Showing posts with label मराठी. Show all posts
Showing posts with label मराठी. Show all posts

4/16/2012

मराठी ब्लॉगिंगोन्नतीचे पाच सोपान

मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा मला अगदी चौथी-पाचवीपासूनच काहीतरी लिहावं आणि लोकांनी आपलं कौतुक करावं असं वाटायचं. कविता वगैरेसुद्धा पाडायचा प्रयत्न मी अगदी लहान वयात केला होता. त्या कवितेला फारसा अर्थ नव्हता हा भाग अलाहिदा, पण लेखक किंवा कवी ह्या शब्दांबद्दल फार आकर्षण वाटायचं. त्याभोवती एक अनामिक ग्लॅमर असल्यागत आणि ते आपण बनावं असं वाटायचं. आता वाटून कुणी लेखक होत नसतो, पण वाटायचं हे महत्वाचं.
तर अशी सुरूवात झाल्यावर माझी हौस मुरत गेली नसती तरच नवल. मी चांगलाच लिहिता झालो. मुख्यत्वेकरून कथा लिहायचो, पद्य मनुष्य मी कधीच नव्हतो आणि हे सत्य मी फार पूर्वी मान्य केलं. एकदा पाय फ्रॅक्चर झाल्यावर मी प्लॅस्टरमध्ये वीस दिवस पडून होतो, तेव्हा एक रेल्वेकादंबरीस्टाईल ऍक्शन दीर्घकथादेखील लिहून काढली होती. एकदा एअरपोर्टवर विमानाची वाट पाहताना मी ई-तिकिटाच्या प्रिंटआऊटच्यामागे कथा लिहिली होती. घरातल्या अडगळींमध्ये आवराआवरी करताना आजही आईला मी कथा लिहिलेले कागदाचे कपटे अधूनमधून सापडतात. आणि हे सगळं 'मराठी ब्लॉग' ह्या माध्यमाची ओळख होण्यापूर्वी. त्याआधी कॉलेजात असताना मित्राच्या नादानं इंग्लिश ब्लॉग लिहायचो. आणि ते अत्यंत बालिश आणि माझ्या अत्यंत मर्यादित महाविद्यालयीन वर्तुळापर्यंतच सीमित असे ब्लॉग्ज असायचे.
तर मुद्दा हा की आजपासून अडीच वर्षांपूर्वी मराठीमध्ये ब्लॉग लिहायला सुरूवात करण्यापूर्वीदेखील मी लिहितच होतो आणि जेव्हा मी ब्लॉगवर काही लिहित नसतो, तेव्हाही कागदांवर मी लिहितच असतो. पण ब्लॉग हे प्रकरण काहीतरी वेगळं आहे.
आपण सर्वप्रथम ब्लॉग म्हणजे काय ते पाहू. Blog म्हणजे Weblog ह्या शब्दाचं छोटं, सुटसुटीत रूप आहे. Web वर ठेवला जाणारा Log अर्थात ढोबळमानानं ऑनलाईन दैनंदिनी. पण ब्लॉग तिथपर्यंतच मर्यादित राहिला नाही. सुरूवातीला इंग्रजीनं आणि नंतर इतरही अनेक ज्ञानभाषांमध्ये समृद्ध असे ब्लॉग्ज जगभरात तयार झाले. ब्लॉगचा वापर नुसती दैनंदिनी म्हणून करणारे जसे लोक आहेत, तसेच ब्लॉग म्हणजे ऑनलाईन ग्रंथच बनवणारेही अनेक महाभाग आहेत. आणि इतका लवचिकपणा हीच ब्लॉगची मुख्य खासियत. थोडक्यात ब्लॉग म्हणजे महाजालावरचा एक असा कोपरा जो वेळ पडल्यास सगळ्या जगालाही दिसू शकतो. अनेकजण असा स्वतःचा कोपरा केवळ मर्यादित वर्तुळापर्यंतच सीमित ठेवतात अर्थात त्याही बाबतीत ब्लॉग हे लवचिक माध्यम आहे. पण ज्याप्रकारे इंटरनेटचा प्रसार होऊ लागला, त्यामुळे ब्लॉगिंग हे संवादाचं एक माध्यम बनू लागलं. अगदी राज्यक्रांत्यांमध्येची ब्लॉगिंगनं बरीच महत्वाची भूमिका वठवली. अर्थात ब्लॉगिंग ही एक भाषा बनली. आणि मग ज्याप्रकारे प्रत्येक भाषेच्या बाबत होतं, त्याप्रमाणेच ब्लॉगिंगबाबतही गुणात्मक आणि संख्यात्मक तुलनांना सुरूवात झाली. इंग्रजी, फ्रेंच, चायनीज, रशियन, स्पॅनिश इत्यादी मोठा सुशिक्षित आणि इंटरनेट उपलब्ध असलेला वर्ग असणार्‍या भाषांमध्ये अनेक ब्लॉग्ज निर्माण झाले. ह्या ब्लॉगिंग जगतांमध्येदेखील निश्चितच अशा प्रकारची ओरड कोणत्या न कोणत्या कालावधीमध्ये झाली असणारच, पण मी तितका शोध घेतला नाही त्यामुळे त्यावर मी भाष्य करणार नाही. पण सध्या, सध्या कशाला, मी जितके दिवस ब्लॉगिंग करतोय तितके दिवस मी 'मराठी ब्लॉग्जचा दर्जा उंचावत नसल्याची खंत' व्यक्त करणारे उसासे वाचतोय. गंमतीचा भाग असा की की लहानपणापासून मी 'मराठी भाषा मरणासन्न आहे' असलेही उसासे ऐकत आलोय आणि त्या उसाशांना काहीही अर्थ नसतो हे मला नेहमीच तितक्याच प्रकर्षाने वाटत आलंय.
आता आपण मराठी ब्लॉगिंगबद्दलच्या काही ठळक काळज्या पाहू -

१. मराठीत विषयांचं वैविध्य नाही.

