Showing posts with label गुंडा न्यूज. Show all posts
Showing posts with label गुंडा न्यूज. Show all posts

9/09/2010

बर्न अ 'गुंडा' डे

आज सकाळी अचानकच एक मोठं पार्सल माझ्या नावाने आलं. मी विचारात पडलो. म्हटलं मला कुणी एव्हढं मोठं पार्सल पाठवेल असं नाहीये. कोण असेल बरं? काय असेल बरं? असे नेहमीचे विचार करतच मी पार्सल उघडलं. आतमध्ये जे काय होतं ते बघून मी विस्मयचकित झालो. त्यामध्ये 'गुंडा' ह्या सिनेमाच्या शंभर एक सीडी/डीव्हीडीज होत्या. सोबत एक बुकलेट होतं. त्या बुकलेटवर "बर्न अ 'गुंडा' डे" असं मोठ्या अक्षरांमध्ये लिहिलेलं होतं. त्यामध्ये 'गुंडा'ची अक्षरं खालून थोडीशी काळपट रंगांची होती, त्यावर लालभडक आणि वर जळत असल्यामुळे ज्वाळा दाखवलेल्या होत्या. मी अचंभ्यात पडलो. माझ्या डोळ्यासमोर धडाधड भारतातले नेते यायला लागले. एक क्षण चिमणरावांचा भाऊ गुंड्याभाऊ पण डोळ्यासमोर तरळून गेला. मग एक बुकलेट उचलून पाहिलं. त्यात 'जो कर' ह्या संप्रदायाच्या लोकांनी '४ सप्टेंबर, २०१०' ज्यादिवशी "गुंडा" ह्या चित्रपटाला रिलीज होऊन एक तप पूर्ण होत होतं, त्या दिवसाला "बर्न अ 'गुंडा' डे" म्हणून साजरा करायचं ठरवलं होतं. त्या दिवशी 'गुंडा' सिनेमाच्या मिळतील तेव्हढ्या प्रती जाहीररित्या जाळण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. किमान एक तरी 'गुंडा' जाळा असं कळकळीचं आवाहन करण्यात आलं होतं.

आता मला महत्वाचा प्रश्न पडला. हे पार्सल मला पाठवण्याचा चावटपणा कुणी केला. होय, चावटपणाच. अहो मी 'बाबाईझम' किंवा अलम दुनिया ज्याला 'मिथुनिझम' म्हणून ओळखतात, त्या धर्माचा खंदा पुरस्कर्ता आहे. प्रेषित देखील होता ह्या धर्माचा, त्याला लोक 'बाबा' म्हणतात आदराने. त्यांच्या निर्वाणाला तीन दशके लोटलीत. काही भाविक त्यांना 'प्रेषित' मानतात, काही नुसताच सामान्य भक्त मानतात. पण त्यानं फारसा फरक पडत नाही. 'मिथुनिझम' मध्ये सर्वभक्तसमानता आहे. आमचा देव 'प्रभुजी मिथुनदा'. आमच्या देवापर्यंत पोचायला आमच्यात बडवे, मौलवी किंवा प्रीस्ट लागत नाहीत. आता महत्वाचा मुद्दा. 'गुंडा'चा आणि 'मिथुनिझम'चा काय संबंध? तर मंडळी. 'गुंडा' हा 'मिथुनिझम'चा 'धर्मचित्रपट' आहे! होय, धर्मचित्रपट. हा जगातला एकमेव धर्म आहे, जिथे धर्मग्रंथ नाहीये. धर्मचित्रपट आहे. धर्माचा संदेश आम्हाला तिथूनच मिळतो. हा संदेश 'बाबां'पर्यंत पोचवणारा आमचा फरिश्ता म्हणजे दिग्दर्शक कांती शाह.

गुंडाचे मुख्यत्वेकरून चार भाग पडतात.

