3/27/2011

माणुसकी

तो निर्विकार चेहर्‍यानं गाडी चालवत होता. त्याच्या शेजारच्या सीटवर दोन लहान मुलं खिडकीला टेकून डोळे विस्फारून बाहेरचं दृश्य पाहत होती. मागच्या सीटवर त्या मुलांची आई होती. गाडीची गती सामान्यच होती. प्राप्त परिस्थितीही जास्त वेगास अनुकूल नव्हती अन रस्त्यांची स्थितीही. तो हेच काम गेले कित्येक दिवस करत होता. त्यामुळे त्याच्या चर्येवर किंवा मनोवस्थेवर फारसा परिणाम होत नव्हता. थंडपणे त्यानं गाडी एका ठिकाणी उभी केली आणि गाडीचं इंजिन बंद केलं. एकदम स्मशानशांतता पसरल्यासारखी वाटली. त्यानं एकवार मुलांकडे अन मग मागे बसलेल्या त्यांच्या आईकडे पाहिलं. तिघंही कुठेतरी हरवलेली होती. त्याला थोडं अवघडल्यासारखं वाटलं. तो थोडासा खाकरला. मुलांची आई एकदम भानावर आली आणि डोळ्यांतलं पाणी टिपत तिनं त्याच्याकडे पाहून मान हलवली. तो चटकन गाडीचा दरवाजा उघडून बाहेर उतरला आणि मुलांच्या बाजूला आला. आधी त्यानं आईचा दरवाजा उघडला आणि ती उतरल्यावर मग मुलांचा दरवाजा. पण आईला आधी उतरवण्याचा त्याचा उद्देश सफल झाला नाही. मुलं वार्‍यासारखी वेगात समोर अथांग पसरलेल्या सिमेंट-विटा-मातीच्या ढिगार्‍याकडे धावली आणि आई फक्त हताशपणे पाहत राहिली. तो दरवाजाही न लावता ते विचित्र दृश्य पाहत उभा राहिला.
रोज थोड्याफार फरकानं अशीच दृश्यं पाहूनही रोज ह्याच क्षणी त्याच्या अंगावर सरसरून काटा येत असे. नजर जाईल तिथवर पसरलेला तो ढिगारा. धरणी अन समुद्राच्या रौद्र रूपाने उद्भवलेल्या दुहेरी नैसर्गिक संकटानंतर उरलेले मानवी संस्कृतीचे अवशेष. त्याखाली न जाणे किती संसार गाडले गेले असतील, किती स्वप्नं मातीत पुरली गेली असतील, किती महत्वाकांक्षा क्षणात जमीनदोस्त झाल्या असतील आणि किती मायेला आसुसलेले जीव थेट धरणीमातेच्या कुशीत विसावले असतील. कशाचाच थांग लागू न शकणार्‍या त्या ढिगार्‍याच्या भयंकर पोकळीमध्ये आपल्या संसारांचे, नात्यांचे किंवा स्वप्नांचे अवशेष शोधणारे ते व्याकुळ जीव रोजच्या रोज पाहताना त्याच्या गणवेषाच्या इस्त्रीआतला माणूस रोज चुरगळला जायचा. दूर दूर नजर फिरवल्यावर फक्त शोधकाम करणारे किंवा आपल्याच भूतकाळामध्ये वर्तमानाशी लढण्यासाठी एक आधार शोधणारी माणसं. पण क्षणात तो भानावरही यायचा. आजही आला. त्यानं स्वतःला सावरलं. दरवाजा बंद केला. गणवेषाचा शर्ट ठीकठाक केला. टोपी नीट केली आणि अदबीनं पुढे झाला. थोड्या अंतरावरून त्या भागातल्या शोधकार्याच्या ऑफिसातून एका कार्यकर्त्याला आणायला गेला.
एव्हढं होईस्तोवर मुलांनी त्यांचं घर एकेकाळी ज्या जागी उभं होतं ती जागा शोधून काढली होती. आणि एक परदेशी पत्रकारांचा गटही कॅमेरांसकट तिथे पोचून सगळं शूट करत होता. "इथे माझी बेडरूम होती. आणि इथे वरती माझं अभ्यासाचं टेबल." मुलगा सांगत होता. एव्हढ्यात मुलगी थोड्या अंतरावरून धावत धावत हातात एक वाळूनं भरलेली स्कूलबॅग घेऊन आली. "मी ह्यामध्ये काहीबाही भरून बाबांसोबत समुद्रावर जायचे." 'समुद्र' ऐकूनच तो क्षणभर दचकला. ती मुलगी अजूनही ती बॅग निरखून पाहत होती आणि मुलगा ढिगारा उपसत होता. आईला कदाचित अश्रूंमुळे सगळं धूसर दिसत असावं, पण तिला समोर तो ढिगारा दिसत नसावा. तिला तिथे अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत उभं असलेलं तिचं छोटंसं विश्वच दिसत असावं. एव्हढ्यात तो घेऊन आलेल्या शोधकार्यकर्त्यानं तिला त्या विश्वातून बाहेर आणलं. "तुमच्या नवर्‍याची अजूनही काही माहिती नाही." असं तो कार्यकर्ता तिला पाहताच थेट बोलला. तो इतका वेळ शून्य नजरेनं सगळं पाहत होता. हा संवाद ऐकून तो थोडा संभ्रमात पडला, हा कार्यकर्ता हिला कसा ओळखतो. "हे बघ काय?" मुलगी आईला काहीतरी दाखवत होती. तिला एक मोडलेली फोटो फ्रेम मिळाली होती. त्यामध्ये त्या कुटुंबाचा त्यांच्या कुटुंबप्रमुखासोबतचा फोटो होता. त्या माऊलीनं ती फ्रेम फेकून दिली आणि त्या फोटोवरून एकदा प्रेमानं हात फिरवला. इतका वेळ कडांपर्यंत येऊन थांबलेले अश्रू एकदाचे गालांवरून ओघळले. आत्तापर्यंतची प्रत्येक गोष्ट शूट करणारे कॅमेरामन आता तिच्याकडे कॅमेरा रोखून उभे राहिले. एक स्त्री पत्रकार तिच्याजवळ गेली आणि तिला काहीतरी विचारू लागली. पण तिला इंग्रजी येत नव्हतं मग ती पत्रकार इथे तिथे पाहू लागली. हा प्रसंग पाहत असलेला तो दुभाष्या म्हणून पुढे झाला.
"हा फोटोतला तुमचा नवरा का?"- पत्रकार.
"हो." ती डोळे पुसत म्हणाली. गरज नसतानाही त्यानं भाषांतरित करून सांगितलं.
"तुमची अन तुमच्या नवर्‍याची ताटातूट कशी झाली?"- पत्रकार.
"ते इथल्या आपत्कालीन यंत्रणांचे समन्वयक होते. संकट उद्भवल्यावर इथल्या सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर पडण्याचे मार्ग दाखवण्याची जवाबदारी त्यांची होती. त्यामुळे सगळे नागरिक सुखरूप मार्गस्थ होईस्तो ते बाहेर पडू शकत नव्हते. आम्हाला तिघांना त्यांनी पुढे पाठवलं." भाषांतरित करायचं आहे हे विसरून तो तिच्याकडे पाहतच राहिला.
हजारो लोकांचं सर्वकाही हरवलेल्या त्या ढिगार्‍यांमध्ये अचानकच त्याला माणुसकी सापडली होती.

टीप - जपानच्या भूकंपानंतर चाललेल्या शोध आणि मदतकार्यामध्ये समोर आलेली एक सत्यघटना पाहून ही कथा लिहावीशी वाटली.