-मी स्वतः अत्यंत थोडेसेच ब्लॉग्ज पाहिले आहेत आणि माझ्या अत्यंत तुटपुंज्या परिघामध्येही एक फोटोग्राफीचा ब्लॉग, भरपूर ट्रेकिंगचे ब्लॉग्ज, ललितलेखनाचे विपुल ब्लॉग्ज, कथा/लघुकथा, कविता, तांत्रिक बाबींशी संबंधित ब्लॉग्ज, पाककला, चित्रकला, हस्तकला, समाजकार्यातले अनुभव, प्रवासवर्णनं, रामायण, महाभारत इत्यादी इत्यादी ब्लॉग्ज मी पाहिलेत. मी स्वतः अत्यंत छोटा अन सामान्य मनुष्य असल्यानं मला जास्त विषयांमध्ये गती नाही त्यामुळे मी फारसे वैविध्यपूर्ण ब्लॉग्ज शोधले नाहीत. पण न शोधताही जर मला इतके मिळाले असतील, तर बाकीचेही काही असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे, एखादा ब्लॉग हा एकाच विषयाला वाहिलेला असावा असा एक टीकाकारांचा सार्वत्रिक अट्टाहास मला जाणवतो, तो अनाकलनीय आहे. एखाद्या व्यक्तीनं एका विषयासाठी एकच ब्लॉग लिहिला तरच तो गुणात्मकदृष्ट्या वरचढ का गणाला जावा? जर एखाद्यानं त्याची फोटोग्राफी, चित्रकला, हस्तकला, तांत्रिक बाबी आणि ललितलेखन एकाच ब्लॉगवर केलं तर लगेच त्याला ललित ब्लॉगर म्हणून हिणवायचं? हे म्हणजे 'लघुत्तम सामायिक विभाजक' काढण्यासारखं आहे आणि तेदेखील चुकीचा. कारण कुठल्याही प्रकारचं लेखन कमी दर्जाचं जास्त दर्जाचं असं म्हणणं हेच मुळात चुकीचं आहे. ललित लिहिलं की वाईट, विवेचन केलं की चांगलं, इंग्रजीमिश्रित बोलीभाषा वापरली की वाईट, जडबंबाळ अललंकारिक लिहिलं की चांगलं ही वर्गवारी कशासाठी?
ज्याप्रमाणे कुठलाही एक मनुष्य दुसर्‍याप्रमाणे नसतो, त्याप्रमाणे कुठलीही एक अभिव्यक्ती दुसर्‍या अभिव्यक्तीसारखी नसते. त्यामुळे एकाच शाळेत, एकाच बाकावर एकाच तासाला बसणारी दोन मुलं त्या तासात घडलेल्या घटनांचं संपूर्ण वेगळं वर्णन करतील. ते आपलं 'एकच कुत्रा आहे म्हणून आमचा निबंध सारखा आहे' असल्या बालिश जोकसारखं कधीच नसतं. तस्मात एकाच धाटणीचे ब्लॉग असं म्हणून जे एक जनरलायझेशन केलं जातं ते मला पूर्णपणे आक्षेपार्ह वाटतं.

२. मराठी ब्लॉगिंगमध्ये रोजच्या घडामोडींबद्दल किंवा फक्त स्वतःच्याच परिघातल्या अनुभवांबद्दल अत्यंत ट्रिव्हियल लिहिणार्‍या ब्लॉग्जचाच भरणा जास्त आहे. थोडक्यात ब्लॉग ह्या माध्यमात 'नवा विचार' येत नाही.

-मी कुणी मोठा लेखक नाही की लोकप्रिय ब्लॉगर नाही की कॉम्प्युटर आहे आणि मराठी टंकलेखन जमतंय म्हणून चार ओळी खरडणारा हौशी मनुष्यही नाही, पण मी ह्या सर्वांचाच प्रतिनिधी आहे. कारण कधी मी लेखक म्हणून लिहितो, तर कधी मनातलंच ललितलेखनाच्या माध्यमातून लिहून चार समविचारी लोकांचे प्रतिसाद मिळावेत म्हणून लिहितो, तर कधी निव्वळ हातात लॅपटॉप आहे म्हणून लिहितो. आणि हो, मीसुद्धा वाचलेली पुस्तकं, पाहिलेला सिनेमा किंवा मस्त जमलेली ट्रीप ह्यांवर ब्लॉगपोस्ट लिहितो. पण जेव्हा 'मराठी ब्लॉगिंगमध्ये नवा विचार येत नाही' असली ओरड होते, तेव्हा मोठी मौज वाटते.
मुळात 'नवा विचार' ही किती सापेक्ष संकल्पना आहे. जी व्यक्ती फक्त स्वतःच्या घरातल्या गोष्टी ब्लॉगवर लिहिते, त्या व्यक्तीनं कथा लिहिणं हा 'नवा विचार' ठरतो. जी व्यक्ती पुस्तक परीक्षणं लिहिते, तिनं ललित लिहून पाहणं हा 'नवा विचार' ठरतो आणि जी व्यक्ति अक्षरशः डोक्यात चाललेल्या कुठल्याही विचारचक्रावर लिहिते, तिनं कविता लिहिणं हा 'नवा विचार'च नाही का?
फक्त दणदणीत शब्दप्रयोग करून वैचारिक लिहिणं म्हणजेच 'सध्याच्या विचारांपलिकडचं' होऊ शकत नाही. अर्थापलिकडला अर्थ शोधणं आणि तो शब्दांकित करणं हा निश्चितच कौतुकास्पद 'नवा विचार' ठरतो, पण फक्त तोच नवा विचार ठरतो हे आक्षेपार्ह आहे. असं लिहिणार्‍यानं एकदा घरात काय घडतंय, ते हलक्याफुलक्या बोलीभाषेत (मग ती इंग्रजीमिश्रित का असेना) शब्दांकित करून पाहणं, हा निश्चितच 'नवा आणि सध्याच्या विचारांपलिकडचा' विचार ठरू शकतो. किएस्लोव्स्कीचे 'थ्री कलर्स' हे तीन सिनेमे, तिन्ही संपूर्ण वेगवेगळ्या धाटणीचे. एकामध्ये डार्क ह्यूमरमध्ये दडलेला सिम्बॉलिझम, दुसर्‍यामध्ये कोंबून भरलेला थेट अंगावर येणारा सिम्बॉलिझम आणि तिसर्‍यामध्ये प्रचंड स्टाईलबाज सिम्बॉलिझम. डेकालॉगचे दहाही एपिसोड वेगवेगळ्या धाटणीचे, एकात रडायला येईल, तर दुसर्‍यात घृणा वाटेल, तिसर्‍यात थरारून जायला होईल तर चौथ्यात चेहर्‍यावर स्मितहास्य येईल. हा 'नवा विचार'. जर किएस्लोव्स्की फक्त सिम्बॉलिझमला कवटाळून बसला असता, तर सिम्बॉलिझमवरचे त्याचे इतके प्रयोग पाहायला कुणी थेटरात फिरकलंही नसतं किंवा त्यावर तासनतासाचा अभ्यास करून लेख पाडायचीही कुणी तसदी घेतली नसती. क्युब्रिकचा प्रत्येक सिनेमा त्याच्या मागच्या सिनेमापेक्षा वेगळा असतो. त्याला 'सध्याच्या विचारापलिकडे जाणं' म्हणतात. जर तो प्रत्येकच सिनेमात 'अर्थामागचे अर्थ' शोधत बसला तर अभिव्यक्तीची बोंब होईल ह्याची त्याला कल्पना असते.
उद्या जर टॉड फिलिप्सनं (हँगओव्हरचा दिग्दर्शक) किएस्लोव्स्कीच्या 'द पर्गेटरी' चं काम पूर्ण करायला घेतलं तर ते त्याला जमेल का? आणि क्रिश्तॉफ पिएशिविचला जर 'हँगओव्हर ४' ची स्क्रिप्ट लिहायला सांगितली तर ती त्याला जमेल का? सांगण्याचा मुद्दा हा की अगदी एखाद्याला नसेलच 'नवा विचार' करायचा तर काय हरकत आहे? 'जरी राजहंसाचे चालणे जगी झालें या शहाणे, म्हणोनि काय कवणें चालोचि नये?'
रडगाणी गाण्यापूर्वी थोडा विचार केलेला बरा असतो.

