9/02/2010

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे

तीन वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा युरोपात आलो. तीन महिन्यांसाठीच फक्त आलो होतो. नोकरीला लागून वर्षही झालं नव्हतं. अजून कॉलेजचा मोड बदलला नव्हता. जग पहिल्यांदाच सुरक्षित परिघाबाहेर पडून बघत असेन. येतानाच घरी एक वेबकॅम लावून आलो होतो. याहू मेसेंजर इन्स्टॉल केला होता. आई-बाबांना कसं चालवायचं, ह्याचं प्राथमिक प्रशिक्षण देऊन आलो होतो. समस्या एकच होती - माझ्याकडे लॅपटॉप नव्हता.

मी इथे आल्यावर इथल्या जुन्या-जाणत्या लोकांना काय प्रश्न विचारला असेल, तर हा की इथे जवळपास सायबर कॅफे कुठे आहे? तेव्हा इथे आश्चर्यकारकरित्या कुणीच घरी व्हिडिओचॅट वगैरेच्या फंदात पडत नव्हते. त्यातून त्यावेळेस इथे सगळी सिनियर मंडळी होती, ज्यांना इंटरनेट वगैरे प्रकार नेट बॅकिंग व्यतिरिक्त फारसे अवगत नव्हते. पुन्हा, तेव्हा आमच्या रेसिडन्समध्ये इंटरनेट सहजगत्या उपलब्धही नव्हतं आणि एकंदरच मिलानमध्ये 'इंटरनेट की' ह्या प्रकरणाचा फारसा प्रसार झालेला नव्हता. कदाचित अतिशयोक्ति वाटेल, पण भर युरोपात मला आफ्रिकेत आल्यागत वाटत होतं, हे सत्य आहे. त्याचं कारण मला नंतर कळलं ते असं, की लँडलाईन फोनवर इंटरनेट सहजगत्या उपलब्ध होतं, पण आम्ही सर्व्हिस अपार्टमेंट्समध्ये असल्याने लँडलाईन आमच्या मालकीचे नव्हते. असो. तर मुद्दा हा की माझा सायबर कॅफेचा शोध सुरू होता. आणि अपघातानेच एक दिवस, आमच्यातल्याच एका तरूण मुलाशी बोलता बोलता पत्ता लागला. तो ही घरी चॅट करण्यासाठी नाही, तर जवळपासच्या जागांची माहिती काढण्यासाठी एकदा दोनदा जाऊन आला होता. अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेव्हा आमच्या ऑफिसात ज्युनियर एम्लॉईजना इंटरनेटची सुविधा नव्हती. तर मी ही सो-कॉल्ड बांगलादेशीची कॅफे शोधत निघालो एकटाच.

एकदाचं सांगितलेल्या खाणाखुणांनुसार दुकान सापडलं. ते एक आयएसडी फोन सेंटर कम सायबर कॅफे होतं. दुकानात शिरलो आणि मोठा ऊर्दू बोर्ड नजरेला पडला. दोन आशियाई माणसं काऊंटरपलिकडे बसलेली होती. मी जाऊन सरळ हिंदीत चालू झालो. दोन-चार फेर्‍यांमध्ये ती कॅफे एका पाक कुटुंबाच्या मालकीची असल्याचं ध्यानात आलं आणि त्यातल्या दोघाजणांशी अगदी चांगल्या गप्पा होऊ लागल्या. त्यांच्या कुटुंबातला प्रत्येक जण काय करतो ह्याची इत्थंभूत माहिती मला झाली. त्यांच्यातल्या दोन वर्षांच्या मुलीच्या नावावरून ठेवलेलं कॅफेचं नाव, त्यांची मूळ गावं असं बरंच. एक दिवस त्यांच्यातल्या एक मोठा भाऊ स्पेशली मला भेटायला आला आणि गप्पा मारून गेला. ते चक्क आपल्याकडचे म्हणून भारतीयांना मूळच्या अव्वाच्या सव्वा किमतीत सूटही द्यायचे. माझ्या पाक लोकांच्या जवळिकीबद्दल मला बरेच जण ऐकवायचे, समजावायचे. मलाही धोके कळत होते, पण वळत नव्हते. तारा जुळल्या होत्या.

