तीन वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा युरोपात आलो. तीन महिन्यांसाठीच फक्त आलो होतो. नोकरीला लागून वर्षही झालं नव्हतं. अजून कॉलेजचा मोड बदलला नव्हता. जग पहिल्यांदाच सुरक्षित परिघाबाहेर पडून बघत असेन. येतानाच घरी एक वेबकॅम लावून आलो होतो. याहू मेसेंजर इन्स्टॉल केला होता. आई-बाबांना कसं चालवायचं, ह्याचं प्राथमिक प्रशिक्षण देऊन आलो होतो. समस्या एकच होती - माझ्याकडे लॅपटॉप नव्हता.
मी इथे आल्यावर इथल्या जुन्या-जाणत्या लोकांना काय प्रश्न विचारला असेल, तर हा की इथे जवळपास सायबर कॅफे कुठे आहे? तेव्हा इथे आश्चर्यकारकरित्या कुणीच घरी व्हिडिओचॅट वगैरेच्या फंदात पडत नव्हते. त्यातून त्यावेळेस इथे सगळी सिनियर मंडळी होती, ज्यांना इंटरनेट वगैरे प्रकार नेट बॅकिंग व्यतिरिक्त फारसे अवगत नव्हते. पुन्हा, तेव्हा आमच्या रेसिडन्समध्ये इंटरनेट सहजगत्या उपलब्धही नव्हतं आणि एकंदरच मिलानमध्ये 'इंटरनेट की' ह्या प्रकरणाचा फारसा प्रसार झालेला नव्हता. कदाचित अतिशयोक्ति वाटेल, पण भर युरोपात मला आफ्रिकेत आल्यागत वाटत होतं, हे सत्य आहे. त्याचं कारण मला नंतर कळलं ते असं, की लँडलाईन फोनवर इंटरनेट सहजगत्या उपलब्ध होतं, पण आम्ही सर्व्हिस अपार्टमेंट्समध्ये असल्याने लँडलाईन आमच्या मालकीचे नव्हते. असो. तर मुद्दा हा की माझा सायबर कॅफेचा शोध सुरू होता. आणि अपघातानेच एक दिवस, आमच्यातल्याच एका तरूण मुलाशी बोलता बोलता पत्ता लागला. तो ही घरी चॅट करण्यासाठी नाही, तर जवळपासच्या जागांची माहिती काढण्यासाठी एकदा दोनदा जाऊन आला होता. अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेव्हा आमच्या ऑफिसात ज्युनियर एम्लॉईजना इंटरनेटची सुविधा नव्हती. तर मी ही सो-कॉल्ड बांगलादेशीची कॅफे शोधत निघालो एकटाच.
एकदाचं सांगितलेल्या खाणाखुणांनुसार दुकान सापडलं. ते एक आयएसडी फोन सेंटर कम सायबर कॅफे होतं. दुकानात शिरलो आणि मोठा ऊर्दू बोर्ड नजरेला पडला. दोन आशियाई माणसं काऊंटरपलिकडे बसलेली होती. मी जाऊन सरळ हिंदीत चालू झालो. दोन-चार फेर्यांमध्ये ती कॅफे एका पाक कुटुंबाच्या मालकीची असल्याचं ध्यानात आलं आणि त्यातल्या दोघाजणांशी अगदी चांगल्या गप्पा होऊ लागल्या. त्यांच्या कुटुंबातला प्रत्येक जण काय करतो ह्याची इत्थंभूत माहिती मला झाली. त्यांच्यातल्या दोन वर्षांच्या मुलीच्या नावावरून ठेवलेलं कॅफेचं नाव, त्यांची मूळ गावं असं बरंच. एक दिवस त्यांच्यातल्या एक मोठा भाऊ स्पेशली मला भेटायला आला आणि गप्पा मारून गेला. ते चक्क आपल्याकडचे म्हणून भारतीयांना मूळच्या अव्वाच्या सव्वा किमतीत सूटही द्यायचे. माझ्या पाक लोकांच्या जवळिकीबद्दल मला बरेच जण ऐकवायचे, समजावायचे. मलाही धोके कळत होते, पण वळत नव्हते. तारा जुळल्या होत्या.