३. मराठी लेखक, खेळाडू, गायक, व्यावसायिक, शास्त्रज्ञ अशा विविध क्षेत्रांमधील कुणीही ब्लॉगलेखनाकडे वळलेले दिसत नाहीत.

-हा एक अत्यंत योग्य मुद्दा आहे. मराठी ब्लॉगजगताला वेगळा आयाम मिळवून देण्यामध्ये ही गोष्ट मोलाची ठरू शकते. पण इथे एक मोठी अडचण आहे. आपल्याकडे शाळेनंतरचं शिक्षण मराठीमध्ये उपलब्ध नाही, आणि असलं तरी ते कुणी घेत नाही कारण त्याचा वास्तविक जगात उपयोग होत नाही हे कटू सत्य आहे. थोडक्यात मराठी ही ज्ञानभाषा नाही. त्यामुळे व्यावसायिक शब्दकोष किंवा खेळामधल्या संज्ञा, शास्त्रीय संज्ञा ह्या मराठीतून एकतर असणं आणि असल्या तरी प्रथितयश किंवा त्या त्या क्षेत्रातले जाणकार, खेळाडू, शास्त्रज्ञ किंवा व्यावसायिक व्यक्तींना ब्लॉगमधून तितक्या पातळीपर्यंत मराठीतून व्यक्त होणं अंमळ अवघडच दिसतं. पण हो, गायक, लेखक, संगीतकार किंवा अगदी व्यावसायिकही काही काही मार्गांनी निश्चितच मराठीतून व्यक्त होऊ शकतात. जुन्या काळातले उत्तम शास्त्रज्ञ उदा नारळीकर किंवा बाळ फोंडकेंसारखे उत्तम शास्त्रीय लेखक आताच्या पिढीत न होण्याची कारणमीमांसा थेट इंग्रजी माध्यमाच्या शाळेपर्यंत घेऊन जाते आणि ह्या विषयामध्ये लिहिण्या/बोलण्यासारखं इतकं काही आहे की माझ्या मर्यादित बुद्धीनं मी काही लिहिणं चुकीचं ठरेल.
थोडक्यात, वाट बिकट आहे, पण जर प्रथितयश लोकांनी मराठीत प्रयत्नपूर्वक लिहिलं (जसं अमिताभ बच्चन हिंदीत ब्लॉगिंग करतात), तर मराठी ब्लॉगजगताला एक नवा आयाम मिळेल ह्यात शंकाच नाही.

४.तांत्रिकदृष्ट्या मराठी ब्लॉग्जना अजून बरीच मजल गाठायची आहे.

-अजून एक योग्य मुद्दा. मराठीमध्ये टंकलेखनाची सुविधा ही तुलनेने अलिकडची घटना आहे. त्यामुळे मराठी ब्लॉगलेखनही अलिकडचंच. त्यातली बरीच मंडळी अशी आहेत जी इंग्रजी ब्लॉग्ज वाचत नाहीत किंवा लिहितही नाहीत त्यामुळे तिथल्या विविध संकल्पनांची ओळख नाही. आणि ब्लॉग लिहिणारे सगळेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले किंवा रोजच्या रोज संगणकाशी निगडीत कामें करणारे नाहीत, त्यामध्ये गृहिणी, पेन्शनर्स आणि इतरही अनेक व्यावसायिकांचा भरणा आहे, ज्यांना ब्लॉगचा आराखडा, प्लगिन्सची व्यवस्था इत्यादी गोष्टींबद्दल अजूनही तितकीशी माहिती नाही. त्यामुळे मराठी ब्लॉग्जमध्ये दिसायला सुटसुटीत आणि विविध सोयीसुविधांनी युक्त असे ब्लॉग्ज फारच कमी आहेत.
ह्या बाबतीमध्ये सुधारणेला बराच वाव आहे.पण सध्या ब्लॉगजगतात तांत्रिक बाबी स्पष्ट करून, समजावून सांगणारे अनेक ब्लॉग्ज आहेत आणि त्यांची संख्या वाढते आहे. त्यामुळे लवकरच चित्र पालटलेलं बघायला मिळण्यास हरकत नाही.

५. शुद्धलेखन आणि परिच्छेद, विरामचिह्ने इत्यादी लेखनविषयक तांत्रिक बाबी.

-इंग्रजी माध्यम आणि तत्सम मुद्द्यांमुळे मराठी शुद्धलेखन किंवा प्रमाण (राजमान्य) मराठी शुद्धलेखन हा एक काळजीचा विषय आहे. योग्य परिच्छेद पाडणं, र्‍हस्व-दीर्घ आणि स्वल्पविराम, पूर्णविराम, अर्धविराम हे योग्य पद्धतीने किती जणांना जमत असेल ते सांगणं कठीण आहे. पण इथे आपल्याला अभिव्यक्ती महत्वाची आहे की सादरीकरण हा एक मुद्दा कळीचा ठरतो. भाषेचा मूळ उद्देश संवाद साधला जाणं आणि माहितीची देवाणघेवाण होणं हा आहे असं धरून चालल्यास तांत्रिक माहिती किंवा प्रवासवर्णनपर किंवा तत्सम माहितीपर ब्लॉग्जमध्ये शुद्धलेखन किंवा परिच्छेदांचा मुद्दा बाजूला ठेवता येईल, पण अर्थातच कविता किंवा कथा ह्यांमध्ये ह्याची अपेक्षा ठेवणं रास्त ठरेल.
पण एकंदरितच सरसकट सर्वत्रच शुद्धलेखन, परिच्छेद हा अट्टाहास धरून चालणं म्हणजे थोडासा अतिरेकच म्हणावा लागेल. सादरीकरण महत्वाचं आहे, पण अभिव्यक्तीचाच गळा घोटणारं सादरीकरण काय कामाचं हाही विचार व्हायला नको काय? माध्यमाला सरावल्यानंतर आपोआपच सादरीकरणात सफाई येऊ लागते. पण सादरीकरणाच्या नावाने गळे काढून नवीन अभिव्यक्ती दडपण्यात काय हशील?

