१.राजा हरिश्चंद्र ते मुग़ल-ए-आज़म
२.मुग़ल-ए-आजम ते शोले
३.शोले ते गुंडा
४.गुंडा च्या पुढचे
वरील वर्गीकरण हे माझं स्वतःच्या निरीक्षणाचं अपत्य आहे. अनेकांना ह्यावर अनेक साक्षेपी आक्षेप असण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरं म्हणजे सुरूवातीला प्री-गुंडा आणि पोस्ट-गुंडा असे दोनच वर्ग मी करणार होतो. पण मग स्युडो-इंटलेक्च्युअल्स अर्थात दांभिक बुद्धिवाद्यांनी माझ्या प्रस्तुत लेखाकडे वाचनापूर्वीच पाठ फिरवली असती. मला आलमआरासुद्धा टाकायचा होता पण मग अति झालं असतं. म्हणून मग मांडवलीमध्ये मी चार कालखंड केले. नीट बघितलं तर प्री-गुंडा आणि पोस्ट गुंडा हे वर्ग योग्य ठरतात, पण ते सिनेमाच्या एकंदर जडणघडणीच्या दृष्टीने. आज मला सिनेमाच्या अंगभूत घटकांबद्दल ऊहापोह करायचाय, त्यामुळे वरील वर्गीकरण त्यादृष्टीने करण्यात आलेलं आहे.
रंगांबद्दल कदाचित ठाऊक असेल. लाल, पिवळा आणि निळा हे एका थिअरीनुसार तीन मूळ रंग आहेत. बाकी सगळे रंग ह्या तीन आणि ह्या तिघांपासून बनलेल्या रंगांची वेगवेगळी संगती मिसळून बनवता येतात. तर ह्या वैज्ञानिक सिद्धांताशीच मिळतंजुळतं एक स्फोटक विधान मी करणार आहे.
"आजच्या तारखेला बनणारा कुठलाही हिंदी सिनेमा 'राजा हरिश्चंद्र', 'मुग़ल-ए-आज़म', 'शोले' आणि 'गुंडा' ह्या चार मूळ आणि ह्या चौघांपासून बनलेल्या सिनेमांची वेगवेगळी संगती मिसळून बनवला जातो."
संपलं विधान! आता स्पष्टीकरण.
राजा हरिश्चंद्र हे भारतीयत्वाचं आद्य प्रतीक आहे. भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कारांचं सर्वोच्च उदाहरण. चित्रमहर्षी दादासाहेब फाळक्यांनी बनवलेली ही कलाकृती म्हणजे पहिला सिनेमा म्हणजे एका अर्थी भारतीय सिनेमाचा गोत्रपुरूष. तत्कालीन भारतीय मानसिकतेची नस अचूक पकडून त्यांनी जशी चित्रनिर्मिती केली त्याला तोड नाही. आणि तत्कालीन भारतीय मानसिकता आजही मुळाशी तशीच आहे. त्यामुळे हा एक मूलभूत घटक अर्थात महाभूत मानला गेलाय.
मुग़ल-ए-आज़म हा प्रेमकथात्मक भारतीय सिनेमामधला मैलाचा दगड आहे. पराकोटीचं प्रेम आणि पराकोटीची कर्तव्यबद्धता त्यावर पराकोटीचा खर्च असं एक वेगळंच रसायन म्हणजे मुग़ल-ए-आज़म. 'लार्जर दॅन लाईफ' असा गरीब मुलगी व श्रीमंत मुलाचा रोमान्स आणि त्या रोमान्सपायी पार शहेनशाहशी बगावत हे सगळे मसाले तत्कालीन भारतीय सिनेमाला एका वेगळ्या वाटेवर नेण्यास कारणीभूत ठरले. त्यामुळे हादेखील एक महाभूत मानला गेलाय.
शोले बद्दल मी खरंतर बोलण्याचीच गरज नाही. मुळात शोले हा काही परकीय सिनेमांवरून प्रेरित असल्याचं जरी म्हटलं गेलं असलं आणि प्रथमदर्शनी ते खरंही वाटत असलं, तरी शोलेमध्ये (असलीच तर) मूळ कलाकृतीचं जे काही भारतीयीकरण केलं गेलंय, त्याला तोड नाही. शोलेतला एक एक संवाद आणि एक एक सीन आजही भारतीय मानसामध्ये बसलाय आणि त्यामुळेच त्याच्याशी जवळिक करणारं काहीही उचलून धरलं जातं. शोलेनं भारतीय सिनेमाला अजून एक वेगळी वाट दाखवली आणि ती खूप बहुपेडी होती. म्हणूनच शोलेदेखील एक महाभूत मानला गेलाय.
