1/24/2011

सिनेदिग्दर्शक सचिन यांस अनावृत पत्र

प्रिय सचिनजी,

पत्र लिहिणेंस कारण की, नुकताच आपला नवा(?) सिनेमा 'आयडियाची कल्पना' पाहण्याचा (कालसर्प)योग आला अन आपणांस पत्र लिहिल्यावाचून राहावले नाही. 'मी लहानपणापासून आपला चाहता आहे' वगैरे असली पुस्तकी विधाने मी करणार नाही पण आपलं गोंडस रूप, मग ते 'उठा, राष्ट्रवीर हो' मधलं असो, किंवा 'सत्ते पे सत्ता' मधला शनि असो नेहमीच मला भावलं होतं हे मात्र तितकंच खरं. त्यानंतर थोडं कळू लागल्यानंतर स्वतःच्या बळावर 'लेखन-दिग्दर्शन-निर्मिती' करून पुन्हा अभिनय करून बर्‍यापैकी दर्जाचे मराठी सिनेमे काढणारा एक कलावंत म्हणून तुमचं कौतुक अन अभिमानही वाटायचा. तुमच्या 'तू-तू-मैं-मैं' चा मी कट्टर चाहता. पण तुम्ही हिंदीत कधी मोठे न होऊ शकल्याचं दुःखही नेहमी 'अखियों के झरोकों' से पाहिल्यावर होत असे. पण जसजसा मोठा होत गेलो अन समज येत गेली, तसतसा हिंदीतलं यश जरी सुखावणारं अन आर्थिकदृष्ट्या मोठं असलं, तरी ते न मिळणं म्हणजे आयुष्याचं नुकसान नव्हे असं अनेक प्रादेशिक (केवळ मराठीच नव्हे) कलावंतांकडे पाहून लक्षात येऊ लागलं. मात्र तुमच्या मनात तो सल कुठेतरी आजही कायम आहे ह्या गोष्टीची कल्पना तुमच्या सिनेमातल्या काही संवादांवरून आली अन विषाद वाटला.
सिनेमातल्या ह्या संवादांमध्ये हिंदीची श्रीमंती अन मराठी सिनेमाची गरीबी ह्या गोष्टीवर इतका भर देण्यात आलाय की गेल्या पाचेक वर्षांत नुसती बजेटपातळीवर नव्हे, तर बजेटच्या योग्य नियोजनाच्या पातळीपासून ते तांत्रिक अन मार्केटिंगपातळीवर क्रांती घडून आलेल्या मराठी चित्रपटसृष्टीतच बनलेला हा चित्रपट आहे ना अशी शंका यावी. उत्तमोत्तम कथावस्तू मराठी वाड्मयापासून ते मराठी नाटकांपर्यंत उपलब्ध असताना आपणांस एका पडलेल्या (किंवा फारशा न चाललेल्या म्हणा) हिंदी चित्रपटाची भ्रष्ट आवृत्ती का काढावीशी वाटली (ते ही 'आम्ही सातपुते' चं उदाहरण ताजं असताना) हे मला पडलेलं कोडं आहे. कथावस्तू सोडून पुढे गेलं, तर संवादांमध्ये जाणवणारं दारिद्र्य हे मन विषण्ण करणारं होतं. अनेकानेक उत्तमोत्तम विनोदी चित्रपट देणारे हेच आपण का? असं कोडं मला वारंवार विनोदी होण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारे संवाद पाहून पडत होतं. (एकंदरच मी एकामागून एक पडणार्‍या कोड्यांमध्ये गुंतलो होतो.) तांत्रिक पातळीवर पाहण्यास जावे, तरी हल्लीच्या एकंदर सिनेमाकडे पाहता, आपल्यासारख्या जुन्याजाणत्या कलाकाराच्या चित्रपटात अजून सफाई अपेक्षित होती. अन कलादिग्दर्शनाबद्दल जितकं कमी बोलेन तितकं चांगलं. एकही सेट डोळ्यांत भरत नाही, अन लोकेशन्सही ऍडजस्ट केल्यागत वाटतात. अर्थात मी काही मोठा सिनेजाणकार नव्हे, पण एका सामान्य सिनेप्रेमीला जे खटकू शकतं तेच सांगतोय, ते ही केवळ तुमच्या अन मराठी चित्रपटसृष्टीच्या प्रेमापोटी.
