12/05/2010

दूधखुळा

तुम्ही अझरूद्दीन दुर्दैवीरित्या धावबाद झाला म्हणून घरातच चीडचीड केलीत. भारत दक्षिण आफ्रिकेकडून वाईट पद्धतीनं हरल्यामुळे तुमचा अख्खा दिवस वाईट गेला. आणि दक्षिण आफ्रिकेची शेवटची विकेट पडायची वाट पाहत, लाईट गेलेत म्हणून तुम्ही रेडिओवर कानात प्राण आणून कॉमेंट्री ऐकताय आणि विकेटच पडत नाहीये म्हणून तुम्ही रडकुंडीला आलायत शेवटी ज्या क्षणी तुमच्या डोळ्यांतून अश्रू गालांवर ओघळतात, त्या क्षणीच एकदाचा पॉल ऍडम्स आऊट होतो आणि तुम्ही आनंदानं ओरडून आईनं तासाभरापूर्वी वाढून ठेवलेलं ताट एकदाचं समोर ओढता. आणि...

आणि ५-६ महिन्यांनी पेपरांमध्ये बातम्या येतात, अझरूद्दीन आणि दक्षिण आफ्रिकन कप्तानानं जवळपास प्रत्येक मॅच फिक्स केलेली होती.

तुमची प्रत्येक आरोळी, तुमचं हास्य, तुमचं दुःख, तुमची निराशा, तुमचा आवेग, तुमचं दुःख, तुमचे अश्रू, तुमची प्रत्येक भावना काय किंमतीची राहिली? ही भावना माझ्या चांगल्याच ओळखीची आहे. विश्वासघात झाल्याची, पण त्याहून जास्त बोचतं ते हे सत्य की तुम्हाला मूर्ख बनवलं गेलं. जगात सर्वांत वाईट दोन भावना असतात, एक म्हणजे तुमच्याशिवायसुद्धा तुमच्या भोवतालच्या प्रत्येक माणसाचं सगळं काही व्यवस्थित चालू शकतं ही आणि दुसरी म्हणजे तुमच्या नकळत तुमचा वापर करून घेतला गेल्याचं लक्षात येणं ही. पण सर्वांत वाईट सत्य हे आहे, की ह्या दोन्ही गोष्टी समजायला लागल्यापासून ते मरेपर्यंत वारंवार तुमच्याबरोबर होत राहतात, पण तरीदेखील त्यामुळे तुम्हाला लागणारी बोच कमी होत नाही. तुम्ही तितकाच त्रागा करून घेता किंवा मनातल्या मनात कुढत राहता.

ओके. आता आपण तुम्ही ऐवजी मी म्हणूया. कारण माझ्याबरोबर हे सगळं असंच्या असं झालेलं आहे. आणि कुठल्याही सामान्य भावनिक 'इमोशनल फूल' भारतीय माणसाप्रमाणे मी अनेकदा वापरला गेलोय. अगदी शाळकरी वयापासून ते 'सुजाण' मतदाता बनेपर्यंत, प्रत्येक पावलावर मी भावनेच्या भरात अनेक गोष्टी केल्यात आणि नंतर सत्य समजल्यावर मनातल्या मनात स्वतःला कोसलंय.

भारतीय क्रिकेट संघासाठी जीव टाकण्याच्या वेडापासून सुरूवात झाली ती पार राज ठाकरेंच्या 'माझी घुसमट होतेय' ला मनातून समर्थन देण्यापर्यंत मी भावनिक मूर्खपणा खूप केलाय. मी जरी मनातून भाजपबरोबरच होतो तरी राज ठाकरेंवर 'अन्याय' होतोय ही भावना माझ्यावर योग्य पद्धतीनं 'रोपित' झाली होती. पण सुदैवानं राहुल गांधीला केलेल्या शून्य विरोधापासून ते अशोक चव्हाणांच्या समर्थनापर्यंत अनेक गोष्टी माझ्या दुर्दैवानं संशयी आणि अतिचिकित्सक असलेल्या राजकीय मेंदूच्या लक्षात येत गेल्या आणि तीच भावना निर्माण होत गेली.