आता चौथं महाभूत 'गुंडा'. होय. गुंडानं भारतीय सिनेमाला अजून एका नव्याच वाटेवर नेलं. तत्कालीन भारतीय सामाजिक स्थिती आणि स्थित्यंतरं तसंच ह्या स्थित्यंतरामुळे थोडीफार गोंधळलेली सामाजिक मानसिकता ह्यांवर परखड भाष्य करत प्रसंगी अतिशय खालच्या पातळीवर जात लिहिलेले मनोरंजनही करणारे संवाद आणि अत्यंत 'ऍब्स्ट्रॅक्ट' एडिटिंग तसेच कमी निर्मितीमूल्यामध्ये फारच थेट पद्धतीचं आणि नायकाचं मसीहा प्रमाणे केलं गेलेलं चित्रिकरण अशा वेगळ्याच वाटेवरून गुंडाचा प्रवास होतो. ही वाट पूर्वीही अनेक सिनेमांनी चोखाळली होती पण 'गुंडा'चं वेगळेपण आणि श्रेष्ठत्व दोन गोष्टींमुळे अधोरेखित होतं. एक म्हणजे 'गुंडा' ही 'त्या' विशिष्ट वाटेवरची निर्विवाद सर्वोच्च कलाकृती आहे. आणि दोन म्हणजे, 'त्या' वाटेला गुंडाने प्रदर्शनाच्या अनेक वर्षांनंतर राजमान्यता मिळवून दिली. ती दुय्यम म्हणून अभिजनांकडून नाकं मुरडली गेलेली वाट 'मुख्य प्रवाहा'त आणण्याचं श्रेय फक्त आणि फक्त गुंडाला जातं. त्यामुळेच गुंडाला चौथं किंवा चतुर्थ महाभूत म्हणून मी मानलंय.
तर ही झाली भारतीय सिनेमाची 'चतुर्महाभूते'. आजच्या भारतीय सिनेमाला उलटं पालटं करून कसंही पहा, ह्या चौघांपासूनच तो बनलेला असल्याचं तुमच्या लक्षात येईल. कुठलंही उदाहरण घ्या. अगदी 'हम आपके है कौन?' पासून सुरूवात करूया. 'राजा हरिश्चंद्र' ह्या कलाकृतीचं स्पष्ट प्रतिबिंब पडलेलं तुम्हाला दिसेल. त्यातला तळ्याकाठचा रोमान्स वगैरे पाहता 'मुग़ल-ए-आज़म' ही थोडाफार डोकावतो. बाकी कालानुरूप आलेली चकचकाटी निर्मितीमूल्य वगैरे वर्खं आहेत. अस्सल माल हा उपरोल्लेखित दोन महाभूतांपासूनच बनलेला आहे. (टीप - 'हम आपके हैं कौन?' बनेपर्यंत 'गुंडा' प्रदर्शित झाला नव्हता, नाहीतर 'गुंडा' चे निशान देखील दिसले असते.)
शोले ह्या महाभूतापासून बनलेले शेकड्याने सिनेमे असतील, त्यातले कित्येक तर सुपरहिटही ठरले, पण त्यातलं घटक महाभूत तर दिसतच. त्याचबरोबर 'आयटम सॉन्ग' ही देखील शोलेनं भारतीय सिनेमाला दिलेली (माझ्या मते) देणगी आहे. 'मेहबूबा मेहबूबा' ह्या गाण्याच्या अभूतपूर्व यशाने कित्येक सिनेमांमध्ये व्हिलनच्या कॅम्पातलं आयटम सॉन्ग घातलं गेलं असेल ह्याला गणतीच नाही. आणि हल्ली तर कुठेही आयटम सॉन्ग घालता येतं.
यश चोप्रा आणि करण जोहर ह्या द्वयीनं मात्र 'मुग़ल-ए-आज़म' च्या गायीचंच दूध काढायचं ठरवलं. त्यांच्या सर्व कलाकृती 'श्रीमंत बापाचा प्रेम सोडून आयुष्यात कसलीही विवंचना नसलेला मुलगा, प्रेमभंग किंवा प्रेम ह्या दुःखांपलीकडे काहीच दुःख नसलेलं एक जग ज्यामध्ये सगळेजण प्रचंड श्रीमंत असतात, प्रत्येकाला नातेवाईक असतात, नात्यांची जाम काळजी असते, महालांमध्ये राहतात आणि सारखे रडतात' ह्या तत्वांपासून बनतात. त्यामुळे त्यांचे बहुतांश सिनेमे हे 'मुग़ल-ए-आज़म' ह्या महाभूतापासून बनल्याचं स्पष्ट होतं. बाकी, राजा हरिश्चंद्र चं प्रतिबिंबही कुटुंबाच्या एकमेकांशी चाललेल्या वागणुकीवरून स्पष्ट दिसतं. शोले आणि गुंडा मात्र अभावानेच त्यांच्या सिनेमांमध्ये दिसून येतात. कारण ही दोन महाभूतं सर्वाधिक अवघड अशी आहेत.
