुष्यातली नाही,
तसं असतं तर तुमच्याकडे नसतो आलो.” त्यानं माफक विनोद केला. पण तो स्वतः हसण्याच्या
मूडमध्ये नव्हता.
डॉक्टरांनी
स्मित केलं. “इट्स गुड दॅट युअर सेन्स ऑफ ह्यूमर इज इन टॅक्ट. आज आपली तिसरी सिटींग
आहे पण तुम्ही अजूनही मला सगळं सांगत नाही आहात. मला जोपर्यंत सगळं कळत नाही तोवर मी
काय सांगू तुम्हाला?”
“डॉक्टर,
मुळात मी तुमच्याकडे येतोय हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. मी अजून कुणाला काही सांगितलं
तर मला वेडा ठरवून मोकळे होतील सर्व.”
“कुणी तुमच्या
जिवावर उठलंय असं वाटतंय का?”
“ओह डॉक्टर,
आय ऍम नॉट पॅरानॉईड. मी स्वतः व्हॉलंटरी काऊन्सिलर आहे आमच्या कंपनीत, त्यामुळे आमच्या
ट्रेनिंगमध्ये आम्हाला हे बेसिक वॉर्निंग साईन्स शिकवले जातात.”
“गुड. म्हणजे
तुम्ही समजून सवरून इथे आलेले आहात. दॅट्स अ गुड स्टार्ट. आज तिसऱ्या सेशनमध्ये पहिली
माहिती कळली मला तुमच्याबद्दल.” डॉक्टर नोट्स घेत म्हणाले, “नक्की काय स्वप्न पडताहेत?
कधी सुरू झालं हे सर्व?”
“असं होणं
कठीण आहे ना डॉक्टर? आय ऍम अ हेल्दी पर्सन. मला काही कसं होऊ शकतं? माझं छान कुटुंब
आहे, चांगली नोकरी आहे, चांगले छंद आहेत, मग हे असं कसं काहीतरी?”
“नक्की काय
स्वप्न पडतात?”
“मी सांगतो
डॉक्टर पण मला खरं खरं सांग़ा, शहाण्या माणसांना इतकी स्पष्ट स्वप्नं पडू शकतात? इतकी
स्पष्ट की जणू ती स्वप्नं नाहीत, हे जे सुरू आहे तेच स्वप्न आहे?”
डॉक्टरांच्या
चेहऱ्यावर गंभीर भाव आले. “तुम्हाला असं वाटतं की हे जे आहे ते स्वप्न आहे?”
“ऑफ कोर्स
नॉट डॉक्टर. मला स्वप्नं पडतात ती वेगळी आहेत. म्हणजे त्यात मी आहे, माझं कुटुंब आहे,
माझं ऑफिस आहे, पण सगळं वेगळं. सगळी माणसं वेगळी, सगळी नाती वेगळी, जागा वेगळी, ऑफिस
वेगळं. जगच पूर्ण वेगळं.”
“काय काय
असतं तिथे?”
“बरंच काही.
पण सगळं तुटक तुटक आठवतं. जाग आली की लक्षात राहत नाही फार, पण एक भावना असते काहीतरी
वेगळं जगल्याची. तुकडे लक्षात राहतात, पण एक खरं, आधी छोटे छोटे क्षण दिसायचे, मग अख्खे
प्रसंग आणि आता दिवसाचा बराच काळ दिसतो. बऱ्याच घटना दिसतात.”
“म्हणजे?”
“नक्की अजून
स्पष्ट नाही होत डॉक्टर. पण जणू कुणाच्यातरी दिनचर्येचा भाग असावा असं जाणवतं. आणि
तो कुणीतरी म्हणजे मीच.”
“नक्की स्वप्नंच
वाटतात का ती?”
“आता डॉक्टर,
मी जागा आहे इथे तुमच्यासमोर. मला सकाळपासून काय काय केलं आणि माझ्या मागच्या आयुष्यातलं
सर्व आठवतंय. पण स्वप्नातलं नाही. म्हणजेच काय ते समजून जा ना?”
“पण तुम्ही
म्हणालात की स्वप्नं स्पष्ट होताहेत, मग सांगत का नाही तुम्ही तुम्हाला काय दिसतंय
ते?”
“स्पष्ट होतंय
सर्व हे जाणवतं, त्या क्षणाला, झोपेत. ती भावना उठल्यावरही कायम असते. पण खरंच सगळं
नाही आठवत. खूप वेळ गेला स्वप्नात हे ही जाणवतं. काही चेहरे, काही जागा, काही रंग,
काही गोष्टी असं तुटक तुटक आठवतं.”
“कुणी ओळखीचा
चेहरा?”
“हो. माझी
बायको.”
“गुड. त्या
वर्किंग आहेत का?”
“इथे की तिथे?”
“म्हणजे?
काही फरक आहे का?”
“हो. ती तिथे
माझ्या ऑफिसात नोकरी करते.”
“इथे नाही
करत का नोकरी?”
“नाही, दुसरीकडे
करते.”
“कदाचित तुमचं
मन तुमच्या आयुष्यातल्या दोन गोष्टींना ओव्हरलॅप करतंय.”
“नाही डॉक्टर.
ते शक्य नाही.”
“का?”
“कारण तिथे
ती माझी बायको नाही.”
