Showing posts with label सरकार. Show all posts
Showing posts with label सरकार. Show all posts

5/12/2010

पोस्टचा विषय


आत्ता मी तुफान पकलोय. मला काहीतरी लिहावंसं वाटतंय, पण काय लिहू ते सुचत नाही. केव्हाचा विचार करतोय. विविध विषय आठवून पाहिले. जसे,
१. सकाळपासून काय केलं - ऑफिसात संगणका समोर बसलो. काम केलं नाही केलं हा प्रश्न महत्वाचा नाही. देवकाकांच्या बझकट्ट्यावर विविध विषयांवर आपल्या मताची पिंक टाकली. मधे एकदा जेवायला आणि दोनदा कॉफी प्यायलाही जाऊन आलो. पण ह्या सगळ्यात लिहिण्यासारखं काहीच नाही.
२. इंग्लंडमध्ये स्थापन होत असलेलं नवं सरकार - कॉन्झर्व्हेटिव्ह आणि लेबर (मला पर्सनली ह्या पक्षांची मराठी नावं फार फार आवडतात - हुजूर आणि मजूर. ज्यानं कोणी बनवलीत तो चांगला रसिक माणूस असणार {माझ्यासारखा}.) ह्यांच्यात लिब-डेम(लिबरल डेमोक्रॅट - हा जुना पक्ष नसल्याने त्या रसिक, बारसं करणार्‍याच्या तावडीतून वाचला; पण मी आहे ना {त्याच्यासारखा} - ह्या पक्षाचं मराठी नाव - खजूर.) ला आपल्या बाजूने ओढण्यासाठी चालू असलेली रस्सीखेच. मग भरपूर कोलांट्याउड्या मारल्यावर मजूर पंतप्रधानाने(मस्त शब्द वाटला ऐकायला) दिलेला राजीनामा आणि हुजूर पक्षाने खजूर पक्षाशी केलेली युती. हुजूर पंतप्रधान आणि खजूर उपपंतप्रधान (हा शब्दही मस्त वाटला). ह्या सगळ्यावर मी बापुडा काय पोस्ट लिहिणार.
३. नुकताच एका मराठी कम्युनिटी साईटवर झालेला कथित आर्थिक घोटाळा आणि त्याचे अन्य कम्युनिटी साईट्स वर उमटलेले पडसाद - हा मला एकदम सपट परिवार महाचर्चा सारखा विषय वाटतोय. माझे बाबा हा कार्यक्रम (सपट महाचर्चा) बरेचदा पाहतात (हे हवेतलं वाक्य आहे, कार्यक्रमाच्या अस्तित्वाविषयी मला काही कल्पना नाही). मला राहून राहून प्रश्न पडतो, की सपट परिवार हा चहा आहे, तर हे लोक कार्यक्रमाचं नाव 'सपट परिवार चहाचर्चा किंवा चहा चर्चा" असं का नाही ठेवत. आधीच नावात परिवार असल्याने मिसगाईड होतो माणूस. हां तर सांगण्याचा मुद्दा हा, की आत्ता मला सपट महाचर्चा करायची इच्छा नाहीय.
४. माझी शाळा - आता कुणाला हा प्रश्न पडेल की असा ५वी च्या मराठीच्या परीक्षेत निबंधाला येणारा विषय मला सुचण्याचं कारण काय. तर कारणं तशी बरीच आहेत.जसं, १. नको, आता इथे A,B,C,D वगैरे घ्यावं लागेल. जाऊ द्या बुलेट्स नकोतच द्यायला. मागच्या वाक्यातली बुलेट ही बंदुकीची गोळी, किंवा मोटरसायकल ह्या अर्थाने नसून वर्ड ह्या संगणक प्रणालीतील अनुक्रमांक देण्याच्या पद्धतीला दिलेलं विचित्र नाव ह्या अर्थाने आहे(अनुक्रमांक हा शब्द मला उत्स्फूर्तपणे सुचलेला आहे, जर कुणाकडे बुलेट्स साठी खरा योग्य शब्द असेल, तर मी मोठ्या मनाने माझी चूक सुधारेन). हां तर आपण कुठे होतो, माझी शाळा हा विषय मला का सुचला. तर, त्याचं असं झालं ऑर्कुटमध्ये आमच्या शाळासोबत्यांपैकी एकाने आमच्या दहावीच्या भौगोलिक सहलीत काढलेलं एक समूह छायाचित्र टाकलं. मग सगळ्यांमध्ये त्यात चेहरे टॅग करण्याची अहमहमिका लागली. सगळे दुसर्‍यांना ओळखत होते, पण स्वतःचाच चेहरा कुणाला ओळखू येत नव्हता (आईच्यान, मी दुसर्‍याने कन्फर्म करेपर्यंत स्वतःबद्दल कॉन्फिडन्ट नव्हतो). त्यात दुसर्‍या एका आपला वेळ सत्कारणी लावणार्‍या सदगृहस्थ मित्राने माझ्या शाळेची ऑफिशियल साईट बनवली आहे. मी कर्तव्यकर्म असल्याप्रमाणे ती दुसर्‍याच दिवशी जॉईन केली होती, पण आज त्यानं त्याची थोडी जाहिरात करण्यासाठी मला सांगितलं. इतका विश्वास तर हॅरी बावेजाचाही हरमन बावेजावर नसेल. (सुज्ञ वाचकांच्या लक्षात माझी सरोगेट ऍडव्हर्टायझिंग आली असेल, मी मित्राला दिलेला शब्द मोडू शकत नाही) तर अशी दोन कारणं झाली ज्यामुळे मी माझी शाळा ह्या टायटलवर आलो होतो. पण मला आत्ता शाळेत झालेले माझे विविध पचकेच आठवत असल्याकारणे मी पोस्ट लिहू इच्छित नाही.