पण पोस्ट गुंडा इरामध्ये मात्र सुरूवातीच्या कालावधीमध्ये बाकी तीन महाभूतांनीच धुमाकूळ माजवला होता. मी आधीच सांगितल्याप्रमाणे 'गुंडा' ची वाट ही अभिजनांनी नाकं मुरडलेली वाट होती. पण म्हणतात ना, खरं सोनं काळाच्या कसोटीवर नेहमीच जिंकतं. तद्वतच पूर्णपणे दाबून टाकलेलं असून देखील गुंडानं व्हिसीडी आणि इंटरनेटच्या मार्फत जनमनामध्ये चंचुप्रवेश केला. हळूहळू गुंडाबद्दलची जागृती एव्हढी झाली की लोकांना सिनेमात काही ठिकाणी सूचकपणे पेरलेले गुंडाचे रेफरन्स कळू लागले. मग गुंडाची वाट आधीच लोकमान्य झालेली असल्याने अल्पावधीतच राजमान्य झाली आणि त्याला 'सिनेमा ऑफ योअर' असं गोंडस नाव देऊन मुख्य प्रवाहात आणण्याची मखलाशी केली गेली. पण आमच्यासारख्या हाडाच्या सिनेरसिकांना 'सिनेमा ऑफ योअर' म्हणजेच गुंडा हे लगेच लक्षात येतं.
पोस्ट गुंडा इरामध्ये 'गुंडा' ची काही वैशिष्ट्य पेरलेले अनेक सुपरहिट सिनेमे आले. जसं चित्रविचित्र वेशभूषा केलेले विनोदी खलनायक, मसीहा आणि पराकोटीचा अन्यायग्रस्त नायक संपूर्ण खलनायकी टोळीला एकहाती नेस्तनाबूत करणारा नायक, यमकामध्ये किंवा कवितांमध्ये किंवा वनलायनर्स मध्ये बोलणारा खलनायक, नायकाने खलनायकाच्या मृत्यूची तारीख (मौत की डेट) फिक्स करणे ही सगळी गुंडाचीच वैशिष्ट्य आहेत आणि ही वैशिष्ट्य लेवून अनेक सुपरहिट सिनेमे आले पण नजीकच्या काळात आऊट ऍन्ड आऊट गुंडा ज्यॉनरवाल्या सिनेमांची लाट आली. उदा. 'गज़नी', 'वॉन्टेड' आणि 'दबंग'.
चतुर्महाभूतांवर मला प्रत्येकी एक पोस्ट ह्या पद्धतीने विस्तृत चर्चा करावी लागेल, त्यामुळे चतुर्महाभूतांबद्दल तूर्तास इतकंच. पुढच्या लेखासाठी पुरेशी पूर्वतयारी झालेली आहे.
तर काल मी दबंग पाहिल्यामुळे आज आपण दबंगची चिरफाड करू. सर्वप्रथम - मला 'दबंग' प्रचंड प्रचंड आवडला. होय, 'वॉन्टेड' नंतर कित्येक दिवसांनी मूलतः 'गुंडा' वर आधारलेला चित्रपट पाहिल्याने असेल, पण जाम जाम मजा आली. मला कशी कुणास ठाऊक पण प्रचंड लवचिकपणे सिनेमा पाहण्याची हातोटी जन्मजात मिळालीय. त्यामुळे मी चित्रपटाच्या ज्यॉनरनुसार आपोआपच चष्मा बदलून सिनेमा पाहतो, त्यामुळे 'डेकालॉग' असो वा 'चांदनी चौक टू चायना' (होय मी हादेखील एन्जॉय केला होता) मला कंटाळा वगैरे प्रकार सहसा येत नाही. आणि 'दबंग' तर प्रत्यक्ष धर्मचित्रपटाशी साधर्म्य सांगतोय अशी हवा असल्याने मी चित्रपट सुरू व्हायच्या आधीच योग्य चष्मा लावून तयार होतो.
