Showing posts with label आवरा. Show all posts
Showing posts with label आवरा. Show all posts

9/09/2014

आवर रे -५

"तुला माहितीय डी. एका लेखकासाठी सर्वांत वाईट काळ कुठला असतो?" दृष्टद्युम्नानं तोंडातल्या सबवे सॅंडविचच्या महत्प्रयासाने तोडलेल्या तुकड्याचे चावे घेणं चालूच ठेवत उत्सुकतेचे खोटे भाव चेहर्‍यावर आणत बभ्रुवाहनाकडे पाहिलं.
"स्वतःच्याच साहित्याची कीव येणं" बभ्रुवाहन कुठेतरी दूर नजर लावत म्हणाला.
डी अजूनही चावेच घेत होता. लेट्युस, काकडी, टोमॅटो, भोपळी मिरची, कांदा, ऑलिव्ह आणि नावं माहित नसलेले कित्येक सॉसेस मिश्रित तो एकच घास बब्याच्या सहनशीलतेचा घास घेण्यास समर्थ होता.
"डी!" काहीच उत्तर न आल्याने अभिमानाची तंद्री मोडल्यानं बब्या वैतागून ओरडला. "मी काहीतरी वक्तव्य केलं"
डी अजूनही चावत होता.
 बब्या असहायपणे त्याचा घास संपण्याची वाट पाहत होता. डी पुढचा घास घेण्यासाठी हातातल्या सॉसेसनी लडबडलेल्या आणि चहूबाजूनी भाज्या बाहेर ओघळत असलेल्या अर्धवट उघडलेल्या पुडक्यामध्ये जागा शोधत होता.
"डी, पुढचा घास घेण्यापूर्वी जरा थांब."
"अरे किती चावशील!" डी घास चावून संपल्यावर म्हणाला.
"इतक्या फालतू कोट्या करतोस म्हणून तुला मित्र नाहीत."
"I don't have friends, Watson. I have 'a' friend." डीनं डायलॉग मारला.
"आवरा!"
"लवकर काय बोलायचं ते बोल. मला ह्या सबवेसोबतच्या युद्धाचा पुढचा राऊंड सुरू करायचाय."
"अरे हो. मी म्हणत होतो. एखाद्या लेखकासाठी सर्वांत वाईट काळ म्हणजे.."
"...स्वतःच्याच साहित्याची कीव येणं"
"तू ऐकलं होतंस तर."
"त्यानं काय फरक पडतो."
"म्हणजे, ऐकलंस तर ऐकल्याचं किमान दर्शवायला नको?"
"त्यानं नाही रे, स्वतःच्याच साहित्याची कीव आल्यानं काय फरक पडतो?"
"अरे असं कसं. नवीन काही लिहायची इच्छा मरून जाते."
"तू 'रायटर्स ब्लॉक' हा शब्द ऐकला आहेस का?"
"हा 'रायटर्स ब्लॉक' नाहीये!" बब्यानं झटकन उत्तर दिलं.
"Interesting." डीनं पहिल्यांदाच संभाषणात लक्ष घातलं. "हा नाहीये म्हणजे.. तू स्वतःबद्दल बोलतोयस का?"
"अलबत्!"
"तू सध्या लिहित नाहीयेस, बरोबर?"
"बरोबर!"
"मग जरा प्रमाण मराठी बाजूला ठेव."
"विषयांतर होतंय."
"पुन्हा तेच!"
"आता तुला प्रमाण विरूद्ध बोली असा वाद घालायचाय का?"
"मला वाद नकोय, संवाद हवाय"
"काहीही बोलतोयस का आता?"
"कसं वाटतं ऐकायला? म्हणूनच म्हणतोय जरा साधं बोलत जा."
"जरा विषयाला धरून बोलशील का?"
"बरं तू धर बघू विषयाला."
"'विषया' नावावरची कोटी.."
"करत नाहीये मी, मुद्द्यावर ये."
"छान, आता तू मला सांग हे."
"समस्या काय आहे तुझी?"
बब्यानं कपाळावर आठ्या आणत सुरूवात केली. "म्हणजे बघ. स्वतःच्याच पूर्वीच्या लिखाणात कमतरता दिसू लागतात. वाचकानुनय, लोकानुनय, कोट्या, शब्दच्छल वगैरे सगळं पाणचट वाटू लागतं. स्वतःचंच कल्पनादारिद्र्य प्रकर्षानं जाणवू लागतं. बरंचसं लिखाण एकांगी आणि बाळबोध वाटू लागतं."
"एक मिनिट."
"काय?"
"मला अजून एक घास घेउ दे, मग तुझं टीकास्त्र चालू दे, म्हणजे माझा घास संपेपर्यंत तुझं बोलून होईल आणि मग मी पुढच्या ब्रेकमध्ये काही उत्तराचा प्रयत्न करू शकेन."
बब्यानं हतबुद्धतेनं पुन्हा एकदा तंद्री लावली.
"म्हणजे बघ."
"काय?"  बब्याची तंद्री मोडली. वेताळ बोलू लागल्यावर विक्रम जसा दचकत असेल आणि सावध होत असेल तसा बब्या दचकला आणि सावधपणे ऐकू लागला.
"जेव्हा तू हे सर्व निकृष्ट लिहिलं होतंस."
"निकृष्ट?"
"आत्ता तूच तर म्हणालास, कीव येते वगैरे."
"हो पण.." डीनं नेहमीप्रमाणे यॉर्कर टाकला होता. "बरं, पुढे बोल."
"तेव्हा तुझी मनःस्थिती काय होती?"
"म्हणजे?"
"ते लिहिताना, तुझ्या मनात काहीतरी सुरू असेल, एखादी विचारशृंखला, ज्यामुळे तू ते लिहायला उद्युक्त झाला असशील."
"ह्म्म.. कुणास ठाऊक?"
"कुणास नाही, तुला ठाऊक आहे, पण अंतर्मनामध्ये. आत्ता ते तुला आठवणार नाही. पण काहीतरी विचाराने प्रेरित होऊनच ते योग्य-अयोग्याचा अदमास घेत केलेलं लिखाण असणार."
"तू असं का बोलतोयस?"
"असं कसं?"
"म्हणजे.." बब्याची जीभ रेटेना, "प्रमाण मराठी."
"तुला दर्शवायला की संवादांमध्ये प्रमाण वापरणं रूपककथांसाठी ठीक असतं पण वास्तववादी किंवा ललितलिखाणात बोली जास्त शोभून दिसते."
"पुन्हा विषयांतर."
"फारसं नाही. तरीही, पुढे म्हणजे, जरी ते वाचकानुनयी, एकांगी, कोटीपूर्ण, शब्दच्छलयुक्त वाटलं, तरी ती मनोवस्था होती आणि तुझं लेखन हे त्या मनोवस्थेचं प्रतिबिंब होतं. जसा एखादा चित्रकार मनोवस्थेचं एक विस्कळित चित्र जसंच्या तसं उतरवतो, पण दर्दी रसिकांना त्या विस्कळितपणामध्येच एक नादपूर्ण लय सापडते. स्वतः चित्रकारासाठी ते चित्र एक कमअस्सल कलाकृती असते कारण त्याचं प्रतिबिंब त्याला कधीच परिपूर्ण वाटत नाही. किंबहुना अस्सल कलाकाराची ती एक खूणच असते."
"थँक्स!"
"आता कसं!"
"काय?"
"काही नाही."
"म्हणजे मी जे लिहिलंय ते चांगलं असू शकतं तर."
"योग्य शब्दप्रयोग केलास. असू शकतं! कारण सौंदर्याची व्याख्या प्रत्येकाची वेगळी. 'डोरियन ग्रे' प्रत्येकासाठी वेगळा असतो."
"तू एकदम 'एलिट' मंडळींचे डायलॉग मारतोयस डी!"
"जर तुझ्या लक्षात आलं असेल की तू आता सामान्य बोलू लागला आहेस, तर माझ्या कष्टांचं चीज़ झालं असं म्हणेन मी!"
"चीज़ माहित नाही, पण मेयोनीज निश्चितच झालं आहे आणि ते तुझ्या सँडविचच्या कागदावरून ओघळून तुझ्या हातावरून टेबलाकडे झेपावण्याच्या तयारीत आहे."
डीनं त्याच्या स्वभावाला अनुसरून सरळ तो कागद काढून टाकला. बाहेर झेपावणार्‍या भाज्या एका टिश्यूमध्ये गोळा केल्या आणि छिन्नविच्छिन्न सँडविचचे तुकडे ट्रे मध्ये एका टिश्यूपेपरवर गोळा केले.
"पण मी काहीही नवीन लिहू लागलो की मला पूर्वी लिहिलेल्यासारखंच वाटतं आणि सांगितलं तसं सगळंच कृत्रिम वाटू लागल्याने लिहिण्याची क्रियाच निरर्थक वाटू लागते. त्यामुळे लिहायचं सुचत असूनही ते पटत नसल्याने लिहिणं होत नाही. ह्याला 'रायटर्स ब्लॉक' कसं म्हणणार?"
"'रायटर्स शो-ऑफ' म्हणायचं काय?"
"असं काय म्हणतोस रे?"
"हे बघ बब्या. सोप्या गोष्टी अवघड करू नयेत. नाव काय करायचंय तुला? प्रॉब्लेम आहे, तर आहे. उत्तर शोध ना. वपु सांगतात, कुठल्याही समस्येवर तीन गोष्टींशिवाय काहीही उपाय नसतो वेगळा - 'वेळ, पैसा आणि माणसं'. ह्याच्यापलिकडची समस्या जगात अस्तित्वात नाही. आणि मला ते पटतं."
"आहे ना. इच्छाशक्ती. ती कुठून आणणार?"
"बरोबर. सापडलं की नाही उत्तर? डॉ. हाऊसप्रमाणे 'एलिमिनेशन' मेथडनं मिळालं आपल्याला उत्तर. आता करा उपाय!"
"उत्तर माहित असून देता येत नाही अशी समस्या आहे ही."
"बब्या. जेव्हा तू 'मी लेखक आहे' ह्या भूमिकेतून बाहेर पडशील, तेव्हाच त्या 'रायटर्स ब्लॉक' मधून बाहेर येशील."
".."
"प्रत्येक कलाकृती ही तिच्या व्यक्त होण्याच्या क्षणानंतर कलाकाराच्या नजरेतून उतरतच जाते. त्यामध्ये नवीन काही नाही. पण प्रत्येक व्यक्त होण्याच्या क्रियेतून कलाकार आपल्या परिपूर्ण कलाकृतीच्या दिशेनं पावलं टाकत असतो."
"काहीही. हे म्हणजे थॉमस अल्वा एडिसनच्या It just turned out to be a thousand step process सारखं झालं."
"मी निकोला टेसलावादी आहे हे माहित असतानाही, मी एडिसनचं वाक्य चोरेन असं कसं वाटलं तुला?"
बब्या थोडा ओशाळला.
"हाहा!" डी पहिल्यांदाच हसला. "एडिसन टेसलाचं श्रेय चोरू शकतो तर मी एडिसनचं वाक्य नाही चोरू शकत?"
"....."
"बरं ते सोड. मी बोललो ते सिरियसली बोललो. कलाकाराच्या कलाकृतीचे टप्पे असतात - पहिल्या टप्प्यात कलाकृती म्हणजे निव्वळ नक्कल असते, दुसर्‍या टप्प्यात ती प्रेरित असते, तिसर्‍या टप्प्यात ती प्रतिबिंब असते आणि चौथ्या टप्प्यात एकरूपता येते."
"हे कुणाचं चोरलंस?"
"आठवत नाहीये."
"डझन्ट मॅटर. चांगलं आहे."
"चांगलं वाईट शी मतलब नाही रे. फेसबुकवर थोडीच टाकायचंय. तुला मी काय म्हणतोय ते कळलं का?"
"हेच ना की, कलेपेक्षा मोठा होऊ नकोस."
"बरोब्बर. स्वतःची कलाकृती कमअस्सल वाटणं ठीक आहे पण सरसकट कीव वाटणं, व्यक्त होणं निरर्थक वाटणं वगैरे थांबवलं पाहिजे. परिपूर्णतेची आस असणं वेगळं आणि परिपूर्णतेचा ध्यास असणं वेगळं."
"तीदेखील मनोवस्थाच आहे नाही का?"
"नक्कीच!"
"मग त्यावरच एखादा लेख लिहू का?"
ह्या वाक्यानंतर वेताळ परत झाडाच्या फांदीवर जाऊन लटकू लागला, अर्थात डीनं उर्वरित सँडविचकडे मोर्चा वळवला.

3/23/2013

आवर रे-४

(टीप  - पोस्टमधला विषय थोडा संवेदनशील आहे. पोस्टमधल्या मतांबद्दल बरीच मतभिन्नता असू शकते.)