सेट अन तांत्रिक पातळीसाठी बजेटचा मुद्दा पुढे येईल हे मी जाणून आहे, पण शिवाजीराजे भोसलेसारख्या सिनेमाला अर्थसहाय्य देणारा मनुष्य तुमच्या सिनेमासाठी हात आखडता असा किती घेईल हा प्रश्न मनात येतोच. मग बजेटचं योग्य नियोजन झालं नसेल का? असाही एक प्रश्न पडतो. खरंच सांगतो, मला ह्या सगळ्यांतला 'ब' ही कळत नाही, पण सामान्य सिनेरसिकाला हे प्रश्न पडू शकतात. अन तुमच्यावर वर्षांनुवर्षं असलेल्या प्रेमामुळे अन लोभामुळे हे प्रश्न खुलेपणी विचारण्याचा हक्क आम्हाला मिळतो असं समजूनच चालतोय मी. हा आगाऊपणा वाटू शकेल, पण तुम्ही पोटात घालाल अशी आशा करतो.
पुढची गोष्ट म्हणजे आता तुम्ही 'हिरो' म्हणून पुढे येण्याचा अट्टाहास सोडावा अशी कळकळीची विनंती. कारण आपण बिलकुलच तरूण दिसत नाही. आपला चेहरा अन पोट झाकण्यासाठी ठेवलेला आऊट शर्ट आपलं वय सहजच सगळ्यांसमोर आणतो. अन जर आपल्याला खरंच हिरोची कामं करायचीच आहेत, तर रजनीकांतचा मेकअप आर्टिस्ट अन त्या दर्जाचे कॅमेरे आणण्यास सुरूवात करा, नाहीतर आपला प्रयत्न खरोखर उघडा पडत होता, अन मला खरंच अपार यातना होत होत्या. 'अखियों के झरोकों से', 'बालिका बधू', 'गंमत जंमत' वगैरेंमधले कुठे तुम्ही ते रूबाबदार सचिन, अगदी 'नवरा माझा नवसाचा' मध्येही आपलं वय दिसूनही व्यक्तिरेखेसोबत शोभत होतं, पण इथे मात्र तरूण दिसण्याच्या केविलवाण्या प्रयत्नाखेरीज मला काहीही दिसत नव्हतं, अन फार फार वाईट वाटत होतं.
अशोक सराफ, महेश कोठारे अन निर्मिती सावंतसारख्या चांगल्या कलावंतांना वाया घालवण्याचं अर्ध काम स्क्रिप्टनं केलं अन उर्वरित काम संवादांनी अन दिग्दर्शनानं मिळून केलं. निर्मिती सावंत ह्यांची व्यक्तिरेखा तर पहिल्यापासूनच शेंडा-बुडखा नसलेली आहे अन महेश कोठारेंना फक्त 'डॅम इट' म्हणायला सिनेमात घेतलंय की काय? असा प्रश्न पडावा इतपत त्यांच्या व्यक्तिरेखेची कधी कधी गळचेपी होते. अशोक सराफ ह्यांची भूमिका कथेच्या दृष्टीनं खरं म्हणजे मध्यवर्ती असायला हवी होती (जशी 'लाखों की बात' मध्ये संजीव कुमारची होती) पण तुमच्या स्वतःबद्दलच्या ऑब्सेशनमुळे तिथे थोडासा बट्ट्याबोळ झालाय.
