6/28/2010

आठवणी

'आठवणी' ह्या शब्दाशी सहसा भल्याभल्यांच्या मनाचे कोपरे हळवे होतात आणि काहीकाहींच्या डोळ्यांचे कोपरे पाणावतात. आठवणी गोड असतात तशा कडू असतात, चांगल्या असतात तशा वाईट असतात, हसर्‍या असतात तश्याच मुसमुसणार्‍याही असतात, आनंदाचं निधान असतात तशा दुःखद विधानही असतात; एकंदर रॅंडम व्हेरिएबल असतात. तुम्ही आठवणी असं इनपुट दिलं, की आऊटपुट काय असेल त्याचा नेम नाही!

अनेकदा ह्या चित्रविचित्र आठवणी इतक्या अनप्रेडिक्टेबल असतात की, तुम्हाला कुठल्या सिच्युएशनमध्ये काय आठवण येईल, ह्याचा नेम नाही! माझं बरेचदा असं होतं. मी उभा असतो रेल्वे तिकिटांच्या लायनीत आणि शांत चित्ताने इकडे तिकडे बघत असतो, अशा वेळी मला सहजच शाळेची आठवण येते. आता काय संबंध. काहीतरी असेल, कदाचित आमच्या शाळेतल्या बर्‍याचश्या बाई ट्रेनने घरी जाण्याचा उल्लेख करत म्हणून असेल, किंवा अजून काही. मी स्वतः शाळेत असताना कधी लोकलच्या पुलाची पायरी चढलो नाही पण रेल्वेच्या लायनीत बरेचदा शाळेची आठवण येते. रेल्वेतून जाताना कॉलेजच्या आठवणी येतात. हे लॉजिकल आहे. कॉलेजच्या सोनेरी वर्षांमधल्या ऍक्च्युअल सोनेरी काळातला एक हिस्सा ट्रेनमध्ये मित्रांसोबत व्यतीत केलाय. इथे मिलानच्या बंदिस्त लिफ्टमध्ये एकटा असताना तर, शाळेत व्यवसायावर मिळालेल्या पहिल्या(आणि एकमेव) अपूर्ण शेर्‍यापासून ते स्वतःहून पहिल्यांदाच बनवलेल्या गोडाच्या शिर्‍यापर्यंत काहीही आठवतं. बरेचदा कुठल्याही पाळीव प्राण्याचा उल्लेख झाला, की आमच्या समोर राहणार्‍यांनी पाळलेल्या दोन वेगवेगळ्या कुत्र्यांच्या आठवणी जागृत होतात.

एके दिवशी सहज एका मित्राबरोबर नोकरी आणि भवितव्य असल्या गहन विषयावर चर्चा करत होतो आणि एकदम गाडी लग्नावर कशी आली कळलं नाही. तो मला एकदम त्याच्या अनेक सुखद(आणि आता दुःखद) अश्या आठवणी सांगायला लागल्या. तिला घरच्यांच्या विरोधामुळे कसं सोडलं, मग लग्नासाठी मुली कश्या पाहिल्या असल्या काय काय आठवणी तो सांगत बसला. आता बोला.

पण ह्या अनप्रेडिक्टेबिलिटीबरोबरच ह्या आठवणी बरेचदा समोरच्याची एक वेगळीच बाजू आपल्यासमोर आणतात. आठवणींच्या कल्लोळामध्ये माणूस एव्हढा हरवून जातो, की मग त्याने जगासाठी घातलेली सगळी कवचकुंडलं गळून पडतात, सगळे मुखवटे लुप्त होतात. त्याक्षणी तो माणूस फक्त तो माणूस असतो. ह्याचं प्रत्यंतर पुन्हा एकदा मला अगदी जवळून ह्या वेळच्या सुट्टीत आलं. मी माझ्या बाबांबरोबर नेहमीसारखाच सातार्‍यात फिरत होतो. फक्त फरक एव्हढाच होता की आमच्याकडे त्यादिवशी मोकळा वेळ होता. आम्ही दोघे नेहमीसारखेच बाबांच्या शाळेसमोरून चाललो होतो. बाबांची नज़र भिरभिरत होती. शाळेचं पटांगण, त्याच्याबाजूला असलेला सायकली लावायचा स्टँड, गेट, इमारत, इमारतीच्या बाहेरचा कठडा.

अचानक बाबा बोलायला लागले. "हे इथे आम्ही खेळायचो. ह्या इथे सायकली लावायचो. छ्या! स्टँडची पार वाट लागलीय. गेटही कोलमडलंय. इमारतीची पार रया गेलीय. इथनं आम्ही आत शिरायचो. आणि इथे ह्या कठड्यावर आम्ही दौती फोडायचो. तेव्हा रस्ता एव्हढा वर नव्हता."