"बब्या!" खणखणीत आवाजात मारलेल्या ह्या हाकेनं ऑफिसचा कॅफेटेरिया दणाणून गेला. बभ्रुवाहनानं मनाशी कितीही ठरवलेलं असलं की 'बब्या' ह्या हाकेला ओ द्यायची नाही, तरी प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे त्यानं आवाजाच्या दिशेनं पाहिलं. चारचौघात अशी हाक मारणारा केवळ 'डी'च असणार ह्याची खात्री आणि आपल्या ऑफिसच्या कॅफेटेरियात डी कसा काय शिरू शकतो ह्याचं आश्चर्य असे मिश्र भाव बब्याच्या चेहर्‍यावर उमटलेले होते.
बब्यानं हाकेला प्रतिसाद दिल्यानं व्हायचं तेच झालं होतं आणि कोपर्‍यात बसलेल्या 'ति'च्यासकट लंचटाईम असल्यानं कॅफेटेरियात उपस्थित जवळपास अख्ख्या ऑफिसला 'बॉबी'चं खरं टोपणनाव कळलं.
जसजसा डी बब्याच्या टेबलाकडे सरकू लागला तसतसं बब्याची 'उद्यापासून आपल्याला एकटंच जेवायला बसावं लागणार' ही जाणीव गडद होऊ लागली. जाणीव पुरती गडद होण्यापूर्वीच डी टेबलापर्यंत पोचला आणि त्यानं 'जरा सरकता का' म्हणून पूर्ण करण्यापूर्वीच बब्याचे मित्र शेजारच्या टेबलावर जाऊन बसले.
"काय  खातोयस?" दृष्टद्युम्नानं पहिला सवाल केला.
"तू माझ्या ऑफिसात काय करतोयस?"
"हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नव्हे."
"तू स्मार्ट आहेस ना फार, मग मी जेवतोय एव्हढं साधं तुला कळू नये."
"तू जेवतोयस हे मला कळलंय विक्रमा, पण तुझ्या ताटात झालेला हा काला नक्की कशाकशापासून बनलेला आहे हे तुला ठाऊक असूनही जर तू मला सांगितलं नाहीस, तर तुझ्या.."
"कळलं कळलं वेताळा." बब्या आजूबाजूला सलज्ज दृष्टीक्षेप टाकत मनातल्या मनात उत्तराची जुळवाजुळव करू लागला.
"ऍज एक्स्पेक्टेड." डी म्हणाला.
"काय ऍज एक्स्पेक्टेड."
"चल ऊठ लगेच." असं म्हणत डी उठून उभा राहिलासुद्धा.
"कुठे ऊठ, बस खाली गपगार. माझा अटेंडन्स कट होईल बाहेर पडलो ऑफिसातनं तर."
"मी कुठे म्हणतोय ऑफिसातनं बाहेर जायला. तुझ्या जागेवर चल, आत्ता तिथे कुणी नसेल नाही का?"
पहिल्यांदाच बब्याला डीचं म्हणणं पटलं.
"पण मग ह्याचं काय?" बब्या ताटाकडे बोट दाखवत म्हणाला.
"मी तुझ्या जागेवर थांबतो. तुला जी काय विल्हेवाट लावायची असेल ती लावून ये." आणि डी निघूनसुद्धा गेला.
बब्यानं भराभर तोंडात घास कोंबले आणि नजरा चुकवत तो आज्ञाधारकपणे डीने सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या जागेकडे गेला.
"अजून १५ मिनिटं शिल्लक आहेत तुमचा लंचटाईम संपायला." डीनं बब्याच्या कॉम्प्युटरवरच्या घड्याळाकडे बघत म्हटलं.
"तू  पीसी अनलॉक कसा केलास?"
"आत्ता तुला खरंच त्याबद्दल बोलायचंय?"
"मग कशाबद्दल बोलायचंय?"
"लेट्स टॉक अबाऊट द एलिफंट इन द रूम."
"व्हॉट एलिफंट." बब्या खांदे उडवत शेजारच्याची खुर्ची ओढून त्यावर बसत म्हणाला.
"अरविंदनं आत्महत्या केली."
बब्यानं एकदम चमकून डीकडे पाहिलं. "त्याबद्दल काय? त्यानं काल आत्महत्या केली आणि त्याच्या उत्तरक्रिया कालच आपण सर्वजण उरकून आलो."
"आपण सर्वजण उरकून आलो पण तू उरकल्या आहेस काय?"
"म्हणजे?"
"बब्या, तुझा सेन्स ऑफ ह्यूमर गेलाय. तू नेहमीसारखा कंट्रोलमध्ये राहायचा प्रयत्न करत नाहीयेस. मला खोडून काढत नाहीयेस. माझ्या प्रत्येक वाक्याला प्रतिमुद्दा द्यायचा प्रयत्न करत नाहीयेस. त्याहीवर म्हणजे चक्क मी सांगितलेलं ऐकतोयस. आणि तुझं म्हणणं आहे की उत्तरक्रिया उरकल्यास."
"ह्या सगळ्याचा आणि उत्तरक्रियांचा काय संबंध?"
"आपल्या वैदिक आणि पौराणिक विचारांप्रमाणे आत्मा मानवी शरीर सोडल्यावर पुढल्या प्रवासाला जातो. त्यामुळे आपण सहसा 'ईश्वर मृतात्म्याला सद्गती देवो' असं म्हणतो, जेव्हा बाकी धर्म 'मृतात्म्यासाठी शांती' मागतात."
"डू यू हॅव अ पॉईंट?"
"बघ, तू मुद्द्याबद्दल बोलणं टाळतो आहेस."
"तू असंबद्ध बोलतो आहेस."
"मी असंबद्ध बोलत नाहीये. मी मुद्द्याकडे येतोय, ज्यासाठी पार्श्वभूमी आवश्यक आहे."
"बरं पुढे." बब्याचा स्वर थोडा रूक्ष झाला होता.
"आपल्या पूर्वजांचा कन्सेप्ट क्लिअर होता. आदमी खतम काम खतम. तो गेला की गेला. उगाच तो आसपास आहे की वर खाली आहे की घुटमळतोय वगैरे नाही. एकदा पिंडदान झालं की माणूस गेला."
"मग ते कावळा न शिवणं वगैरे?"
"ते सगळं जिवंत माणसांची समजूत काढायला. आता उदाहरण देतो, असं बघ, माझं कुणी फार जवळचं गेलं."
"कशाला?"
"अरे उदाहरण आहे. आणि मी माझंच देतोय ना?"
"पण कशाला?"
"तुझं दिलं तर चालेल?"
बब्या शांत बसला.
"तर  माझ्या कुणीतरी जवळचं म्हणजे आपसूकच मला त्या व्यक्तिच्या अपूर्ण इच्छा वगैरे माहित असण्याची शक्यता असणार. मग माझ्या जवळचं म्हणजे मला त्या इच्छा अपूर्ण राहिल्याबद्दल प्रचंड वाईट वाटत राहणार. डाचत राहणार. ते होऊ नये म्हणून मग पिंडदान करत असावेत."
"तुझं म्हणणं आहे की सगळं काही जिवंत माणसासाठीच असतं?"
"एक्झॅक्टली माय पॉईंट. नाहीतर कुणासाठी असणार? अरे आपण माणसं फार स्वार्थी असतो. मृतासाठी वगैरे सगळं बोलायला रे. खरं म्हणजे एव्हरिथिंग इज अबाऊट अस."
"असं का म्हणतोस?"
"त्यात काही वाईट आहे म्हणत नाही मी. इट्स बेसिक ह्युमन नेचर."
"म्हणजे?"
"म्हणजे बघ. माणूस जातो तेव्हा आपण प्रचंड रडारड करतो किंवा प्रचंड दुःख करत राहतो. बोलत नाही, खात नाही, पित नाही. हसणं वगैरे सगळं बंद."
"अरे मग दुःख होऊच नये का?"
"मी कुठे नाही म्हणतो. पण बेसिक गोष्ट ही आहे की ते दुःख कशाबद्दल असतं, तर तो माणूस आपल्याला सोडून गेला. आणि आता आपलं काय होणार."
"मग बरोबर आहे की."
"बरोबर काय आहे? आत्महत्या केलेल्या लोकांबद्दल फुकाची हळहळ व्यक्त करणारे गावभर आहेत."
"अरे म्हणजे काय? वयाच्या ९व्या वर्षापासून २७ व्या वर्षापर्यंत किंवा त्याहीपेक्षा जास्त-कमी असू शकेल, अकाली आत्महत्या करणार्‍यांबद्दल हळहळ व्यक्त करायला नको? किंवा कर्जबाजारी झाल्यानं किंवा इतर कारणांनी वैफल्य आल्याने भरल्या संसारातून उठून जाणार्‍यांचं काय? आपल्या मुलाबाळांना मारून आत्महत्या करणार्‍यांचं काय?"
"मुलाबाळांना मारणं डझन्ट काऊंट ऍज आत्महत्या. आणि बाकीच्यांबद्दल हळहळ व्यक्त करून काय होणार आहे?"
"अरे म्हणजे काय? वाईट वाटतं. ते बरंच काही करू शकले असते आयुष्यात."
"असं कोण म्हणतं? देव काय तुम्हाला कानात सांगायला आलेला?"
"तू देवाचा उल्लेख करतोयस?"
"माझ्या प्रश्नाचं उत्तर दे."
"व्हॉट्स युअर पॉईंट?"
"माझं म्हणणं आहे की माणसानं आत्महत्या करणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि उगाच त्याला गुन्हा वगैरे लेबलं लावू नयेत."
"९ वर्षांच्या मुलानं गणितात फेल झाल्यामुळे आत्महत्या करायची ठरवली तर तो त्याचा प्रश्न कसा ठरू शकतो?"
"का नाही ठरू शकत? जीव त्याचा आहे."
"पण त्याला समज कुठेय पुरेशी?"
"ते ठरवणारे तुम्ही कोण?"
"डी तू बरा आहेस ना?"
"हे बघ. माणूस गेल्यानंतर आपण शोक करणं मी समजू शकतो कारण ते आपलं नुकसान असतं ज्यासाठी आपण आदळआपट करतो. पण आत्महत्या केलेल्या माणसांना ते चुकले होते असं म्हणायचा आपल्याला काही अधिकार नाही."
"असं कसं डी?"
"बरं थांब मी स्पष्ट करतो. आयुष्य म्हणजे काय? मृत्यू म्हणजे काय?"
"डी. माझा लंच टाईम संपत आलाय."
"एक क्लोझेस्ट ऍनॉलॉजी देतो. प्रिझन. अर्थात जेल."
"आता मी म्हणजे कसं काय असं विचारायचं का?"
"हे बघ. जेव्हा माणूस जेलमध्ये जातो तेव्हा तो खूप दुःखी होतो. त्याला रूळायला वेळ लागतो. तो जेलमध्येच असतो. त्याला बाहेरचं जग नसतं. कधीतरी एखादी झलक दिसतेही उंचच उंच भिंतीपलीकडली पण ती खरी का आभास तेही कळण्यापलिकडे मन पोचलेलं असतं."
"युअर पॉईंट बिईंग?"
"आयुष्य म्हणजे एक प्रिझन आहे. आपल्याला जन्माला आल्यावर रूळायला वेळ लागतो. ह्या जगापलिकडे, आपल्या इंद्रियांपलिकडे, ह्या तीन मितींपलिकडे काही जग आपल्याला नाही. कधीतरी आपल्यातल्या कुणालातरी अतिंद्रिय शक्ती जाणवतात, चौथी मिती खुणावते पण मग ती खरी की खोटी, सत्य की आभासी ते कुणालाच सांगता येत नाही. जेलमध्ये जसे लोक छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानतात तसे आपण प्रेम, वाढदिवस, शैक्षणिक आणि व्यावसायिक यश वगैरे गोष्टींमध्ये आनंद मानतो. मानणं भागच असतं नाहीतर आपली शिक्षा भोगून संपायची कशी? डिस्ट्रॅक्शन तर हवं ना?"
"म्हणजे आयुष्य ही शिक्षा आहे तुझ्या मते."
"माझ्याच नाही आपल्या पूर्वजांच्या मते देखील. मनुष्यजन्म आपल्याला पापं फेडण्यासाठी मिळतो. रादर सगळेच जन्म. एकदा पापं फेडून झाली की आत्म्याला मुक्ती. एनर्जी रिलीज होते. तोपर्यंत शरीरं बदलत राहायचं. पापं फेडत."
"तू चक्क वेदांचे दाखले देतोयस?"
"नाही. मी मला पटलेलं तत्वज्ञान सांगतोय. अरे जेव्हापासून ऐकतोय. जगी सर्वसुखी असा कोण आहे? असले सवालच ऐकतोय. एक माणूस मला आजवर सापडला नाही जो सुखी आहे. त्याचं कारण हेच की सुख हा उतारा आहे."
"सुख मानण्यावर असतं."
"आणि दुःख?"
"ते पण मानण्यावर."
"चूक. ते मानण्यावर नसतं. ह्या सर्व संतांनी ज्यांनी सर्वसंगपरित्याग केले. त्यांनी सगळ्या भावनांवर जय मिळवला पण कुठेतरी खोलवर प्रत्येकाच्या तत्वज्ञानात दुःखाचा अमीट अंश आहे. दुःख ही शाश्वत भावना आहे. तिला एक्झॅक्टली दुःख म्हणून लेबल करता येणार नाही एखादवेळेस. पण एक हूरहूर, एक संतत रूखरूख ही प्रत्येक जीवाला उपजतच असते. ती दूर करण्याचा प्रयत्न करण्यात माणसाचं आयुष्य निघून जातं. कुणी संत बनून सर्वसंगपरित्याग करून ती दूर करायचा प्रयत्न करतात, तर काही जण ह्यू हेफ्नर बनून. अंतिमतः काय की शिक्षेचा कालावधी पूर्ण करण्यास उपयुक्त अशी ती रूखरूख असते."
"पण मग शिक्षा संपल्यावर काय?"
"शिक्षा संपल्यावर काय, हे जेलमध्ये गेलेल्यांना तरी कुठे ठाऊक असतं. पलीकडे आपलं कुटुंब वाट बघतंय की ओसाड पडलेलं घर आणि संपलेली, विझलेली नाती हे बाहेर पडल्याशिवाय कळत नाही."
"मग आत्महत्या म्हणजे?"
"प्रिझन ब्रेक."
"वो वो... एक मिनिट. धीस इज नॉट द टाईम."
"धीस इज द टाईम. कधी विचार केलायस तू की की तुझ्या अन माझ्या आवडत्या 'प्रिझन ब्रेक' ह्या सिरीजचा पॉईंट काय होता?"
"काय पॉईंट होता. एन्टरटेनमेन्ट."
"तो एक. पण महत्वाचा म्हणजे मायकेल मरतो. सगळ्या ताणतणावांनंतर तो एकटाच प्रिझन ब्रेक करतो. बाकी सगळे भौतिक जगातल्या जेलमधून बाहेर पडतात. पण खरा 'प्रिझन ब्रेक' मायकेल करतो."
"डी, मला वाटतं आता तू घरी जायला हवंस."
"नाही. ऐकून घे माझं. तू म्हणत होतास नऊ वर्षांच्या मुलानं आत्महत्या केली तर ते चूक की बरोबर, किंवा फॉर दॅट मॅटर कुणीही आत्महत्या करणं चूक की बरोबर."
"मी असा प्रश्न विचारत नाहीये. माझ्या मते प्रॉमिसिंग आयुष्य असू शकणार्‍यांनी आत्महत्या करणं चूक."
"प्रिसाईजली माय पॉईंट. कोण ठरवणार प्रॉमिसिंग आयुष्य आहे की नाही. ज्याचं जळतं त्यालाच कळतं ना. त्याला/तिला नसेल वाटत अजून लढावंसं. त्यांना फोर्स करणारे आपण कोण? आणि ते त्यांच्या चांगल्यासाठी आहे की वाईटासाठी हे ठरवणारे तरी आपण कोण? कदाचित त्यांचा निर्णय बरोबर होता. त्रास संपून त्यांना मुक्ति मिळाली असेल. आपण जेलमध्ये खितपत पडलो म्हणून त्यांनीही आपल्यासोबत खितपत पडून राहायचा हट्ट आपण का धरावा? उलट आपण त्यांच्यासाठी आनंदी व्हायला हवं की त्यांना बाहेरचा रस्ता सापडला."
"अरे म्हणजे काय कुणी आत्महत्या करत असेल तेव्हा त्याला परावृत्त करायचेही प्रयत्न करायचे नाहीत?"
"कोण म्हणतंय असं. करा ना प्रयत्न. स्वतःच्या मनःशांतीसाठी नक्की करा प्रयत्न."
"स्वतःच्या मनःशांतीसाठी?"
"मग काय तर? माहित असूनही मदत न केल्याचं ओझं आयुष्यभर कोण वागवेल?"
"तुझ्या मते मनुष्यजात एव्हढी स्वार्थी का आहे रे? कुणी जेन्युईनली चांगलं वागतच नसेल का?"
"नाही. इट्स ऑल इन द वायरिंग."
"कसलं?"
"डोक्यातलं. मेंदूतलं वायरिंग. प्रत्येक माणसाचं एका विशिष्ट पद्धतीनं झालेलं डोक्यातलं वायरिंग. जेनेटिकली, ऍट्मॉस्फेरिकली, इमोशनली, वेगवेगळ्या फॅक्टर्सनी तयार झालेलं आणि कायम इव्हॉल्व्ह होत असलेलं, बदलत असलेलं मेंदूतलं वायरिंग. आपल्याला कुणाचा स्वभाव आवडतो तेव्हा आपल्याला ते वायरिंग आवडलेलं असतं. चांगुलपणा, दुष्टपणा सगळं सगळं केवळ वायरिंग. देअर इज नथिंग जेन्युईन. काहींना चांगलं वागायला आवडतं तर काहींना वाईट. काहींना मनाविरूद्ध चांगलं वागण्यातनं किक मिळते तर काहींना मनाविरूद्ध वाईट वागून. इट्स टेक्निकली द सेम थिंग."
"तू काय बोलतोयस हे तुझं तुला तरी कळतंय का?"
"मी एव्हढंच सांगतोय की आत्महत्या करणं इज अ टाईप ऑफ 'प्रिझन ब्रेक'. तुरूंग तोडून पळणं आहे ते."
"म्हणजे तो सुटला असं म्हणायचंय का तुला?"
"नॉट नेसेसरिली. पण त्यानं प्रयत्न केला."
"?"
"म्हटलं ना, पापं फेडेपर्यंत जन्म घेतंच राहायचं."
"पण कुठली पापं? मुळात कुठेतरी पापं केल्याशिवाय का जन्म घेत राहायचं?"
"प्रत्येक जन्मातली."
"पण मग मुळातला जन्म कुठल्या पापांमुळे?"
"मुळातला जन्म हा क्रिएशन. आणि तोच शेवटचा देखील ठरू शकतो. पण तिथेच हिशोब चुकते झाले नाहीत तर पुन्हा जन्म-मरणाचं चक्र सुरूच."
"आणि तुझा ह्या सगळ्यावर विश्वास आहे."
"नाही. मी तुला लॉजिक एक्स्प्लेन केलं."
"मग तुझा विश्वास कशावर आहे."
"आयुष्य ही शिक्षा आहे ह्यावर."
"डी. आर यू ऑलराईट ब्रदर."
"हे बघ. आपण नेहमीदेखील ब्रेकिंग आऊट ह्या कन्सेप्टवरच आपली आयुष्य उभारतो. चक्रातून बाहेर पडत राहणं हा आपल्या आयुष्यांचा स्थायीभाव आहे. अरे एव्हढंच कशाला, ज्या संस्कृतींमध्ये सद्गती म्हणून कन्सेप्ट्स नाहीत, तिथेही शेवटी मोक्ष हा फंडा वापरलाच जातो. आपण मृत्यूनंतरच्या आयुष्यातसुद्धा पुन्हा चक्र आणि मोक्ष हे फंडे कल्पिले आहेत. हा सगळा निव्वळ योगायोग आहे असं म्हणतोस की ही कुठल्या प्रकारची अतिंद्रिय जाणीव आहे असं वाटतं तुला?"
"तू इथे तत्वज्ञानावर आणि मृत्यूनंतरच्या आयुष्यावर चर्चा करायला आलायस का?"
"नाही पण तू विचारलंस त्या प्रश्नाचं उत्तर हे की, आत्महत्या हे सोल्युशन असेलच असं नाही."
"मग तू सपोर्ट कशाला करतोयस?"
"मी विरोध करत नाहीये, दोन्हींमध्ये फरक आहे."
"डी. आपल्या जिवलग मित्रानं आत्महत्या केली. आय कॅन अन्डरस्टँड इफ यू फील बॅड."
"दॅट्स द पॉईंट. आय डोन्ट फील बॅड. आणि तुलासुद्धा वाईट वाटता कामा नये. तो त्याचा निर्णय होता आणि आपल्याला त्या निर्णयाविरूद्ध बोलायचा किंवा त्याच्यावर टीका करायचा अधिकार नाही."
"मला वाईट वाटता कामा नये हे ठरवणारा तू कोण?"
"राईट. मला माफ कर. एका दिवसामध्ये तुझंसुद्धा दुःख कमी होईल अशी अपेक्षा मी करू शकत नाही."
 "एक दिवस? डी. अरविंदला जाऊन सात दिवस झालेत."