----
पुण्याला
पोचल्यावर दुसरी बस पकडण्याइतपतही त्राण त्याच्यात उरलं नव्हतं. जे दिसलं होतं त्यावर
विचार करकरून तो थकून गेला होता. त्यानं रिक्षा शोधायचा प्रयत्न केला पण कोणी मीटरनं
यायला तयार नव्हतं, मग त्यानं ओला केली आणि आली त्या गाडीत अंग झोकून दिलं.
ड्रायव्हरला
ओटीपी देताना अचानक त्याच्या डोक्यात एक कल्पना चमकली. त्यानं मोबाईलचे फोटो उघडले.
एक-एक करून सगळे फोटो बघितले, सेल्फी बघितले, पण तेच. तो निराश झाला होता. नक्की काय
सुरू होतं सर्व. त्यानं गडबडून एकदम ओलाचं ऍप उघडलं आणि आत्ताच सबकॉन्शसली टाकलेला
पत्ता वाचला. काहीतरी चुकत होतं. पण नक्की काय चुकत होतं ते कळत नव्हतं.
सांगितलेल्या
पत्त्यावर पोचला, पण आता तो सावध होता. गेटमधून आत शिरताना त्यानं वॉचमनकडे पाहिलं.
वॉचमनजवळ रजिस्टर होतं पण वॉचमननं त्याच्याकडे पाहून ओळखीचं स्मित केलं आणि रजिस्टरजवळ
हात नेला नाही. म्हणजे तो इथे नक्कीच बरेचदा येत असावा, असं त्यानं मनाशी बांधलं. तीन
विंग्ज होत्या, पण त्याचे पाय आपसूकच सी विंगकडे वळले. खाली मालकांच्या नावावरून त्यानं
नजर फिरवली पण एकही ओळखीचं नाव दिसेना. पुन्हा पुन्हा त्यानं ती लिस्ट वाचली पण काहीच
नाही. मग तो लिफ्टमध्ये शिरला आणि प्रतिक्षिप्त क्रियेनं त्यानं तिसरा मजला निवडला.
लिफ्टपासून सर्वच ओळखीचं होतं. त्याची मेमरी पुढेमागे होत होती. काही क्षण सगळंच नेहमीचं
आहे, योग्य आहे, असं वाटत होतं, तर काही क्षण सगळंच अनोळखी. बाहेर पडला तर समोरच्याच
घरावरच्या पाटीनं त्याचं लक्ष वेधून घेतलं. ज्ञानेश्वर गणपुले. ओळखीचं वाटत होतं की
नाही ह्यावर तो संभ्रमात पडला. सवयीनं डावीकडे वळला आणि पाटी शोधू लागला. पण त्या घरावर
पाटीच नव्हती. दरवाजा नेहमीचा वाटत होता. त्यानं विचार करून बेल दाबली आणि आतुरतेनं
दरवाजा उघडायची वाट पाहू लागला.
दहा-पंधरा
सेकंदांनी दरवाजा उघडला. समोर ती उभी होती. तिनं त्याच्याकडे हसून पाहिलं आणि ती आत
निघून गेली. तो आत शिरला आणि सोफ्यावर बसला. हे नक्की कुणाचं घर असेल? तो विचार करत
राहिला. ती परत आली पाण्याचं तांब्या-भांडं घेऊन. थकलेली शिणलेली दिसत होती ती. त्याच्या
शेजारी येऊन बसली आणि त्याच्या खांद्यावर तिनं मान टाकली.
तो एकदम अवघडला.
एव्हढ्यात आतून कुणाचीतरी चाहूल लागली आणि ती स्वतःहूनच थोडी दूर सरकली. तिनं डोळ्यातलं
पाणी पुसलं असावं असं त्याला वाटलं. आतली व्यक्ती बाहेर आली आणि तो चकित झाला. ती त्याची
आई होती.
“आई?” तो
आश्चर्यानं म्हणाला.
“काय झालं?
आत्ताच झोपून उठले. तुझ्या बेलनं चाहूल लागली. झालं का तिथलं काम नीट? तसा फोनवर झालं
म्हणालाच होतास. तरी.”
त्याचं आश्चर्य
ओसरत नव्हतं. आई इथे काय करत होती? पण, ती वेगळी का दिसत होती? हे कुणाचं घर आहे? आणि
ही कोण?
----
तो पार्किंग
लॉटमधून गाडी काढत होता. डोक्यात विचारांची गर्दी झाली होती. शेवटी एकदाचं डॉक्टरना
सर्व सांगितलं होतं त्यानं. तसं सगळं नव्हतं सांगितलं पण तरी डॉक्टरांना अंदाज येईल
एव्हढं तरी नक्कीच. पण त्याला कुठेतरी हे सगळं पटत नव्हतं. असं कसं शक्य होतं? एव्हढे
डिटेल्स स्वप्नात कसे दिसतील? आणि ते ही अनोळखी जागा, अनोळखी माणसं? काही काही माणसं
तीच आहेत, पण बाकीची? घर, ऑफिस, शहर सगळं वेगळं?