१. खलकांड - ह्यामध्ये सर्व खलपात्रांच्या ओळखी आणि त्यांचे आपापसातले संबंध ह्यांवर प्रकाश पडतो. प्रमुख खलनायकाचा (प्रमुख खलनायकाचं नाव मी लिहू शकत नाही, कारण ते मिथुनींना अ-मिथुनींसमोर बोलणं हराम आहे) काटा काढण्यासाठी एक 'कफनचोर नेता' दुसर्‍या नावाजलेल्या गुंडाला सुपारी देतो. मग सर्व खलपात्रांच्या ओळखीचा एक दीर्घ प्रसंग आहे, ज्यात काही अतिशय गाजलेल्या ओव्या आहेत. उदाहरणार्थ, "मेरा नाम है पोते, जो अपने बाप के भी नहीं होते". ह्या प्रसंगातल्या अनेक ओव्या अ-मिथुनींसमोर वर्ज्य आहेत. त्यानंतर तो गुंड प्रमुख खलनायकाच्या बहिणीवर बलात्कार करून तिचा खून करतो. त्यावर मुख्य खलनायक अतिशय दीर्घ, ह्रद्य असं एक स्वगत म्हणतो, "मुन्नी, मेरी बहन मुन्नी! तो तू मर गयी. तू कटा हुआ गुर्दा, याने के मुर्दा हो गयी! लंबू(दुसरा गुंड) ने तुझे लंबा कर दिया, माचिस की तिली को खंबा कर दिया!" मला सांगा कुठल्या संवेदनशील माणसाला हे वाचून गलबलून येणार नाही? हे स्वगत हा गुंडाचा हायपॉईंट आहे. कारण इथे तो खलप्रवृत्तींची एक वेगळीच बाजू समोर आणतो. शेवटी खल देखील मानवच असतात असा एक मानवतावादी संदेशही ह्यातून जातो. अनेक खल मिथुनी पापक्षालनासाठी ह्या ओव्यांचं नित्य पठण करतात. असो. तर ह्यानंतर जेव्हा मुख्य खलपात्र लंबूला मारण्यासाठी घेराव घालतं, तेव्हा लंबूही एक दीर्घ संवाद म्हणतो. जो लिहिणं मला शक्य नाही. कारण, तो काही विशिष्ट परिस्थितींमध्येच उद्घृत करण्याचा सख्त अलिखित दंडक सारे मिथुनी मानतात. असे अनेक संवाद आहेत, जे अ-मिथुनींसमोर म्हणणं वर्ज्य आहे. त्याबद्दल पुन्हा कधीतरी! तर ह्या वधावेळी मुख्य खलपात्र 'हम दो नंबरके धंदे करनेवालोंकी बहू-बेटियों की जान और इज्जत का कोई भरोसा नहीं होता' असं एक अतिशय सखोल तत्वज्ञानपूर्ण वाक्य म्हणतं. ह्या एका प्रसंगात, किंबहुना ह्या वाक्यातच कित्येक वाममार्गाला लागलेल्यांना योग्य मार्गावर आणण्याची ताकद आहे. ह्यानंतर लंबूवधाचा प्रसंग संपतो.

२. हमालकांड - ह्यामध्ये प्रभुजी हमाल म्हणून आपली कर्तव्य पूर्ण करतात आणि त्याचबरोबर जगाला बंधुभाव आणि नागरिकशास्त्राचे धडेही देतात. ह्या कांडामध्ये प्रभुजींनी गुंडायुगात विमानतळ आणि गोदी अश्या दुहेरी कॉम्प्लेक्समधल्या हमालाचा अवतार घेतल्याचं स्पष्ट होतं. मग प्रभुजी विमानतळावर मुख्य खलपात्राच्या एका अनुयायाला गैरकृत्य करताना पकडतात आणि विमानतळापासून पार कोर्टापर्यंत पाठलाग करून पकडून देतात. आणि ह्याबद्दल बक्षिस मिळाल्यावर 'बाप पे पूत, पिता पे घोडा, कुछ नही तो थोडा थोडा' हा श्लोकही म्हणतात. ह्यानंतर प्रभुजी एका मुलीच्या लग्नासाठी पैसे कमी पडत असलेल्या म्हातार्‍या हमालाच्या मदतीसाठी मुख्य खलपात्राच्या पैलवानाला सहज चीत करून आपल्या निःस्वार्थी वृत्तीने आपल्या अवतारकार्याची एक चुणूक दाखवतात. पण त्याचबरोबर सामान्य हमालांप्रमाणेच दारू पिऊन धिंगाणाही घालून दाखवतात.

३. अन्यायकांड - ह्यामध्ये प्रभुजींची बहिण आणि एकंदरच त्यांच्या कुटुंबावर सर्व प्रकारचे अन्याय केले जातात. प्रभुजींच्या बहिणीचं फसवून लग्न लावून दिलं जातं आणि मुख्य खलपात्राचा भाऊ तिचा बलात्कार करून तिचा खून करतो. प्रभुजींचे वडिल जे पोलिसात हवालदार असतात, त्यांचा इन्स्पेक्टर बॉस त्यांच्यासमोर खुन्यांची मदत करतो. (पण प्रभुजींचे हवालदार वडिलही एकाच प्रसंगात मिश्या असलेले आणि नसलेले असे दिसून आपल्या दैवी अंशाचं दर्शन घडवतात, पण मर्त्य इन्स्पेक्टरला हा इशारा उमगत नाही आणि तो प्रभुजींच्या हातच्या अटळ मरणाच्या दिशेनं जातो.) ह्या दुर्घटनेनंतर प्रभुजी खलनायकांच्या घरी जातात, तो प्रसंग जर कुठल्या दा व्हिंची नं चितारला, तर 'लास्ट सपर' च्या तोडीचं पेंटिंग बनेल. प्रभुजी दरवाजात उभे आहेत आणि सर्व खलनायक समोरच बंगल्यातल्या जिन्यावर उभे आहेत. ह्याच प्रसंगात प्रभुजी आपल्या अवतारी असण्याचा प्रकट पुरावा देतात, जेव्हा ते सर्व खलपात्रांच्य 'मौत ची डेट' फिक्स करतात. आणि 'दो, चार, छे, आठ, दस...बस' ह्या मंत्राने तो प्रसंग संपतो.