अटलबिहारींचं सरकार एका मतानं कोसळलेलं लाईव्ह टीव्हीवर पाहून अश्रू ढाळणारा मी आणि नंतर तेरा महिन्यांसाठी आणि त्यानंतर पूर्ण वेळासाठी सरकार विश्वासमत जिंकल्यावर आनंदित झालेला मी, अटलबिहारींचा वारस म्हणवणार्‍या प्रमोद महाजनांचे उंची लाईफस्टाईल आणि विविध भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले हात पाहून आणि सेंटॉर घोटाळ्यापासून ते शवपेट्या आणि बंगारू लक्ष्मणचे प्रताप पाहून मनातल्या मनात काय भोगत होतो ते मलाच ठाऊक आहे.

नीरा राडियाच्या टेप्स ऐकून आपलं सरकार आणि आपले मंत्री कुठल्या पद्धतीनं बनवले जातात हे उघडं सत्य पहिल्यांदाच प्रत्यक्ष नागडं झालं. आपल्याला बातम्या देणारी मंडळीच बातम्या बनवण्याच्या खेळामधले हीन दर्जाचे दलाल आहेत हीदेखील ऐकीव माहिती खरी असल्याचं समोर आलं. आणि माहित असलेल्याच गोष्टींवर शिक्कामोर्तब होतानाही एक कळ मात्र अजाणतेपणीच उठली. का? कशासाठी? सगळंच तर ठाऊक होतं. पण कदाचित मीच दूधखुळा ज्याला कुठेतरी माहित असलेलं सगळं अतिरंजित असेल अशी एक भाबडी आशा होती आणि कदाचित त्या आशेचाही गळा घोटला गेल्यावर मात्र वेदना अनावर झाली आणि कळ उठली.

लहानपणापासून संघाची शिस्त आणि राजकारण ह्यांचा मिलाफ म्हणून भाजपाकडे मी एका वेगळ्या नजरेनं पाहायचो. मी कधी संघाच्या शाखेत गेलो नाही, पण संघाची विचारसरणी मला बर्‍यापैकी ठाऊक आहे ती माझ्या संघचालक वडिलांमुळे. पण जेव्हा भाजपामध्ये चाललेली चिखलफेक पाहिली आणि अगदी आमच्या भागातले नगरसेवकापासून ते आमदारकीसाठीचे उमेदवार कसे पैसे देऊन उमेदवारी मिळवताहेत, हे माझ्या वडिलांच्याच तोंडून ऐकलं तेव्हा माझी झालेली चीडचीड मला अजून आठवते. पण त्याहून जास्त त्रास ह्या गोष्टीचा विचार करून झाला, की वर्षांनुवर्षं संघाची विचारसरणी अक्षरशः जगणार्‍या माझ्या बाबांसारख्या अनेकानेकांना ह्या सर्व गोष्टींचा किती त्रास होत असेल. आणि दुसर्‍या दिवशी सकाळीही उठून जेव्हा बाबा नेहमीप्रमाणे शाखेत निघाले तेव्हा मला काहीच समजेनासं झालं. ही माणसं कदाचित ह्या भावनेवर मात करायला शिकली आहेत.

एखादेवेळेस मी ही त्या वयाचा होईपर्यंत असाच होईन असंच मला वाटायचं. पण कदाचित तसं होणार नाही. कारण वारंवार फसवलं गेल्यानंतर माणसं एकतर सहन करायला शिकतात किंवा प्रत्येक गोष्टीवर संशय घेऊ लागतात. मी दुसर्‍या प्रकारात मोडणारा झालोय.

दोनेक महिन्यांपूर्वी विकिलीक्सच्या कार्यामुळे मी आनंदित झालो होतो आणि ते करत असलेल्या कार्यामध्ये मला क्रांतीची बीजं दिसत होती. मी अतिशय प्रभावित होऊन एक कौतुक करणारी आणि शुभेच्छा देणारी पोस्टही लिहिली होती. पण त्यानंतर घडत गेलेल्या घटनांनी मी द्विधा मनःस्थितीत पडलोय. अमेरिकेची काही गुपितं उघड करून विकिलीक्सनं अमेरिकेची जगहसाई तर व्यवस्थित केली. पंण...

