Showing posts with label अनावृत पत्र. Show all posts
Showing posts with label अनावृत पत्र. Show all posts

4/25/2011

अक्षय कुमार यास अनावृत पत्र

अक्कीदादा (तुझ्याबद्दल प्रचंड आपुलकी वाटते त्यामुळे, तुम्हाला/आपल्याला वगैरे न वापरता थेट अरे दादावर घसरतोय),
तुला मराठी उत्तम कळतं आणि बोलता येतं त्यामुळे बिनधास्त मराठीमध्ये पत्र लिहितोय. बर्‍याच वर्षांपासून तुला पत्र लिहिण्याची इच्छा होती, पण नेहमी काही ना काही कारणामुळे राहून गेलं. प्रत्येक वेळी पत्र लिहिण्याचं कारण आणि विषयही वेगळे होते. आज मात्र अनावृत पत्र लिहितोय कारण मी जे लिहू इच्छितो ते थेट तसंच्यातसं तुझ्या इतर असंख्य चाहत्यांनाही वाटतं.
मी तुझा एक असा पंखा आहे जो कधीच फिरायचा बंद होणार नाही. तुझ्या असंख्य कट्टर चाहत्यांपैकी एक. तुझ्या 'खिलाडी' सिनेमापासून तुझ्याशी जडलेलं नातं 'जीना इसी का नाम है' कार्यक्रमातल्या तुझ्या मुलाखतीनं घट्ट झालं. ही मुलाखत पाहेपर्यंत एक मार्शल आर्ट एक्सपर्ट ऍक्शन हिरो वाटणारा तू थेट आपल्यातला वाटू लागलास. तुझं सामान्य बालपण आणि त्यातनंच पुढे येऊन तू मिळवलेलं असामान्य यश आणि तरीही आपल्या सामान्य बालपणाशी कधीच तुटू न दिलेली नाळ हे सगळं तुझ्याशी कनेक्ट करून गेलं. मग तुझे 'मिस्टर बॉन्ड' पासून ते 'अंगारे', 'जानवर' इत्यादी इत्यादी सारे सिनेमे पाहिले. काहींची नावे विसरलोही असेन, पण टीव्हीवर तुझा सिनेमा आहे आणि मी चॅनेल बदलला असं कधी झालं नाही. तू अनेक सामान्य ते तद्दन भिकार सिनेमे केलेस, हे तू स्वतःही मान्य करतोस. किंबहुना तुझा हाच सच्चेपणा मला भावतो. नसीरूद्दीन शाह हा असामान्य कलावंत तुझ्याबरोबर दोन-तीन मसाला सिनेमांमध्ये होता. तेव्हा तू छोटा स्टार होतास. सुपरस्टार झाल्यानंतर एकदा नसीरूद्दीन शाहनं एका मुलाखतीत तुझा उल्लेख केला होता. तो म्हणाला, "अक्की स्वतः मला म्हणतो की मला ठाऊक आहे मी चांगला अभिनेता नाही, पण मी नेहमीच उत्तम देण्याचा प्रयत्न १०० टक्के करतो. आणि अक्की खरंच सिनेमाला जेव्हढं देतो, जेव्हढी मेहनत करतो ती काबीलेतारीफ आहे." ती मुलाखत पाहिल्यावर मला तुझा आणखीनच अभिमान वाटलेला.
मी तसा एलिटिस्टही गणला जाऊ शकतो असा सिनेरसिक आहे. फेस्टिव्हल फिल्म्स किंवा आर्ट फिल्म्सवर तासनतास विचार करणं आणि मग अगम्य भाषेत लिहिणं हा माझा छंदही आहे. पण तरीही तू माझा आजच्या पिढीतला सर्वांत आवडता अभिनेता आहेस, ह्याचं लोकांना आश्चर्य वाटतं. कधीकधी मलाही वाटतं, पण हे सत्य आहे. एक मिथुनदा आणि त्यानंतर थेट तू. तू केलेली असंख्य लफडीसुद्धा मला तुझा फॅन होण्यापासून कधीच रोखू शकली नाहीत. त्याचं कारण कदाचित हे आहे की तू कधी त्यांपासून दूर पळायचा प्रयत्न केला नाहीस. जे जसं होतं तसंच तू मान्य केलंस. एका वर्षांत अर्धा डझन फ्लॉप सिनेमे दिल्यावर तू एकदा सिनेसंन्यासाची भाषा केली होतीस, पण मग 'जानवर' आला आणि तू निर्णय बदललास. योग्यच केलंस कारण नाहीतर 'हेराफेरी' आला नसता आणि हिंदी सिनेमाला एक वेगळा प्रकार मिळाला नसता. 'हेराफेरी' येईपर्यंत कधीच सिनेमाचे मुख्य नायक 'कॉमेडी' करत नव्हते. त्यासाठी स्पेशल पात्र असायची. पण 'हेराफेरी' नं मुख्य नटाला 'कॉमेडीयन' बनता येतं हे सिद्ध केलं. त्यानंतर अशा सिनेमांची लाट आली, त्यातच तू ही काही सारखे सिनेमे केलेस पण 'हेराफेरी' पुन्हा जमला नाही. चालायचंच.