तो मानसोपचारतज्ज्ञांकडे
जात होता हे त्यानं घरी किंवा ऑफिसात कुणालाच सांगितलं नव्हतं. त्याला ट्रेनिंग देणाऱ्या
डॉक्टरांकडून त्यानं ह्या डॉक्टरांचा रेफरन्स घेतला होता. पहिल्या दोन सिटींग तो फक्त
अंदाज घेत होता डॉक्टरांचा. ट्रेनिंग घेतल्याचे दुष्परिणाम हे की तो उगाच इतरांना मोजपट्ट्या
लावत होता. पण दुसरं असं की आपल्यासोबत हे असं काही होईल असं त्याला स्वप्नातही कधी
वाटलं नव्हतं. आणि दैवदुर्विलास असा की स्वप्नच त्याला भंडावून सोडत होत होती.
घराकडे जाणाऱ्या
रस्त्याला नेहमीप्रमाणेच भयंकर ट्रॅफिक लागलं होतं. सगळ्या गाड्यांच्या काचा वर होत्या
आणि आपापल्या छोट्याशा विश्वांच्या गारव्यामध्ये सगळीजण दोन क्षणाचा विसावा शोधत होती.
कुणी गाणी लावली होती, कुणी गाडीतच बोलत होतं, कुणी फोनवर बोलत होतं, कुणी जीपीएससाठी
वर लावलेल्या फोनवर व्हिडिओ पाहत होतं, तर कुणी जराही न बदलणाऱ्या जीपीएसवरच्या ट्रॅफिककडे
प्राण कंठाशी आणून पाहत होतं आणि आशा करत होतं की ट्रॅफिक जरा तरी ओसरेल आणि आपण एका
बंदिस्त विश्वातून दुसऱ्या बंदिस्त विश्वात पोहोचू. एक सिग्नल पडला की ती सगळी तुटक
जगं एकाच दिशेनं पुढे सरकायची, दिशा एकच पण बाकी सगळंच वेगळं. तो आजूबाजूला पाहत होता.
त्याच्या गाडीतही रेडिओ लागला होता. त्यावरची असंबद्ध बडबड आणि जाहिरातींच्या मधे लागणारी
गाणी त्याच्या कानावर पडत होती, पण त्याचं लक्ष ह्या लोकांकडेच होतं. काय असतं माणसांच्या
डोक्यात? मनात? मेंदूत? किती विश्व तयार करतो तो स्वतःची. कुणी दिवसा ऑफिसमध्ये काय
झालं त्यात हरवला आहे, कुणी कॅबमध्ये बसून व्हॉट्सऍपवर कॉलेज ग्रुपमध्ये हरवला आहे,
कुणी फेसबुकवर मैत्रिणींच्या साखरपुड्याच्या फोटोंवर कॉमेंट करतेय, कुणी वाग्दत्त वराशी
चॅट करत स्वतःशीच हसतेय, तर कुणी आवडत्या मित्राशी फोनवर हळूहळू बोलत स्वतःशीच लाजतेय,
कुणी शेअर कॅबमध्ये शेजारी बसलेल्या तरूणीच्या गंधानं आणि स्पर्शानं मोहरून गेला आहे,
तर कुणी घरून सारखा बायको आणि मुलीचा फोन येतोय त्यांना समजावून थकून गेला आहे. कुणाच्या
घरी त्रास वाट पाहतोय, तर कुणाच्या घरी विसावा पण शाश्वताची अनामिक ओढ सगळ्यांनाच तिथे
घेऊन जातेय.
शाश्वत. हेच
हवं असतं ना माणसाला. सगळं काही नक्की, ठरलेलं, कायम आणि समजणारं. काही आकलनाच्या बाहेरचं
दिसलं, घडलं, आयुष्यात आलं की थरकाप उडतो मनाचा. ते चांगलं असेल किंवा वाईट पण ते शाश्वत
हवं.
अचानक मागून
हॉर्न वाजले. सिग्नल पडला होता. घराच्या ओढीनं तो ही पुढे सरकत होता पण डोक्यात शाश्वत-अशाश्वताचा
कल्लोळ माजला होता. जे घडत होतं ते कळत नव्हतं आणि कळलं असतं, ते घडत नव्हतं. आज त्या
घटनेला चार महिने होऊन गेले होते, पण अजूनही अर्थ लागत नव्हता. कदाचित कधी लागणारही
नव्हता.
----
तो झोपेतनं
उठला आणि समोर छतावरचा पंखा एका तालात फिरत होता. नेहमीचाच ओळखीचा पंखा. पण अचानकच
त्याच्या अंगावर काटा आला. ओळखीचा वाटतोय खरा पण हे त्याचं घर नाही. तो झपकन उठून बसला.
त्याच्या शेजारची जागा रिकामी होती. चादरीची घडी करून ठेवली होती. ती घडी करण्याची
टिपिकल पद्धत त्याच्या चांगलीच लक्षात होती. त्याची बायको करते तशी घडी. एव्हढ्यात
बाथरूमचा दरवाजा उघडल्याचा आवाज झाला आणि त्यानं त्या दिशेनं पाहिलं. ती ती होती. कालचीच,
सोफ्यावर त्याच्या शेजारी येऊन बसलेली. ती त्याची बायको नव्हती. पण तिलाही कुठेतरी
पाहिलं होतं त्यानं. कुठे ते मात्र आठवत नव्हतं. तिनं त्याच्याकडे पाहून हलकं स्मित
केलं. तिच्या डोळ्यांखालची काळी वर्तुळं त्याच्या नजरेतून सुटली नाहीत. ‘आधी ही अशी
नव्हती.’ तो स्वतःशीच म्हणाला आणि त्याला असं का वाटलं ह्याचं त्याला आश्चर्य वाटलं.