3/24/2011

वाईट दिवस

सकाळी घड्याळाचा गजर वाजलाच नाही
वेळेवर झोप उडालीच नाही
चहाचं आधण ऊतू गेलं
अन इस्त्री केलेल्या एकमेव शर्टाचं बटण तुटलं
चुरगळलेल्या शर्टावर चहाचा थेंब आणि
बससाठीची धाव नेहमीचीच सेम
आज नेमकी बस डोळ्यासमोर सुटली
कधी नव्हे ती पावलं रिक्षाकडे वळली
एरव्हीचे रिकामटेकडे रिक्षावाले आज कामात गर्क होते
एरव्हीचा तोंडी अपमान आज फक्त नजरेनंच करत होते
चरफडत उन्हात स्टेशनाकडे चालत
निघालो सोमवार बाजाराची गर्दी पाहत
आज ट्रेनांना कशानं दुप्पट गर्दी
डब्यामध्ये नेमके संगीतरसिक दर्दी
स्टेशनातनं बाहेरचीसुद्धा बस पुन्हा चुकली
चरफडतच पुन्हा रिक्षाकडे नजर गेली
चमत्कारच की रिक्षावाला चक्क हो म्हणाला
त्याक्षणी कदाचित मुलीचा होकारही असता मिळाला
माझ्याच आनंदाला माझीच नजर लागली
रिक्षा ट्रॅफिकात दोन तास थांबली
घामेजलेला शर्ट आणि आंबलेलं मन
ऑफिसातला लेट पंच अन नुसतीच तणतण
"बेक्कार दिवस आहे यार.." शेजार्‍याला म्हणालो
तो दिसला नाही म्हणून नुसताच सुस्तावलो
"त्याचं कळलं नाही का?" आवाज आला दुरून
प्रश्नार्थक नजरेनंच पाहिलं मी दोन टेबलं सोडून
"दोन तासांपूर्वी इथेच एक चौक आधी
घाईत रस्ता ओलांडताना आला तो गाडीखाली
नेला लगेच उचलून सगळ्यांनी हॉस्पिटलात
आहे ठीक आता पण तीनेक आठवडे घरात"
ट्रॅफिकचा गोंधळ आता माझ्या नीट लक्षात आला
वाईट दिवस माझा चक्क वरदान वाटू लागला

3/13/2011

भोग

(माझ्या सर्वांत आवडत्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'ओल्डबॉय' (हिंदीत 'ज़िंदा' ही निर्लज्ज, भ्रष्ट कॉपीदेखील आहे). त्यामध्ये मध्यवर्ती पात्राला अचानक किडनॅप करून कोठडीत बंद केलं जातं. कशासाठी, कुणी, किती काळासाठी ह्या प्रश्नांची उत्तरं नाहीत. खोली एखाद्या हॉटेलच्या खोलीसारखी मूलभूत सोयींनी युक्त, पण बाकी काहीच नाही. अशी चौदा वर्षं तो काढतो. त्याच्या अवस्थेवर सुचलेली एक कविता. अर्थात कविता जास्त कळण्यासाठी सिनेमा बघितलेला असणं चांगलं. पण एक वॉर्निंग ही की हा सिनेमा फार म्हणजे फारच बोल्ड आणि हिंसक आहे, सर्वांना झेपणारं काम नाही.)