पण थोडा नीट विचार केला तर काय दिसतं. व्हिडिओगेम्सप्रमाणे नागरिकांना हसत हसत मारणारे अमेरिकन सैनिक, हे काय जगाला ठाऊक नसलेलं सत्य होतं? अबू-ग़रेब च्या आठवणी विस्मृतीच्या गर्तेत गेल्या होत्या एव्हढंच, नाहीतर अमेरिकन कारनामे येन केन प्रकारेण लोकांसमोर येतच होते. त्यामुळे अमेरिकेचा बुरखा फाटला हे जरी सत्य आणि स्तुत्य असलं तरी त्यामुळे अमेरिकेला प्रत्यक्षात काहीच फरक पडला नाही. 'आमच्या युद्धनीती जगासमोर येतील आणि शत्रू प्रबळ होईल' अशी कोल्हेकुई अमेरिकेनं केली हे जरी सत्य असलं, तरी प्रत्यक्षात तसलं काहीच घडलंय असं कुठे वाचण्यात आलं नाही, कारण विकिलीक्स डॉक्युमेंट्स संपादित करून प्रकाशित करतंय. विकिलीक्सला मिळणार्‍या फुटलेल्या कागदपत्रांची 'संख्या', 'प्रमाण' आणि 'सातत्य' संशयाचं वलय निर्माण करतं. कारण एव्हढे महिने उलटूनही अमेरिकेला एकही गळका नळ बंद करता आलेला नाही हे अविश्वसनीय वाटतं (किंवा जरी त्यांनी जगहसाईच्या भीतीनं गुप्तपणे काही नळ बंद केले असले, तरीदेखील गळती एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर चालूच रहावी हे अविश्वसनीय वाटतं). आणि ज्युलिअन असाँजवर अद्यापही 'एस्पिओनेज ऍक्ट' लावण्यात अमेरिकन सरकार दिरंगाई का करतंय हा अनुत्तरित प्रश्न आहे. आणि ह्याच क्षणी थोडंसं सिंहावलोकन करता एक गंमतीशीर गोष्ट लक्षात आली. पहिली मोठी गळती प्रकाशित केल्या केल्या असाँजवर बलात्काराची केस टाकली गेली आणि चोवीस तासांत मागे घेतली गेली. ह्यावर माझ्यासकट सर्व भावनिक माणसांनी अमेरिकन बाळबोधपणाची खिल्ली उडवली. पण कदाचित तेच अमेरिकेला हवं होतं? अमेरिकेसारखी पाताळयंत्री शक्ति इतकी सरळसोट चूक करेल? पण कदाचित त्यांना आपल्या दूधखुळेपणावर प्रगाढ विश्वास असावा. आणि अजून एक म्हणजे (कदाचित सैतानी विधान वाटेल पण) असाँज अजून जिवंत किंवा पूर्णपणे धडधाकट कसा? त्याच्यावर अजून एकही हल्ला झाला नाही?

मी स्वतःचा माझे मुद्दे फिरवतोय का? असं मला वाटू लागलंय म्हणून थोडीशी ताजी निरीक्षणं अशी की नुकत्याच प्रकाशित 'डिप्लोमॅटिक केबल्स' चा परिणाम नीट अभ्यासल्यास पुढचे मुद्दे समोर येतात.

१. उत्तर कोरिया आणि चीनच्या संबंधांत संशय निर्माण होऊ शकतो.

२. इराण आणि मध्यपूर्वेच्या देशांच्या संबंधांत असुरक्षितता निर्माण होऊ शकते, जी इराणच्या वाईटासाठी आणि इस्रायलच्या पथ्यावर पडणारी आहे.