मी एव्हढं सगळं पाल्हाळ लावण्याचं कारण एव्हढंच होतं, की मराठी ब्लॉगिंगमध्ये नव्या वाटा चोखाळल्या जाव्यात हा विचार मांडताना जी सद्यस्थितीबद्दल ओरड होते आहे ती अनाठायी आणि संकुचित मनोवृत्तीची आहे असं माझं ठाम मत मला मांडायचं होतं. आणि त्याचसोबत मराठी ब्लॉगिंग माझ्या नजरेतून खरोखरच कुठे आहे, ह्याचीही एक पडताळणी करायची होती. मी कुणीही तीसमारखाँ नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित करतो, पण जे खटकलं किंवा वाटलं ते मांडण्याचं माझं स्वातंत्र्य वापरून मी हे लिहितोय.
नव्या वाटा ह्या कायमच उपलब्ध असतात, अगदी इंग्रजी ब्लॉगजगतामध्ये सर्व काही पादाक्रांत झालंय असा दावा कुणीही करणार नाही, त्यामुळे नव्या वाटा अन नव्या विचारांसाठी आत्ता लिहिणार्‍या किंवा लिहिण्याचा प्रयत्न करणार्‍यांना कमी गुणवत्तेचे, ट्रिव्हियल, स्वकीयांच्या जीवनशैलीची अपरिहार्यता साजरी करणारे वगैरे म्हणणं हे चूक आहे. जोवर लेखन होत नाही, तोवर ते वेगळं आहे की नाही हे कसं कळेल? तेव्हा कायम उपलब्ध साहित्याबद्दल बोंब ठोकण्यापेक्षा किंवा व्यक्त होण्याचा प्रयत्न करणार्‍यांना शेरेबाजीनं नामोहरम करण्यापेक्षा प्रत्येकाचंच स्वागत आणि कौतुक करायला काय हरकत आहे? इंटरनेटची लोकशाही तर सर्वोच्च प्रकारची लोकशाही आहे आणि ती तितक्याच उच्च दर्जाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्यही देते. तर आपलं स्वातंत्र्य आपण इतरांच्या अभिव्यक्तीला अधिक फुलवायसाठी वापरायचं की दडपायसाठी ते प्रत्येकानं ठरवायचं.

टीप - काल नजरचुकीने काही वाक्यांची दोन परिच्छेदांमध्ये पुनरूक्ती झाली होती. ती दुरूस्त केली आहे.

8/12/2010

कैच्याकै

माझा जन्म पुण्याचा आहे आणि मी मुंबईत लहानाचा मोठा झालो. मला ठाऊक आहे, की मी हे इतक्या वेळा सांगितलंय, की 'माझा जन्म..' हे वाचल्यावर पुढचं वाक्य लिहायचीही गरज उरणार नाही मला. तरीही पुन्हा सांगतो, कारण ह्या माहितीची पुढच्या लेखाला तेव्हढीच गरज आहे, जेव्हढी मुक्तपीठ वरच्या प्रतिक्रिया एन्जॉय करण्यासाठी लेख वाचण्याची.

तर असं आहे, की माझे वडील सातार्‍याचे आणि ते माझ्या जन्माआधी मुंबईत येऊन बरीच वर्षं झाली होती. त्यामुळे त्यांची भाषा वेगळीच पण बर्‍यापैकी मुंबईकर झाली होती. आई कोकण/पुण्याची त्यामुळे तिचा वेगळाच शब्दसंग्रह, ज्याला मुंबईकर मराठीचा तडका. आता मागचं वाक्य नीट पहा. फोडणी नव्हे, तडका. हे मुंबईकर मराठी. फोडणी पुणेरी भाषेची असते, आमचा तडका. कारण मुंबईकर मराठीवर गुजराती, हिंदी आणि हल्लीची पोरं इंग्रजी शाळांमध्येच जात असल्याने इंग्रजीचे मुख्यत्वेकरून संस्कार आहेत. बरं इथे मी मध्यमवर्गीय मुंबईकर मराठीची गोष्ट करतोय. उदाहरणार्थ, 'वांधा' हा शब्द मूळचा बहुधा गुजराती लोकांचा आहे, पण मुंबईत मराठी काय सगळ्यांच भाषांमध्ये वापरतात. 'तडका' हा पंजाबी/हिंदी शब्द असाच अलगद मराठीत वापरला जातो. सगळ्यात मस्त गोष्ट 'बिंदास' ह्या शब्दाची आहे. मूळ मराठी शब्द 'बिनधास्त', त्याचा दाक्षिणात्य लोकांनी अपभ्रंश केला, 'बिंदास'. हा शब्द मुंबैय्या(भैय्या शी यमक जुळतो नै!) हिंदीत दत्तक गेला आणि मजेशीर गोष्ट ही, की हल्ली मराठी माणसं सुद्धा 'बिंदास' असा उच्चार अगदी बिंदास करतात.

तर नेहमीप्रमाणेच मी विषयावरून वाहावत गेलो. मूळ विषयावर परत येऊ. माझ्या घरी असं जबरा मराठी भाषिक वैविध्य असल्याने, माझं मराठी स्पेशल असणं भाग होतं. पण पुलं म्हणतात ना, 'नारळ आणि मुलगा, कसा निघेल ते सांगता येत नाही', तस्मात आमचं मराठी हे 'ना घर का, न घाट का' असं झालं. मागच्या वाक्यात वापरायला मला मराठी म्हण सापडेना. हां आत्ता आठवली, 'कशाचं काय अन् फाटक्यात पाय'. चुकीची असावी बहुधा, पण असो. आम्ही प्रयत्न तर केला.

हां, तर आमच्या मातोश्री कोकणात शाळा आणि पुण्यात कॉलेज अन् नोकरी केलेल्या. त्यामुळे फटकळ शब्दांचा संग्रह त्या योग्य वेळी बटव्यासारखा मोकळा करतात. 'खुटापर्‍यागत बसू नकोस', 'निवणं करून कशासाठी बसले आहात', 'सपाज्ञा देउ नकोस (की करू नकोस?)' हे आणि असे अनेक वाक्प्रचार मला कळतात, पण मला योग्य वेळी इतक्या वर्षांचा दांडगा श्रवणानुभव असूनही वापरता येत नाहीत. पण तिच्या बोलण्यात पुणेरी तिरकसपणापेक्षा कोकणी फटकळपणा जास्त आहे. त्यामुळे ती रागावून बोलली तरी तिलाच जास्त त्रास होतो. आम्हा दगडांना सहसा जास्त काही वाटत नाही. उलट बाबांची केस आहे. बाबांचा शब्दसंग्रह सातारी आहे. ते कधीच 'चावी' वापरत नाहीत, फक्त 'किल्ली'. ते भाज्या कापू शकत नाहीत, फक्त 'चिरता' येतात. 'टोमॅटो' चं स्पेलिंग अचूक ठाऊक असूनही, ते फक्त 'टामाटू'च खातात, माझ्यासाठी ते नेहमी 'बारके बारके' पेरू आणतात आणि 'मामुली' गोष्टींमुळे त्यांना फरक पडत नाही. सातारी लोकांना सहसा वाक्प्रचार ह्या भाषाविशेषाविषयी प्रेम नसतं, तद्वत माझे वडिल वाक्प्रचारांच्या फंदात पडत नाहीत. पण रांगडेपणा भरपूर. बोलताना फारसा विचार करायचा नाही. फटकळ नव्हे, लहेजाच रांगडा. म्हणजे उदाहरणार्थ. "नमस्कार, काय म्हणता?" च्या ऐवजी, "काय लेका, हैस कुठं?" अर्थात बाबांच्या मूळ भाषेलाही मुंबईचा तडका बसलाय, त्यामुळे हे 'लेका' वगैरे मी सातार्‍याला गेल्यावर माझ्या आतेभावाच्या तोंडूनच ऐकतो.

