Showing posts with label वैचारिक. Show all posts
Showing posts with label वैचारिक. Show all posts

2/15/2011

शोध

कधी कधी असं होतं की खूप खूप लिहावंसं वाटतं. खूप काही सुचतंय असं वाटतं अन बाह्या सरसावून लॅपटॉपसमोर ठाण मांडलं की एकत्रित येणार्‍या विचारांचा कल्लोळ उठतो. पण काहीच सुसंबद्ध बाहेर पडत नाही. एकदम आभाळ भरून यावं, कुंद कुंद वातावरण व्हावं अन पाऊसच पडू नये तद्वत. विचारांचा कल्लोळ पार थकवून टाकतो. ऑफिसातल्या कामाच्या रगाड्यापासून ते प्रियतमवियोगाच्या दुःखापर्यंत अन बँकेत जमा न झालेल्या पगारापासून ते नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीपर्यंत, सर्व तर्‍हेचे अन सर्व प्रकारचे विचार एकत्रितच येतात.
मला लहानपणी कुणीतरी सांगितलेलं आठवतं, की शून्य वैचारिक अवस्था कशी गाठावी, तर एकाच वेळी निरनिराळे विचार करायला सुरूवात करावी. आपोआपच सगळे विचार एकमेकांना कॅन्सल करू लागतात आणि थोड्या वेळाच्या अशा कठोर उपासनेनंतर मेंदू शांत शांत होऊ लागतो. माझ्याबाबतीत तसं सहसा घडत नाही. मी निरनिराळे विचार करू लागलो की मी अजून भंडावून जातो. बहुतेक माझा प्रोसेसर फारच ऍडव्हान्स असावा अन उपरोल्लेखित उपाय हा जुन्या प्रोसेसर्सवर उपयोगी असावा. मला शून्य वैचारिक अवस्था तेव्हा लाभते, जेव्हा मला खरंच विचार करावासा वाटतो. माझ्या मेंदूमध्ये बहुदा 'नॉट गेट' (इंजिनियर्सच्या भाषेत) बसवलेलं आहे. म्हणजे कुठलीही आज्ञा दिली की तो अगदी विरूद्ध कृती करतो. मी ठरवलं की आज अमुक एका विषयावर लिहायचं, म्हटलं की विचार करणं आलं अन विचार करणं म्हटलं की मला लाभलीच शून्य वैचारिक अवस्था.
पण एरव्ही कसलेही अपूर्व विचार कधीही सुचतात. उदाहरणार्थ, एके दिवशी मी मेट्रोमध्ये चढलो. अन नेहमीप्रमाणे चार सीट्सच्या बाकड्याची कोपर्‍यातली सीट पकडली. अन नकळतच पुढच्या स्टेशनांवर चढणार्‍यांचं निरीक्षण करू लागलो. प्रत्येकजण पहिल्यांदा कोपर्‍यातली सीट पकडायचा प्रयत्न करतो. दोन माणसांच्यामध्ये बसणं सहसा लोक टाळतात. मला माझीच सवय जाणवली. मीसुद्धा नेहमी कोपर्‍यातली जागा घेतो. विमानात आवर्जून येण्याजाण्याच्या मार्गाबाजूची सीट मागतो. एकदा दोन माणसांच्या मध्ये बसावं लागलेलं तर बराच वेळ मी अवघडलेला होतो. कॉलेजात असताना केमिस्ट्रीच्या प्रोफेसरांनी