स्वतःच स्वतःचं फॅन असणं काही चूक नाही. शाहरूख खान अन करिना कपूर ही त्याची ढळढळीत (यशस्वी) उदाहरणं. पण ते कुठे दाखवावं ह्यामुळे बराच फरक पडतो. प्रस्तुत चित्रपटात ह्या गोष्टीचा अतिरेक झाल्यागत वाटतो अन बरेचदा काही प्रसंग नको तेव्हा हास्यास्पद होतात. अन क्लायमॅक्सचा प्रसंग विचित्र पद्धतीने हास्यास्पद वाटण्याइतपत खेचला गेला आहे. त्याचबरोबर सिनेमाला अर्थसहाय्य मिळतं म्हणून 'सरोगेट ऍडव्हर्टायझिंग' चा वापर करणं ही युक्ति चांगली होती. पण ज्या पद्धतीनं त्या जाहिराती झाल्यात, त्यांच्यासमोर सुभाष घईंच्या 'यादें' मधल्या 'पासपास' च्या जाहिरातीसुद्धा जास्त कल्पक वाटतात. पण सगळ्यांत वाईट म्हणजे MRI चा फुलफॉर्म 'Magnetic Resonance Imaging' असा आहे, पण सिनेमातल्या हॉस्पिटलच्या सेटमध्ये चक्क 'Medical Resonance Imaging' असं लिहिलेलं दिसतं.
भार्गवी चिरमुलेचं काम जरी ठीक झालं असलं तरी एकंदरच आपली अन तिची जोडी कुठेही सूट होत नसल्यामुळे अन तिच्याही व्यक्तिरेखेला शेंडाबुडखा नसल्याने (एकंदरित थोड्याफार प्रमाणात अशोक सराफ ह्यांची व्यक्तिरेखा सोडल्यास सगळ्यांच व्यक्तिरेखा बिन शेंडा-बुडख्याच्या आहेत) बरेचदा कंटाळवाणंच वाटतं. त्यातून तिच्यासाठी जे पेहराव वापरले आहेत, ते अनेकदा इनऍप्रॉप्रियेट वाटतात.
संगीतामध्ये अवधूत गुप्तेंनी दिलेली लावणी चांगली आहे अन टायटल साँग (जे कुणी संगीतबद्ध केलंय ते मला ठाऊक नाही) हे दोन वगळता काहीही लक्षात राहिलं नाही.
आपल्या सिनेमाबाबत इतकं वाईट लिहिण्यामागे माझा कोणताही वैयक्तिक आकस नाही. पण गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक सिनेमाने लावलेल्या सवयी अन वाढवलेल्या अपेक्षा जेव्हा मराठी सिनेमा अन थोड्या प्रमाणात हिंदी सिनेमाही पूर्ण करू लागला, तेव्हा माझ्या अपेक्षा अजूनच वाढत गेल्या. त्यात आपण मराठी चॅनेल्सवरती, असेल नसेल त्या कार्यक्रमात येऊन अन स्वतःच्याच 'एकापेक्षा एक' मध्ये सिनेमाची तोंड फाटेल तेव्हढी स्तुती करू लागलात. ह्या सगळ्या परिस्थितीत मी सिनेमाला गेलो अन माझ्या सगळ्या अपेक्षांच्या फुग्याला पहिल्याच फ्रेममध्ये टाचणी लागली. अन मग त्या फुटलेल्या फुग्यावर पुढची प्रत्येक फ्रेम असंख्य टाचण्या बरसवतच राहिली. सिनेमा संपेस्तोवर मी फारच दुःखी झालो होतो. खरंच सांगतो, माझं मराठीवर, सिनेमावर अन पर्यायाने मराठी सिनेमावर प्रचंड प्रेम आहे. अन गेल्या काही वर्षांमध्ये तर मराठी सिनेमाने माझी मान अभिमानाने ताठ केलेली आहे. अशा वेळी आपल्यासारख्या एकेकाळी मराठी सिनेमाला गर्दी खेचून आणणार्‍या कलावंताने इतका वाईट (माझ्या मते) सिनेमा बनवावा हे फारच खटकलं. त्या सगळ्या वेदना कागदावर उतरल्या अन तुमच्यावर असलेल्या प्रेमाखातर थेट तुम्हाला लिहिण्याचं धाडसही करू शकलो. फार जास्त आगाऊपणा झाला असेल तर क्षमा करा. पण एका खर्‍या सिनेरसिकानं सच्च्या कळकळीनं लिहिलेलं हे पत्र आहे.
कळावे. लोभ असावा.

