Showing posts with label Natarang. Show all posts
Showing posts with label Natarang. Show all posts

2/26/2010

रितीच घागर नशिबी माझ्या..!

माझ्या नटरंग पुराणामुळे आता माझे मित्र, माझे घरचे सगळेच पकले आहेत, पण नटरंग बद्दल ऐकून, वाचून, पाहून आणि त्यातली गाणी ऐकून मी मात्र अजूनही पकलो नाही आहे. आणि कधी पकेनसं वाटत नाही. (अर्थात मतभेद असु शकतात).गाण्यांचा तर रतीब घालतोय मी स्वतःला. जवळपास सगळीच तोंडपाठ झाली आहेत. असो, मुद्दा तो नाही. प्रत्येक गाण्याचे श्रेय जितके अजय-अतुल चे आहे, तितकेच गुरु ठाकूर चे आहे. नुसतीच सुंदर शब्दरचना नाही तर, पात्राची मनस्थिती, काळ ह्या सगळ्याचं अप्रतिम मिश्रण जवळपास प्रत्येक गाण्यात आहे. मी प्रत्येक गाण्याबद्दल वेगळी नोंद लिहू शकतो, पण ते नंतर, आत्ता ज्या गाण्याबद्दल लिहिण्यासाठी कित्येक दिवसांपासून ठरवतोय, त्या गाण्याबद्दल.
'कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी' हे गाणं म्हणजे एक गवळण आहे. हे गाणं चित्रपटामध्ये गुणा कागलकरच्या पहिल्या तमाशातील आहे. गुणा शेतातील विहिरीचे पाणी काढून द्यायचे काम करतो. पण शेतांमध्ये विहिरीवर मोटर बसवल्याने गुणाला दुसर रोजगार शोधणे भाग पडते. आणि तो आपल्या कलेचा उपयोग करायचं ठरवतो.  पण परिस्थितीमुळे त्याला नाच्या बनावं लागतं. आता पहिलवान गुणा नाच्या बनलाय आणि आपल्या गावातल्यांसमोर, स्वतःच्या बायको-मुलासमोर आपला तमाशाचा धंदा सुरु करतोय - नाच्याच्या रूपात. अशा वेळी त्याच्या गवळणीतल्या ओळी असतात.
"नकोस फोडू कान्हा माझी, घागर आज रिकामी। हसेल सारी गोकुळ नगरी होईल रे बदनामी॥
आज दिली बघ नंदकिशोरा हाती लाज तुझ्या रे। रितीच घागर नशीबी माझ्या शरण तुला मी आले॥"
ह्या ओळींमधून तो देवाकडे लाज राखण्याचं आवाहन करतो. एक म्हणजे धंद्याची लाज आणि त्याची स्वतःची आणि त्याच्या कुटुंबाची(तो नाच्या बनल्यामुळे). अर्थात, हे सगळं सूज्ञ वाचकांना ठाउकच असेल, पण मला केव्हाचं डाचतंय आणि आज दोनदा गाणं ऐकल्यावर मी स्वतःला आवरू शकलो नाही.
पुन्हा गुरू ठाकूर पाणी भरणार्‍या गुणा कागलकरच्या तोंडी रिकाम्या घागरीचं उदाहरण देतात, तेव्हा आपोआप दाद जाते. वाह!

2/07/2010

नटरंग

अप्रतिम. एवढा एकच शब्द माझ्या मनात आला, जेव्हा मी नटरंग बघितला.(अर्थात कुणाचे ह्याबाबतीत माझ्याशी मतभेद असू शकतात.) खरं म्हणजे काही गोष्टी शब्दांमध्ये वर्णन करणं शक्यही नसतं आणि योग्यही नसतं. कारण जर चित्रपटांचं वर्णन शब्दांमध्ये करता आलं असतं तर, कादंब-यांवर चित्रपट बनले नसते. पण ब्लॉग म्हटलं की शब्द आलेच. आणि शब्द म्हणजे माझं स्वतःला व्यक्त करण्याचं सध्या तरी एकमेव माध्यम आहे.

मी सिनेमांची परीक्षणं करणं केव्हाच सोडलं आहे. कारण मला प्रत्येक सिनेमामध्ये काहीना काही आवडतंच. पण मजा अशी झालीय, की मला नटरंगमध्ये सगळंच आवडलं. अगदी वेशभूषेपासून, ते अप्रतिम संगीतापर्यंत. पण नटरंग एका वेगळ्याच उंचीवर पोहोचतो, ते अतुल कुलकर्णींमुळे. अतुल कुलकर्णी "गुणा कागलकर" च्या व्यक्तिरेखेमध्ये अनेकानेक रंग भरत जातात आणि डॉ. आनंद यादवांची कादंबरी वेगवेगळ्या पातळ्या पार करत जाते. मी डॉ. यादवांची मूळ कादंबरी वाचली नाहीय, पण नक्कीच त्यांना स्वतःलाही ह्या सिनेमाचा अभिमान वाटला असेल यात वाद नाही.

रवी जाधव ह्यांचं दिग्दर्शन नवोदितासारखं वाटतंच नाही. आणि त्यांचा एडव्हर्टायझिंगचा अनुभव चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममध्ये दिसत राहतो.  सर्व प्रमुख कलाकारांचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे. तो काळ, ते प्रसंग आपल्याला त्यांच्या विश्वात घेउन जातात. एका सच्च्या कलावंताचं दुःखं आणि त्यायोगे त्याच्या नातेवाईकांच्या वाट्याला आलेलं दुःखं सगळं अंगावर येत राहतं. नशीबाचे विचित्र खेळ बघून मन सुन्न होतं. पण सगळ्या परिस्थितींमध्ये सुद्धा असलेली गुणाची निरागसता आणि सचोटी पाहून काळजाला पीळ पडतात आणि प्रेरणासुद्धा मिळते. हाच ह्या चित्रपटाचा विजय आहे, की ही एका प्रतिभावान, सच्च्या पण परिस्थितीने गांजलेल्या कलाकाराची विलक्षण कथा असूनही त्या कलेशी दूरान्वयानेही संबंध नसलेल्या प्रेक्षकालासुद्धा आतपर्यंत स्पर्शून प्रेरणा देते.