एकांती बसलो इथे मी
शांत अन हतबुद्धही
पाहतो चोहीकडे अन
नाही पाहत काहीही

दृष्टीस पडणे हे कधी का
पाहण्यासम भासते?
स्थिरचित्रही भिंतीवरीचे
पाहूनी मज लाजते

चलचित्र जेव्हा माणसांचे
भ्रम उभारू लागले
गंध अन संवेदनांचे
बंध निसटू लागले

एक केवळ गंध उरला
गूढ अन परिचित असा
संगीत येई घेऊनी ते
मूर्च्छनेचा एक ठसा

मोजतो मी दिवस वर्षे
अन कधी सेकंदही
वाट बघणे हेच हाती
निस्तेज मग ते अंकही

सर्वकाही तेच ते पण
भास अन आभासही
वीट येतो घेऊनी ते
श्वास अन उच्छवासही

सोडले जेव्हा पळांचे
मांडणेही गणित मी
मांडला मी ठोकताळा
केली मी पापे किती

कोण तो घायाळ इतका
सूड ज्याचा संपे ना
कोण जो निष्ठुर इतका
की मला संपवेही ना

भरली मग पाने वहीची
एकमेकांमागुनी
थक्क झालो मी पुन्हा
ती सर्व पापे पाहूनी

एकदा मी फक्त त्या
चळतीकडे मग पाहिले
भोग माझ्या भाळीचेही
शेवटी ओशाळले

3/08/2011

लोकाभिमुख कला - वारली चित्रकला

एकेका कलेचं नशीब असतं. हे वाक्य मी म्हणणं म्हणजे काजव्यानं तार्‍यांच्या श्वेतबटू बनण्याबद्दल वगैरे चर्चा करण्यासारखं आहे, पण असो. तर माझं असं म्हणणं केवळ एव्हढ्याचसाठी आहे, की एखादी कला अचानकपणेच काही कारणानं प्रचंड लोकप्रियता मिळवते, मोठ्या लोकसंख्यपर्यंत पोचते अन तिच्या प्रचार, प्रसार आणि संवर्धनासाठी ह्या गोष्टीची मदत होते. ती कला पुढे जात राहते, नवनवे स्तर पार करत राहते. तर काही कला ह्या अज्ञात कारणानं तेव्हढ्या लोकप्रिय होऊ शकत नाहीत, त्या लोकांपर्यंत त्या संख्येनं किंवा तीव्रतेनं पोचत नाहीत. आणि त्या कारणास्तव त्या एका विशिष्ट छोट्या परिघाबाहेर न पडल्यानं नामशेष होतात की काय अशी भीती निर्माण होते. पण कधी कधी एक छोटासा कल्पक प्रयत्नदेखील त्या कलेच्या लोकांपर्यंत न पोचू देणार्‍या मर्यादा ओलांडायला कारणीभूत ठरू शकतो आणि कलेचं पार नशीबच पालटवूनच टाकू शकतो.
उदाहरणं बघायची झाली तर युरोपियन बॅले किंवा पश्चिम युरोपियन आणि दक्षिण अमेरिकन नृत्यप्रकार ह्या कला योग्य त्या स्तरावर मार्केटिंग झाल्यामुळे म्हणा किंवा योग्य त्या पद्धतीनं (संख्येनं आणि तीव्रतेनं) त्यांचा प्रचार झाल्यामुळे आणि त्यामध्ये बदलावांस आवश्यक तो वाव राहिल्यामुळे जगभरातल्या लोकसंख्येपर्यंत पोचल्या. आणि त्यामुळेच त्यांचा टिकाव तर लागलाच पण मोठ्या प्रमाणावर त्यांचं संवर्धनही होत आहे. पण त्याच ठिकाणी कित्येक भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकारांकडे आपण नजर टाकली तर योग्य त्या पद्धतीच्या मार्केटिंगचा अभाव आणि कधीच एका ठराविक परिघाबाहेर न पडल्यामुळे बहुतेक (अन्यही अनेक कारणं असतील, माझ्या मर्यादित ज्ञानावर आधारलेली अगोचर वक्तव्य मी नेहमीच करत असतो, त्यामुळे चुकत असल्यास क्षमा करावी) त्या कला जास्त लोकसंख्येपर्यंत पोचू शकल्या नसल्याचं चित्र दिसतं. आणि तसं पाहता पाश्चिमात्य नृत्यप्रकार सोपे असतात किंवा किचकट, क्लिष्ट नसतात अशातला भाग नाही, त्यांचेही असंख्य नियम आणि गरजा असतात, पण योग्य त्या मार्केटिंगचा अभाव आणि बदलांंस सक्त विरोध असल्याकारणे परिघाबाहेर पडण्याची नसलेली शक्यता ह्यांमुळे भारतीय नृत्यकला मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोचल्या नाहीत असं मला वाटतं. अर्थात मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोचणं हे कलेच्या उच्चनीचतेचं मोजमाप आहे असं माझं मुळीच म्हणणं नाही. कारण मुळामध्ये कलांमध्ये तुलना किंवा कला चांगली-वाईट ठरवणं हे पूर्णतः सापेक्ष असतं. पण मी हे सगळं ह्यासाठी महत्वाचं मानतो कारण, कला जेव्हा मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोचते तेव्हा ती ज्या संस्कृतीतून आली, त्या संस्कृतीची दूत असते. ती अप्रत्यक्षपणे त्या संस्कृतीलाच एका मोठ्या वर्गापर्यंत पोचवत असते. उदाहरणात वापरलेलीच पाश्चात्य नृत्य पाहिलीत तर आज कित्येक पाश्चात्य नृत्यप्रकार तुमच्या दरवाजापर्यंत येऊन पोचलेत. मोठ्या शहरांमध्ये हे नृत्यप्रकार शिकवणारे क्लासेस सहजगत्या उपलब्ध आहेत आणि टीव्ही, सिनेमामधल्या जबरदस्त मार्केटिंगमुळे त्यांच्याकडे वळण्याचा ओघ वाढलाय हे निश्चित. अर्थात ह्याचा अर्थ असा नव्हे की ह्या नृत्यकला चांगल्या आहेत म्हणून हे होतंय, ह्यामागे आर्थिक कारणं, प्रसिद्धी इत्यादी इत्यादी बर्‍याच गोष्टी आहेत. त्यांचा ऊहापोह करणे हा हेतू नव्हे. पण लक्षात घेण्याजोगी गोष्ट ही, की हे नृत्यप्रकार बर्‍यापैकी लोकाभिमुख आहेत. कुठल्याही सामान्य माणसाच्या सहज आवाक्यातले आणि त्यामध्ये एक लवचिकता आहे. त्याचबरोबर ह्या नृत्यप्रकारांच्या आपल्या जीवनातील चंचुप्रवेशामुळे त्या त्या संस्कृतींची आपल्याला जास्त ओळख होऊ लागली आहे. अर्थात, टीव्ही/सिनेमे ह्यांमुळे होते आहेच, पण टीव्ही/सिनेमे हे देखील कलाप्रकारच नव्हेत का?