आपला,
(आपल्याकडून उत्तम सिनेमाची अपेक्षा करणारा चाहता) विद्याधर.

40 comments:

 1. झक्कास एकदम.. मी हा चित्रपट बघितलेला नाही (आणि आता तर बघणारही नाही) .. पण तू लिहिलं आहेस तसंच थोडंफार ऐकलं सगळ्यांकडून.. हे पत्र सचिनला मेल कर किंवा फेसबुकवर वगैरे टाक.. त्याच्यापर्यंत हे पोचलं पाहिजे..

  ReplyDelete
 2. kharach mala pan pahayacha hota cinema. Aata? kadapi nahi.

  ReplyDelete
 3. तू सांगितलस आणि मी हा बघायचा टाळला ;-)
  वाचलो रे वाचलो...

  Medical Resonance Imaging - हे भारी होत :)

  ReplyDelete
 4. विद्याधर, एका अतिशय आत्मस्तुती व आत्मप्रौढी मिरवणार्‍याला तीन तास पाहण्यातून वाचवलेस. धन्यू रे बाबा. त्या जुन्या सचिनच्या लोभातच कायमचे रहावे ते बरे. ते महागुरू प्रकरण काय सुरू झाले सगळा बट्ट्याबोळ झाला. :(

  ReplyDelete
 5. ते महागुरू प्रकरण काय सुरू झाले सगळा बट्ट्याबोळ झाला.>>+++++

  सिनेमाच्या टायटल वरुनच मला हा सिनेमा कसा असेल ते कळले..
  त्यात अशोक सराफ, सचिन आणि महेश कोठारे एकत्र म्हणजे फक्त मिसळ होणार हे समजत होतेच...

  सचिनकडुन खरंच चांगल्या सिनेमाची अपेक्षा आहे आणि हा चित्रपट अपेक्षाभंग...

  ReplyDelete
 6. नमस्कार,
  मी हा चित्रपट पहिला आहे. मी लेखकाशी सहमत आहे. सचिनने आता स्वस्तुती करणे सोडून द्यावे त्याचबरोबर चांगले काही देता येईल का या कडे लक्ष द्यावे.
  सध्या त्याच्या डोक्यात रि०मेक चे खुळ आहे ते कृपया सोडून द्यावे.

  ReplyDelete
 7. महागुरु मधे ऐटबाज कोंबड्याप्रमाणॆ आपली मान वेळावण्यापलीकडे त्याने काहीच केले नाही. आता वय झालंय, हे मान्य करून सचिन ने नायकाच्या भुमीकेतून सन्यास घ्यावा.
  तो अशोक सराफ पण हल्ली अंगावर येतो. त्याला पहाणं म्हणजे एक शिक्षा झालेली आहे.
  भरत जाधव म्हणजे त्याच त्या प्रकारचा अभिनय करणारा एक ठोकळा ( त्याचे फॅन्स मला क्षमा करतीलच) कारण त्याला फक्त तोंड वेड्ं वाकडं केलं की अभिनय झाला असे वाटते. त्यालाच काय, पण बहूतेक सगळ्याच मराठी नटांची ही स्थिती आहे. स्वर्गीय लक्श्मीकांत बेर्डे पण तसाच होता, हे दुर्दैवाने म्हणावे लागते.
  लेखातल्या मतांशी सहमत. पण दुर्दैवाने बहुसंख्य मराठी नटांना हे लागू होतंय.

  ReplyDelete
 8. विभी
  मी ह्या चित्रपटाची शुटींग सलग दोन दिवस पहिली आहे.आमच्या कॉलेज च्या समोर असणाऱ्या सिम्बायोसिस मध्ये होती शुटींग.एकाच वेळेस दोन दोन चित्रपटाची शुटींग एकटा सचिन करत होता.आयडियाची कल्पना आणि अजून एक हिंदी होता.सेट वरील चुका ह्या त्या मुले असू शकतात .अन खर सांगू शुटींग बघत असतानाचा मला काही चुका जाणवल्या पण आपल्याला काय कळतंय त्यातलं म्हणून शांत बसलो.अन तू म्हणतोयस त्याप्रमाणे त्या पडद्यावर दिसत आहेत.असो

  सचिन च्या गम्मत जम्मत ,अशी हि बनवा बनवी चा खूप मोठा पंख आहे.हे चित्रपट आजही मी कित्येक वेळा बघायला तयार आहे अन त्यातला विनोदावर आजही खूप हसतो.