त्यानंतर मी भारतात परतलो आणि पाच सहा महिन्यांनी लांब पल्ल्यासाठी इथे परत आलो. ह्यावेळेस सोबत लॅपटॉप आणला होता. मध्यंतरीच्या काळात माझा त्यांच्यातल्या कुणाशीही संपर्क नव्हता. मी सहज ते दुकान अजून आहे का म्हणून पाहायला गेलो, तेव्हा त्यांनी एकदम बर्‍याच दिवसांनी भेटलेल्या मित्रासारखं स्वागत केलं. माझ्या रूमवरती नेटचा जुगाड होईस्तो मी तिथे जायचो, आणि जुगाड झाल्यावर तर नुसताच गप्पा ठोकायला जायचो. आठवड्यातून एक दिवस तासभर. त्यानंतर पहिल्याच थंडीत मी न्यूमोनियानं आठवडाभर आडवा पडलो आणि त्यांच्या दुकानावर गेलो नाही. तर तिथे गेलेल्या दुसर्‍या एका मुलाला त्यांनी माझ्याबद्दल विचारलं आणि मी आडवा आहे ऐकून माझ्या मोबाईलवर फोन केला. आपुलकीनं चौकशी केली आणि काहीही लागलं तर सांग म्हणून सांगितलं. बरेचदा, काहीच न करता, नुसत्या आपुलकीच्या चार शब्दांनीच आपल्याला बरं वाटतं. आता माझे १०० सहकारी इथे होते, ह्याची मदत मला कितीशी लागणार होती, पण त्यानं साफ मनानं सांगितलं, ते मला कळलं.

मग आई-बाबा इथे आले होते, तेव्हा बाबांना घेऊन मी खास दुकनावर गेलो. त्यांनी बाबांचं एखाद्या खास पाहुण्यासारखं स्वागत केलं. कॉफी मागवली आणि बर्‍याच गप्पा झाल्या, अगदी भारत-पाक राजकारणापासून सगळ्याच. तिथून निघताना बाबा मला म्हणाले, "खूप चांगली माणसं जोडलीयस तू!"

त्यानंतर माझे दोन मित्र दोन तीनदा माझ्या आग्रहावरून माझ्या घरी आले. बर्‍याचदा सहज भेट व्हायची. मग एक दिवस लॉसमध्ये चालतंय म्हणून आम्ही दुकान विकतोय म्हणून त्यांनी मला सांगितलं. आता भेटायचं कारण गेलं होतं, पण तरी ठरवून कुठेतरी भेटायचोच, महिन्याभरातून एकदा वगैरे. आणि मग २६ नोव्हेंबर,२००८ ला मी मुंबईत उतरलो, आणि त्याच क्षणी मुंबईवर हल्ला सुरू झाला होता. हल्ल्याच्या तारा पार इटलीतल्याच एका फोन सेंटरपर्यंत पोचल्या होत्या. हे ते फोन सेंटर नव्हतं, पण सगळेच जण संशयाच्या घेर्‍यात होते.

महिन्याभराने मी इथे परतलो. आता ह्यावेळी मात्र पाकिस्तानींशी बोलायचं नाही की उगा त्यांना शोधत जायचं नाही असं ठरवलं होतं. मन सारखं सांगत होतं, की 'अरे मित्र आहेत तुझे.' पण मेंदू समजावत होता, 'असा अडकशील की आयुष्यातून उठशील!' मी तब्बल १वर्ष त्यांच्याशी कुठलाही संपर्क केला नाही. ते राहायला माझ्याच भागात होते, पण नजरेस पडले नाहीत. रिसेशन मध्ये नोकर्‍या गेल्यात असे ते एकदा सांगत असल्याचं मला आठवत होतं. 'काय झालं असेल? ते ही इन्व्हॉल्व्ह्ड असतील का? की रिसेशनचे बळी?' हजारो प्रश्न पडत होते. पण मी भीतीचं ओझं वागवत होतो.

मी मधल्या काळात दोनदा सुट्टीवर जाऊन आलो. आणि ह्या फेब्रुवारीत, अचानकच घरासाठी मी बस स्थानकावर उभा असताना, त्यांच्यातल्या एकाला मी दिसलो. तो हर्षभरित होऊन माझ्याकडे आला आणि त्यानं मला मिठी मारली. मी एकदम बावरलो. आनंदित होतो, पण काय प्रतिक्रिया द्यावी हेच मला कळत नव्हतं.

"होतास कुठे तू?" तो.

"अरे मी मध्यंतरी काही महिने भारतात होतो." मी खोटं बोलण्याचा प्रयत्न करत होतो. मला प्रचंड गिल्टी फीलिंग येत होतं.

"अरे माझा नंबर नाहीये का तुझ्याकडे? तुझा नंबर तर लागतच नाही." तो.

माझा नंबर खरंच वर्षभरात रिचार्च न केल्याने एक्सपायर झाला होता. "अरे मेरा नंबर बदल गया है, और तुम्हारा मेरे इस मोबाईल में नही है!" मी उर्वरित लोणकढी मारली. आणि त्याच्यासमोर त्याचा नंबर फीड करायला लागलो, तर डिस्प्ले वर त्याच्या ऑलरेडी स्टोअर्ड नंबरचं सजेशन आलं. ते त्यानंही पाहिलं. मला तर आत्ता धरणी दुभंगून मला आत घेईल का असा सीतास्पद विचार आला. पण मग मी माझं लोणकढ्यांचं भांडार उघडलं.