४. धमालकांड - ह्यामध्ये प्रभुजींना आपलं अवतारकार्य पूर्ण करण्यासाठी शस्त्र हातात उचलावी लागतात. आणि प्रभुजी सर्व खलपात्रांना एक एक करून संपवतात. ह्यामध्ये प्रभुजी एका खलनायकाचा वध करताना 'भिगी हुई सिगरेट कभी जलेगी नही, और यह तय है की तेरी मौत की तारीख कभी टलेगी नही' ही ओवी म्हणतात (इथे लोक 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि' चे संदर्भ शोधतात, शोधोत). प्रभुजींच्या शस्त्रांमध्ये बझूका लॉन्चरचाही समावेश आहे, जे प्रभुजी आपल्या लीलेनं एका यःकश्चित गाडीच्या डिकीतून घेऊन येतात. आणि हा लॉन्चर रिफील करावाच लागत नाही, तो आपोआप रिफील होत राहतो (इथे काही लोक द्रौपदीच्या न संपणार्‍या साडीचे रेफरन्स शोधतात, पण तो मूर्खपणा आहे कारण इथे द्रौपदीपण प्रभुजी आणि कृष्णपण.) अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा प्रभुजी बच्चू भिगोना ह्या राजकीय नेत्याचा वध करण्यासाठी म्हणून अशक्य अंतरावरून रायफलने चालत्या गाडीवर नेम धरतात, तेव्हा दुसरंच खलपात्र बच्चू भिगोनाचा खून करतं, मात्र पोलिस प्रभुजींना पकडतात. ह्याउलट प्रभुजी त्यानंतर सर्व खलपात्रांना स्वतः संपवतात पण पोलिस काहीही करू शकत नाहीत. ह्यातून हा संदेश मिळतो, की 'बळी तो कान पिळी'. आणि शेवटी तर प्रभुजी मुख्य खलपात्राच्या अनौरस संततीला आपलं अपत्य म्हणून स्वीकारून जगाला एक वेगळाच मानवतेचा संदेश देतात.

तर असा धर्मचित्रपट लाभलेला हा खराखुरा आधुनिक धर्म म्हणता येईल. तर ह्या आमच्याच धर्माविरुद्ध रचलेलं हे कुभांड मलाच पाठवण्याचा उपद्व्याप माझ्या लक्षात आला नाही.

मग मला अजून एक गहन प्रश्न पडला. कारण पाचच दिवसांपूर्वी मी 'गुंडा दिवस' मोठ्या आनंदानं साजरा केला. त्यादिवशी सगळे 'मिथुनी' दिवसभर 'निर्जळी' कडकडीत उपवास करतात. आणि संध्याकाळी 'गुंडा' तल्या एका श्लोकात सांगितल्याप्रमाणे (संदर्भ - हमालकांडातील प्रभुजींचे टल्ली होऊन असलेले गाणे. मूळ पंक्ति "क्यूं ये बर्फ पीता है व्हिस्की में डालके?") व्हिस्कीत टाकून बर्फ पिऊन उपवासाची सांगता करतात (नीट वाचा. व्हिस्कीत टाकून बर्फ पितात, बर्फ टाकून व्हिस्की पीत नाहीत.). सहसा मिथुनी हा सोहळा समूहात मिळून करतात. कुटुंबंच्या कुटुंब एकत्र येऊन हा सोहळा साजरा करताना मी कित्येकदा पाहिली आहेत. एकदा उपवासाची ऑफिशियल सांगता झाली की मग सगळे एकमेकांना मिठ्या मारून शुभेच्छा देतात. मग ज्या कुटुंबाचे सर्वाधिक सदस्य सहभागी असतील, त्या कुटुंबाला यजमानपदाचा मान मिळतो आणि जेवणाच्या पंगतींना वाढण्याची जवाबदारीही. जेवण अगदी हॉटेलातलही चालतं. त्यावर कुठलीही आडकाठी 'मिथुनिझम' करत नाही. फक्त सहसा गोड्या पाण्यातल्या माशांचा समावेश त्या दिवशी जास्त असतो जेवणात. कारण प्रभुजींना 'गोड्या पाण्यातले मासे' फार आवडतात. पण शाकाहारी-मांसाहारी सर्वांसाठी सोय असते. त्यामुळे मोठ्या आनंदात जेवणं होतात. पुन्हा इथल्या जेवणाचा नियम आहे, जोवर खाणारा 'दो, चार, छे, आठ, दस... बस'(संदर्भ - अन्यायकांडामध्ये प्रभुजी त्यांच्या बहिणीच्या हत्येनंतर खलनायकांच्या घरी जाऊन ज्या ओव्या म्हणतात, त्यातली शेवटची ओवी) म्हणत नाही, तोवर वाढतच राहायचं. जेवणं उरकल्यावर मग 'गुंडा' चा एक सामुदायिक खेळ होतो. त्यानंतर एकदा प्रभुजींच्या नावाचा जयघोष करून सगळे मिथुनी समाधानानं आपापल्या घरी जातात. ह्यावर मला अनेकांनी विचारलं की स्वतः प्रभुजी कधी सहभागी होतात की नाही. मी म्हटलं, अरे अज्ञानी जीवांनो, 'देवाला कधी धर्म असतो का? धर्म आपण मर्त्य मानव बनवतो. सण आपण साजरे करतो, देवाच्या नावानं!'