इलेक्ट्रॉन्सबद्दल शिकवताना सांगितलं होतं, की इलेक्ट्रॉन्स ऑर्बिटमध्ये कसे भरायचे, तर रिकाम्या बसमध्ये लोक चढले की कसे बसतात तसे. म्हणजे पहिल्यांदा सगळ्या विंडो सीट्स भरतात आणि मग त्यांच्या बाजूच्या सीट्स. थोडक्यात माणूस पहिल्यांदा एकटाच राहणं पसंत करतो. नंतर पर्याय नाही तर दुसर्‍या माणसाजवळ. हे वागणं थोडं विचित्र भासतं, जेव्हा आपण माणूस हा सामाजिक प्राणी आहे असं म्हणतो तेव्हा.
पण खरंच माणूस सामाजिक प्राणी आहे कारण एका पातळीनंतर त्याला समाजाची गरज भासते. पण ती एका पातळीनंतर. त्याआधी प्रत्येक माणूस एकटा असतो. आणि त्याला तसंच राहायला आवडतं. अर्थात प्रत्येकाची ही पातळी वेगळी असते. पण असतेच. ज्याला आपण पर्सनल लाईफ म्हणतो. वैयक्तिक आयुष्य. त्यामध्ये कधीकधी जीवनसाथीलादेखील स्थान नसतं. ही पातळी नकळतच अस्तित्वात असते प्रत्येकामध्ये.
महाराजी नावाचे एक प्रवचनकार आहेत. झीटीव्ही यूकेवर अशी बरीच प्रवचनं लागतात. रविवारी सकाळी जाग आल्यावर डोळे चोळत चाळा म्हणून टीव्ही लावावा तर हाच प्रकार चालू असतो. मी सहसा मनोरंजन म्हणून पाहतो पण कधीकधी एखादा चांगला विचार कानी पडतो. तसंच त्यादिवशी महाराजींचं प्रवचन चालू होतं, तेव्हा ते म्हणाले. "प्रत्येक माणसाची दोन जगं असतात. एक जग बाहेरचं ज्यामध्ये तो जगत असतो. आणि दुसरं त्याच्या आतमधलं जे त्याच्याआत जगत असतं. बाहेरच्या जगात कितीही सुखं आणि दुःखं असली तरी त्याच्या आतमधल्या जगामध्ये फक्त एकच सुख आणि एकच दुःख असतं. ते सुख काय आहे ह्याच्या शोधातच तो आयुष्यभर असतो आणि ते सुख मिळत नाही हेच त्याचं एकमेव दुःख असतं."
अतिशय गोंधळात टाकणारा अन अशा विदेशांमध्ये पैसे घेऊन प्रवचन देणार्‍या हायफाय बाबाला शोभणाराच विचार आहे. पण त्यामध्ये मला थोडंसं तथ्य जाणवलं. आपल्या आतलं जग, ज्याला आपण वैयक्तिक आयुष्य म्हणतो, ज्याला प्राणपणानं जपण्यासाठी आपण एका विशिष्ट पातळीपर्यंत स्वतःतच राहतो, त्यामध्ये आपण नक्की काय करतो? आपण स्वतःलाच शोधत असतो किंवा ते एक सुख शोधत असतो. आणि ते मिळत नाही ह्याचं दुःख बाळगत बाहेर एक सर्वसामान्य आयुष्य जगत असतो.
काही नशीबवान माणसं ह्या शोधाच्या शेवटापर्यंत पोचतात. त्यांना ते सुख सापडतं किंवा नाही हा भाग अलाहिदा, पण ते असफल शोधाचं दुःख मात्र संपवण्यात यशस्वी होतात.