डीनं बब्याकडे एक कटाक्ष टाकला.
"अरे असा काय बघतोयस?"
बब्याच्या ऑफिसची मंडळी एव्हाना आपापल्या जागेवर परतू लागली होती.
डी उठून उभा राहिला. "नाईस टू हॅव यू बॅक ब्रदर." म्हणून तो दरवाज्याच्या दिशेनं चालायला लागला. 

10/07/2012

आवर रे-३

"काय बब्या!" दृष्टद्युम्न कॉफी शॉपमध्ये शिरत नेहमीप्रमाणेच जोरात म्हणाला. आणि मग नेहमीप्रमाणेच बभ्रुवाहनासोबतच कॉफी शॉपच्या स्टाफसकट सर्व गिर्‍हाईकांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या आणि बभ्रुवाहनाला नेहमीप्रमाणेच मेल्याहून मेल्यासारखं झालं. त्याची मनोवस्था पाहता त्याक्षणी त्याला मेल्याहून मेल्याहून मेल्यासारखं झालं.
तो काहीही न बोलता मेन्युकार्डात डोकं खुपसून बसला. दृष्टद्युम्न सराईतपणे बब्याच्या समोरची खुर्ची ओढून बसला आणि वेटरला खूण केली. वेटर जवळ आल्याबरोबर त्यानं एक कपुच्चिनो आणि एक माक्कियातो अशी ऑर्डर केली. वेटरसोबत बब्यासुद्धा हडबडला.
"सर, यू नो व्हॉट इज माक्कियातो राईट?" वेटरनं थोडंसं कुतूहलानं आणि थोडंसं तुच्छतेनं दृष्टद्युम्नाकडे वरपासून खालपर्यंत पाहत विचारलं. दृष्टद्युम्नाचे कपडे पाहून कुणीही त्याला हडतूड करावं इतके साधे कपडे घालून तो फिरत असे आणि पायात चक्क कोल्हापुरी. आता तो काय उत्तर देतो ह्याकडे बब्याचं लक्ष लागलं होतं.
"यू नो व्हॉट इज माक्कियातो राईट?" दृष्टद्युम्नानं शांतपणे वेटरकडे पाहत विचारलं.
वेटरला काही कळेना, तो "येस सर." एव्हढंच म्हणाला.
"झालं तर. घेऊन या मग." म्हणून दृष्टद्युम्न बब्याकडे पाहू लागला. वेटर आपला पडलेला चेहरा जमिनीवर हुडकत कॉफी आणायाला गेला.
बब्या प्रचंड भडकलेला असूनही दृष्टद्युम्नाचं त्याला नेहमीप्रमाणेच प्रचंड कौतुक वाटत होतं. आणि त्याचवेळी आपण असे का वागू शकत नाही अशी एक सूक्ष्म खंतही त्याला चाटून गेली. बब्या दृष्टद्युम्नाच्या अगदी विरूद्ध. रात्री झोपतानाही असला नाईटसूट घालेल की दृष्टद्युम्न स्वतःच्या लग्नालाही घालायचा नाही.
आता नेहमीप्रमाणेच दृष्टद्युम्न काहीतरी बोलेल असं बब्याला वाटत होतं, पण तो फक्त बब्याकडे टक लावून पाहत बसला होता.
"का बे डी! आता काही बोलणार का?" शेवटी न राहवून बब्याच बोलला.
डीनं शेवटी नजर बब्यावरून काढली आणि त्याच्या हातातून मेन्युकार्ड हिसकावून घेतलं. "तू काय मेन्युकार्ड पाठ करत होतास काय? की कुणीतरी ऑर्डर द्यायची वाट पाहत होतास?"
"च्यायला. एकतर मी तुला भेटायचं नाही असं निक्षून सांगितलेलं असूनही तू इथे मला शोधत आलास आणि आता ही निरर्थक बडबड करतो आहेस काय?" बब्याचं डोकं अजूनही तापलेलंच होतं.
"जगात सगळंच निरर्थक असतं बाबा." डी चहूकडे एक नजर फिरवत म्हणाला. कॉफी शॉपमधल्या काही अपर्‍या नाकांना अजूनही डीचं कुतूहल वाटत होतं.
"झालं सुरू तुझं निरूपण? हेच नकोय मला आत्ता. म्हणून तुला टाळत गावभर फिरतोय मी."
"निरूपण कसलं रे. मनात असतं ते बोलतो झालं."
बब्या कितीही उखडला, भडकला असला तरी डी जे बोलायचा ते ऐकण्यात आणि प्रसंगी त्याच्याशी तुटपुंजा वाद घालण्यात त्यालाही गंमत वाटायचीच. पण सध्या खरंच त्याचा मूड नव्हता. त्याप्रमाणेच डी पुढे काय म्हणेल हे त्याचं कुतूहल, सद्यपरिस्थितीच्या जाणिवेचा चटका बसताच शमून गेलं. त्याच्या चेहर्‍यावर पुन्हा उदासी पसरली.
"तुझ्या नव्या फोनचं काय झालं रे पुढे?" डी शेजारच्या टेबलावरून इंग्रजी पेपर ओढत घेत म्हणाला. त्यावर तिथल्या अपर्‍या नाकानं नाक मुरडलं.
"कसला नवा फोन? माझा ५ वर्षं जुना फोन आहे." बब्या आश्चर्यचकित होत म्हणाला.
"अरे तेच रे. नवा घेणार होतास ना तू? धत् च्यायला."
"का धत् च्यायला काय?"
"अरे तुला नाही रे. चॅम्पियन्स लीगचा ड्रॉ बकवास निघालाय म्हणून  म्हटलं." असं म्हणत डीनं पेपराचं पान पलटलं. 
"का? डेअरडेव्हिल्स आणि नाईट रायडर्स एकाच ग्रुपमध्ये आहेत?" बब्यानं विचारलं.
"क्रिकेटच्या चॅम्पियन्स लीगमध्येही ग्रुप असतात? मी फुटबॉलबद्दल बोलत होतो." डीनं पेपराची घडी घालून बाजूला ठेवली. "बाकी हल्ली बिग बॉसमुळे इम्रान हाश्मीदेखील मला जंटलमन वाटू लागलेला आहे."
"अरे तुला नक्की कशावर बोलायचंय ते ठरव ना बाबा." बब्या काकुळतीला येत म्हणाला.
"बरं. तुझ्या नवीन मोबाईलबद्दल बोलू."
"मी नवा घेतलेला नाहीये."
"तेच ते. घेणार होतास ना नवा. त्याचं काय झालं?"
"मला हवा तसा मिळत नाहीये."
"म्हणजे?"
"मला हवी ती सगळी फीचर्स एकाच मोबाईलमध्ये नाहीयेत यार."
"कशी असतील?"
"म्हणजे?"
"ती तशी नसतात म्हणून तर आपल्याला हवी असतात." डी बब्याचा चेहरा आणि त्यावरचे झरझर बदलणारे भाव निरखत म्हणाला.
".." बब्या अजूनही डीचा डायलॉग डोक्यामध्ये प्रोसेस करत होता.
तेव्हढ्यात डीनं वळून काऊंटरकडे एक नजर टाकली. मगाचचाच वेटर डीची नजर चुकवून इथेतिथे पाहू लागला.
"म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय?"
"तुझा पगार फार वाढलाय का रे?" डी बोलला.
"अरे पगारावर कुठून आलास तू?"
"नाही तू कॉलेजपासूनच व्यवस्थित कपडे घालायचास. पण हल्ली जरा जास्त होतंय असं नाही वाटत? आणि पुन्हा हा कॉफी शॉपही जरा उच्चभ्रूंचाच वाटतोय. पण सगळे एकजात नवश्रीमंत आहेत." डी आजूबाजूच्या पाच-सहा बाकड्यांना ऐकू येईल इतक्या जोरात म्हणाला.
"अरे हळू बोल जरा." बब्या अवघडून गेला होता.
"काय फरक पडतोय. ह्यांच्यातल्या अर्ध्यांना माझं बोलणं कळणार नाही आणि ज्यांना कळेल त्यांना ते कळल्याचं लोकांना कळेल ह्याची लाज वाटेल म्हणून ते न कळल्याचं नाटक करतील. त्यामुळे, रिलॅक्स!"
"पण ते फीचर्सबद्दल काय बोलत होतास? असतात-नसतात."
"ते होय. मी म्हटलं की एकाच मोबाईलमध्ये सगळी तुला हवीत ती फीचर्स नसतात कारण मुळात ती तशी एका ठिकाणी नाहीत ह्यासाठीच तुला हवी असतात."
"अजूनही मला कळत नाहीये डी."
"अरे कळण्या-न कळण्यासारखं काही गहन बोलत नाहीये मी. मानवी मनाचे खेळ आहेत हे साधे-सोपे. जे नसतं तेच हवं असतं. आता तूच सांग. तुझ्या पाहण्यात अशी किती माणसं आहेत की ज्यांना त्यांच्याजवळ जे आहे तेच आणि तेव्हढंच हवंय."
"तू मोबाईलवरून तत्वज्ञानात शिरतोयस."
"बरं मोबाईलवरच राहूयात. किती जणांकडे मोबाईलमध्ये त्यांना हवीयेत ती सगळी फीचर्स आहेत?"
"तुझ्याकडे." बब्या दबकत म्हणाला.
"मी नोकिया ११०० वापरतो म्हणजे मला तेव्हढंच हवंय असा अर्थ होत नाही. मी आहे ते चावून घेतोय एव्हढाच त्याचा अर्थ. मलाही कधीकधी आयफोन हवा असं वाटतं. पण मला तो नोकिया ११०० च्या किंमतीत बसवता येत नाही."
"मला बाऊन्सर्स जाऊ लागलेत."
"बरं. आता तुझंच उदाहरण घेऊ. तुला तुझ्या गर्लफ्रेंडमध्ये मॉडर्नपणाही हवा होता अन संस्कारही हवे होते, बिनधास्तपणाही हवा होता आणि शालीनताही हवी होती. सौंदर्यही हवं होतं अन निरागस वेंधळेपणाही हवा होता. आणि ह्यासगळ्याउप्पर तुला निष्ठाही हवी होती. पण मुळात ही सगळी फीचर्स एकत्र नसतातच म्हणून तुला हवी होती असं मी म्हणेन."
"डी!" बब्याचा आवाज चढला. "मी तिच्याशी एकनिष्ठ असताना तिनं माझ्याशी असावं एव्हढी माफक अपेक्षा ठेवणं चूक आहे का?"
"प्रश्न माफक नव्हे तर अपेक्षेचा आहे. मुळात अपेक्षाच अशा का ठेवाव्यात ज्या पूर्ण होणे नाही."
"म्हणजे?"
"तू जेव्हा तिला भेटलास तेव्हा ती त्या पलिकडच्या चौकातल्या पिंट्यासोबत फिरत होती. जर ती त्याला सोडून तुझ्याकडे आली तर तुला सोडून तिसर्‍याकडे जाणार नाही असं कसं वाटलं तुला?"
"असं काही नसतं रे डी. तू किती मुलींना ओळखतोस असली वक्तव्यं करायला? ती बदलली होती मला भेटल्यावर."
"कुणी बदलत नसतं बब्या. सगळे मुखवटे असतात. आपण समोरच्या माणसाला हवे तसे वागतो थोडा काळ. कधी कळून सवरून तर कधी आपल्याही नकळत."
"पण आपला मूळ स्वभाव बदलत नाही असंच ना?"
"आपला मूळ स्वभाव असा काही प्रकार नसतो. आपण कायम मुखवटे घालूनच फिरतो. स्वतःशी खरं असणे वगैरे भंपकपणा काही लोक करतात, त्यातही फार अर्थ नाही. आपण स्वतःलासुद्धा लई गंडवत असतो पावलोपावली. पण ऍक्च्युअली ते गंडवणं नाही. स्वतःलाच बरं वाटावं म्हणून घातलेला मुखवटाच."
"अरे पण जेव्हा आपण स्वतःची चूक समजावून घेतो तेव्हा आपण स्वतःला क्लेश देत असतो. त्यावेळचं काय?"
"त्यावेळेस ती चूक मान्य करणे किंवा त्यातनं स्वतःला क्लेश होणे ही आपली गरज असते. मग त्यातून आपण सच्चेपणाचं सोंग घेतो. जेव्हा काही आक्षेपार्ह घडतं तेव्हा बरेचदा आपण स्वतःला माफही करतोच की. सगळं सोईप्रमाणे असतं आणि त्यात चूक-बरोबर काही नाही."
"म्हणजे जे संत-महात्मे होऊन गेले, किंवा जी चांगली माणसं असतात ती मुळात महान किंवा चांगली नाहीतच असं तुझं म्हणणं आहे? तुकोबांचे अभंग किंवा रामदासांचे मनाचे श्लोक ही सगळी बाष्कळ बडबड आहे का?"
"मी  कुठे असं म्हटलं? मी फक्त एव्हढंच म्हणतोय की ती सगळी मनोवस्था आहे. आपण सगळं काही ग्लोरिफाय करून ठेवतो. मी महान म्हणत नाही ह्याचा अर्थ बाष्कळ म्हणतो असं नव्हे. पण प्रत्येक गोष्ट रेट करणं जरूरी आहे का? गोष्टी ह्या फक्त गोष्टीच असू शकत नाहीत का?"