पण तू त्यात वाहावत गेलास, ह्याचं वाईट वाटतं. शाहरूख खानमध्ये जर काही अभिनय असलाच तर तो चोपडा-जोहर कंपनीनं झाकून टाकला आणि तुझ्यातला कलाकार तू स्वतःच. मिथुनदांनीही त्यांच्या उतारवयात तेच केलेलं. माझ्या दोन सर्वाधिक आवडत्या नटांचा एकसारखा रस्ता पाहून थोडंसं आश्चर्य आणि वैषम्य वाटतं. तुझे 'कॉमेडी' च्या नावाखाली हल्ली जे सिनेमे येतात, ते पाहून अपार यातना होतात. मी तरीदेखील भारतात असेन तर तुझा प्रत्येक पिक्चर थेटरात जाऊन पाहतोच. पण खरंच माझ्यासोबत येणार्‍या मित्रांना तुला नावं ठेवताना पाहून काळीज तुटतं. तुला आपला मानलंय त्यामुळे प्रत्येक वेळी तुझी बाजू घेऊन मी भांडत राहीनच. पण आता खरंच बदलाची वेळ आहे रे.
माझ्या मते हिंदी सिनेसृष्टीला मिळालेलं सर्वोत्तम ऍक्शन हीरो मटेरियल तू आहेस. जर हॉलीवूडच्या तोडीस तोड कुणी ऍक्शन हीरो असेल तर तूच आहेस आणि ह्यात कुणीही हरकत घेऊ शकत नाही. पण तू ते सगळं वाया घालवतोस असं वाटतं. तू अभिनेता नाहीस असं नाही, पण तुला जेव्हढा अभिनय येतो त्याच्या एकशतांशाचाही तू वापर करत नाहीस. तुझी गणितं आणि तुझे निर्णय सर्वस्वी तुझेच आहेत आणि ह्या गोष्टीचा मान राखूनच मी सांगतो की तुझी सिनेमांची निवड हल्ली मला कोड्यात टाकते. तू आता मोठा माणूस आहेस त्यामुळे तू थेट सहनिर्माता बनून नफ्यातला हिस्सा घेतोस. मग एव्हढी ताकद हाताशी असताना तू 'थँक यू' आणि 'खट्टा मीठा' सारखे सिनेमे का करतोस? मला तुलना आवडत नाही पण मी तुला बॉलीवूडचा विल स्मिथ मानतो, पण तू असे सिनेमे करत राहशील तर कसं होईल? तुझ्या व्यक्तिमत्वात जादू आहे हे 'खतरों के खिलाडी' सारख्या शोजच्या यशावरून सिद्ध होतं. पण ती जादू योग्य जागी लागत नाही असं नाही वाटत तुला?
आजच्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीत चाळिशी उलटून गेलेल्या हिरोंचीच चलती आहे, त्यामधलंच एक नाव तू. पण तू इतर सर्वांहून वेगळा आहेस. तुझा रस्ता निराळा आहे आणि तुझी कलाही. तू तुझा आब वेगळ्याच पद्धतीनं राखला आहेस, पण मग ही हुशारी तुझ्या सिनेमांच्या निवडीत का दिसत नाही ह्याचं प्रचंड वैषम्य वाटतं. थेट हॉलीवूडपर्यंत झेप घेण्याची तुझी क्षमता आहे आणि तशी तू घेतलीही असल्याचं मध्यंतरी कानावर आलं होतं. पण मग अचानक ह्या बथ्थड सिनेमांची लाट आली आणि काहीतरी मोठी चूक झाल्यागत जाणवू लागलं.
