Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

5/09/2011

चारोळ्या - पुन्हा एकदा

चालत्या बोलत्या दुःखांना
मधेच वाचा फुटते
एकमेकांचं ऐकून
ओठांवर हास्याची लकेर उमटते

----

उडत्या पक्ष्याला कधीकधी
जमिनीचा विसर पडतो
जागा कळून पुन्हा ओळख पटताना
चार-दोन पंखांचा बळी जातो

----

वेड्या वार्‍याला आपल्या शक्तीचा
पुरेसा अंदाज नसतो
समुद्राबरोबरच्या निरागस खेळात
कुणाचा उभा संसार कोलमडतो

----

एकदा गिरक्या घेता घेता
उकाड्यानं पृथ्वीला चक्कर आली
लाख-दोन लाख माणसं मेली अन
शे-दोनशे खडबडून जागी झाली

----

खोटं बोललं म्हणून शिक्षा भोगायला
मी काय आता लहान आहे?
खरं बोललो तर शिक्षा होईल भाऊ
माझा भारत महान आहे

----

4/05/2011

तो

वैराण रस्त्यावरचा मैलाचा दगड
त्यावर बसलेला तो
आणि जमिनीमध्ये विरघळलेली नजर
डोक्यात केवळ प्रश्न
साथीला भर दुपारी भरून आलेलं आभाळ
आणि तितकंच भरून आलेलं मन
नजर जाईल तिथवर फक्त वैराण रस्ता
पण पावलं पुढं सरकायला नाखुष
अधूनमधून मागे पडलेल्या रस्त्याचा अदमास घेणारे डोळे
कधी काठोकाठ भरून तर कधी कोरडे पडून
अचानकच जसा नेहमी येतो, तसाच
त्याही थांब्यावर 'तो' आला
'ह्या'ला रस्त्याची कधीच गरज का पडत नाही
असा विचारही त्याच्या मनात तरळून गेला
साधंसंच पण आश्वासक हसत त्यानं
खांद्यावर टाकलेला ओळखीचा हात
आणि त्याच्या स्पर्शातली ती ऊब
हजारो जन्मांचा शीण जणू वितळवून टाकणारी
"मागे वळून काय पाहतोस?" 'त्या'नं विचारलं
मागल्या फाट्यावर सुटलेलं बरंच काही आठवलं
"फाटा तरी दिसतो का आता?"
शोधक नजर पुन्हा निराश झाली
"आणि फाट्यापर्यंत पोचेस्तोवरची पावलं?"
निराशेचं रूपांतर वेदनेत झालं
"आता पावलांचे ठसे पाहत अश्रू गाळणार?
की पुढच्या रस्त्यावर नवे ठसे उमटवणार?"
वेदना कमी झाली नाही पण
पुढच्या पावलांसाठीचा जोर आला
नजरेचा मागे वळण्याचा हट्ट कमी झाला नाही
पण पुढे बघायची इच्छा झाली
पुन्हा पुढे वैराण रस्ता, नवनव्या फाट्यांची भीती
मनकवड्या 'त्या'चा हात लगेच पडला खांद्यावरती
पुन्हा ते साधंसंच हसू, 'आहे मी' असं सांगणारं
बिनधास्त पुढे हो असं न बोलून समजावणारं
पावलं पुढे टाकण्याआधी त्यानं 'त्या'ला मिठी मारली
भरून आलेलं आभाळ अखेर एकदाचं बरसलं
वैराण रस्त्याचा दाह थोडा कमी झाल्यागत वाटलं
पहिलं पाऊल टाकून तो एकदा मागे वळला
फाट्याप्रमाणेच 'तो'ही आता तिथे नव्हता
पुढची पावलं टाकताना एकच विश्वास होता
पुन्हा फाटा फुटताना खांदे पडताच सावरायला
'तो' नक्कीच येणार होता