"म्हणजे जगात चांगुलपणा नाहीच आहे का?"
"चांगुलपणा-वाईटपणा हा मानण्यावर आहे."
"अरे पण मन म्हणजे काही चीज असते की नाही?"
"एक्झॅक्टली. मन. गंमतीशीर कन्सेप्ट आहे एकदम. तुला जे वाटतं ते मन. मग तुला जे वाटेल तेच योग्य-अयोग्य, चांगलं-वाईट. कुणीहीकडून तुझ्या मनाला बरं वाटण्याशी कारण. आणि तुझ्या मनाला बरं वाटणं म्हणजे काय तर तुझ्या मेंदूची प्लेझर सेंटर्स उद्दिपित होणं किंवा शरीरात एन्डॉर्फिन्सचा स्राव होणं. मग तो कशानंही होऊ शकतो की. त्यासाठी चांगलीच कामं करावीत असं कुठे म्हटलंय. मेडिटेट कर किंवा चरस घे."
"तू ड्रग्ज घेणं योग्य आहे म्हणतोयस?"
"पुन्हा. मी काहीही योग्य-अयोग्य म्हणत नाहीये. मेडिटेट केल्यानं शरीराला नुकसान होत नाही पण चरस घेतल्यानं होतं हे जरी सत्य असलं तरी त्या दोघांचाही तात्काळ परिणाम एकसमानच आहे हे तू नाकारू शकत नाहीस."
"त्यामुळे तुझं आर्ग्युमेंट सिद्ध होत नाही."
"मला काहीही सिद्ध करायचं नाहीय." डी म्हणत वळला आणि जोरात म्हणाला, "काय रे तुलाही माक्कियातो म्हणजे काय ठाऊक नाही काय?"
"सॉरी. सॉरी सर. जरा शिफ्ट चेंजचा ब्रेक होता." असं म्हणत मगाचचाच वेटर मेल्याहून मेल्यासारखा होत धडपडत दोन कप कॉफी मशीनसमोर ठेवू लागला.
"तू कधी नव्हे ते चुकतोयस डी. जग इतकं ऍबस्ट्रॅक्ट नाहीय तू म्हणतोयस तसं. जगाला काहीतरी अर्थ आहे."
"काय अर्थ आहे जगाला? रादर तुझ्या-माझ्या जगण्याला? तू आयुष्यात लग्न करून, कुटुंब बनवून काय मोठा अर्थ प्रदान करणार आहेस मानवजातीला? आईनस्टाईननं मूलभूत गोष्टी शोधूनही तुझ्या दुःखावर काही उपाय सापडला का? अंतराळात फेर्‍या मारूनही मनुष्य अमर काही झाला नाही. समुद्र, पाऊस, वादळं, ऋतू ह्यांवर आपला  अजूनही कंट्रोल नाही. आणि मी हे सगळे विचार करून नक्की काय साध्य करणार आहे?"
"डी, तू देवाबद्दल वगैरे बोलणार आहेस का?"
"नाही रे बाबा. मी फक्त सांगतोय तुला. की अर्थ वगैरे काही नाहीये कशाला. आपल्या जगण्याची सोय व्हावी ह्यासाठी आपण शोधलेलं ते एक कारण आहे. 'वेटिंग फॉर गोदो' मध्ये कसे 'गोदो' च्या येण्याची वाट पाहत ती माणसं दिवस कंठत असतात. तसं 'अर्थ' हा आपला 'गोदो' आहे. रादर 'गोदो' हा त्यांच्या जीवनाचा 'अर्थ'."
"टोटली कन्फ्युज्ड." असं बब्या म्हणेस्तोवर टेबलावर कॉफीचे कप आले.
"एव्हढं करूनही गंडलासच की रे. 'मोका' घेऊन आलास."
"यू ऑर्डर्ड इट सर."
"मी 'माक्कियातो' मागवली होती."
"दॅट इज व्हेरी डार्क कॉफी सर."
"मग?"
"आय थॉट.."
"काय थॉट? मला माहित नाही ते?"
"सॉरी सर."
"सॉरी काय आता? तेव्हाच विचारलं होतं तुला 'माक्कियातो' म्हणजे काय माहितीय ना म्हणून."
"मला वाटलं.."
"तू काय मनकवडा आहेस काय?"
"प्लीज डोन्ट यूज ऍव्युझिव्ह लँग्वेज हियर." शेजारच्या टेबलवरचं अपरं नाक अचानकच चिरक्या आवाजात बोललं. डीनं तिच्याकडे पाहिलं अन मग वेटरकडे पाहिलं. बब्या हसून हसून खुर्चीवरून पडायच्या बेतात होता. तिला कळेना तिचं काय चुकलं ते.
"तुला कळलं ना रे मी काय बोललो ते?" डी चेहर्‍यावरची रेषही न हलू देता म्हणाला.
"येस सर."
"बोलतो ते नीट समजून घेतलंस तरी बस. मनातले विचार वाचायच्या फंदात पडू नकोस परत." वेटर मोकाचा कप उचलून निमूटपणे गेला. आणि डी आता अपर्‍या नाकाकडे वळला. "डू यू नो व्हाय ही इज लाफिंग सो हार्ड?" डी बब्याकडे बोट दाखवत म्हणाला. बब्या एकदम अवघडून गेला.
"नो?" अपर्‍या नाकाला डी तिच्याशी बोलतोय ह्या गोष्टीनंच अवघडल्यासारखं झालं होतं.
"गुड. दॅट प्रूव्हज यू आर नॉट मनकवडी."
"मिस्टर.  डोन्ट ऍब्यूज मी. आय विल कॉल पोलिस." डीच्या चेहर्‍यावर फायनली स्मितरेषा आली. "तुम्हाला शाळेत मराठी कुणी शिकवलं हो, त्यांचा फोन नंबर देता का जरा? फोनवरूनच पाया पडेन म्हणतो."
अपरं नाक रागानं लालबुंद झालं आणि तिथून उठून तोंडानं 'स्टुपिड, इडियट, पेडेस्ट्रियन स्कमबॅग' म्हणत दुसर्‍या रिकाम्या टेबलावर बसलं.
"तुला मजा येते ना फार हे असं करायला?"
"काय करायला?" डी निरागसपणे म्हणाला. तेव्हढ्यात वेटर 'माक्कियातो' घेऊन आला. "मॅडमच्या कॉफीचे पैसे मी देईन रे." डी लालबुंद अपर्‍या नाकाकडे बोट दाखवत वेटरला म्हणाला. अपर्‍या नाकाचं लक्ष होतं पण ते गप्प बसलं.
"तर काय बोलत होतो आपण?" डीनं माक्कियातोमध्ये पाकिटभर साखर ओतली आणि हळूवार छोट्याशा चमच्यानं ढवळू लागला.
"जीवनाचा अर्थ आणि गोदो वगैरे..." बब्या म्हणाला.
"अरे म्हणजे सिंपल. आता इथे आपण जर काहीच न बोलता एकमेकांकडे पाहत बसलो तर केव्हढं बोअर होईल. तसंच वेळ काढायसाठी आपण हे सगळे फंडे शोधलेत. मिनिंग, सुपर मिनिंग, देव, दानव, चांगलं-वाईट, धर्म-बिर्म आणि त्याचबरोबर निरिश्वरवादसुद्धा. निरीश्वरवादसुद्धा एका लेव्हलच्या पुढे टाईमपासच आहे. मुळात आयुष्य हाच एक टाईमपास आहे. आपल्या पुराणांमध्ये लिहिलंय तसं आपण जगून टाकण्यासाठीच जगात येतो."
"तू फार समजण्यापलिकडे चालला आहेस."
"अरे आता अजून किती सोपं करून सांगू. ओन्ली थिंग यू हॅव टू अंडरस्टँड इज दॅट देअर इज नथिंग टू अंडरस्टँड."
"पण मग नाती, प्रेम ह्या सगळ्याचीच काही किंमत नाही काय?"
"मुळात प्रेम हा शब्द ओव्हररेटेड आहे. पुस्तकांत, कवितांत, कथांमध्ये, सिनेमांमध्ये, तुमच्यासारख्या मजनूंच्या उसाशांमध्ये किंवा साहित्यिकांच्या प्रेमाच्या विविध नात्यांमधल्या आविष्कारांना आलंकारिक लेणी घातलेल्या लेखनामध्ये असतं तसलं प्रेम वगैरे काही नसतं. असते ती फक्त गरज."
"काय?"
"हे बघ. आपल्या प्रत्येकाला कशाची न कशाची गरज असते. आपुलकीची, सहवासाची, शाबासकीची, जखमेवर फुंकर घालण्याची इतकंच काय शरीराचीही. मग त्या गरजा आपण नात्यांतून पूर्ण करतो."
"हे फारच सेन्सेशनल आणि फार फेच्ड आहे असं नाही वाटत डी?"
"अजिबात नाही. तूच विचार कर. मुळात नातं हे गरजेपोटीच बनतं असं नाही वाटत तुला?"
"आई-मुलाचं नातं कुठल्या गरजेपोटी बनतं?"
"त्या नात्याच्या गरजेपोटी."
"म्हणजे तुझ्या आईचं तुझ्यावर प्रेम नाही?"
"प्रेम नाही असं कुठे म्हणतोय मी. पण प्रेम हा जग वापरतं तो शब्द आहे एव्हढंच माझं म्हणणं आहे. प्रत्येक नात्याला, भावनेला नाव देण्याच्या अट्टाहासातून आलेल्या अनेक शब्दांपैकी एक शब्द. मी त्या भावनेला गरज म्हणतो, बाकी दुनिया प्रेम. एव्हढाच फरक."
"म्हणजे तुझ्या आईला तुझी गरज आहे?"
"तुझी गरजेची व्याख्या खूप संकुचित आहे. त्यामुळे तुला मागचं वाक्य उथळ वाटेल. खोलात जाऊन विचार केलास तर कदाचित पटेल मी काय म्हणतो ते."
"मग निःस्वार्थी भावनेला तुझ्या लेखी काहीच किंमत नाही म्हणायची."
"मुळात निःस्वार्थी हा शब्द दिशाभूल करणारा आहे. जगात निःस्वार्थी असं काही नसतं. निःस्वार्थी वागणं हा काही व्यक्तिंचा स्वार्थ असतो. त्यामुळे टेक्निकली इट्स अ पॅराडॉक्स."
"म्हणजे?"
"काही माणसांना दानधर्म करून किंवा गरजूंना मदत करून आनंद मिळतो. जगासाठी ते निःस्वार्थीपण असतं. पण त्यातनं त्यांना आनंद मिळतो म्हणजे टेक्निकली तो स्वार्थच नव्हे काय?"
"म्हणजे तुझ्यासाठी चार्ल्स शोभराज आणि संत गाडगेबाबा दोघेही स्वार्थीच."
"हे बघ. शेवटी माणूस त्याच्या आत लागलेली चिरंतन आग विझवण्यासाठी आयुष्यभर धडपडत असतो. प्रत्येकाचे रस्ते वेगळे असतात. काहींचे रस्ते इतरांसाठी सुखाचे होतात तर काहींचे इतरांना त्रासाचे. माणूस अल्टिमेटली जगतो तो स्वतःसाठी. जरी तो इतरांसाठी जगणारा असला तरी तसं करून त्याला आत्मिक समाधान मिळत असतं किंवा निदान त्याला तसं वाटत असतं, अर्थात तो स्वतःसाठीच जगत असतो."
"तुझ्याशी बोलण्यात अर्थ नाही." बब्याला काहीही बोलायला सुचत नव्हतं.
"एक्सक्यूज मी. हू आर यू टू पे माय बिल? हू डू यू थिंक यू आर?" मगाचचंच अपरं नाक तावातावानं भांडायला आलं होतं.
डीनं वळून तिच्याकडे पाहिलं, "आय न्यू यु वुड कम लॅशिंग आउट ऍट मी लाईक धीस."
"सो?"
"नथिंग. दॅट मेक्स मी अ मनकवडा." आणि डीच्या चेहर्‍यावरची एकही रेषा हलली नव्हती.
"पे माय बिल ऍन्ड गो टू हेल." ती तणतणत पाय आपटत कॉफीशॉपबाहेर पडली.
"तुला एक गंमत सांगू?" डी म्हणाला.
बब्यानं फक्त त्याच्याकडे प्रश्नार्थक चेहर्‍यानं पाहिलं.
"जेव्हा माणसाच्या मनात अपराधी भावना असते ना, तेव्हा त्याची दुःख सहन करण्याची शक्ति वाढते."
"म्हणजे?"
"म्हणजे आपण दुःखात आहोत, ह्याचं जस्टिफिकेशन त्याच्याकडे असतं. त्यामुळे ते दुःख तो शिक्षा म्हणून  सहज ऍक्सेप्ट करतो."
"हे अचानक कुठून आलं?"
"तुझ्याकडे पाहून."
"म्हणजे? व्हॉट डू यू मीन? मी कुणाचं काय केलंय?" बब्याचं डोकं एकदमच भडकलं. तो उठून उभा राहिला.
डी फक्त बब्याकडे पाहत होता.
"यू नो व्हॉट डी. ती पोरगी म्हणाली तसं गो टू हेल. तुझं डोकं सडकं आहे एक नंबरचं. इथे भेटलास, तिथे भेटू नकोस ही विनंती!" असं म्हणत बब्या जाऊ लागला.
"सी यू इन अनदर लाईफ, ब्रदर!" डी म्हणाला.
"ओह, गेट लॉस्ट!" बब्या म्हणाला आणि कॉफीशॉपमधून बाहेर पडला.
वेटर बिल घेऊन डीकडे आला.
"तू मनकवडा आहेस म्हणायचा." डी खिशातून पैसे काढत वेटरला म्हणाला.