५. दंतकथा - आता दंतकथा ह्या विषयावर मी का आलो. मला खरं म्हणजे एक लघुकथा लिहायची होती. एकदम जेन्युईन. एकदम शाळेत एक 'विजयस्तंभ' अशा कायशाशा नावाची वि.स. खांडेकरांची लघुकथा होती, तशी. अजूनही मला लघुकथा म्हटलं की तीच आठवते ('विजयस्तंभ' ही लघुकथा). किमान शब्दांत कमाल आशय सांगणारी (संदर्भासहित स्पष्टीकरणात असं सगळं लिहावं लागायचं). किमान शब्दांत कमाल आशय म्हटलं की मला गिर्‍हाईकाचा 'किमान शब्दांत कमाल अपमान' करणारे पुणेरी दुकानदार आठवतात. मग ही अशी गाडी आशयावरून पॉप कल्चर(लोकसंस्कृती{पुन्हा उत्स्फूर्त शब्द...}) वर यायला लागली आणि लघुकथा लिहायचं गांभीर्यच निघून गेलं. मग लोकसंस्कृतीवरून मला पुणेरी पाट्या आनि त्याचं कल्ट असं काय काय आठवावं लागलं आणि कल्टला समानार्थी शब्द मी शोधू लागलो. सगळ्यात जवळ जाणारा शब्द मला दंतकथा वाटतो (इथे मी कल्ट ज्या अर्थी घेतोय त्यासाठी, बाकी कल्टला मिथुनदा हा देखील एक समानार्थी शब्द आहे). तर मी लघुकथेवरून दंतकथेवर आलो. पण तरीही अख्खी पोस्ट लिहावी असं मला ह्यातदेखील काही सुचेना. पण आता एव्हढं लिहिलंच आहे, तर एका छोट्याश्या दंतकथेबद्दल सांगूनच संपवतो.
त्याचं काय आहे. एन. टी. एस. उर्फ नॅशनल टॅलेंट सर्च नावाची एक परीक्षा असते. त्याच्या पूर्वपरीक्षा म्हणजे अनुक्रमे बी.टी.एस. बॉम्बे टॅलेंट सर्च(हे कदाचित आता एम.टी.एस. झालं असेल, पण तसं झालं तर कॉन्फ्लिक्टींग होईल, कसं ते पुढे) आणि एम.टी.एस. (महाराष्ट्र टॅलेंट सर्च, कळलं का कॉन्फ्लिक्ट). तर ह्या बी.टी.एस. चे मुखिया रुपारेल कॉलेजचे एक सर होते. ते इंटरव्ह्यूमध्ये पोरांना तुफान घ्यायचे(नाचीजको पर्सनल एक्स्पिरियन्स है). तर ते आणि त्यांनी घेतलेले विविध इंटरव्ह्यू हा बी.टी.एस. आणि एम.टी.एस. ला बसलेल्या पोरांसाठी एक दंतकथेचा विषय होता. त्यातली एक दंतकथा, ज्याची सत्यासत्यता बिलकुलच पडताळता येणार नाही (फक्त सर सांगू शकतात) पुढीलप्रमाणे.
एकदा सर एका मुलाचा इंटरव्ह्यू घेत असतात. त्यांच्या टेबलावर त्यावेळी एक चीनीमातीचा चहाचा कप ठेवलेला असतो आणि त्यावर एक बशी उपडी असते. ते त्या मुलाला फुल घेत असतात, पण मुलगाही पुरून उरत असतो. अचानक सर त्याला सांगतात,
"बाळ, आता असं कर, ह्या कपातला चहा, त्या बशीला हात न लावता पिऊन दाखव.
तो मुलगा स्टन होतो. विचारमग्न पण दृढ मुद्रेने तो एकदा सरांकडे आणि एकदा बशीकडे बघतो. सर विजयी मुद्रेने एकदा बशीकडे आणि एकदा त्याच्याकडे पाहतात. मग मुलगा हळूहळू एकेका शब्दावर जोर देत म्हणतो,
"सर, पण ह्या कपात चहा कुठाय?"
"मग" आता स्टन व्हायची पाळी सरांची असते.
"कप रिकामा आहे सर. ह्यात चहा असता तर मी नक्की पिऊन दाखवला असता." मुलगा त्याच दृढ मुद्रेने म्हणतो.
"मी तुला सांगतो, की कपात चहा आहे. पिऊन दाखव." सर स्वतःला सावरत म्हणतात.
"पण सर मी सांगतोय, की ह्यात चहा नाही."
"तुला कसं माहित, चहा मी मागवलाय." सर रेस्टलेस होतात.
"कळतं सर बघून." तो थोडासा हललेला असतो, कारण कसंही असलं तरी सरांशी पंगा महागात पडू शकतो.
"आहे चहा. पिऊन दाखव."
"नाहीये, तो कप रिकामा आहे."
सर तिरीमिरीतच बशी उचलून त्याला दाखवतात, "हा बघ चहा."
तो क्षणार्धात कप उचलून तोंडाला लावतो.