3/24/2011

वाईट दिवस

सकाळी घड्याळाचा गजर वाजलाच नाही
वेळेवर झोप उडालीच नाही
चहाचं आधण ऊतू गेलं
अन इस्त्री केलेल्या एकमेव शर्टाचं बटण तुटलं
चुरगळलेल्या शर्टावर चहाचा थेंब आणि
बससाठीची धाव नेहमीचीच सेम
आज नेमकी बस डोळ्यासमोर सुटली
कधी नव्हे ती पावलं रिक्षाकडे वळली
एरव्हीचे रिकामटेकडे रिक्षावाले आज कामात गर्क होते
एरव्हीचा तोंडी अपमान आज फक्त नजरेनंच करत होते
चरफडत उन्हात स्टेशनाकडे चालत
निघालो सोमवार बाजाराची गर्दी पाहत
आज ट्रेनांना कशानं दुप्पट गर्दी
डब्यामध्ये नेमके संगीतरसिक दर्दी
स्टेशनातनं बाहेरचीसुद्धा बस पुन्हा चुकली
चरफडतच पुन्हा रिक्षाकडे नजर गेली
चमत्कारच की रिक्षावाला चक्क हो म्हणाला
त्याक्षणी कदाचित मुलीचा होकारही असता मिळाला
माझ्याच आनंदाला माझीच नजर लागली
रिक्षा ट्रॅफिकात दोन तास थांबली
घामेजलेला शर्ट आणि आंबलेलं मन
ऑफिसातला लेट पंच अन नुसतीच तणतण
"बेक्कार दिवस आहे यार.." शेजार्‍याला म्हणालो
तो दिसला नाही म्हणून नुसताच सुस्तावलो
"त्याचं कळलं नाही का?" आवाज आला दुरून
प्रश्नार्थक नजरेनंच पाहिलं मी दोन टेबलं सोडून
"दोन तासांपूर्वी इथेच एक चौक आधी
घाईत रस्ता ओलांडताना आला तो गाडीखाली
नेला लगेच उचलून सगळ्यांनी हॉस्पिटलात
आहे ठीक आता पण तीनेक आठवडे घरात"
ट्रॅफिकचा गोंधळ आता माझ्या नीट लक्षात आला
वाईट दिवस माझा चक्क वरदान वाटू लागला

3/13/2011

भोग

(माझ्या सर्वांत आवडत्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'ओल्डबॉय' (हिंदीत 'ज़िंदा' ही निर्लज्ज, भ्रष्ट कॉपीदेखील आहे). त्यामध्ये मध्यवर्ती पात्राला अचानक किडनॅप करून कोठडीत बंद केलं जातं. कशासाठी, कुणी, किती काळासाठी ह्या प्रश्नांची उत्तरं नाहीत. खोली एखाद्या हॉटेलच्या खोलीसारखी मूलभूत सोयींनी युक्त, पण बाकी काहीच नाही. अशी चौदा वर्षं तो काढतो. त्याच्या अवस्थेवर सुचलेली एक कविता. अर्थात कविता जास्त कळण्यासाठी सिनेमा बघितलेला असणं चांगलं. पण एक वॉर्निंग ही की हा सिनेमा फार म्हणजे फारच बोल्ड आणि हिंसक आहे, सर्वांना झेपणारं काम नाही.)