  मी हा सुद्धा चित्रपट पाहीन केवळ सचिन च्या प्रेमापोटी .

  बाकी पत्र छान लिहील आहेस.

  ReplyDelete
 9. अतिरेक आहे रे हा सचिन ! डोक्यातच जातो! बघावं तेव्हा स्वःताचीच लाल करतो ! महागुरु म्हणे आणि सुप्रिया गुरुमाता! स्वःताचे असे काही कॉन्सेप्ट्स नसतातच त्यच्या चित्रपटात नेहमी कॉपी पेस्ट ! ते ही रटाळलेले तेच तेच विनोद ! बकवास!

  ReplyDelete
 10. मी त्याच्याकडून अपेक्षा करणंच सोडून दिलेलं आहे! त्याचा टीव्हीवरचा अचरटपणा बघून!

  ReplyDelete
 11. सचिनजी सध्या मराठीतील देव आनंद झाले आहेत.
  त्यांच्या काळातील हिरोंच्या मानाने ते तरुण दिसतात हे खरे पण म्हणून आजच्या नायिकांबरोबर ते बिलकुलही शोभत नाहीत.

  ReplyDelete
 12. मला वाटलं होतं चांगला असेल हा सिनेमा. रविवारीच "अशी ही बनवा बनवी" गेल्या महिन्याभरात दुसर्यांदा पाहिला तेंव्हाच म्हणत होतो पुण्यात असतो तर "आयडियाची कल्पना" पाहिला मिळाला असता. मरो पुन्हा "बनवाबनवी"पाहून जुन्या सचिनवर तहान भागवावी.

  ReplyDelete
 13. Tyachya promos varun aasa cinema asel vatat hote parantu he vachlyavar khatri jhali :)

  dhanyavad Tachanya tochun ghenyapasun vachavalyabdaal :)

  ReplyDelete
 14. Anonymous1:54 AM

  बाबा वाचवलस रे एका अत्याचारापासून.... आमच्याकडे जुन्य़ा सचिनचे आम्ही दोघं नवरा-बायको फॅन असलो तरी ’महागुरू’ नामक प्रकार पचवल्यावर आता सहनशक्तीने सपशेल हार मानली आहे...

  ’नवरा माझा नवसाचा’ ईशानचा लाडका सिनेमा, पण त्या बिचाऱ्याने जूना सचिन पाहिलाच नसल्याने त्याचा नाईलाज आहे... :)

  अतिशय संयत लिहीले आहेस पण मुद्दे... आवडले मला पत्र!!कोणितरी कानऊघडणी करणे गरजेचे होते सचिनची....

  ReplyDelete
 15. तुमचं मत आणि त्यावर आपल्या मित्रमैत्रिणींची मतं अगदी अगदी पटली.मी हा चित्रपट बघण्याचं डेअरिंग करणारच नव्हतो.याचं दुसरं कारण आता महिन्याभरात त्याचा वर्ल्ड प्रिमियर होईल झी वर आणि वर्षभरात विविध ज्युबल्यांच्या रांगोळ्य़ा! महेद्रजींनी म्हटल्याप्रमाणे अनेक मराठी नटनट्यांची घसरणच झालेली दिसते.नवीन काही अभिनेते/त्या ते अभिनेते/त्या आहेत की नाहीत असा प्रचंड संभ्रम निर्माण होतो.सचिनजींच्या जुन्या चित्रपटाचा उल्लेख झालाय.बरेच चित्रपट वसंत सबनीसांसारखे दिग्गज लिहित होते.’सबकुछ’ मी होऊन बसायचं आणि प्रेक्षकांना गृहित धरायचं हेच चाललेलं आहे.कुणीतरी म्हटल्याप्रमाणे मिडीऑकर बनण्या-रहाण्यात काही कलावंत धन्यता मानू लागलेत.दुसर्‍या बाजूला हरिश्चंद्राची फॅक्टरीसारखे उत्कृष्टं चित्रपट निर्माण होताएत हे आपलं नशीब!