9/05/2010

सकाळ

कधी कधी लिहायला बसलं, की एकदम रिकामं वाटतं. जी शून्य वैचारिक अवस्था गाठण्यासाठी लोक तप करतात, ती कधी कधी लेखक बनू इच्छिणार्‍या लोकांना आपोआप मिळते, पण फक्त लिहायला बसल्यावर. म्हणजे बघा, जेव्हा झोप येत नसते, तेव्हा जर अभ्यासाचं किंवा कुठलंही जड पुस्तक हातात घेतलं, की कशी मस्त झोप डोळ्यांवर झुलायला लागते, तद्वतच!

आत्ताही अशीच शून्य वैचारिक अवस्था लाभलीय. लिहायला बसलोय आणि काही सुचतच नाहीये. पण लिहायचा सोस भारी. त्यामुळे जबरदस्तीनं विचार करायला लागलो. आणि एकदम एक चमकदार (!) कल्पना सुचली. आपण शाळेत कसे निबंध लिहितो, एक काहीतरी विषय दिला की आपण आपल्या कल्पनेचं वारू मोकाट सोडून देतो. आता ब्लॉगमध्येही दुसरं काही आपण करत नाही, फक्त विषय निवडायचं काम आपण करतो आणि ते रोजच्या जीवनातले असतात. मग आत्ता मी एकदम ठरवलं, की आपण जो शब्द पहिला डोक्यात येईल त्याच्यावर निबंध सॉरी ब्लॉग लिहायचा. हे म्हणजे लोककथांमध्ये असतं ना, 'जो वेशीतून पहिला माणूस येईल त्याला राजा बनवायचं.' तसलाच प्रकार. मग आधी मी स्वतःलाच विरोध केला. पण आत्ता 'झी टीव्ही'वर 'सारेगमप सिंगिंग सुपरस्टार' हा कार्यक्रम चालू आहे. त्यात सलमान खान पाहुणा म्हणून आलाय. त्याला बघून, त्याच्या 'वॉन्टेड' सिनेमातला माझा फेव्हरेट डायलॉग मला आठवला, 'एक बार जो मैने कमिटमेंट कर दी, फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता'. आधी मी स्वतःलाच 'आवरा' म्हटलं आणि मग मी स्वतःचं न ऐकता पहिला शब्द शोधायला लागलो. आणि पहिलाच शब्द डोळ्यासमोर आला तो 'सकाळ'.

आता 'सकाळ' हा शब्द का डोक्यात यावा हा प्रश्न मला सर्वांत आधी पडला. काहीही लॉजिक नाही. उगाच. अक्षरशः रॅन्डम. आधी मी बरीच डोकेफोड केली, की हा शब्द आला कुठून आणि मग ह्यावर डोकेफोड केली, की लिहायचं काय? मग अचानक जाणवलं, की ह्या शब्दाला अनेक फाटे फुटतात. (फाटा म्हटलं, की आधी मला शीळफाटा आठवतो. आणि त्यानंतर राजू परूळेकर. असो.) खूप कंगोरे असलेली विचारचक्र सुरू होतात. मग म्हटलं, क्रमवार एकेक करून लिहू.

१. सकाळ म्हटल्या म्हटल्या पहिल्यांदा माझ्या डोक्यात, 'सकाळी उठोनी देवासी भजावे, गुरूसी वंदावे, जीवेभावे।' हा श्लोक आला. कुठल्यातरी एका व्यक्तिमत्व विकास शिबिरामध्ये संचालक म्हणाले होते, 'आपण स्वतःलाच वारंवार चकित करत असतो'. ह्याचा प्रत्यय मला वारंवार येतो, पण ते सहसा नकारात्मक चकित असतं, आज मी चक्क सकारात्मक चकित झालो. मला असलं चांगलं, साजूक आणि सोज्वळ आठवावं, हे माझं मलाच आधी पटलं नाही. मला भरून यायला सुरूवात झाली होती, पण तेव्हढ्यात ह्याचंच ऐकलेलं एक बाळबोध शाळकरी विडंबन आठवलं आणि माझा आश्चर्याचा भर लगेच ओसरला. 'सकाळी उठोनि देवासी भाजावे, गुरूसी वधावे, जीवेभावे।' अत्यंत ऍमॅच्युअर विडंबन आहे, शुद्ध मराठीत हौशी विडंबन म्हटलं तर तेसुद्धा एक विडंबनच होईल. असो पाचकळपणा पुरे. पण खरंच हे जे विडंबन आहे ते सुचल्यामुळे एक गोष्ट झाली, मी अजून नॉर्मल आहे आणि एकटेपणाचा माझ्यावर अजून काहीही परिणाम झालेला नाही हे कन्फर्म झालं.