एकांती बसलो इथे मी
शांत अन हतबुद्धही
पाहतो चोहीकडे अन
नाही पाहत काहीही

दृष्टीस पडणे हे कधी का
पाहण्यासम भासते?
स्थिरचित्रही भिंतीवरीचे
पाहूनी मज लाजते

चलचित्र जेव्हा माणसांचे
भ्रम उभारू लागले
गंध अन संवेदनांचे
बंध निसटू लागले

एक केवळ गंध उरला
गूढ अन परिचित असा
संगीत येई घेऊनी ते
मूर्च्छनेचा एक ठसा

मोजतो मी दिवस वर्षे
अन कधी सेकंदही
वाट बघणे हेच हाती
निस्तेज मग ते अंकही

सर्वकाही तेच ते पण
भास अन आभासही
वीट येतो घेऊनी ते
श्वास अन उच्छवासही

सोडले जेव्हा पळांचे
मांडणेही गणित मी
मांडला मी ठोकताळा
केली मी पापे किती

कोण तो घायाळ इतका
सूड ज्याचा संपे ना
कोण जो निष्ठुर इतका
की मला संपवेही ना

भरली मग पाने वहीची
एकमेकांमागुनी
थक्क झालो मी पुन्हा
ती सर्व पापे पाहूनी

एकदा मी फक्त त्या
चळतीकडे मग पाहिले
भोग माझ्या भाळीचेही
शेवटी ओशाळले

2/06/2011

काऊन्सिलिंग

..असं झालं रे
म्हणून त्यानं बोलणं संपवलं
नजर वर करून माझ्या डोळ्यात
उत्तर शोधायला बघितलं
मी शांतपणे ग्लासातून
अजून एक घोट घेतला
अन फक्त त्याच्या खांद्यावर
दोन क्षण हात ठेवला
हसू त्याच्या चेहर्‍यावर
जणू सहजच उमललं
काऊन्सिलिंगचं गमक मला
अचानकच उमगलं
रोजच्या रोज आता
नवीन लोकं भेटू लागले
मी घोट घेता घेता
उसासे सोडू लागले
माझे कान ऐकोत न ऐकोत
हात खांद्यावर पडत होता
उत्तरं नको होती कुणाला
असण्यानंच फरक पडत होता
एक हात खांद्यावर होता
अन दुसरा कायम ग्लासावर
पण त्याच्या असण्याचा कधी
प्रभाव नसावा माझ्यावर
आज मात्र भलतंच माझं
मन खायला उठलंय
पण माझं काऊन्सलिंग करायला
कुणाला काय पडलंय
आणि लक्ष गेलं माझं
फडताळावर तो बसला होता
नक्की आठवत नाही आत्ता
पण माझ्याकडे पाहून हसला होता
..असं झालं रे
म्हणून मी बोलणं संपवलं
नजर वर करून त्याच्याकडे
उत्तर शोधायला बघितलं
तो स्थितप्रज्ञासारखा टेबलावर
समाधीस्थ बसला होता
काऊन्सिलिंगचा खरा मानकरी
बहुतेक कायम तोच होता!

1/29/2011

झापडं

जन्माला मीही तिथेच आलो
पण बाकीच्यांइतका नशीबवान नव्हतो
माझ्या बापाकडे पैसा नव्हता
रूढार्थाने मी श्रीमंत नव्हतो
मोठं होता होता कळलं
श्रीमंती पैशांची नसते
श्रीमंती असते संस्कारांची
तिथे मी कमनशीबी नव्हतो
नोकरीला लागेस्तोवर जगच बदललेलं
एकदम अंगावर येणारं
प्रत्येक गोष्टीसाठी पैसा मागणारं
अन देणारा मी एकटाच नव्हतो
नव्या जगाच्या नियमांना
सरावणं फारच अवघड होतं
संस्कारांवर दरोडा पडला
पण पुरेसा श्रीमंत मी होत नव्हतो
सरकारी चाकांना वंगण लागतं
हे निर्लज्जपणे सांगत होतो
पण कुटुंबाची जवाबदारी उचलणारा
मी काही जगात एकटाच नव्हतो
डोळ्यांवर झापडं घालून चालताना
सगळीकडचा हाहाकार अनुभवत होतो
मी अन माझं घर ह्यापलिकडे
कुणाचं देणं लागत नव्हतो
कॅन्सरसारखी खोल विवेकबुद्धि
हाडांमध्ये रुतून बसलेली
तिची हाक टाळून चालत राहायला
मी कुणी राजकारणी नव्हतो
एक दिवस दुखणं असह्य झालं
अन साकळलेलं रक्त बाहेर आलं
इतक्या वर्षांचा साचलेला आवाज
थांबवायचा प्रयत्न मी करीत नव्हतो
तोंडावर कुलूप लावून जगणार्‍यानं
जगाचा नियम मोडला होता
राखणदारांच्या झोपा उडल्या
पण मी आता थांबणार नव्हतो
तेव्हा जगानं झापडं बंद केली
जेव्हा काडी माझ्या दिशेनं झेपावली
आग मलाच लागली होती
पण मी एकटाच जळत नव्हतो

1/26/2011

काही (फुटकळ) चारोळ्या

(माथाटीप - सर्वांच्या वतीने 'आवरा' मी आधीच म्हणून घेतोय स्वतःला, पुनरुक्ति टाळावी :D )

कधीतरी शांतपणे चालताना विचित्र जाणीव होते
काहीतरी मागे सुटून गेलं अन नकळत वाट वळते
नव्या नवख्या वाटेवरती नवलाईच्या सोबतच
सुटून गेलेल्या कसलीतरी रूखरूख लागून राहते

----

ऋतू तो पानगळीचा जरी ओरबाडून गेला
दिसण्यास तो जरीही सर्वस्व घेऊनी गेला
तरी अंतरी अजूनी तो ध्येयाग्नी आहे
मी वृक्ष कालही होतो मी वृक्ष आजही आहे