एव्हढं सगळं रटाळ पुराण लावण्याचं कारण हे की काही महिन्यांपूर्वी एका अशाच वेगळ्या कलेनं माझं लक्ष वेधून घेतलं. तसा मी कलाशून्य मनुष्य. पण दैवयोगानं मी ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात येतो ती सगळी मंडळी कलाकार असतात. असंच एकदा मित्राच्या बायकोनं काढलेलं एक चित्र, मित्र मला कौतुकानं दाखवत होता. मी दोन मिनिटं चित्र निरखून पाहिलं. आधीच सांगितल्याप्रमाणे मला कलेतलं फार कमी (जवळपास शून्य) कळतं. पण मला ते चित्र आधी चित्र आहे हेच कळायला वेळ लागला. त्यामध्ये अतिशय सामान्य पद्धतीनं दोन त्रिकोण जोडून बनवलेली माणसं होती. उभे त्रिकोण काढलेली झाडं आणि डोंगर, सूर्य असावासा वाटणारा गोल आणि शेतीची कसलीशी क्रिया करणारी ती माणसं ज्या जमिनीवर काम करत होती तो जमिनीचा तुकडा चौकोन काढून दाखवलेला होता. पण त्या सगळ्यात एक पॅटर्न होता. अर्थात तो समजण्याइतपत अक्कल मला असती तर अजून काय हवं होतं, पण अधिक चौकशी करता ही 'वारली चित्रकला' असल्याचं मला सांगण्यात आलं. आणि 'वारली' ही महाराष्ट्र अन गुजरातेमध्ये असणारी एक आदिवासी संस्कृती असल्याचं ज्ञान मला मित्राकडून मिळालं. ते चित्र आमच्या इथल्या गणेशोत्सवामध्ये घेतलेल्या चित्रकला स्पर्धेतलं असल्यानं बर्‍याच लोकांनी पाहिलं अन आश्चर्य म्हणजे माझ्या अजून दोघा-तिघा मित्रांनी ही वारली चित्रकला असल्याचं लगेच ओळखलं अन त्यांचीही बहिण/बायको किंवा तत्सम कुणीतरी ती शिकत असल्याचं किंवा शिकलं असल्याचं कळलं. माझ्यासाठी हा धक्का होता. एक आदिवासी कला, शहरी, सुसंस्कृत माणसांपर्यंत बर्‍यापैकी पोचली होती.
नंतर एक दिवस तन्वीताईनंही तिच्या काही वारली चित्रांचे फोटो टाकलेले मध्यंतरी. त्यामुळे माझ्या विस्मरणात गेलेलं 'वारली चित्रकले'बद्दलचं कुतूहल पुन्हा उफाळून वर आलं. मग नेटवर थोडी शोधाशोध केली. तेव्हा 'वारली' ही संस्कृती निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करणारी आणि मनुष्य हा निसर्गाचाच भाग असल्याने त्याचं आयुष्य नैसर्गिक समतो राखण्यास हातभार लावणारं असावं असा जीवनविषयक दृष्टिकोन असणारी आहे हे वाचनात आलं. वारली भाषा ही न लिहिली जाणारी, लिपि नसणारी भाषा. त्यामध्ये संस्कृत, गुजराती अन मराठीतल्या आधुनिक शब्दांचाही भरणा आहे. पण मग संपर्काचं दुसरं साधन म्हणजे चित्रलिपी किंवा चित्रकला. घराच्या भिंतींवर लिहून साधला जाणारा संपर्क. त्यातूनच शेतीचे हंगाम, पीक घेणं किंवा शुभकार्यांशी निगडीत वेळी केली जाणारी ही वारली चित्रकला जन्म घेते. मुळात ही वारली चित्रकला, वारली परंपरा आहे. काटक्या, माती आणि शेणापासून बनवलेल्या भिंतीवर गेरूनं लाल पार्श्वभूमी तयार करायची आणि मग तांदळाचा लगदा आणि पाणी ह्यांचं मिश्रण आणि ते बांधण्यासाठी त्यात गोंद घालून तयार केलेल्या पांढर्‍या रंगानं त्यावर चित्र काढणे अशी मूळ परंपरा. त्रिकोण, चौकोन, वर्तुळ असे अतिशय मूलभूत आकार वापरणं हे 'वारलीं'च्या साध्या सरळ निसर्गाच्या जवळ जाणार्‍या आयुष्याशी मेळ खातं. त्यातही माणूस दोन सारख्याच त्रिकोणांना जोडून बनवण्यामध्ये नैसर्गिक समतोलाचाही संकेत असल्याचं अभ्यासकांचं मत आहे. अशी ही वैशिष्ट्यपूर्ण कला जर तशीच चित्रलिपीमाणे वारली वस्त्यांमध्ये ठराविक वेळांवर केली जात राहिली असती, तर कधीच परिघाबाहेर पडली नसती. मग इथेच जिव्या सोमा म्हशे, भास्कर कुलकर्णी आणि यशोधरा दालमियांचं योगदान येतं.
एखाद्या सामान्य वारली मुलाप्रमाणेच त्यांचं आयुष्य होतं. पण त्यांची आई त्यांच्या वयाच्या सातव्या वर्षी गेली. त्या धक्क्यानं म्हशेंचं बोलणंच बंद झालं. पुढली कित्येक वर्षं ते न बोलता धुळीमध्ये, मातीमध्ये चित्र काढत राहायचे. त्यांच्यासाठी व्यक्त होण्याचं एकमेव माध्यम म्हणजे चित्र. त्यांच्या समाजातही त्यांना एक वेगळंच स्थान मिळालं ते ह्यामुळेच. त्याच्या अशा गप्प राहण्यामुळे त्यांची सगळी शक्ती आणि विचार चित्र ह्या एकमेव व्यक्त होण्याच्या माध्यमात एकवटले. त्यांची कल्पकता, प्रतिभा सर्वच अत्यंत उच्च दर्जाचं असल्यामुळे त्यांची 'वारली चित्र' फारच बोलकी असत. स्त्रियांनी चित्रकला करण्याची प्रथा म्हशेंनीच मोडली. असं म्हणतात की १९७५ मध्ये आदिवासी कलांचं संवर्धन करण्यासाठी इंदिरा गांधींनी सुरू केलेल्या मोहिमेवेळी भास्कर कुलकर्णींना म्हशे यांची अन त्यांच्या कलेची ओळख झाली आणि 'वारली चित्र' ह्या कलेची अन त्या माध्यमाच्या ताकदीची ओळख झाली. मग त्यांनी ही कला आधुनिक समाजासमोर आणली. त्यामुळे म्हशेंना कागद आणि कॅनव्हासची ओळख झाली आणि म्हशेंची कला अजून बंधनांमधून मुक्त झाली. नवी माध्यमं अन नवे प्रकार हाताळून म्हशेंनी कलेला नव्या स्तरावर नेलं, ज्यामुळे 'वारली चित्रकला' परिघाबाहेर पडली. यशोधरा दालमियांनी म्हशेंची मदत घेऊन 'पेंटेड वर्ल्ड ऑफ वारलीज' हे पुस्तक लिहून ही कला इंग्रजी भाषेत जगासमोर आणल्यानं एकदम कक्षाच रुंदावल्या. वारली संस्कृती पूर्ण जगभरात पोचली. वारली चित्रकलेचं नशीबच पालटलं.
तिथून मग म्हशेंनी कधी मागे वळून बघितलंच नाही. त्यांनी दिल्लीत कला सादर केली. राष्ट्रपती पुरस्कारही मिळवला. पुढे त्यांचे देशोदेशी अनेक सत्कार झाले. २०१० चं पद्मश्री म्हशेंना देऊन शासनाने उशीराने का होईना ८० वर्षीय मशेंचा सन्मान केला हे ही नसे थोडके. म्हशेंच्या मते वारली संस्कृतीचा गाभा असणारा विचार म्हणजे, "माणसं, पक्षी, प्राणी, दिवस-रात्र सगळंच गतिमान, चलत आहे. थोडक्यात आयुष्य म्हणजे चलन." त्यामुळे वारली चित्रकलेतही नेहमी हेच प्रतिबिंबित होत आलेलं आहे. मुळात वारली चित्रलिपी ही वारली आयुष्याचं प्रतिबिंबच आहे. पण म्हशेंमुळे वारली चित्रकला अनेक घटकांपासून स्वतंत्र झाली. खर्‍या अर्थाने लोकाभिमुख झाली.पण म्हशेंचं खरं योगदान हे आहे की त्यांनी ही वारली परंपरा जगासमोर एक सुटसुटीत आणि आयुष्य प्रतिबिंबित करण्याचं एक माध्यम म्हणून आणली. सामान्य माणसापर्यंतही ती पोचलीय त्याचं कारण हे की एक म्हणजे ती सामान्यांच्या आवाक्यातील आहे कारण मुळात ती निसर्गाच्या आणि मानवी जीवनाच्या जवळ जाणारी आहे आणि ती परिघाबाहेर पडू शकली. पण ही वारली चित्रकला खर्‍या अर्थानं लोकांपर्यंत पोचली असं तेव्हाच म्हणता येईल जेव्हा केवळ वारलीच नाही तर इतरही संस्कृतींचं प्रकटीकरण करण्यासाठीही वारली चित्रकलेचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणावर होईल.