11/18/2010

आवर रे-२

(स्थळ - कॉलेजचं कॅंटीन.)

बभ्रुवाहन प्रचंड टेन्शनमध्ये जर्नल वाचत होता. टेबलावर जर्नलशेजारीच कटिंगचा ग्लास होता. आणि दृष्टद्युम्न खांद्याला बॅग लटकवलेल्या अवतारात कँटीनच्या प्रवेशद्वारातून अवतीर्ण झाला.

"बब्या!!!" दृष्टद्युम्नाचा आवाज कँटीन फारसं भरलेलं नसल्यानं घुमला, पण एका कोपर्‍यात गलका करणार्‍या टग्या ग्रुपने मात्र वळून पाहिलंच आणि त्या ग्रुपबरोबर बसलेल्या सुंदर मुलीनंही बब्या कोण, हे वळून पाहिल्यानं बब्या जास्तच ओशाळला.

"काय रे डी! आयुष्यात पहिल्यांदाच मला पाहिल्यासारखा काय बोंबलतोस?" बब्या डोळ्यांच्या कोपर्‍यातून, अजून ती आपल्याकडे बघतेय का हे चेक करत म्हणाला.

"च्चच्च.. पहिल्यांदा कसा रे? दुसर्‍यांदा किंवा बर्‍याच गॅपने बघितल्यासारखा म्हण. पहिल्यांदाच पाहिला असता तुला, तर तुझं नाव घेऊन बोंबललो असतो का रे?" डी नेहमीप्रमाणेच भावशून्य चेहर्‍याने म्हणाला आणि बॅग टेबलावर ठेवत बसला. बब्या त्याच्याकडे असूया, संताप, हेवा आणि अन्य अनेक मिश्र भावनांनी पाहत होता.

"काय वाचतोयस?" डी बब्याचं जर्नल ओढत म्हणाला.

"तू आत्ता जी व्हायव्हा देऊन आलायस तेच वाचतोय!" बब्या ते त्याच्या हातून हिसकून घेत म्हणाला.

"ते मलाही ठाऊक आहे, मी नक्की कुठला पार्ट वाचतोयस ते विचारत होतो!" डी कटिंगचा ग्लास उचलून घेऊन निरखून पाहत शांतपणे म्हणाला.

"तुमच्या बॅचची संपली का? आणि आमची ठरलेल्या वेळीच सुरू होणार आहे की उशीर लागणार आहे? फटाफट देतोय सर सह्या की पीडतोय?" बब्या डीच्या विक्षिप्त चाळ्यांकडे दुर्लक्ष करत स्वतःच्या टेन्शनला वाट करून देत होता.

"मला सांग, हा ग्लास अर्धा रिकामा आहे की..." डीला वाक्यही पूर्ण करू न देता बब्या ओरडला, "ही फिलॉसॉफीची वेळ नाहीये डी!" आणि टग्या ग्रुप आणि त्यातल्या सुंदर मुलीसकट सगळ्यांनी बब्याकडे पाहिलं. बब्या ओशाळला.

डीनं एकदा बब्याकडे नेहमीच्याच शांत नजरेनं पाहिलं आणि ग्लास खाली ठेवला. "मी विचारत होतो, की हा चहा तू अर्धा प्यायला आहेस की कटिंगच मागवला होतास! ग्लासच्या ओघळांवरून कटिंग दिसतोय, मला पिता आला असता म्हणून विचारलं."

बब्या अजून ओशाळला. "अबे, मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतोयस का?" बब्यानं थोडं वैतागून विचारलं.

"हं विचार!" डी बॅगेतून ताजं वर्तमानपत्र काढत म्हणाला.

बब्यानं पुन्हा एकदा दुर्लक्ष करत आपले प्रश्न विचारायला सुरूवात केली. "आमच्या बॅचची किती वाजता सुरू होणार?"

"होईल नेहमीच्या वेळीच बहुतेक." डी अगदी वर्तमानपत्रात हरवूनही गेला.

बब्याला डीच्या ह्या रूपाची सवय होतीच, त्यामुळे तो ही रेटत राहिला, "मग काय विचारलं सरांनी?"

"आँग सान सू ची पुढे काय करणार?" डी.

"काय?" बब्या पुन्हा ओरडला. पुन्हा टग्या ग्रुप आणि सुंदर मुलीनं पाहिलं, पण त्यात ह्यावेळेस गल्ल्यावरच्या तंबीनं आणि टेबल पुसणार्‍या छोटूनंही पाहिलं त्यामुळे बब्याचं ओशाळणं चौपट होतं. "तो पेपर बाजूला ठेव ना बे! मी तुला प्रश्न काय विचारतोय, तू उत्तरं काय देतोयस?"

"अरे पण भावा, हाच प्रश्न विचारला मला सरांनी!" डी पेपराची घडी घालून ठेवत म्हणाला.

"काय?" बब्यानं ह्यावेळेस नियंत्रणात आश्चर्य व्यक्त केलं. "सरांनी आँग सान सू ची बद्दल विचारलं?"

"वेल. तुला असं वाटतं का?" डीनं बब्याच्या चेहर्‍यावरचे अवर्णनीय भाव निरखत एक क्षणाचा पॉज घेतला आणि पुढे म्हणाला, "काय आहे ना, आपल्याला सांगितल्या गेलेल्या बर्‍याचशा गोष्टींवर विश्वास ठेवायची सवय असते."

"अरे पण मी कुठे विश्वास ठेवला."

"मी जर ए. राजासारखी काहीतरी थाप विणून सांगितली असती तर तू विश्वास ठेवला असतास?" डी बब्याकडे रोखून पाहत म्हणाला.

"आवरा!"

"काही उत्तर नसलं की आवरा.." डी शांतपणे म्हणाला.

बब्याला नवीन वादाचा वास येऊ लागला. "तू काय रेडबुल मारून आलायस का?" बब्या वातावरणातला ताण हलका करायचा प्रयत्न करत म्हणाला.

"व्यसनं वाईट आणि निर्व्यसनी असणं चांगलं, हे लहानपणापासून ठसवलं जातं ना आपल्या मनावर." डीची मुद्रा विचारमग्न वाटत होती. बब्या थोडा सावध झाला. डी गंभीर असला की ज्वालामुखीसदृश स्थिती असते.

"डी तुझ्यासाठी पण एक चहा मागवू का रे?" बब्या म्हणाला आणि वळला, "छोटू, एक कटिंग रे!"

"बापाचं चहाचं व्यसन चांगलं, पण पोराचं सिगरेटचं व्यसन वाईट. अमुक एक गोष्ट चांगली, तमुक एक गोष्ट वाईट. चांगलं-वाईट नावाचा प्रकार असतो काय नक्की?" डीचा आवाज थोडा चढला होता. आपण काहीही बोललो तरी निखार्‍याला हवा घालणं होईल, हे समजून बब्या शांत बसला.

"सांग ना मला तू, चांगलं आणि वाईट म्हणजे नक्की काय? तुझ्यासाठी मांस खाणं वाईट आहे, ते सातासमुद्रापारच्या माणसासाठी पवित्र आहे, अफू घेतल्यानं पण किक लागते आणि ध्यानधारणा केल्यानं पण जवळपास तोच अनुभव येतो तर मग नक्की चांगलं काय आणि वाईट काय?" डीनं बब्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. बोलणं भाग होतं.

"अरे जे केल्यानं आपल्याला समाधान मिळतं, ते चांगलं आणि जे केल्यानं वाईट वाटतं ते वाईट" बब्या ह्या वाक्यात बर्‍याच कमकुवत जागा असल्याचं जाणून होता.

"पण मला समाधान का मिळतं, कारण मला लहानपणापासून हेच सांगितलं जातं, की हे चांगलं आहे, ध्यानधारणा केल्यानं पुण्य मिळतं, आणि अफू घेणं वाईट आहे, त्यानं पाप लागतं. आपल्या मनावर आपण ज्या समाजात राहतो, त्याचे नियम बिंबवले जातात. आणि तेच नियम आपल्यासाठी चांगल्या-वाईटाचे निर्णय घेत असतात. माणूस कधीच निर्णय घेत नाही, समाज आणि त्याच्यावरचे संस्कार घेतात, थेट किंवा आडून. आपल्या चांगल्या वाईटाच्या व्याख्या कुठला ना कुठला समाज ठरवत असतो." डी आज भलताच सिरियस झाला होता.

बब्याला बोलण्याची उबळ आली (आणि एका शर्टाच्या दुकानावर लिहिलेली पाटी आठवली, "बोलना सरल है, मौन कठीन है"), "अरे पण आपण म्हणतो, की जेव्हा मी माझ्या अंतरात्म्याचं ऐकून निर्णय घेतलाय आणि तो योग्यच आहे."

"हो. जेव्हा आपण असे काही निर्णय घेतो तेव्हा ते योग्य किंवा अयोग्य म्हणून नाही तर कुठल्यातरी आंतरिक ऊर्मीनं किंवा कधीतरी नकळत घडलेल्या कुठल्यातरी संस्कारानं असेल, पण तो योग्य किंवा अयोग्य म्हणून घेत नसतो आपण. बस आपण एक निवड करत असतो. मग स्वतःला बळ देण्यासाठी, त्याला 'योग्य' 'असण्याची' लेबलं लावतो."

