Showing posts with label नीरा राडिया. Show all posts
Showing posts with label नीरा राडिया. Show all posts

12/05/2010

दूधखुळा

तुम्ही अझरूद्दीन दुर्दैवीरित्या धावबाद झाला म्हणून घरातच चीडचीड केलीत. भारत दक्षिण आफ्रिकेकडून वाईट पद्धतीनं हरल्यामुळे तुमचा अख्खा दिवस वाईट गेला. आणि दक्षिण आफ्रिकेची शेवटची विकेट पडायची वाट पाहत, लाईट गेलेत म्हणून तुम्ही रेडिओवर कानात प्राण आणून कॉमेंट्री ऐकताय आणि विकेटच पडत नाहीये म्हणून तुम्ही रडकुंडीला आलायत शेवटी ज्या क्षणी तुमच्या डोळ्यांतून अश्रू गालांवर ओघळतात, त्या क्षणीच एकदाचा पॉल ऍडम्स आऊट होतो आणि तुम्ही आनंदानं ओरडून आईनं तासाभरापूर्वी वाढून ठेवलेलं ताट एकदाचं समोर ओढता. आणि...

आणि ५-६ महिन्यांनी पेपरांमध्ये बातम्या येतात, अझरूद्दीन आणि दक्षिण आफ्रिकन कप्तानानं जवळपास प्रत्येक मॅच फिक्स केलेली होती.

तुमची प्रत्येक आरोळी, तुमचं हास्य, तुमचं दुःख, तुमची निराशा, तुमचा आवेग, तुमचं दुःख, तुमचे अश्रू, तुमची प्रत्येक भावना काय किंमतीची राहिली? ही भावना माझ्या चांगल्याच ओळखीची आहे. विश्वासघात झाल्याची, पण त्याहून जास्त बोचतं ते हे सत्य की तुम्हाला मूर्ख बनवलं गेलं. जगात सर्वांत वाईट दोन भावना असतात, एक म्हणजे तुमच्याशिवायसुद्धा तुमच्या भोवतालच्या प्रत्येक माणसाचं सगळं काही व्यवस्थित चालू शकतं ही आणि दुसरी म्हणजे तुमच्या नकळत तुमचा वापर करून घेतला गेल्याचं लक्षात येणं ही. पण सर्वांत वाईट सत्य हे आहे, की ह्या दोन्ही गोष्टी समजायला लागल्यापासून ते मरेपर्यंत वारंवार तुमच्याबरोबर होत राहतात, पण तरीदेखील त्यामुळे तुम्हाला लागणारी बोच कमी होत नाही. तुम्ही तितकाच त्रागा करून घेता किंवा मनातल्या मनात कुढत राहता.

ओके. आता आपण तुम्ही ऐवजी मी म्हणूया. कारण माझ्याबरोबर हे सगळं असंच्या असं झालेलं आहे. आणि कुठल्याही सामान्य भावनिक 'इमोशनल फूल' भारतीय माणसाप्रमाणे मी अनेकदा वापरला गेलोय. अगदी शाळकरी वयापासून ते 'सुजाण' मतदाता बनेपर्यंत, प्रत्येक पावलावर मी भावनेच्या भरात अनेक गोष्टी केल्यात आणि नंतर सत्य समजल्यावर मनातल्या मनात स्वतःला कोसलंय.

भारतीय क्रिकेट संघासाठी जीव टाकण्याच्या वेडापासून सुरूवात झाली ती पार राज ठाकरेंच्या 'माझी घुसमट होतेय' ला मनातून समर्थन देण्यापर्यंत मी भावनिक मूर्खपणा खूप केलाय. मी जरी मनातून भाजपबरोबरच होतो तरी राज ठाकरेंवर 'अन्याय' होतोय ही भावना माझ्यावर योग्य पद्धतीनं 'रोपित' झाली होती. पण सुदैवानं राहुल गांधीला केलेल्या शून्य विरोधापासून ते अशोक चव्हाणांच्या समर्थनापर्यंत अनेक गोष्टी माझ्या दुर्दैवानं संशयी आणि अतिचिकित्सक असलेल्या राजकीय मेंदूच्या लक्षात येत गेल्या आणि तीच भावना निर्माण होत गेली.

अटलबिहारींचं सरकार एका मतानं कोसळलेलं लाईव्ह टीव्हीवर पाहून अश्रू ढाळणारा मी आणि नंतर तेरा महिन्यांसाठी आणि त्यानंतर पूर्ण वेळासाठी सरकार विश्वासमत जिंकल्यावर आनंदित झालेला मी, अटलबिहारींचा वारस म्हणवणार्‍या प्रमोद महाजनांचे उंची लाईफस्टाईल आणि विविध भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले हात पाहून आणि सेंटॉर घोटाळ्यापासून ते शवपेट्या आणि बंगारू लक्ष्मणचे प्रताप पाहून मनातल्या मनात काय भोगत होतो ते मलाच ठाऊक आहे.