"मेरे पास दो सेलफोन्स हैं। पहले यह था, फिर बीच में मैं दुसरा वाला लाया था, तो उसमें नंबर नहीं था।" मी प्रचंड असहाय झालो होतो. माझं काय चुकलं होतं, हेच मला कळत नव्हतं, पण मला खूप अपराधी वाटत होतं.

त्याला कितपत पचली थाप कुणास ठाऊक. पण तो माझ्याच एरियात यायला निघाला होता. त्यानं मध्यंतरात जागा बदलली होती, आणि जिथून आम्ही बस पकडली तिथेच त्यानं जागा घेतल्याचं तो मला मनापासून सांगत होता. दुसर्‍या मित्रानं आता बायकोला देशातून इथे आणल्याचं आणि तो जुन्याच जागी राहत असल्याचं त्यानं मला सांगितलं. आणि तो त्याच्या युक्रेनियन मैत्रिणीला भेटायला माझ्या एरियात येत असल्याने, दुसर्‍याला कल्पना नाहीये, तर आत्ता त्याला फोन करू नकोस असंही मला डोळे मिचकावत सांगितलं. मग माझ्या अपराधी आग्रहास्तव आणि त्यालाही त्याची मैत्रीण येईपर्यंत वेळ काढायचा असल्याने तो माझ्या घरी येईन बसला. गप्पाष्टक चालूच होतं. कसाबवरही चर्चा झाली. दोघंही थोडे सांभाळूनच बोलत होतो. मग त्याचे एक नव्याने इथे आलेले काका, बांग्ला वॉरच्या वेळी भारतात युद्धकैदी होते हे तो मला कौतुकानं सांगत होता. पुढच्या रविवारी तुला फोन करून स्टॉपवर बोलावेन आणि मग तुला तिथून माझ्या घरी घेऊन जाईन, मग आपण निवांत गप्पा करू आणि काय ना काय. मग त्याच्या मैत्रीणीचा फोन आला आणि तो गेला.

पुढच्या आठवड्यात काही त्याचा फोन आला नाही. त्याच्या पुढच्या आठवड्यात दुसरा मित्र मला बोलवायला आला आणि कॉफी शॉपमध्ये घेऊन गेला. त्याच्या बायकोचे वगैरे फोटो बघून झाले. गप्पा झाल्या आणि आम्ही अलविदा केला. नंतर ना मला कुणाचा फोन आला ना मी कुणाला फोन केला. कदाचित त्या पहिल्याला त्याच्या काकाने डोस पाजला असेल आणि दुसर्‍याला माझ्या चलबिचलीचा अंदाज़ आला असेल! कुणास ठाऊक.

पण मग सहा महिने उलटले आणि अचानक ह्या शनिवारी मी बस स्टॉपवर उभा असताना, बायको आणलेला मित्र दुसर्‍या बसमधून उतरला. त्याच्या चेहर्‍यावर ओळख होती पण आनंद नव्हता. आपली साडेतीन महिन्याची मुलगी दाखवताना तो फारसा उत्साही नव्हता. जबरदस्तीनं माझ्याशी बोलत होता. दुसरा, युक्रेनियन मैत्रीणवाला पाकिस्तानात सुट्टीवर गेल्याचं सांगत होता. मग बसमध्ये चढलो आणि मी दूरच बसणं पसंत केलं. कदाचित विश्वासात मीच कमी पडलो होतो, त्यामुळे आता मीच मागे हटत होतो. मला ठाऊक आहे, मी जे केलं होतं, ते प्राप्त परिस्थितीत योग्यच होतं. पण तरीही तो मैत्रीतला विश्वासघातच होता. आम्ही दोघेही एकमेकांच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हतो. तो माझ्या आधीच्या स्टॉपवर उतरतो. उतरताना मला म्हणाला, तुझा नंबर तोच आहे ना? मी कॉल करीन. तो कॉल करणार नाही, हे मला ठाऊक आहे आणि मी तर नाहीच नाही, हे त्याला! पण आम्ही दोघेही किती विचित्र परिस्थितीत अडकलो आहोत ह्याची एक भयाण जाणीव मला त्याक्षणी झाली.

हा जगाचा न्यायच आहे, मानवानं केलेली पापं, अखिल मानवजातीला अशी ना तशी फेडावीच लागतात. आम्ही पाकी अतिरेक्यांची आणि स्वार्थी, संधीसाधू राज्यकर्त्यांची पापं फेडतोय. आमच्या मैत्रीच्या खांद्यावर परस्पर अविश्वासाचं कधी ना कमी होणारं असं ओझं चढलंय. आणि त्या ओझ्याखाली आमचा मोकळेपणा आणि आमच्या मैत्रीतला ओलावा पार दबला गेलाय. हे ओझं कधी आणि कसं उतरणार?