----

लाटांच्या आधाराने समुद्र लाथाडीत होतो
क्षितिजाच्या नजरेने सूर्य बुडवीत होतो
बुडता बुडताही तो फिस्सकन हसला
अन कल्पनेचा प्रयत्न कल्पनेतही फसला

----

उदास संध्याकाळी एकट्या वाटसरूला
ना चालण्यात मर्जी ना थांबण्यात अर्थ
दूर थांबलेले पैलतीर ते खुणावे
जड संथ पावले पण सावलीत गर्क

----

वेडा म्हणून कोणी मला एकदा हाक मारली
मी नजर वर करून भुवई वर केली
दोन क्षण नजरानजर झाली अन
'हाक मी नाही मारली' म्हणत प्रतिबिंबानंच नजर खाली केली

----

दिसतोस उंच शांत ऐटीत डोलताना
स्वातंत्र्यदिन कधी अन गणतंत्रदिनही आहे
मज पामरास किंतु अप्रूप काय त्याचे
भाकरीच्या चंद्रकळांना मी ओळखून आहे!

----

1/25/2011

झोल आहे

झोल आहे

कविता करायची आहे असं ठरवून
कागद पेन घेऊन बसणं फोल आहे
नेहमीच असं घडतं म्हणजे
आपल्याच अकलेत झोल आहे

फुका ट ला ट करण्यापेक्षा
अर्थवाही शब्दांना मोल आहे
पण तेदेखील जमण्याइतपत
आपली बुद्धि कुठे खोल आहे?

हल्ली जिकडे बघावं तिकडे
कसलं ना कसलं ओपिनियन पोल आहे
पण सत्तेच्या खुर्चीत सगळा प्रकार
होल ऍन्ड सोल आहे

आमची कविता म्हणजे
राष्ट्रकुलमधला ओव्हररेटेड टॉयलेट पेपर रोल आहे
अन कांदा महागल्यानं हुंगवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या
फाटक्या बुटाचा सोल आहे

एका कडव्यात तरी राजकीय भाष्य
हा कवीनं ठरवलेला गोल आहे
बाकी कविता म्हणजे कापला गेलेला
पतंग भरदोल आहे

स्वतःच्याच स्वतःबद्दलच्या गैरसमजांची
केलेली पोलखोल आहे
स्वतःलाच समजावण्याचा एक प्रयत्न की
"मित्रा, दुनिया गोल आहे"

स्वतःला कवि न समजण्याइतपत
समज माझी समतोल आहे
प्रतिभावंत हिर्‍यांच्या गर्दीत
मी आपला एक कोल आहे..

(टीप - उगाच काहीही)

12/02/2010

कधी कधी वाटतं...

(टीप - सदर कविता स्वतःच्या जवाबदारीवर वाचावी. आधी ही कविता आहे का हेच नक्की नाहीय, तरीही.)

कधी कधी वाटतं...

आरशात पाहताना प्रतिबिंब दिसावं...आणि ते ओळखता यावं...

कधी कधी वाटतं...

आरशातल्या प्रतिबिंबाशी नजर मिळवावी...आणि कुणाचीच नजर झुकू नये...

कधी कधी वाटतं...

गुलाब कुस्करला जाताना...बोटही रक्तबंबाळ व्हावं...

कधी कधी वाटतं...

वाट फुटत राहावी ...निवडावी लागू नये...

कधी कधी वाटतं...

पावलं पडत राहावीत...अन् वाट कधी संपू नये...

कधी कधी वाटतं...

चुकीच्या वाटेवर चालतानासुद्धा...धीर मात्र खचू नये...

कधी कधी वाटतं...

मागे वळून पाहताना...नजर अनोळखी वाटावी...

कधी कधी वाटतं...

श्वासांचं गणित मांडताना...एखादा हातचा निसटून जावा...

कधी कधी वाटतं...

एकदातरी उडता यावं...अन् क्षितिजापुढचं पैलतीर दिसावं...

कधी कधी वाटतं...

एकदातरी...स्वतःला डोळेभरून पाहता यावं...

11/04/2010

कविता

मी आज कविता लिहायचीच असा निश्चय करून बसलो होतो. पण नेहमीप्रमाणेच काव्यदेवता माझ्यावर रूष्ट आहे. काही म्हणजे काही केलं ना, तरी कविता हा प्रकार मला वश होतच नाही. कित्येकदा अनेकांच्या ब्लॉग्जवरच्या सुंदर सुंदर कविता वाचून आनंद घेण्याऐवजी, 'कसं जमतं राव?' असले कोते विचार मनात येऊन मूड खराब होतो. हल्ली मात्र ते कमी झालंय, कारण एकदा स्वतःची लायकी स्वतःला समजावली की असले प्रकार आपोआप कमी होतात.