नीरा राडियाच्या टेप्स ऐकून आपलं सरकार आणि आपले मंत्री कुठल्या पद्धतीनं बनवले जातात हे उघडं सत्य पहिल्यांदाच प्रत्यक्ष नागडं झालं. आपल्याला बातम्या देणारी मंडळीच बातम्या बनवण्याच्या खेळामधले हीन दर्जाचे दलाल आहेत हीदेखील ऐकीव माहिती खरी असल्याचं समोर आलं. आणि माहित असलेल्याच गोष्टींवर शिक्कामोर्तब होतानाही एक कळ मात्र अजाणतेपणीच उठली. का? कशासाठी? सगळंच तर ठाऊक होतं. पण कदाचित मीच दूधखुळा ज्याला कुठेतरी माहित असलेलं सगळं अतिरंजित असेल अशी एक भाबडी आशा होती आणि कदाचित त्या आशेचाही गळा घोटला गेल्यावर मात्र वेदना अनावर झाली आणि कळ उठली.

लहानपणापासून संघाची शिस्त आणि राजकारण ह्यांचा मिलाफ म्हणून भाजपाकडे मी एका वेगळ्या नजरेनं पाहायचो. मी कधी संघाच्या शाखेत गेलो नाही, पण संघाची विचारसरणी मला बर्‍यापैकी ठाऊक आहे ती माझ्या संघचालक वडिलांमुळे. पण जेव्हा भाजपामध्ये चाललेली चिखलफेक पाहिली आणि अगदी आमच्या भागातले नगरसेवकापासून ते आमदारकीसाठीचे उमेदवार कसे पैसे देऊन उमेदवारी मिळवताहेत, हे माझ्या वडिलांच्याच तोंडून ऐकलं तेव्हा माझी झालेली चीडचीड मला अजून आठवते. पण त्याहून जास्त त्रास ह्या गोष्टीचा विचार करून झाला, की वर्षांनुवर्षं संघाची विचारसरणी अक्षरशः जगणार्‍या माझ्या बाबांसारख्या अनेकानेकांना ह्या सर्व गोष्टींचा किती त्रास होत असेल. आणि दुसर्‍या दिवशी सकाळीही उठून जेव्हा बाबा नेहमीप्रमाणे शाखेत निघाले तेव्हा मला काहीच समजेनासं झालं. ही माणसं कदाचित ह्या भावनेवर मात करायला शिकली आहेत.

एखादेवेळेस मी ही त्या वयाचा होईपर्यंत असाच होईन असंच मला वाटायचं. पण कदाचित तसं होणार नाही. कारण वारंवार फसवलं गेल्यानंतर माणसं एकतर सहन करायला शिकतात किंवा प्रत्येक गोष्टीवर संशय घेऊ लागतात. मी दुसर्‍या प्रकारात मोडणारा झालोय.

दोनेक महिन्यांपूर्वी विकिलीक्सच्या कार्यामुळे मी आनंदित झालो होतो आणि ते करत असलेल्या कार्यामध्ये मला क्रांतीची बीजं दिसत होती. मी अतिशय प्रभावित होऊन एक कौतुक करणारी आणि शुभेच्छा देणारी पोस्टही लिहिली होती. पण त्यानंतर घडत गेलेल्या घटनांनी मी द्विधा मनःस्थितीत पडलोय. अमेरिकेची काही गुपितं उघड करून विकिलीक्सनं अमेरिकेची जगहसाई तर व्यवस्थित केली. पंण...