पण मजा इथेही झालीच. जेव्हा एखादा सिनेमा मला एकाच वेळी एकाहून जास्त चष्मे लावायला मजबूर करतो, तेव्हा मला तो सिनेमा जास्त आवडतो. 'दबंग'चं तसंच आहे. तो 'गुंडा' प्रमाणेच विसंगत आविर्भाव आणून अनेक ठिकाणी व्यवस्थेला शालजोडीतले लगावत पुढे सरकतो. 'सरकारतर्फे जखमी पोलिसांना ५०००० आणि मेलेल्यांना १ लाख' हा प्रसंग असू दे किंवा 'मोटे वाले उस तरफ, पतले वाले इस तरफ और फिट वाले मेरे पीछे' म्हणून मागे वळून जेव्हा नायक पाहतो, तेव्हा मागे कुणीच नसल्याचं पाहून तो म्हणतो 'क्या हो गया है पुलिस फोर्स को!' किंवा 'वो डकैत हमारे फंडरेजर थे और उन्होने रेज किया हुआ फंड आप ले गये' हा प्रसंग असू दे. त्यानंतर पोलिओ झालेल्या माणसाला 'बचपन में दो बूंद नहीं पिलायी क्या?' अशा संदेशपर प्रसंगात 'बाप को शराब पीनेसे फुरसत नहीं मिली' असं सणसणीत आणि विचित्रपणे दाहक ब्लॅक कॉमेडी स्टाईल उत्तर अशा विविध छोट्या छोट्या वरवर विसंगत वाटणार्या पण साथीनेच प्रचंड मनोरंजन करणार्या प्रसंगांतून दबंग पुढे सरकतो.
'वॉन्टेड' प्रमाणेच तोंडात बसतील असे डायलॉग्ज हे 'गुंडा' वरून घेतलेलं वैशिष्ट्य.
"१०१ कमिनों की बलि चढाई थी हमारे मां-बाप ने तब जाके हम पैदा हुए थे।" मुख्य खलनायक.
"हम उन्ही १०१ कमिनों के भगवान हैं, बदला लेने के लिये आये हैं।" नायक.
"जंगल में रहके सेर से बैर! देखो भैया हम आदमी थोडे जटिल किस्म के हैं।" मुख्य खलनायक.
"जंगल में शेर कम और शिकारी ज्यादा हो गये हैं, ज्यादा ज़ोर से दहाडना नहीं, वरना चमडी भी उधड सकती है!" नायक.
असले एक से एक गुंडा स्टाईल डायलॉग्ज. त्यात मुख्य खलपात्राचं नाव 'छेदी सिंग' हे 'गुंडा'तल्या मुख्य खलपात्राच्या नावावरूनच प्रेरित झाल्यागत वाटतं. आणि महत्वाचं म्हणजे 'गुंडा' प्रमाणेच मुख्य खलपात्र इथेही नायकाच्या जवळपास संपूर्ण कुटुंबाच्या विविध प्रकारे छळाला कारणीभूत होतो. 'गुंडा'त नायकाच्या बहिणीचा वापर होतो, इथे भावाचा. 'लंबा करणे' हा वाक्प्रचार, जो की गुंडामुळे प्रसिद्ध झाला, त्याचाही कौशल्यपूर्वक कथानकामध्ये वापर करण्यात आलाय. एकट्याच धावणार्या नायकावर काटकोनात होत असलेला गोळीबार लगेच 'गुंडा'तला सीन डोळ्यापुढे आणतो. शेवटाकडे जेव्हा नायक पोलिसांच्या गाड्यांचा ताफा घेऊन खलनायकाकडे पोचतो, तेव्हा गुंडातल्या ऍबॅसेडर्सचा आणि शेवटाकडला रिक्षाचा सीन तडक डोळ्यासमोर येतो. आणि गुंडाप्रमाणेच एव्हढं सगळं असूनही शेवटी खलनायकाबरोबर नायक वन ऑन वन फाईट करतो. पण खलनायकाचा शेवट मात्र वेगळा घेतलाय. तो मात्र 'गुंडा' तल्याच खलपात्राच्या भावाच्या खुनाप्रमाणे 'काव्यात्म न्याय' दर्शवणारा आहे.
