Showing posts with label स्मायली. Show all posts
Showing posts with label स्मायली. Show all posts

10/17/2010

एक आहे स्मायली...

गेल्या काही दिवसांपासून चॅट अगदी म्हणजे अगदीच कमी झालं. त्यामुळे एरव्ही दिवसात सहज केली जाणारी स्मायलींची उधळण कमी झाली. गुगल बंद ठेवलेलं असल्याने इतर कम्युनिटी साईट्सवरचा वावर थोडा वाढला आणि विविध प्रकारचे स्मायली दिसले. मग काल अशीच वेगवेगळ्या प्रकारच्या स्मायलींची चर्चा आणि तुलना करताना ही पोस्ट लिहायची कल्पना माऊताईनं दिली. मग फक्त 'स्मायली' ह्या शब्दावरून जे जे सुचलं, ते ते लिहायचा प्रयत्न केला. :)

स्मायली म्हणजे मराठीत भाषांतर केलं तर 'हसरा'. पण इंटरनेट ऊर्फ आंतरजालाने 'स्मायली'ला स्माईल शिवाय बरंच काही काही करायला लावलं. 'स्मायली' हे विशेषण न राहता विशेषनाम झालं. आणि त्याला अनेकानेक रूपांमध्ये पेश केलं जाऊन त्याच्या विशेषणपूर्ण नावामागे अनेकानेक विशेषणं जोडली गेली. स्मायली कधी चिडवणारा, तर कधी चिडणारा, कधी हसवणारा, तर कधी हसणारा आणि कधी कधी तर चक्क 'रडका' स्मायली (ऑक्झिमोरॉन म्हणतात इंग्रजीत अशा शब्दांना, मराठीत विरोधाभासी शब्द असं भारदस्त नाव सुचतंय मला)! जगभरातल्या इंटरनेट चॅट्स चा आधारस्तंभ – स्मायली!

नेटावर थोडी शोधाशोध केली तर कळलं, पहिला स्मायली फिल्मवर दिसला तो १९४८ साली चक्क 'इंगमार बर्गमन' ह्या गाजलेल्या स्वीडीश चित्रपट दिग्दर्शकाच्या 'हॅमस्टाड' ह्या सिनेमात. पण स्मायलीला आजच्या रूपात पहिल्यांदा डिझाईन करण्याचा मान 'हार्वे बॉल' ह्या माणसाला दिला जातो, त्यानं १९६३ साली हे डिझाईन बनवलं. वॉलमार्ट ह्या मोठ्या सुपरमार्केट चेनचं स्मायली हे कित्येक वर्षं ओळखचिन्ह होतं. पण स्मायली हे नाव आणि लोगो मात्र फ्रेंच पत्रकार फ्रँकलिन लुफ्रानिकडे आहे, ज्यानं पहिल्यांदा पेपरामध्ये चांगल्या बातम्यांसाठी हे चिन्ह वापरायला सुरूवात केली. पण ह्या सगळ्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कॉपीराईट इश्यूज आहेत. पण ह्या सगळ्या गोंधळापासून अलिप्त 'स्मायली' मात्र आपल्या जन्मदात्यांच्या हक्कावरून चाललेल्या भांडणांमध्ये न पडता, लोकांची भांडणं जमलीच तर सोडवण्याचं काम करतो.

एकतर स्मायली हे बायकी नाव आणि त्यात कुणीही त्याला कुठलीही क्रिया करायला लावावी. बिचारा दिवसाचे चोवीस तास कुठल्या न कुठल्या प्रमाणवेळेमध्ये कुणा न कुणाकडून एक्स्प्लॉईट केला जातो. होय, एक्स्प्लॉईट! शोषण होतं त्याचं. कारण वापर हा शब्द तेव्हा वापरतात जेव्हा तो प्रमाणामध्ये होतो. पण स्मायली काय, फुकट आहे मग केलं जातं शोषण! माझ्या मते शोषण ही वस्तू अथवा सेवा फुकटात मिळण्यामुळे निर्माण होत असलेली मानसिक वृत्ती आहे. आमचा एक साहेब म्हणतो, "काही लोकांची, 'मुफ्त में मिलेगा, तो फिनाईल भी पी लेगा' ही वृत्ती असते." तद्वतच ही प्रमाणाबाहेर स्मायली वापरण्याची माणसांची वृत्ती. ज्यानं स्मायलीचं शोषण चालू आहे.