पण थोडा नीट विचार केला तर काय दिसतं. व्हिडिओगेम्सप्रमाणे नागरिकांना हसत हसत मारणारे अमेरिकन सैनिक, हे काय जगाला ठाऊक नसलेलं सत्य होतं? अबू-ग़रेब च्या आठवणी विस्मृतीच्या गर्तेत गेल्या होत्या एव्हढंच, नाहीतर अमेरिकन कारनामे येन केन प्रकारेण लोकांसमोर येतच होते. त्यामुळे अमेरिकेचा बुरखा फाटला हे जरी सत्य आणि स्तुत्य असलं तरी त्यामुळे अमेरिकेला प्रत्यक्षात काहीच फरक पडला नाही. 'आमच्या युद्धनीती जगासमोर येतील आणि शत्रू प्रबळ होईल' अशी कोल्हेकुई अमेरिकेनं केली हे जरी सत्य असलं, तरी प्रत्यक्षात तसलं काहीच घडलंय असं कुठे वाचण्यात आलं नाही, कारण विकिलीक्स डॉक्युमेंट्स संपादित करून प्रकाशित करतंय. विकिलीक्सला मिळणार्‍या फुटलेल्या कागदपत्रांची 'संख्या', 'प्रमाण' आणि 'सातत्य' संशयाचं वलय निर्माण करतं. कारण एव्हढे महिने उलटूनही अमेरिकेला एकही गळका नळ बंद करता आलेला नाही हे अविश्वसनीय वाटतं (किंवा जरी त्यांनी जगहसाईच्या भीतीनं गुप्तपणे काही नळ बंद केले असले, तरीदेखील गळती एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर चालूच रहावी हे अविश्वसनीय वाटतं). आणि ज्युलिअन असाँजवर अद्यापही 'एस्पिओनेज ऍक्ट' लावण्यात अमेरिकन सरकार दिरंगाई का करतंय हा अनुत्तरित प्रश्न आहे. आणि ह्याच क्षणी थोडंसं सिंहावलोकन करता एक गंमतीशीर गोष्ट लक्षात आली. पहिली मोठी गळती प्रकाशित केल्या केल्या असाँजवर बलात्काराची केस टाकली गेली आणि चोवीस तासांत मागे घेतली गेली. ह्यावर माझ्यासकट सर्व भावनिक माणसांनी अमेरिकन बाळबोधपणाची खिल्ली उडवली. पण कदाचित तेच अमेरिकेला हवं होतं? अमेरिकेसारखी पाताळयंत्री शक्ति इतकी सरळसोट चूक करेल? पण कदाचित त्यांना आपल्या दूधखुळेपणावर प्रगाढ विश्वास असावा. आणि अजून एक म्हणजे (कदाचित सैतानी विधान वाटेल पण) असाँज अजून जिवंत किंवा पूर्णपणे धडधाकट कसा? त्याच्यावर अजून एकही हल्ला झाला नाही?

मी स्वतःचा माझे मुद्दे फिरवतोय का? असं मला वाटू लागलंय म्हणून थोडीशी ताजी निरीक्षणं अशी की नुकत्याच प्रकाशित 'डिप्लोमॅटिक केबल्स' चा परिणाम नीट अभ्यासल्यास पुढचे मुद्दे समोर येतात.

१. उत्तर कोरिया आणि चीनच्या संबंधांत संशय निर्माण होऊ शकतो.

२. इराण आणि मध्यपूर्वेच्या देशांच्या संबंधांत असुरक्षितता निर्माण होऊ शकते, जी इराणच्या वाईटासाठी आणि इस्रायलच्या पथ्यावर पडणारी आहे.

हे दोन्ही मुद्दे सरळसरळ अमेरिकेच्याच पथ्यावर पडणारे दिसतात. आता उत्तर कोरिया, चीन आणि इराण काही चांगली सरकारं आहेत अशातला भाग नाही, पण अमेरिकेच्या केबल्स रिलीज करून आम्ही अमेरिकेचा बुरखा फाडतोय असा जो आविर्भाव एकंदर आहे तो दिशाभूल करणारा आहे. अर्थात त्याच केबल्समधील काही ह्या अमेरिकन मित्रराष्ट्रांच्या नेत्यांची खिल्ली उडवणार्‍या देखील आहेत, पण अर्थात जर सगळाच बनाव असला तर असल्या गोष्टींची पूर्वकल्पना देता येऊ शकते आणि केली गेलेली विधानं ही उघड गुपितंच आहेत.

संशयी मन ह्या सगळ्यांचा असा निष्कर्ष काढतंय की अमेरिका विकिलीक्सला वापरतंय, स्वतःला दोन चापट्या मारून जगाची दिशाभूल करत शत्रूंना धोबीपछाड घालायचा प्रयत्न करतंय. पण कदाचित उलटही असेल, की रशिया किंवा चीन अमेरिकेला धोबीपछाड घालण्यासाठी स्वतःला चापट्या मारतंय. पण दोन्ही केसेसमध्ये दोन गोष्टी अनुत्तरित राहतात, एक म्हणजे एव्हढी कांडं करण्यासाठी लागणारा भरमसाठ पैसा विकिलीक्सकडे येतो कुठून आणि दुसरा म्हणजे आपण कुणावर विश्वास ठेवायचा? कारण दोन्ही केसेसमध्ये आपण मॅनिप्युलेटच केले जातोय. अर्थात लगेच विकिलीक्सवरचा माझा विश्वास उठलाय अशातला भाग नाही. पण जोवर खरंच अमेरिकेला किंवा कुठल्याही अनैतिक शक्तिला प्रत्यक्ष नुकसान पोचवणारं असं काही विकिलीक्स समोर आणत नाही तोवर संशयाला जागा राहतेच.

मग मात्र प्रचंड वैचारिक मंथन होतं आणि शेवटी मी निष्कर्ष काढतो की दूधखुळा राहण्यातच सोय आहे. विश्वासघात झाल्याचं कळेपर्यंत तरी आपण आनंदी असतो. आणि झाल्यावरदेखील काळासोबत आपण पुन्हा पूर्वीसारखेच दूधखुळे बनू शकतो. फुकाचं वैचारिक मंथन काय कामाचं राव!