तर मुद्दा होता की आज त्या घटनेला १०० वर्षं पूर्ण होऊन पाच दिवस होत असताना मला हे पार्सल आलं कसं? आणि त्या पवित्र दिवशी आमच्या धर्मावर आलेल्या ह्या संकटाबद्दल मला काहीच कसं ठाऊक नव्हतं. मी लगेच ते पार्सल कुठून आलंय हे शोधायला सुरूवात केली. मग माझ्या लक्षात आलं की भारतातल्या अगदी मोजकी फॉलोईंग असलेल्या 'जो कर' ह्या संप्रदायाचा हे मला पाठवण्यात काहीही हात नाहीये. एक विलक्षणच गोष्ट होती. त्याचं झालं असं होतं.

'जो कर' हा अतिशय रद्दड आणि मूर्ख असे रोमॅन्टिक सिनेमे पाहणार्‍यांचा संप्रदाय होता. ते बहुधा 'श्श चुपरहा' आणि 'जोहर कर'(ह्याच्या नावावरूनच संप्रदाय सुरू झालाय) ह्या दिग्दर्शकांचेच सिनेमे पाहायचे. त्यांचा स्वतःचा आमच्यासारखा फुल फ्लेज धर्म नाहीये. ते स्वतःची जागा बनवायचा प्रयत्न करत होते. ह्याच त्यांच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून त्यांनी आमच्यासारख्या प्रसिद्ध पण विचित्र धर्माचा प्रसिद्धीसाठी वापर करून घ्यायचं ठरवलं. सूर्यावर थुंकून लोकप्रियता मिलवायचा केविलवाणा प्रयत्न म्हणून ही अशी पार्सल बर्‍याच मध्यममार्गी लोकांना पाठवली. पण परिणाम उलटा झाला. आमच्या धर्मचित्रपटात असं आहे तरी काय? की ज्यामुळे इतका बवाल होतोय हे जाणण्यासाठी अनेकांनी उत्सुकतेपोटी 'गुंडा' पाहिला. आणि उलट आमच्या धर्माची लोकप्रियता रातोरात वाढली. 'गुंडा' जळणं तर राहिलं दूर, उलट लोकांनी अनेक दिवस वर्तमानपत्र, न्यूज चॅनेल्स सगळीकडे फक्त आमच्याच 'मिथुनिझम'बद्दल लेख लिहिले, डॉक्युमेंट्रीज बनवल्या. ज्यामुळे 'जो कर' संप्रदायाचे वांधे झाले. त्यांनी अजून जोरात बोंबलायला सुरूवात केली. त्यांनी ४ सप्टेंबरला काही सीडीज जाळल्यादेखील, पण ते पहायला कुणीच गेलं नाही. उलट त्यादिवशी 'गुंडा दिवसा'ची सेलिब्रेशन्स मात्र सगळ्यांनीच अनुभवली.

त्या विचित्र दिवसामुळे 'मिथुनिझम'ची पताका सगळीकडे फडकली, पण 'जो कर' संप्रदाय मात्र अनुल्लेखानेच मारला गेला किंवा झालाच तर इतका बदनाम झाला की जवळपास नामशेषच झाला. कित्येक त्याच संप्रदायाच्या लोकांनी फुटून वेगळी चूल मांडली. आणि त्या फजितीमुळे त्यांनी तो दिवस विसरून जाणंच पसंत केलं. मिथुनींच्या तत्कालीन धुरिणांनी हा द्वेषपूर्ण दिवस विसरून जाण्याचं आवाहन मिथुनींना केलं त्यामुळे ही ऐतिहासिक घटना इतिहासाच्या पानात हरवून गेली होती. पण हे एक त्याकाळचं पार्सल माझ्या आजोबांनी जपून ठेवलेलं होतं. ते त्यांच्या मृत्यूच्या एक वर्षाने मला पाठवण्याचं त्यांच्या मृत्यूपत्रात लिहिलेलं असल्याने हे मला आलं होतं. पण तरी मला कळत नव्हतं, की त्या दिवसाचे सगळे पुरावे जर नष्ट झाले होते, तर आजोबांनी हे जपून का ठेवलं?