52 comments:

  1. ह्म्म्म .. अंतर्मुख करणारं लिहिलं आहेस.

    माझा इथला एक रूममेट पाकिस्तानी होता पण कित्येकदा त्याचं वागणं, बोलणं, स्वभाव, सतत मदत करण्याची वृत्ती मिश्कीलपणा या सगळ्यामुळे आपल्या लोकांपेक्षाही जवळचा वाटायचा.. !!

    Generalization kills !!!!

    ReplyDelete
  2. खरं लिहिलंयस बाबा, मानवानं केलेली पापं अखिल मानवजातीला अशी ना तशी फेडावीच लागतात. आपण शाळेत प्रदूषणांबद्दल शिकतो, वायू, जल, ध्वनी वगैरे. पण त्याहीपेक्षा मोठ्या अन् गंभीर प्रमाणात आपण एकमेकांची मनं प्रदूषित केली आहेत. दुर्दैवानं फार लोकांच्या ते खिजगणतीही नाही. या प्रदूषणाचा परिणाम प्रत्येक जण भोगत असतो, तूही, मीही.

    आपले सहिष्णु, समंजस वगैरे विचार या प्रदूषणापासून आपल्याला वाचवायचा थोडाफार प्रयत्न करतात. अॅंटिबॉडीज कशा विरोध करतात जिवाणूंना, तसंच काहीसं. मग बौद्धिक ताप वगैरे येतो. काहीतरी चुकल्यासारखं, वाईट घडल्यासारखं, विषण्ण वगैरे वाटतं...

    काही काळानं एक तर या विचारांचं कारण दूर तरी जातं किंवा ते प्रदूषित विचार आपला एक भाग तरी होतात. प्रदूषणाच्या साथीत मग आपणही एक प्रदूषक म्हणून सामील होतो.

    थोडं असंबद्धसं बरळलोय खरं, पण बाबा, तू जे काही म्हणतोयस त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे.

    ReplyDelete
  3. असं होणं सहज शक्य आहे. पण नंतर वातावरण निवळेल लवकरच..

    ReplyDelete
  4. विभी, शिर्षक एकदम समर्पक. तुझ्या मनातील घालमेल कळली. तुझ्याजागी मी असतो तर कदाचित असाच वागलो असतो. बाकी पोस्ट नेहमीप्रमाणे मस्तच.

    ReplyDelete
  5. खूप छान लिहिलं आहे. ९/११ च्या वेळी मलाही अगदी असाच अनुभव होता. मुठभर माथेफिरू लोकांच्या उपद्व्यापामुळे एखादा पूर्ण समाजच कसा बदनाम होतो ह्याचे हे एक उदाहरणच आहे.

    ReplyDelete
  6. सकाळी ५.२० ला तुझा लेख वाचला..तेंव्हाच खर म्हणजे कोमेंट द्यायला हवी होती..पण वाचुन मन सुन्न झाले रे..म्हणुन फक्त एव्हडेच [:(] केले...जास्त काही लिहीत नाही..विचार करण्याजोग लिहिले आहेस हे नक्कीच....

    ReplyDelete
  7. mazya don maitrini muslim aahet...tyatli ek pakistani aahe...khup chaan aahe pan mala dar veli tichya kadun aala ki asvasthach hota....hi feeling ithe jasti yete(US madhe)aani dusari maharashtriyan muslim...tila mazyapeksha jasti bhartacha abhimaan aahe pan sanyshayacha kida ekda chavla ki....asa vatata yanchya itaka javal java ki jau naye? tuza mhanana 1oo% patala...by the way tuzya sagalya posts aavrjun vachate...masta lihitos aani main mhanaje regular aahes....pls keep it up...and regards

    ReplyDelete
  8. अंतर्मुख करणारं लिहिलं आहेस...

    फ़क्त मैत्रीत दुरावा आला तर मन इतक सुन्न झालं.....

    ह्या क्षणी मला आठवण येते आहे आपल्या देशाच्या हुत्माता झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांची.....
    किती तरी मुलं अनाथ झाले असतील....किती तरी मुली विधवा झाल्या असतील.....किती तरी बापांनी आपल्या तरुण मुलाच्या देहाला खांदा दिला असेल....किती तरी संसार उभे राहण्या अगोदर विस्कटले असतील...

    जे आपल सर्वस्व गमावुन बसले आहेत त्यांनी काय कराव???