“चहा करू
गरम? आज जाणार आहेस का ऑफिसला?”
त्यानं फक्त
मान डोलावली. ती बाहेर गेली. तो परत आडवा झाला आणि सगळ्याचा अर्थ लावायचा डोक्यात प्रयत्न
करू लागला.
सगळं ओळखीचं
होतं, पण तरी अनोळखी. कोण होती ती सगळी माणसं? तो तिथे काय करत होता? तो पुण्यात का
होता? नोकरी कुठे करत होता? डोक्यावर थोडा जोर दिल्यावर त्याला धूसर धूसर आठवू लागलं.
तो सकाळी साडेसातला घरातून बाहेर पडत असे. गल्लीच्या टोकाशी ऑफिसची बस येत असे. त्यानं
सवयीनं उशीच्या उजवीकडे पाहिलं. त्याचा मोबाईल आणि शेजारी घड्याळ होतं. सकाळचे सव्वा
सहा वाजत होते.
त्यानं मोबाईलवर
फिंगरप्रिंट लॉक उघडलं. तीन मिस्ड कॉल्स होते. तिन्ही ऑफिसचे. रात्री १० वाजता? मग
त्याला आठवलं की तो नाईटशिफ्टवाल्या एका टीमलाही मॅनेज करत होता. सिनेमात जणू एखाद्याची
मेमरी परत यावी तद्वत त्याला गोष्टी आठवत होत्या. ‘पण माझी मेमरी गेल्याचं बाकी कुणाला
कसं काही जाणवत नसेल? की नुकतीच माझी मेमरी जाऊ लागलीय? मला काही होतंय का?’
ऑफिसचे मेल
उघडून पाहिले, त्याला सगळं ठाऊक होतं, कळत होतं. सगळं नॉर्मल होतं. तो नुकताच परदेशात
जाऊन आला होता, त्याच्या सेटलमेंटशी संबंधित मेल्स होते. बरोबर – जर्मनी. पंधरा दिवस
तो जर्मनीत होता. पण एव्हढंच. बाकी त्याला त्या ट्रिपबद्दल काहीच आठवत नव्हतं. आणि
ती त्याला असं का म्हणाली, की ऑफिसला जाणार आहेस का? तो आदल्या दिवशी मुंबईहून का परत
येत होता? आणि संध्याकाळी सोफ्यावर बसल्यानंतरचं त्याला काहीच का आठवत नव्हतं?
त्यानं पर्सनल
मेल उघडले. एसटीचं तिकीट होतं, पन्नास साठ नोकरीचे मेल्स होते. एक त्याच्या अत्यंत
जिवलग मित्राचा मेल होता. ‘आर यू ओके?’. बस एव्हढंच लिहिलेलं होतं. त्यानं तो मेल वाचलाही
होता. पण जणू आत्ताच वाचतोय असं त्याला वाटलं.
तो त्याचा
जिवलग मित्र होता हे त्याला आठवत होतं. पण काहीतरी जुळत नव्हतं. त्याला कालचे प्रसंग
आठवले आणि त्यानं फोटो ऍप उघडलं. कदाचित ते सगळं दुःस्वप्न असेल अशी मनोमन इच्छा करत
त्यानं एक एक करत सगळे फोटो पाहिले. सेल्फी पाहिले. तेच. तिच्याबरोबरचे फोटो. हसतानाचे
खूष असतानाचे.
हे नक्की
काय होतं? स्वप्न की सत्य?
आणि काल आरशात
पाहिलं ते? तो खडबडून उठला आणि ड्रेसिंग टेबलसमोर जाऊन उभा राहिला. तो स्वतःलाच ओळखत
नव्हता. आरशात जो होता, तो तो नव्हता.
----
एकदम त्यानं
डोळे उघडले. मध्यरात्र होती. त्याला दरदरून घाम फुटला होता. त्यानं काय पाहिलं होतं
ते त्याला लख्ख आठवत होतं. शेजारी बायको झोपली होती आणि ती, तीच होती. त्यानं ठरवलं,
आज मात्र विसरायचं नाही. पटकन लॅपटॉप उघडून तो टाईप करू लागला.
पहाटे पुन्हा
कधीतरी त्याचे डोळे उघडले. बायको अजूनही शेजारी झोपलेलीच होती, पण आता काहीही आठवत
नव्हतं. कदाचित काही स्वप्नच पडलं नव्हतं. मग एकदम त्याला आठवलं आणि त्यानं उठून लॅपटॉप
उघडला. त्याला भीती वाटत होती की मध्यरात्री उठल्याचंही स्वप्नच तर नसावं. पण डेस्कटॉपवरच
ती फाईल होती. त्यानं एक एक डिटेल नीट लिहून ठेवली होती. त्याचं मन थोडं शांत झालं.
नेहमीप्रमाणे आवरून तो ऑफिसला गेला.
संध्याकाळी
लवकर निघून तो डॉक्टरांकडे गेला.
“धीस लूक्स
इंटरेस्टिंग!” डॉक्टर त्याने दिलेले प्रिंटआऊट्स वाचत म्हणाले. “कधी जाग आली म्हणालात
तुम्हाला?”
“मध्यरात्री.
मग परत पहाटे उठलो, तेव्हा काहीही आठवत नव्हतं.”
“मेक्स सेन्स.
रात्री REM झोपेतून उठला असणार तुम्ही. Rapid Eye Movement अर्थात तीव्र नेत्रचलन.