तुझ्याबद्दल प्रचंड तळमळ वाटते म्हणून एव्हढं सगळं लिहिलं. तू अजून मोठा व्हावंस अशी नेहमीच इच्छा आहे. म्हणूनच एकदा आपल्या सिनेमांच्या निवडीवर लक्ष देऊन पाहा. तू प्रयत्न करतोस हे '८x१० तस्वीर' वरून दिसतंच पण एक प्रयत्न फसला म्हणून प्रयत्न करणं सोडू नकोस. आणि सिनेमामध्ये 'अक्षय कुमार' बनून राहू नकोस, जे शाहरूखचं झालं तेच तुझंही होताना दिसतंय, पण शाहरूखच्या इमेजला(लव्हरबॉय) मरण नाही, हे त्याचं नशीब आणि तुझ्या 'स्ट्रीटस्मार्ट' इमेजला तेव्हढं शेल्फ लाईफ नाही हे तुझं. त्यामुळे लवकरात लवकर ह्या फेजमधून बाहेर पड. माझ्यासारख्या चाहत्यांच्या शुभेच्छा नेहमीच तुझ्यासोबत आहेत.
तुझा,
(तुला आणि मिथुनदांना घेऊन 'शॉशँक रिडेम्प्शन'चा रिमेक बनवायचं स्वप्न बाळगणारा चाहता) विद्याधर.

1/24/2011

सिनेदिग्दर्शक सचिन यांस अनावृत पत्र

प्रिय सचिनजी,

पत्र लिहिणेंस कारण की, नुकताच आपला नवा(?) सिनेमा 'आयडियाची कल्पना' पाहण्याचा (कालसर्प)योग आला अन आपणांस पत्र लिहिल्यावाचून राहावले नाही. 'मी लहानपणापासून आपला चाहता आहे' वगैरे असली पुस्तकी विधाने मी करणार नाही पण आपलं गोंडस रूप, मग ते 'उठा, राष्ट्रवीर हो' मधलं असो, किंवा 'सत्ते पे सत्ता' मधला शनि असो नेहमीच मला भावलं होतं हे मात्र तितकंच खरं. त्यानंतर थोडं कळू लागल्यानंतर स्वतःच्या बळावर 'लेखन-दिग्दर्शन-निर्मिती' करून पुन्हा अभिनय करून बर्‍यापैकी दर्जाचे मराठी सिनेमे काढणारा एक कलावंत म्हणून तुमचं कौतुक अन अभिमानही वाटायचा. तुमच्या 'तू-तू-मैं-मैं' चा मी कट्टर चाहता. पण तुम्ही हिंदीत कधी मोठे न होऊ शकल्याचं दुःखही नेहमी 'अखियों के झरोकों' से पाहिल्यावर होत असे. पण जसजसा मोठा होत गेलो अन समज येत गेली, तसतसा हिंदीतलं यश जरी सुखावणारं अन आर्थिकदृष्ट्या मोठं असलं, तरी ते न मिळणं म्हणजे आयुष्याचं नुकसान नव्हे असं अनेक प्रादेशिक (केवळ मराठीच नव्हे) कलावंतांकडे पाहून लक्षात येऊ लागलं. मात्र तुमच्या मनात तो सल कुठेतरी आजही कायम आहे ह्या गोष्टीची कल्पना तुमच्या सिनेमातल्या काही संवादांवरून आली अन विषाद वाटला.
सिनेमातल्या ह्या संवादांमध्ये हिंदीची श्रीमंती अन मराठी सिनेमाची गरीबी ह्या गोष्टीवर इतका भर देण्यात आलाय की गेल्या पाचेक वर्षांत नुसती बजेटपातळीवर नव्हे, तर बजेटच्या योग्य नियोजनाच्या पातळीपासून ते तांत्रिक अन मार्केटिंगपातळीवर क्रांती घडून आलेल्या मराठी चित्रपटसृष्टीतच बनलेला हा चित्रपट आहे ना अशी शंका यावी. उत्तमोत्तम कथावस्तू मराठी वाड्मयापासून ते मराठी नाटकांपर्यंत उपलब्ध असताना आपणांस एका पडलेल्या (किंवा फारशा न चाललेल्या म्हणा) हिंदी चित्रपटाची भ्रष्ट आवृत्ती का काढावीशी वाटली (ते ही 'आम्ही सातपुते' चं उदाहरण ताजं असताना) हे मला पडलेलं कोडं आहे. कथावस्तू सोडून पुढे गेलं, तर संवादांमध्ये जाणवणारं दारिद्र्य हे मन विषण्ण करणारं होतं. अनेकानेक उत्तमोत्तम विनोदी चित्रपट देणारे हेच आपण का? असं कोडं मला वारंवार विनोदी होण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारे संवाद पाहून पडत होतं. (एकंदरच मी एकामागून एक पडणार्‍या कोड्यांमध्ये गुंतलो होतो.) तांत्रिक पातळीवर पाहण्यास जावे, तरी हल्लीच्या एकंदर सिनेमाकडे पाहता, आपल्यासारख्या जुन्याजाणत्या कलाकाराच्या चित्रपटात अजून सफाई अपेक्षित होती. अन कलादिग्दर्शनाबद्दल जितकं कमी बोलेन तितकं चांगलं. एकही सेट डोळ्यांत भरत नाही, अन लोकेशन्सही ऍडजस्ट केल्यागत वाटतात. अर्थात मी काही मोठा सिनेजाणकार नव्हे, पण एका सामान्य सिनेप्रेमीला जे खटकू शकतं तेच सांगतोय, ते ही केवळ तुमच्या अन मराठी चित्रपटसृष्टीच्या प्रेमापोटी.