बरं मी मराठी शाळेत शिकलो. पण सगळी पोरं शहरीच आणि शाळेतलं मराठी आपलं प्रमाणित अधिकृत मराठी असतं. त्यामुळे काही विशेष बदल संभवत नव्हता. पण माझ्या इमारतीमध्ये राहणार्‍या इंग्रजी मिडियमच्या पोरांमुळे आणि त्यांच्या 'बड्डे' ला केक खायला जात असल्याकारणे माझ्या शब्दसंग्रहात, आमच्या 'बिल्डिंग'ची 'बॅगसाईट' (मागची बाजू) आणि 'टेरेस' अशी भर पडली होती. भरीस भर म्हणून मी क्रिकेट खेळताना 'फास बॉल' टाकायचो आणि बरेचदा 'क्लीन बोल्ट' व्हायचो. आणि मी बिल्डिंगमधल्या लहान पोरांमध्ये गणना होत असल्याने बरेचदा 'इंटर पिंटर' असायचो (म्हणजे दोन्ही टीम कडून खेळायचो, 'लिंबू टिंबू' ह्या मराठी कारकुनाला 'अकाउंटंट' म्हणायची पद्धत आहे ती). मग इंजिनियरिंग कॉलेजात पोचेस्तोवर हळूहळू अनेक रोजच्या वापरातले शब्द इंग्रजी झाले होते. पण वर्गातल्या हॉस्टेलाईट पोरांच्या विविध भाषांशी ओळख होऊ लागली होती. सगळ्यात लगेच लक्षात येणारा लहेजा म्हणजे नागपुरी. "अबे काय करून राहिला बे तू?" "मी इथे तुझी वाट पाहून राहिलो न बे!" ही वाक्यरचना मला जाम म्हणजे जाम आवडते. पण नागपुरी पब्लिकची दुसरी सवय म्हणजे आपापसात बरेचदा हिंदीत बोलतात. हे मला न उलगडलेलं कोडं आहे. बाकी वैदर्भीय बंधूंची बोली ही नागपुरीसारखीच थोडीफार, पण त्यातही व्हेरियेशन्स असतात. त्यांना आपापसात बरोबर कळतं कोण कुठला आहे. माझा त्यामध्ये विशेष अभ्यास नसल्याने आत्ता जाऊ दे.

पुढे नोकरीला लागलो तर तिथेही माझ्या पुढच्याच टेबलवर माझा मित्र नागपुरी. बरेच दिवस त्याच्याबरोबरच प्रोजेक्टवर होतो. त्यामुळे नकळत मी त्याच्याशी त्याच्याच बोलीत बोलायला लागलो. ही माझी समस्या आहे. माझा लहेजा फार सहजपणे समोरच्यासारखा होऊन जातो. ६वी-७वीत असताना मी महिनाभर वडगाव बुद्रुकला राहिलो होतो, माझ्या आजोबांच्या घरी. तिथल्या गावातल्या पोरांबरोबर खेळायला जायचो. आईलाच माझ्या लहेजाची काळजी लागली. पण मग मुंबईत परतल्यावर महिन्याभरात मी नॉर्मलला आलो.

तर माझ्या ह्याच समस्येचा मला सध्या भारी त्रास होतोय. त्याचं झालं असं.

मी मराठी ब्लॉग विश्वामध्ये जानेवारी २०१० मध्ये इवल्याश्या पावलांनी, दबकत दबकत चंचुप्रवेश केला. गरीबासारखा पोस्टा लिहायचो. चार-दोन भली माणसं, 'मराठी ब्लॉग विश्व' च्या कृपेनं चक्कर टाकून जायची. एखादा अतिशय भला भेटदाता, प्रतिक्रियाही देऊन जायचा. मी सुखावायचो. काही प्रथितयश ब्लॉगकारांचे ब्लॉग्ज आणि त्यावरच्या प्रतिक्रियांचा पाऊस पाहून डोळे दिपून जायचे. कधीतरी आपला ब्लॉगही असा होईल का? अश्या निरर्थक स्वप्नांमागे मन दुडूदुडू धावायचं. हो दुडूदुडू, कारण तेव्हा मी मराठी ब्लॉगिंगमधलं बाळ होतो. अर्थात अजून मोठा झालो नाहीये, पण तेव्हा बाळ होतो हे कन्फर्म. तर अश्या वेळी, एक फरिश्ता माझा फॉलोअर झाला. त्याचं नाव मी सांगत नाही, पण आडनाव पत्रे होतं. त्याचं नाव सांगायला मला फार आनंद झाला असता, पण असो. आणि माझा आत्मविश्वास दुणावला. मग मी अजून जोमाने आपल्या मतांची पिंक टाकायला लागलो. मग कळलं, की जितकं जास्त वाचेन तितकं जास्त लिहिता येईल, मग मी अजून ब्लॉग्ज वाचायला घेतले. त्या फरिश्त्याशी नेट ओळख झाली. मग अनेक प्रथितयश ब्लॉगर्सच्या ब्लॉग्जवर प्रतिक्रिया देऊन देऊन त्यांच्याशी ओळखी काढल्या. मग गुगल बझ नामक एका झंझावातानं अनेकानेक ओळखींची कवाडं उघडली. रोजच्या रोज कित्येक मराठी ब्लॉगर्स आणि ब्लॉगवाचकांशी ओळखी झाल्या आणि इथेच घात झाला.

महाराष्ट्राच्या नव्हे भारताच्या नव्हे जगाच्या कानाकोपर्‍यातल्या अनेकानेक लोकांशी रोजच्या रोज बोलण्यामुळे माझ्या भाषेची वासलात लागली. आयडेंटिटी क्रायसिस निर्माण झाला. मीच हरवलो. हे म्हणजे, अमिताभपासून सगळ्या गायकांच्या आवाजात गाणी गाऊन गाऊन सुदेश भोसलेंचा स्वतःचाच आवाज कुणाला ठाऊक नाही, तसं झालं. इतके विविध शब्द माझ्या संग्रहात आलेत की हल्ली मी जे लिहितो, ते मीच लिहिलंय का असा प्रश्न मला पडतो. बरं, हे शब्द स्पेशल आहेत. ते अर्थांसकट इथे मी स्वतःच्याच आठवणीसाठी देतोय. जेणेकरून आजपासून काही वर्षांनी जेव्हा माझी भाषा पुन्हा एकदा बदलून गेली असेल, तेव्हा हा लेख मला माझ्या आजच्या स्थितीची कल्पना देईल.