आई-बाबा सांगतात की मी जेव्हा लहान होतो, तेव्हा अगदी पार दोन वर्षांचा वगैरे होईपर्यंत बोलत नव्हतो. गप्प स्वतःचे धंदे चालू असायचे. तेव्हा मी बोलावं असं सगळ्यांना वाटायचं. पण मग मी एकदाचा बोलायला लागलो आणि पार 'आता पुरे बोलणं' असं म्हणायची पाळी आली लोकांवर. तर सांगण्याचा मुद्दा हा, की बोलणं मुबलक. त्यामुळे लिहिण्याची खुमखुमी असणं स्वाभाविक आहे. त्यातूनच लहानपणी निबंध आणि मोठेपणी ब्लॉग लिहिणंही आलं. पण एव्हढं सगळं होऊनही ती अप्राप्य कला काही साधेना ज्यासाठी पार लहानपणापासून तपश्चर्या केली. अगदी लहानपणी जेव्हा लिखाणाची खुमखुमी प्रथम सुरू झाली, तेव्हा आपण कवी व्हावं ही इच्छा होती. कशी, का ठाऊक नाही, पण वाटायचं जाम की आपण कवी व्हावं. कुठेतरी वाचलं असेल कुसुमाग्रज वगैरेंबद्दल. ते जे काय असेल ते, पण मुद्दा हा की आम्हाला व्हायचं होतं कविराज. पण कुसुमाग्रज वगैरे सोडा, आम्ही कवि कलश अर्थात कब्जी कलुषा पण नाही होऊ शकलो.

मग एकदा संध्याकाळी बिल्डिंगच्या आवारात आवारागर्दी करताना एकदम 'स्फूर्ती' मिळाली. मी धावत धावत घरी गेलो आणि एक वही आणि पेन घेऊन खाली आलो. बागेत जाऊन बसलो आणि चंद्राकडे एकटक पाहू लागलो. सोबत खेळणारा मित्र काळजीने काय झालं म्हणून विचारू लागला. 'कविता सुचतेय' असं कविराज वदले. आणि कविराजांनी चक्क एक कविता पाडली. ही 'हा पिवळसर चंद्र' अशी काहीशी सुरूवात असलेली कविता महत्प्रयासाने शाळेच्या वार्षिकात छापून आणली होती. आणि अशा प्रकारे मी पहिली पायरी पार केली. माझ्या नावावर ऑफिशियली एक कविता लागली. चार शिक्षक ओळखू लागले. थोडक्यात आमचं काम झालं.

तसा मी एकदम गद्य माणूस, कवितांमध्ये कधी फारसा रमलो नाही हे सत्य. एकदा शाळेत काव्यपठण/वाचन स्पर्धा होती. आवडलेली कविता वाचून किंवा हावभावांसकट पाठ म्हणून दाखवायची होती. आईनं तिच्या कॉलेज लायब्ररीतून कुसुमाग्रजांचा काव्यसंग्रह आणला होता आणि मी हौसेनं त्यातली एक कविता पाठ करून म्हणालो. मला उत्तेजनार्थ मिळालं होतं. मी ते उत्तेजन खूप सिरियसली घेतलं आणि रद्दीच्या दुकानातून कुठलासा काव्यसंग्रह विकत घेऊन आलो. दोनेक पानांमध्ये कळलं, की हे आपले काम नोहे. ना मला ती पाठ केलेली कविता कळली होती, ना त्या रद्दीच्या दुकानातल्या पुस्तकातली. थोडक्यात जिथे शॉर्टकट तिथे आम्ही नाही. उगाच दोन ओळींमधे वीस ओळींचा अर्थ शोधा, त्यापेक्षा वीस ओळी वाचा की. पुन्हा अलंकार, मात्रा, वृत्त, गेयता आणि न जाणे काय काय. कुणी सांगितलेत नाही ते धंदे. मस्त टेकायचं आणि गद्य वाचायचं शांत.