पहाटे तसं नसेल.”
“आय नो डॉक्टर.” तो डॉक्टरांच्या चेहऱ्यावर विश्वास आहे की अविष्वास त्याचा अदमास बांधण्याचा प्रयत्न करत होता.
“राईट. यू
आर ट्रेन्ड.”
“ते आहेच,
पण मी स्वप्न ह्या विषयावर बरंच वाचन करतोय सध्या.” त्याच्या बोलण्यात कुठलीही आढ्यता नव्हती. डॉक्टर त्याचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत होते.
“ह्म्म.”
डॉक्टर थोडे विचारात पडत म्हणाले. “कदाचित असं तर नसेल की तुमच्या ह्या वाचनामुळे तुम्ही
ह्या चक्रात अजून अडकत चालले असाल? मनी वसे ते स्वप्नी दिसे.” डॉक्टरांच्या उभट चेहऱ्यावर डाव्या डोळ्याच्या शेजारी आणि गालाच्या वर कोपऱ्यामध्ये एक मोठा व्रण होता. कधीतरी पडलेली खोक असावी, पण जाणवू येण्याएवढी मोठी होती. मेंदूचं ऑपरेशन झाल्यावरही असंच दिसत असेल का? असा एक विचित्र विचार त्याच्या मनात येऊन गेला.
“कम ऑन डॉक्टर.
मी एव्हढा वेडा वाटतो का तुम्हाला?”
“जे झालंय
तुमच्या आयुष्यात, त्यानं मनावर थोडा परिणाम होणं स्वाभाविक आहे.” डॉक्टर एखादा मुद्दा अधोरेखित करत तेव्हा त्यांच्या भुवया ते एकदम वर करत आणि तो व्रण एकदम प्रश्नचिन्हासारखा दिसू लागे.
तो एकदम चिडून
उठला. “एकदा तुम्ही मनाशी खूणगाठ बांधलीत तर मग झालंच. तुम्ही थोडे वेगळे आहात असं
आमचे ट्रेनर म्हणाले होते. पण.. असो. मी पाहून घेईन पुढे काय होतं ते. तुम्ही केलीत
तेव्हढी मदत पुरे झाली.” असं म्हणत तो दरवाजाकडे निघाला.
“एक मिनिट.”
डॉक्टर जोर देऊन म्हणाले. “ज्याला बरं व्हायचं असतं, तो माझ्याकडे येतो. ज्यांना माझी
पातळी जोखायचीय किंवा उत्तरं शोधायचीयत त्यांची मी मदत करू शकत नाही. तुम्ही जोवर तुम्हाला
समस्या आहे हे मान्य करणार नाही, तोवर मी काहीच करू शकणार नाही. शुभेच्छा!”
तो रागारागानंच
इमारतीतून बाहेर पडला. ‘डॉक्टर म्हणत होते ते खरं असेल का? आता तर चार महिने होत आले.
अजूनही मी त्यातून सावरलो नसेन? पण असं का झालं माझ्यासोबत? का सावरावं मी? असा तडाखा
का बसावा? असं दुःख वाट्याला का यावं?’
त्याच्या
डोळ्याच्या कडा पाणावल्या. गाडी काढून तो गेटबाहेर पडला. त्या गल्लीतून बाहेर पडताना
सहजच त्याचं लक्ष कोपऱ्यावरच्या इमारतीकडे गेलं. ती इमारत बाकीच्यांमध्ये उठून दिसत
होती. वेगळीच. आणि त्यावरच्या एका बोर्डानं त्याचं लक्ष वेधून घेतलं. “विनायक खरे.
थियरिस्ट.” बस, एव्हढाच बोर्ड होता. त्याला गंमत वाटली. इमारतीला पार्किंग दिसत नव्हतं.
गाडी रस्त्यावरच लावून तो इमारतीत शिरला.
एव्हढ्या
छोट्याशा इमारतीच्या मानानं सिक्युरिटी मस्त होती. रिव्हॉल्व्हिंग डोअर्स होते. चकाचक
ठेवण होती. लिफ्टनं तो दुसऱ्या मजल्यावर गेला आणि एका दारावर पुन्हा तशीच पाटी होती,
ते ढकलून तो आत शिरला.
“या. बसा.”
आवाजाच्या दिशेनं त्यानं पाहिलं तर एक स्पीकर होता. तो जवळच असलेल्या सोफ्यावर बसला.
दोनच मिनिटांनी एक दार उघडलं आणि त्यातून एक जवळपास त्याच्याच अंगकाठीचा मनुष्य बाहेर
आला. त्याच्या चेहऱ्यावर स्मित होतं.
तो त्याच्यासोबत
आत गेला. आत एक छोटीशी अभ्यासिका होती. टेबलावर एका लहान मुलाचा हसरा फोटो होता. शेजारच्या फ्रेममध्ये एक स्त्रीचा फोटो होता. त्या स्त्रीला त्यानं कुठेतरी पाहिलं होतं. पण कुठे? बाकी पाच-सहा पुस्तकांचा पसारा आणि पाण्याची बाटली आणि दोन ग्लास, बस
एव्हढंच टेबल.
“आय डोन्ट
गेट व्हिजिटर्स. काय काम काढलंत तुम्ही?” खरे पाण्याचा ग्लास समोर करत म्हणाले.