हे दोन्ही मुद्दे सरळसरळ अमेरिकेच्याच पथ्यावर पडणारे दिसतात. आता उत्तर कोरिया, चीन आणि इराण काही चांगली सरकारं आहेत अशातला भाग नाही, पण अमेरिकेच्या केबल्स रिलीज करून आम्ही अमेरिकेचा बुरखा फाडतोय असा जो आविर्भाव एकंदर आहे तो दिशाभूल करणारा आहे. अर्थात त्याच केबल्समधील काही ह्या अमेरिकन मित्रराष्ट्रांच्या नेत्यांची खिल्ली उडवणार्‍या देखील आहेत, पण अर्थात जर सगळाच बनाव असला तर असल्या गोष्टींची पूर्वकल्पना देता येऊ शकते आणि केली गेलेली विधानं ही उघड गुपितंच आहेत.

संशयी मन ह्या सगळ्यांचा असा निष्कर्ष काढतंय की अमेरिका विकिलीक्सला वापरतंय, स्वतःला दोन चापट्या मारून जगाची दिशाभूल करत शत्रूंना धोबीपछाड घालायचा प्रयत्न करतंय. पण कदाचित उलटही असेल, की रशिया किंवा चीन अमेरिकेला धोबीपछाड घालण्यासाठी स्वतःला चापट्या मारतंय. पण दोन्ही केसेसमध्ये दोन गोष्टी अनुत्तरित राहतात, एक म्हणजे एव्हढी कांडं करण्यासाठी लागणारा भरमसाठ पैसा विकिलीक्सकडे येतो कुठून आणि दुसरा म्हणजे आपण कुणावर विश्वास ठेवायचा? कारण दोन्ही केसेसमध्ये आपण मॅनिप्युलेटच केले जातोय. अर्थात लगेच विकिलीक्सवरचा माझा विश्वास उठलाय अशातला भाग नाही. पण जोवर खरंच अमेरिकेला किंवा कुठल्याही अनैतिक शक्तिला प्रत्यक्ष नुकसान पोचवणारं असं काही विकिलीक्स समोर आणत नाही तोवर संशयाला जागा राहतेच.

मग मात्र प्रचंड वैचारिक मंथन होतं आणि शेवटी मी निष्कर्ष काढतो की दूधखुळा राहण्यातच सोय आहे. विश्वासघात झाल्याचं कळेपर्यंत तरी आपण आनंदी असतो. आणि झाल्यावरदेखील काळासोबत आपण पुन्हा पूर्वीसारखेच दूधखुळे बनू शकतो. फुकाचं वैचारिक मंथन काय कामाचं राव!

34 comments:

  1. विभि

    उत्तम लिहिलास .
    बाकी तू म्हणल्याप्रमाणे " एक म्हणजे तुमच्याशिवायसुद्धा तुमच्या भोवतालच्या प्रत्येक माणसाचं सगळं काही व्यवस्थित चालू शकतं ही आणि दुसरी म्हणजे तुमच्या नकळत तुमचा वापर करून घेतला गेल्याचं लक्षात येणं ही. " या विषयी न बोललेलंच बर

    बाकी या पोस्ट मुळे मला भूतकाळाचा परत विचार करायला भाग पडलास :(

    ReplyDelete
  2. मस्त लिहिलं आहे.

    ReplyDelete
  3. हम्म बाबा...काय बोलायचं सांग....आपण सामान्य माणूस म्हणजेच दुधखुळे असं म्हणायचं.....काय करू शकतो (किंवा खरच काहीच नाही) हे कळतं...आणि मग जास्तीत जास्त त्रास होतो रे.....तुझी पोस्ट छान झाली आहे.....

    ReplyDelete
  4. सत्यमेव जयते!

    ReplyDelete
  5. Anonymous8:14 PM

    विद्याधर याचसाठी वाचावा वाटतो तुझा ब्लॉग ... उत्तम निरिक्षण, अभ्यासपुर्ण परिक्षण आणि स्वत:च्याच मुद्द्यांवर स्वत:च पुन्हा केलेला विचार...

    >>>दुसर्‍या दिवशी सकाळीही उठून जेव्हा बाबा नेहमीप्रमाणे शाखेत निघाले तेव्हा मला काहीच समजेनासं झालं. ही माणसं कदाचित ह्या भावनेवर मात करायला शिकली आहेत.
    हे मान्य.. हेच आमच्याकडेही आहे!!!