"दौती फोडायचात? म्हणजे? कशासाठी?" मी.

बाबांच्या चेहर्‍यावरचे भाव त्याक्षणी अनमोल होते. "उगाच. काहीच कारण नाही. परीक्षा संपली की सगळेजण फोडायचे. आम्हीही फोडायचो." एक मिश्किल हसू होतं त्यांच्या चेहर्‍यावर. कदाचित त्याक्षणीही ते त्या वर न आलेल्या रस्त्यावर गुडघ्यांवर बसून त्या कठड्यावर दौती फोडत होते, चहूकडे काचा आणि शाईचा खच पडला होता; पण तो फक्त त्यांच्या नजरेला दिसत होता.

बाबा आणि माझं नातं बाप-लेकाच्यापेक्षाही पुढचं आहे. मित्रासारखंच. ते मला खूपदा खूप काही सांगतात, त्यांच्या बालपणाबद्दल, त्यांच्या एकंदर आयुष्याबद्दल. अगदी जेवतानाही सगळ्या कुटुंबगप्पांमध्येही. माझी आईसुद्धा तिचं लहानपण वगैरेंबद्दल सांगताना विलक्षण हळवी होते. कॉलेजातली प्रोफेसर असलेल्या माझ्या आईला तिच्या बालपणी चॉकलेटं आणि विविधरंगी रिबीनी कश्या आवडायच्या हे सांगते तेव्हा तिच्या चेहर्‍यावरचे भाव प्राईसलेस असतात. माझ्या बाबांची कवचकुंडलं उतरताना मी खूपदा पाहिलीत. जगासाठी टफ गाय असणारे माझे बाबा आठवणी सांगताना हळवे कसे होतात हे मी पाहिलंय. पण त्यादिवशी का कुणास ठाऊक, मी त्यांच्याशी आयडेंटिफाय केलं. कदाचित शाळा हा त्यांच्या आणि माझ्या बालपणातला कॉमन पॉईंट होता, 'लघुत्तम सामायिक विभाजक'. त्यादिवशी बाबा ज्या नजरेनं शाळेकडे बघत होते, कदाचित त्याच नजरेनं मीही आज पाहत असेन.

दोन दिवसांपूर्वी मी माझ्या जुन्या इमारतीमधल्या (जिथे मी जन्मापासून १४ वर्षांचा होईपर्यंत राहत होतो) माझ्या बालमित्राला भेटलो. त्यानेही १५ व्या वर्षी ती इमारत सोडली होती(बाबांच्या कंपनीची क्वार्टर होती ती). आम्ही दोघे हॉटेलात बसलो होतो. नोकरी, पुढचं शिक्षण, भविष्य आणि मुली असल्या तारूण्यसुलभ गप्पा झाल्यावर आम्ही आमच्या एकत्र घालवलेल्या लहानपणावर आलो. आमचा त्यादिवशी मिसिंग असलेला तिसरा भिडू, आम्ही लहानपणापासून केलेले विविध उद्योग, आमच्या इमारतीत आम्ही तीन १२ वर्षाच्या पोरांनी मिळून सुरू केलेली होळी पूजेच्या पाण्याने कशी विझली आणि मग डगमगून न जाता आम्ही पुढच्या वर्षी कशी अजून चांगली केली आणि आज १२ वर्षांनंतर कसा त्या होळीचा रोपट्याचा वटवृक्ष झालाय, कसे आम्ही पतंगांच्या मागे धावायचो आणि गाडीमागे धावणार्‍या कुत्र्याप्रमाणे कित्येक दिवस पकडलेल्या पतंगांच हिशोब ठेवण्यापलिकडे काहीच करत नसू, कसे गच्चीत क्रिकेट खेळायचो, कसे त्या सिमेंटच्या गच्चीत डाईव्ह मारून फिल्डिंग करायचो, छ्या! न जाणे काय काय बोलत बसलो. वेटर आमच्याकडे पाहत असतील कदाचित. आम्ही पार हरवून गेलो होतो. मला आत्ताही आठवतंय, विषय निघाला तेव्हा माझ्या हातांना सूक्ष्म कंप सुटला होता. आत्ताही तसंच वाटलं हे सगळं टंकताना.

