Showing posts with label आठवणी. Show all posts
Showing posts with label आठवणी. Show all posts

6/28/2010

आठवणी

'आठवणी' ह्या शब्दाशी सहसा भल्याभल्यांच्या मनाचे कोपरे हळवे होतात आणि काहीकाहींच्या डोळ्यांचे कोपरे पाणावतात. आठवणी गोड असतात तशा कडू असतात, चांगल्या असतात तशा वाईट असतात, हसर्‍या असतात तश्याच मुसमुसणार्‍याही असतात, आनंदाचं निधान असतात तशा दुःखद विधानही असतात; एकंदर रॅंडम व्हेरिएबल असतात. तुम्ही आठवणी असं इनपुट दिलं, की आऊटपुट काय असेल त्याचा नेम नाही!

अनेकदा ह्या चित्रविचित्र आठवणी इतक्या अनप्रेडिक्टेबल असतात की, तुम्हाला कुठल्या सिच्युएशनमध्ये काय आठवण येईल, ह्याचा नेम नाही! माझं बरेचदा असं होतं. मी उभा असतो रेल्वे तिकिटांच्या लायनीत आणि शांत चित्ताने इकडे तिकडे बघत असतो, अशा वेळी मला सहजच शाळेची आठवण येते. आता काय संबंध. काहीतरी असेल, कदाचित आमच्या शाळेतल्या बर्‍याचश्या बाई ट्रेनने घरी जाण्याचा उल्लेख करत म्हणून असेल, किंवा अजून काही. मी स्वतः शाळेत असताना कधी लोकलच्या पुलाची पायरी चढलो नाही पण रेल्वेच्या लायनीत बरेचदा शाळेची आठवण येते. रेल्वेतून जाताना कॉलेजच्या आठवणी येतात. हे लॉजिकल आहे. कॉलेजच्या सोनेरी वर्षांमधल्या ऍक्च्युअल सोनेरी काळातला एक हिस्सा ट्रेनमध्ये मित्रांसोबत व्यतीत केलाय. इथे मिलानच्या बंदिस्त लिफ्टमध्ये एकटा असताना तर, शाळेत व्यवसायावर मिळालेल्या पहिल्या(आणि एकमेव) अपूर्ण शेर्‍यापासून ते स्वतःहून पहिल्यांदाच बनवलेल्या गोडाच्या शिर्‍यापर्यंत काहीही आठवतं. बरेचदा कुठल्याही पाळीव प्राण्याचा उल्लेख झाला, की आमच्या समोर राहणार्‍यांनी पाळलेल्या दोन वेगवेगळ्या कुत्र्यांच्या आठवणी जागृत होतात.

एके दिवशी सहज एका मित्राबरोबर नोकरी आणि भवितव्य असल्या गहन विषयावर चर्चा करत होतो आणि एकदम गाडी लग्नावर कशी आली कळलं नाही. तो मला एकदम त्याच्या अनेक सुखद(आणि आता दुःखद) अश्या आठवणी सांगायला लागल्या. तिला घरच्यांच्या विरोधामुळे कसं सोडलं, मग लग्नासाठी मुली कश्या पाहिल्या असल्या काय काय आठवणी तो सांगत बसला. आता बोला.

पण ह्या अनप्रेडिक्टेबिलिटीबरोबरच ह्या आठवणी बरेचदा समोरच्याची एक वेगळीच बाजू आपल्यासमोर आणतात. आठवणींच्या कल्लोळामध्ये माणूस एव्हढा हरवून जातो, की मग त्याने जगासाठी घातलेली सगळी कवचकुंडलं गळून पडतात, सगळे मुखवटे लुप्त होतात. त्याक्षणी तो माणूस फक्त तो माणूस असतो. ह्याचं प्रत्यंतर पुन्हा एकदा मला अगदी जवळून ह्या वेळच्या सुट्टीत आलं. मी माझ्या बाबांबरोबर नेहमीसारखाच सातार्‍यात फिरत होतो. फक्त फरक एव्हढाच होता की आमच्याकडे त्यादिवशी मोकळा वेळ होता. आम्ही दोघे नेहमीसारखेच बाबांच्या शाळेसमोरून चाललो होतो. बाबांची नज़र भिरभिरत होती. शाळेचं पटांगण, त्याच्याबाजूला असलेला सायकली लावायचा स्टँड, गेट, इमारत, इमारतीच्या बाहेरचा कठडा.

अचानक बाबा बोलायला लागले. "हे इथे आम्ही खेळायचो. ह्या इथे सायकली लावायचो. छ्या! स्टँडची पार वाट लागलीय. गेटही कोलमडलंय. इमारतीची पार रया गेलीय. इथनं आम्ही आत शिरायचो. आणि इथे ह्या कठड्यावर आम्ही दौती फोडायचो. तेव्हा रस्ता एव्हढा वर नव्हता."

"दौती फोडायचात? म्हणजे? कशासाठी?" मी.

बाबांच्या चेहर्‍यावरचे भाव त्याक्षणी अनमोल होते. "उगाच. काहीच कारण नाही. परीक्षा संपली की सगळेजण फोडायचे. आम्हीही फोडायचो." एक मिश्किल हसू होतं त्यांच्या चेहर्‍यावर. कदाचित त्याक्षणीही ते त्या वर न आलेल्या रस्त्यावर गुडघ्यांवर बसून त्या कठड्यावर दौती फोडत होते, चहूकडे काचा आणि शाईचा खच पडला होता; पण तो फक्त त्यांच्या नजरेला दिसत होता.