दुसर्‍या दिवशी सहज त्यातली एक गुंडा ची नसलेली डीव्हीडी माझ्या नजरेस पडली. ती मी उत्सुकतेपोटी लावली. आणि मला धक्काच बसला. त्यात माझ्या आजोबांचा माझ्यासाठी व्हिडिओ संदेश होता. त्याचा सारांश असा-

"मी प्रत्यक्ष 'बाबां'चा वंशज आहे. आणि आजच्या जगाला 'मिथुनिझम'च्या विजयाची किंवा त्यापेक्षा 'आक्रस्ताळेपणा'च्या पराभवाची ही विलक्षण कथा सांगण्यासाठीच माझी नेमणूक 'बाबां'नी केली होती."

सर्व मिथुनी आणि अ-मिथुनींना 'गुंडा दिवसा'च्या उशीरानेच शुभेच्छा!

4/11/2010

अ, ब आणि क

मी जेव्हापासून सिनेमे अनुभवण्यासाठी म्हणून बघायला लागलो, तेव्हापासून माझी नजर नुसतीच गोष्ट किंवा अभिनय किंवा आवडते नट-नट्या (नट आपलं उगाच जोडशब्द म्हणून लिहिलंय) ह्याकडे न राहता इतर अनेक गोष्टींकडे जाऊ लागली (हे लिहिणार होतो म्हणूनच आवडते नट-नट्या{पुन्हा नट ...} आधी लिहिण्याचा खटाटोप). असो. तर इतर गोष्टी म्हणजे कॅमेरा ऍंगल, प्रकाशयोजना पण ह्या तांत्रिक गोष्टी फारश्या समजत नसल्यामुळे त्यांचा जास्त विचार न करता माझी गाडी वळते ती संवाद आणि संवादफेकीकडे.
मला वैयक्तिकदृष्ट्या ब-क दर्जाचे सिनेमे फक्त संवाद आणि संवादफेकीसाठी आवडतात (उदाहरणार्थ, मिथुनदांचं सेल्ल्युलॉईडवरचं महाकाव्य - "गुंडा"(१९९८)). हे सिनेमे तद्दन भिकार वाटू शकतात लोकांना. वाटोत, बिचार्‍यांना आयुष्यातल्या केव्हढ्या मोठ्या आनंदाला मुकावं लागतं ते त्यांना नाही कळायचं.  मला हे सिनेमे आवडण्याचं एकमेव कारण म्हणजे, ते कुठेही सत्य किंवा पाथब्रेकिंग वगैरे असण्याचा आव आणत नाहीत. नागवे तर नागवे, उगाच 'नग्नचित्र ही काय कला आहे तुम्हाला नाही कळायचं' असले आव आणणं नाही. म्हणूनच मला त्यातून निर्मळ मनोरंजन मिळतं. अर्थात, त्यामध्ये बीभत्सपणा अंमळ जास्त असतो, पण शेवटी ह्या सिनेमांचा टारगेट ऑडियन्स असतो. आता वानगीदाखल गुंडातला पुढचा संवाद पहा,
"ए कौन है बे तु?"-एक व्हिलन मिथुनदाला.
"मैं हूं जुर्म से नफरत करनेवाला, गरीबों के लिये ज्योती और तुझ जैसे गुंडों के लिये ज्वाला।"-मिथुनदा.
"बना के तुझे मौत के मुंह का निवाला, गाड दूंगा तेरी छाती में मौत का भाला।"-....
आता मला सांगा ह्या असल्या फालतू संवादांपासून सिनेमातले जवळपास सगळे संवाद यमक जुळवून आहेत, काही बीभत्स, काही खरंच विनोदी. मग का नाही मी ह्या सिनेमाला महाकाव्य म्हणायचं. असेच संवाद मिथुनदा आणि धर्मेंद्रच्या उतारवयातील अनेक सिनेमांमध्ये आहेत. पण असो, मी जर सुरु झालो तर फक्त संवादांचाच एक ब्लॉग होईल.
ह्या सिनेमांमध्ये आपले मराठीतले आघाडीचे अभिनेते मोहन जोशी हटकून असतातच. गुंडा, लोहा अश्या अनेक सिनेमांमधून त्यांनी आपल्या ब-अभिनयाचा लोहा मनवलेला आहे. तर आपण कुठे होतो. संवाद आणि संवादफेक. तर अश्या सिनेमांमध्ये बरेचसे कलाकार फडतूस असतात. स्वस्तात कामे करणारे. त्यामुळे त्यांचा दर्जा हा सिनेमाच्या एकूण दर्जाशी साधर्म्य साधणारा असतो. पण ह्या सिनेमांमध्ये जे मिथुनदा, धर्मेंद्र, शक्ति कपूर सारखे मंझे हुए कलाकार असतात त्यांचीसुद्धा खास ह्या सिनेमांसाठी एक टाळ्या घेणारी संवादफेक असते. एरव्ही "आय एम कृष्णन अय्यर येम ये." म्हणून अप्रतिम अभिनय करणारा मिथुनदा, जेव्हा "दो..