    अश्या पोस्टा टाकतोस ना तेव्हा मला खरच कौतूक सांगावे वाटते तुझे...उत्तम पोस्ट... मुद्द्या मुद्द्याला सहमतीची मान डोलत होती माझी!!

    लगे रहो मेरे भाई!!!

    ReplyDelete
  6. अशा वेळी सारखे स्वत:ला प्रश्न विचारायची आणि कोणाकडून फारशी अपेक्षा न ठेवण्याची सवय उपयोगी पडते.. पण त्याला काही 'पावसाळे' जावे लागतात :-)

    ReplyDelete
  7. निराशा येते हा विचार केला तर आणि विचार टाळणं हे काही बरोबर नाही. अपेक्षा न ठेवणे हा उपाय होऊ शकेल असे मला नाही वाटत. कारण हा काही घरेलू मामला नव्हे. नवरा/बायकोकडून काही अपेक्षाच नाही ठेवली कि सगळी गणित सोप्पी. ह्यात देशाचे/पृथ्वीचे भवितव्य ओवलेले असते...मग उपाय? कोण जाणे! पोस्ट चांगलीच आहे.

    ReplyDelete
  8. अपेक्षा न ठेवण चांगल, पदरी निराशा येण्यापेक्षा बरे, या गोष्टीवर विचार कोणीच जास्त करू नये ,यावर काहीच उपाय नाही,उत्तम, छान निरीक्षण , मस्त, चांगला ,आवडला,

    ReplyDelete
  9. अप्रतिम लेख !! सगळे ओळखीचे मुद्दे असलेला पण तरीही अतिशय अभ्यासपूर्ण !!

    मला वाटतं याच्यावरचा एक उपाय भगवंतांनी सांगितलाय गीतेत.. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन.. आपण फसवले गेलोय, जातोय हे माहित असतं पण त्यामुळे हात पाय गाळून तर बसणं शक्य नाही ना !! त्यामुळे आपण आपलं काम करत रहायचं.. बस्स !!!

    (फार जड वाटेल प्रतिसाद.. पण..)

    ReplyDelete
  10. सागर,
    अरे बरेचदा असं होतं की आपल्याला गत घटनांचा पुन्हा एकदा आढावा घ्यावासा वाटतो..पुढे काही निर्णय घेणं सोपं जातं मग! :)

    ReplyDelete
  11. संकेत,
    धन्यवाद भाऊ!

    ReplyDelete
  12. अपर्णा,
    कधीकधी एकदम हतबल झाल्यागत वाटतं, त्याच मनःस्थितीत लिहिलेली ही पोस्ट!
    आभार! :)

    ReplyDelete
  13. ओंकार,
    दुर्दैवानं ह्याच विधानाची सत्यासत्यता तपासण्याची वेळ आलेली आहे! :(

    ReplyDelete
  14. तन्वीताई,
    अगं बर्‍याचदा बर्‍याच गोष्टी डोक्यामध्ये गोंधळ माजवतात. विरोधाभासी विचार मनात उठत राहतात, मग सगळं लिहून काढलं की सगळ्या गोष्टींचा थोडा वस्तुनिष्ठ विचार करता येतो :)
    बाकी अगं मागच्या पिढीचाही झालेला भ्रमनिरास पाहून खूप वाईट वाटतं. :(

    ReplyDelete
  15. सविताताई,
    बहुतेक तसंच असावं... अजून काही पावसाळे गेले की कदाचित विचारांना 'पक्वता' येईल. :)

    ReplyDelete
  16. अनघा,
    सारखे विचार एकमेकांनाच उलटं पाडत राहतात. कुठेतरी थांबून नव्यानं विचार करावा लागतो अशा वेळी. :)

    ReplyDelete
  17. महेशकाका,
    खरंच कधीकधी असाच भ्रमनिरास होतो आणि दिशाहीन, हतबल झाल्यासारखं वाटतं! :(

