कधी कधी असं होतं की खूप खूप लिहावंसं वाटतं. खूप काही सुचतंय असं वाटतं अन बाह्या सरसावून लॅपटॉपसमोर ठाण मांडलं की एकत्रित येणार्या विचारांचा कल्लोळ उठतो. पण काहीच सुसंबद्ध बाहेर पडत नाही. एकदम आभाळ भरून यावं, कुंद कुंद वातावरण व्हावं अन पाऊसच पडू नये तद्वत. विचारांचा कल्लोळ पार थकवून टाकतो. ऑफिसातल्या कामाच्या रगाड्यापासून ते प्रियतमवियोगाच्या दुःखापर्यंत अन बँकेत जमा न झालेल्या पगारापासून ते नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीपर्यंत, सर्व तर्हेचे अन सर्व प्रकारचे विचार एकत्रितच येतात.
मला लहानपणी कुणीतरी सांगितलेलं आठवतं, की शून्य वैचारिक अवस्था कशी गाठावी, तर एकाच वेळी निरनिराळे विचार करायला सुरूवात करावी. आपोआपच सगळे विचार एकमेकांना कॅन्सल करू लागतात आणि थोड्या वेळाच्या अशा कठोर उपासनेनंतर मेंदू शांत शांत होऊ लागतो. माझ्याबाबतीत तसं सहसा घडत नाही. मी निरनिराळे विचार करू लागलो की मी अजून भंडावून जातो. बहुतेक माझा प्रोसेसर फारच ऍडव्हान्स असावा अन उपरोल्लेखित उपाय हा जुन्या प्रोसेसर्सवर उपयोगी असावा. मला शून्य वैचारिक अवस्था तेव्हा लाभते, जेव्हा मला खरंच विचार करावासा वाटतो. माझ्या मेंदूमध्ये बहुदा 'नॉट गेट' (इंजिनियर्सच्या भाषेत) बसवलेलं आहे. म्हणजे कुठलीही आज्ञा दिली की तो अगदी विरूद्ध कृती करतो. मी ठरवलं की आज अमुक एका विषयावर लिहायचं, म्हटलं की विचार करणं आलं अन विचार करणं म्हटलं की मला लाभलीच शून्य वैचारिक अवस्था.
पण एरव्ही कसलेही अपूर्व विचार कधीही सुचतात. उदाहरणार्थ, एके दिवशी मी मेट्रोमध्ये चढलो. अन नेहमीप्रमाणे चार सीट्सच्या बाकड्याची कोपर्यातली सीट पकडली. अन नकळतच पुढच्या स्टेशनांवर चढणार्यांचं निरीक्षण करू लागलो. प्रत्येकजण पहिल्यांदा कोपर्यातली सीट पकडायचा प्रयत्न करतो. दोन माणसांच्यामध्ये बसणं सहसा लोक टाळतात. मला माझीच सवय जाणवली. मीसुद्धा नेहमी कोपर्यातली जागा घेतो. विमानात आवर्जून येण्याजाण्याच्या मार्गाबाजूची सीट मागतो. एकदा दोन माणसांच्या मध्ये बसावं लागलेलं तर बराच वेळ मी अवघडलेला होतो. कॉलेजात असताना केमिस्ट्रीच्या प्रोफेसरांनी इलेक्ट्रॉन्सबद्दल शिकवताना सांगितलं होतं, की इलेक्ट्रॉन्स ऑर्बिटमध्ये कसे भरायचे, तर रिकाम्या बसमध्ये लोक चढले की कसे बसतात तसे. म्हणजे पहिल्यांदा सगळ्या विंडो सीट्स भरतात आणि मग त्यांच्या बाजूच्या सीट्स. थोडक्यात माणूस पहिल्यांदा एकटाच राहणं पसंत करतो. नंतर पर्याय नाही तर दुसर्या माणसाजवळ. हे वागणं थोडं विचित्र भासतं, जेव्हा आपण माणूस हा सामाजिक प्राणी आहे असं म्हणतो तेव्हा.
पण खरंच माणूस सामाजिक प्राणी आहे कारण एका पातळीनंतर त्याला समाजाची गरज भासते. पण ती एका पातळीनंतर. त्याआधी प्रत्येक माणूस एकटा असतो. आणि त्याला तसंच राहायला आवडतं. अर्थात प्रत्येकाची ही पातळी वेगळी असते. पण असतेच. ज्याला आपण पर्सनल लाईफ म्हणतो. वैयक्तिक आयुष्य. त्यामध्ये कधीकधी जीवनसाथीलादेखील स्थान नसतं. ही पातळी नकळतच अस्तित्वात असते प्रत्येकामध्ये.
महाराजी नावाचे एक प्रवचनकार आहेत. झीटीव्ही यूकेवर अशी बरीच प्रवचनं लागतात. रविवारी सकाळी जाग आल्यावर डोळे चोळत चाळा म्हणून टीव्ही लावावा तर हाच प्रकार चालू असतो. मी सहसा मनोरंजन म्हणून पाहतो पण कधीकधी एखादा चांगला विचार कानी पडतो. तसंच त्यादिवशी महाराजींचं प्रवचन चालू होतं, तेव्हा ते म्हणाले. "प्रत्येक माणसाची दोन जगं असतात. एक जग बाहेरचं ज्यामध्ये तो जगत असतो. आणि दुसरं त्याच्या आतमधलं जे त्याच्याआत जगत असतं. बाहेरच्या जगात कितीही सुखं आणि दुःखं असली तरी त्याच्या आतमधल्या जगामध्ये फक्त एकच सुख आणि एकच दुःख असतं. ते सुख काय आहे ह्याच्या शोधातच तो आयुष्यभर असतो आणि ते सुख मिळत नाही हेच त्याचं एकमेव दुःख असतं."
अतिशय गोंधळात टाकणारा अन अशा विदेशांमध्ये पैसे घेऊन प्रवचन देणार्या हायफाय बाबाला शोभणाराच विचार आहे. पण त्यामध्ये मला थोडंसं तथ्य जाणवलं. आपल्या आतलं जग, ज्याला आपण वैयक्तिक आयुष्य म्हणतो, ज्याला प्राणपणानं जपण्यासाठी आपण एका विशिष्ट पातळीपर्यंत स्वतःतच राहतो, त्यामध्ये आपण नक्की काय करतो? आपण स्वतःलाच शोधत असतो किंवा ते एक सुख शोधत असतो. आणि ते मिळत नाही ह्याचं दुःख बाळगत बाहेर एक सर्वसामान्य आयुष्य जगत असतो.
काही नशीबवान माणसं ह्या शोधाच्या शेवटापर्यंत पोचतात. त्यांना ते सुख सापडतं किंवा नाही हा भाग अलाहिदा, पण ते असफल शोधाचं दुःख मात्र संपवण्यात यशस्वी होतात.