चार..छे..आठ..दस.....बस.." म्हणतो, तेव्हा तो फक्त कूली शंकर असतो. "मेरा नाम है सुरज..ट्रक ड्रायव्हर सुरज." ह्या संवादाची कल्ट फॉलोईंग तर "द नेम इज बॉन्ड.." पेक्षाही जास्त असेल. धर्मेंद्रचं "कोई हसीना जब रूठ जाती है तो..." हे तुम्हाला पानीकम वाटायला लागेल, जर तुम्ही "पुट ऑन द घुंगरू ऑन माय फीट ऍंन्ड वॉच माय डीराम्मा.."(तहलका) पहाल. आणि तुम्ही जगप्रसिद्ध "सुसाsssईड" म्हणणारा हाच का धर्मेंद्र असा विचार कराल जेव्हा तो "मैं हूं गरम धरम...मुझे कैसी शरम."(पुन्हा तहलका) असं म्हणत नाचतो.
हे सिनेमे नुसतेच भिकार असतात अशातला भाग नाही, कधीकधी अत्यंत हिडीस उपमा देऊन संवादांना नटवलेलं असतं. आता लोहामध्ये एक भिकार सिच्युएशन आहे. एकेकाळचा मोठा भाई दीपक शिर्के('एक शून्य शून्य वाला) आता अगदी बरबाद आहे आणि तो दुसर्‍या एका भाईकडे मदतीची याचना करायला आलाय. त्याच्या ओळी आहेत, "मैं बिना पेट्रोल की गाडी हूं, मैं बिना नशे की ताडी हूं, मैं वो फटेली साडी हूं, जिसे कोई हिजडा भी नही पेहनेगा।"
अशा वेळी माझा सलाम जेव्हढा त्या कलाकाराला असतो, तेव्हढाच त्या सिनेमाच्या लेखक दिग्दर्शकाला. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन पुन्हा ओरडून पहा मी किती खालच्या पातळीवर आहे हे सांगण्यासाठी कलेजा लागतो, तो जर चोप्रा आणि जोहरकडे असता, तर "कांताबेन" आणि "ये कान में डाल.."(कल हो ना हो), "बोमन इराणीचं दोस्तानामधलं पात्र" आणि "सेक्सी सॅम" (कभी अलविदा ना कहना) हे बीभत्स विनोद आजची पिढी किंवा मॉडर्न सोसायटीच्या नावाखाली खपवण्याचा दांभिकपणा त्यांनी केला नसता. असो. माझे मुद्दे, दृष्टीकोन सगळ्यांनाच पटतील असं नाही. ते पटावेत असा अट्टाहासही नाही. आपण पुढे जाऊ.
माझी अजून एक आवडती गोष्ट म्हणजे एक्स्ट्रा. नाचातले नाही. एकूणातच सिनेमातले, किंवा अगदी हल्लीच्या सिरियलमधलेही (होय मी सिरियल्स बघतो. मी खुल्लम खुल्ला सांगतो की मी सिरियल्स बघतो). आणि हे फक्त ब-क वाले नाही सगळ्याच अगदी मेनस्ट्रीम (इथे द्व्यर्थ आहे का? मेन म्हणजे पुरुष सुद्धा होतं) सिनेमातलेही. हे लोकसुद्धा एक प्रकारचे 'ब आणि क'च, कारण मुख्य पात्र म्हणजे 'अ', हे आपले उगाच पूरक. ह्याचा अर्थ मला ब आणि क हा प्रकार एकूणातच भलताच आवडतो असा होतो. पण शाळेत मी 'अ' वर्गात होतो आणि गणितातल्या 'ब, क आणि ड' गटाशी माझे फारसे सलोख्याचे संबंध नव्हते.
तर आपण ब आणि क कॅटेगरीच्या पात्रांवर होतो. म्हणजे बघा हिरो हिरॉईनला पाणीपुरी खायला घालतोय, तेव्हा पाणीपुरीच्या गाडीवाल्याच्या चेहर्‍याचं कधी निरीक्षण केलंय तुम्ही कधी? अगदी मजेदार भाव असतात. म्हणजे कधी कधी एखादा हळूच आपण कॅमेरात दिसतोय की नाही हे डोळ्यांच्या कोपर्‍यातून बघत असतो, एखादा जबरदस्त कॅमेरा कॉन्शस असतो आणि तो इस्त्री (मला कधीकधी प्रश्न पडतो, काही उत्तर भारतीय, 'स्कूल'ला 'इस्कूल' 'स्तर'ला 'इस्तर' म्हणतात, मग ते 'स्त्री' ला 'इस्त्री' म्हणत असतील का?