सेट अन तांत्रिक पातळीसाठी बजेटचा मुद्दा पुढे येईल हे मी जाणून आहे, पण शिवाजीराजे भोसलेसारख्या सिनेमाला अर्थसहाय्य देणारा मनुष्य तुमच्या सिनेमासाठी हात आखडता असा किती घेईल हा प्रश्न मनात येतोच. मग बजेटचं योग्य नियोजन झालं नसेल का? असाही एक प्रश्न पडतो. खरंच सांगतो, मला ह्या सगळ्यांतला 'ब' ही कळत नाही, पण सामान्य सिनेरसिकाला हे प्रश्न पडू शकतात. अन तुमच्यावर वर्षांनुवर्षं असलेल्या प्रेमामुळे अन लोभामुळे हे प्रश्न खुलेपणी विचारण्याचा हक्क आम्हाला मिळतो असं समजूनच चालतोय मी. हा आगाऊपणा वाटू शकेल, पण तुम्ही पोटात घालाल अशी आशा करतो.
पुढची गोष्ट म्हणजे आता तुम्ही 'हिरो' म्हणून पुढे येण्याचा अट्टाहास सोडावा अशी कळकळीची विनंती. कारण आपण बिलकुलच तरूण दिसत नाही. आपला चेहरा अन पोट झाकण्यासाठी ठेवलेला आऊट शर्ट आपलं वय सहजच सगळ्यांसमोर आणतो. अन जर आपल्याला खरंच हिरोची कामं करायचीच आहेत, तर रजनीकांतचा मेकअप आर्टिस्ट अन त्या दर्जाचे कॅमेरे आणण्यास सुरूवात करा, नाहीतर आपला प्रयत्न खरोखर उघडा पडत होता, अन मला खरंच अपार यातना होत होत्या. 'अखियों के झरोकों से', 'बालिका बधू', 'गंमत जंमत' वगैरेंमधले कुठे तुम्ही ते रूबाबदार सचिन, अगदी 'नवरा माझा नवसाचा' मध्येही आपलं वय दिसूनही व्यक्तिरेखेसोबत शोभत होतं, पण इथे मात्र तरूण दिसण्याच्या केविलवाण्या प्रयत्नाखेरीज मला काहीही दिसत नव्हतं, अन फार फार वाईट वाटत होतं.
अशोक सराफ, महेश कोठारे अन निर्मिती सावंतसारख्या चांगल्या कलावंतांना वाया घालवण्याचं अर्ध काम स्क्रिप्टनं केलं अन उर्वरित काम संवादांनी अन दिग्दर्शनानं मिळून केलं. निर्मिती सावंत ह्यांची व्यक्तिरेखा तर पहिल्यापासूनच शेंडा-बुडखा नसलेली आहे अन महेश कोठारेंना फक्त 'डॅम इट' म्हणायला सिनेमात घेतलंय की काय? असा प्रश्न पडावा इतपत त्यांच्या व्यक्तिरेखेची कधी कधी गळचेपी होते. अशोक सराफ ह्यांची भूमिका कथेच्या दृष्टीनं खरं म्हणजे मध्यवर्ती असायला हवी होती (जशी 'लाखों की बात' मध्ये संजीव कुमारची होती) पण तुमच्या स्वतःबद्दलच्या ऑब्सेशनमुळे तिथे थोडासा बट्ट्याबोळ झालाय.