(नेहमीप्रमाणेच केवळ कुतूहलापोटी गोळा केलेली माहिती एकत्रित लिहिण्याचा प्रयत्न. मला ह्यातला ८०% भाग १० दिवस पूर्वीपर्यंत ठाऊक नव्हता. www.warli.in ह्या संकेतस्थळावर बरीच माहिती उपलब्ध आहे. तसेच वरील सर्व माहिती मी प्रस्तुत चार ठिकाणांवरून मुख्यत्वे गोळा केलेली आहे. , , आणि .)

3/06/2011

उगाच काहीही -१

गेले काही दिवस फारच दणकट, भरभक्कम वगैरे लिहितोय असा काहीतरी माझा स्वतःचाच गैरसमज झाला. त्यामुळे वैचारिक थकवा आल्याचा एक आभास निर्माण झाला. त्यामुळे एरव्हीही वेळेवर चालण्यास नकार देणारी आळशी बुद्धी आज सरळ डोक्यावर चादर ओढून झोपून राहिली. कारणमीमांसा करण्यासाठी खोलात जाऊन विचार करायचा प्रयत्न केला तर हिवाळा असूनपण एकदम खूप उकडायला लागलं. मग लक्षात आलं की फार खोलात जाता जाता पार बेसमेंटमध्ये पोचलोय हॉटेलच्या. (हा केविलवाणा विनोद पाणचटपणाचा रजनीकांतावा 'घात' होता हे मलासुद्धा ठाऊक आहे, त्यामुळे स्वतःला 'आवरा' ची आवर्तनं करण्यापासून आवरा.) आता मी कंसामध्ये जोशात येऊन 'रेझ्ड टू रजनीकांत' असं लिहिणार होतो, मग चटकन जीभच चावली. धेडगुजरी माध्यमात शिकल्याचे परिणाम असे पदोपदी दिसतात. मग थोडा डोक्यावर जोर दिला. आठवीपासून गणित आणि शास्त्र 'वाघिणीच्या दुधात' मिसळून प्यायला सुरूवात केलेली, त्यामुळे 'राज पिछले जनम का' स्टाईल मी एक एक वर्ष मागे मागे जात होतो. मग एकदम 'सत्तावीस म्हणजे तीनाचा कितवा घात?' असले अवसानघातकी प्रश्न आठवायला लागले. 'घातांकां'नी माझ्या शालेय जीवनात किती आतंक माजवला होता ते फारसं सांगत नाही, पण त्याकाळात आलेल्या सनी देओलच्या 'घातक' नावाच्या सिनेमाचं नाव माझ्या मित्राने 'घातंक' असं वाचल्याचं स्मरतं. ज्यावरून घातांकांच्या त्याच्या आयुष्यावरील प्रभावाची एक पुसटशी कल्पना येऊ शकते.
'घातांक' वगैरे एकदम घातपाती नावं लेवून माझ्या बालआयुष्याच्या 'वर्ग-घनमुळावर' उठलेल्या गणितानं अनेकदा सुवर्णगुणोत्तराचेही प्रत्यय दिले, पण एकंदरच गणिताचं गणित मला कधीच सुटलेलं नाही. एका वर्षी पार 'पर्थ' च्या खेळपट्टीवर विक्रम राठोडला मॅकग्रासमोर उभा करावा तशी स्थिती, तर एखादेवर्षी एकदम वानखेडेच्या खेळपट्टीवर वॉर्नला पार जतीन परांजपेसुद्धा स्टेडियमबाहेर भिरकावत होता तद्वत स्थिती. गणितासारख्या निश्चित गोष्टीमध्ये मी दाखवत असलेल्या अनिश्चित प्रावीण्याचं मला नेहमीच नवल वाटत आलेलं आहे. असं अनिश्चित प्रावीण्य मी बर्‍याच गोष्टींमध्ये दाखवत आलेलो आहे उदा.विमानात तीन-चार तास सलग एका जागी मला बसवत नाही, उठून उभा तरी राहतो, किंवा बसण्याच्या स्थितीत बदल तरी करतो. पण ह्यावेळेसच्या भारतवारीत मी एका खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये सलग साडेपाचतास बसण्याची स्थितीही न बदलता यशस्वीरित्या प्रवास करण्याचा भीमपराक्रम गाजवला. तसं बघायला गेलं तर 'अनिश्चितता हीच एकमेव निश्चितता आहे' वगैरे तत्वज्ञानं मी अक्षरशः जगतो. (असं एकतरी वाक्य लिहिलं की पोस्ट 'पूर्ण' झाल्यागत वाटतं.)
अनिश्चितता आपल्या दैनंदिन आयुष्याचा किती अविभाज्य भाग बनलेली आहे ह्याचा प्रत्यय आपल्याला अक्षयी येत राहतो. मागचं वाक्य कसलं भारी जमलं मला. तर अनिश्चितता इतकी वाढलीय की माझ्या एका मित्राचा चक्क रक्तगट दोन वेगवेगळ्या चाचण्यांमध्ये वेगवेगळा आला. पहिल्या चाचणीला 'बी पॉझिटिव्ह' आणि दुसर्‍या चाचणीला 'ए पॉझिटिव्ह'. मी पाणचट विनोद केला, "अरे पहिल्यांदा ते म्हणाले 'बी पॉझिटिव्ह', पुढच्या वेळेस पोहोचेपर्यंत तू आयुष्याबाबत पॉझिटिव्ह झाला होतास, त्यामुळे त्यांनी तुला 'ए पॉझिटिव्ह' असं संबोधित केलं." तिसरा एक मित्र माझ्या डोक्यात घालण्यासाठी काही मिळतं का ह्यासाठी आजूबाजूला चाचपू लागला, पण ह्याचं समाधान नाही, "पण मग पुढच्या वेळेस 'ओ पॉझिटिव्ह' आला तर?" मी एक छद्मी हास्य केलं. वानखेडेची खेळपट्टी होती आणि वॉर्न जतीन परांजपेला बॉल टाकत होता. "पुढच्या वेळेपर्यंतही जर तू पॉझिटिव्ह राहिलास तर त्यांना तुझ्याबद्दल आदर निर्माण होईल आणि ते तुला 'ओ पॉझिटिव्ह' म्हणून संबोधित करतील." तिसर्‍याला अजूनही काही मिळालं नव्हतं.
असो. विषयावरून भरकटलो. तर आपण कुठे होतो? हां. मी खोलात जाऊन विचार करायचा प्रयत्न केला. 'प्रयत्न केला' हे महत्वाचं आहे. कारण विचार माझ्याच्यानं फारसा झाला नाही. एव्हढंच लक्षात आलं की आपण 'विनोदी' लिहायला हवं. आता विनोदी 'लिहायला हवं' हे जरा आगाऊ नाही वाटत? 'लिहायला हवं' म्हणून लिहायला तो काय इंजिनियरिंगचा 'आऊट ऑफ सिलॅबस' पेपर आहे की 'गोध्रा जळितकांडावर जस्टिस बॅनर्जीनं लिहिलेला रिपोर्ट' आहे? अर्थातच हे सुज्ञ प्रश्न मला 'विनोदी' लिहिण्याचा विचार आल्यानंतर पडले. आणि माझा चेहरा पडला. विनोदी लिहायचंय म्हणून विनोदी लिहिता आलं असतं तर किती बरं झालं असतं! असा एक स्वार्थी विचार एक क्षण मनाला चाटून गेला. तरीही पडलेला चेहरा उचलून परत लावला आणि लिहायला बसलो. पण आज पर्थची खेळपट्टी आहे आणि मॅकग्रा बॉलिंग टाकतोय!

(पुढचे भाग येऊ नयेत अशी मनोमन इच्छा आहे. पण तरी आलेच तर अनुक्रमांकांची सोय आत्ताच करून ठेवतोय.)