{समस्त स्त्रीवर्गाची आत्ताच माफी मागतो}) मारल्यागत करून उभा राहतो, एखादा जबरदस्त कॅमेरा कॉन्शस असतो पण त्याला दाखवायचं नसतं की तो कॅमेरा कॉन्शस आहे, मग तो उगाच खोटं हसू किंवा आपण आजूबाजूला बघण्यात गर्क आहोत असा आव आणत राहतो किंवा एखादा एवढा कॅमेरा अनकॉन्शस असतो की आपण सीनचा भाग नसून आपणपण शूटींग बघायला आल्यासारखा पूर्ण सीनभर हिरो हिरॉईनकडे पाहत राहतो. मग एखाद्या सीनमध्ये, स्पेशली ९०' च्या दशकातल्या सिनेमांमध्ये हिरो किंवा हिरॉईन रस्त्यावर नाचगाणी करत असतात, तेव्हा उभ्या क्राऊडमध्ये एखाद्याकडे जाऊन काहीतरी वेगळं म्हणजे त्याची टोपी काढतात किंवा त्याची दाढी कुरवाळतात किंवा त्याचा विग काढतात वगैरे, तेव्हा त्या एका माणसाचा चेहरा बघण्यासारखा असतो. कारण हे क्राऊड म्हणजे बरेचदा खरंच रस्त्यावरचं शूटींग बघायला आलेलं क्राऊड असतं, तेव्हा सिनेमाच्या मुख्य कलाकाराबरोबर आपण एका सीनमध्ये आहोत हा अनुभवच त्यांचा चेहरा तेजोमय करायला पुरेसा असतो, त्यामुळे बरेचदा त्यांची फजिती होतेय असा सीन असतो, पण त्या माणसाच्या चेहर्‍यावर असे भाव असतात की त्यावेळी समर्थांनी त्याला विचारलं की "जगी सर्व सुखी असा कोण आहे?' तर तो "मी" असं छाती ठोकून उत्तर देईल(मला माहितेय की ही जरा ओढून ताणून उपमा झालीय, खरं म्हणजे मी "स्वतः मेनका त्याचे पाय चोळून देतेय" असे भाव असतात असं लिहीणार होतो, मग अचानक पुलंचं 'असा मी असामी' आठवलं, मग म्हटलं टॅरॅंटीनो स्टाईल 'होमेज' देऊया. आणि बघा एकाच कंसात मला पुलं आणि टॅरॅंंटीनो दोन्ही माहितीयेत हे सांगूनही झालं). पण त्याहून जास्त मजेशीर भाव असतात ते ह्या फजिती होणार्‍याच्या शेजारी उभे असणार्‍यांच्या चेहर्‍यावर. आपण कॅमेरात व्यवस्थित येत असू की नाही ह्याची एकीकडे काळजी आणि येत असू तर नीट दिसत असू ना ही विवंचना (कारण सिनेमा रिलीज झाल्यावर नातेवाईक, शेजारी, सहकारी सगळ्यांना दाखवायचं तर धड दिसायला तर हवं ना). माझा हा पर्सनल एक्स्पिरियन्स आहे, मी लहान होतो तेव्हा - साधारण सहावी सातवीत असेन - माझ्या एका मित्राच्या आईने "ताकधिनाधिन" ह्या तेव्ह्याच्या सह्याद्रीवरच्या हीट टीव्ही शोसाठी पासेस मिळवले होते. तो शो होता "लहान मुलांचा खास", त्यामुळे माझा मित्र, मी आणि अजून एक अशी आम्ही तीन लहान मुलं गेलो होतो शूटींगला. आम्ही नशीबवान म्हणून ऍंकर उभे राहतात त्यांच्या शेजारीच आम्ही होतो. आपल्या तिरंग्याच्या तीन रंगाच्या टोप्या पोरांना वाटल्या होत्या. मला भगवा मिळाला होता. ती टोपी मी बरेच वर्ष जपून ठेवली होती, अजूनही घरी कुठेतरी असेल. च्यायला अर्ध्या तासाचा तो शो पण त्याचं शूटींग पाच तास चाललं होतं. प्रत्यक्ष शूटींगमध्ये तुम्ही मुख्य कलाकार नसाल तर काहीच मजा नसते हे तेव्हा माझ्या बालमनाला पहिल्यांदाच कळलं होतं. असो, तर मी एंकर्स च्या शेजारी बसलो होतो त्यामुळे प्रत्येक फ्रेममध्ये आपण असू असं वाटत होतं (अर्थात ते थोडंफार खरंही