“पण मग तुम्ही
बाहेर पाटी का लावली आहे?”
“हाहा. ती
होय. गंमत म्हणून. आजूबाजूचे लोक माझी थट्टा करतात, त्यामुळे मी मुद्दाम तशी पाटी लावली
आहे. यू नो. इफ यू कान्ट बी फेमस… वगैरे वगैरे..”
तो थोडा नर्व्हस
झाला.
“अरे. काळजी
नका करू. तुम्हाला काहीही वाटलं असलं तरी मी तुमची मदत करु शकलो तर नक्की करीन.”
“खरं सांगायचं
तर मलाही माहित नाही मी का वर आलो ते. तुमचं नाव आणि वेगळीच पाटी…तुम्ही नक्की कसले
थियरिस्ट आहात?”
“नावाचं काय?”
“ते सोडा
ना सर. थियरिस्ट कसले आहात?”
“कसलाही ठराविक
नाही. मी अभ्यासक आहे. बऱ्याच गोष्टींचा. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, गणित, पॅराफिजिक्स,
पॅरानॉर्मल.”
त्याच्या
चेहऱ्यावर प्रश्नचिह्न उमटलं. ते खरेंनी लगेच ओळखलं.
“म्हणूनच
लोक थट्टा करतात.”
“नाही. मला
तसं नाही वाटत. मला… खरं तर मदत हवी होती थोडी.”
“बोला ना.”
“मला स्वप्नं
पडतात. विचित्र, स्पष्ट आणि तुटक. कधी लहान, कधी मोठी. कधी लक्षात राहतात, कधी नाहीत.
हळूहळू लांबी वाढत चाललीय असं वाटतंय.”
खरे विचारात
पडले. जागेवरून उठले आणि पुस्तकांच्या एका शेल्फकडे चालत गेले. “ओनेरॉलॉजी” ते प्रकट
म्हणाले. “स्वप्नशास्त्र” त्यांनी दोन पुस्तकं काढली.
खाली वाकले
आणि बऱ्याच वह्या होत्या त्या काढल्या आणि परत टेबलाकडे आले.
“काही वर्षांपूर्वी
मी बराच रिसर्च केला होता.” वह्यांवर हात थोपटत ते म्हणाले.
“मग, तुम्ही
मदत करु शकता?”
“हो. पण तुम्हालाही
स्वतःची मदत करायला लागेल.”
“काय?”
“ही दोन पुस्तकं
घेऊन जा आणि वाचून झाली की परत या. मग आपण बोलू.” त्यांनी ती दोन पुस्तकं त्याच्या
दिशेनं सरकवली.
“ओनेरॉलॉजी
: अ स्टडी इन ह्यूमन ड्रीम्स” मायकेल कारमायकेल आणि “इन युअर ड्रीम्स” चार्ल्स फिनली.
----
“डॉक्टर प्लीज
हेल्प हिम.” ती डोळ्यांत पाणी आणून डॉक्टरांना सांगत होती.
“तुम्ही त्यांना
घेऊन आला आहात का?”
“हो, पण त्याला
खरं नाही सांगितलंय मी. तो मॅटर्निटी वॉर्डच्या बाहेर बसला आहे. मी माझ्यासाठी आलेय
असं सांगून त्याला घेऊन आले आहे.”
डॉक्टर विचारात
पडल्या. “ओके. एक काम करा, त्यांना सांगा की मी मॅटर्निटी सायकोलॉजिस्ट आहे. तिथल्या
एका कन्सल्टिंग रूममध्ये भेटू आपण.”
“काय प्रॉब्लेम
वाटतो मॅडम.” डॉक्टर पहिल्यांदाच बोलाव्यात तशा बोलल्या.
तिनं त्याच्याकडे
एक क्षण पाहिलं आणि म्हणाली. “आम्हाला फार त्रास होतोय डॉक्टर. सहन होत नाही आता. रात्र
रात्र झोप लागत नाही.”
“आणि तुम्हाला?”
डॉक्टरांनी त्याच्याकडे रोखून पाहिलं.
तो टेबलावरची
स्टेशनरी निरखत होता. डॉक्टरांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पेपरवेट ओढून घेतला आणि
ड्रॉवरमध्ये ढकलला.
“नाही लागत
झोप?” तो मनाशी विचार करत होता.
“अजून?”
“अजून काय?”
“यू हॅव टू
ओपन अप.”
“मी कशाला
ओपन अप होऊ. थेरपी हिच्यासाठी आहे ना?” तो मोबाईलशी चाळा करत म्हणाला.
“मला काळजी
वाटते तुझी.” ती एकदम म्हणाली.
“काय झालं
काळजी करायला. समर्थ आहे मी स्वतःला सांभाळायला.” तो एकदम तीक्ष्णपणे म्हणाला.
तिच्या डोळ्यांत
आता निराळीच वेदना आली. “अनोळखी नजरेनं बघतोस हल्ली. माझ्याकडे, आईंकडे, सगळ्यांकडे.
विचित्र पद्धतीनं बोलतोस. शून्यात पाहतोस. जवळ येत नाहीस. घरी उशीरा येऊन लवकर जातोस.