"अरे पण तो निर्णय आपल्याला योग्यच वाटत असतो ना."

"एग्झॅक्टली. योग्य 'वाटतो', योग्य 'असतो' नाही. तू कधी ऑब्झर्व्ह केलंयस? आपल्याला सगळं वाटतं. आनंद वाटतो, वाईट वाटतं. ह्या आपल्या जन्मापासून घडत गेलेल्या आंतरिक व्याख्या असतात, प्रोग्रॅमिंग म्हण, ज्यामुळे आपली प्रत्येक सिच्युएशनला रिऍक्ट होण्याची एक पद्धत बनते. थोडक्यात रेफरन्स पॉईंट्स बनतात. संस्कार, आपण राहतो तो समाज ह्या सगळ्यानी घडवलेले रेफरन्स पॉईंट्स. मग आपण प्रत्येक गोष्ट क्लासिफाय करत राहतो. हे चांगलं, हे वाईट, हे सुंदर, हे कुरूप. पण प्रत्यक्षात काही असतं का? काहीच नाही. प्रत्यक्षात ह्या गोष्टी फक्त असतात, त्यांचं वर्गीकरण आपण आपल्या सोयीसाठी करतो. तू एक गोष्ट करतोस, मी एक गोष्ट करतो, पण आपण त्या गोष्टीचं मूल्यमापन करत बसतो. फक्त एक गोष्ट केली, एव्हढं ढोबळ वर्णन आपण करूच शकत नाही."

"अरे पण तुला म्हणायचं काय आहे?"

"मला हे म्हणायचंय, की ह्या जगात हत्ती, मुंग्या, कोल्ह्या, माशा, डास ह्यांच्या अतित्वाला जो अर्थ आहे, तोच अर्थ माणसाच्या जीवनाला आहे." डीनं नेहमीप्रमाणे बॉम्बगोळा टाकला आणि शेजारी थिजून उभा असलेल्या छोटूच्या हातून कटिंगचा ग्लास घेतला.

"अरे पण आपल्याला मेंदू आहे, आपण प्रगत आहोत." बब्याला ठाऊक होतं, ह्याही वाक्याचं पानिपत होणार, पण त्याला आज मजा येत होती. कधी नव्हे तो डी वाहावत चालला होता.

"प्रगत? हा शब्द कुणाचा? आपला! आपल्यासाठी प्रगती. आपण ठरवलं की ही प्रगती. टेलिफोन, तारा, विमानं, रेल्वे, इंटरनेट, कॉम्प्युटर ही प्रगतीची व्याख्या. सगळंच पर्सेप्शन आहे. मानण्यावर. मी मानतो की माझ्याकडे कॉम्प्युटर आला आणि मी हजार मैलांवर कुणाशीतरी बोललो म्हणजे मी प्रगती केली. काय मिळालं प्रगती करून? काय उखडलं मानवानं?"

"अरे प्रगतीतूनच तर माणसं सुखी झाली."

"सुखी झाली? मग सहस्रकांपूर्वी शोधलेल्या ध्यानधारणेकडे कशासाठी वळताहेत प्रगत माणसं?"

"ते काहीजणांचं 'पर्सेप्शन' आहे समाधान आणि शांतता मिळवण्यासाठीचं!" बब्या 'पर्सेप्शन' शब्दावर जोर देत म्हणाला.

"बरं. असो पर्सेप्शन. झाले लोक सुखी तुमच्या 'प्रगती'नं. मग पुढे? काय फरक पडला? तुम्ही जर प्रगती केलीच नसती. म्हणजे तुम्ही अश्मयुगातच असतात, तर काय फरक पडला असता. मनुष्य तेव्हाही सुखीच असेल की!"

"हो पण आम्ही विविध औषधांचा शोध लावला. ज्यामुळे मानवजात कित्येक एपिडेमिक्सपासून वाचली. पेनिसिलिनचा शोध लावला!"

"ओह्ह...आणि पेनिसिलिनचा शोध लावणारा काय आकाशातून पडला? त्याच्या आधी मानवजात टिकली नाही? आणि ही एपिडेमिक्स कुणाच्या कर्मानं वाढली? आणि बाय द वे, लगेच 'आम्ही' आणि 'तुम्ही'? मी काय एलियन आहे का?"

"अरे पण मग तुला म्हणायचं काय आहे?" बब्या थोडा वैतागला.

"मला एव्हढंच म्हणायचंय की आपण आणि इतर सजीव, ह्यांची जगाच्या लेखी किंमत एकच आहे. आपण सगळे जगाच्या चक्राचा एक भाग आहोत. आपल्याला वाटतं की आपण वरचढ वगैरे आहोत. ह्यात तथ्य दिसत नाही. अगदी बेसिक लेव्हलवर विचार कर. त्रयस्थपणे पृथ्वीच्या बाहेरचा तू कुणी जीव आहेस असा विचार कर. मानवाची जागा काय आहे बघ. नीट पाहिलं तर जाणवेल की आपण जास्तीत जास्त जगाच्या चक्राचा वेग थोडा कमी जास्त करू शकतो, ते ही आपल्यासाठी पण ते चक्र थांबवणं किंवा सुरू ठेवणं आपल्या हातात नाही. जग जसं चालायचंय तसंच चालतंय. आपण स्वतःच स्वतःसाठी चौकटी आखून घेतल्या आहेत आणि निष्कारण स्वतःच्या काही समजूती करून घेतल्या आहेत..."

"एक मिनिट, एक मिनिट डी.." बब्या त्याला तोडत म्हणाला, "आता हे खूप आवरा होतंय."

"ओके. टू कट द लॉन्ग स्टोरी शॉर्ट. आपला आनंद आणि आपलं दुःख हे सगळं आपण बनवलेलं असतं. जगात आनंद, दुःख अशी गोष्ट अस्तित्वातच नाही. आपण स्वतःच स्वतःच्या गरजा बनवतो आणि मग पूर्ण नाही होत म्हणून दुःख करतो किंवा पूर्ण झाल्या म्हणून आनंद. आपली मूलभूत गरज फक्त अन्न हीच होती, पण आपल्या अट्टाहासामुळे आपण स्वतःच्या विविध गरजा बनवल्या आणि उत्क्रांती होत होत आपण आपल्या मूलभूत गरजा अगदी इंटरनेटपर्यंत आणल्यात. त्यामुळे डोन्ट क्राय फॉर एनिथिंग. इट्स ऑल युअर पसेप्शन." डी बोलत होता.

"यू नॉ व्हॉट डी." बब्या अनकॅरॅक्टरिस्टिक शांतपणे म्हणाला. "गौतम बुद्ध वर्षानुवर्ष बोधीवृक्षाखाली बसले आणि त्यांना साक्षात्कार झाला की इच्छा हे सर्व दुःखांचं मूळ आहे."

"मग?" डी पुन्हा शांत होता.

"आणि आपल्याला चौथीच्या पुस्तकात हे लिहून दिलं होतं की इच्छा हे सर्व दुःखांचं मूळ आहे."

"ह्म्म" डीला कळत होतं गाडी कुठे निघालीय ते.

"पण एव्हढं मोठं सत्य आपल्याला इतक्या सहज मिळूनही काही फरक पडला का? आपण अजूनही इच्छा करतच राहतो. तस्मात् तू आत्ता मला इतकं ज्ञानामृत फुकटात पाजलंयस तरी मी तुला चहा पाजला हे माझं पर्सेप्शन मी बदलणार नाही. तू बोलत असलेलं सगळं मला पटतं आणि इच्छा हे सर्व दुःखांचं मूळ आहे हे ही पटतं, पण सॉरी, मी ते आचरणात आणू शकत नाही. मला असंच 'सामान्य' माणसासारखं समाजात राहायचंय आणि जमलं तर 'माणसांसाठी' काहीतरी असामान्य करून दाखवायचंय. जगाच्या चक्रात कुठलीही भर न घालता अवतार संपवायचाय."

"बाय द वे. तुझ्या जर्नल चेकिंगची वेळ होत आली असेल. बेस्ट ऑफ लक." डी नेहमीच्या निर्विकार मुद्रेनं म्हणाला.

बब्यानं आश्चर्यानं घड्याळात पाहिलं. "साल्या, माझी एकदा रिव्हिजन झाली असती इतक्या वेळात. दळण दळत होतास ते!"

"कालपासून तू १५ वेळा रिव्हाईज केलं असशील. वाचलेलं मुरायलाही वेळ दिला पाहिजे ना. नेमका तोच तू देत नाहीस आणि परीक्षेत फाफलतोस."

"म्हणून तू हे सगळं..." बब्या अविश्वासानं डीकडे पाहत होता.

"काल रात्री अभ्यास करताना तुझ्या बाबांचं एक पुस्तक टीपॉयवर पडलं होतं. त्यात हे सगळं होतं. कुठलंही वाचन वाया जात नाही म्हणतात, ते सत्य आहे." डी मिश्किल हसत म्हणाला.

बब्या दप्तर आवरून लॅबकडे पळत सुटला.

8/26/2010

आवर रे-१

नावामधला अंक पाहून पळू नका. ही कथा नाहीये! प्रसंगवर्णन आहे. काही वर्षांपूर्वी प्रवीण दवणे 'सावर रे' अश्या नावाचं एक सुंदर सदर पेपरात लिहायचे. त्यावरून हे शीर्षक सुचलंय, ही त्या सदराची पॅरडी, थट्टा, विडंबन, विटंबन वगैरे नाहीये. पण मग हे नक्की काय आहे, ते वाचूनच ठरवा.

बभ्रुवाहन 'कॅफे कॉफी डे' मध्ये त्याच्या मैत्रीणीची वाट पाहत बसला होता. एव्हढ्यात समोरून दृष्टद्युम्न आला. बभ्रुवाहननं इकडे-तिकडे बघण्याचा निष्फळ प्रयत्न केला. पण दृष्टद्युम्नच्या बाज़ नजरेनं त्याला बरोबर पकडलं आणि समस्त प्रेमी युगुलं, मीटिंग करत असलेले बिझनेसमन आणि पाचकळपणा करत बसलेले कॉलेज ग्रुप्स एकत्रच फ्रीज झाले अशी एक हाळी कॅफे कॉफी डे (ह्यापुढे सीसीडी) च्या आसमंतात घुमली.

"आयला बब्या!"

आता सगळ्याजणांनी 'बब्या' कोण म्हणून बभ्रुवाहनाकडे पाहिलं. चेहर्‍यावर कसंनुसं हासू आणत बभ्रुवाहननं (बब्या) दृष्टद्युम्नाकडे पाहिलं. दृष्टद्युम्न आपल्याच मस्तीत चालत चेहर्‍यावर त्याचं नेहमीचं हसू घेऊन बब्याच्या सोफ्यापाशी आला आणि हक्कानं बसला (बब्यानं मोठ्या कष्टानं वेळेच्या तासभर आधी येऊन कष्टानं नजर ठेवून पटकावलेल्या आयत्या सोफ्यावर).

"काय रे बब्या, तू चक्क सीसीडीमध्ये!" दृष्टद्युम्न.

"अरे हळू बोल ना डी." बब्या गयावया करत, इकडेतिकडे बघत म्हणाला. (दृष्टद्युम्न ह्या नावाचा कुठलाही शॉर्टफॉर्म संभवत नसल्याने त्याला सगळेच 'डी' एव्हढंच म्हणतात. नाईलाजाने 'बब्या' देखील.)

"अरे काय तिच्यायला तू पण, भित्री भागूबाई, चुलीपुढे.."

"बरं बरं कळलं."

"काय मग, इथे कुठे?"

"अरे सहज, कॉफी प्यायला!"

"बब्या, सीसीडीमध्ये एकट्यानं कोणी 'कॉफी प्यायला' येत नाही. इथे लोक गप्पा मारून वेळ काढण्यासाठी किंवा तत्सम प्रकारांसाठी येतात, कॉफी जागेचं भाडं म्हणून पितात. एकट्यानं येऊन कॉफी पिउन जाण्याइतकी एकतर कॉफी स्वस्त नाही आणि दुसरं म्हणजे कॉफीसारख्या क्षुल्लक गोष्टीसाठी ७० रुपये उगाच मोजणार्‍यातला तू नाहीस."

"बरं बरं. पुरे माझी स्तुती." बब्याचं लक्ष अजून दरवाज्याकडे होतं. मैत्रीण यायच्या आत ही ब्याद घालवणं आवश्यक होतं. "मग तू एकटा कसा काय? की तुझ्याकडे आहे पैसा उडवायला?" कितीही प्रयत्न केला तरी बब्याला डी इतकं तिरकं बोलता येत नसे.

"अरे मी असाच. हा गल्ल्यावर उभा आहे ना, 'अरविंद' तो माझा मित्र आहे." डी गल्ल्याच्या दिशेने बोट करून म्हणाला. बब्यानं पाहिलं, तर गल्ल्यावर तीन माणसं होती.

"डी, अरे तीन जण आहेत, ह्यातला अरविंद कोण?" डीचं लक्ष नव्हतं. तो मेन्युकार्ड वाचण्यात गढला होता. "डी.." बब्यानं अजून एक प्रयत्न केला.

"हं." डीनं वर पाहिलं.

"अरे गल्ल्यावर तीन जण आहेत. ह्यातला अरविंद कोणता?" डीनं बेफिकीरपणे गल्ल्याकडे पाहिलं.

"तो रे! उजवीकडे उभा आहे ना!" असं म्हणून डी पुन्हा मेनुकार्डात गढला.

"अरे पण तुझ्या उजवीकडे की त्या माणसाच्या?" बब्याला खूप इंटरेस्ट आला होता. गल्ल्यावरच्या माणसाशी ओळख असणं भविष्यात उपयोगी पडलं असतं. बब्या आधीच भविष्यात पोचला होता, पण वर्तमानातली मैत्रीण अजून पोचली नव्हती, सीसीडीत.

"अरे तुझ्या उजवीकडे आहे तो." डी नेहमीच्याच शांतपणे, न वैतागता, मेन्युकार्डामधून डोकंही वर न उचलता म्हणाला.

"म्हणजे तो, हिरवा शर्ट?"