  ReplyDelete
 16. हेरंब,
  सचिन फेबुवर वगैरे आहेत की नाही ठाऊक नाही रे... असो.. पोहोचतील भावना कशातरी त्यांच्यापर्यंत.. :)

  ReplyDelete
 17. सुदर्शन,
  ब्लॉगवर बहुतेक पहिलीच प्रतिक्रिया तुमची! स्वागत! एव्हढा विश्वास दाखवलात, बरं वाटलं!
  प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. भेट देत राहा!

  ReplyDelete
 18. सुहास,
  :)
  अरे आधी माझंही लक्ष गेलं नव्हतं.. शेजारी मित्र बसलेला तो मला दाखवू लागला.. थेटरात तो अन मी सोडून फक्त चार जण होते :D

  ReplyDelete
 19. श्रीताई,
  हो ना..हल्ली फारच सुरू आहे आत्मस्तुती...प्रत्येक कार्यक्रमात तेच.. अन पुन्हा सगळ्यांनी म्हणायचं, 'तुम्ही अजून पहिल्यासारखेच कसे दिसता'..कैच्याकै वाटू लागलं होतं सगळं..तरी मनाचा हिय्या करून सिनेमा बघितला, अन पस्तावलो :(

  ReplyDelete
 20. आका,
  अरे मी ह्या सगळ्यांच्या जुन्या सिनेमांच्या प्रेमाखातर गेलेलो..त्यातही कोठारेंचे अगदी अलिकडचेही सिनेमे किमान बघण्यालायक असतात म्हणून...पण पार गेमच झाला माझा..
  खरंय अन ते महागुरू आपल्या डोक्यात जातात, पण त्यांच्याही 'डोक्यात गेलेत'. :P

  ReplyDelete
 21. महेश,
  ब्लॉगवर स्वागत! खरंच सचिननी आता नव्या नजरेनं सिनेमाकडे पाहणं भाग आहे.. नाहीतर प्रेक्षकांचं, फायनान्सर्सचं अन त्यांचं स्वतःचं काही खरं नाही!
  प्रतिक्रियेबद्दल खूप आभार.. भेट देत राहा!

  ReplyDelete
 22. महेंद्रकाका,
  खरंय. एकीकडे प्रयोग होत असताना काही गरीबीतून वर आलेले कलावंत त्याच त्याच भूमिकांच्या चक्रात केवळ आर्थिक स्थैर्यासाठीही अडकताहेत. ते त्यांच्यासाठी चांगलंही ठरत असेल, पण सिनेमाचं अन कलेचं नुकसान आहेच. काय करणार..

  ReplyDelete
 23. सागर,
  अरे एका सिनेमाचं धड काही नाहीये अन दोन दोन शूटिंगं करून काय मिळालं रे. ते सेटचे लोचे त्यामुळे झालेले वाटत नाहीत. प्रचंड लॅक ऑफ प्लॅनिंग सरळसरळ दिसतं. नीट कशावरच काम केलेलं वाटत नाही. अति अन फाजील आत्मविश्वास हेच कारण असावं.
  तुझे खरंच इतके आवडते असतील, तर अवश्य बघ.. पण शक्यतो फुकटातच बघ.. :D

  ReplyDelete
 24. दीपक,
  हे अगदी खरं. गेल्या काही वर्षांपासून सचिनना कुठल्यातरी सिनेमावरून उचलेगिरी करण्याचा काय शौक चढलाय कळत नाही. 'ऐसी भी क्या जल्दी है' पासून अगदी 'आम्ही सातपुते' अन आता हा.
  किती उत्तमोत्तम कथावस्तू पडल्यात रे! :-s

  ReplyDelete
 25. अनघाताई,
  खरंच हल्लीत फारच झालं होतं... :-|

  ReplyDelete
 26. सागर कोकणे,
  खरंच. सचिननी आता त्यांच्या कोषातून बाहेर येऊन पाहायला हवंय..