बळेच निघालो. पुन्हा जिथे वाटा वेगळ्या होत होत्या, तिथे अर्धा तास गप्पा मारल्या. तो आता यूकेला निघालाय. न जाणे अजून दोनेक वर्षांत भेट तरी होईल की नाही. निघताना त्याला मिठी मारली. त्या दोन तासांत मी आयुष्याची कळायला लागल्यापासूनची महत्वाची वर्षं पुन्हा जगलो होतो. जड अंतःकरणानं रिक्षात बसलो. दुसर्‍या दिवशी रात्रीचं फ्लाईट होतं. मी शून्य नजरेनं बाहेर बघत होतो. रिक्षा माझ्या जुन्या इमारतीवरूनच जाते. रात्रीचे अकरा वाजत होते. ती इमारत जवळ येत होती. माझ्या अंगावर शहारा आला होता. धडधड थोडीशी वाढली होती. मी रिक्षातून वाकून वाकून पाहत होतो. ती इमारत आली. मी डोळे भरून ती संपूर्ण पाहिली.

आजच्या तारखेला त्या इमारतीत असंख्य बदल झालेत, पण त्याक्षणी माझ्यासमोर माझी जुनी इमारतच होती. तिच्या कानाकोपर्‍यात मी दोन सेकंदात मनातल्या मनात जाऊन आलो. तिच्या कुशीत खेळून आलो. जिन्यांवरून धडाधड उड्या मारत पतंग पकडायसाठी गच्चीपासून ग्राउंड फ्लोअरपर्यंतचे पाच मजले उतरून आलो. आईबाबांचं किंवा कुठल्याही मोठ्यांच लक्ष नाही पाहून जिन्याच्या कठड्यावरून पाचव्या मजल्यापासून खालपर्यंत घसरतही आलो. मग रिक्षा पुढे आली. माझी जाणीव गडद व्हायला लागली. माझं वय आता २५ आहे. मी नोकरी करतो. क्षणभर काहीतरी उणीव राहून गेल्यागत वाटलं.

म्हटलं ना मगाशी. सगळी कवचकुंडलं गळून पडतात त्याक्षणी! आठवणी!

35 comments:

 1. सुंदर लिहिलं आहेस. खुपच हळवी पोस्ट !!

  ReplyDelete
 2. विभि...खूप हळवी झाली आहे पोस्ट...मस्त लिहल आहेस रे.

  ReplyDelete
 3. बाबा कु ये अच्छा दिखता क्या? अरे तुमने वो कडक-फडक लिखना..पर चलो ये बी खूब!!

  ReplyDelete
 4. खुपच हळवे केलेस बघ....हे असे काही वाचले की मन इतके हळवे होते की काय सांगु????अप्रतिम .....

  ReplyDelete
 5. होय खरंय सगळ्यांचंच म्हणणं.. डोळे पाणावले.. बाबांशी तुमचे मैत्रीचे नाते असेच टिकुन असावे व अजुन अजुन असे काही ह्रदयस्पर्शी वाचायला मिळावे हीच इच्छा... बहुत खूब....

  ReplyDelete
 6. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 7. अप्रतिम बाबा... पण पोस्ट वाचुन मी चकीत झालो... खुप आवडली

  ReplyDelete
 8. बाबा समजतेय तुझे हळवे होणे, आणि नुकतेच काकांशी बोलणे झालेय तेव्हा तुमचे मैत्रीचे नाते उमजू शकते :) मस्तच झालीये पोस्ट ...सध्या मी पण या हळवे सदरात आहे. एकच म्हणेन माझे बंधुराज माझ्यासारखेच आहेत :)

  ReplyDelete
 9. म्हणतोस ते खरं आहे. त्याक्षणी सगळी कवचकुंडलं गळून पडतात. त्या उर्जैपुढे मनाचा सपशेल शरण जातं.अचानक शून्यातून येणाऱ्या आठवणींचा आवेग रोखणं फारच कमी जणांना जमतं.

  ReplyDelete
 10. खरच आठवणी ह्या अशाच असतात................

  ReplyDelete
 11. धन्यवाद हेरंब,
  काल काय झालं होतं काय ठाऊक!

  ReplyDelete
 12. धन्यवाद योगेश,
  असतो एकेक दिवस!

  ReplyDelete
 13. यशवंत,
  मी पोस्ट लिहायला सुरूवात केली तेव्हा असं काही लिहिनसं वाटलं नव्हतं..पण बोटं जसजशी चालत गेली..नियंत्रण राहिलं नाही!
  धन्यवाद!

  ReplyDelete
 14. माऊ,
  खूप खूप धन्यवाद! आई-वडिलांचं असं रूप अगदी कायमचं मनावर कोरलं जातं. त्या आठवणींना मनःपटलावर आणण्यासाठी छोटंसं कारणदेखील पुरतं मग!

  ReplyDelete
 15. संध्याताई,
  ब्लॉगवर स्वागत.
  आठवणी कश्याही असल्या तरी हळवंच करतात, हा शोध मला लेख संपता संपता लागला!
  खूप खूप धन्यवाद!