    हे सार कशासाठी??? कुणामुळे अन का???

    ReplyDelete
  9. विद्याधर,
    अगदी खर लिहिलंस.इथेही पाकिस्तानी लोक पुष्कळ आहेत. कितीही चांगली असली तरी त्यांच्या मनात व आपल्या कुठेतरी हि दरी असतेच. बिचकत मैत्री ठेवावी तर ती लोक मनाने चांगली असतात. सामंजस्याने आम्ही म्हणतो कि काही माणसाची वृत्ती घातक असते सर्व असे नसतात. आणि हो तू लिहिलेले अगदी सत्य आहे मी हि इथे येण्यापूर्वी आईला नेट समजावून आले होते. माझ्याशी बोलण्या करता तर ती मोबाईल सुद्द्धा वापरण्या करता शिकली होती. मी युरोप मध्ये फिरताना पहिले होते कि तिथे सायबर दिसत नाहीत. असो तू संवेदनशील स्वभावाचा आहेस म्हणून जे आपल्याशी चांगले ते आपले.....

    ReplyDelete
  10. दुबईत आमचे दोन पाकिस्तानी मित्र आहेत. खूप छान 'माणसे' आहेत. बायकापोरे असलेली. आमच्या कठीण काळात त्यांनी आम्हांला केलेली मदत आणि आपल्या भारतीय एम्बसीतील भारतीय लोकांकडून मिळालेली वागणूक ह्यातील जमिनआस्मानाचा फरक, माणुसकी हा एकच धर्म खरा हे पटवून गेला. जमल्यास फेसबुक वरील माझ्या - अनघा निगवेकर - ह्या इथे जाऊन माझ्या notes मधील 'Beware of Indian Consulate' ही post वाच. लिंक देण्याचा प्रयत्न केला, पण का माहित नाही...नाही देऊ शकले.

    ReplyDelete
  11. खरंय विभिदा तुझं...लेख वाचतांना मन अगदी सुन्न झालं...
    "आम्ही पाकी अतिरेक्यांची आणि स्वार्थी, संधीसाधू राज्यकर्त्यांची पापं फेडतोय. आमच्या मैत्रीच्या खांद्यावर परस्पर अविश्वासाचं कधी ना कमी होणारं असं ओझं चढलंय. आणि त्या ओझ्याखाली आमचा मोकळेपणा आणि आमच्या मैत्रीतला ओलावा पार दबला गेलाय. हे ओझं कधी आणि कसं उतरणार?"
    अगदी सहमत....ह्या प्रश्नच उत्तर कधी तरी मिळेल का आपल्याला ..?

    ReplyDelete
  12. Manachi ghalmel yogya shabdat mandali aahes

    parantu yat tumha doghanchi kahi chuk nahi :(

    ReplyDelete
  13. Anonymous3:15 AM

    विभी,तुझी अगतिकता जाणवली..शिर्षकपण योग्यच...

    ReplyDelete
  14. आमच्या इंडस्ट्रीमध्ये नाही म्हटला तरी ३०-३५ टक्के मुसलमान लोक असतात..इम्रान हा तर मला भावासारखा..काय सांगू पण आत कुठे तरी जाणवला रे जसा तुला वाटला तस...

    पण मी.... :( :(

    ReplyDelete
  15. Very thought provoking post. All boundaries are artificial and every culture has good and bad people. But many times we want to blame someone from someone else's mistakes .. In the name of Nationality and Religion we are fighting - forgetting that we have only ONE earth to share!

    (Sorry for writing in English, no Marathi font!)

    ReplyDelete
  16. एकदम खरं विभि..... परिस्थीती पुढं आपण किती आगतिक असतो नाही.... हैदराबादला मला मुस्लिम मित्राने सर्वात जास्त मदत केली आहे.... पण संशयाची दरी कुठेतरी दोघांमध्ये आहेच.... गढुळवलीत मनं.... :(

    ReplyDelete
  17. विभि, अरे मी केंब्रीजला असताना आमच्या कॉलेजचा कॉम्प्युटर ऑफीसर पाकीस्तानी होता. एकदा मला काहीतरी प्रॉब्लेम आला म्हणून मला त्याच्या कडे जावं लागलं. तर अगदी आस्थेनं चौकशी करून व्यवस्थित गप्पा मारल्या. पुन्हा मला इतर सॉफ्टवेअर्स तशीच मोफत द्यायला तयार होता. म्हणाला काही प्रॉब्लेम आला तर ये. पण ही मोफत सॉफ्टवेअर देण्याची सुविधा फक्त भारत आणि पाकीस्तानी विद्यार्थ्यांसाठीच आहे बाकी कुणाला बोलू नकोस. पण हेच अजुन एक पाकीस्तानी मुलगी माझ्या ब्लॉक च्या वरच रहात होती. ती मात्र जाम जहाल आणि आतल्या गाठीची. तिचे वडील पाकीस्तानी आर्मी मध्ये होते ना.
    पण हे खरंय पाकीस्तानातील सामान्य माणसांना भारताशी मैत्रीच हवी आहे. पण म्हणतात ना....."कुणाच्या खांद्यावर...."शीर्षक एकदम समर्पक आहे.