छ्या! एव्हढे विषय सुचूनही धड एका विषयावर पोस्ट नाही झाली.

2/13/2010

इझून गेली ठिणगी रामा इझून गेला जाळ !

'नटरंग' सिनेमामध्ये एक छान कटाव आहे. तशी 'नटरंग'ची सगळीच गाणी मला आवडतात, पण सध्याची परिस्थिती पाहून ह्या ओळी फारच समर्पक वाटतात.


"मिरगाचा (मॄग नक्षत्राचा) हंगाम दाटला, फाटलं आभाळ। इझून गेली ठिणगी रामा इझून गेला जाळ॥"

२६/११/२००८ ला रात्री ११ वाजता मी विमानाने मुंबईला उतरलो होतो. विमानातच सूचना मिळाली होती की शहरात काहीतरी घडलंय म्हणून. पण किती भयंकर आहे ह्याचा अंदाज आधी आप्रवसन (इमिग्रेशन) ला आणि मग विमानतळाबाहेरची सुरक्षाव्यवस्था बघून आणि शेवटी विमानतळावरून घरी जातानाचे रिकामे रस्ते पाहून आला. आणि घरी पोहोचल्यावर टीव्ही पाहून अंदाजाचं रुपांतर अविश्वासात झालं. मग ते हल्ले संपल्यावर तिथे मेणबत्त्या लावायचे प्रकार झाले. नेत्यांनी एकमेकांच्या यथेच्छ उखाळ्यापाखाळ्या काढल्या. आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. दोन चार मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले. मुंबईच्या 'स्पिरिट'ला सलाम झाला. शहीदांना श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबांना मदतीच्या नावाखाली त्यांचे अपमानही झाले. मीडियावाल्यांनी चार-पाच वर्षांची कमाई ४-५ महिन्यांमध्येच करून घेतली. सरकारतर्फे पाकिस्तानला ललकारण्यात आलं संबंध तोडण्याची भाषा झाली. "पुरावे" सुपूर्द करण्यात आले. जिवंत दहशतवाद्याच्या खटल्यातून सर्व मृतांना न्याय मिळवून देण्याच्या गोष्टी झाल्या.