बाकी, सलमानच्या पात्राची बिनधास्त दबंगाई आणि काय वाटेल ते करण्याची स्टाईल खरंच प्रभुजी मिथुनदांची आठवण करून देते. सलमाननं 'चुलबुल पांडे' पेललायही जबरा. एकीकडे तो दिसेल त्या खलपात्राला आणि मधे तर भावालासुद्धा हवा तसा फिरवून उडवून ठोकतो. कुठूनही कुठेही उड्या मारतो, गोळ्या घालतो. आणि त्याचबरोबर त्याचं भावाला ठोकताना गॉगलमागचं डोळे पुसणं, आई दगावल्याचं लक्षात आल्यावर दबंगाईच्या बुरख्यामुळे नीट रडताही न येणं आणि बापासमोर आपल्या दबंगाईचं खरं स्वरूप सांगताना हलकेच डोळ्यातून पाणी काढणं अशा प्रसंगांमुळे सिनेमाला बॅलन्स मिळतो. काही ऍक्शन सिक्वेन्सेस, 'मुन्नी बदनाम हुई' हे व्हिलनच्या कॅम्पातलं आयटम सॉन्ग, प्रेमामुळे बदलणारा नायक आणि यूपीचा बॅकड्रॉप हे 'शोले' ह्या महाभूतावरून घेतलेले प्रकार आहेत. स्वप्नवत रोमान्स, गरीब मुलगी हे 'मुग़ल-ए-आजम' वरून तर कुटुंब आणि नीतीमूल्य हे प्रकार 'राजा हरिश्चंद्र'वरून. एकंदरच 'दबंग' हे योग्य मिश्रण आहे.
त्यातही दिग्दर्शक अभिनवसिंग कश्यप (मी ऐकल्याप्रमाणे हा 'अनुराग कश्यप' चा धाकटा भाऊ आहे) काही ठिकाणी आपल्यावरचा टॅरँटिनोचा प्रभाव दाखवतो. वेगवेगळ्या ठिकाणी मारामारी करताना मधेच सलमानच्याच लोकप्रिय गाण्यांचे रिंगटोन्स व्हिलनच्या मोबाईलवर वाजू लागतात (इथे एक चूक आहे, सलमान ह्याला 'कॉलरट्यून' म्हणतो, जे माझ्या मते चूक आहे) आणि सलमान नाचता नाचता मारामारी सुरू करतो. पुन्हा लग्नाच्या वेळी बँडवाले 'अनुराग कश्यप'च्या सिनेमातलं गाणं वाजवतात. सिनेमाभर सलमान असताना 'काऊबॉय' सिनेमांच्या पद्धतीचं पार्श्वसंगीत वाजतं. सलमान स्वतःला रॉबिन हूड म्हणतो. अशा प्रकारे टॅरँटिनो स्टाईल इन-रेफरन्सिंग बरोबरच, सलमानची भ्रष्ट पोलिसांची टोळी आणि सलमान आपापसात जसं बोलतात (म्हणजे गंभीर विषयांवर एकदम कॅज्युअली), ते थोडंफार टॅरँटिनोच्या 'पल्प फिक्शन' वरून प्रेरित वाटतं. असो कदाचित मी अति सूक्ष्म निरीक्षणात शिरतोय.
अर्थात दबंगमध्येही अनेक सुटलेल्या जागा आहेत. पण सिनेमाचं विचित्र ज्यॉनर अशा गोष्टींना माफ करतं. अप्रतिम काम करणारा खलनायक सोनू सूद आणि सुंदर दिसणारी(थोडाफार अभिनय देखील करणारी) नायिका सोनाक्षी सिन्हा हे सिनेमाचे उर्वरित चांगले भाग. बाकी सिनेमात फक्त आणि फक्त सलमान आहे. 'गुंडा' प्रमाणेच नायकाचे नातेवाईक (विनोद खन्ना, डिंपल कपाडिया आणि अरबाज़ खान) हे फक्त खलनायकाशी वैयक्तिक शत्रुत्व निर्माण करण्यासाठीच सिनेमात आहेत.
एकंदर जवळपास ६०% गुंडा एलिमेन्ट असणारा 'दबंग' एकदातरी प्रत्येक सामान्य सिनेरसिकाने आणि 'गुंडा'ने भारतीय सिनेमा आणि सिनेरसिकांच्या आवडीनिवडींवर केलेले दूरगामी परिणाम पाहण्यासाठी सिनेअभ्यासकांनी पहायलाच हवा.
माझ्या मते ज्याप्रमाणे दारूच्या बाटलीवर ज्या पद्धतीनं किती टक्के अल्कोहोल आहे हे लिहिलेलं असतं, त्यापद्धतीनं प्रत्येक सिनेमाच्या पोस्टरवर किती टक्के 'गुंडा' आहे ते लिहायला हवं. जेणेकरून प्रेक्षकांना 'चष्मा' लावायला सोयीचं जाईल. आणि मी फक्त 'गुंडा' हे महाभूत एव्हढ्याचसाठी म्हणतोय कारण तेच सगळ्यांत 'स्ट्राँग' महाभूत आहे.