    ReplyDelete
  18. हेरंबा,
    अगदी तोच विचार मनात आला होता.
    गीतेमध्येतर मला वाटतं मनुष्यप्राण्याच्या जवळपास सर्व समस्यांवरचे तोडगे आहेत! फक्त ते पाहण्याची नजर हवी! :)

    ReplyDelete
  19. छान लिहिला आहेस पण काही आक्षेप आहेत काही मुद्द्यांबद्दल..
    १)ज्युलिअन असाँज ला अजूनही बलात्काराच्या केस मधून मुक्त केला नाही नाहीये.
    २)'एस्पिओनेज ऍक्ट खूप complicated आहे. त्यात अमेरिकेला असे सिद्द्ध करावे लागेल की ह्या लिक मुले अमेरिकेचा धोक्यात येत आहे आणि पुष्कळ वेळा अमेरिकन Government केसेस हरली आहेत. हा कायदा पहिल्या विश्व युद्धाच्या वेळेस आला , परंतु तो फ्रीडम ऑफ स्पीच च्या विरुद्ध येतो . जरी कागदपत्रे Confedential असली तरी जर असा सिद्ध करता आला नाही की त्याने देशाचं नुकसान होतंय तर हा law लावता येणार नाही.
    ३) विकीलिक वाल्यांचा हा प्लान बघ
    Insurance file

    On 29 July 2010 WikiLeaks added a 1.4 GB "Insurance File" to the Afghan War Diary page. The file is AES encrypted and has been speculated to serve as insurance in case the WikiLeaks website or its spokesman Julian Assange are incapacitated, upon which the passphrase could be published, similar to the concept of a dead man's switch.[89][90] Following the first few days' release of the United States diplomatic cables starting 28 November 2010, the US television broadcaster CBS predicted that "If anything happens to Assange or the website, a key will go out to unlock the files. There would then be no way to stop the information from spreading like wildfire because so many people already have copies."
    (सौजन्य : विकिपीडिया )

    कदाचित हा सगळा CIA चा खेळ असेलही.पण मला शक्यता कमी वाटते.

    ReplyDelete
  20. उत्तम लेख.. आजकाल नाण्यांना दोन पेक्षा अधिकही बाजू असू शकतात का रे ?

    ReplyDelete
  21. स्मित,
    १. त्याच्यावरची बलात्काराची केस ड्रॉप केली होती, आता फक्त लैंगिक शोषण किंवा असभ्य लैंगिक वर्तन अशा नावाखाली काहीतरी चालू आहे.
    २. 'एस्पिओनेज ऍक्ट' कॉम्प्लिकेटेड असेल ह्यात शंका नाहीच, पण ज्या प्रमाणात अमेरिका कांगावा करतेय, ते पाहता आत्तापर्यंत पळवाट काढता आली असती बहुतेक. बाय द वे, काल इंग्लंडात ऍरेस्ट वॉरंट निघालंय असाँजविरूद्ध. :)
    ३. आजच मीदेखील ह्या इन्श्युरन्स फाईलबद्दल वाचलं. उत्तम कल्पना आहे.
    आणि मला स्वतःलादेखील हा CIA चा बनाव असू नये असं वाटतं. पण हल्ली कशावरच विश्वास ठेवावासा वाटत नाही. तरी काही काही गोष्टी डेव्हलप होताहेत विकिलीक्सबाबत, त्यांवर नजर ठेवावी लागेल.
    धन्यवाद रे भाऊ! :)

    ReplyDelete
  22. आनंद,
    खरंच तिसरीच काय अनेक बाजू असाव्या असा संशय येऊ लागलाय खरा! :)

    ReplyDelete
  23. Anonymous7:11 AM

    खूप दिवसांनी दुधखुळा शब्द ऐकला, शब्द न शब्द पटला. अरे मी तर नेहमीच दुधखुळी ठरते. एखाद्या मैत्रिणीला बर नाही म्हणून प्रेमाने घासातला घास घेऊन तिच्या साठी घेऊन जावा तर तीच सकाळी नेट वर हजर असलेली पाहते , मी मात्र दुधखुळी तिला अजून बर नाही म्हणून दुपारचा स्वैपाक तिच्या साठी मन लावून करत असते. कोणाला आपलं मानावं हेच कळेनास झाल. खूप वाईट वाटत. आपण मात्र काहीच झाल नाही अस समजून पुन्हा पुन्हा खूळ व्हायचं...... म्हणून हस केल कि मला माझा न्यूटन आवडतो.