3/03/2011

क्रांतीची मशाल -३-सैफ-अल-अवाम

काही वर्षांपूर्वी मी जेव्हा कर्नल मुअम्मर गद्दाफीबद्दल पहिल्यांदा ऐकलं आणि नंतर वाचलं होतं, तेव्हा मला त्याच्याबद्दल विलक्षण कुतूहल वाटलं होतं. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी त्या मनुष्याच्या हातात एका तेलानं भरलेल्या देशाची सत्ता एकवटली होती. आणि त्यानं ती पस्तीसहून जास्त (आता चाळीसहून जास्त) वर्षं टिकवून ठेवलेली आहे, हे मला फारच नवलाचं वाटलं होतं. पण मग त्याच्याबद्दल वाचल्यावर त्याचे एकंदर रंगढंग पाहून मला त्याच्या एकंदर व्यक्तिमत्वाचा अंदाज आला. पण खरंच वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी हातात इतक्या मोठ्या तिजोरीची चावी येऊन पडणं आणि त्यापुढे चाळीस वर्षं ती चांगल्या मार्गाने नाही, तर धाकदपटशा, क्रूरता आणि खटपटी लटपटी करून टिकवून ठेवणंसुद्धा खाण्याचं काम नाही.
कर्नल मुअम्मर गद्दाफीचं २००९ सालचं संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतलं गाजलेलं ९० मिनिटांचं मूर्खासारखं भाषण, त्याचं जिथे जाईल तिथे विमानानंच स्वतःचं फर्निचर घेऊन जाणं, न्यूयॉर्कमध्ये त्याला कुठल्याही हॉटेलमध्ये हे न जमल्यानं त्यानं रस्त्यावर तंबू ठोकून राहण्याचा विक्षिप्त निर्णय, त्याचं स्त्री-अंगरक्षकांचं पथक, त्याची 'लाडकी' युक्रेनियन नर्स आणि तो अन त्याच्या कुटुंबियांचं ऐषारामी अन बेफाम जगणं ह्या सगळ्या गद्दाफीच्या विविध तर्‍हा आहेतच, पण मुअम्मर गद्दाफीच्या उदयापासून त्यानं केलेल्या सगळ्याच करामती ह्याहूनही जास्त सुरस आणि चमत्कारिक आहेत.
लिबिया हा देश काही वर्षे इटलीची वसाहत होता. इटली गेल्यानंतर तिथल्या राजाच्या हाती सत्ता आली, ज्यानं स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले होते. लिबियाचा राजा १९६९ मध्ये काही आजाराने ग्रस्त असल्याने तुर्कस्तानात इलाजासाठी गेला होता. त्याच काळामध्ये इस्रायलनं अरब फौजांचे दणादण पराभव केलेले होते. अशा वातावरणामध्ये सैन्यात नवखा असलेला अरब-वर्णावर्चस्वीवृत्तीचा गद्दाफी आपल्या समविचारी तरूणांना गोळा करू लागला. राज्याच्या युवराजाला राजाकडून संमतीपत्र मिळायच्या आतच २७ वर्षांच्या गद्दाफीनं काही त्याच्यासारख्याच तरूण ऑफिसरांच्या मदतीनं युवराजाला अटक करून राजसत्ता बरखास्त केली, आणि लिबियामध्ये प्रजासत्ताक स्थापनेची घोषणा केली. त्यांच्या अरब वर्चस्व आणि अरब स्वाभिमानाच्या ध्येयाबद्दल सहानुभूती असणार्‍या सैन्याधिकार्‍यांची ह्या रक्तविरहित क्रांतीला मूक मदत झाली.
ह्या गोंधळामध्ये फक्त कॅप्टन असलेला एक तरूण, नवखा सैन्याधिकारी तेलानं ओतप्रोत भरलेल्या एका स्ट्रॅटेजिकली अन भौगोलिकदृष्ट्या युरोपसाठी (म्हणजेच पाश्चात्य जगासाठी) अत्यंत महत्वाच्या अशा एका देशाचा प्रमुख बनला. त्यामुळे साहजिकच सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. गद्दाफीला सत्तेतून उतरवणं अमेरिकेसाठी अवघड नव्हतं. पण क्रिकेटमध्ये म्हणतात ना, ज्याच्याबद्दल काहीच माहित नाही असा खेळाडू नेहमीच धोक्याचा ठरतो, तद्वतच जगाच्या उचापती करणार्‍या अमेरिकेची गद्दाफीला जोखण्यात चूकच झाली. खरंतर गद्दाफी आल्या आल्या त्याला उडवण्याचा एक 'हिल्टन असाईनमेंट' नामक प्लॅनही बनला होता, ज्यामध्ये परदेशातून भाड्याचे मारेकरी आणून आणि लिबियन तुरूंगांतून कैद्यांना सोडवून एक विचित्र क्रांती घडवण्याचं ठरलं होतं (आयरॉनिकली आज गद्दाफी आपल्याच विरोधातलं बंड मोडण्यासाठी भाड्याचे मारेकरी वापरतोय). पण आयत्या वेळी अमेरिकेच्या कम्युनिस्टद्वेष्ट्या नीतीमुळे गद्दाफी हा पुरेसा कम्युनिस्टद्वेष्टा असल्याचं जाणवल्यानं ह्या कटाला तिलांजली देण्यात आली. पण गद्दाफी हा खरंच माहित नसलेला खेळाडू होता. त्यानं नंतर जे काय करून सत्तेवर मांड बसवली ते नुसतं वाचूनही धाप लागते.
गद्दाफीनं सर्वप्रथम एक गव्हर्निंग काऊन्सिल सदृश व्यवस्था बनवली, ज्याचा प्रमुख तो स्वतः होता. ज्याच्यामार्फत तो 'प्रजासत्ताक' चालवत होता. त्यानं सर्वप्रथम जेव्हढे इटालियन लोक लिबियात राहत होते, त्या सर्वांना बाहेरचा रस्ता दाखवला. स्वतःचय देशाला पश्चिमद्वेष्ट्या लोकांचं आश्रयस्थान बनवून टाकलं. लिबियामध्ये शरिया कायदा लावून टाकला. इस्लाम आणि अरब ह्या गोष्टींना कमालीचं ग्लोरिफाय करून इस्लामी जगतात स्वतःची प्रतिमा बळकट करायचा प्रयत्न केला. काही दिवसांसाठी तो पंतप्रधानदेखील होता. मग एक दिवस प्रजासत्ताकाचं रूपांतर 'जमहिरिया' अर्थात 'थेट-लोकशाही' अशा काहीशा प्रकारात करून त्यानं स्वतःला सर्वोच्च अशा महासचिव पदावर बसवलं. तो ज्या काऊन्सिलचा महासचिव होता, त्याखाली छोट्या स्थानिक स्वराज्य संस्था अशा प्रकारची एक वेगळीच थेट लोकशाही व्यवस्था त्यानं निर्माण केल्याचा आभास उभा केला. आणि दोनेक वर्षांत त्याने सर्व पदांचा त्याग करून स्वतःला 'लिबियन क्रांतीचा गुरूबंधू आणि मार्गदर्शक' अशा अर्थाची एक पदवी देऊन घेतली. तो अधिकृतरित्या लिबियाचा नेता आहेही अन नाहीही, अशी काहीशी ही स्थिती आहे.
कर्नल गद्दाफी ह्या नावाबद्दल मला कुतूहल वाटण्याचं पहिलं कारण होतं, नावातला 'कर्नल'. कारण आजवर ऐकलेले सर्व लष्करशहा किमान 'जनरल' तरी असायचेच, पण हा एकमात्र कर्नल. अधिक माहिती काढता लक्षात आलं, की त्यानं इतर लष्करशहांप्रमाणे स्वतःची सैन्यामध्ये थेट 'जनरलपदी' पदोन्नती करून घेतली नाही. फक्त स्वतःच्या कॅप्टनपदावरून काही वर्षांनी 'कर्नल' एव्हढीच मानद पदोन्नती घेतली. त्यामार्फत तो जगातला एकमेव 'कर्नल' पातळीचा लष्करप्रमुख झाला. गद्दाफीला सगळ्यांच बाबतींत वेगळेपणाची हौस असल्याचं इथेही दिसतं.