त्यानंतर मात्र आम्ही मूळ अर्थात गद्य स्वभावाकडेच वळलो, अर्थात इमानेइतबारे शालेय निबंध लिहू लागलो. मग कॉलेजात असताना एकदा सावरकरांचं छोटंसं चरित्र कुठेतरी वाचून आणि दामोदर चाफेकरांवरचा त्यांचा पोवाडा वाचून पुन्हा एकदा स्फूर्ती आली. आणि मग सावरकरांवरच एक कविता रचली होती. 'कसली भारी झालीय' असं मला बरेच दिवस वाटत होतं. मी 'काव्यकेसरी' झाल्यागत ती कविता मी आई-बाबांना दाखवली होती आणि 'छान छान' एव्हढं ऐकलं होतं. आता ती कविता कुठे आहे ते लक्षात नाही. फडतूस होती, पण जपून ठेवायला हवी होती असं मात्र वाटतं.

कॉलेजच्या मासिकासाठी म्हणून वर्गाच्या खिडकीतून दिसणार्‍या एका सुंदर चेहर्‍यावरही एकदा कविता केली होती. पण ती घडी वगैरे घालून खणात ठेवलेली होती आणि एके दिवशी खण आवरताना ती आमच्या ज्येष्ठ बंधूंच्या नजरेस पडली. त्यांनी आश्चर्यमिश्रित काळजीनं आम्हाला बोलावून तो कागद आमच्यासमोर नाचवला. आम्हाला घाम फुटला आणि कविराज अनेकवचनातून एकवचनात आले. मी कसाबसा त्याला समजावू शकलो, की ती खरंच कॉलेजच्या मासिकासाठी लिहिली होती. पण त्या प्रसंगा नंतर मी ती कॉलेजच्या मासिकात न देण्याचं निश्चित केलं. ती कविताही आमच्या कपाटाच्या उदरात गडप झाली कुठेतरी.

पण मग अचानक प्रगल्भता किंवा प्रौढत्व का काय म्हणतात ते आलं बहुतेक. कारण मला ते अलंकार, मात्रा, वृत्त, गेयता अर्थांमागचा अर्थ वगैरे फंडे कळायला लागले. अगदीच दुर्बोध असं काही वाटेनासं झालं. कवितेचा आनंद घेणं म्हणजे काय, ते थोडंफार का होईना कळू लागलं. मग आमच्यातले सुप्त कविराज पुन्हा जागे झाले. पण हाय रे दुर्दैवा, ह्यापूर्वी तीन चारदा जसे सहज सुलभ ते प्रकटले होते, तसे आताशा होईनात. कारण आता त्यांच्यावर विविध साहित्यिक मूल्यांचं ओझं पडलं होतं. प्रतिभेच्या मर्यादा ह्या ओझ्यांमुळे अधिकच आक्रसल्या होत्या. ती जुनी 'स्फूर्ती आलीय' वाली निरागसता लोप पावल्याचं कविराजांच्या लक्षात आलं आणि ते आले तसेच नाहीसे झाले.

अजूनही स्वतःला वारंवार समजावूनही कधी कधी मनाच्या विविध अवस्थांमध्ये तो कवि जागा होतो आणि व्यक्त व्हायचा प्रयत्न करतो. पण मनावरची ओझी आणि प्रतिभेच्या मर्यादा त्याला झेपत नाहीत. मग खरडलेले चार शब्द बॅकस्पेसचं भक्ष्य बनतात. मग बोटं काहीतरी असंबद्ध टंकत राहतात, डोळे कवितेची एक झलक पाहण्यासाठी तरसत राहतात आणि कविता दूर धुक्यात बसून मोनालिसासारखं गूढ स्मित करत राहते, आपल्या अप्राप्य असण्याची जाणीव करून देत राहते.

5/23/2010

मला तर बाबा काहीच कळत नाही

फार वर्षांपूर्वी दूरदर्शन सह्याद्री (कदाचित तेव्हा ते फक्त DD-१० होतं)वर नववर्षाचा एक कार्यक्रम लागला होता. नववर्षाचा कार्यक्रम म्हणजे तोच जो ३१ डिसेंबरला रात्री लागतो. एकेकाळी DD-१० वरचा तो कार्यक्रम दर्जेदारही असायचा. त्यावेळीही आमच्याकडे केबल असावं, पण मराठी वाहिन्यांचा सुकाळ नसल्याने आम्ही बाण्याला जागून कदाचित बाकी सगळ्या वाहिन्या(हिंदी) सोडून हा कार्यक्रम पाहत होतो. अर्थात मी बराच लहान होतो, मला फारसं काही आठवत नाहीये, फक्त प्रदीप पटवर्धन धूसर आठवतायत. पण त्या कार्यक्रमातली एक गोष्ट अगदी ठसठशीत लक्षात राहिली, ती म्हणजे त्यामध्ये दाखवलेल्या (कॉमेडी) कविसंमेलनात सादर केल्या गेलेल्या एका कवितेचं ध्रुवपद(हे एकदम 'इस दिल में क्या है धडकन, धडकन में क्या है साजन' च्या स्टाईलमध्ये झालं).