"असेल रे. तू कशाला चौकश्या करतोयस एव्हढ्या? इंट्रो करून हवाय का?" डीनं नेहमीप्रमाणेच इंट्रो शब्दावर खोचकपणे भर देत विचारलं.

"कैच्याकै!" बब्या एकदम वरमला. पुन्हा त्याचं लक्ष दरवाज्याकडे जाऊन परत डीवर आलं.

"तू एव्हढं काय वाचतोयस त्यात. काय पाठ करणार आहेस काय मेन्युकार्ड? अरविंदच्या जागी घेताहेत की काय तुला?" बब्यानं सूक्ष्म विनोदनिर्मितीचा प्रयत्न केला, पण डी वर हवा तो परिणाम झाला नाही. त्यानं शांतपणे मेन्युकार्ड बंद केलं आणि टेबलावर ठेवलं.

"काय आहे, मेन्युकार्ड वाचताना मला अचानकपणे काही गोष्टी जाणवल्या!"

"फार महाग आहेत ना सगळ्या गोष्टी! जायचा विचार करतोयस ना तू इथून."

चेहर्‍यावर एक छोटंसं स्मित आणून डी म्हणाला, "मी काय म्हणतो, तू मेन्युकार्ड वाचतोस, तेव्हा उजवी बाजू आधी वाचतोस की डावी बाजू?"

"आयला अरे तो अरविंद बोलावतोय बहुतेक तुला. जा ना भेटून घे त्याला. तुला पुढेही जायचं असेल ना, उशीर होईल रे तुला, माझ्याशीच गप्पा मारण्यात वेळ काढलास तर!" बब्याचा एक डोळा दरवाज्याकडे होता आणि दुसरा डीच्या हालचालींकडे. दोन्ही डोळ्यांना हवी तशी दृश्यं दिसली नाहीत.

"अरे गोली मारो अरविंदको! त्याची ड्युटी बराच वेळ आहे. बीसाईड्स, त्याला माझ्याकडे काम आहे. गरज असेल तर येईल इथे. आणि मला पुढे काहीही कार्यक्रम नाहीये. मी तुझ्याच घरी चक्कर टाकायच्या विचारात होतो."

"तू कॉफी पिणार का?" बब्या डी ला कटवण्यासाठी पैसेही खर्च करायला तयार होता.

"मी पिऊन आलोय घरून. तू मागव पाहिजे असेल तर! पण आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे!" बब्यानं मनातल्या मनात हिशोब केला आणि त्याचं चित्तपावन मन भारी पडलं, "नाही मला आत्ता थोडी ऍसिडीटी वाटतेय, थोड्या वेळाने घेईन!"

"अरे मग एखादं एरेटेड ड्रिंक घे!"

"नको रे बाबा, होईल सगळं आपोआपच थोड्या वेळात ठीक."

"हं, पण तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस!"

"कुठला प्रश्न!"

"मेन्युकार्ड वाचताना तू उजवी बाजू आधी वाचतोस की डावी बाजू?"

"तू माझ्या घरी चक्कर टाकणार होतास म्हणालास. काही विशेष काम होतं का?" बब्याला विषय बदलायचा होता, कारण डी जेव्हा असं काही सुरू करतो, तेव्हा त्यात काहीतरी मोठा मुद्दा दडलेला असतो. आणि आत्ता त्याला मोठी चर्चा परवडणारी नव्हती.

"काही विशेष नाही, सहज कॉलेजची बाष्कळ गॉसिपिंग करावीशी वाटत होती."

"काय?"

"अरे काही नाही, ते सोड, तू आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे!" आता अजून तंगवणं शक्य नाही हे उमजल्यानं, बब्यानं पुन्हा एकदा दरवाज्याकडे व्यर्थ कटाक्ष टाकला आणि म्हणाला,

"तुझी उजवी की माझी उजवी!"

"मेन्युकार्डची उजवी-डावी"

"उजवी की डावी?"

"ते उत्तर तू द्यायचंय." कितीही फालतूपणा केला तरी डी विचलित कसा होत नाही, ह्याचं बब्याला नेहमीप्रमाणेच आजही आश्चर्य वाटलं.

"उजवी ऑफकोर्स. मी चित्तपावन आहे."

"हं. मी तुझ्याकडून तीच अपेक्षा केली होती. पण ही चित्तपावनांचीच नाही, तर तमाम मध्यमवर्गीयांची थोड्याफार फरकाने मेंटॅलिटी असते. पण उगाच प्रत्येक गोष्टीला जातीय रंग द्यायची आपल्याला खोड असते."

"मी कुठे जातीय रंग दिला. मी सहज म्हणालो होतो. बीसाईड्स मी माझ्या जातीबद्दल बोललो."

"जातीचा उल्लेख करायची काय गरज होती? आणि तुझी जात म्हणजे काय तू काहीही बोलशील का? मी म्हणू का मी मराठा आहे म्हणजे पैलवानी डोक्याचा असणारच."

"अरे म्हणायची पद्धत आहे. आणि काहीही काय बोललो, मला अभिमान वाटतो मी काटकसरी आहे ह्याचा."

"कसलेही अभिमान बाळगणे ही दुसरी वाईट खोड. उद्या मी म्हणीन मी डोक्यानं विचार करत नाही ह्याचा मला अभिमान आहे."

"आवरा! तू फुकट काहीतरी उकरून काढतोयस. तुला वादासाठी वाद घालायचाय का?"

"नाही, तू मला सोप्पं सांग. तुला मी चित्तपावन आहे हे सांगावंसं का वाटलं?"

"अरे सांगायचं काय आहे? मी आहे हे तुला ठाऊक आहे. बोलायची पद्धत आहे राजा."

"बरी आहे की बोलायची पद्धत. मग आमचे छावा आणि ब्रिगेडचे पब्लिक बोलले की राग येतात तुम्हाला."

"तुमचे ब्रिगेड आणि आम्हाला राग? अरे कैच्याकै काय बोलतोयस तू? ठीक आहेस ना? कालच वर्गात रिताला मराठा ही जात नसून साम्राज्याच्या पाईकांसाठीचा शब्द असल्याचं सांगत होतास!"

"रिताला मधे आणून विषय बदलू नकोस. ब्रिगेडचा कशाला रे राग तुम्हा लोकांना? काय चुकीचं बोलतात ते?"

"काय चुकीचं बोलतात? आवरा, हे तू मला विचारतोयस?"

"इथे तुझ्याशिवाय दुसरं कोणी आहे?"

"तू पण असला करंटा निघशील वाटलं नव्हतं मला. ती बांडगुळं..."

"बरं ते सोड. मला एक सांग, भगव्या आतंकवादाबद्दल तुझं काय मत आहे? कालच चिदुभाऊ म्हणालेत, की तो आपल्या देशासमोरचं एक मोठं आव्हान बनलाय म्हणून."

"अरे काय चाललंय तुझं? ह्या प्रश्नाचा आधीच्या मुद्द्याशी काय संबंध आहे?"

"अरे तू बांडगूळ म्हणालास त्यावरून एकदम आठवले चिदुभाऊ!"

"तू ठीक आहेस ना?"

"होय, मी आता ठीक आहे." घड्याळाकडे बघत डी म्हणाला.

"म्हणजे?"

"नंदिनीचा आज साखरपुडा झाला." डी बब्याचा चेहरा निरखत म्हणाला.

"क्काय?" बब्या जोरात ओरडला. मगाचचेच लोक पुन्हा फ्रीज झाले, पुन्हा नजरा वळल्या आणि पुन्हा बब्या ओशाळला.

"अरे तिनं मला इथे भेटायला बोलावलं होतं!"

"ठाऊक आहे मला. तुला कुणीना कुणीतरी फोन करून हे सांगितलं असतं आणि तू तिथे जाऊन धिंगाणा घातला असतास म्हणून मी इथे आलो."

"काय संबंध?"

"ती तुझ्या लायक नव्हती हे मला पहिल्या दिवसापासून ठाऊक होतं. तिचं ऑलरेडी अफेयर चालू होतं. तू तिला परीक्षेच्या नोट्ससाठी हवा होतास आणि तू वेडा!"

"मग हे आधीही सांगता आलं असतं ना!"

"तू विश्वास ठेवला असतास माझ्यावर?"

"आता का ठेवू?"

"फोन चालू करून बघ, मित्रांचे मिस्ड कॉल्स मेसेजेस दिसतील. त्यातल्या कुणालाही फोन करून विचार!"

"फोन ऑफ कधी केलास?"

" मेन्युकार्ड वाचायला मला तीस सेकंद पुरतात, पण तुझं लक्ष दरवाज्यापासून गल्ल्याकडे भिरभिरत असताना तुझ्या खिशातून मोबाईल काढून ऑफ करून पुन्हा ठेवायला ५ मिनिटं!" डी मिश्किल हसत म्हणाला.

"अरे पण तुला कसं कळलं ती इथे येणार होती ते!"

"हीच प्रत्येक गोष्टीची चिरफाड करण्याची सवय देशाला घेऊन बुडणार!" डी उठत म्हणाला.

"अरे पण कॉफी तर घेऊ!"

"नको, एक कुकीजचा पुडा घेऊ काऊंटरवरून!"

गल्ल्यावर आत्ता एकच माणूस होता. आणि त्याच्या शर्टावर 'पुनीत' असं लिहिलेला बॅज होता. बब्यानं प्रश्नार्थक नजरेनं डी कडे पाहिलं.

"बाजीप्रभूंनी शिवाजीमहाराजांसाठी प्राण दिले! एव्हढं पुरेसं नाही ना तुम्हा लोकांना? ते कोण, कसे.."

"आवरा!!!"

काहीही क्रमशः नाहीये आणि समाप्तही नाहीये. आता क्रमांकाबद्दल सांगतो. भविष्यात कधी पुन्हा असंच काहीतरी निरूद्देश लिहावंसं वाटलं, तर अनुक्रमांकांची सोय आत्तापासूनच करून ठेवतो.

8/12/2010

कैच्याकै

माझा जन्म पुण्याचा आहे आणि मी मुंबईत लहानाचा मोठा झालो. मला ठाऊक आहे, की मी हे इतक्या वेळा सांगितलंय, की 'माझा जन्म..' हे वाचल्यावर पुढचं वाक्य लिहायचीही गरज उरणार नाही मला. तरीही पुन्हा सांगतो, कारण ह्या माहितीची पुढच्या लेखाला तेव्हढीच गरज आहे, जेव्हढी मुक्तपीठ वरच्या प्रतिक्रिया एन्जॉय करण्यासाठी लेख वाचण्याची.

तर असं आहे, की माझे वडील सातार्‍याचे आणि ते माझ्या जन्माआधी मुंबईत येऊन बरीच वर्षं झाली होती. त्यामुळे त्यांची भाषा वेगळीच पण बर्‍यापैकी मुंबईकर झाली होती. आई कोकण/पुण्याची त्यामुळे तिचा वेगळाच शब्दसंग्रह, ज्याला मुंबईकर मराठीचा तडका. आता मागचं वाक्य नीट पहा. फोडणी नव्हे, तडका. हे मुंबईकर मराठी. फोडणी पुणेरी भाषेची असते, आमचा तडका. कारण मुंबईकर मराठीवर गुजराती, हिंदी आणि हल्लीची पोरं इंग्रजी शाळांमध्येच जात असल्याने इंग्रजीचे मुख्यत्वेकरून संस्कार आहेत. बरं इथे मी मध्यमवर्गीय मुंबईकर मराठीची गोष्ट करतोय. उदाहरणार्थ, 'वांधा' हा शब्द मूळचा बहुधा गुजराती लोकांचा आहे, पण मुंबईत मराठी काय सगळ्यांच भाषांमध्ये वापरतात. 'तडका' हा पंजाबी/हिंदी शब्द असाच अलगद मराठीत वापरला जातो. सगळ्यात मस्त गोष्ट 'बिंदास' ह्या शब्दाची आहे. मूळ मराठी शब्द 'बिनधास्त', त्याचा दाक्षिणात्य लोकांनी अपभ्रंश केला, 'बिंदास'. हा शब्द मुंबैय्या(भैय्या शी यमक जुळतो नै!) हिंदीत दत्तक गेला आणि मजेशीर गोष्ट ही, की हल्ली मराठी माणसं सुद्धा 'बिंदास' असा उच्चार अगदी बिंदास करतात.

तर नेहमीप्रमाणेच मी विषयावरून वाहावत गेलो. मूळ विषयावर परत येऊ. माझ्या घरी असं जबरा मराठी भाषिक वैविध्य असल्याने, माझं मराठी स्पेशल असणं भाग होतं. पण पुलं म्हणतात ना, 'नारळ आणि मुलगा, कसा निघेल ते सांगता येत नाही', तस्मात आमचं मराठी हे 'ना घर का, न घाट का' असं झालं. मागच्या वाक्यात वापरायला मला मराठी म्हण सापडेना. हां आत्ता आठवली, 'कशाचं काय अन् फाटक्यात पाय'. चुकीची असावी बहुधा, पण असो. आम्ही प्रयत्न तर केला.