७-८ महिनेच झाले असतील. पुन्हा तेच सरकार निवडून आलं. ज्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले होते, बहुतेकांना पुन्हा तीच खाती मिळाली. बाकीच्यांची राजकीय पुनर्वसनं झाली. पाकिस्तानने 'पुरावे' अपुरे असल्याचे सांगत सर्व प्रमुख आरोपींना सोडून दिलं. हाफिज सईद गच्च गर्दीच्या रॅल्या घेतोय. 'जिहाद' चे नारे देतोय. कसाब, एकमेव जिवंत अतिरेकी आता प्रसारमाध्यमांचा अन्नदाता आहे. कसाब कोर्टात हसला, त्याने डोळ्याच्या एका कोपर्‍यातून पाहिलं, तो मराठीत बोलला, आज कसाब कोर्टात असताना मजा झाली वगैरे वगैरे. कोणाच्या हे लक्षात आहे का की ह्याच माणसामुळे १८४ जिवंत माणसं मेली. मुंबई पोलिसांचे ३ खंदे अधिकारी गेले. पण आपण मात्र पाकिस्तानी कलावंत आणि त्यांचे क्रिकेटपटू भारतात यावेत ह्याच काळजीत. त्यांच्या रोजीरोटीची जवाबदारी आपली असल्यागत. फक्त दीड वर्ष झालं असेल, आता आपण "पाक खेळाडू आपले पाहुणे आहेत. आपण त्यांचा अपमान नाही केला पाहिजे. ते सर्वोत्तम आहेत." असं म्हणणार्‍या एका कणाहीन माणसाच्या एका सिनेमासाठी पाठिंबा देतो. इथे खेळाडूंना कुणाचाही विरोध नाही. विरोध देशाला आहे. त्यांना सर्व बाबतीत एकटं पाडल्याखेरिज शांततेचं महत्व कळणार नाही. पण आपण सहिष्णू आहोत. इथे हाच पैशांसाठी लग्नांमध्ये नाचणारा नट गुलशन कुमार खटल्यात व्यस्त असल्यामुळे साक्ष देऊ शकला नाही आणि भरत शाह खटल्यात उलटला होता ह्याचा सर्वांना सोयिस्कर विसर पडतो. इथे पुन्हा विरोध सिनेमाला नाही तर व्यक्ति आणि वृत्तीला आहे. आपलं सरकार सगळा पोलिसी फौजफाटा त्याच्या सिनेमाच्या दिमतीला लावतं, हेच सरकार मराठी सिनेमावर अशीच वेळ आलेली असताना तमाशा पाहतं कारण तेव्हा सरकारातलेच मंत्री आपली अब्रू वाचवण्यासाठी सिनेमा रोखत असतात. सगळा फौजफाटा सिनेमाच्या मागे असल्यामुळे पुण्यात अतिरेकी अगदी सहज बॉम्ब फोडतात. १० लोक मरतात. तरी ४-५ महिन्यांपूर्वी निवडणुकांपर्यंत गर्जना करणारं सरकार पाकिस्तानबरोबर बोलणी करायला तयार होतं. आणि पुन्हा पाकिस्तानी म्हणतात, आम्ही नाही झुकलो, तेच झुकले शेवटी. आणि तरीही आपण पुनःपुन्हा तेच सरकार निवडून द्यायचं.

महागाई वाढलीये. ८०च्या दशकात, बायकांनी लाटणे मोर्चे काढून सरकारला सळो की पळो करून सोडलं होतं. आता लोकांना विचारा. लोक म्हणणार, काय करणार आपण? अरे? महागाई निवडणुकांच्या आधीपासून आहे, काय केलंत तुम्ही निवडणुकांच्यावेळी? घरी बसून लोळलात. पुन्हा तेच सरकार आलं आणि हेच चालणार. महागाई वाढणार, दहशतवाद वाढणार, पाकिस्तान असंच आपल्या तोंडावर थुंकणार. आपण मात्र सिनेमांना पाठिंबा द्यावा, तो कुणी काढलाय त्याच्याशी आपल्याला काय? उद्या अफझल गुरु किंवा कसाबल घेऊन सिनेमा आला तरी आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पाठराखण करण्यासाठी तो सिनेमा बघायचा. महागाई, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, दहशतवाद ह्या विषयी आपण काय करणार? खरंच, आपण काय करणार?

असं म्हणतात, की प्रत्येक मनुष्यसमूहाला त्याच्या लायकीनुसार नेता मिळतो. खरंय, अगदी शंभर टक्के खरं आहे.

षंढ झालो आहोत आपण! काही करायचंच नाही आहे कुणाला! सगळ्यांना फक्त स्वतःची काळजी आहे. पण सगळे हे विसरतात, की ज्या आगीकडे ते "आपल्याला काय त्याचं" म्हणून पाहतायत, ती आज नाहीतर उद्या त्यांच्याच घरात येणार आहे. पण पर्वा कुणाला आहे. लाचारीची सवय झालीये. मुघल आणि इंग्रजांनी आपल्या लाचार प्रवृत्तीचा फायदा घेऊनच राज्य केलं. आता घरभरू नेते करताहेत. एके काळचे आपण शूर म्हणवणारे, इतिहासातच शूर राहिलो आहोत. आता तर स्थिती सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे आहे.

"इझून गेली ठिणगी रामा इझून गेला जाळ ।"