    ReplyDelete
  18. विभी, आपण सारेच किती दुविधेत सापडलो आहोत रे. आणि हे चक्र एकदा का सुरू झाले की मनात संशय आणि भीती यांची आवर्तने संपतच नाहीत. खरेतर तुमचे सूर इतके चांगले जुळलेले. पण... मनं गढुळलीत. या सार्‍या अतिरेकी घटनांचे ओझे आपण सारीच( त्यांच्याकडचीही त्यात आलीच ) जन्मभर वागवणार आहोत. माणसाकडे माणूस म्हणून नाही तर कोण देशाचा हे नकळत पाहीले जाते. :(

    विचारांची चक्रे सुरू झालीत... पोस्ट खूपच छान आणि शिर्षक पर्फेक्ट.

    ReplyDelete
  19. हेरंब,
    खरंच रे...
    जनरलायझेशन किल्स! :(

    ReplyDelete
  20. नॅकोबा,
    असंबद्ध नाही भाऊ...तू अगदी छान साखळी वर्णन केलीयेस...आणि दुर्दैवाने ती अगदी तशीच घडत जाते..आणि आपण काहीही करू शकत नाही! विचित्र हतबलता येते!

    ReplyDelete
  21. माऊताई,
    अगं अगदी ह्याच शनिवारी हा बसवाला शेवटचा प्रसंग घडला गं!
    मी तो उतरून गेल्यावर कितीतरी वेळ विचारातच होतो! कितीही अन्वयार्थ लावायचा प्रयत्न केला तरी काही निघत नाहीच!

    ReplyDelete
  22. अभिलाष,
    आपल्या शहरावर झालेला हल्ला, आपली मेलेली माणसं!इतक्या गढूळ वातावरणात हे घडूनच गेलं रे!
    धन्यवाद रे!

    ReplyDelete
  23. निरंजन,
    त्या समाजाच्या विशिष्ट चालीरिती आणि राहणीमानामुळे, त्यांच्यात एक इन्हेरंट असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे, आणि त्याला धार्मिक भावना भडकवून खतपाणी घातलं जातं! त्यामुळे मूठभर लोक करत असलेल्या ह्या कृत्यांनाही, बर्‍याच मोठ्या समूहाचा मूक किंवा सक्रिय पाठिंबा असतो. पण हे ही तितकंच खरं की सगळेच तसे नाहीत!
    पण शेवटी काय तर माझीच माणसं मेली आणि माझीच माणसं दुरावली! आणि दोषीही मीच! :(

    ReplyDelete
  24. मेघा,
    खरंच. संशय आणि अविश्वास हा जुन्या पिढीकडून नव्या पिढीला अजाणतेपणी मिळत असलेला वारसा आहे! नवं जग अविश्वासामुळेच वाहतूक आणि दळणवळणामुळे एव्हढं जवळ येऊनही मनानं दुरावतच चाललंय! चालायचंच!
    तुम्ही मनापासून दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार!

    ReplyDelete
  25. योगेश,
    मला कळतं रे... सैनिकांनी आणि पोलिसांनी प्राण, आपल्या देशानं सुपुत्र आणि त्यांच्या कुटुंबांनी सर्वस्व गमावलं!
    पण सत्य तिथेच राहतं ना रे!
    ज्या माणसाची त्यात काहीच चूक नव्हती, त्याच्याबद्दल संशय घेतला गेला ना!
    मी ज्या क्षणी मुंबईला उतरत होतो, त्याच क्षणी कामाला गोळीबार होत होता. मी रिकाम्या रस्त्यावरून घरी गेलो आणि घरी गेल्यावर जेव्हा अर्धवट कळलेली माहिती पूर्ण कळली, तेव्हा अंगावर आलेला शहारा!
    त्यानंतरचं सगळं थरारनाट्य आणि आपला सामान्य दिनक्रम चालू ठेवून टीव्हीवर संपलं का एव्हढंच बघत असलेलाही मीच!
    कुणाची किती ऋणं मानू आणि कुणाचे किती पांग फेडू! पण ह्या सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा मी कुणाला देऊ?
    अजाणतेपणी ही शिक्षा निरपराधांनाच दिली गेली ना रे...
    मैत्री दुरावल्याच्या दुःखाहून माणुसकीला पारखा झाल्याचं दुःख आहे!