  ReplyDelete
 16. आनंदा,
  यशवंतला सांगितलं तसंच, अरे लिहायला सुरूवात केली तेव्हा काहीतरी स्वतःचीच खिल्ली वगैरे असा काहीसा विचार होता..पण जाते थे जापान, पहुंच गये चीन असं काहीसं झालं...
  बाकी धक्क्यातून सावरला असशीलच! ;)

  ReplyDelete
 17. तन्वीताई,
  काल जामच हरवून गेलो निघायच्या आधीच्या शेवटच्या दिवसामध्ये...त्या रात्री घरी पोचलो तेव्हा तो सातार्‍यातला प्रसंग आठवला होता...सगळी साखळी मग आपोआप पूर्ण झाली!
  >>एकच म्हणेन माझे बंधुराज माझ्यासारखेच आहेत
  :D

  ReplyDelete
 18. अरुंधतीताई,
  खूप आभार!

  ReplyDelete
 19. नॅकोबा,
  खरंच..तो आवेग रोखणारी माणसं विरळाच! धरणाचा बांध फोडून धबाधब वाहणार्‍या प्रवाहासारखीच पूरपरिस्थिती होते...
  तुझी पहिलीच कॉमेंट ना! कॉमेंटसाठी स्वागत!;)

  ReplyDelete
 20. सागर,
  ब्लॉगवर स्वागत!
  पाडगावकरांच्या ओळी थोड्या मोडीफाय करता येतील..
  तुमच्या आमच्या सेम असतात! :)
  प्रतिक्रियेसाठी आभार!

  ReplyDelete
 21. खरच रे... मी तर अश्या आठवनीवर लिखाण करू कि काय असे वाटते आहे ... छान लिहिले आहेस तू... माझ्यासुद्धा काही आठवणी नकळत जाग्या झाल्या.

  शेवटी वपू म्हणतात ना.. आठवणी ह्या वारूळामधल्या मुंग्यासारख्या असतात.. एक बाहेर पडली कि तिच्या मागून जश्या शेकडो-हजारो मुंग्या बाहेर पडतात तश्या आठवणी मागून आठवणी येतात... :)

  ReplyDelete
 22. Anonymous11:23 AM

  बाबा..मस्तच झाली आहे पोस्ट...बरयाच फ़टकेबाजीनंतर ही अशी हळवी पोस्ट भावली बुवा आपल्याला...मला तर कुठे कसली आठवण येइल हयाचा काही पत्ता नाही...

  ReplyDelete
 23. आठवणी बरेचदा समोरच्याची एक वेगळीच बाजू आपल्यासमोर आणतात. आठवणींच्या कल्लोळामध्ये माणूस एव्हढा हरवून जातो, की मग त्याने जगासाठी घातलेली सगळी कवचकुंडलं गळून पडतात, सगळे मुखवटे लुप्त होतात.

  well said !!!

  ReplyDelete
 24. Anonymous8:02 PM

  वाचता वाचता डोळ्यातले थेंब कधी पडले कळलच नाही. कागद असता हा, तर अजून पण सुकलेल्या थेंबाची निशाणी दिसली असती तुला..

  ReplyDelete
 25. छान झाली आहे पोस्ट.
  लिहीत रहा

  ReplyDelete
 26. बाबा बेष्ट एकदम..काही आठवणी दाटून आल्या बघ..खूप मस्त

  ReplyDelete
 27. रोहन,
  हो रे आठवणी उफाळून यायला अगदी नाममात्र कारणही पुरतं...
  >>आठवणी ह्या वारूळामधल्या मुंग्यासारख्या असतात.. एक बाहेर पडली कि तिच्या मागून जश्या शेकडो-हजारो मुंग्या बाहेर पडतात तश्या आठवणी मागून आठवणी येतात
  अगदी खरं! सोलह आने सच!
  धन्यवाद रे!

  ReplyDelete
 28. धन्यवाद देवेन,
  आठवणी कम्प्लिटली अनप्रेडिक्टेबल असतात हेच खरं!

  ReplyDelete
 29. अनामिक,
  खूप धन्यवाद भाई...!

  ReplyDelete
 30. अमृता,
  सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप आभार!

  ReplyDelete
 31. मीनल,
  ब्लॉगवर स्वागत(प्रतिक्रियेसाठी, तू आधी वाचत असावीस असा माझा कयास आहे)!
  खूप आभार!

  ReplyDelete
 32. सुहास,
  खूप आभार भाऊ! आठवणींना फक्त निमित्त लागतं..आज माझी पोस्ट ठरली हे वाचून बरं वाटलं!!:)

  ReplyDelete
 33. "लघुत्तम सामायिक विभाजक"
  cha vaapar aavadla...
  Haa nasel tar connect karu shakNaar nahi.

  ReplyDelete
 34. धन्यवाद सागरा,
  होय रे..तो महत्वाचा...:)

  ReplyDelete