  ReplyDelete
 27. सिद्धार्थ,
  खरंच, बनवाबनवी तीनदा पहा हवंतर.. पण हा कुणी फुकटातही दाखवला तरी पाहू नकोस..

  ReplyDelete
 28. विक्रम,
  अरे लई त्रास होतो राव.. इतकाही वाईट असेल अशी कल्पनाच केली नव्हती मी!

  ReplyDelete
 29. तन्वीताई,
  खरोखर अत्याचार होता. मी अन माझा मित्र तीस मार खान बघणार होतो. पण आयत्यावेळी मराठीप्रेम जागं झालं अन आम्ही अवलक्षण करून घेतलं. दोघेही कपाळाला हात लावून बसलो होतो. निर्णय दोघांचा होता, त्यामुळे एकमेकांना दोषही देऊ शकत नव्हतो :)
  ईशानला दाखव जुने सिनेमे, पण चुकूनही हा दाखवू नकोस..बिचार्‍याचा भ्रमनिरास होईल एकदम..
  आपण आपला आपल्या घरी त्रागा करायचा..सचिनपर्यंत थोडीच जाणार आहे आपला आवाज!

  ReplyDelete
 30. विनायकजी,
  वर्ल्ड प्रिमियर हल्ली खरंच कशाचेही करतात. बर्‍याचशा नटनट्यांच्या घसरणीमागे आर्थिक स्थैर्य लवकरात लवकर मिळवण्यासाठीचा प्रयत्नच दिसतो, मग त्यासाठी कलेचा दर्जा खालावला तरी चालेल. जास्तीत जास्त कामे मिळताहेत तोवर करून पोतडी भरायची.
  >>बरेच चित्रपट वसंत सबनीसांसारखे दिग्गज लिहित होते.
  हे मला ठाऊक नव्हतं..
  आता खरंच त्या सबकुछ चा अतिरेक झालाय...अन हल्लीतल्या इतर उत्तमोत्तम मराठी चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर असे चित्रपट निष्कारण उठून दिसतात.

  ReplyDelete
 31. खुप निराशाजनक

  ReplyDelete
 32. विभि..जुना सचिन नक्कीच चांगला होता..पण सध्या तो आवरा झाला आहे...महागुरु तर अशक्य आहे रे....सहनशक्तीच्या पलीकडे आहे.. हे पत्र त्यांच्या पर्यंत पोहचल पाहिजे रे..

  ReplyDelete
 33. आनंदराव,
  :(

  ReplyDelete
 34. योगेश,
  खरंच आवरा झालेलं आहे सगळं हल्ली... कसं पोचवावं पत्र ??

  ReplyDelete
 35. Anonymous2:36 AM

  agadi sadka chitrapat

  ReplyDelete
 36. Anonymous2:38 AM

  SACHIN TU ATA MHATARA JHALA AHES. GHARI SWASTHA BAS.
  EKAPEKSHA EK PROGRAMME TUJHA OWN PRODUCTION AND TUCH SWATA MAHA???GURU ????
  VA VA , SWATACHICH PATH THOPTUN GHE. KADHI PROGRAMME MADHYE BAYKOLA BOLAVUN APLICH TARIF . VA VA

  ReplyDelete
 37. Anonymous,
  भावना पोचल्या! :)

  ReplyDelete
 38. सचिनकाका मराठीतले देव आनंद ना होवोत. बाकी एकापेक्षा एकमधे कानाला लय चावतात. आस्था सारखे चॅनल एकहाती चालवू शकतिल सचिनकाका.

  ReplyDelete
 39. सौरभ,
  :D:D
  सचिनकाकांकडे तुझं सजेशन पोचवूया आपण!

  ReplyDelete
 40. कपाळावर चार केस पुढे ओढलेला सचिन पोस्टरमधे पाहिल्यावरच चित्रपटाचं भवितव्य कळलं होतं, त्यामुळे या चित्रपटाच्या वाटेच गेले नाही. तुझा लेख वाचल्यावर तर सी.डी. पण नाही विकत घेणार.

  ReplyDelete