स्वतःच स्वतःचं फॅन असणं काही चूक नाही. शाहरूख खान अन करिना कपूर ही त्याची ढळढळीत (यशस्वी) उदाहरणं. पण ते कुठे दाखवावं ह्यामुळे बराच फरक पडतो. प्रस्तुत चित्रपटात ह्या गोष्टीचा अतिरेक झाल्यागत वाटतो अन बरेचदा काही प्रसंग नको तेव्हा हास्यास्पद होतात. अन क्लायमॅक्सचा प्रसंग विचित्र पद्धतीने हास्यास्पद वाटण्याइतपत खेचला गेला आहे. त्याचबरोबर सिनेमाला अर्थसहाय्य मिळतं म्हणून 'सरोगेट ऍडव्हर्टायझिंग' चा वापर करणं ही युक्ति चांगली होती. पण ज्या पद्धतीनं त्या जाहिराती झाल्यात, त्यांच्यासमोर सुभाष घईंच्या 'यादें' मधल्या 'पासपास' च्या जाहिरातीसुद्धा जास्त कल्पक वाटतात. पण सगळ्यांत वाईट म्हणजे MRI चा फुलफॉर्म 'Magnetic Resonance Imaging' असा आहे, पण सिनेमातल्या हॉस्पिटलच्या सेटमध्ये चक्क 'Medical Resonance Imaging' असं लिहिलेलं दिसतं.
भार्गवी चिरमुलेचं काम जरी ठीक झालं असलं तरी एकंदरच आपली अन तिची जोडी कुठेही सूट होत नसल्यामुळे अन तिच्याही व्यक्तिरेखेला शेंडाबुडखा नसल्याने (एकंदरित थोड्याफार प्रमाणात अशोक सराफ ह्यांची व्यक्तिरेखा सोडल्यास सगळ्यांच व्यक्तिरेखा बिन शेंडा-बुडख्याच्या आहेत) बरेचदा कंटाळवाणंच वाटतं. त्यातून तिच्यासाठी जे पेहराव वापरले आहेत, ते अनेकदा इनऍप्रॉप्रियेट वाटतात.
संगीतामध्ये अवधूत गुप्तेंनी दिलेली लावणी चांगली आहे अन टायटल साँग (जे कुणी संगीतबद्ध केलंय ते मला ठाऊक नाही) हे दोन वगळता काहीही लक्षात राहिलं नाही.
आपल्या सिनेमाबाबत इतकं वाईट लिहिण्यामागे माझा कोणताही वैयक्तिक आकस नाही. पण गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक सिनेमाने लावलेल्या सवयी अन वाढवलेल्या अपेक्षा जेव्हा मराठी सिनेमा अन थोड्या प्रमाणात हिंदी सिनेमाही पूर्ण करू लागला, तेव्हा माझ्या अपेक्षा अजूनच वाढत गेल्या. त्यात आपण मराठी चॅनेल्सवरती, असेल नसेल त्या कार्यक्रमात येऊन अन स्वतःच्याच 'एकापेक्षा एक' मध्ये सिनेमाची तोंड फाटेल तेव्हढी स्तुती करू लागलात. ह्या सगळ्या परिस्थितीत मी सिनेमाला गेलो अन माझ्या सगळ्या अपेक्षांच्या फुग्याला पहिल्याच फ्रेममध्ये टाचणी लागली. अन मग त्या फुटलेल्या फुग्यावर पुढची प्रत्येक फ्रेम असंख्य टाचण्या बरसवतच राहिली. सिनेमा संपेस्तोवर मी फारच दुःखी झालो होतो. खरंच सांगतो, माझं मराठीवर, सिनेमावर अन पर्यायाने मराठी सिनेमावर प्रचंड प्रेम आहे. अन गेल्या काही वर्षांमध्ये तर मराठी सिनेमाने माझी मान अभिमानाने ताठ केलेली आहे. अशा वेळी आपल्यासारख्या एकेकाळी मराठी सिनेमाला गर्दी खेचून आणणार्‍या कलावंताने इतका वाईट (माझ्या मते) सिनेमा बनवावा हे फारच खटकलं. त्या सगळ्या वेदना कागदावर उतरल्या अन तुमच्यावर असलेल्या प्रेमाखातर थेट तुम्हाला लिहिण्याचं धाडसही करू शकलो. फार जास्त आगाऊपणा झाला असेल तर क्षमा करा. पण एका खर्‍या सिनेरसिकानं सच्च्या कळकळीनं लिहिलेलं हे पत्र आहे.
कळावे. लोभ असावा.

आपला,
(आपल्याकडून उत्तम सिनेमाची अपेक्षा करणारा चाहता) विद्याधर.