होतं), त्यामुळे जेव्हाही ते ऍक्शन म्हणायचे मी एकदम विचारवंतासारखा चेहरा करायचो आणि स्पर्धकांबरोबर काही विनोद झाला की उगाच फार मोठा विनोद झाल्यागत कंपल्सरी हसायचो. आणि त्यांनी टाळ्या वाजवायला सांगितल्या की अगदी जीवाच्या आकांताने टाळ्या वाजवायचो. अर्थात माझ्या मेहनतीचं मार्जरीन झालं (चीजमध्ये खूप अनवॉन्टेड फॅट्स असतात), कारण कधीतरी कुणीतरी तो एपिसोड पाहून, तू त्यात होतास का, म्हणून विचारल्याचं आठवतंय, नाही नाही एक मिनिट, त्यांनी विचारलं, तेव्हा मी ती भगवी टोपी घातली होती काय? च्यायला, कुठून तुम्हाला सांगायला गेलो, आयुष्यातल्या एका निखळ आनंदाच्या क्षणावर कायमसाठी संशयाचा बोळा फिरला. जाऊ द्या.
त्यानंतर असेच मस्त हावभाव न्यूज चॅनेलचे पत्रकार ज्या राह चलत्या आम आदमीचे इंटरव्ह्यू घेतात त्यांचे असतात ("अ वेन्सडे" चित्रपटात स्नेहल दाभी ह्या कलावंताने ते अप्रतिम दर्शवलेत). आपण कोणीतरी फार जाणकार दिसतो म्हणून आपल्याला विचारताहेत असं काहींना वाटत असतं, तर काहींना आपण स्मार्ट दिसतो असं वाटत असतं, तर काही आपण खरंच विचारवंत आहोत असं समजून पल्लेदार वाक्य फेकतात. तर त्याच्या आजूबाजूला उभे असलेले 'ह्यालाच का विचारतायत" असा विचार करत असतात, तर काही त्याच्यानंतर आपल्याला विचारलं तर आपण काय उत्तर द्यायचं ह्याची जुळवाजुळव (मनातल्या मनात) करण्यामध्ये गुंतलेले असतात, तर काही घरी फोन करून अमका चॅनेल लावा, मी दिसतोय का बघा आणि शेजार्‍यांना सुद्धा सांगा वगैरे करण्यात व्यस्त असतात. इथे सुद्धा पर्सनल एक्स्पिरियन्स आहे (आहेच का? म्हणजे काय, माझा ब्लॉग आहे, मी स्वतःची लाल नाही करणार तर कोणाची). एकदा आमच्या कॉलेजात एक न्यूज चॅनेलवाले आले होते, मी तेव्हा जी.एस. असल्याने (कळला ना महत्वाचा मुद्दा, मी जी.एस. होतो, बाकी नाही वाचलंत तरी चालेल) मी समन्वय करत होतो. सगळी जनता कॅमेरासमोर उभी झाली. मग त्यांनी "बसमध्ये कंडक्टर २५ पैश्यांचं नाणं परत देईल तर तुम्ही काय कराल?" असला काहीतरी प्रश्न विचारला. कोणी कोणी काय काय पुड्या सोडत होतं, कसलं उत्तर आणि कसलं काय, सगळं लक्ष कॅमेराकडे. नाहीतर आम्ही, कॅमेराचं आमच्याकडे बिलकूल लक्ष नसूनही नेटाने फ्रेममध्ये येण्याचा प्रयत्न करत होतो. कुणी घरी फोन लावले, मी मात्र मला विचारलं तर मी काय सांगावं ह्याची जुळवाजुळव करण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होतो. व्यर्थ अशासाठी की मी प्रश्न नीट ऐकलाच नव्हता आणि दुसरं मी समन्वयक असल्याने तांत्रिकदृष्ट्या मी कॅमेराच्या मागचा माणूस होतो आणि त्या निर्दयी कॅमेरामनने माझं कॅमेरासमोरचं टॅलेंट लोकांसमोर येउ नये ह्याची पुरेपूर खबरदारी घेतली. म्हणतात ना मीडिया बायस्ड आहे, खरंच.
तर असो. मुद्दा हा की सगळ्यांनी आजपासून मुख्य पात्र, कथा, आणि आवडत्या नट-नट्या (पुन्हा नट..) यांच्या पलीकडे बघायला सुरुवात करा. कारण तरच तुम्ही कुठल्याही कलाकृतीतला निखळ आनंद घेउ शकाल आणि त्या पात्रांनाही(आमच्यासारख्या) त्यांचं ड्यू क्रेडीट मिळेल.