बाबा आणि माझं नातं बाप-लेकाच्यापेक्षाही पुढचं आहे. मित्रासारखंच. ते मला खूपदा खूप काही सांगतात, त्यांच्या बालपणाबद्दल, त्यांच्या एकंदर आयुष्याबद्दल. अगदी जेवतानाही सगळ्या कुटुंबगप्पांमध्येही. माझी आईसुद्धा तिचं लहानपण वगैरेंबद्दल सांगताना विलक्षण हळवी होते. कॉलेजातली प्रोफेसर असलेल्या माझ्या आईला तिच्या बालपणी चॉकलेटं आणि विविधरंगी रिबीनी कश्या आवडायच्या हे सांगते तेव्हा तिच्या चेहर्‍यावरचे भाव प्राईसलेस असतात. माझ्या बाबांची कवचकुंडलं उतरताना मी खूपदा पाहिलीत. जगासाठी टफ गाय असणारे माझे बाबा आठवणी सांगताना हळवे कसे होतात हे मी पाहिलंय. पण त्यादिवशी का कुणास ठाऊक, मी त्यांच्याशी आयडेंटिफाय केलं. कदाचित शाळा हा त्यांच्या आणि माझ्या बालपणातला कॉमन पॉईंट होता, 'लघुत्तम सामायिक विभाजक'. त्यादिवशी बाबा ज्या नजरेनं शाळेकडे बघत होते, कदाचित त्याच नजरेनं मीही आज पाहत असेन.

दोन दिवसांपूर्वी मी माझ्या जुन्या इमारतीमधल्या (जिथे मी जन्मापासून १४ वर्षांचा होईपर्यंत राहत होतो) माझ्या बालमित्राला भेटलो. त्यानेही १५ व्या वर्षी ती इमारत सोडली होती(बाबांच्या कंपनीची क्वार्टर होती ती). आम्ही दोघे हॉटेलात बसलो होतो. नोकरी, पुढचं शिक्षण, भविष्य आणि मुली असल्या तारूण्यसुलभ गप्पा झाल्यावर आम्ही आमच्या एकत्र घालवलेल्या लहानपणावर आलो. आमचा त्यादिवशी मिसिंग असलेला तिसरा भिडू, आम्ही लहानपणापासून केलेले विविध उद्योग, आमच्या इमारतीत आम्ही तीन १२ वर्षाच्या पोरांनी मिळून सुरू केलेली होळी पूजेच्या पाण्याने कशी विझली आणि मग डगमगून न जाता आम्ही पुढच्या वर्षी कशी अजून चांगली केली आणि आज १२ वर्षांनंतर कसा त्या होळीचा रोपट्याचा वटवृक्ष झालाय, कसे आम्ही पतंगांच्या मागे धावायचो आणि गाडीमागे धावणार्‍या कुत्र्याप्रमाणे कित्येक दिवस पकडलेल्या पतंगांच हिशोब ठेवण्यापलिकडे काहीच करत नसू, कसे गच्चीत क्रिकेट खेळायचो, कसे त्या सिमेंटच्या गच्चीत डाईव्ह मारून फिल्डिंग करायचो, छ्या! न जाणे काय काय बोलत बसलो. वेटर आमच्याकडे पाहत असतील कदाचित. आम्ही पार हरवून गेलो होतो. मला आत्ताही आठवतंय, विषय निघाला तेव्हा माझ्या हातांना सूक्ष्म कंप सुटला होता. आत्ताही तसंच वाटलं हे सगळं टंकताना.

बळेच निघालो. पुन्हा जिथे वाटा वेगळ्या होत होत्या, तिथे अर्धा तास गप्पा मारल्या. तो आता यूकेला निघालाय. न जाणे अजून दोनेक वर्षांत भेट तरी होईल की नाही. निघताना त्याला मिठी मारली. त्या दोन तासांत मी आयुष्याची कळायला लागल्यापासूनची महत्वाची वर्षं पुन्हा जगलो होतो. जड अंतःकरणानं रिक्षात बसलो. दुसर्‍या दिवशी रात्रीचं फ्लाईट होतं. मी शून्य नजरेनं बाहेर बघत होतो. रिक्षा माझ्या जुन्या इमारतीवरूनच जाते. रात्रीचे अकरा वाजत होते. ती इमारत जवळ येत होती. माझ्या अंगावर शहारा आला होता. धडधड थोडीशी वाढली होती. मी रिक्षातून वाकून वाकून पाहत होतो. ती इमारत आली. मी डोळे भरून ती संपूर्ण पाहिली.

आजच्या तारखेला त्या इमारतीत असंख्य बदल झालेत, पण त्याक्षणी माझ्यासमोर माझी जुनी इमारतच होती. तिच्या कानाकोपर्‍यात मी दोन सेकंदात मनातल्या मनात जाऊन आलो. तिच्या कुशीत खेळून आलो. जिन्यांवरून धडाधड उड्या मारत पतंग पकडायसाठी गच्चीपासून ग्राउंड फ्लोअरपर्यंतचे पाच मजले उतरून आलो. आईबाबांचं किंवा कुठल्याही मोठ्यांच लक्ष नाही पाहून जिन्याच्या कठड्यावरून पाचव्या मजल्यापासून खालपर्यंत घसरतही आलो. मग रिक्षा पुढे आली. माझी जाणीव गडद व्हायला लागली. माझं वय आता २५ आहे. मी नोकरी करतो. क्षणभर काहीतरी उणीव राहून गेल्यागत वाटलं.

म्हटलं ना मगाशी. सगळी कवचकुंडलं गळून पडतात त्याक्षणी! आठवणी!