तर ते ध्रुवपद होतं, "मला तर बाबा काहीच कळत नाही।"

अहो खरंच, असंच ध्रुवपद होतं. तुमच्यापैकी कुणाला आठवत असेल हा कार्यक्रम. असो. नसला आठवत तरी हेच ध्रुवपद होतं. एव्हढी सगळी प्रस्तावना फक्त एव्हढ्यासाठी, कारण आज मी हेच ध्रुवपद उसनं घेऊन एक माझी बेसुमार सुमार कविता सादर करणार आहे. बर्‍याच वर्षांनी मी कविता करत आहे, तेव्हा चूकभूल द्यावी घ्यावी. एका कम्युनिटी साईटवर आढळलेलं एक छान प्रोफाईल वाक्यही इथे उद्घृत(क्लृप्ती प्रमाणेच सलग पाच वेळा हा ही म्हटल्यास जीभ साफ होऊ शकते, दोन्ही एकत्र म्हटल्यास सुपडाही साफ होऊ शकतो) करतो. "जर तुम्हाला माझे काम आवडले तर इतरांना सांगा, जर नाही आवडले तर फक्त मला"!

अथ :

सूर्य प्रकटतो पूर्व दिशेने पूर्वरंग दाखवतो,

ढगाळ आसमंतातही आशेचा किरण दाखवतो,

मनावरचे मळभ मात्र काही केल्या टळत नाही,

मला तर बाबा काहीच कळत नाही, मला तर बाबा काहीच कळत नाही।

थेंब बिचारे कोसळती अगणित जलधारांमधूनी,

त्यांच्या क्षणभंगूर अस्तित्वाची दखल ती घ्यावी कोणी,

आसुसलेल्या धरणीवरती आसराही का मिळत नाही,

मला तर बाबा काहीच कळत नाही, मला तर बाबा काहीच कळत नाही।

माणसे मरतात चटचट, किंमती वाढतात पटपट,

मुकी बिचारी कुणीही हाकण्याचे असिधाराव्रत, चालूच राहते अविरत,

प्रतिकारास्तव मुक्या तरूंचे एक पानदेखील का सळसळत नाही,

मला तर बाबा काहीच कळत नाही, मला तर बाबा काहीच कळत नाही।

पोलीसाच्या घरात होते चोरी, कानाखाली वाजवतात पोरी,

ऑफिसात नेहमीची स्टोरी, स्वप्नात बार्बरा मोरी,

हल्ली हटकल्यानंतर रस्त्यावरचं कुत्रंदेखील पळत नाही,

मला तर बाबा काहीच कळत नाही, मला तर बाबा काहीच कळत नाही।

उगाच काहीतरी विचार, डोक्याचं भजं साचार,

कितीही प्रयत्न केला तरी बदलत नाही आचार,

हव्या त्या योग्य वळणावर मनाचा कावळा का वळत नाही,

मला तर बाबा काहीच कळत नाही, मला तर बाबा काहीच कळत नाही।

आता संपवायलाच हवी कविता, नाहीतर आटून जाईल वाचकसरिता,

ओढूनताणून यमक आणिता, पडतील चारदोन सपाता,

एव्हढं कळून देखील प्रतिभेच्या मेणबत्तीचे मेण का वितळत नाही,

मला तर बाबा काहीच कळत नाही, मला तर बाबा काहीच कळत नाही।

इति।

तुम्हालाही काही कळलं नसेलच, त्यामुळे इथे मी तुम्हाला धन्यवाद म्हणण्याऐवजी तुम्ही मला धन्यवाद म्हणत असाल. त्यामुळे उगाच अजून संवाद साधायचा प्रयत्न करून वाद न वाढवता अपवाद म्हणून मी पोस्ट नेहमीपेक्षा लवकर, इथेच संपवतो.