त्यानंतर मी भारतात परतलो आणि पाच सहा महिन्यांनी लांब पल्ल्यासाठी इथे परत आलो. ह्यावेळेस सोबत लॅपटॉप आणला होता. मध्यंतरीच्या काळात माझा त्यांच्यातल्या कुणाशीही संपर्क नव्हता. मी सहज ते दुकान अजून आहे का म्हणून पाहायला गेलो, तेव्हा त्यांनी एकदम बर्याच दिवसांनी भेटलेल्या मित्रासारखं स्वागत केलं. माझ्या रूमवरती नेटचा जुगाड होईस्तो मी तिथे जायचो, आणि जुगाड झाल्यावर तर नुसताच गप्पा ठोकायला जायचो. आठवड्यातून एक दिवस तासभर. त्यानंतर पहिल्याच थंडीत मी न्यूमोनियानं आठवडाभर आडवा पडलो आणि त्यांच्या दुकानावर गेलो नाही. तर तिथे गेलेल्या दुसर्या एका मुलाला त्यांनी माझ्याबद्दल विचारलं आणि मी आडवा आहे ऐकून माझ्या मोबाईलवर फोन केला. आपुलकीनं चौकशी केली आणि काहीही लागलं तर सांग म्हणून सांगितलं. बरेचदा, काहीच न करता, नुसत्या आपुलकीच्या चार शब्दांनीच आपल्याला बरं वाटतं. आता माझे १०० सहकारी इथे होते, ह्याची मदत मला कितीशी लागणार होती, पण त्यानं साफ मनानं सांगितलं, ते मला कळलं.
मग आई-बाबा इथे आले होते, तेव्हा बाबांना घेऊन मी खास दुकनावर गेलो. त्यांनी बाबांचं एखाद्या खास पाहुण्यासारखं स्वागत केलं. कॉफी मागवली आणि बर्याच गप्पा झाल्या, अगदी भारत-पाक राजकारणापासून सगळ्याच. तिथून निघताना बाबा मला म्हणाले, "खूप चांगली माणसं जोडलीयस तू!"
त्यानंतर माझे दोन मित्र दोन तीनदा माझ्या आग्रहावरून माझ्या घरी आले. बर्याचदा सहज भेट व्हायची. मग एक दिवस लॉसमध्ये चालतंय म्हणून आम्ही दुकान विकतोय म्हणून त्यांनी मला सांगितलं. आता भेटायचं कारण गेलं होतं, पण तरी ठरवून कुठेतरी भेटायचोच, महिन्याभरातून एकदा वगैरे. आणि मग २६ नोव्हेंबर,२००८ ला मी मुंबईत उतरलो, आणि त्याच क्षणी मुंबईवर हल्ला सुरू झाला होता. हल्ल्याच्या तारा पार इटलीतल्याच एका फोन सेंटरपर्यंत पोचल्या होत्या. हे ते फोन सेंटर नव्हतं, पण सगळेच जण संशयाच्या घेर्यात होते.
महिन्याभराने मी इथे परतलो. आता ह्यावेळी मात्र पाकिस्तानींशी बोलायचं नाही की उगा त्यांना शोधत जायचं नाही असं ठरवलं होतं. मन सारखं सांगत होतं, की 'अरे मित्र आहेत तुझे.' पण मेंदू समजावत होता, 'असा अडकशील की आयुष्यातून उठशील!' मी तब्बल १वर्ष त्यांच्याशी कुठलाही संपर्क केला नाही. ते राहायला माझ्याच भागात होते, पण नजरेस पडले नाहीत. रिसेशन मध्ये नोकर्या गेल्यात असे ते एकदा सांगत असल्याचं मला आठवत होतं. 'काय झालं असेल? ते ही इन्व्हॉल्व्ह्ड असतील का? की रिसेशनचे बळी?' हजारो प्रश्न पडत होते. पण मी भीतीचं ओझं वागवत होतो.
मी मधल्या काळात दोनदा सुट्टीवर जाऊन आलो. आणि ह्या फेब्रुवारीत, अचानकच घरासाठी मी बस स्थानकावर उभा असताना, त्यांच्यातल्या एकाला मी दिसलो. तो हर्षभरित होऊन माझ्याकडे आला आणि त्यानं मला मिठी मारली. मी एकदम बावरलो. आनंदित होतो, पण काय प्रतिक्रिया द्यावी हेच मला कळत नव्हतं.
"होतास कुठे तू?" तो.
"अरे मी मध्यंतरी काही महिने भारतात होतो." मी खोटं बोलण्याचा प्रयत्न करत होतो. मला प्रचंड गिल्टी फीलिंग येत होतं.
"अरे माझा नंबर नाहीये का तुझ्याकडे? तुझा नंबर तर लागतच नाही." तो.
माझा नंबर खरंच वर्षभरात रिचार्च न केल्याने एक्सपायर झाला होता. "अरे मेरा नंबर बदल गया है, और तुम्हारा मेरे इस मोबाईल में नही है!" मी उर्वरित लोणकढी मारली. आणि त्याच्यासमोर त्याचा नंबर फीड करायला लागलो, तर डिस्प्ले वर त्याच्या ऑलरेडी स्टोअर्ड नंबरचं सजेशन आलं. ते त्यानंही पाहिलं. मला तर आत्ता धरणी दुभंगून मला आत घेईल का असा सीतास्पद विचार आला. पण मग मी माझं लोणकढ्यांचं भांडार उघडलं.