क्वेंटिन टॅरँटीनो कसा विविध आवडते सिनेमे आणि गाणी ह्यांना इनरेफरन्सिंग करून (म्हणजे त्यांसारखे सीन्स, डायलॉग्ज किंवा ती गाणी विविध प्रसंगांमध्ये वाजवून) होमेज देतो, तसंच काहीसं गद्दाफी आपल्या सत्तेच्या अंमलबजावणीत करतो. त्यानं ज्या ज्या नेत्यावरून प्रेरणा घेतली, त्या त्या नेत्याचं इनरेफरन्सिंग त्याच्या वेगवेगळ्या कृतींतून दिसतं. लहान असताना तो गमाल अब्देल नासरचा फॅन होता, मोठा झाल्यावर प्रत्यक्षात जेव्हा तो अन नासर दोघेही शेजारी राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा त्याला काय वाटलं असेल हा विचार करून मला गंमत वाटते. गमाल अब्देल नासरचा 'पॅन-अरब नेशन' चा कन्सेप्ट गद्दाफीनं जसाच्या तसा उचलला. एक अरब राष्ट्र बनवण्याच्या दृष्टीनं काही फसलेले प्रयत्नही त्यानं करून पाहिले. पण पुढे त्याच अब्देल नासरचा देश असलेल्या इजिप्तवर एक दिवस त्यानं हल्लाही केला. स्वतःला क्युबन क्रांतीचा प्रणेता 'चे ग्वेव्हारा' सारखं मॉडेल करण्याचाही गद्दाफीनं प्रयत्न केला. स्वतःच्या विचारसरणीला 'अरब सोशलिझम' असं गोंडस नावही देऊन टाकलं. चीनच्या माओच्या 'लिटिल रेड बुक' सारखं स्वतःचं 'ग्रीन बुक' काढून पाहिलं. गद्दाफीला गॉगल्स आणि सफारी सूट्सचं वेड होतं, पण कालांतरानं वाढत्या वयासोबत त्यानं हुशारीनं कपडे बदलले, तरी गॉगल तसाच राहिला.
गद्दाफीनं स्वतःचं राज्य राखण्यासाठी जसे स्वतःच्या शासनव्यवस्थेत शिताफीनं बदल केले आणि कुणाचीही पक्की मांड कुठेच बसू दिली नाही, त्याचप्रमाणे त्याने आपल्या विरोधकांना क्रूरतेनं दडपण्याचेही धंदे केले. लिबिया सोडून देशाबाहेर गेलेल्या विरोधकांना मारण्यासाठीही एक पथक होतं. त्यांना 'देशात परत या नाहीतर ह्या पथकाच्या हाती येण्यास तयार राहा' सारख्या खुलेआम धमक्याही दिल्या. आंतरराष्ट्रीय दहशतवादाला सर्वतोपरी मदत आणि एव्हढंच नव्हे तर प्रत्यक्ष खुलेआम सहभाग इथवरही गद्दाफीची मजल गेली. पण तरीही त्याचं नशीब बलवत्तर होतं म्हणा किंवा त्याच्या हातात 'मानवाधिकारां'चा डंका पिटणार्‍या सर्व पाश्चात्य खेळण्यांची चावी अर्थात तेल होती म्हणून तो सर्व प्रकरणांतून टिकून राहिला. अगदी पाश्चात्य नागरिकांनाच विमानाच्या बॉम्बस्फोटात शेकड्यांनी मारूनही तो उजळ माथ्यानं फिरत राहिला. आणि एव्हढंच नव्हे तर ह्याच तेलाच्या ताकदीच्या जोरावर, ह्या विमानस्फोटाच्या आरोपीला थेट युनायटेड किंग्डममधून सोडवून घेऊन आला. मध्यंतरीच्या कालावधीत लिबियावर संपूर्ण पाश्चात्य देशांनी निर्बंध घातले होते. पण कालांतराने ह्या निर्बंधांचा दोन्ही पक्षांना फटकाच बसणार असल्याचं लक्षात आल्यावर मांडवली केली गेली. मग लिबियानं सर्व कुरापतींची 'नैतिक जवाबदारी' स्वीकारली आणि मृतांच्या कुटुंबियांना भलीथोरली भरपाई देण्याचं निश्चित केलं. बदल्यात जगानं लिबियन सरकारला सर्व आरोपांपासून अन प्रलंबित खटल्यांपासून मुक्ती देण्याचं अन निर्बंध उठवण्याचं मान्य केलं. हे जरी वरकरणी असं दिसत असलं तरी प्रत्यक्षात हे तेलाचे प्रताप आहेत. लिबिया हा आफ्रिकेतील सर्वाधिक तेलसाठे असलेला देश आहे, हे एकच कारण मांडवलीसाठी पुरेसं होतं. मग थोड्याच दिवसांनी त्यानं गाजावाजा करून बॉम्बस्फोट आरोपीला सोडवून आणलं. स्कॉटिश सरकार कितीही दया म्हणून सुटका वगैरेची मलमपट्टी करत असलं तरी सगळ्या जगाला माहितीय की ही सुटका राजकीय हेतूंनी प्रेरित आहे. आणि चक्क एका पाश्चात्य सरकारानं आपल्याच देशाच्या नागरिकांना मारणार्‍या आरोपीला सोडून देण्याची दुर्मिळ घटना ही गद्दाफीच्या उद्दाम नीतीचा एक विजयच म्हटला गेला पाहिजे. ह्या बॉम्बस्फोटाची उघड जवाबदारी घेतल्यानंतरही संयुक्त राष्ट्रांच्या 'मानवाधिकार समिती'वर लिबिया अर्थात गद्दाफीची नुसती नेमणूकच नव्हे तर त्याला अध्यक्ष म्हणून बसवण्याचाही कारनामा पाश्चात्य देशांनी केलेला आहे.
गद्दाफीनं पाकिस्तान, चीनपासून ते भारतापर्यंत अनेकांकडून आण्विक शस्त्रे मिळवण्याचा अयशस्वी प्रयत्न केलेला आहे. त्यानं अनेक इदि अमीन आणि स्लोबोदान मिलोसेविच सारख्या जेनोसाईड करणार्‍या क्रूरकर्मांना वेळोवेळी पाठिंबाही दिलेला आहे. इदि अमीनशी तर त्याचे इतके मधुर संबंध होते की इदि अमीननं त्याच्या मुलीशी लग्नही केलं होतं. पुढे त्याच्या मुलीनं इदि अमीनशी घटस्फोटही घेतला.
स्वतःच्या सर्व विरोधक अन शत्रूंना क्रूरपणे ठेचणारा क्रूरकर्मा गद्दाफी आपल्या मुलांच्या बाबतीत मात्र अगदी जवाबदार बाप आहे. त्यानं आपल्या सर्व मुलांना योग्य प्रकारे देशातल्या विविध महत्वाच्या पदांवर बसवून ठेवलंय. एकजण महत्वाचे सरकारी उद्योग पाहतो, एकजण सुरक्षा सल्लागार, एकजण ऑलिम्पिक समितीचा अध्यक्ष, एकजण उदारमतवादी मुखवटा अन एकजण सागरी उद्योगांचा व्यवस्थापकीय सल्लागार. त्याचबरोबर स्वतःची मुलगी अन जावयाचीही व्यवस्थित सोय लावून गद्दाफीनं आपला देश स्वतःच्या मुलांसाठी खर्‍या अर्थानं 'बाप की जागीर' बनवून ठेवलाय.