    ReplyDelete
  24. फार चांगला लेख आहे. वर लिहिलेली सर्व प्रकरणे स्वतंत्रपणे माहित होती. मात्र ती अशी एकत्र वाचल्यावर डोके गरगरले. काय खरे आणि काय खोटे? कसे समजेल?

    ReplyDelete
  25. विद्याधर,
    एकदम छान नोंद. माझं एक निरीक्षण आहेः-बातमी देणे आणि बातमी ग्रहण करणे हा आता एकूण मनोरंजनाचाच भाग झाला आहे.
    असांजेने भलेही कागदपत्रे उघड करून मोठी खळबळ उडविली असेल, पण काही माहिती राखून ठेवणे हा जबाबदारीचा भाग आहे. या प्रकरणात अमेरिकेच्या माहितीमुळे कदाचित फार हाहाकार उडणार नाही, पण भारताची अशी कागदपत्रे उघड्यावर आली तर किती मोठा अनर्थ होऊ शकतो. काल वाराणसीत झालेल्या स्फोटाचे उदाहरण ताजेच आहे. खूप माहिती दडवून ठेवल्यानंतर ही अवस्था आहे. सगळीच माहिती उघड झाली, तर काय होईल. त्यामुळे असांजेबद्दल सहानुभूती व्यक्त केली, तरी त्याच्या कृत्याचे समर्थन करता येणार नाही.

    ReplyDelete
  26. विभि खुप माहितीपुर्ण लेख झालाय...

    >>" एक म्हणजे तुमच्याशिवायसुद्धा तुमच्या भोवतालच्या प्रत्येक माणसाचं सगळं काही व्यवस्थित चालू शकतं ही आणि दुसरी म्हणजे तुमच्या नकळत तुमचा वापर करून घेतला गेल्याचं लक्षात येणं ही. "

    हे अगदी पटेश..

    ReplyDelete
  27. अनुजाताई,
    बरेचदा होतं आपल्याबरोबर असं...:(
    धन्यवाद गं!!!

    ReplyDelete
  28. अपूर्व,
    आपल्याला अशा गोंधळलेल्या स्थितीत ठेवणंच मोठ्या शक्तिंच्या हिताचं आहे...
    आपला चक्रव्यूह आपल्यालाच भेदावा लागणार!! :-|

    ReplyDelete
  29. देविदासजी,
    तुमचं म्हणणं मला पटतं...बरेचदा बर्‍याच सीमारेषा धूसर असतात आणि त्यांचा प्रत्येकजण सोयीस्कर अर्थ काढत राहतो. :)
    धन्यवाद!!

    ReplyDelete
  30. योगेश,
    मंडळ आभारी आहे! :D

    ReplyDelete
  31. मी ४ वर्षे संघाच्या शाखेत जायचो.. त्या नंतर २ वर्ष अभाविप मध्ये होतो.. वापरले गेल्याचे कळल्यावर १२ वी नंतर सर्व सोडले.

    शेवटी जुने लोक उगाच म्हणून नाही गेले.. 'अज्ञानात सुख असते...'

    ReplyDelete
  32. Anonymous4:04 AM

    खर आहे रे बाबा,खूप वेळा भावनेच्या भरात आपल्या नकळत आपण असे वापरले जातो...त्यापेक्षा हे दुधखुळा बनून राहण्याचे तंत्रच अवगत करून घ्यायला हवे.... उत्तम पोस्ट !!

    ReplyDelete
  33. रोहन,
    :( कधी कधी असंच होतं खरं!!
    अज्ञानात सुख असतं हे सत्य!

    ReplyDelete
  34. देवेंद्र,
    :) पर्याय नाही दुसरा!

    ReplyDelete