    ReplyDelete
  26. अनुजाताई,
    खरंच..ही दरी कधी मिटत नाही...वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या मुरवतोय आपण ती!
    काय करणार!

    ReplyDelete
  27. अनघा,
    खरंच! कधीतरी बेसावध क्षणी माणसातला माणूस माणसातल्या नागरिकावर भारी पडून जातो आणि एक वेगळंच नातं निर्माण होतं!
    पण त्या चकाकत्या नात्यावर प्रदूषणामुळे लगेच काळी पुटंही चढतात! त्याचंच दुःख आहे!
    मला तुमची प्रोफाईलच सापडत नाहीये फेसबुकवर! का कुणास ठाऊक! सर्चमध्येच येत नाहीये!

    ReplyDelete
  28. सागर,
    कुणाची शिक्षा आपण कुणाला किंवा कशाला देतो, ते आपलं आपल्यालाच कळत नाही! आणि सहसा ती आपणच स्वतःला दिलेली शिक्षा असते, हे समजेपर्यंत बराच उशीर झालेला असतो!

    ReplyDelete
  29. विक्रम,
    खरंच रे... चूक कुणाची झालीच नाही...मग शिक्षा का मिळतेय, तेच कळत नाहीये!

    ReplyDelete
  30. सुहास,
    ही भावना आपल्याला अधून मधून आतल्याआत कुरतडत राहते! दॅट हर्टस!

    ReplyDelete
  31. देवेन,
    धन्यू रे! :(

    ReplyDelete
  32. सविताताई,
    तुम्ही म्हणता ते शंभर नंबरी सत्य आहे!
    कधीकधी आपले सगळे पेहराव आणि आपल्या सगळ्या बाह्य ओळखी गळून पडतात आणि मग आपण स्वतःचंच मूळ स्वरूप पाहतो! जेव्हा हे दोन्ही बाजूनी घडतं, तेव्हा जो अपार आनंद मिळतो, त्याक्षणी जाणवतं, की आपण कुठल्या बेगडी कल्पना घेऊन जगत होतं!
    आणि मग एका क्षणी जेव्हा मुंबई हल्ल्यासारखा प्रचंड धक्का बसतो, तेव्हा आपण आपल्या सगळ्या ओळखी, सगळे मुखवटे, कवचकुंडलं समजून चढवतो आणि त्यामागे सुरक्षित असल्याची स्वतःचीच केविलवाणी समजूत काढत राहतो!

    ReplyDelete
  33. आनंदा,
    कळतच नाही रे..आपण सगळीच माणसं अशी का वागतो!

    ReplyDelete
  34. अलताई,
    अगदी खरं आहे!
    माणसा माणसांमध्येच फरक असतो, तिथे धर्म, जात, देश आड येत नाही!
    वृत्ती आणि संगोपन ह्यांमुळे खूप फरक पडतो, हे तुझ्या वर्णनावरून जाणवतं!

    ReplyDelete
  35. महेंद्रकाका,
    तुमचा आशावाद मला खरंच खूप दिलासा देऊन गेला...!
    (ही कॉमेंट मी आधी पोस्टली होती ती मला आता दिसत नाहीये! ब्लॉगर जाम गंडतंय हल्ली!)

    ReplyDelete
  36. श्रीताई,
    >>माणसाकडे माणूस म्हणून नाही तर कोण देशाचा हे नकळत पाहीले जाते
    खरंच गं! आणि हे अगदी प्रतिक्षिप्त क्रियेगत घडतंय, ह्याचीच टोचणी लागते! :(

    ReplyDelete
  37. अनघा,
    फेसबुकला कॅपिटल आणि स्मॉल लेटर्सची ऍलर्जी असल्याचं आत्ता माझ्या ध्यानात आलं!
    तुमची पोस्ट वाचून मी सुन्न झालोय!
    अशीही माणसं असू शकतात! :(

    ReplyDelete
  38. बाबा कालपासून २/३ वेळा वाचली तुझी पोस्ट... वारंवार तु मांडलेले विचार मनात येत होते.... खरयं रे हा राग, द्वेष आपण एका पिढीतून दुसऱ्या पिढीत देतोय...मनातल्या कल्पनांवर मात नाही करता येत कधी कधी!!

    आमच्याकडे एक प्लंबर येतो तो पाकिस्तानी आहे, कुठून आहेस विचारले तर ’दुश्मन मुलुक’ असे हसत सांगतो.... पण फोन केल्यावर कधिही रिकाम्या हातानी येत नाही, कायम मुलांसाठी खाऊ घेऊन येतो... विचारले की म्हणतो मेरी बहेन के बच्चे है!! हनाभाई म्हणून एक बांग्लादेशी रहातो आमच्या घराजवळ... कुठल्याही सणाला आंब्याची, तुळशीची पानं मिळवण्याचे इथे तसे अवघड असणारे काम तो नेहेमी न सांगता करतो... अश्या वेळी खरचं वाटतं आपण मनातले बांधलेले ठोकताळे जरा बाजुला करावेत...