"मेरे पास दो सेलफोन्स हैं। पहले यह था, फिर बीच में मैं दुसरा वाला लाया था, तो उसमें नंबर नहीं था।" मी प्रचंड असहाय झालो होतो. माझं काय चुकलं होतं, हेच मला कळत नव्हतं, पण मला खूप अपराधी वाटत होतं.
त्याला कितपत पचली थाप कुणास ठाऊक. पण तो माझ्याच एरियात यायला निघाला होता. त्यानं मध्यंतरात जागा बदलली होती, आणि जिथून आम्ही बस पकडली तिथेच त्यानं जागा घेतल्याचं तो मला मनापासून सांगत होता. दुसर्या मित्रानं आता बायकोला देशातून इथे आणल्याचं आणि तो जुन्याच जागी राहत असल्याचं त्यानं मला सांगितलं. आणि तो त्याच्या युक्रेनियन मैत्रिणीला भेटायला माझ्या एरियात येत असल्याने, दुसर्याला कल्पना नाहीये, तर आत्ता त्याला फोन करू नकोस असंही मला डोळे मिचकावत सांगितलं. मग माझ्या अपराधी आग्रहास्तव आणि त्यालाही त्याची मैत्रीण येईपर्यंत वेळ काढायचा असल्याने तो माझ्या घरी येईन बसला. गप्पाष्टक चालूच होतं. कसाबवरही चर्चा झाली. दोघंही थोडे सांभाळूनच बोलत होतो. मग त्याचे एक नव्याने इथे आलेले काका, बांग्ला वॉरच्या वेळी भारतात युद्धकैदी होते हे तो मला कौतुकानं सांगत होता. पुढच्या रविवारी तुला फोन करून स्टॉपवर बोलावेन आणि मग तुला तिथून माझ्या घरी घेऊन जाईन, मग आपण निवांत गप्पा करू आणि काय ना काय. मग त्याच्या मैत्रीणीचा फोन आला आणि तो गेला.
पुढच्या आठवड्यात काही त्याचा फोन आला नाही. त्याच्या पुढच्या आठवड्यात दुसरा मित्र मला बोलवायला आला आणि कॉफी शॉपमध्ये घेऊन गेला. त्याच्या बायकोचे वगैरे फोटो बघून झाले. गप्पा झाल्या आणि आम्ही अलविदा केला. नंतर ना मला कुणाचा फोन आला ना मी कुणाला फोन केला. कदाचित त्या पहिल्याला त्याच्या काकाने डोस पाजला असेल आणि दुसर्याला माझ्या चलबिचलीचा अंदाज़ आला असेल! कुणास ठाऊक.
पण मग सहा महिने उलटले आणि अचानक ह्या शनिवारी मी बस स्टॉपवर उभा असताना, बायको आणलेला मित्र दुसर्या बसमधून उतरला. त्याच्या चेहर्यावर ओळख होती पण आनंद नव्हता. आपली साडेतीन महिन्याची मुलगी दाखवताना तो फारसा उत्साही नव्हता. जबरदस्तीनं माझ्याशी बोलत होता. दुसरा, युक्रेनियन मैत्रीणवाला पाकिस्तानात सुट्टीवर गेल्याचं सांगत होता. मग बसमध्ये चढलो आणि मी दूरच बसणं पसंत केलं. कदाचित विश्वासात मीच कमी पडलो होतो, त्यामुळे आता मीच मागे हटत होतो. मला ठाऊक आहे, मी जे केलं होतं, ते प्राप्त परिस्थितीत योग्यच होतं. पण तरीही तो मैत्रीतला विश्वासघातच होता. आम्ही दोघेही एकमेकांच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हतो. तो माझ्या आधीच्या स्टॉपवर उतरतो. उतरताना मला म्हणाला, तुझा नंबर तोच आहे ना? मी कॉल करीन. तो कॉल करणार नाही, हे मला ठाऊक आहे आणि मी तर नाहीच नाही, हे त्याला! पण आम्ही दोघेही किती विचित्र परिस्थितीत अडकलो आहोत ह्याची एक भयाण जाणीव मला त्याक्षणी झाली.
हा जगाचा न्यायच आहे, मानवानं केलेली पापं, अखिल मानवजातीला अशी ना तशी फेडावीच लागतात. आम्ही पाकी अतिरेक्यांची आणि स्वार्थी, संधीसाधू राज्यकर्त्यांची पापं फेडतोय. आमच्या मैत्रीच्या खांद्यावर परस्पर अविश्वासाचं कधी ना कमी होणारं असं ओझं चढलंय. आणि त्या ओझ्याखाली आमचा मोकळेपणा आणि आमच्या मैत्रीतला ओलावा पार दबला गेलाय. हे ओझं कधी आणि कसं उतरणार?