जाता जाता - 'गुरूसी वधावे' नंतर 'जीवेभावे' येतं ना राव, तो किलर टच आहे विडंबनातला, शब्दशः सुद्धा!

२. दुसरा वैचारिक फाटा फुटला तो म्हणजे आजची सकाळ. आज सकाळी मी काय केलं. ७.३० ला जागा झालो. ८ वाजेपर्यंत गादीतून आळसावत बाहेर आलो. ८.३० च्या आसपास चहा वगैरे उरकून घरी मिस्ड कॉल दिला, आणि स्काईप चालू करून आईची वाट बघत बसलो. जाऊ द्या. हे सगळं लिहून काय होणार आहे. 'जाऊ द्या' च्या आधीची तीन वाक्य इग्नोअर करा, दुर्लक्षित करा, मला बॅकस्पेस मारायचा कंटाळा आलाय. तर मी सकाळी काहीतरी टाईमपास करत असताना ऑर्कुटवर काहीतरी कीडे करत होतो. जेव्हा मी ऑर्कुट नवं जॉईन केलं होतं, तेव्हा जोशात येऊन वाट्टेल तेव्हढ्या कम्युनिटीज जॉईन केल्या होत्या. माझ्या जवळपास ९९ कम्युनिटीज आहेत आणि मी एकावरही काहीही करत नाही. रोज उजवीकडच्या विंडोत ९-१० ऍक्टीव्ह कम्युनिटीज दिसतात. सहसा मी बघतही नाही(कबुली - समीरा मखमलबाफ ची कम्युनिटी असली की तिकडे सहसा लक्ष जातं). पण आज चक्क तिची कम्युनिटी दिसत नसतानाही लक्ष गेलं. 'ओल्डबॉय' ची कम्युनिटी दिसली आणि डोक्यात हजारो घंटा वाजायला लागल्या. जवळपास ५ वर्षांपूर्वी पाहिलेला सिनेमा. आजही त्याच्या फ्रेम्स डोक्यात घर करून आहेत. ती क्लॉ हॅमर, ते पिंजारलेले केस आणि तो शेवटून दुसरा लिफ्टमधला सीन. त्यानंतर मी आवरलं, म्हणजे आंघोळ वगैरे हो. आजची सकाळ संपली.

३. अजून एक वैचारिक फाटा. रोजची सकाळ. रोज सकाळी मी काय करतो. अगदी गेल्या आठवड्यापर्यंत मी सकाळी उठोनी, चालायला जायचो. १५ मिनिटं ते अर्धा तास मधलं जे काही उठण्याच्या वेळेला सूट करेल. पण हल्ली जाम थंडी पडायला लागलीय सकाळी, त्यामुळे बंद केलंय. आता संध्याकाळी जातो. पण संध्याकाळ हा आजचा विषय नाही, त्यामुळे त्याबद्दल पुन्हा कधीतरी. तर चालून आल्यावर मी चहा बनवतो. हल्ली उठल्या उठल्या चहा बनवतो, कारण चालण्याची वेळ झोपेच्या वेळेला अधिकारिकरित्या जोडण्यात आलेली आहे. चहा झाला की आन्हिकं उरकून बस पकडायला नेमाने(नेमाडे नव्हे. ओके ओढून ताणून केलेला विनोद होता. सॉरी.) धावतो. मग बस, मग मेट्रो आणि मग चालतो. थोडक्यात वाहतुकीचे सगळे प्रकार होतात. मग गुगल सुरू होतं आणि माझी रोजची सकाळ संपते.