१. भारी - भारी म्हणजे मुंबईकर मराठीत झकास. मी भारी हा शब्द दोन-तीन महिने पूर्वीपर्यंत कधीच वापरला नसेल. आणि आजच्या तारखेला, ह्या शब्दाशिवाय माझा दिवस पुरा होत नाही. कुठलीही चांगली गोष्ट 'भारी'च असते, असा माझा ठाम समज झालाय.

२. प्रचंड - प्रचंड हा शब्द मी पुस्तकात कित्येकदा वाचलाय, पण मी बोलीभाषेत तो वापरेन असं मला कधी स्वप्नातही वाटलं नसेल. आज मी हा शब्द कशाच्याही मागे लावतो. 'तो प्रचंड त्रास देतोय मला' पासून 'त्याने प्रचंड वेळ काढला.'

३.प्रचंड भारी - हे डेडली कॉम्बो आहे. प्रचंड भारी म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री आहे. एखादी गोष्ट प्रचंड भारी आहे म्हणजे अतिशय सुंदर किंवा अतिशय झकास किंवा अतिशय .... भारी आहे!

४. कैच्याकै भारी - ओके, आता ह्यासाठी मला कैच्याकैचा अर्थ सांगावा लागेल असं तुम्हाला वाटत असेल तर त्याची अजिबात गरज नाही. कैच्याकै भारी म्हणजे 'ब्युटिफुल, मोअर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल' मधल्या 'मोस्ट ब्युटिफुल' सारखं आहे. म्हणजे, ह्यापुढे उच्च दर्जा नाही. ह्यापुढे दाद असूच शकत नाही. उदाहरणार्थ, लतादीदी कैच्याकै भारी गातात, सचिन तेंडुलकर कैच्याकै भारी क्रिकेट खेळतो आणि विद्याधर भिसे कैच्याकै भारी पकवतो. ओके, शेवटचा वाक्यातला प्रयोग चुकलाय पण असो.

थोडक्यात, कुठल्याही विशेषणापुढे 'प्रचंड' आणि 'कैच्याकै' हे लावता येतात. पण 'कैच्याकै' वेगळा वापरला तर मात्र अर्थ बदलतो बरं का. तेव्हा इथे थोडं सांभाळावं लागतं.

५. कैच्याकै - कैच्याकै ह्या शब्दाचा 'काहीच्या काही' ह्या शब्दसमूहाशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. हां, काही भाषाप्रभू कैच्याकै हे अपभ्रंश झालेलं रूप असल्याचा दावा करतील, पण करोत बापडे. आमच्या मते ते फक्त 'होमोफोन्स' (सारखा उच्चार असलेले) आहेत. पण, ह्याच भाषाप्रभूंमुळे काही लोक कैच्याकै ला 'काहीच्या काही' च्या ऐवजी वापरतात. कैच्याकैचा खरा(!) अर्थ 'आऊट ऑफ धिस वर्ल्ड' असा आहे. आता कुणी म्हणेल, मराठी काय अर्थ. अरे मनुष्यांनो, हा एकमेवाद्वितीय शब्द आहे. मराठीत ह्या शब्दाला समानार्थी शब्दच नाहीये. आणि इंग्रजीतही अख्खा शब्दसमूह वापरावा लागला.

६. निवांत - हा शब्द मी पुस्तकांमध्ये वाचला होता, पण मग हल्ली ब्लॉग आणि बझच्या कृपेने मीदेखील सर्रास वापरू लागलोय. कुणी विचारलं काय चाललंय, की मी 'निवांत' असं उत्तर देईन हे मला ५ महिन्यांपूर्वी कुणी म्हणालं असतं तर मी निवांतपणे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असतं.

७. अशक्य - अशक्य ह्या शब्दाचे 'शक्य नसलेलं' ह्यापलिकडेही अर्थ आहेत, हे जर नेपोलियनला वेळेत कळलं असतं, तर त्यानं त्या शब्दासकट डिक्शनरी छापली असती. अशक्य म्हणजे 'प्रचंड' आणि 'कैच्याकै' ह्यामधली पातळी. अशक्य सुंदर म्हणजे अतिशय सुंदर. ऑन सेकंड थॉट्स, असं पाहिजे - 'भारी, प्रचंड भारी, अशक्य भारी'. कैच्याकै म्हणजे 'आऊट ऑफ धिस वर्ल्ड' आहे ना! पण अशक्यचा दुसरा अर्थ म्हणजे 'शब्दांपलिकडे' म्हणजे 'कैच्याकै' सारखं नाही, ऍक्च्युअली कशासारखंच नाही. म्हणजे, आता बघा, एखाद्यानं तुम्हाला तुमच्या आवडत्या मुलीसमोर दुसर्‍याच मुलीबद्दल चिडवलं, तर तुमच्याकडे काय शब्द असतात त्याच्यासाठी? मागचा प्रश्न नीट वाचा मी शब्द म्हणतोय, शिव्या नव्हे. असा शब्दांपलिकडला आशय सभ्यपणाने व्यक्त करायचा असेल तर, 'अशक्य आहेस तू!' एव्हढं म्हणता येईल.

आता असा शब्द जो मी अभिजीत वैद्यला भेटण्यापूर्वी ऐकलाही नव्हता आणि आता सर्वांत जास्त वापरतो.

आवरा - 'आवरा' हा शब्द मी ऐकला नव्हता असं नाही. 'चला आता दप्तराचा पसारा आवरा नाहीतर फटके मिळतील' अश्या आशयाने ऐकला होता. पण आवरा हे पाणचटपणाचं एकक आहे हे मला अभिजीतमुळे कळलं. एखाद्या लेखावर खूपच 'आवरा' कॉमेंट्स येताहेत, किंवा अमकातमका 'आवरा' फॉर्ममध्ये आहे ,अश्या पद्धतीने ते विशेषण म्हणूनही वापरलं जातं. आता ते विशेषण आहे म्हटल्यावर, आवरा, प्रचंड आवरा, अशक्य आवरा आणि कैच्याकै आवरा असेही वाक्प्रयोग हल्ली मी बरेचदा करतो.

आता लोकं 'आवरा' म्हणण्याच्या आत ही साता उत्तरांची कहाणी साठा उत्तरीं सुफळ संप्रूण(संपूर्ण) करतो!

विशेष टीप - वरती शब्दांचा क्रम हा त्यांची प्राथमिकता किंवा महत्व दर्शवत नाही, तो कसाही आहे. आणि 'आवरा'ला अनुक्रमांक न देणं हे त्याचं निर्विवाद वर्चस्व दर्शवण्यासाठी वापरलं गेलेलं 'गिमिक' आहे.