    ReplyDelete
  39. तन्वीताई,
    हो ना गं! माणसातलं माणूसपण एकदा जाणवलं ना, की त्यानंतर असे ठोकताळे जीवावर येतात...
    पण दुनियेची रीतच विचित्र झालीय! :(

    ReplyDelete
  40. ह्या इथवरच्या टप्प्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची माणसे भेटली....तरीदेखील माणूसकीवरचा विश्वास कायम ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे. :)

    ReplyDelete
  41. बाबा,
    लेख विचारात पडायला लावणारा.कि नक्की काय नि कुठे चुकतंय म्हणून हे सगळा काही चाललंय.
    ताज वरील हल्ल्या नंतर खास करून पुण्यात खालील एस.एम.एस.बऱ्याच जणांना फोरवर्ड केला गेला होता.तो सुध्धा भल्या-भल्यांना विचारात पाडणारा होता.कि हा एस.एम.एस.तरी कशासाठी?तो पुढील प्रमाणे."प्रत्येक मुसलमान हा आतंकवादी निश्चितच नाहीये पण प्रत्येक आतंकवादी हा मुसलमानच का आहे?"सर्व साधारण बुद्धिमत्ता असणाऱ्यांसाठी हा एस.एम.एस.म्हणजे कोडे होते.अर्धा ग्लास भरलेला का रिकामा म्हणयचा ह्या प्रमाणे.जस जसे आधुनिकीकरणामुळे जग जवळ येत गेले तस-तसे एकूणच सगळे अवघड होत गेले.माझ्या मते माणसाने निसर्गाचा"फक्त लायक असेल तोच जगेल"हा नियम धुडकावल्यामुळे तर आत्ताची हि बला नसेल?बारकाईने जर बघितले नि विचार केला तर पहा कि जे "माणूस"म्हणून जगायलाही लायक नाहीत अशांना आज खुद्द परमेश्वर सुध्धा लगेच शिक्षा करायला असमर्थ ठरलाय.त्याच्या दरबारी न्याय नक्कीच आहे पण कलियुग असल्याने सत्याचा विजय हा नेहमी "शेवटीच" होणार आहे "पहिल्यांदा नाही" एवढेच आपण लक्षात ठेऊ.असो.

    ReplyDelete
  42. यथार्थ व्यक्तता... बाबाजी तुझी भिंत चढायला घेतलीये :)

    ReplyDelete
  43. निनाद,
    धन्यवाद भाऊ!

    ReplyDelete
  44. mynac दादा,
    >>बारकाईने जर बघितले नि विचार केला तर पहा कि जे "माणूस"म्हणून जगायलाही लायक नाहीत अशांना आज खुद्द परमेश्वर सुध्धा लगेच शिक्षा करायला असमर्थ ठरलाय.त्याच्या दरबारी न्याय नक्कीच आहे पण कलियुग असल्याने सत्याचा विजय हा नेहमी "शेवटीच" होणार आहे "पहिल्यांदा नाही" एवढेच आपण लक्षात ठेऊ.असो.

    हे अगदी कटू सत्य आहे! :(

    ReplyDelete
  45. सौरभ,
    ब्लॉगवर स्वागत भाई!
    प्रतिक्रियेबद्दल खूप आभार! असाच लोभ असू दे! :)

    ReplyDelete
  46. खूप छान लिहिलं आहे...
    Pardeshat nehmich Paki bhetle ki thodi chalbichal hotech yaar....ani mag wicharat padaylach hota...mag ekikade kasab sarkhe pahile ki mala tar kalat nahi ki kunawar wishwas thewayacha....

    aaso on a lighter note hya weli 50 wi tu maar...kay??

    ReplyDelete
  47. अपर्णा,
    होय ना.. परदेशात बरेचदा त्यांचा आधारही वाटतो, पण त्या अदृश्य भिंती क्षणभरासाठीच ढासळतात, कायमच्या नष्ट होत नाहीत..चालायचंच!
    बाकी, हे बेस्ट आहे! माझ्या ५० साठी तू अशी ना तशी कारणीभूत असतेस!

    ReplyDelete
  48. खरय रे बाबा.. माझे सुद्धा २ मित्र आहेत पाकिस्तानी. बरेचदा बोलणे होते पण कुठेतरी काहीतरी बोचते आहेच... :(

    ReplyDelete
  49. रोहन,
    कटू सत्य आहे हे! :(

    ReplyDelete