तुझ्या ऑफिसातलेही लोक तेच म्हणतात. फक्त.. फक्त अरूणाशी बोलतोस. तू जे काही बोलतोस,
ते तिलाही कळत नाही, फक्त तू बोलतोस म्हणून ती ऐकत होती. तिलाही तुझी काळजी वाटली म्हणून
ती घरी आली आणि मला सगळं सांगितलं. माझीही मदत ह्याच डॉक्टरांनी केली होती.” तिला हुंदका
अनावर झाला. “ते झाल्यावर.” मग तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
त्याच्या
डोक्यात कल्लोळ माजला होता.
‘कोण आहे
मी. का मला जाणवतंय ही म्हणतेय ते दुःख. नको वाटतंय हे सगळं. सगळं अनोळखी आणि सगळं
परिचितही.
“इट हॅज जस्ट
बीन अ मंथ. त्रास दोघांनाही आहे आणि थेरपीची गरज तुम्हा दोघांनाही आहे.”
आणि एकदम
त्याला जाणवलं काय झालं होतं ते. एक महिन्यापूर्वी. त्याच्या अंगावर शहारा आला. त्यानं
तिच्याकडे पाहिलं. तिच्या खोल गेलेल्या डोळ्यांतली वेदना त्याला जाणवली. आरशात दिसणाऱ्या
चेहऱ्याच्या सदैव लाल डोळ्यांमागचं कारणही कदाचित कळलं होतं. छातीवर सदैव जाणवणाऱ्या
दडपणामागचं सत्यही उलगडलं होतं.
“हे सगळं
स्वप्न आहे. हे खरं नाही. सगळं सगळं स्वप्न आहे. दुःस्वप्न आहे हे. थांबत का नाहीये
हे. का परत परत मी ह्याच स्वप्नात येतो. का परत परत हीच वेदना आणि हेच दुःख भोगतोय.”
त्यानं डोळ्यांवर हात ठेवला आणि ढसाढसा रडायला लागला.
तिनं त्याच्याभोवती
हात ठेवले आणि त्याला मिठी मारून तीही रडायला लागली.
तो मनात वाट
पाहत होता, पण त्याला जागच येत नव्हती.
----
“झालीदेखील
पुस्तकं वाचून?” खरे हसत त्याच्याकडे पाहत होते. “तीनच दिवस झाले आपल्याला भेटून.”
“झोपलोच नाही
मी गेले दोन दिवस.”
“म्हणजे एक
दिवस झोपलात.” खरे विचार करत म्हणाले. “लेट मी गेस. ह्यावेळेसच्या स्वप्नानंतर हिंमत
झाली नाही झोपायची?”
त्यानं तारवटलेल्या
लाल डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत फक्त मान डोलावली.
“लेट्स स्टार्ट.”
“काय सांगू.”
“लेट्स स्टार्ट
विथ… तुम्ही माझ्याशी का बोलताय? व्हाय डू यू थिंक आय कॅन हेल्प यू.”
“माहित नाही.
खरंच माहित नाही. कदाचित, तुम्ही डॉक्टर नाही म्हणून. ज्ञानाचा भपकारा नाही म्हणून.
मी वेडा आहे हे ठरवून तुम्ही मला पाहत नाही म्हणून कदाचित.”
“इंटरेस्टिंग.
मी डॉक्टर नाही हे टेक्निकली सत्य नाही. मी पीएचडी आहे.” खरे हसत म्हणाले.
“मुख्य म्हणजे,
मला स्वप्न पडतात म्हटल्यावर तुम्ही एक क्षणही माझ्यावर अविश्वास दाखवला नाहीत.”
“बीन देअर,
डन दॅट.” खरे पुन्हा हसले.
“कसं करायचं?”
“हं.” खरे
स्वतःची नोंदवही समोर ओढत म्हणाले. “लेट्स बिगिन विथ कॅरॅक्टर मॅपिंग.”
“मी म्हणजे
मीच आहे, पण इथे आहे तसा दिसत नाही. माझी आई, माझी आईच आहे, पण, पण ती वेगळी दिसते
असं मला वाटतं. पण तरी मी तिला ओळखतो, ती माझी आईच आहे, पण माझं स्वतःचं तसं नाही.
माझी इथली बायको म्हणजे, तिथली ऑफिसातली कलिग.”
“आणि तिथली
बायको? इथे कुणीतरी सिग्निफिकंट असेल ना.”
“तेच तर कळत
नाही. ती इथे कुणी नाही.”
“असं कसं.
नीट विचार करा. नक्कीच कुणीतरी असेल.”
“ओळखीचा आहे
चेहरा. पण आय कान्ट प्लेस इट.”
“सम ओल्ड
फ्लेम? क्रश?”
“फ्रॉईड?”
“कोण फ्रॉईड?”
“यू मस्ट
बी जोकिंग.” म्हणून तो क्षीण हसला.
“ठीक. हरकत
नाही. आठवेल तुम्हाला. हळू हळू चित्र उलगडतंय असं म्हणत होतात.”
“हो. आधी
क्षण, दोन क्षण लक्षात दिसायचे, लक्षात राहायचे. मग तास, दोन तास, आता दिवसच्या दिवस
दिसतो. इकडचे तिकडचे तुकडे लक्षात राहतात. मी लिहून ठेवायला सुरूवात केली. आधीचंही
जे आठवलं ते ही लिहून ठेवलं.”
“गुड.”
“तुम्हाला
वाचायचंय?”
“नको. मला
ऐकायला आवडेल तुमच्या तोंडून.”
ते कसं.
“ल्युसिड
ड्रीमिंगचा प्रयोग करू आपण. सजग स्वप्नावस्था.”