हां, तर आमच्या मातोश्री कोकणात शाळा आणि पुण्यात कॉलेज अन् नोकरी केलेल्या. त्यामुळे फटकळ शब्दांचा संग्रह त्या योग्य वेळी बटव्यासारखा मोकळा करतात. 'खुटापर्‍यागत बसू नकोस', 'निवणं करून कशासाठी बसले आहात', 'सपाज्ञा देउ नकोस (की करू नकोस?)' हे आणि असे अनेक वाक्प्रचार मला कळतात, पण मला योग्य वेळी इतक्या वर्षांचा दांडगा श्रवणानुभव असूनही वापरता येत नाहीत. पण तिच्या बोलण्यात पुणेरी तिरकसपणापेक्षा कोकणी फटकळपणा जास्त आहे. त्यामुळे ती रागावून बोलली तरी तिलाच जास्त त्रास होतो. आम्हा दगडांना सहसा जास्त काही वाटत नाही. उलट बाबांची केस आहे. बाबांचा शब्दसंग्रह सातारी आहे. ते कधीच 'चावी' वापरत नाहीत, फक्त 'किल्ली'. ते भाज्या कापू शकत नाहीत, फक्त 'चिरता' येतात. 'टोमॅटो' चं स्पेलिंग अचूक ठाऊक असूनही, ते फक्त 'टामाटू'च खातात, माझ्यासाठी ते नेहमी 'बारके बारके' पेरू आणतात आणि 'मामुली' गोष्टींमुळे त्यांना फरक पडत नाही. सातारी लोकांना सहसा वाक्प्रचार ह्या भाषाविशेषाविषयी प्रेम नसतं, तद्वत माझे वडिल वाक्प्रचारांच्या फंदात पडत नाहीत. पण रांगडेपणा भरपूर. बोलताना फारसा विचार करायचा नाही. फटकळ नव्हे, लहेजाच रांगडा. म्हणजे उदाहरणार्थ. "नमस्कार, काय म्हणता?" च्या ऐवजी, "काय लेका, हैस कुठं?" अर्थात बाबांच्या मूळ भाषेलाही मुंबईचा तडका बसलाय, त्यामुळे हे 'लेका' वगैरे मी सातार्‍याला गेल्यावर माझ्या आतेभावाच्या तोंडूनच ऐकतो.

बरं मी मराठी शाळेत शिकलो. पण सगळी पोरं शहरीच आणि शाळेतलं मराठी आपलं प्रमाणित अधिकृत मराठी असतं. त्यामुळे काही विशेष बदल संभवत नव्हता. पण माझ्या इमारतीमध्ये राहणार्‍या इंग्रजी मिडियमच्या पोरांमुळे आणि त्यांच्या 'बड्डे' ला केक खायला जात असल्याकारणे माझ्या शब्दसंग्रहात, आमच्या 'बिल्डिंग'ची 'बॅगसाईट' (मागची बाजू) आणि 'टेरेस' अशी भर पडली होती. भरीस भर म्हणून मी क्रिकेट खेळताना 'फास बॉल' टाकायचो आणि बरेचदा 'क्लीन बोल्ट' व्हायचो. आणि मी बिल्डिंगमधल्या लहान पोरांमध्ये गणना होत असल्याने बरेचदा 'इंटर पिंटर' असायचो (म्हणजे दोन्ही टीम कडून खेळायचो, 'लिंबू टिंबू' ह्या मराठी कारकुनाला 'अकाउंटंट' म्हणायची पद्धत आहे ती). मग इंजिनियरिंग कॉलेजात पोचेस्तोवर हळूहळू अनेक रोजच्या वापरातले शब्द इंग्रजी झाले होते. पण वर्गातल्या हॉस्टेलाईट पोरांच्या विविध भाषांशी ओळख होऊ लागली होती. सगळ्यात लगेच लक्षात येणारा लहेजा म्हणजे नागपुरी. "अबे काय करून राहिला बे तू?" "मी इथे तुझी वाट पाहून राहिलो न बे!" ही वाक्यरचना मला जाम म्हणजे जाम आवडते. पण नागपुरी पब्लिकची दुसरी सवय म्हणजे आपापसात बरेचदा हिंदीत बोलतात. हे मला न उलगडलेलं कोडं आहे. बाकी वैदर्भीय बंधूंची बोली ही नागपुरीसारखीच थोडीफार, पण त्यातही व्हेरियेशन्स असतात. त्यांना आपापसात बरोबर कळतं कोण कुठला आहे. माझा त्यामध्ये विशेष अभ्यास नसल्याने आत्ता जाऊ दे.

पुढे नोकरीला लागलो तर तिथेही माझ्या पुढच्याच टेबलवर माझा मित्र नागपुरी. बरेच दिवस त्याच्याबरोबरच प्रोजेक्टवर होतो. त्यामुळे नकळत मी त्याच्याशी त्याच्याच बोलीत बोलायला लागलो. ही माझी समस्या आहे. माझा लहेजा फार सहजपणे समोरच्यासारखा होऊन जातो. ६वी-७वीत असताना मी महिनाभर वडगाव बुद्रुकला राहिलो होतो, माझ्या आजोबांच्या घरी. तिथल्या गावातल्या पोरांबरोबर खेळायला जायचो. आईलाच माझ्या लहेजाची काळजी लागली. पण मग मुंबईत परतल्यावर महिन्याभरात मी नॉर्मलला आलो.

तर माझ्या ह्याच समस्येचा मला सध्या भारी त्रास होतोय. त्याचं झालं असं.

मी मराठी ब्लॉग विश्वामध्ये जानेवारी २०१० मध्ये इवल्याश्या पावलांनी, दबकत दबकत चंचुप्रवेश केला. गरीबासारखा पोस्टा लिहायचो. चार-दोन भली माणसं, 'मराठी ब्लॉग विश्व' च्या कृपेनं चक्कर टाकून जायची. एखादा अतिशय भला भेटदाता, प्रतिक्रियाही देऊन जायचा. मी सुखावायचो. काही प्रथितयश ब्लॉगकारांचे ब्लॉग्ज आणि त्यावरच्या प्रतिक्रियांचा पाऊस पाहून डोळे दिपून जायचे. कधीतरी आपला ब्लॉगही असा होईल का? अश्या निरर्थक स्वप्नांमागे मन दुडूदुडू धावायचं. हो दुडूदुडू, कारण तेव्हा मी मराठी ब्लॉगिंगमधलं बाळ होतो. अर्थात अजून मोठा झालो नाहीये, पण तेव्हा बाळ होतो हे कन्फर्म. तर अश्या वेळी, एक फरिश्ता माझा फॉलोअर झाला. त्याचं नाव मी सांगत नाही, पण आडनाव पत्रे होतं. त्याचं नाव सांगायला मला फार आनंद झाला असता, पण असो. आणि माझा आत्मविश्वास दुणावला. मग मी अजून जोमाने आपल्या मतांची पिंक टाकायला लागलो. मग कळलं, की जितकं जास्त वाचेन तितकं जास्त लिहिता येईल, मग मी अजून ब्लॉग्ज वाचायला घेतले. त्या फरिश्त्याशी नेट ओळख झाली. मग अनेक प्रथितयश ब्लॉगर्सच्या ब्लॉग्जवर प्रतिक्रिया देऊन देऊन त्यांच्याशी ओळखी काढल्या. मग गुगल बझ नामक एका झंझावातानं अनेकानेक ओळखींची कवाडं उघडली. रोजच्या रोज कित्येक मराठी ब्लॉगर्स आणि ब्लॉगवाचकांशी ओळखी झाल्या आणि इथेच घात झाला.

महाराष्ट्राच्या नव्हे भारताच्या नव्हे जगाच्या कानाकोपर्‍यातल्या अनेकानेक लोकांशी रोजच्या रोज बोलण्यामुळे माझ्या भाषेची वासलात लागली. आयडेंटिटी क्रायसिस निर्माण झाला. मीच हरवलो. हे म्हणजे, अमिताभपासून सगळ्या गायकांच्या आवाजात गाणी गाऊन गाऊन सुदेश भोसलेंचा स्वतःचाच आवाज कुणाला ठाऊक नाही, तसं झालं. इतके विविध शब्द माझ्या संग्रहात आलेत की हल्ली मी जे लिहितो, ते मीच लिहिलंय का असा प्रश्न मला पडतो. बरं, हे शब्द स्पेशल आहेत. ते अर्थांसकट इथे मी स्वतःच्याच आठवणीसाठी देतोय. जेणेकरून आजपासून काही वर्षांनी जेव्हा माझी भाषा पुन्हा एकदा बदलून गेली असेल, तेव्हा हा लेख मला माझ्या आजच्या स्थितीची कल्पना देईल.

१. भारी - भारी म्हणजे मुंबईकर मराठीत झकास. मी भारी हा शब्द दोन-तीन महिने पूर्वीपर्यंत कधीच वापरला नसेल. आणि आजच्या तारखेला, ह्या शब्दाशिवाय माझा दिवस पुरा होत नाही. कुठलीही चांगली गोष्ट 'भारी'च असते, असा माझा ठाम समज झालाय.

२. प्रचंड - प्रचंड हा शब्द मी पुस्तकात कित्येकदा वाचलाय, पण मी बोलीभाषेत तो वापरेन असं मला कधी स्वप्नातही वाटलं नसेल. आज मी हा शब्द कशाच्याही मागे लावतो. 'तो प्रचंड त्रास देतोय मला' पासून 'त्याने प्रचंड वेळ काढला.'

३.प्रचंड भारी - हे डेडली कॉम्बो आहे. प्रचंड भारी म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री आहे. एखादी गोष्ट प्रचंड भारी आहे म्हणजे अतिशय सुंदर किंवा अतिशय झकास किंवा अतिशय .... भारी आहे!

४. कैच्याकै भारी - ओके, आता ह्यासाठी मला कैच्याकैचा अर्थ सांगावा लागेल असं तुम्हाला वाटत असेल तर त्याची अजिबात गरज नाही. कैच्याकै भारी म्हणजे 'ब्युटिफुल, मोअर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल' मधल्या 'मोस्ट ब्युटिफुल' सारखं आहे. म्हणजे, ह्यापुढे उच्च दर्जा नाही. ह्यापुढे दाद असूच शकत नाही. उदाहरणार्थ, लतादीदी कैच्याकै भारी गातात, सचिन तेंडुलकर कैच्याकै भारी क्रिकेट खेळतो आणि विद्याधर भिसे कैच्याकै भारी पकवतो. ओके, शेवटचा वाक्यातला प्रयोग चुकलाय पण असो.

थोडक्यात, कुठल्याही विशेषणापुढे 'प्रचंड' आणि 'कैच्याकै' हे लावता येतात. पण 'कैच्याकै' वेगळा वापरला तर मात्र अर्थ बदलतो बरं का. तेव्हा इथे थोडं सांभाळावं लागतं.

५. कैच्याकै - कैच्याकै ह्या शब्दाचा 'काहीच्या काही' ह्या शब्दसमूहाशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. हां, काही भाषाप्रभू कैच्याकै हे अपभ्रंश झालेलं रूप असल्याचा दावा करतील, पण करोत बापडे. आमच्या मते ते फक्त 'होमोफोन्स' (सारखा उच्चार असलेले) आहेत. पण, ह्याच भाषाप्रभूंमुळे काही लोक कैच्याकै ला 'काहीच्या काही' च्या ऐवजी वापरतात. कैच्याकैचा खरा(!) अर्थ 'आऊट ऑफ धिस वर्ल्ड' असा आहे. आता कुणी म्हणेल, मराठी काय अर्थ. अरे मनुष्यांनो, हा एकमेवाद्वितीय शब्द आहे. मराठीत ह्या शब्दाला समानार्थी शब्दच नाहीये. आणि इंग्रजीतही अख्खा शब्दसमूह वापरावा लागला.

६. निवांत - हा शब्द मी पुस्तकांमध्ये वाचला होता, पण मग हल्ली ब्लॉग आणि बझच्या कृपेने मीदेखील सर्रास वापरू लागलोय. कुणी विचारलं काय चाललंय, की मी 'निवांत' असं उत्तर देईन हे मला ५ महिन्यांपूर्वी कुणी म्हणालं असतं तर मी निवांतपणे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असतं.

७. अशक्य - अशक्य ह्या शब्दाचे 'शक्य नसलेलं' ह्यापलिकडेही अर्थ आहेत, हे जर नेपोलियनला वेळेत कळलं असतं, तर त्यानं त्या शब्दासकट डिक्शनरी छापली असती. अशक्य म्हणजे 'प्रचंड' आणि 'कैच्याकै' ह्यामधली पातळी. अशक्य सुंदर म्हणजे अतिशय सुंदर. ऑन सेकंड थॉट्स, असं पाहिजे - 'भारी, प्रचंड भारी, अशक्य भारी'. कैच्याकै म्हणजे 'आऊट ऑफ धिस वर्ल्ड' आहे ना! पण अशक्यचा दुसरा अर्थ म्हणजे 'शब्दांपलिकडे' म्हणजे 'कैच्याकै' सारखं नाही, ऍक्च्युअली कशासारखंच नाही. म्हणजे, आता बघा, एखाद्यानं तुम्हाला तुमच्या आवडत्या मुलीसमोर दुसर्‍याच मुलीबद्दल चिडवलं, तर तुमच्याकडे काय शब्द असतात त्याच्यासाठी? मागचा प्रश्न नीट वाचा मी शब्द म्हणतोय, शिव्या नव्हे. असा शब्दांपलिकडला आशय सभ्यपणाने व्यक्त करायचा असेल तर, 'अशक्य आहेस तू!' एव्हढं म्हणता येईल.

आता असा शब्द जो मी अभिजीत वैद्यला भेटण्यापूर्वी ऐकलाही नव्हता आणि आता सर्वांत जास्त वापरतो.

आवरा - 'आवरा' हा शब्द मी ऐकला नव्हता असं नाही. 'चला आता दप्तराचा पसारा आवरा नाहीतर फटके मिळतील' अश्या आशयाने ऐकला होता. पण आवरा हे पाणचटपणाचं एकक आहे हे मला अभिजीतमुळे कळलं. एखाद्या लेखावर खूपच 'आवरा' कॉमेंट्स येताहेत, किंवा अमकातमका 'आवरा' फॉर्ममध्ये आहे ,अश्या पद्धतीने ते विशेषण म्हणूनही वापरलं जातं. आता ते विशेषण आहे म्हटल्यावर, आवरा, प्रचंड आवरा, अशक्य आवरा आणि कैच्याकै आवरा असेही वाक्प्रयोग हल्ली मी बरेचदा करतो.

आता लोकं 'आवरा' म्हणण्याच्या आत ही साता उत्तरांची कहाणी साठा उत्तरीं सुफळ संप्रूण(संपूर्ण) करतो!

विशेष टीप - वरती शब्दांचा क्रम हा त्यांची प्राथमिकता किंवा महत्व दर्शवत नाही, तो कसाही आहे. आणि 'आवरा'ला अनुक्रमांक न देणं हे त्याचं निर्विवाद वर्चस्व दर्शवण्यासाठी वापरलं गेलेलं 'गिमिक' आहे.