स्मायली हा माझ्यामते जगातला एकमेव असा प्राणी असेल, जो जन्मतः हसरा असेल आणि नंतर त्याला जगानं रडवलं. आणि नुसतं रडवलंच नाही, तर जीभ काढून दाखवायला लावली, तर कधी दात काढून हसायला लावलं, कधी नुसतंच तोंड पाडायला लावलं तर कधी मौन पाळायला, कधी रागाने लाल व्हायला तर कधी गॉगल चढवून स्टाईल मारायला न जाणे त्याला काय काय करायला लावलं लोकांनी. आणि अजूनही अगदी आत्ता ह्या क्षणी देखील तो बापुडा कुणाच्या तरी बोटांच्या इशार्‍यावर विविध हावभाव करून दाखवत असेल आणि कुणाला तरी रिझवत, रडवत, चिडवत किंवा हसवत असेल. तो लोकांच्या बोटांवर नाचतो, पण वृत्तीनं मात्र अगदीच बोटचेपा आहे.

स्मायली एव्हढासा दिसतो, पण त्याची क्षमता प्रचंड आहे. कधीकधी १० ओळी लिहूनपण जो भाव व्यक्त होणार नाही, तो एक स्मायली व्यक्त करून जातो. त्यामुळेच मूलतः आळशी असलेली मानवी जमात स्मायलीच्या मागे एव्हढी दिवानी आहे. दोन ते तीन कळा दाबून मणभर भावना व्यक्त करण्याचा सोपा मार्ग म्हणजे स्मायली. बोळकं असलेल्या लहान बाळापासून ते बोळकं झालेल्या आजीआजोबांपर्यंत सर्वांपर्यंत योग्य भावना योग्य रितीने पोचवू शकणारा एकमेव विश्वासू व्यक्ती म्हणजे स्मायली. कुठल्याही भाषेची आडकाठी नाही की कुठल्याही भाषेच्या काठीची गरज नाही असा स्वतःवर नं भुंकता देखील 'स्वयंभू' असणारा म्हणजे स्मायली. स्मायलीला फक्त चेहराच असतो (काही काही ठिकाणी पूर्ण शरीर असलेले द्विमिती स्मायलीही असतात, पण एकमितीवाल्या स्मायलीची मजा और आहे), पण त्यामुळे त्याच्या भावना व्यक्त करण्याला मर्यादा येण्याऐवजी त्यातली गंमत अजूनच वाढते. नुसती चॅटविंडोच कशाला, कागदाच्या कपट्यावर एक छोटासा स्मायली काढून कुणाला दिला तरी समोरच्याला भावना लगेच पोचतात. स्मायली खर्‍या अर्थाने वैश्विक आहे.

त्याला स्वतःचा असा एकच भाव आहे. एक स्मितहास्य, बस. त्यामुळे त्याचं चिन्ह तेच आहे. एअर इंडियाच्या महाराजाप्रमाणे तो कायम हसतमुख असतो. मग लोक त्याच्याकडून वाट्टेल ते करवतात. कधी कधी विचार येतो, की अशी अनेकानेक चांगली माणसं, जी फक्त दुसर्‍यांना दुःख होऊ नये म्हणून आपल्या भावभावना लपवून ठेवून दुसर्‍याला चांगलं वाटेल असं वर्तन करतात. किंवा समाजासाठी किंवा देशासाठी संपूर्ण आयुष्य देऊन फक्त इतरांच्यासाठी जगणारे लोक. ही सगळी माणसं म्हणजे एकप्रकारचे स्मायलीच असतात. दुसर्‍यांच्या भावभावनांसाठी स्वतःचं सगळं उधळून टाकणारी माणसं.

स्मायली हा खरं बघायला गेलं, तर एक महान अभिनेता आहे. कुठलीही भावना चटकन आणि तेही फक्त मुद्राभिनयाने व्यक्त करू शकणं हा त्याचा हातखंडा. पण कधी त्याची कथा लिहायची पाळी आली, तर ती शोकांतिकाच असेल असं का कुणास ठाऊक वाटतं. बालबुद्धीला अतितीव्रताण देऊन विशाल कल्पनाविस्तार करता माझ्यासमोर आत्ता 'एका तुफानाला कुणी चॅटविंडो देता का चॅटविंडो!" म्हणत भरकटणारा स्मायली येतोय. पण फरक इतकाच आहे की आबालवृद्धांपासून सगळ्यांना आवडणारा आणि आपल्याच वयाचा वाटणारा स्मायली स्वतः मात्र चिरतरूण आहे, चिरंजीव आहे. पण तो अश्वत्थाम्यासारखा भळभळती जखम घेऊन तेल मागत फिरत नाहीये, उलट तो जमलंच तर लोकांच्या जखमांवर फुंकर घालत फिरतोय.