“पण त्यासाठी
इक्विपमेंट वगैरे लागतील का?”
“कशाला? ड्रग्ज
माझ्याकडे आहेत. मला तुमची ब्रेन ऍक्टिव्हिटी वगैरे मॅप करायची नाही. रेम झोप मला अशीही
कळेल. “
“पण काही
प्रॉब्लेम झाला तर?”
“तुम्ही म्हणालात
की काही कारणानं तुम्हाला माझा विश्वास वाटतो.” खरे त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाले.
“पुन्हा माझ्या काही थियरीज चाचपून पाहण्याची ही योग्य संधी आहे.”
“थियरीज?”
तो चिडून म्हणाला. “ते महत्वाचं आहे तुमच्यासाठी?”
“एका गोष्टीतून
दुसरी गोष्ट घडत असेल तर प्रॉब्लेम काय?”
“नाही.” तो
जागेवरून उठत म्हणाला. “आता मला तुमच्यावर विश्वास ठेवल्याचा पश्चात्ताप होतोय.”
“तुम्ही मला
शोधत इथे आलात. काहीतरी कारण असेल. मी डॉक्टर नाही, थेरपिस्ट नाही. ही फक्त माझी अभ्यासिका
आहे. मी फक्त मदत करतोय, मला तुमच्याकडून काहीही नकोय. तुमची इच्छा असेल तर थांबा.
नाही तर हरकत नाही.” खरे शांतपणे म्हणाले.
“आपण करू
प्रयोग.” तो थोडा शांत होत म्हणाला. “पण आधी मी एकदा माझ्या घरी भेटून येतो सर्वांना.”
“अहो काही
होणार नाही तुम्हाला.”
“पण मी, मीच
राहीन ही शाश्वती देऊ शकता तुम्ही?”
खरे गप्प
राहिले.
“पण एक गोष्ट.
प्रयोग करण्याआधी, मला तुमचं मत जाणून घ्यायचंय. तुम्ही नुसतंच कॅरॅक्टर मॅपिंग घेतलंत.”
“गोष्ट ऐकल्याशिवाय
काय निष्कर्ष काढू?”
“डिस्जंक्टिव्ह
कॉग्निशन?”
“तुटक आकलन.
गुड. पुस्तकं वाचली आहेत तुम्ही. म्हणूनच पुस्तकं दिली आहेत तुम्हाला. इथे मी डॉक्टर
तुम्ही पेशंट असं रिलेशन नाही. आपण दोघांनी मिळून ह्याचा माग काढायचा आहे.” खरे नोंदवही
उघडत म्हणाले. “तुम्ही स्वतः आणि तुमची आई, ह्या तुटक आकलनाचा परिणाम असू शकता. तुम्हाला
माहित आहे की ते तुम्ही आहात, आणि तरी तुम्ही तसे दिसत नाही. स्वप्नशास्त्रामध्ये शेकडो
केसेस आहेत अशा. पण खरं सांग़ायचं तर तुमची स्वप्न त्या पलिकडली वाटतात. तुमची बायको,
तुमची तिकडची बायको, इट्स व्हेरी पिक्युलिअर. म्हणून जोवर तुम्ही गोष्ट सांगत नाही,
किंवा सांगू शकत नाही, मला निष्कर्ष काढायचा नाहीये.”
“पण तुमच्या
थियरीज?”
खरे उठून
पुस्तकांच्या शेल्फकडे गेले. एक पुस्तक त्यांनी शोधून काढलं आणि त्याला आणून दिलं.
“थियरी ऑफ
मल्टिपल ऍंड शेअर्ड कॉन्शसनेस”, विनय खरे
“अनेक जागृतावस्था
आणि सामायिक जागृतावस्थांचा सिद्धांत.” खरे गंभीरपणे म्हणाले.
“तुम्ही सगळं
मराठीत का सांगताय मला?”
“कारण माझं
पीएचडी मराठीत केलेलं आहे, मी पुस्तक इंग्रजीमध्ये जागतिक आकलनासाठी लिहिलं आहे.”
“काय? मराठीत?”
“ते सोडा
हो.” खरे विषय बदलत म्हणाले. “ही माझी थियरी. माणूस एका वेळी दोन जीवनं जगू शकतो का?
एकमेकांना न कळता असेल तर अनेक आणि एकमेकांना कळत असेल तर सामायिक. क्वांटम फिजिक्सचे
नियम वळवता आले तर हे शक्य होऊ शकतं का असा उहापोह केलेला आहे.”
“म्हणजे तुम्हाला
असं वाटतंय की मी एकाच वेळी अनेक आयुष्य जगतोय?”
“माहित नाही.
तेच सिद्ध तरी करायचंय किंवा खोडून तरी काढायचंय. शास्त्रज्ञ म्हटलं की सिद्धांत खरा
की खोटा हे दोन्ही तितकंच महत्वाचं. खरा असेल तर आपला विजय, खोटा असेल तर पुढच्या पावलासाठी
रस्ता स्पष्ट होतो.”
तो पुस्तकाचं
मलपृष्ठ पाहत होता.
“या तुम्ही
तुमच्या कुटुंबाला भेटून. मी तयारच आहे प्रयोगासाठी.”
तो विचारमग्न
अवस्थेतच बाहेर पडला.
----
क्रमशः
No comments:
Post a Comment