2/01/2010

झेंडा

ही नोंद झेंडा चित्रपटामुळेच लिहित आहे मी, पण ही फक्त झेंडाबद्दलच नाही.  कालच मी झेंडा सिनेमा पाहिला. पाहिल्यावर मनात संमिश्र भावना होत्या. मराठी मनाची चलबिचल टिपण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न, असं झेंडाचं साधारण वर्णन होऊ शकतं. झेंडा काही मोठे आणि कळीचे प्रश्न उभे करतो. पण त्या प्रश्नांची जी उत्तरं तो देतो, ती सगळ्यांनाच पटतील असं नाही. झेंडा कमालीचा अस्वस्थ आणि त्याहूनही जास्त निराशावादाकडे झुकणारा सिनेमा आहे. अर्थात कुठल्याही सिनेमाचे असतात तसे झेंडाचेसुद्धा स्वतःचे असे क्षण आहेत. आणि ते अतिशय छान जमलेत ते कलाकारांच्या तितक्याच सरस अभिनयामुळे. "विठ्ठला" हे गाणं अप्रतिमच. राजेश सरपोतदारचं पात्र निभावणारा राजेश शृंगारपुरे आणि संतोष जुवेकर हे माझ्या मते अप्रतिम आणि सिनेमातले काही चांगले हलके-फुलके प्रसंग चिन्मय मांडलेकरला मिळाले आहेत आणि तो त्यांच सोनं करतो. बाकी, सिनेमाचा शेवट मला तितकासा पटला नाही, पण प्रत्येकाची आपली मतं असतात.

मी झेंडा पहायला आणि शिवसेना-रा.स्व.संघ वाद पेटायला एकच गाठ पडली. आमचं अख्खं घर संघवाल्यांचं आहे. माझेही सुरूवातीचे संस्कार संघाचे आहेत. पण मी वेगळ्याच विचारांचा आहे ह्याचा प्रत्यय मला वेळोवेळी येत राहातो. तसंच, यावेळीही. उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे संघाने यात पडायलाच नको होतं. संघाचे काय विचार आहेत, हे विचारलंय का कोणी? उगाच हात दाखवून अवलक्षण. करूनच्या करून कॉन्ग्रेस नामानिराळी राहिली आणि हे भांडतायत आपापसांत. महाराष्ट्राची इमेज खराब होतेय म्हणून आपले मुद्दे न मांडणे म्हणजे पळ्पुटेपणा आहे. त्या येड्डियुराप्पांना असते का कर्नाटकाची इमेज खराब व्हायची काळजी? करुणानिधिला वाटते का देशभराच्या प्रसारमाध्यमांना तामिळमध्ये मुलाखत देताना लाज? मग आमचे गडकरी कशाला लगेच भाजप प्रांतवादी नाही म्हणून सफाया देत फिरतायत? कोणी विचारलंय का तुम्हाला? आणि असाल तुम्ही प्रांतवादी तर त्याने कुणाला काय फरक पडतोय? त्या आत्महत्या करणा-या शेतक-यांनाही फरक पडत नाही आणि स्फोटांमध्ये मरणा-या सामान्य माणसालाही फरक पडत नाही. तुमचा खेळ होतोय श्रेयासाठी, पण अब्रू मराठी माणसांची जातेय.

आज गेली पन्नास वर्षं "जय हिंद! जय महाराष्ट्र!" म्हणूनही मराठी माणसांना धमक्या दिल्या जात आहेत. आणि मराठी माणसांना एकराष्ट्रीयत्वाचा शहाणपणा कोण शिकवतंय, तर आपले लुंगिशिवाय इतर कोणत्याही पेहरावात न दिसणारे माननीय गृहमंत्री चिदंबरम. आता त्यांना विचारावंसं वाटतं, की तुम्हाला जसा तुमच्या तामिळचा अभिमान आहे, तसा आम्हाला आमच्या मराठीचा आहे, मग तो आम्ही आमच्या राजधानीत दाखवला तर चुकलं कुठं? तुमच्या चेन्नई (सॉरी, आपली नाही का?) पेक्षा तरी आम्ही निश्चितच सहिष्णु आहोत. किमान हिंदीत बोलल्यावर अपमान तरी नाही करत आम्ही!  आणि पुन्हा, आम्ही आज जे थोडे काही जागे झालो आहोत, ते पन्नास वर्षे परप्रांतियांकडून संपूर्ण विकास करून घेतल्यावर (लालू-नितीश असंच कायसंसं म्हणतात). ते ही केव्हा, जेव्हा इकडे मराठी गाणी एफ.एम. वर लावण डाउनमार्केट म्ह्टलं जाउ लागलं. जेव्हा मुंबईतल्या शाळेमध्ये मराठी शिकवण्याच्या सक्तिविरूद्ध कोर्टकेस झाली. जेव्हा दुकानांची बोर्डं मराठीत लावली तर धंद्यावर परिणाम होतो असं म्हणणारे लोक उघड माध्यमांमध्ये स्टार बनवले जाउ लागले. जेव्हा बेरोजगार मराठी पोरांच्या घरी येणा-या पेपरांमध्ये महाराष्ट्रातल्याच भरतीच्या जाहिराती गेली कित्येक वर्षे येत नाहीत, हे तेव्हढीच वर्षे बिहारचे रेल्वे मंत्री झाल्यावर लक्षात आलं. जेव्हा महाराष्ट्रात चाळिस वर्षे राहून, भरभरून पैसे कमावून पुन्हा "हम यूपी वाले हैं, हिंदी में ही बोलेंगे, महाराष्ट्रवाले हमें माफ करें!" असं प्रसारमाध्यमांसमोर आढ्यतेने आणि चेह-यावर छद्मी हसू आणून म्हणण्याची काही अतिशहाण्यांची हिम्मत व्हायला लागली. जेव्हा महाराष्ट्रातून, दोन जागी विधानसभेवर निवडून जाणारा आमदार, जो फक्त प्रक्षोभक भाषणे द्यायचा तो फक्त लोकांना डिवचण्यासाठी हिंदीत शपथ घेण्याची स्टंटबाजी करू धजावला आणि राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये हीरो ठरवला गेला. जेव्हा महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये टॅक्सी चालवण्यासाठी परवाना मिळवतानाही मराठीची सक्ति नको हे सांगयला बिहारचा मुख्यमंत्री उठला आणि आमचे सन्माननीय मुख्यमंत्री (जे स्वतः आणि त्यांचे पूर्वसुरी गेली कित्येक वर्षं दिल्लीत बायकांच्या साड्यांना इस्त्र्या करत आलेत.(अगदी झेंडात म्हटलंय तसं) )सरकारच्या गेले कित्येक वर्ष अस्तित्वात असलेल्या कायद्यावरून मागे फिरले. आणि जेव्हा स्वतः कुठेही कुठल्याही माणसांमध्ये एकमेकांशी अगदी ठासून गुजराती बोलणारे गुजराती आम्हाला आमच्याच राज्यात चारचौघांमध्ये हिंदीत बोलण्याचे धडे द्यायला लागले.