४. हा मात्र खराखुरा वैचारिक फाटा बरं का. सकाळ वृत्तपत्र. सकाळ म्हटलं की मला सर्वप्रथम त्यांचं ओळखचिन्ह डोळ्यासमोर येतं. पहिल्यांदाच बघणार्‍यांना ते 'सुकाळ' असंही वाटू शकतं (हे मला एकदा बाबांनी दाखवलं होतं). मग 'सुकाळ' म्हटलं की मला 'गाढवाचा गोंधळ अन लाथांचा सुकाळ' ही म्हण आठवते. आणि 'गाढव' म्हटलं की मला बाबांनीच केव्हातरी सांगितलेला एक 'मुद्राराक्षसाचा विनोद' अर्थात प्रिंटींग जोक आठवतो.

"एकदा एक पत्रकार एका ज्येष्ठ नेत्याच्या घरी मुलाखतीसाठी जातो. तेव्हा नेता झोपलेला असतो. तर तो पत्रकार परत येऊन बातमी तयार करतो. 'आम्ही त्यांच्याकडे मुलाखतीसाठी गेलेलो असता, ते गाढ व शांत झोपलेले होते.'

पेपरात दुसर्‍या दिवशी छापून येतं. 'आम्ही त्यांच्याकडे मुलाखतीसाठी गेलेलो असता, ते गाढव शांत झोपलेले होते.' "

मग ज्येष्ठ नेता, गाढव आणि शांत झोपलेले असल्या कॉम्बिनेशनवरून मला शरद पवार आठवले (आठवले वरून आत्ता मला रामदास आठवले आठवले, पण तिथे डेड एन्ड आला म्हणून मी पुन्हा शरद पवारांनाच आठवले) आणि शरद पवार आठवल्यावर त्यांचा पेपर 'सकाळ' आठवला. थोडक्यात एक वर्तुळ पूर्ण झालं.

५. किती विचित्र. मला सकाळवरून मुक्तपीठ आठवायला इतका वेळ लागला. ५व्या क्रमांकावर चक्क! तिथल्या प्रतिक्रिया हल्ली कमी झाल्यात हे एक कारण असेल किंवा एकंदरच तिथे हल्ली मजा येत नाही हे दुसरं. किंवा एकंदरच आपण आपल्या माणसांना गृहित धरतो म्हणून असेल. पण मुक्तपीठ आठवलं हे महत्वाचं! मागच्या वाक्यात मी 'आठवले' असं लिहिणार होतो. पण मग म्हटलं, नपुंसकलिंगी आहे त्यामुळे 'आठवलं' ऍप्रॉप्रियेट आहे आणि पुन्हा 'आठवले' लिहिलं की श्लेष होतो आणि मला पाचकळ राजकीय विनोद करावेसे वाटतात. पण मग ह्या नपुंसकलिंगावरून मला एक झकास शाळकरी विनोद आठवला.

एकदा एक मुलगा रडत रडत घरी येतो. बाबा विचारतात काय झालं. मुलगा म्हणतो, 'बाबा, मास्तरांनी मारलं.' बाबा विचारतात 'काय केलंस?' तो म्हणतो मास्तरांनी विचारलं, "मराठी भाषेत लिंग किती आणि कुठली?" मी सांगितलं, "तीन. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग." बाबा म्हणतात, "मग? बरोबर तर उत्तर दिलंस. मग मारलं का मास्तरांनी?" त्यांनी पुढे विचारलं, "उदाहरणं दे!" मी दिली, "तो फळा, ती शाळा आणि ते मास्तर!"

तर 'सकाळ' ह्या शब्दावरून आत्तापर्यंतच मला एव्हढं काय काय सुचलं आणि आधी एक ओळ तरी खरडता येईल का ह्या काळजीत होतो मी. मेंदूच्या खोलीत अडकलेल्या विचारांना मुक्त करायची ही शाब्दिक चावी बरी वाटली. "रूठी हुई प्रतिभा(टॅलेंट ह्या अर्थी) को मनाने का अच्छा आयडिया है।" "व्हाट एन आयडिया सरजी।"