सर्व पाश्चात्य देशही निर्बंध उठल्यापासून कधी काही घडलंच नाही अशा प्रकारे गद्दाफीचा उदोउदो करण्यात मग्न. इटलीनं तर गद्दाफीसोबत मोठमोठे करार केलेत. 'एनी' ही मोठी एनर्जी कंपनी लिबियात फार मोठा सेटअप बांधून आहे. इटलीतील 'युनिक्रेडिट' ह्या बँकेत 'लिबियन सेंट्रल बँक' ची मोठी गुंतवणूक आहे, इटलीतील नावाजलेला फुटबॉल क्लब 'युव्हेंटस'मध्ये गद्दाफी कुटुंबियांचे हितसंबंध अन समभाग आहेत. ह्यासर्वांसोबत इटलीला भरमसाठ इंधनांचा पुरवठा करण्याबदल्यात इटलीकडून गेल्या काही वर्षांपासून गद्दाफीला भलीथोरली मदत मिळते. नुकताच गद्दाफी कुटुंबियांचं यूके मधील आलिशान घर गोठवण्यात आल्याचीही बातमी आली. टुरिस्ट बेट असलेल्या सेंट बार्ट्स बेटावर 'बियॉन्'से, 'नेली फुर्ट्याडो', 'मारिया कॅरे', 'अशर' अशा अमेरिकेतील मोठमोठ्या कलाकारांनी गद्दाफीच्या खाजगी नववर्षाच्या पार्टीत आपली 'कला सादर' केल्याच्याही नुकत्याच बातम्या आल्यात आणि त्याचे 'व्हिडिओज' देखील. लगोलग ह्या लोकांनी घाबरून आम्ही त्यावेळी मिळालेलं मानधन समाजकार्यासाठी दान करत असल्याचं जाहीर करून टाकलं. (न जाणे का मला दाऊदच्या पार्ट्यांमध्ये नाचणारे आपले बॉलीवूडचे सितारे आठवले.) गद्दाफीनं रशियापासून ते व्हेनेझुएलापर्यंत सगळ्या अमेरिकाविरोध्यांशीही सलोख्याचे संबंध बनवले. राजकीय डावपेचांमध्ये बहुदा गद्दाफी बहुतेक अरब हुकूमशहांना मागे टाकतो. त्यानं युरोपच्या भळभळत्या जखमेवर हळुवार फुंकर घालून युरोपला आपल्या बाजूला वळवलं. युरोपची भळभळणारी जखम म्हणजे उत्तर आफ्रिकेतून येणारे इमिग्रंट्स. लिबियाची भौगोलिक जागा अशी आहे, की त्यांनी ठरवल्यास बहुतेक मानवी तस्करीला चाप बसू शकतो. त्यानं स्वतःची सागरी यंत्रणा लावून ही तस्करी कमी करायला हातभार लावला आणि युरोपचा पाठिंबा मिळवला. अशा प्रकारे विविध गटांना खूष करून तो आपलं राज्य राखण्यासाठी काहीही करायला मोकळा झाला. अन त्याचे दडपशाही उद्योग सुरूच राहिले.
पण नुकत्याच उठलेल्या अरब क्रांती लाटेमध्ये लिबियन जनतेलाही मानसिक सामर्थ्य मिळालं आणि तीदेखील पेटून उठली. योगायोग असा की ज्या बेनगाझीमध्ये गद्दाफीनं सैनिक प्रशिक्षणाचे धडे गिरवले त्याच बेनगाझीमध्ये त्याच्याविरोधी उठावाची ठिणगी पडली आणि सर्वप्रथम 'स्वतंत्र' होणारं शहर बेनगाझीच ठरलं. इतर अरब देशांप्रमाणेच लिबियादेखील विविध अरब टोळ्यांनी बनलेला प्रदेश आहे. त्या सर्व टोळ्यांना एका मोटेत बांधून ठेवण्याची तारेवरची कसरत इतकी वर्षे गद्दाफी करत होता. पण बेनगाझीमध्ये त्याच्याविरोधी असंतोष अनेक वर्षे धुमसत होता. तो ह्या निमित्तानं बाहेर पडला. गद्दाफीचं स्वतःचं सैन्यही काही प्रमाणात बंड करून उठलं आणि त्यामुळे यादवीसदृश स्थिती निर्माण झाली. क्रूरकर्मा गद्दाफीनं थेट आपल्याच नागरिकांवर आपलंच सैन्य सोडल्याचा हा परिणाम होता. काही वैमानिक तर बॉम्बर विमानं घेऊन थेट माल्टाला पळून आले, स्वतःच्याच बांधवांवर बॉम्ब कसे टाकायचे म्हणून. लोकांचा रेटा अन बंड केलेले सैनिक ह्यांनी हळूहळू गद्दाफीच्या हल्ल्याला तोंड देत पूर्वेच्या बेनगाझीकडून पश्चिमेच्या राजधानी त्रिपोलीकडे कूच चालू ठेवली आहे. रोज शेकडो नागरिक अन सैनिक धारातीर्थी पडताहेत. पण लिबियन जनतेला बाहेरून सैनिकी मदत नकोय. त्यांना त्यांचा लढा स्वतःच्या हिमतीवर जिंकायचा आहे. जमलीच तर जगानं राजकीय अन अन्न तसंच वैद्यकीय मदत करावी पण लढाईत नको असंच त्यांचं ठाम मत आहे.
यूकेतल्या सत्तापलटानंतर आलेल्या हुजूर पक्षाच्या सरकारनं तर गद्दाफी देशातून पळून व्हेनेझुएलाला गेला अशी अफवा उठवून आपल्यापरीनं गद्दाफीला खिंडीत गाठायला सुरूवात केली. युरोपियन देश लोकलज्जेस्तव पुन्हा निर्बंधांच्या गोष्टी करताहेत. अमेरिका इजिप्तच्या वेळी ज्या जोमानं उडत होती, तितकीच आता गप्प आहे. पण खिंडीत सापडलंय इटली. गद्दाफी पडला तर तेलाचं काय होणार ह्यावर इटलीचे डोळे लागलेत. इटली हा लिबियाचं सर्वांत मोठं गिर्‍हाईक आहे. त्यातच इटलीत पंतप्रधान वादाच्या भोवर्‍यात आहे. त्यामुळे इटली कुठल्याच मुद्दयावर थेट विरोध दर्शवत नाही.
लिबियातल्या लढाईमुळे एकीकडचा ट्युनिशिया अन दुसरीकडचा इजिप्तकडे परदेशी कामगारांचे लोंढे येताहेत, त्यामुळे आधीच अस्थिर असलेल्या ह्या भागामध्ये गोंधळ उडाला आहे. गद्दाफीनं परदेशी भाड्याचे मारेकरी आणल्याच्या बातम्यांमुळे परदेशी कामगारांनाही संशयाचं बळी व्हायची पाळी आलीय. अराजकाच्या अन अस्थिरतेच्या वातावरणात बेनगाझीतल्या जनतेनं प्रतिसरकार स्थापन करून स्वतःची नवी व्यवस्था बांधायला घेतलीय.
तिकडे गद्दाफीचं सरकारी टीव्हीवर विक्षिप्त भाषणं देणं वगैरे चालूच आहे. पण आताशा लढाई भलतीच हातघाईची होत चाललीय. त्रिपोली हाच गद्दाफीचा गड आहे, ज्यादिवशी तो पडेल, गद्दाफीचा अंतही तिथेच असेल. गद्दाफी अन त्याचा वारसपुत्र सैफ-अल-इस्लाम (इस्लामची तलवार) दोघेजण मुलाखती देत सुटलेत. आमच्या सच्च्या नागरिकांचं कसं आमच्यावर प्रेम आहे आणि जे विरोधक आहेत, ते सगळे अल-कायदा, अमेरिका अन इटलीनं चिथवलेले किंवा ड्रग्ज घेतलेले तरूण आहेत वगैरे गोष्टी बडबडत सुटलेत. नुकतीच प्रसिद्ध झालेली ख्रिस्तियान अमानपोरनं घेतलेली गद्दाफीची मुलाखत बरीच गाजली अन त्याची टवाळी झाली. त्यामध्ये तो माझ्या लोकांचं माझ्यावर प्रेम आहे वगैरे बडबडतो. त्यामुळे त्याला मुअम्मर 'माय पीपल लव्ह मी' गद्दाफी असं टोपणनावही पडलंय! पण ह्यात आश्चर्य वाटण्याजोगं काहीच नाही, कारण इतकी वर्षं असंच असंबद्ध बोलूनही जगामध्ये उजळ माथ्यानं वावरलेला तो मनुष्य आहे. त्याला ठाऊक आहे की ह्या स्थितीमधून पुढे जर तो हा उठाव क्रूरपणे दडपण्यात यशस्वी झाला तर वर्षा-दोन वर्षांत सगळं पाश्चात्य जग त्याला पुन्हा स्वीकारेल. हेच कटू सत्य आहे. आज मानवाधिकाराच्या गप्पा मारणार्‍या पाश्चात्य देशांचे इतिहास किती मानवाधिकारांची पायमल्ली करणारे आहेत आणि ह्यांना ह्याच गद्दाफीचं सत्य आजपासून महिनाभरापूर्वीपर्यंत दिसत नव्हतं?
पण उठाव अन लढा अजून चालू आहे आणि ह्यावेळेस लोकं हवं तेव्हढं रक्त सांडायला तयार आहेत. ४२ वर्षांपूर्वी रक्तहीन क्रांती करणार्‍या गद्दाफीला उखडून फेकण्यासाठी मात्र रक्तरंजित क्रांतीमध्ये रक्ताचे सडे पाडावे लागताहेत हा केव्हढा मोठा दैवदुर्विलास आहे. आता सर्व पिचलेल्या अन सदसद्विवेकबुद्धी जागृत असलेल्या जगाच्या शुभेच्छा लिबियन जनतेसोबत आहेत आणि ही सैफ-अल-अवाम (जनतेची तलवार) गद्दाफी राजवटीचं शिर कापूनच म्यान होईल हीच शुभेच्छा!