तसं बघायला गेलं तर उशीरच झाला म्हणायचा. आधीच जर हिंदी बोलणा-यांचा अपमान केला असता, तर कमीतकमी दुस-यांकडून प्रगती करून घेतल्याचं पातक तरी लागलं नसतं. बॉम्बेचं मुंबई केल्यावर आपली खिल्ली आवर्जून चेन्नई म्हणणा-या चिदंबरम साहेबांनी तरी कमीत कमी उडवली नसती. अरे हो पण तेव्हा कदाचित चिदंबरम साहेबांना हिंदी आलं असतं.

ता.क. - आता राहुलजी गांधींच्या मते, बिहारी आणि यू.पी. च्या कमांडोनी मुंबईला दहशतवादी हल्ल्यातून वाचवलं. आपण वेडेच की, करकरे, साळसकर आणि कामटे मुंबईला वाचवायला गेलेच नव्हते. तुकाराम ओंबाळे मूळचे बिहारी आहेत. आणि, मेजर उन्नीकृष्णनसुद्धा यू.पी.बिहारचेच. जाउ दे, आपण असल्या मूर्ख आणि अक्कलशून्य वक्तव्यांना कशाला भाव द्यायचा म्हणताय? खरं आहे हो, पण ह्याच गृहस्थांच्या वक्तव्यांना आजच्या तरुणाई्चं प्रतिबिंब मानतात हो.

1/30/2010

म-मराठी ब्लॉगचा

मी आता आठवड्यातून किमान एक तरी पोस्ट मराठीतून लिहिण्याचं ठरवलं आहे. आता, तसं बघायला गेलं तर माझी आठवड्यातून एक पोस्ट (इंग्रजी) होण्याचेसुद्धा वांधे असतात, पण 'एक बार जो मैंने कमिटमेन्ट कर ली, फिर मैं अपने आप की भी नही सुनता।' आता अगदीच स्वतःचं नाही ऐकणार असं नाही, पण एकदा डायलॉग आठवला की तो बोलून टाकावा. काय आहे अशी अचानक खुमखुमी येण्याचं कारण? आता कसं आहे, मी आपला सहज ऑफीसमध्ये बसलो होतो आणि काही निरुपयोगी विरोप(इ-मेल्स) काढत होतो. काही दिवसांपूर्वीच माझ्या एका मित्राने मला डॉ. सलील कुलकर्णींचा एक लेख पाठवला होता, तो न वाचताच तसाच ठेवला होता. मग तो वाचताना मला अमॄतमंथन ह्या ब्लॉगबद्दल कळलं. आणि तिथून मग मी मराठीब्लॉग्स.नेट वर पोहोचलो. आणि तिथून उघडले स्वर्गाचे द्वार. मी वेगवेगळे आणि तितकेच वेगवेगळ्या विषयांवरचे, चांगले ब्लॉग्स पाहिले आणि अनेक दिवसांची सुप्त इच्छा जागी झाली.

तसा मी ब्लॉगिंगला सरावलेलो आहे. मी इंजिनीयरिंग कॉलेजच्या दुस-या किंवा तिस-या वर्षापासून इंग्रजीमध्ये ब्लॉग लिहायला सुरुवात केली. माझा एक मित्र आहे, ज्याच्यामुळे मी ब्लॉगची सुरुवात केली, त्याला पब्लिसिटी आवडत नाही म्हणून त्याचं नाव देत नाही. सुरुवात मजा म्हणून आणि मित्राची बरोबरी म्हणून केली. कॉलजातल्या फालतू गोष्टी, छोटी-मोठी भांडणं अशी सुरुवात झाली. मग मधेच इतरांच बघून तत्वज्ञान किंवा बिलकुल न जमलेला विनोदी लेख. इंजिनियर होता होता थोडी अक्कल आली म्हणा किंवा मोठा झालो म्हणा. तोवर जागतिक सिनेमाचं वेड लागलं होतं. तेवढी एकच कमाई, कारण ते वेड आयुष्यभर छान साथ करेल. तर त्या वेडाबद्दल ब्लॉग्पोस्ट व्हायला लागल्या. पण अजूनही म्हणावी तशी मजा येत नव्हती.  नोकरीला लागलो. ब्लॉग लिहिणं मात्र सोडलं नाही कधी. काहीही का असेना, लिहीत राहिलो. शालेपासुन असलेला लिखाणाचा नाद असा पूर्ण करत राहिलो. मग अनेकांचे ब्लॉग्स वाचले. आणि जाणवायला लागलं, की आपल्याला नक्की जे वाटतं ते सांगण्यासाठी ब्लॉग हे उत्तम व्यासपीठ आहे, आणि मी आत्तापर्यंत ते जसं सांगयचा प्रयत्न केला तो सौंदर्यवादी दॄष्टिकोनातून चांगला नव्हताच पण सुरुवातीला बालिशही होता.

आताशा विचारहि स्थिरावायला लागले होते, थोडक्यात म्हणजे माझा शाहरुख पासून आमिरकडे प्रवास सुरू झाला होता. मग मी माझा जुना ब्लॉग माझ्या कॉम्प्युटरवर जुन्या आठवणी म्हणून साठवला आणि मोठ्या जड अंतःकरणाने मी इंटरनेटवर माझ्या ब्लॉगचं विसर्जन केलं. आणि जन्म झाला ह्या ब्लॉगचा. आताशा चांगला जम बसला आहे. हां अजूनही कोणी फारसं वाचत नाही, पण मी मनापासून लिहितो. आता माझे पोस्ट आशुतोष गोवारीकरच्या सिनेमांसारखे लांबलचक असतात, त्याला मी काय करणार. पुन्हा मी कवी ग्रेस यांच्यासारखं लिहीणार तर, पु. ल. देशपांड्यांसारखी लोकप्रियता कशी मिळणार. असो. मुद्दा तो नाही. मुद्दा हा, की आता काही दिवसांपूर्वीच मी सगळ्या भारतीय भाषांमध्ये लिहिण्याचं प्लगिन बसवलं. आणि मराठीत लिहिण्याचा विचार करत होतो, पण एवढी मेहनत करायची हिम्मत होत नव्हती. मग, एवढे सारे मराठी ब्लॉग्स वाचून माझ्या इच्छेला बळ मिळालं.

आता, मराठीत लिहायचं हे ठरलं, पण सुरूवात करायची कुठून? मग, माझ्या ब्लॉगच्या जन्मकथेपासूनच सुरू केलं. कित्येक दिवसांपासून ठरवतोय, हे सगळं सांगायचं म्हणून, पण मातृभाषेत म्हटलं तशी चट्कन लिहून झालं. (आता तुमच्यापासून काय लपवायचं, जितक्या चट्कन विचार आले, त्याच्या दसपट वेळ मराठीत TYPE करण्यात गेला.) तर अशी ही माझ्या ब्लॉगची साठा उत्तरांची कहाणी साता उत्तरी सुफळ संप्रूण (संपूर्ण)!